विरोध || कथा भाग ५ || Marathi Stories ||



कथा भाग ५ 

अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला.

"पण मला तुला बोलायचं नाहीये प्रिती !! तुला कळत कस नाहीये की हे आता शक्य नाहीये !!! तुझ लग्न झालंय प्रिती !! आणि मीही माझ्या संसारात, आयुष्यात सुखी आहे !! " 
"मग सोडून देऊयात हे सगळं अनिकेत !! मला फक्त तू हवा आहेस !!"
"इतकं सोपं असतं हे सगळं सोडण प्रिती!! नात सोडणं आणि जोडणं तुझ्यासाठी सोपं असेन !! माझ्यासाठी नाही !! कित्येक अश्रू वाहून गेले तुझ्या आठवणीत !! तेव्हा या श्वेताने मला सावरलं !! आणि माझं प्रेम आता फक्त श्वेता आहे !!"
"म्हणजे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही ?"
"नाही !!" अनिकेत एवढंच बोलतो आणि गाडीत बसून निघून जातो. प्रिती कित्येक वेळ तिथेच बसून राहते.

"नात जोडणं आणि तोडण नसेल कदाचित इतकं सोपं !! पण तुला गमावून मी चूक केली हे मात्र मला मान्य आहे अनिकेत !! तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम पाहिलंय!! माझ्यासाठी तुझी ओढ पण पाहिली मी !! आज कित्येक वर्षांनंतर तू मला भेटलास !! या काळाने तुझ प्रेम थोड हरवून गेलंय !! मी त्याला शोधणार नक्की!!! नक्कीच शोधणार !!" 
प्रिती डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली. तेवढ्यात समोर श्वेता येताना तिला दिसते. श्वेता प्रिती जवळ येत म्हणते.

"तुम्ही इथे ??"
"हो आले होते भेट घ्यायला !! पण आता उगाच आले अस वाटायला लागलं!!" प्रिती तुटक बोलते.
"म्हणजे ??" श्वेताला काहीच कळत नाही.
"काही नाही !! सहजच आले होते !! चल येते मी !!" प्रिती निघायला लागते. 
"आलाच आहात तर चला ना घरी !!" 
"नाही नको !! येईल नंतर ! " 
"प्रिती ताई एक बोलू !! भूतकाळाच्या आठवणीत एवढं गुंतू नये कधी !!त्रास होतो !!"
"आणि तो भूतकाळ विसरता येत नसेल तर ??"प्रिती श्वेताकडे पाहत म्हणते.
"तर आयुष्यात अजुन खूप काही करायचं आहे हे म्हणून चालत राहायचं !!आपल्या जवळच्या लोकांसोबत !! "
"आणि जवळचे लोक आपली साथ द्यायला तयार नसतील तर !!"
"जे आयुष्यात आपली साथ सोडून जातील ते आपले कोण ??" श्वेता प्रितीच्या डोळ्यात पाहते.

प्रितीला श्वेता काय म्हणते आहे हे लगेच कळत ती काहीच न बोलता निघून जाते. 

"सुंदर वळणावर आयुष्य जात असताना मध्येच अचानक मोठा डोंगर यावा असं काहीसं माझं का व्हावं मलाच कळत नाही !! मागे जावं तर आठवणी छळतात आणि पुढे यावं तर त्याच आठवणी यक्ष बनून आपल्या समोर उभ्या राहतात, ही कोणती गोष्ट मलाच कळतं नाही. माझं पहिल प्रेम म्हणून आजही तिचंच नाव या ओठातून माझ्या निघत. पण ते पहिलं प्रेम आता फक्त एक आठवण असेल तर काय करावं काहीच कळत नाही!! पण म्हणतात ना , प्रेम करणं सोपं असतं, पण जो आयुष्यभर आपली साथ देईल तेच आपलं खर प्रेम असत!! माझ्या सगळ्या परिस्थतीमध्ये श्वेताने मला साथ दिली , माझ्या खिशात दमडा नव्हता त्यावेळी ती माझ्यासोबत खंबीरपणे सोबत होती, मी हसलो ती हसली , मी रडलो ती रडली काय नि काय !! माझी श्वेता !!आजही माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे !!" अनिकेत ऑफिसमध्ये स्वतःत गुंतून गेला होता. 

 आज पार्कींग मध्ये त्याच्या मनात नसतानाही त्याने प्रितीला खूप काही सुनावलं होत. तुझ्या लेखी माझी किंमत किती या प्रश्नाला खरतर त्याला माझ्या लेखी तुझी किंमत अनमोल आहे अस म्हणायचं होत. पण अशाने तिचा हा वेडेपणा वाढला असता म्हणून अनिकेत तिला रागात बोलला.  हाच विरोध तिने मला सोडून जाताना स्वतःचा मनाशी , त्या खोट्या नात्याशी केला असता तर कदाचित ती या परिस्थितीत आलीच नसती. पण मला सगळंच हवं हे विचार तिला सुखी होऊ देत नाहीत.

