शर्यत || कथा भाग ४ || Sharyat katha bhag 4 ||




कथा भाग ४

सखा कित्येक दिवस दुकानाकडे गेलाच नाही. त्याच्या मनात सारखं जाण्याचा विचार येतही होता पण त्याला काय करावं सुचतच नव्हतं. पुन्हा त्या शिरपाने मारलं तर ?? या भीतीने तो घरातच थांबला. या वयात काही झालं तर निस्तारायला पैसे तरी आहेत का ?? या विचारांनी तो पुरता वेडावून गेला होता. डोक्यावरची जखम आता हळूहळू बरी होत आली होती. 

सांजवेळ होत आली आणि शांता समोरून येताना त्याला दिसली. तिला पाहून तो जागेवरून उठला तिच्या डोक्यावर भलीमोठी लाकडाची मोळी होती. ती डोक्यावरून उतरवत शांता बोलू लागली.
"आज दिवसभर भटकले !! पण कुठ पण काम मिळालं नाही मला!! शेवटी पलिकडच्या गावात झाड तोडायच होत,  ते केलं !! कसे बसे पाच रुपये दिलेत त्यांनी !! " शांता खाली बसत म्हणाली.
"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला.
शांता पाणी घटाघटा प्याली.
"पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!" शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली.
"चल मग जेवूयात !! " सखा तिला उठवत म्हणाला.
"जेवण ??"
सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला. 
"तुम्ही केलंत ??"
"हो !! "

सखा आणि शांता जेवण करायला बसले. शांता एकटक हातातल्या घासाकडे पाहत राहिली.
"जेव की !! काय झालं ??"
"किती दिवस अस घाबरून घरी बसून राहणार ?? शांता सखाकडे पाहत म्हणाली.
"भित नाहीये मी !!!" सखा नजर चोरत म्हणाला.
"खर ??"
सखा काहीच बोलला नाही. जेवण करून तो उठला आणि समोरच्या अंगणात जाऊन बसला.

"काय सांगू शांता तुला !! हो खरंच मला भीती वाटतेय !! मला काही झालं तर तुझ काय होईल याची !! माझ्यामुळ तुला काही त्रास होईल याची !! पोटच्या पोरानी जिवंतपणी अनाथ केलं ! घराबाहेर काढून आभाळ दाखवलं !! ते दुःख तू पचवलस !! म्हणूनच कदाचित आता तुला मला अजून दुःख द्यायचं नाहीये !! हा हे खरंय की घरात बसूनही चालणार नाही !! मला आज नाहीतर उद्या काहीतर खटाटोप करावी लागणारच आहे. माहितेय मला !!!" सखा गोधडीवर पडून विचार करत होता. 

"सखा !! ये सखा ??" समोरून कोणीतरी आवाज देत होत.
"कोण आहे ?? " सखा जागेवरून उठला.
"मीच आहे !! आप्पा !!" आप्पा सख्याच्या  जवळ येत म्हणाले.
"आप्पा तुम्ही ??" 
"हो मीच  !! काय माणूस आहेस का कोण आहेस तू ??कामावर का येत नाहीस तू ??"
सखा काहीच बोलला नाही. 
"सांग ना ?? का आला नाहीस ??"
"बरं वाटतं नाही म्हणून येणं झालं नाही !!" 
"खर की काही वेगळं अजून !! दहा पंधरा दिवस झाले कामावर नाहीस !! बरं तुझा पत्ता माहीत नाही !! तुझ्या वस्तीतला एकजण भेटला त्याला विचारलं तेव्हा माहीत झालं तुझ घर !!"
"चूक झाली आप्पा !!" सखा हात जोडत म्हणाला.
"त्या शिरपामूळ आला नाहीस ना ??"
आप्पांनी विचारताच सखा आश्चर्याने पाहू लागला.
"पाहू नकोस तसा !! साहेबांनी चोप चोप चोपलाय त्याला तेव्हा सांगितलं त्यानं !!"
"त्याची काही चूक नाही आप्पा !! मीच त्याच्या पोटावर पाय दिला म्हणून तो चिडला !!"
"पोटावर कसला !! माजलाय भडकाव !! जिथं खातो तिथंच थुकतो रांडचा !!" आप्पा रागात म्हणाले.
आप्पा बोलताना सखा फक्त पाहत राहिला. जरा वेळ थांबून आप्पा म्हणाले.
" ताबडतोब तुला साहेबांनी वाड्यावर घेऊन यायला सांगितलय !! चल पटकन !!"
"आत्ता ?? "
"हो आत्ता !! 

सखा पटकन उठला, घरात गेला. शांताला बाहेर आप्पा आल्याचं त्याने सांगितलं. कपडे घालत घालत बाहेर आला.शांता त्याच्या मागे मागे आली. आप्पांकड पाहून हात जोडून म्हणाली.

