माझे बाबा कविता || वडील कविता ||



















उसवलेला तो धागा कपड्यांचा,
कधी मला तू दिसुच दिला नाही !!
मला नेहमीच नवीन कपडे घेतले,
पण स्वतःस साठी एकही घेतला नाही !!

स्वप्नांच्या या दुनियेत चालताना,
तू कधीच स्वतःकडे पाहिले नाही !!
माझ्या स्वप्नांच्या दुनियेत येऊन,
रमल्या शिवाय राहिला नाही !!

बाबा!! किती रे तुझी ती धडपड,
मला तु कधीच कळू दिली नाही !!
दिवसभर काम करून आलेला,
थकवा सुधा जाणवू दिला नाही !!

आयुष्याचं गणित सांगताना,
कधीच तू चुकला नाही !!
पण मी जिथे जिथे चुकलो असेल,
तिथे सावरल्या शिवाय राहिला नाही !!

मनात तुझ्या किती ते प्रेम,
कधीच तू कळू दिले नाही !!
यशाच्या मार्गावर कठोर होताना,
क्षणभरही तू विचार केला नाही !!

सारे आयुष्य खर्ची करून,
स्वतःकडे काहीच ठेवले नाही !!
माझ्यासाठी जगताना बाबा तु,
स्वतःसाठी एक क्षणही जगला नाही !!!

✍️©योगेश खजानदार

माय माझी || आई मराठी कविता ||


"श्वास तो पहिलाच होता'
पहिलीच होती भेट माझी !!
रडत होतो मी तेव्हा आणि,
रडत होती माय माझी !!

पहिला स्पर्श माथ्यावरती,
नकळत देत होती माय माझी !!!
अश्रुंच्या त्या कडा तेव्हा,
पुसत होती माय माझी !!

मिठीत मला सामावून घेत , 
आपलंसं करत होती माय माझी!!
कळत नव्हते काहीच मला,
पण कळत होती माय माझी !!

कित्येक वेदना क्षणात विसरून,
हसत होती माय माझी !!
माझ्या आयुष्याची सुरुवात होऊन,
स्वतः स विसरत होती माय माझी !!

पाहून तिला मी पाहतच राहिलो,
प्रेमरूपी सागर माय माझी !!
जगात येताच घडले दर्शन,
त्या विधात्याचे रूप माय माझी !!

श्वास तो पहिलाच होता,
पहिलीच होती भेट माझी ..!!!"

✍️©योगेश खजानदार

चहा मराठी कविता || स्पेशल चहा (कविता) ||


अमृत म्हणा , विष म्हणा
काही फरक पडत नाही !!
वेळेवरती चहा हवा,
बाकी काही म्हणणं नाही !!

सकाळ सकाळ उठल्या उठल्या,
याच्या शिवाय पर्याय नाही !!
पेपर वाचत दोन घोट घेता,
स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही!!

दूध थोड कमी चालेल,
पण साखरे शिवाय पर्याय नाही!!
हो पत्ती थोडी जास्त टाका,
त्याच्या शिवाय मजा नाही!!

कित्येक चर्चा रंगल्या असता,
त्यास सोबत दुसरी नाही!!
एक कप चहा घेतला आणि,
गप्पा तिथे संपत नाही!!

वाईट म्हणतील काही यास,
आपण मात्र लक्ष द्यायचं नाही!!
वेळेला आपल्या एक कप तरी,
चहा घेणं सोडायचं नाही!!

आळस झटकून टाकायला,
याच्या सारखा उपाय नाही!!
कित्येक आजार याने मग,
पळून गेल्या शिवाय राहत नाही!!

टपरी वर घेतला असता,
गोडी काही कमी होत नाही!!
सिगरेटच्या दोन कश सोबत,
त्याची मैत्री काही तुटत नाही!!

अशा या चहाचे गोडवे,
लिहिल्या वाचून राहतं नाही!!
पण एक कप हातात येताच,
दुसरं काही सुचत नाही!!

तेव्हा , अमृत म्हणा ,विष म्हणा,
काही फरक पडत नाही ...!!

✍️©योगेश खजानदार

हळूवार क्षणात || रंग अधुऱ्या प्रेमाचे ||


अगदी रोजच भांडण व्हावं ,
अस कधीच वाटलं नाही!!
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं,
अस मात्र उगाच वाटतं राहत !!

थोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल व्हावं,
अस नेहमीच वाटत नाही!!
पण एकदा तरी क्षणिक रागवाव,
अस मनात सतत वाटतं राहत..!!

त्याच्या विरहात, खूप दूर निघून जावं,
अस स्वप्नातही कधी पाहिलं नाही!!
पण क्षणभर तरी दुरावा यावा,
अस सारखं मन बोलत राहत.!!!