 अनिकेत आज ऑफिसमधून घरी लवकरच आला. श्वेताला त्याने पार्कींग मध्ये प्रिती भेटली होती याबद्दल सगळं काही सांगितलं. श्वेताने ती पुन्हा तिला भेटली होती हेही सांगितलं. सगळं काही शांत असताना कित्येक वेळ अनिकेतचा मोबाईल वाजत राहतो. प्रिती त्याला खूप वेळ झालं फोन करत राहते. अनिकेत मोबाईल बंद करून ठेवतो. इकडे प्रिती बैचेन होते ,

"याला कळत नाही का !! माझ्या फोनला उत्तर द्यायचं !! पहिलं तर माझ्या सारख मागेपुढे करायचा आता ही श्वेता आली तर जास्त शहाणा झालाय हा अनिकेत !!" प्रिती गॅलरी मध्ये बसून बोलत असते.
आत सूरज निवांत पुस्तक वाचत बसलेला असतो. त्याला प्रितीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो.
"मूर्ख कुठला !! " प्रिती मोबाईल जोरात जमिनीवर आदळते. मोबाईलचे तुकडे तुकडे होतात.
सूरज धावतच गॅलरी जवळ येतो. खाली तुटलेला मोबाईल पाहत तो म्हणतो.
"काय झालं प्रिती ?? आणि मोबाईल का असा तोडलास ??"
"तू जा बर सूरज इथून !! आधीच माझं डोकं दुखतंय तू अजून नको त्रास देऊस !! "प्रिती आत खोलीत जात म्हणाली.

प्रिती खोलीत जाताच अडखळून पडते. पडल्यामुळे तिच्या पायाला जखम होते. सूरज धावत जाऊन मलमपट्टी घेऊन येतो.

"जरा नीट बघून चालायचं ना !!" जखमेवर मलम लावत सूरज तिला म्हणतो.
प्रिती स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत राहते.
"उठू नकोस !! थांब जरा वेळ!!" 
"राहू दे बर तू !!" प्रिती सूरजला लांब करत म्हणते.
"अस करू नकोस प्रिती !! काय कमी आहे आपल्यात सांग ना. !!सगळं काही आहे आपल्याकडे!! तू आहेस तर मी आहे प्रिती !!" सूरज प्रितीच्या डोळ्यात पहात म्हणतो. त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागतात.
प्रिती फक्त पाहत राहते काहीच न बोलता तसेच ती जागेवरून उठून आत जायला लागते. आणि तेवढ्यात मागे वळून म्हणते.
"मला divorce पाहिजे सूरज !!!"
"काय बोलतेय तू कळतंय का तुला प्रिती !!"
"हो !! मला तुझ्यापासून divorce हवा  आहे!! माझा हा निर्णय अंतिम आहे "
"असा वेडेपणा करू नकोस प्रिती !! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो !! तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार !!"

प्रिती पुढे काहीच बोलत नाही. ती खोलीत निघून जाते. सूरज भरल्या डोळ्यांनी आपल्या संसाराची झालेली वाताहत पाहत राहतो. हताश होतो. त्याच मन सुन्न होत. डोळ्या समोर फक्त अंधार होतो. रात्रभर त्या गॅलरी मध्ये बसून तो प्रितीच्या आणि त्याच्या कित्येक गोड आठवणीं पाहत राहतो. कित्येक वेळ सिगारेट ओढत राहतो.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार

विरोध || कथा भाग ४ || सुंदर मराठी कथा ||



कथा भाग ४

मेसेज टोन वाजताच अनिकेत श्वेता पासून लांब जातो. मोबाईल मध्ये पाहतो आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून तिच्या जवळ येतो. श्वेता अनिकेतकडे पाहत राहते आणि बोलते.

"अनिकेत एक विचारू ??"
अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो.
"विचारतेस काय !! बोल ना !!"
"आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! काही प्रोब्लेम तर नाहीना ??"
अनिकेत क्षणभर शांत बसतो आणि बोलतो.
"नाही ग !! काही प्रोब्लेम नाही!!"
"मग असा गप्प गप्प का आहेस ?"
"नाही तर !!" अनिकेत नजर चोरत बोलतो. 
श्वेता त्याच वागणं बरोबर ओळखते. 
"कॉफी घेशील ?"
"हो चालेल कर!!" 

 श्वेता कॉफी करायला आत निघून जाते. तेवढ्यात अनिकेत मोबाईल खिशातून बाहेर काढतो आणि मेसेज वाचू लागतो.

"अनिकेत !! आज मी तुझ्या घरी आले होते!! तुझ्या बायकोला भेटले! छान वाटलं !! पण आता मला एक क्षणही तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही!! मी काय करू सांग ना रे !! तुझा अबोला !! तुझा राग मला छळतोय रे !! अनिकेत !! मला बोल ना रे !!"

अनिकेत मेसेज वाचून मोबाईल ठेवून देतो. श्वेता कॉफी घेऊन येते.