"साहेब गरिबाच्या घरचा चहा तरी घेऊन जा !!"
"नको बाई ! पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्की घेईन चहा !!" आप्पा तिला नमस्कार करून पुढे निघाले.

दोघेही साहेबाच्या घरी जायला निघाले. सख्याला काय करावं?? काय होतंय ?? काहीच कळत नव्हतं !! सगळं काही घडत होत. अगदी अनपेक्षित. दोघही फक्त चालत होते. आप्पा हातात दुकानाच्या हिशोबाची वही घेऊन जोरात चालत होते. त्याच्या मनात काहीतरी सुरू होत म्हणूनच की काय ते सख्याला एकही शब्द बोलत नव्हते. 

साहेबांच घर समोर येताच आप्पा म्हणाले.

"चल !! आल साहेबांच घर !! " त्या कोपऱ्यात चरवितल पाणी घेऊन पाय धू आणि मगच आत ये !!" 

साहेबांच घर पाहून सखा थोड्या वेळ शांतच बसला. स्वप्नातलं घर म्हणावं ते यालाच की काय असं त्याला वाटू लागलं. जागोजागी लावलेले कारंजे, शोभेची झाड आणि त्या झाडातून येणारा रातराणीचा सुगंध त्याला मोहून टाकू लागला. तो क्षणभर एकाच जागी अडखळला. 

"ये सखा !! ये आत !!" साहेब समोर येत म्हणाले.
आप्पा आणि सखा लगबगीनं साहेबांन जवळ गेले.
"काय झालं सखा ?? का आला नाहीस इतक्या दिवस !! त्या शिरपामूळ ?? अरे एकदा येऊन मला बोलायचं होतस  ! त्याला तुझ्या समोर हाणला असता !!"साहेब सख्याला खाली बसायला खुणावत म्हणाले.
"नाही साहेब !! पण या वयात कुठ मला भांडण झेपणार होत का !! म्हणून मग !!" सखा खाली जमिनीवर बसत म्हणाला.
" बरं असुदे !! आता त्याचं डोक्यात काही घेऊ नकोस !! उद्यापासून पुन्हा कामाला ये !!"
"जी साहेब !!" सखा आनंदाने म्हणाला.

साहेब आणि आप्पा एकमेकांकडे पाहत काहीतरी खुणावू लागले. सखा शांत बसून राहिला. क्षणभर साहेब शांत राहिले. आप्पांनी त्यांना हिशोबाची वही हातात दिली. हिशोबाच्या वही बघत बघत साहेब बोलू लागले.

"सखा तुला माहितेय तुला मी कामावर का घेतल ते ??"
सखा फक्त साहेबांकड पाहत राहिला. साहेब लगेच म्हणाले.
"तुझ्या इमानदारीमूळ ! अरे , पोटात एवढा भुकेचा आक्रोश होत असतानाही तू मला डबा द्यायला धावत आलास !! त्यासाठी !! ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होत !! "
"तुमची कृपा अशीच राहुद्य साहेब !!" सखा हात जोडून म्हणाला.
"कृपा नाही सखा !! तुझं कष्ट तुला बोलत!!" साहेब आप्पाकड पाहात म्हणाले. 
साहेब वही बंद करून आप्पणाकड देत जागेवरून उठले. सखाही जागेवरून उठू लागला त्याला पाहून साहेब म्हणाले.

"बस बस !! खरंतर सखा मी तुला आज दुसऱ्याच कारणासाठी बोलावलय !!"
"कोणतं साहेब ??" सखा कुतूहलाने विचारू लागला.
"शर्यतीच !! "
"शर्यत?? " सखा प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
"हो शर्यत !!  मानाची शर्यत !! महादेवाच्या जत्रेतली !! इतकी वर्ष तो शिरपा आमच्या बाजून पळायचा !! पण दर वर्षी हरायचा !!  परवा त्याला कळलं की साहेबांना त्याच्या पेक्षाही भारी माणूस भेटला म्हणून त्यानं तुला मारलं !! आप्पांनी चौकशी केली तेव्हा सगळं उघडीस पडलं !!" साहेब आपांकड पाहत म्हणाले.
आप्पा मध्येच म्हणाले.
"भाडकाव वर्षभर साहेबांच खाऊन त्यांनाच दगा द्यायचा !! दरवर्षी पलिकडच्या कुरलेवाडीच्या पाटलाकडून पैसे घेऊन मुद्दाम हरायचा !! खाल्या मिठाला जागला नाही रांडचा!!" 
"म्हणूनच सखा तुला यावर्षी आमच्याकडुन शर्यतीत पळाव लागलं. त्याबदल्यात तुला वर्षभर मी जेवण , कपडे आणि राहायला एक घर आणि महिना हजार रुपये पगार देईल !!" साहेब सखाच्या जवळ जात म्हणाले.
"हजार रुपये ?? "
"हो हजार रुपये !! पण लक्षात ठेव शर्यत जिंकायलाच पाहिजे !! मानाची शर्यत आहे ती !! जो व्यापारी जिंकेल त्याला राजदरबारी वेगळाच मान असतो, आणि सगळ्या राज्याचा महुसुल गोळा करायची काम पण मिळतात त्या व्यापाराला !! वेगळाच मान असतो !!!" साहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. 