खूप काही त्याने मला बोलावं,
असं ठरवूनही त्याला सांगितलं नाही!!
पण दोन शब्द प्रेमाचे बोलावे,
अस मात्र नेहमी वाटतं राहत!!

क्षणोक्षणी त्याने जवळच असावं,
अस वचन कधीच मागितलं नाही!!
पण हळव्या वेळी नकळत यावं,
अस त्याला सांगावं वाटत राहतं!!

त्याने व्यक्त व्हावं , सारखं  नजरेत असावं,
अस कधीच मला वाटल नाही!!
पण एकदा तरी, मिठीत घट्ट पकडून ठेवावं,
अस नेहमी वाटतं राहतं ..!!

✍️©योगेश खजानदार

मराठी चेहरा कविता || मराठी कविता संग्रह ||


कोणती ही मनास चिंता,
कोणती ही आठवण आहे !!
बदलून गेल्या चेहऱ्यास आता,
कोणती नवी ओळख आहे !!

कोणता हा रंग त्याचा,
कोणती नवी वाट आहे !!
पाहू तरी कुठे आता,
सारे काही नवे आहे !!

राहिले न आता आपुले काही,
त्याची व्यर्थ ओढ आहे!!
गेल्या क्षणात उगा शोधता,
सारे हरवून गेले आहे!!

पुन्हा पुन्हा परतून येता,
ती आठवण ही एकटी आहे!!
तिच्यासवे ओलावल्या तेव्हा,
अश्रूंची तेवढी साथ आहे!!

बदलून गेला रंग सारा,
कोणता हा दोष आहे!!
बदलला चेहराच जेव्हा,
कोणता हा शोध आहे!!

थांब जरा ओळख स्वतःस,
भरकटली एक जुनी साथ आहे!!
जिथे थांबली ती तुला सोडण्या,
अखेरची ती तुझी ओळख आहे!!

कोणती ही मनास चिंता,
कोणती ही आठवण आहे ..!!!

✍️© योगेश खजानदार

मराठी ओळख कविता || मराठी कविता मनातल्या ||


उरले ते काय पाहायला,
कोणती ती शोधाशोध असावी !!

नसावी त्याला तमा कशाची,
एक ती आस असावी!!

पण काय शोधत आहोत याची,
आपल्याला जाणीव नसावी!!

भरकटला वाऱ्यास तेव्हा,
उगाच त्याची दिशा पुसावी !!

नकळत का मग तेव्हा आपण,
स्वतःचीच ओळख विसरावी!!

उरले ते काय पाहायला
कोणती ती शोधाशोध असावी...!!

✍️©योगेश

क्षण मराठी कविता || Marathi Prem Kavita ||



बोलावंसं वाटलं तरी, काय बोलावं?? 
कधीच कळलं नाही !!

समुद्राच्या लाटेने ते मन, नकळत ओल केलं तरी,
मनास ते कधीच कळल नाही !!

सारा भार त्या अश्रूनवर होता ,
पण अश्रूंनी कधीच तक्रार केली नाही !!

गालावर ते ओघळले आणि,
एकांताची आठवणही झाली नाही !!

किनारा तो साथ देताना,
काहीच बोलला नाही!!

लाटेच्या त्या पुन्हा पुन्हा येण्याची,
 त्याने साधी चाहूलही दिली नाही !!

खरंच त्या भरती आणि ओहोटी मध्ये,
एक क्षणही शोधता आला नाही...!!!

✍🏼 योगेश खजानदार

एक लाट मराठी कविता || Marathi Poem ||


"अलगद स्पर्श करून जाणारी, 
समुद्राची ती एक लाट !!
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी,
पाहात होती माझीच वाट !!

साठवलेल्या मनात तेव्हा,
दिसत होती एक साथ !!
राहिले इथे काहीच नाही,
सांगत राहिली मनाच्या आत !!

किनारा उगाच ऐकत राहिला,
वाऱ्यासवे कसली बात !!
अबोल या क्षणाचे आता,
वेचू नकोस क्षण उगाच !!

सरत्या वेळी एकांत सारा,
वाटे जरी नकोसा आज !!
उद्या पुन्हा भेटण्याची मना,
नकोस ठेवू उगाच आस !!

काय राहिले काय शोधले,
मिळे न काही त्या जगात !!
निशब्द सारे खूप बोलले,
उरले न काही या मनात !!

सांग तरी का पुन्हा पुन्हा,
भेटण्यास यावी ती एक लाट !!
ओलावल्या या मनास बोलण्या,
पाहात होती माझीच वाट...!!"

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...