"घे !! कसा गेला आजचा दिवस ?" श्वेता अनिकेत समोर बसतं बोलते.
"छान होता !! ऐक ना श्वेता !! मला तुला काही सांगायचं आहे !! "
"मला माहितेय तुला काय सांगायचं आहे ते !!प्रिती ना ??" श्वेता अनिकेत जवळ येत म्हणाली.
"तुला कसं माहिती !! प्रिती ने सांगितलं ??"
"नाही रे !! त्या दिवशी तिच्या डोळ्यात मी तुझ्याबद्दलच प्रेम ओळखलं होत अनिकेत !! "
"प्रेम नाही ते !! स्वार्थ आहे !!" अनिकेत एकदम बोलला.
"अस का म्हणतोय तू अनिकेत !!" श्वेता कॉफीचा कप बाजूला ठेवत म्हणली.
"कारण !! जी व्यक्ती एका क्षणात नात तोडून निघून जात असेल !! आणि आज अचानक पुन्हा जोडण्याचा मूर्ख अट्टाहास करत असेल त्याला दुसर काय म्हणावं तूच सांग !!! " अनिकेत श्वेताचा हात हातात घेत म्हणाला.
"पण ती इतक्या वर्षात तुला विसरली सुद्धा नाही !! हेही खरं आहे ना ??"
"पण त्या आठवणींना काय किंमत ?" अनिकेत श्वेताच्या डोळ्यात पहात म्हणतो.
 श्वेता काहीच बोलत नाही. अनिकेत तिला त्याच्या आणि प्रितीच्या भूतकाळातील नात्याबद्दल सगळं काही सांगतो. श्वेता सगळं काही ऐकुन घेते आणि म्हणते.

"पैसा नात जोडतो हे मान्य !! पण ते नात पैश्यासोबतच निघून जात हेही खरं !! "
"पण श्वेता ! एवढं सगळं लक्षात येऊनही तू मला एका शब्दाने बोलली नाहीस आज !! का ??"
"कारण अनिकेत माझा तुझ्यावर विश्वास आहे !! मला माहित होत हे सगळं तू मला नक्की सांगशील ते!!"

अनिकेत काहीच बोलत नाही. आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजतो. तो पाहतो तर तो कॉल प्रितीचा असतो. श्वेताला ते लक्षात येत. ती म्हणते.

"कोणाचा आहे फोन !! उचल ना !!"
अनिकेत फक्त मोबाईल स्क्रिन तिला दाखवतो. 
"मी बोलते तिला !! " अस म्हणत श्वेता अनिकेतचा मोबाईल घेते आणि फोन उचलते.

"हॅलो!!"
श्वेताचा आवाज ऐकुन प्रिती थोड्या चिडल्या आवाजात म्हणते.
"अनिकेत कुठे आहे ??"
"ते बाहेर गेलेत!! कोण बोलतंय ??"
"प्रिती बोलते ! आणि त्याला सांग !! आला की कॉल कर म्हणून. !! काम आहे !!"
"मला सांगा काय काम आहे !! मी सांगेन त्यांना !!"
"नाही काही गरज नाही त्याची !!" 
एवढं बोलून प्रिती फोन कट करते . श्वेता मोबाईल अनिकेतकडे देत म्हणते.

"बघ ना अनिकेत !! आयुष्याची सुंदर पान जेव्हा आपण लिहीत असतो तेव्हा कोणीतरी येत आणि दुसऱ्या आयुष्याची !! दुसऱ्या स्वप्नांची ओढ देत आणि या पानांना अर्धवट सोडून त्या खोट्या आयुष्याच्या मागे आपण लागतो!! पण जेव्हा ही आपली चूक आहे हे लक्षात येतं तेव्हा वेळ खूप पुढे निघून गेलेली असते अस वाटत ना !! तसचं काहीस प्रितीच झालं !! " 
"तिला खूप समजावून सांगितलं मी !! पण ती पुन्हा त्या तिथेच येते!! ती चुकली हे मान्य !! मी त्याबद्दल तिला माफही केलं ! पण याचा अर्थ असा नाही की पुन्हा ते नात जिवंत होईल !! "
"जिवंत तर आहेच रे ते अनिकेत !! तुझ आजही ते पहिलं प्रेम आहे हे तूही मान्य करतोस ना !!"
"हो पण आता त्या गोष्टीला अर्थ राहतोच कुठे ??"
"नात्याला अर्थ शोधायचा नसतो रे ! शोधावं ते प्रेम नात्या मधल!! तो जिव्हाळा !!"
"आणि तेच आता उरलं नाही !! आणि आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस श्वेता !! आणि मला यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाहीये!! आणि हेच मी तिला सांगत होतो!!" अनिकेत श्वेताला जवळ घेत म्हणाला.
श्वेता हे ऐकुन अनिकेतकडे पाहत हलके हसते. जणू त्याला आपल्या प्रेमाची साथ देते. हळू हळू ते दोघेही एकमेकात गुंतून जातात.

 त्या रात्री अनिकेत आणि श्वेता एकमेकांत रमून गेले. त्याच्या मिठीत श्वेता स्वतःला हरवून गेली. तिच्या ओठांवरील त्या चुंबनात अनिकेतच्या प्रेमाची गोडी होती.जणू ते ऐकमेकांस कित्येक भाव बोलत होते.

"क्षणात शोधावे प्रेम असे की 
तुझ्यात मी हरवून जावे
साऱ्या गोड आठवणीत तेव्हा
चित्र मज तुझे दिसावे 

ओठांवरच्या गोड चुंबनात
सारे प्रेम रिते व्हावे
मिठीत त्या तुझ्या मी तेव्हा
नकळत प्रेम व्यक्त करावे!!"