सखा शांत झाला. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याला आज कळलं होत डबा रोज धावत पळत जाऊन देण्याचं महत्त्व. ती त्याची परीक्षा होती. ती त्याच्या साहेबाची प्रतिष्ठा होती.

 सखा सगळं ऐकून बाहेर आला. तो काहीच बोलतं नव्हता. आप्पा आपल्या घरी निघून गेले. सखा हळू हळू पाऊल टाकत घराकड निघाला.

क्रमशः

✍️योगेश खजानदार

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||




 कथा भाग ३

सखा धावत धावत पुन्हा सुतारवाडीला आला. दुकानात आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याला जोरजोरात कोणीतरी बोलण्याचा आवाज आला. आप्पांना कोणीतरी भांडत होत हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तो दरवाजातून आत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात कोणीतरी रागात बाहेर येताना त्याला दिसलं. मागे आप्पाही येत होते.आप्पा दरवाजासमोर येत म्हणाले.

"शिरपा एवढा माज चांगला नाही !!"
"तर तर !! एका मिनीटात मला कामावरून काढलं !! आन आता माज माझाच दिसायला होय !!" शिरपा जोरात म्हणाला.

एव्हाना सख्याच्या लक्षात आल होत काय प्रकार आहे तो. तेवढ्यात आप्पांच लक्ष सखाकडे जात. त्याला बघून ते म्हणाले.
"आलास का डबा देऊन ??"
"होय !!" सखा हळू आवाजात म्हणाला.
"जा !! आत दुसऱ्या कामात मदत करू लाग !! " आप्पा दरवाज्याकडे हात करत म्हणाले.
तेवढ्यात शिरपा मोठ्याने म्हणाला.
"हे म्हातारं आहे काय साहेबांना डबा द्यायला जाणार !!"
"शिरपा !! तोंड सांभाळून बोल !! आन तुला कामावरून काढल कोण म्हणतंय !! फक्तं हे काम नाही !! दुसरं करायचं !!" 
"पण गेली कित्येक वर्ष मीच हे काम करत आलोय !! त्याच काही नाही का ??"
"आहे बाबा !! म्हणून तर साहेबांनी तुला काढून नाही टाकलं !! सावंतवाडीच्या दुकानावर काम दिलंय !!"
"तर तर !! उपकारच केलेत माझ्यावर !!" एवढं बोलून शिरपा तरातरा चालत निघून गेला.

आप्पा आणि सखा एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणभर काहीच बोलले नाही. दरवाजातून आत जात आप्पा म्हणाले.
"या शिरपाच काही मनावर घेऊ नको सखा !!जरा गरम डोक्याचा आहे !! साहेबांनी सांगितलं की गप्प बसेल !!"
"पण एवढं रागवायच काय त्यात !! तस असलं तर देऊ द्या त्याला डबा, माझं काय मी म्हणलं ते दुसरं काम करतो !!"
"नाही सखा !! साहेबांनी सांगितलं म्हणजे सांगितलं !! यात बदल व्हायचा नाही आता !!"
सखा काहीच बोलला नाही. दिवसभर कामात राहिला. पण त्याला शिरपाच रागावणं अजूनही मनाला खटकत होत. 

दिवसभर काम करून सखा थकून गेला. सुर्य मावळतीला आला आणि अखेर घराकड निघाला. आप्पांनी जाताना हातात थोडी मिठाई दिली होती. ती पिशवीत ठेवून तो भराभर चालू लागला. पण अचानक मागून कोणीतरी डोक्यात काहीतरी मारलं हे सखला कळायचा आत त्याच्या डोळ्याला अंधारी आली. पुसट अस कोणीतरी ओळखीचं आहे हे त्याला कळाल. थोड शुद्धीत येताच समोर शिरपा आहे हे त्याला कळलं.

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!"
सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो.
"साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!"
सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. 
"पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! "
"आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!"
"पण साहेब ?? आप्पा !!"
"त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो !! पण तू पुन्हा तिथं नाही दिसला पाहिजे !!"

सखा काहीच बोलत नाही.डोक्यातून ओघळणाऱ्या रक्ताला हातातल्या कापडान झाकत तो घरी निघाला. पायात ताकद राहिली नव्हती. कसाबसा तो घरी पोहचला. समोर शांता त्याची वाट पाहतच बसलेली होती. त्याला अशा अवस्थेत पाहून ती धावतच त्याच्याकडे आली.
"काय झालं !! हे रक्त ?? काय झालं काय !! आहो सांगा की !!" शांता अगदीक होत म्हणाली.
"सांगतो सांगतो !! "
सख्याने तिला घडलेलं सगळं सांगितलं. पुढं काय करावं हेही विचारलं.

