हिरमुसलेल्या फुलाला. ..!!

"हिरमुसलेल्या फुलाला
पुन्हा फुलवायचंय
मना मधल्या रागाला
लांब सोडुन यायचंय
ओठांवरच्या हास्याला
पुन्हा शोधुन आणायचंय
सोडुन सारे रुसवे
नातं हे जगायचंय

कधी तरी तिच्या सवे
सार जग फिरायचंय
हातात तिचा हात घेऊन
सोबत तिची व्हायचंय
सुख दुखाच्या लाटांमध्ये
हे जीवन जगायचंय
कधीच नसेल दुरावा असं
नातं हे जगायचंय

आठवणींच्या बाजारात
फक्त तिचंच नाव लिहायचंय
शोधुनही न सापडेन असे
प्रेम तिला द्यायचंय
डोळ्यान मधले भाव तिचे
ओठांवर आणायचंय
विसरुन जाईल रुसावा ती
असं मन फुलवायचंय
आणि तिच्या सवे प्रेमाचं
नातं हे जगायचंय. . !!"
- योगेश खजानदार

लहानपणं...!!

कधी कधी वाटतं
पुन्हा लहान व्हावं
आकाशतल्या चंद्राला
पुन्हा चांदोबा म्हणावं

विसरुन जावे बंध सारे
आणि ते बालपण आठवावं
शाळेत जाऊन त्या बाकावर
आठवणीच पुस्तक उघडावं

मित्रा सोबत पुन्हा एकदा
मनसोक्त बोलावं
कधी मस्ती कधी दंगा
सगळं बालपण दिसावं

आईने रागावलं तरी
डब्यातुन एक लाडु खावं
अभ्यास सोडुन पुन्हा एकदा
बाहेर खेळायला जावं

दादा सोबत पाऊसात
मनभर भिजुन घ्यावं
कागदी होड्यांनाही तेव्हा
पाण्यात सोडुन द्यावं

क्षणांना ही आता
मागे फिरवुन घ्यावं
कारण कधी कधी वाटतं
पुन्हा लहानं व्हावं




बाबा

रात्री आकाशात पहाताना
चांदण्याकडे बोट करणारा
माझ्या लुकलुकत्या डोळ्यात
स्वप्न पहाणारा आणि
त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा
बाबा तुच होतास

कधी मला रागवलास तरी
मायेनं जवळ करणारा
जगाची दुख सहन करून
आपली आसवे लपवताना
मला आनंदी ठेवणारा ही
बाबा तुच होतास

माझा हट्ट पुरवताना
स्वतः काटकसर करणारा
माझ्या छोट्याश्या जगाला
आनंदाने भरणारा
स्वतःच्या कष्टाने उभा करणारा ही
बाबा तुच होतास

माझ्या लटपणार्‍या पायांना
सावरून घेणारा
आणि उडणाऱ्या पक्षाकडे
बोट दाखवताना
पखांना बळ देणारा ही
बाबा तुच होतास

मी हरलो तरी
मला पुन्हा उठवणारा
आणि मी जिंकलो तरी
एका कोपर्‍यात उभारुन
आनंदाने पहाणारा ही
बाबा तुच होतास
- योगेश खजानदार










ती!!