नव्या दिवसात पुन्हा अनिकेत आणि श्वेता आपल्या आयुष्याच्या वाटेवर लागतात. अनिकेत सकाळी लवकर आवरून ऑफिसला जायला निघतो. श्वेता त्याला नाष्टा घेऊन येते. अनिकेत नाष्टा करून ऑफिसला निघतो. पार्किंग मध्ये गाडी जवळ येतो. समोर गाडी जवळ त्याला प्रिती उभारलेली दिसते. तो काहीच न बोलता गाडी उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रिती गाडीचा दरवाजा जोरात बंद करत त्याला म्हणते.

"मला तुला बोलायचं आहे अनिकेत !! एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला ??"

क्रमशः 

✍️ © योगेश खजानदार

विरोध || कथा भाग ३ || हृदयस्पर्शी कथा ||



कथा भाग ३

 कित्येक वेळ तिथे बसल्या नंतर प्रिती घरी जायला निघाली. तिच्या मनात कित्येक विचारांचे आभाळ होते. डोळ्यात अश्रू होते आणि तिला सोडून जाणारा अनिकेत दिसत होता. आज खरंच प्रेमाने त्या पैशाच्या नात्याला कमजोर केलं याची जाणीव तिला झाली. रात्र खूप झाली, ती आता तिच्या घरी पोहोचली. सूरज तिची वाटचं पाहत बसलेला होता. 

प्रिती दरवाजा उघडून आत येते. समोर सूरज सोफ्यावर बसला होता. तिला पाहून थोड रागातच तो विचारतो.

"कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ??"
स्वतःला सावरतच प्रिती बोलते.
"मैत्रिणीकडे गेले होते!!!"
"यायला उशीर का झाला ??"
"झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते.
"कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतल भेटायला गेली होतीस ना ??"
प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
"हो!! मी त्यालाच भेटायला गेले होते.!! अजुन काही ??" 
"कशाला पण !! काल भेट झाली होती ना !!"
"मला भेटायचं होत त्याला !! मला भेटावसं वाटत त्याला !!" 
"सरळ सरळ सांगना प्रिती !! की आजही प्रेम करतेस तू त्याच्यावर !!" 
"हो !! करते मी त्याच्यावर प्रेम !!"
"माझ्या प्रेमाला तुझ्या मनात काहीच किंमत नाही !!" सूरज मध्येच विचारतो.
प्रिती गप्प राहिली, पण सूरज पुढे बोलला.
"तुला प्रिती तुझ प्रेम ही सोडावस वाटलं नाही !! आणि माझ्याकडे मिळालेलं सुखही !! स्वार्थी आहेस तू प्रिती !! स्वार्थी !!"

प्रिती काहीच न बोलता खोलीत निघून जाते. सूरज आता थोडा शांत होतो. शेजारीच ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढतो आणि पेटवून ओढू लागतो. असंख्य विचारांच्या समुद्रात बुडून जातो. सगळं काही अंधुक होत.

" प्रिती ! ज्यावेळी पहिल्यांदा माझ्याकडे आली तेव्हा खरंच मला वाटलं जगातला सगळ्यात नशीबवान माणूस मी आहे !! मला माझं प्रेम मिळालं! पण ते कस?? तर या पैसा, संपत्तीकडे पाहून!! की मी या संपत्तीचा रुबाब दाखवून ते मिळवलं!! चूक माझीच आहे !!! हे खोट प्रेम मी कधी ओळखूच शकलो नाही !! प्रितीला भेटायला गेलो तेव्हा ती माझ्यापेक्षा माझ्या हातातील त्या तिला भेट म्हणून आणलेल्या अंगठीकडे जास्त पाहत होती. मला वाटलं ती आनंदाने हुरळून गेली असेल !! पण ती पैशातून नात तयार करत होती!! मग हे टिकेल तरी किती दिवस !! जेव्हा हे सारं काही नकोस वाटायला लागलं, तेव्हा तिला आता पुन्हा अनिकेत आठवू लागला. नाही !! मला तिला सावरायला हवं !! "

सूरज भानावर येत खोलीत आला.  त्याला समोर शांत बसलेली प्रिती दिसत होती. तिच्या सुंदर चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती. तो तिच्या जवळ जात बोलू लागला.

"प्रिती !! झालं गेलं विसरून जाऊ आपण !! "
प्रिती ऐकुन न ऐकल्या सारखं करत होती. तरीही सूरज तिला पुन्हा पुन्हा बोलत होता.
"ऐक ना प्रिती !! हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करीन!! त्या अनिकेत पेक्षा जास्त करीन!! पण अस वेड्या सारख करू नकोस!! "
"तू जा बर सूरज इथून !!" प्रिती त्याला लांब करत म्हणाली. 

सूरज तिला काहीच बोलत नाही. तो बाहेर निघून जातो. 

रात्रभर तो बाहेर बसून राहतो. प्रिती आणि त्याच्या मधल्या या नात्याला कोणत्याच गोष्टीची मात्रा लागू होत नाही हे त्याला कळून चुकलं होत. कारण प्रितीला आता या नात्याची गरजच राहिली नव्हती. त्याच्या मनात असंख्य विचार येत होते. कधी त्याला वाटलं आपण जाऊन जाब विचारावा तिला! की मी तुझा नवरा आहे प्रिती !! हे असलं नाटक माझ्या समोर चालणार नाही !! पण पुन्हा तो शांत होई. पण कधी वाटे सरळ जाऊन त्या अनिकेतला विचारावं, की तू माझ्या बायकोला का भेटलास ते , पण त्याची काहीच चूक नाही हे माहितेय मला!!  सार काही अवघड आहे हे.