"पण त्याला काय एवढं झालंय !! हे नाहीतर ते काम दिलंच ना साहेबांनी ??"
"दिल पण त्याला हेच काम पाहिजे !! काय एवढं आहे यात मलाच कळणा झालंय !!" सखा माठातील पाणी घेत म्हणाला.
"मग तुम्ही काय ठरवलंय आता ??" शांता हळद घेऊन येत म्हणाली.
सखा जमिनीवर बसला. जखम हलकेच शांताकडे करत म्हणाला.
"मलातर काही सुचत नाहीये बघ !! एक मन म्हणतंय जावं !! तर दुसरं म्हणतंय कशाला त्या भानगडी !!"
"एवढ्या कष्टानं मिळालेलं काम असच सोडून देणार तुम्ही ??" जखमेवर हळद लावत शांता म्हणाली.
क्षणभर सखा शांत राहिला झालेली जखम खूप वेदना देत होती. पण स्वतःला सावरत तो म्हणाला.
"उद्या बघू काय करायचं ते !! " सखा शांता जवळुन उठत म्हणाला.

झालेल्या जखमेत सखा रात्र भर व्हिव्हळत राहिला. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. 

"कशासाठी एवढा अट्टाहास आहे शिरपाचा काहीच कळत नाहीये ! साहेब पैसे तर त्याला तेवढंच देणार आहेत मग ह्याच कामात काय आहे एवढं !! धाव धाव धावून माझे या वयात पाय फाटले सगळे. मलातरी हौस आहे का याची , पण करावं लागत पोटासाठी. पण शिरपाची ही तळमळ पोटासाठी नाही हे कळायला मी मूर्ख नाही !! काय आहे त्या साहेबांना डबा देण्यात एवढं ?? "

सखा रात्रभर विचारात राहिला. डोक्यावरच्या जखमने व्हिव्हळत होता.

क्रमशः

✍️योगेश खजानदार


शर्यत || कथा भाग २ ||Marathi katha ||




कथा भाग २

आप्पा लगबगीने साहेबांच्या घरी पोहचले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना. साहेबांचं घर म्हणजे जणू एक महालच होता. आप्पा मुख्य दरवाज्यातून आत गेले. समोर साहेब नुकतेच जेवण करून हात धुवायला गेले होते. आप्पांना समोर पाहून ते हातातील ताब्या बाजूला ठेवत म्हणाले.

"काय आप्पा !! कधी नाही ते आज उशीर झाला यायला!!"
आप्पा क्षणभर काहीच बोलले नाही. हातातील हिशोबच वही समोर करत म्हणाले.
"आज थोडा वेळच झाला दुकान बंद करायला !! "
"बरं बरं !!" साहेब आप्पांच्या हातातील हिशोबाची वही घेत म्हणाले. 

दोघांमध्ये कित्येक वेळ दुकानाच्या हिशोबा विषयी चर्चा झाली आणि मध्येच साहेबांनी आप्पांना विचारलं.

"आप्पा !! दुपारी डबा कोणाच्या हातून पाठवला होता ??"
"तुम्हाला डबा मिळाला ??"
"हो तर !! अगदी वेळेत दिला आणून !!"
"नवीनच होता माणूस !! सखा नाव आहे त्याच !!" 
"सखा !! बरं बरं !! पुन्हा बोलावून घ्या त्याला !!"
" हो जी !! उद्या येतो म्हणाला !! अजून पाच रुपये द्यायचे राहिलेत त्याचे !!"
"द्यायचे राहिलेत ?? का बरं ??" 
" साहेब दहा मिनीटात तो तुम्हाला डबा द्यायला पोहचला !! आणि तेवढ्याच वेळात पुन्हा आला !! मला विश्वासाचं बसत नव्हता !! मला वाटलं त्यानं डबा मध्येच खाऊन टाकला !! म्हणून त्याला पाच रुपये कमी दिले !!"
"नाही आप्पा !! माणूस कामाचा आहे !! गावची जत्रा जवळ आली माहितेय ना ??"
"जी साहेब !! पण आपण तर दरवेळी शिरपाला !!"
"हो माहितेय !! पण यावेळी माणूस बदलायचा !! यावर्षी काहीही झालं तरी शर्यत जिंकायची ! "
"हो !! " आप्पा साहेबांकडे पहात म्हणाले. 
"त्याला आता फक्त कामावर ठेवून घ्या !! बाकी सगळं मी सांगेन त्याला भेटल्यावर !!"
"जी साहेब !!"