माझ्या कित्येक कवितेत 'ती'चा उल्लेख नेहमी होतो. माझे मित्र मला विचारतात की  ' योग्या तुझी ती कोण आहे! ! जिच्यासाठी तु आजपर्यंत इतक्या कविता लिहिल्या आणि लिहित असतोस !! तेव्हा त्यांना काय सांगावं हा प्रश्नच पडतो. आता ती कोण आहे हे सांगाणार तरी कसं. 'स्वप्नातुन ती अगदी समोर जरी आली तरी तुझी लेखणी तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यात गुंग होऊन जाईल एवढं तिचं कौतुक कवितेतुन करतोस ..!' अस म्हणारा माझा मित्र नक्की मला काय सुचवतो तेच कधी कळत नाही. ' बाकी योग्या तूझ्या कवितेतील ती माझ्या आयुष्यात आली ना तर आयुष्यच बदलून जाईल ना माझं!! असं म्हणारा तुष्या माझ्या कवितेतील 'ती' शोधतोय तेही स्वतःसाठी असही मला गुप्तचर यंत्रणे कडुन कळलंय. असो ती त्याला लवकरच मिळेल ही.
   उदास किंवा अगदी प्रेमभंग झालेल्या माझ्या कविता वाचणारे लोक माझ्या भुतकाळात मला कोणी ती सोडुन गेली असणार असा अंदाजही लावतात. शेवटी त्याची तरी काय चुक म्हणा. ' योगेश सांगत नाही आपल्याला पण नक्कीच त्याची प्रेयसी त्याला बोलत नाही बघं !! अरे पैज लावून सांगतो ना!!  त्याच्या कवितेतुनच कळतना!! ' मग बहुदा त्यांनी माझ्या मोजक्याच कविता वाचल्या असाव्यात अशी मी आपली मनाची समजुत करुन घेतो आणि ती चा विषय बाजुलाच ठेवतो. शेवटी प्रत्येक कवितेला काही पार्श्वभुमी असते हे नक्कीच मग अशा कविता का लिहिल्या याचा विचार मी तरी करत नाही. पण मनातील ती ला प्रत्येक नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न करतो मग त्यात प्रेम व्यक्त करणं , विरह , ओढ आणि अशा कित्येक प्रेमाच्या छटा मी माझ्या कवितेतुन लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रत्येक छटां मध्ये ती ला पाहण्याचा प्रयत्न करतो.
  अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा न कळो. माझ्या प्रत्येक कवितेत मी 'ती' च्या सोबत जगलोय. प्रत्येकांच्या मनात तो किंवा ती चा चेहरा असतोच मग तो चेहरा काहीजण मनात लपवुन ठेवतात तर काही माझ्या सारखे त्याला कवितेत मांडुन हजारो रुप देतात. मी ही तेच केलंय. आज सगळ्यांना माझ्या मनातील ती कोण हे जाणुन घ्यायचंय कारण प्रत्येकाच्या मनात कोठेतरी ती नक्कीच असते जी माझ्या कवितेतुन त्यांना 'ती' ची आठवणं करुन देते .. हो ना?
 

लपुन छपुन

न राहुन पुन्हा पुन्हा
मी तुला पाहिलं होतं
लपुन छपुन चोरुन ही
मनात तुला साठवलं होतं

कधी तुझ हास्य
डोळ्यांत मी भरलं होतं
कधी तुझ्या अश्रु मधलं
दुख मी जाणलं होतं

तु न दिसता कुठेच
मन हे बैचेन झालं होतं
तुला शोधत शोधत ही
दुरवर जाऊन आलं होतं

प्रेम तुझ्यावर करताना
तुझ्या पासुन लपवलं होतं
आठवणीत तुला लिहिताना
शब्दात ते मांडलं होतं

कधी तुझी वाट पहाताना
वाटांवर भरकटलं होतं
तुझ्या विरहात ही
मन खुप रडलं होतं

पहायच तुला पुन्हा पुन्हा
मन हे बोलतं होतं
आणि लपुन छपुन चोरुन ही
मनात तुला साठवतं होतं
- योगेश खजानदार




नातं आपलं

क्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं

विचार एकदा मनाला
तिथे कोण राहत होतं
कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये
सतत माझं नाव होतं

तु रुसावंस मी चिडावं
नातं हे दुरावलं होतं
तु न बोलावंस मी ही रागवावं
सगळच इथे बिघडलं होतं

मी माझा विसरून जावं
तुही कुठे हरवुन जावीसं
मग सारे बंध तुटावेत
इतक ते सैल नव्हतं

कधी आठवणीत पहावं
राग सारा विसरुन बघावं
नातं हे आपल आजही
तिथेच आपली वाट पाहतं होतं
- योगेश खजानदार

दोन श्वास ..!!