 रात्रभर सूरज हॉल मध्येच सोफ्यावर झोपी गेला. सकाळी उशिरा त्याला जाग आली. झोपेतून उठल्या उठल्या तो प्रिती झोपी गेली होती तिथे गेला पण ती तिथे नव्हतीच. तिला त्याने सगळ्या घरात शोधलं पण ती घरी नव्हतीच. त्याने फोनही लावला तोही बंद लागतं होता. त्याला आता काळजी वाटू लागली. तो घरातून बाहेर पडला सगळीकडे तो तिला शोधू लागला. कदाचित ती रागात कुठे निघून तर गेली नाहीना !! अस त्याला वाटू लागलं. ती पुन्हा त्या अनिकेतला भेटायला गेली असेल का !! काहीच कळत नाही. सूरज मनातून खचून गेला. त्याच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले.

" प्रिती !! माझं पहिल प्रेम !! जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती प्रिती !!! ती अशी कुठे निघून गेली !! मला न सांगता!! मला सांगून तरी जायचं ना !! एवढं काय लगेच नाराज व्हावं !! देवा !! ती कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव !! " सूरज आता हताश झाला होता. राहून राहून तो तिचा फोन लागतो का ते पाहत होता. आणि थोड्या वेळाने तिचा फोन लागतो. आणि ती फोन उचलते. सूरज बोलू लागतो.

"प्रिती !! प्रिती !!! प्रिती !! कुठे आहेस तू ?? अस मला न सांगता कुठे बघून गेली तू !!" 
"सूरज मी नीट आहे!! तू !! तू उगाच माझी काळजी करू नकोस बर !! मी काही लहान बाळ नाहीये!!"
"पण तू आहेस कुठे ??" 
"मी आहे जिथं आहे तिथेच !! "
"अनिकेत सोबत आहेस ना तू ??"
"नाही !! श्वेताकडे आली आहे !!!"
"श्वेता !! म्हणजे त्या अनिकेतची बायको ??"
"हो !! येईल मी थोड्या वेळाने घरी !! उगाच फोन करू नकोस !! "

 एवढं बोलून प्रिती फोन बंद करते. सूरज निराश होऊन घरी निघून जातो. इकडे श्वेता प्रितीला बोलते.

"आज अचानक कसकाय येणं केलं ??"
"सहजच आले होते!! या इकडे आले मग अनिकेत म्हणाला होता की इथे जवळ राहतो आम्ही !! म्हणून म्हटलं भेटाव चला !!" प्रिती घरात इकडे तिकडे पाहत म्हणाली.
"होका!! अनिकेत म्हणाले का !!"
"अनिकेत नाही घरी ?" 
"ते सकाळीच गेले ऑफिस ला !! "
"अच्छा !!"
"काय घेणार मग !! चहा की कॉफी??"श्वेता प्रितीला विचारते.
"काही नको !! बर चला मी निघते !!"
"लगेच !! काहीतरी घ्या!!"
"नाही नको!! पुन्हा कधीतरी !! आता काय भेट होईलच वरचेवर!!"

 श्वेता काहीच बोलत नाही.तिला प्रितिच हे अचानक येणं थोड वेगळंच वाटलं. पण ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. ऑफिस संपून अनिकेत संध्याकाळी घरी आल्यानंतर ती त्याला म्हणते.

"अरे अनिकेत !! आज प्रिती आली होती रे घरी !!"
"कसकाय ??" अनिकेत आश्चर्याने विचारतो. 
"काय माहित !! आली काय बसली काय आणि तू नाही म्हणाले की निघून गेली काय !! काहीच कळलं नाही !!" श्वेता शांत बोलत होती.
"जाऊदे सोड !! ती अशीच आहे !!"
"नाहीरे !! पण तीच वागणं !! बोलणं !! सगळंच जरा वेगळं वाटलं मला!!"
"श्वेता !! जाऊदे ना !!" अनिकेत तिला जवळ घेत म्हणाला.

आणि तेवढ्यात मोबाईलच्या मेसेजची टोन वाजते.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार

विरोध || कथा भाग २ ||मराठी रंजक कथा ||

 


कथा भाग २

आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.

 विचारात रात्र अशीच सरून गेली. उगवतीच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली. सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला. सगळी आवरा आवर करत असताना. मोबाईलची मेसेज टोन वाजते. अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो.

" अनिकेत !! तुझ ते काल मला अचानक भेटन खरंच खूप छान होत. तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर, पुन्हा मी तुला खूप शोधलं, पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस!! पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे !! मला तुला पुन्हा भेटायचं आहे!! भेटशील ??"

अनिकेत मेसेज वाचून क्षणभर विचारात पडतो. काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो.पुन्हा मेसेज टोन वाजते.अनिकेत पुन्हा मेसेज वाचू लागतो.

"तुझा राग मी समजू शकते. पण त्याच कारण तरी काय हे ऐकुन घेशील का??मला पुन्हा भेटशील का ??" 

अनिकेत पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून देतो. तेवढ्यात श्वेता त्याच्या जवळ येते. हातातील नाश्ता त्याला देत म्हणते.

