शर्यत || कथा भाग ६ || Sharyat Katha Bhag 6 ||




कथा भाग ६

 रात्रभर शांता मध्ये मध्ये झोपेतून उठत होती. तिला मध्येच खोकला येत होता . सखाला तिच्या आजाराबद्दल काळजी वाटू लागली होती. पण तरीही तो तिला धीर देत होता. रात्र सखाच्या काळजी करण्यातच गेली.
सकाळी आवरून सखा कामावर जायला निघाला. त्याला कामावर जावं की नको अस वाटू लागलं. शांताकडे पाहून तो म्हणाला.
"शांता !! वैद्यबुवा म्हणाले होते !! तुझी तब्येत काळजी नाही घेतली तर अजून बिघडेलं म्हणून !! मी आज नाही जात कामावर !! " 
शांता सखाकडे पाहत म्हणाली.
"मला माहितेय तुमचा जीव माझ्यात अडकलाय !! पण तुम्हाला कामावरही जायचंय !! तुम्ही नका काळजी करू माझी !! मी बरी आहे !!!" शांता आलेली उबळ दाबत म्हणाली.
"माझं मन मला तुझ्याकडे खेचत आहे शांता !! कसा जाऊ मी कामावर !! " 
"जावं तर लागणार !! नाहीतर हे असच चालू राहणार !!" शांता सखाला समजावत सांगत होती.

सखा जड पावलांनी कामावर जायला निघाला. त्याच एक मन शर्यतीबद्दल विचार करत होत आणि एक मन शांताबद्दल विचार करत होत. या विचारांच्या द्वंद्वात त्याला काहीच सुचत नव्हतं. तसाच तो रखडत रखडत आप्पासमोर जाऊन उभा राहिला. सखाला पाहून आप्पा खुश झाले आणि म्हणाले
"व्हा !! व्हा !!सखा आलास तू !! बरं झाल रे !! सकाळपासून तुझी वाट पाहत होतो मी !! 
सखा काहीच बोलला नाही . पुन्हा कामावर आल्याबद्दल त्याला आनंद झाला होता. पण शांताकडे पाहून त्याचा धीर खचला होता. 
"सखा !! आज साहेबांनी तुला तिकडं बोलावलंय बरं !! सावंतवाडीला !! म्हणाले, सखा आला की ताबडतोब त्याला माझ्याकडं पाठवून दे !! "
"बरं आप्पा !! मग जाऊ का मी तिकडं !! " 
"हो जा !! " 
सखा जायला निघाला . पण तेवढ्यात आप्पांनी त्याला हाक मारून बोलावून घेतल.
"काय झालं आप्पा ?? " 
हातातला डबा देत आप्पा म्हणाले. 
"डबा कोण घेऊन जाणार ??"
"विसरलोच जरा !! द्या !! "

सखा डबा घेऊन निघाला. सख्याच काहीतरी बिनसलंय हे आप्पांच्या लक्षात आल. पण ते काहीच म्हणाले नाही. सखा धावत धावत सावंतवाडीला निघाला. मनात एकच विचार शांता बरी झाली पाहिजे !! 
"जिच्यासाठी मी एवढा अट्टाहास करतोय तीच आज अंथरुणाला खिळून बसलीय !! याच मला राहून राहून वाईट वाटतंय !! कित्येक दिवस आम्ही दोघांनी भिकारी म्हणून दिवस काढले.. आता कुठे चांगले दिवस येतायत, तर मागे शांताच आजारपण लागावं. पुन्हा त्या वैद्याकडे जावं तर पैसा लागणार. तो आणावा कुठून हेच मला कळत नाही. शांता बरी व्हावी एवढच मला वाटत . बाकी काही नको !! " सखा धावत धावत सावंतवाडीला पोहचला. समोर दुकान येतच आतमध्ये गेला. साहेब आपल्या कामात गुंग होते. त्यांनी एकदा सखाकडे पाहून त्याला थांबायचा इशारा केला. सखा दरवाजातच थांबला. साहेब कित्येक वेळ काम करत राहिले आणि नंतर समोरची वही बंद करत उठले.

"काय सखा !! आता बरा आहेस ना रे ?? कसं वाटत आता कामावर येऊन ??"
"जी चागलं वाटतंय !!" सखा तुटक बोलला.
"छान छान !! घे डबा इकडे !!" साहेब हात पुढे करत म्हणाले.
सखा साहेबांना डबा देतो डबा उघडताच त्यातून खमंग भाज्यांचा वास सर्वत्र दरवळतो. सखाकडे पाहत साहेब म्हणाले.