आप्पा एवढं बोलून आपल्या घरी निघून गेले. त्याच्या डोक्यात तेच होत. दोन दिवस पोटात अन्नाचा एक कणही नसताना हा सखा एवढा धावला कसा ?  कोणती ताकद होती ती, की जी त्याला हे सगळं करायला भाग पाडत होती. खरंच माझं चुकलंच ते , त्याच्यावर असा अविश्वास दाखवायला नव्हता पाहिजे मी !! माझं खरंच चुकलं !! उद्या तो येईल तेव्हा त्याची पहिलं माफी मागेन मी !! हातात एवढा जेवणाचा डबा असतानाही, ते अन्न घेऊन तो इमानाने धावला, फक्त मला दिलेल्या शब्दासाठी !! आणि मी क्षणात त्याच्यावर अविश्वास ठेवून त्याला घालवून दिलं. पण माझं दुसरं मन मला म्हणाल होत सखा तसा नाहीरे आप्पा ! पण काय करू या व्यवहारी जगात राहून मला त्याचं कधी ऐकूच आल नाही. "

 आप्पा विचारांच्या तंद्रीत घरी येऊन कधी झोपी गेले त्यांनाही कळलं नाही. सकाळच्या त्या सूर्यकिरणांनी डोळ्यांना त्रास दिला तेव्हा त्यांना जाग आली. लगबग सुरु झाली. सर्व आवरून पुन्हा दुकानात ते निघाले. कालच्या त्या विचारात त्यांना आपल्यातला दुसरा चेहरा दिसला याच नवल वाटत होत. दुकानात काम करता करता वेळ धावु लागला. दुपारची वेळ झाली. त्याची नजर सखा कधी येतोय त्याकडेच लागली होती.

"राम राम आप्पा !!"
आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता. 
"सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!"
"म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!"
"हो रे !! बसला विश्वास !!"
"मग द्या माझे उरलेले पाच रुपये !!" 
" अरे !! पाच रुपयाचं काय घेऊन बसलास !! मी तुला कामावरच ठेवून घेतो की !! "
" मला ??" सखा अगदी आनंदात म्हणाला.
"हो तुला !! महिना पाचशे रुपये पगार पण देतो !! "
"काय मस्करी करता काय गरीबाची !!" सखा आप्पाला हसत म्हणाला.
"मस्करी नाही आणि काही नाही !! बोल आहे मंजूर ??"
"पण काम ??"
"काही नाही काल जे केलस तेच रोज करायचं !! थोडफार दुसरही काम पडलं तर करायचं !!!"
"रोज साहेबांना डबा द्यायचा ??" 
"हो!"
"ठीक आहे आप्पा !! मला चाललं !! " 
"मग घे हा डबा आणि लाग कामाला !!" 

सखा आनंदाने धावत सुटला, त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजल होत. 
"कधी एकदा इथून घरी जातोय अस झालंय मला !! लवकरात  लवकर डबा पोहोचवतो आणि घरी जातो !! शांताला ही बातमी ऐकून भारी आनंद होईल !! तिच्या डोळ्यात मला तो आनंद पाहायचा आहे. धाव सखा !! अजून जोरात धाव !! पाचशे रुपये देणार आहेत तुला ते !! कामात ढिलाई करून कसं चाललं !! अरे पाच रुपयांसाठी केली नाही !! हे तर पाचशे आहेत !! धाव ! अरे पण भूक ??" सखा कित्येक मनातील प्रश्नात गुंतला त्याच्या धावण्याचा वेग अजून वाढला. 
"या पैश्याच्या समोर कसली भूक !! "

सखा धावत धावत दुकाना समोर आला. समोर कालचाच तो नोकर उभा होता. त्याला पाहून सखा हसला आणि म्हणाला.
"डबा पाठवलाय आप्पांनी !!"
"तू सखा ना ??"
"होय सखा !!"
"जा मग आत !! साहेब तुझी वाट पाहत बसलेत !!
"साहेब अन् माझी वाट ??? का बरं ?? माझं काय चुकलं का ??"
"ते मला काही माहीत नाही !! पण त्यांनी मला सांगितलं तू आलास की आत पाठवून दे म्हणून !!"
"बरं बरं !! 

सखा डबा घेऊन दुकानाच्या आत गेला. समोर साहेब बसलेले पाहून त्यांना नमस्कार करत म्हणाला, 
"मी सखा !!"
"बरं बरं !! मी नारायण मामा !! या दुकानाचा मालक !!"
"साहेब !! " सखा थोड झुकत म्हणाला.
"असू दे !! असू दे !! मला काल आप्पांनी सांगितलं की तू सुतारावाडीवरून इकडं सावंतवाडीला फक्त दहा मिनीटात आला म्हणून !"
"होय साहेब !!"
"आणि आप्पांनी एवढं सांगितल्यावर मला वाटलं कोणी तरणा बांड मुलगा असेल म्हणून !! पण तू तर केस पिकलेला म्हातार निघालास !! "
"काय करू साहेब !! पोटात भुकेन कावळे ओरडत होते!! हाताला काहीच काम नव्हतं !! म्हणून आप्पांना म्हटलं करतो हे काम !!"
"व्हा !! छान !! पण मग एकटाच आहेस की ??"
"बायको आहे माझ्यासोबत !! तीन पोर पण आहेत पण त्यांना आता आम्ही जड झालो म्हणून सगळे गेली निघून शहराकड !!"
"अरेरे !! म्हातारपणी आधार गेला !! पण अंगातली ताकद तुला साथ देते आहे हेच नशीब !!"
"होय साहेब !!"
"बाकी आप्पांनी तुला सांगितलं असेलच सगळं !! रोज या वेळेत डबा द्यायला यायचं !! ठीक आहे ??" 
सखा फक्त मान हलवून हो म्हणाला.
"बाकी काही लागलं तर सांग नक्की !! ये आता !!" साहेब दिलेला डबा उघडत म्हणाले.