"काय झालं ?? आज एवढा उशीर का होतोय तुला ??बरा आहेस ना ??" 
"मी बरा आहे !! मला काय होणार आहे !! " अनिकेत हसत बोलतो. तेवढ्यात शेजारी ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजतो.
"काय रे !! कोणाचा मेसेज येतोय !! बघत का नाहीयेस !!" 
"कंपनीचा आहे !! जाऊदे चल मी निघतो !!"

  श्वेताला खोट बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये सुद्धा त्याला काय करावं काहीच कळत नाही. कित्येक मेसेज येऊन गेल्यानंतर प्रिती त्याला फोन करते. कित्येक वेळा फोन वाजून गेल्यानंतर अखेर अनिकेत फोन उचलतो.

"हॅलो!!"
"प्रिती बोलते !!"
अनिकेत काहीच बोलत नाही.
"अनिकेत मला तुला भेटायचं आहे !!तू अस का करतोयस ??"
"पण मला तुला भेटायचं नाहीये आता !!" अनिकेत रागात येऊन बोलतो.
"आणि प्लीज !! हे मेसेजेस करणं !! बंद कर!!"
"एवढा राग आहे माझ्याबद्दल ??" 
"राग नाहीये !! पण आता तू ती प्रिती नाहीयेस आणि मी तो अनिकेत पण राहिलो नाहीये !!"
"हे बघ अनिकेत एवढा माझा द्वेष करू नकोस !! Please एकदा भेट !! तिथेच !आज संध्याकाळी ! "
"ठीक आहे !! अगदी शेवटचं !!"

अनिकेत भेटण्याचं ठरवून मेसेजेस आणि कॉल्स मधून सुटका करून घेतोय अस त्याला वाटलं. आयुष्याची कित्येक वर्षे सरून गेल्या नंतर काय बोलायचं आहे, पण ती पुन्हा का आयुष्यात आली या विचाराने त्याला पुरत हैराण करून सोडलं होत.बघता बघता संध्याकाळ झाली, अनिकेत प्रितीला भेटायला जातो. तेव्हा ती तिथे त्याच्या आधीच येऊन बसलेली असते. दोघेही समोरासमोर कित्येक क्षण गप्प बसतात आणि अखेर प्रितीच बोलायल सुरुवात करते.

"भेटायला आलास याचा खूप आनंद झाला !!"
अनिकेत अगदी थोड हसू चेहऱ्यावर आणून बोलतो.
"मलाही झाला असता तर बर झालं असत !!"
प्रिती काहीच बोलत नाही. क्षणभर शांत राहते आणि बोलते.
"दहा वर्ष लोटली या सगळ्या गोष्टींना !! राग आजही आहे ??"
अनिकेत फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
"आजही तितकच प्रेम करतोस माझ्यावर ??" प्रिती अगदिक होऊन विचारते .
"नाही !! " अनिकेत क्षणात बोलतो.
"श्वेता!! तुझी बोयको तुम्ही मजेत आहात!! पाहून छान वाटलं !!"
अनिकेत फक्त ऐकत राहतो.
"या दहा वर्षात कित्येक वेळा तुझी आठवण मला आली !! पण मी खूप शोधूनही मला तू सापडला नाहीस !!"
"सूरज प्रेम करत नाही तुझ्यावर ??" अनिकेत तिला विचारतो.
"करतो रे !! खूप करतो !! पण तुझी आठवण काही गेली नाही !!"
"एवढंच प्रेम होत तर जायचंच नव्हतं ना मला सोडून मग !! "
"ती माझी चूक होती !!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.
"नाही प्रिती !! चूक नाही !! तो तू विचार करून केलेला निर्णय होता!! " अनिकेत आता मोकळेपणाने बोलू लागला.
"म्हणजे??" प्रिती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
"म्हणजे !! मी भिकारी आणि तो सूरज श्रीमंत !! मी देऊन देऊन काय दिलं असतं !! पण सुरजचा पैसा , संपत्ती याची भुरळ पडली तुला!!" 
"काय बोलतोयस तू अनिकेत !! अस काही नाहीये !! "
"मग कोणताही विरोध नसताना !! सर्वांची आपल्या नात्याला संमती असतानाही अचानक तू त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का केलास ?? आणि जाऊ देना !! मला या विषयात आता पडायचं नाहीच !! मी निघतो !!" अनिकेत उठून निघतो.
"थांब अनिकेत !! आता मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाहीये !!"प्रिती त्याला अडवत म्हणते.
"आता खूप उशीर झालाय प्रिती !!!bye!!" अनिकेत निघून जातो.

 अनिकेत गेल्यानंतर कित्येक वेळ प्रिती तिथेच बसून राहते. तिला तिचेच विचार छळु लागतात. 

"अनिकेत बोलला त्यात काय चूक आहे प्रिती ! तू नात्याचा व्यवहार केलास!! तू पाहिलंस नात श्रीमंत आहे की गरीब !!तू मन कधी ओळखुच शकली नाहीस !! हो प्रिती तू चुकली आहेस !! तुझ्या आयुष्यात पैसा खूप आला !! पण प्रेम ?? नाहीना !! बघ !! अनिकेतने पुन्हा प्रेम केलं !! त्याच्या आयुष्यात श्वेता आली !! त्याच्यावर ती खूप प्रेम करते !! तुझ काय ?? फक्त पैश्यात नाती मोजणारा नवरा ?? की एक उजाड आयुष्य ?? प्रेम कुठे आहे तुझ प्रिती !! ते बघ तुझ खर प्रेम तर तुझ्यापासून दूर जातंय!! " अचानक प्रिती भानावर येते आणि स्वतःला बोलते.