"काय सखा !! आज यायला उशीर तो केलास !! आणि डबा ही थोडा सांडलेला वाटतोय ??" 
"चुकी झाली साहेब !! येताना चुकून झालं असलं!! "
"बरं बरं !!" साहेब सखाच्या चेहर्याकडे पाहत म्हणाले आणि लगेच पुढे बोलू लागले,
"काही झालंय का सखा ?? का पुन्हा शिरपान त्रास दिला ??"
"नाही नाही साहेब !! शिरपा नाही !! माझी बायको शांता !! ती आजारी आहे कालपासून !! काल तुमच्या इथून गेलो, तर घरात बेशुद्ध होऊन पडली होती!! रात्री थोडी बरी झाली, तर सकाळी पुन्हा तब्येत खराब झाली."
"अरे मग पहिले नाहीका सांगायचं !! बरं जाताना आप्पाकडून पन्नास रुपये घेऊन जा !! चांगल्या वैद्याला दाखव तिला !! "
"उपकार झाले साहेब !! " सखा हात जोडत म्हणाला. 
"सखा ते तर तुला एक मदत म्हणून रे !! पण लक्षात ठेव सखा !! शर्यत आता फक्त तीन दिवसांवर आली आहे ! जत्रेला उद्यापासून सुरुवात होईल !! शर्यत परवा असेल !! तुला त्यात जिंकायचं आहे !! आपल्या गावाचा मान वाढवायचा आहे तुला लक्षात ठेव!! " साहेब जोरात बोलले.
सखा फक्त बघत राहिला.
"तुझ्या बायकोची तब्येत लवकर बरी होईल काळजी करू नकोस !! जा आता !!"

सखा पुन्हा धावत पळत सूतारवाडीला आला. साहेबांनी त्याला पन्नास रुपये देऊ केले याच त्याला राहून राहून नवल वाटत होत. त्याच्या मनात साहेबांविषयी आदर वाढला होता. सुतारवाडीला येताच त्याने आप्पांना सगळं काही सांगितलं.

"सखा सकाळी आलास तेव्हा एका शब्दान मला काही बोलला नाहीस !! सांगायचं तरी ना मला !!
"आप्पा काय करावं काही कळतं नव्हतं !! पण साहेबांनी खूप विचारलं तेव्हा सांगावं लागलं. " सखा शांत बोलत होता.
"बरं आता एक काम कर !! इथून पलिकडच्या गावात एक वैद्य आहेत त्यांना तू दाखव ते काय म्हणतात ते बघ !! खूप प्रसिध्द आहेत !! "
"बरं !!"

 आप्पांनी सखाला पन्नास रुपये दिले. तसा सखा धावतच घरी निघाला. त्याला कधी एकदा घराकडे जाईल असे झालं होत. धावत धावत तो घरी आला. शांता शांत झोपली होती. सखाच्या येण्याच्या आवाजाने ती जागी झाली. तिच्याजवळ जात सखा म्हणाला.
"आता बरं वाटता??" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
"मी बरी आहे हो !! " शांता दबक्या आवाजात म्हणाली.
सखा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.
"ताप आहे शांता तुला!!  आजार पण वाढतोय !! चल पटकन आपण वैद्यांकडे जाऊयात !! " 
"आहों पण पैसे ??"
"साहेबांनी पन्नास रुपये दिलेत !! " 
"आहों पण कशाला !! मी होईन बरी !! "
"हट्ट करू नकोस !! चल !!"

सखा शांताला घेऊन निघाला. जवळच्या ओळखीच्या एकाची बैलगाडी घेऊन शांताला घेऊन तो निघाला. रात्रभर बैलगाडी त्या गावाकडे जात होती. हळूहळू रस्ता मागे टाकत होती. पहाटे पहाटे सखा त्या गावी पोहचला. समोर त्या वैद्याचे घर दिसताच. त्याने बैलगाडीतून उतरून त्यांना हाक दिली. अर्धवट झोपेतून उठून वैद्यबुवा आले. त्यांनी लगेच परिस्थिती ओळखली. शांताला आत घेऊन या अशी खून त्यांनी केली.
बैलगाडी सोबत आलेला त्याने आणि सखाने शांताला हळूच उचलून घरात आणलं. क्षणभर सगळे शांत होते. तापेन शांतेच अंग फणफणत होत. तिचा श्वास दीर्घ झाला होता.

"हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! "
"काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." 
"बरं बरं !!" वैद्यबुवा सगळं ऐकून एक मात्रा शांताच्या ओठांवर ठेवत म्हणाले.
"हे बघा !! वयामूळ शरीर साथ देत नाहीये !! पण एक औषध देतो !! ते दर एक तासाला दुधात टाकून त्यांना देत राहा !!" बुवा औषधाची डबी सखाकडे देत म्हणाले.
"बरी होईल ना ती ??" सखा अगदिक होत म्हणाला.
"हे बघा !! प्रयत्न करणं आपलं काम आहे !! बाकी त्या देवाच्या मनात काय असेल ते !! पण ही मात्रा चुकवू नका !! या आता !!"