  "खिडकी मधुन येणारा वारा आठवणीचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसुन होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचंय हे त्याला ऐकायच होतं. पण शब्द तिच्या ओठांवर येतंच नव्हते. बहुधा तेही रुसले असावेत कारण ती त्याची साथ अर्ध्यावरच सोडुन चालली होती. त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि मनात दुखाचा आक्रोश.
  पण प्रयत्न करुन ती बोलली.. ' मी निघुन गेल्यावर तु पुन्हा नव्याने आयुष्य सुरु कर !! माझ्या आठवणी कायमच्या पुसुन टाक !! आणि मला माफ कर मी तुला दिलेल वचन पुर्ण नाही करु शकले!! ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आठवणींच्या कित्येक गोष्टी ती त्याला सांगत होती . शेवटच एकदा त्याला मनभर बोलतं होती. जीवनाच शेवटचं पानं लिहित होती.
'तु निघुन गेल्यावर मी जगायचं तरी कोणासाठी सांग ना?' तो तिला विचारात होता. ' तिच्याकडे एकटक बघत होता. ' माझ्या मनाचा विचार न करता तु का जातेयस !! छोट्याश्या भांडणात  एक क्षण जरी नाही बोललो तरी न राहावणारा मी,  तु कायमची माझ्या पासुन अशी दुर गेल्यावर मी राहु तरी कसा सांग ना?' त्याच दुख त्याला सहन होत नव्हत. मनातल्या भावनांचा गुंता त्याला सुटत नव्हता. कित्येक गोष्टी फक्त तो सांगत होता.
पण नियतीच काही वेगळंच ठरलं होतं. क्षणात सारं संपलं होतं. तो तिला खुप काही सांगत होता. पण तिच पानं लिहुन झालं होतं. तिचा हातं तसाच त्याच्या हातात होता. खिडकीतून दिसणारा सुर्य केव्हाच मावळला होता. सावल्यांनी केव्हाच मनात घर केलं होतं. आठवणींचा अंधार आता सर्वत्र दिसत होता. तो तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता पण आता ती त्याला कायमचं सोडुन गेली होती.
ते बोलनं ती अर्धवट सोडून गेली होती. तिच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. पण तरीही तो बोलतंच होता. तिच्या शांत चेहर्‍याकडे फक्त बघत होता. मनात तिला साठवत होता अगदी कायमचं.. तीच ते शांत रुप त्याला खुप काही बोलत होतं. मिटलेल्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. आणि ते अश्रु त्याला जणु सांगतं होते..

श्वासांचा हिशोब करताना
शेवटचे दोन श्वास
मी राखुन ठेवले होते

एक श्वास तुला पहायला
एक श्वास तुला बोलायला

मनातल काही सांगायला
तुझ्या मनातल ऐकायला

तुझा हात हाती घ्यायला
माझा हात
तुझ्या हाती द्यायला

आठवणी जाग्या करायला
डोळ्यातले अश्रु पुसायला

दोन क्षण जगायला
आणि प्रत्येक श्वासांवर
तुझच नाव लिहायला
मी .. शेवटचे दोन श्वास
राखुन ठेवले होते...!!"
- योगेश खजानदार

एक गीत... !!

गीत ते गुणगुणावे
त्यात तु मझ का दिसे
शब्द हे असे तयाचे
मनात माझ्या बोलते असे

तु राहावी जवळ तेव्हा
सुर जे छेडले असे
हुरहुर ही कोणती मनाची
ठाव मझ माझा नसे

फितुर झाले शब्द जेव्हा
गीत ते माझे असे
भाव हे माझ्या मनीचे
सांगतो तुला असे

ऐक ना तु एकदा
गीत हे माझे असे
तुझ्यातील तु मला
भेटशील का रे असे

हरवुन गेली वेळ जेव्हा
भास हा होतो असे
न कळावे नजरेस तेव्हा
का तुला शोधसी असे

हे गीत गावे पुन्हा पुन्हा
मन हे का ऐकते असे
शब्द हे असे तयाचे
त्यात तु मझ का दिसे
- योगेश खजानदार



Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...