सखा साहेबांना हात जोडून नमस्कार करत तेथून निघाला. पुन्हा धावत ! अगदी जोरात धावत निघाला !!

क्रमशः 

✍️योगेश खजानदार


सखी सोबती ती || Marathi Virah Kavita ||




बरसून जाण्या, पुन्हा आठवात यावी !!
सखी सोबती ती, सांज होऊन यावी !!

कुठे अलगदशी , झुळूक होऊन जावी!!
कुठे हुरहूर ती, मनास लावून जावी!!

साऱ्या नभात ती, रंग जणू उधळावी !!
साऱ्या आयुष्याची, साथ ती व्हावी !!

सावल्यात तेव्हा, कूठे ती शोधावी !!
सावली होऊन , हृदयात ती राहावी !!

कसे सांगावे, कशी ती लिहावी !!
मनातल्या तिला, गोष्ट एक सांगावी !!

क्षणात येता, नजरेत त्या ठेवावी !!
क्षणात जाता, नजरेतून ओघळावी!!

सखी ती हसता, ती  रात्रही हसावी !!
सखी ती बोलता , ती रात्रही बोलावी !!

हळूवार ती , गंध होऊन पसरावी !!
अलगद ती, पुन्हा आठवात यावी !!

सखी सोबती ती, सांज होऊन यावी !!

✍️योगेश खजानदार

शर्यत || कथा भाग १ || MARATHI STORIES || KATHA ||




टीप : " शर्यत " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


कथा भाग १


" जमिनीवर पडलेल्या प्रत्येक अन्नाचा कण मला डोंगरा एवढा मोठा का वाटतो ?? आणि त्याला उचलण्यासाठी माझी ती एवढी धडपड का असेल ??  पण सगळं वायाच गेलं !! मी इकड जमिनीवर पडलेल्या भाकऱ्या गोळा करत बसलो आणि तिकडं त्या माझ्यासारख्याच भुकेजल्या कुत्र्यांनी ते ओढून नेलं !! जाऊदे त्यांच्याच नशिबात  असलं ते म्हणून त्यांना मिळालं !! शेवटी नशिबाच्या पुढं कोणाचं चालतंय का ?? " सखा आपल्याच विचारांच्या तंद्रीत रस्त्यावरून चालत चालला होता. 
"शांतेला काम मिळालं असलं !! ती आणलं काहीतरी खायला संध्याकाळी !! आता तो पर्यंत पोटाची भूक अशीच मारावी लागणार मला !! " सखा पोटाला हाताने दाबत विचारातून बाहेर येतो. 
समोर एक इसम जोरजोरात ओरडत होता. आपल्या हाताखालच्या लोकांना काम लवकर करा म्हणून ताकीद देत होता. सखा एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. तो इसम स्वतःला पुटपुटत राहिला.

"कामाच्या वेळी कसली रे नाटकं ही !!! साहेबांना जर वेळेत डबा नाही पोहचला तर आपलं काही खर नाही !! " 
अचानक तो शेजारचा डबा उचलत म्हणाला.
"पंधरा मिनिटात हा डबा साहेबांना कसा पोहोचवायचा कळत नाहीये !! " समोरच्या एका कामगाराकडे पाहत म्हणाला.
" काय रे ! आपला शिरपा आज नाही वाटत आला ??"
"जी नाहिजी !! " एवढं बोलून तो कामगार आपल्या कामाला निघून गेला. 