"नाही !! त्याला मी जाऊ देणार नाही !! तो माझा आहे !! तो माझा आहे !!"

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

विरोध || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||



टीप :" विरोध " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

कथा भाग १

 "आयुष्यात खूप काही घडून गेल्यानंतर ,खूप काही हातून सुटल्यानंतर!! आपण एका अश्या वळणावरती येतो, अचानक अशा व्यक्तीला भेटतो की पुढे सारं काही आपलंस वाटायला लागतं!! असंच काहीसं श्वेता आयुष्यात आली तेव्हा झालं होत. पहिल्या प्रथम सगळं काही खोटं असतं !! प्रेम वगैरे सगळं बनावट असतं असा समज झाला होता. तसं वाटायला लागलं!! पण का कुणास ठाऊक, खूप काही गमावल्या नंतर, श्वेताने सगळी ही माझी गणिते चुकीची ठरवली!! खूप प्रेम करते ती माझ्यावर !! आणि मलाही पुन्हा प्रेम करायला शिकवले तिन्हे !! आज मिळालेलं यश फक्त तिचच आहे !! ती नसती तर हे शक्य नव्हतं !!!" अनिकेत कित्येक वेळ आपल्याच विचारात मग्न होता.

"अनिकेत !! अनिकेत !!" श्वेता बाहेरून आवाज देत खोलीत येते.
"अजुन तसाच आहेस तू ! आवर ना चल !"
"फक्त दोन मिनिट !! आवरतो लगेच !!"
"पटकन चल !! " श्वेता बाहेर निघून जाते.

"माझ्यासारख्या सामान्य माणसाला , असामान्य वाटावं हीच खरी नात्याची ताकद असते !! या हजारो ,करोडो लोकांमध्ये ती आपली एक व्यक्ती !! आपल्या जवळची ती व्यक्ती, आपलं सर्वस्व !! " अनिकेत आवरत विचार करत राहतो, आणि आवरून बाहेर येतो.

"मग आज कुठे जायचं ?" अनिकेत श्वेताला जवळ घेत विचारतो.
"कुठे म्हणजे काय !! आपल्या नेहमीच्या ठिकाणी !!" 
"तिथेच ??"
"हो !! "
"चला मग !! "

अनिकेत आणि श्वेता दोघेही गाडीत बसून निघतात. श्वेता कित्येक वेळ रेडिओवर लागलेलं गाणं गुणगुणत राहते. दोघेही आज खुश असतात. थोड्याच वेळात ते तिथे पोहचतात. 

"श्वेता आपण नेहमी इथेच का येतो माहितेय तुला ??" 
"कारण तुला इथ येणं आवडत म्हणून !!" श्वेता समोरच्या खुर्चीवर बसत म्हणते.
"नाही !! चूक !!" 
श्वेता आश्चर्याने अनिकेतकडे पाहते आणि विचारते.
"मग का ??"
"कारण , माझ जून आयुष्य इथेच संपलं , आणि नव्या आयुष्याला येथेंच सुरुवात झाली, तू मला भेटलीस !! इथेच !!" अनिकेत श्वेताच्या नजरेत पाहत म्हणाला.
"बरं ! ठीक आहे !! आता काही मागवूया !! खूप भूक लागली मला !! " 
"मागव ना मग पटकन !! " अनिकेत श्वेता कडे हसत पाहत म्हणाला.

 अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ एकमेकांत अगदी मिसळून गेले. दहा वर्षाचा संसार त्यांचा! अगदी मनसोक्त फुलला. श्वेता नेहमीच अनिकेत सोबत अगदी खंबीर पणें उभी राहिली. संसार अगदी सुखात चालला होता. खूप वेळ एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवल्या नंतर दोघेही घरी जायला निघाले.

"चला !! घरी जायचं की इथेच थांबायचं आज ??" अनिकेत श्वेताला मिश्किल हसत म्हणाला.
"थांबुयात ना मग इथेच !! " श्वेता हसत म्हणाली.
"चला आता !! " अनिकेत खुर्चीवरून उठतं म्हणाला.

दोघेही घरी परत जायला निघतात. अनिकेत श्वेताला बोलण्यात एवढा गुंग होऊन जातो की समोरून कोणी आलेलं त्याला कळतंच नाही. आणि तो समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकतो. खरतर ही भुतकाळाने पुन्हा घातलेली साद होती. ती व्यक्ती समोर अडखळते , अनिकेत सावरतो. आणि क्षणात मागे सरकतो.

"लागलं तर नाहीना ?" श्वेता विचारते. 
अनिकेत मात्र फक्त पाहत राहतो.