सखा शांताला घेऊन पुन्हा सूतारवाडीला आला. त्याला शांताची ही अवस्था आता बघवत नव्हती. दुपारपर्यंत ते घरी आले. शांता झोपेतून कशीबशी जागी झाली. तिला दर एक तासाला औषध सखा देऊ लागला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा नव्हता. पण पुन्हा कामावर जायची वेळ आली होती. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. त्याची ही घालमेल शांताने ओळखली आणि ती म्हणाली
" तुम्ही जरावेळ झोप घ्या!! आणि मग जा कामावर. मला आता ठणठणीत बरं वाटतंय !! " शांता अंथरुणावरून थोड वर उठत म्हणाली.
"माझा पाय निघत नाहीये !! " सखा तिच्याकडे पाहून म्हणाला.
"जावं तर लागेल ना ! साहेबांचा किती विश्वास आहे पाहिलं ना !! एका क्षणात त्यांनी पन्नासची नोट काढून दिली !! ती दिली नसती तर आज माझा इलाज करता आला असता का ?? "
"होना !! त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत !! थोडा वेळ पडतो !! आणि जातो !! डबा देतो आणि त्यांना सांगून घरी येतो लगेच !! "
शांता काहीच बोलत नाही. होकारार्थी मान हलवते. 

सखा जरा वेळ झोप घेतो. उन्ह डोक्यावर आल्यावर तो पुन्हा कामाला लागतो. दुकानावर त्याला पाहताच आप्पा विचारतात
"काय सखा जाऊन आलास का वैद्यानकडे ??"
"हो आप्पा !! जाऊन आलो !! औषधं दिलंय त्यांनी !! आता बरं वाटतंय तिला !!"
"पण सखा आता तुला काळजी घ्यायला हवी तिची आणि शर्यतीची सुद्धा !! सखा शर्यत दोन दिवसांवर आली आहे !! तुला त्याबद्दल सांगायचं आहे !! साहेब म्हणाले आता सखाला दुसरं कोणतं काम नाही !! फक्त शर्यत !!"
"साहेब म्हणतील तस आप्पा !! बोला मला काय करावं लागेल!!" 
"आधी शर्यत काय आहे ते ऐक !! आपल्या महादेवाच्या मंदिरापासून ते सावंतवाडीच्या महादेवाच्या मंदिरापर्यंत ही शर्यत असेल!! या शर्यतीचा नियम फक्त एकच !! जो जिंकला त्याची सत्ता !! त्यामुळं कोणी शर्यतीत तुझ्यावर वार करेल !! तुझा जीव घेण्याचाही प्रयत्न होईल !! पण त्याला प्रतिकार करत तुला तिथं पोहोचाव लागेल. जर कोणी जास्तच अंगावर आला तर जीव घ्यायलाही मागेपुढे बघू नकोस !!"
"जीव घ्यायचा !??" सखा डोळे विस्फारून बघू लागला.
"होय सखा !! जीव घ्यायलाही !!"
"आणि लोक अस करतात ??"
"होय !! कित्येक लोकांचा जीव गेलाय यात !! पण तरीही ही शर्यत जिंकली पाहिजे म्हणून नवीन लोक उतरतं राहतात पटांगणात !! शेवटी राजाच्या दरबारात मान कोणाला नको वाटेल!! "
"मला जमलं ??"
"का नाही जमणार ?? तुला फक्त पळायचं आहे !! तू नकोस कोणाच्या अंगावर जाऊ !!" आप्पा सखाच्या जवळ जात म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला. त्याला काय बोलावं तेच कळेना. 
"आजपासून तुला एवढच काम आहे सखा !! उद्या ठीक सकाळी दहा वाजता महादेवाच्या मंदिरात भेट शर्यतीची पूर्वतयारी करायची आहे आपल्याला !!"

सखा सगळं ऐकू. घरी जायला निघाला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. शर्यत ती जीवघेणी असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. मग नको म्हणावं का शर्यतीला असाही त्याचा मनात विचार आला. पण मग आपण साहेबांशी नमक हरामी केल्यासारखं होईल. त्यांनी एका क्षणात पन्नास रुपये दिले त्याची तरी जान ठेवावी लागेल. आणि नाही म्हणालो तर ते परत करावे तरी कसे मग !! अशाशा कित्येक विचारांनी सखा वेडावून गेला. 

सांजवेळी सखा पुन्हा घरी आला.

क्रमशः 

✍️योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...