सखा हे सगळं लांबून पाहत होता. त्याने क्षणभर मनात विचार केला आणि लगेच त्याला म्हणाला.
"साहेब !! तुमची काही हरकत नसेल तर मी देऊन येऊ का डबा ??"
तो इसम सखाकडे क्षणभर पाहत राहिला आणि उत्तरला.
"अरे कोण तू ?? आणि तू का देणार डबा ??"
"नाही !! मलापण कामाची गरज आहे!! दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही !! एवढं तुमचं काम करून देतो त्याबदल्यात काय पैसे द्यायचे ते द्या !!" सखा अगदिक होऊन म्हणाला.
"तूच दोन दिवसाचा उपाशी !! तुझ्यावर काय विश्वास ठेवू !! गेलास डबा घेऊन पळून तर साहेब मलाच रागावतील !!" तो इसम आपल्या दुकानात आत जात म्हणाला. 
"नाही साहेब !! या सखाला बेइमानी माहीत नाही !!" 
तो इसम शांत राहिला. त्याने दोन मिनिटे सखाकडे न्याहाळून पाहील. डोक्यावर मळकी टोपी, डाव्या बाजूला फाटलेला सदरा आणि पांढरी शुभ्र झालेली त्याची तोंडावरची दाढी. 
"ठीक आहे !! ठेवतो मी तुझ्यावर विश्वास ! माझा नाईलाज आहे !!! पण लक्षात ठेव !! इथून सावंतवाडीला जायचंय !! साहेबांना वेळेचं भान फार आहे !! आता निघालास तर वीस पंचवीस मिनिटे लागतील!! पण साहेबांना दहा मिनीटात डबा पोहचला पाहिजे !! जमलं का तुला?? "
"त्या टेकडीच्या पल्याडचीच ना सावंतवाडी ?? " 
" हो तीच !! " 
"ठीक आहे द्या तो डबा !! " 
 
तो इसम सखाकडे डबा देत म्हणाला. 
" आणि हो, ऐक !! नारायण मामा म्हणून मोठ दुकान आहे. तिथं दे डबा!! आणि म्हण आप्पा मुनिमांनी डब्बा पाठवलाय म्हणून !! तुला बघितल्यावर ओळखायचे नाहीत ते !! "
"बरं ठीक आहे !! "

सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते हातात तो डबा होता आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !! 

धावत धावत सखा त्या दुकानाजवळ येऊन पोहचला. समोरच एक दुकानातील नोकर उभा होता. त्याच्याकडे पाहत सखा म्हणाला.
"आप्पा मुनिमांनी डब्बा पाठवलाय साहेबांसाठी !!" 
समोरचा नोकर क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला.
"तू कोण ?? "
"मी सखा !! त्यांनीच मला पाठवलंय !! मला म्हणले दहा मिनीटात साहेबांना डबा पोहचला पाहिजे !! म्हणून धावत आलोय !! " सखा क्षणात म्हणाला. धापा टाकत टाकत म्हणाला.
"तू सुतारवाडीवरून इथ दहा मिनीटात आलाय ??"  तो नोकर आश्चर्य करत म्हणाला.
सखा मान हलवत हो म्हणाला.
"ठीक आहे जा !! मी सांगतो साहेबांना !!" 

सखा तेथून परत यायला निघाला. पुन्हा धावत पळत तो सुतारवाडीला आला. समोर सख्याला पाहून आप्पा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले.
"आलास काय जाऊन ?? का मधल्या वाटेतून परत आलास ??"
"नाही साहेब डबा देऊन आलोय !!"
आप्पाला काही केल्या विश्वास बसेना. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारलं. डबा सुद्धा त्यांना कुठं दिसला नाही.
"हे बघ सखा !! अरे त्या सावंतवाडीला आमच्या पोराला रोज जायला वीस पंचवीस आणि यायला तेवढेच मिनिट लागतात आणि तू म्हणतोयस की मी वीस पंचवीस मिनिटात जाऊन आलो म्हणून !! " 
"आप्पा खरंच जाऊन आलोय !! डबा देऊन आलोय ! मला माझे पैसे द्या !! " 
"हे बघ सखा !! तू साहेबांना डबा दिलास की मधल्या मध्येच त्याच काय केलंस याचा मला विश्वास बसत नाहीये !! पण तुझी गरज बघून मी तुला पाच रुपये आत्ता देतोय !! उद्या पुन्हा याच वेळी ये ! मग अजून पाच रुपये देतो !!"
सखा हतबल झाला. त्याने ठीक आहे म्हणून मान हलवली.

"आणि अजून एक !! हे थोड खायचं घेऊन जा !! माझ्याकडून देतोय !! गरजू वाटतोयस म्हणून देतोय !!"
हातावर थोडी भाजी आणि थोड्या पुऱ्या आप्पांनी ठेवल्या. सखा त्या न खाताच आपल्या पिशवीत ठेवून बाहेर आला. धावत धावत त्यानं घर गाठलं. घर कसलं खुराडच ते , समोर शांता बसलेली पाहून त्याला आनंद झाला. आज दिवसभर काय झालं त्यानं सगळं तिला सांगितलं.

"आन ! दहा मिनीटात तुम्ही सावंतवाडील गेलात ??" शांता आश्चर्य वाटत म्हणाली.
"होय तर !! " सखा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
"काहीही नका बोलू उगाच !! " शांता चेष्टा करत म्हणाली. 
"बरं जाऊदे !! चल त्या दुकानाच्या मुनिमानी पुरी भाजी दिली ती तरी खाऊ !!
"पुरी भाजी ??" शांता आनंदात म्हणाली.
"हो !!" 