"नाही !! लागलं नाही!! " 
"अनिकेत बघून चालायचं ना रे !!" 
"अनिकेत ??"  ती व्यक्ती क्षणभर अनिकेत कडे पाहते आणि अचानक बोलते. 
श्वेता पाहत राहते.
"Hii, प्रिती !!" अनिकेत प्रितीकडे पाहत म्हणतो.
"तुम्ही ओळखता एकमेकांना ??" श्वेता मध्येच बोलते.
"हो !! आम्ही दोघे एका कॉलेजमध्ये आणि नंतर काही दिवस एका ठिकाणी जॉबही एकत्र केला !!" प्रिती अगदी उत्साहाने सांगत होती.
अनिकेत मात्र गप्प राहिला.
"तुम्ही दोघे ??इथे ?" प्रिती अनिकेतकडे पाहत म्हणाली.
"श्वेता माझी बायको !! " अनिकेत श्वेताकडे हात करत म्हणाला. 
"आज सहजच आलो होतो!! " 
"यांना इकडे या ठिकाणी यायला खूप आवडतं !! म्हणून येत असतो कधी कधी इथे !!" श्वेता मध्येच बोलते.

अनिकेत प्रितीला अनपेक्षित भेटून अगदी स्तब्ध झाला. त्याला खरतर तिने पुन्हा भेटणं नको होत. प्रिती हे अनिकेतच पहिलं प्रेम. पण या मनावर आता फक्त श्वेता होती.

"यांना कंपनी मध्ये बढती मिळाली !! आता हे प्रोजेक्ट हेड म्हणून राहणार !! मग या आनंदात एक छोटी पार्टी म्हणून आम्ही इथे आलो !!"
"अच्छा!! " प्रिती श्वेताकडे पाहत म्हणाली.
अनिकेत मात्र अबोल राहिला. पण प्रितीच्या डोळ्यात त्याला ती पूर्वीची ओढ दिसल्या वाचून राहिली नाही.
"तुम्ही काय करता !!" श्वेता आता अगदी मनमोकळ बोलू लागली.
"मी housewife आहे !! Husband बिझनेस करतात!!  त्यामुळे जास्तवेळ तर बाहेरच राहतात !!" प्रिती अनिकेतकडे पाहत राहते.
"अच्छा!! ते आले नाहीत बरोबर ? " 
"आलेत ना !! कुठे राहिले मागे ,काय माहित !! " प्रिती मागे पाहते. आणि तेवढ्यात तिच्या जवळ तिचा Husband येतो.
" हे माझे husband!!  सुरज उपाध्याय !!"
"नमस्कार !! प्रिती!! मी पुढे जातोय !! तुझ झालं की ये लगेच !!" सूरज लगेच निघून जातो.
श्वेता अनिकेत बघत राहतात. क्षणभर शांतता राहते. आणि मग प्रिती बोलते.

"तुम्ही चला ना आमच्या सोबत !!"
"नाही नको!! तुम्ही करा एन्जॉय !! आम्ही निघतोय आता !!" अनिकेत मध्येच बोलतो.
"हा !! तुम्ही करा एन्जॉय !! असही परत अनिकेतला उद्या लवकर जायचं!! " श्वेता प्रितीकडे पाहत म्हणाली.
"ओके!! भेटुयात मग पुन्हा !! अनिकेत तुझा नंबर दे ना !! भेटुयात नंतर सगळे निवांत !!" प्रिती अनिकेतकडे पाहत म्हणते.

अनिकेत क्षणभर शांत राहतो. त्याला प्रितीला नंबर द्यायचा नसतो आणि तेव्हा मध्येच श्वेता बोलते. दोघींमध्ये पुन्हा भेटण्याचं ठरत, नंबर घेतले जातात. दोघी कित्येक वेळ बोलत राहतात. 

 पुन्हा भेटण्याचं सांगून अनिकेत आणि श्वेता निघून जातात. प्रिती अचानक भेटल्याने अनिकेत थोडा विचलित होतो. ती अशी अचानक भेटेल असे त्याला कधीच वाटलं नव्हतं.घरी आल्यावरही तो कित्येक वेळ हाच विचार करत बसतो.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार

कोजागिरी || Kojagiri Marathi Kavita ||


चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी  न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न काही !!
हळूवार ती झुळूक, अलगद येऊन जाई!!

परी सांडले ते चांदणे, पाना फुलांत काही !!
शुभ्र वस्त्र जणू ,पांघरूण आज येई !!
कुठे उगाच भास, त्या रात्रीचा येई!!
परी आभास का उगाच, मनास आज होई !!

जागले ते नभ , झोप न आज येई!!
बोलते त्या चंद्रास , कवेत आज घेई !!
साऱ्या आसमंतात, बहरून आज जाई!!
कोणती ही हुरहूर , मनात त्या होई!!

चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!

✍️© योगेश खजानदार

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||


"भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान  करायला विसरायचं नाही !!

आपला हक्क, आपलं मत
कधीच कोणाला विकायचं नाही !!
लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो
आपणच आपल्याला संपवायचं नाही !!

उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत
मनात हे विसरायचं नाही !!
अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास
लोकशाही खराब करू द्यायचं नाही !!

हो !! ही आपली जबाबदारी आहे !!
लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !!
आपलं भविष्य या एका क्षणात
खराब करू द्यायचं नाही !!

एक एक मत जोडून घडतो भारत
त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !!
आपलं मत खूप काही करू शकते
त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !!

मतदान करून घडवू ही लोकशाही
आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !!
सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी
आपले मत द्यायला विसरायचे नाही !!

भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !! "

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...