दोघेही आनंदाने ती पुरी भाजी खात एकमेकांना गप्पा मारत बसले. खाऊन झाल्यावर थकलेला सखा पाठ जमिनीवर टाकताच शांत झोपी गेला. पण आप्पांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजून गेला. 

"खरंच तो सखा साहेबांना डबा देऊन आला असेल का ??  आज रात्री साहेब गावाकड येतील तेव्हा कळेलच म्हणा !! तरीही मला विश्वास बसत नाहीये !! " आप्पा कित्येक वेळ विचार करत राहिले. रात्री दुकान बंद करायलाही त्यांना कळले नाही. अखेर घाईगडबडीत दुकान बंद करून सगळा आजचा जमाखर्च घेऊन ते साहेबांच्या घरी निघाले. 

क्रमशः 

✍️योगेश खजानदार 

वाचा पुढील भाग : शर्यत || कथा भाग २ ||Marathi katha ||

चार पानांचं आयुष्य || Marathi Sundar kavita ||



चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !!
प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!

पहिल्या पानावरती कुतूहलाने, नवं रूप पहायचं !!
बालपण हे सुंदर, त्याला मनभर बोलायचं !!
खेळायच , पडायचं , खूप काही शिकायचं !!
सुरुवातीच्या या पानात, जग सार लिहायचं !!

नकळत केव्हा मग, दुसरं पान वाचायचं !!
तारुण्याच्या आरशात, स्वतःला तासनतास पाहायचं !!
पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायच !!
कुठे यश , कूठे अपयश , सतत धडपडत राहायचं !!

येता येता मग ते, पान तिसरं बघायचं !!
स्वप्न सत्यात उतरवताना, घर ते बांधायचं !!
आई बाबा, बायको मुल, साऱ्यांना कवेत घ्यायचं !!
आपलं सुख बाजूला ठेवून, साऱ्यांना सुखी करायचं !!

मग येत चौथ पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं !!
उतरत्या वयात स्वतःला, पुन्हा तरूण करायचं !!
नातवाच्या हाताला धरून, साऱ्या घरभर फिरायचं !!
पिकलेल्या केसांकडे पाहत मग , आठवात हरवून जायचं !!!

चार पानांचं आयुष्य हे!! मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना, नवं काही लिहायचं !!

✍️ योगेश खजानदार

शोधाशोध || मराठी कविता || Marathi Kavita ||



सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??
हरवलेल्या वाटा!! आणि ओढ त्या कोणाची!!

बोल तू खरे !! रुखरुख आहे ना मनाची ??
आठवांचा गंध!! आणि भेट ती पावसाची!!

डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची!!

एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ??
जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची !!

वादळात भेट व्हावी!! होईल का क्षणांची ??
उद्ध्वस्त घरात, सोय होईल का निवाऱ्याची!!

इथेच पुन्हा यावे!! हीच ओळख नात्यांची??
संवाद आणि वाद !! हीच उत्तरे प्रश्नांची !!

सारं काही इथेच आहे !! मग शोधाशोध कशाची??

✍️ योगेश खजानदार

क्षण सारें असेच || Marathi Kavita || kshan Sare asech ||



क्षण सारें असेच, का निघून जातात?? वर्षा मागून वर्ष, मागे पडत जातात !!
कुठे गोड आठवांचा, गंध ठेवून जातात , कूठे उगा अश्रूंचा, बांध भरून जातात !!

क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात??

क्षण सारें असेच, जीव लावून जातात !! परतून येण्याचे का?  वचन देऊन जातात!!
मागे वळून पाहता , दूर का भासतात ?? डोळे बंद करता, जवळ का येतात ??

क्षण सारें असेच , अनोळखी होऊन जातात !! पाहता पाहता का?? अबोल होऊन जातात !!
हृदयाच्या कोपऱ्यात का? घर करून राहतात !!  आपलेच चेहरे विसरून, परक्यास आठवतं राहतात !!

क्षण सारें असेच, शब्द होऊन जातात !! लिहून घेतल्या कागदात , मन मोकळं राहतात !!
कधी प्रेमाची आठवण, जणु करत रहातात !!! शेवटच्या ओळीत का ?? सारं बोलून जातात !!

क्षण सारें असेच,  पाऊस होऊन जातात !! भेफान बरसताना का ?? स्वतःस विसरून जातात !!
कूठे ओल कायमची, मनात ठेवून जातात !! कूठे नुसता आभास, उगाच देऊन जातात !!

क्षण सारें असेच , नदी होऊन येतात !! कूठे वाट डोंगराची, कूठे उंचावरून कोसळतात !!
सारं काही सोबत, जणु घेऊन येतात!! अखेर त्या समुद्रात, स्वतःस हरवून जातात !!

क्षण सारें असेच, का निघुन जातात ??!

✍️ योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...