शब्दाचिया नावे ...!!

"शब्दांचिया नावे उगाच दोष जातो
कवितेत एक भाव तूच आहेस
तुझेच आहे दिसणे यात
नी तुझेच आहेत भास यास
उगाच खाती भाव ती ओळ शब्दाची
त्यात सौदर्य ही तूच आहेस

एक लय येते बोलते ओठातून
सुरास शोधता फिरते नजरेतून
भेटता सुरू त्या कवीतेस
ते सुरू ही किती सुंदर आहेत
त्यातील एक गोडवा सखे तूच आहेस

ऐकावी पुन्हा पुन्हा वाचावी का पुन्हा
त्यात तुझ्याच असण्याची जाणीव आहे
वहीच्या पानास ही मोह वाचण्याचा
त्यास ही आस तुलाच पाहण्याची आहे
सखे त्या मनातील एक ओढ तूच आहेस

कधी राग आहे कधी प्रेम आहे
कधी भेटण्याची इच्छा आहे
कधी एकटा मी तर कधी तू सोबती आहे
कवितेतील तुला सांगू किती मी
कवितेचे कित्येक रंग फक्त तूच आहेस

शब्दांचिया नावे उगाच दोष जातो
कवितेत एक भाव तूच आहेस..!!"

✍योगेश खजानदार

स्वप्नांच्या पलीकडले !!!

स्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे

तुझ्या आठवणीच्या पडद्यावर
मनसोक्त एकदा फिरताना
झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे

हरवून जाईल कधी ती सांज
ओल्या मनातील भावनेत
त्या भावनेतील ओल मला व्हायचं आहे

कधी एकांती, कधी तुझ्या सोबत
कधी अबोल, तर कधी खूप बोलत
तुझ्या गप्पांमध्ये मला हरवून जायचं आहे

ही दुनिया थोडी अतरंगी
तुझ्या आवडत्या रंगाने भरली
त्या रंगातील एक रंग मला बनायचं आहे

कधी दूर असेन ,कधी जवळ तुझ्या
साथ माझी असेल, कधी विरह असेन जरा
त्या विरहातील ओढ मला व्हायचं आहे

साथ तुझी द्यायला, सोबत माझी व्हायला
तुला आपलेसे करायला , मला तुझ्यात हरवून जायला
त्या घरात मला एकदा यायचं आहे..!!!
✍ योगेश खजानदार

नव्या वाटा ...!!

नव्या वाटांच्या शोधात
पाखरांनी घेतली भरारी
उठ तूही आता
सोडून दे कालची काळजी

मुक्त फिरायला हे आकाश
बोलावते आहे तुजला आता
कोणता विचार मनात घेऊन
थांबला आहेस तू या क्षणी

सूर्याची ती किरणे
खुणावत आहेत तुला नव्यानी
उठ सज्ज हो आता
पसुरून ज्यांना दाही दिशी

त्या वाऱ्यासही पुन्हा आता
नव्या स्वप्नांची आस लागली
तुझ्या डोळ्यात एक वाट
नव्याने यावी त्यास दिसूनी

कोणती ही नवी आशा
सर्वत्र गेली पसरुनी
तुझ्या मनात आज नसावा
कोणताही कालचा राग मनी

ही नवी आशा ही नवी दिशा
बोलते आहे तुजला नव्याने
उठ तू आता पुन्हा
आणि सोडून दे कालची काळजी!!
✍योगेश खजानदार

नाते भरकटलेले

  कित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बसला होता. खूप वेळ बोलण झाल्या नंतर मी त्याला रोज एक संध्याकाळी तिला मेसेज करायला सांगीतला. त्यामध्ये बाकी काही नाही फक्त त्याला आपल्या गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्या व्हायला हव्या एवढंच लिहायला सांगितलं होत आणि शेवटी एक वाईट शब्द लिही अस निक्षून सांगितलं. तसे त्याने महिनाभर केले त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तिने त्याला सगळीकडे ब्लॉक केले फोन रिसिव्ह करणे सोडून दिले.
  महिना झाल्या नंतर मी दोघांनाही त्यांच्या नकळत मला भेटायला सांगितल. वेळ एकच पण दोघेही अचानक समोर येतील या गोष्टी पासून अनभिज्ञ. अचानक समोर एकमेकांना पाहून दोघेही गोंधळून गेले. तिला एवढं समजावून सांगूनही ती समजू शकली नाही या गोष्टीमुळे तोही थोडा चिडलेला. कारण व्यक्तीला समजून सांगूनही जर समजत नसेन तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो. तिने त्याच्याकडे बघून न पाहिल्या सारखे केले. थोडा वेळ जाऊ दिला आणि विषयाला हात घातला. तो म्हणाला आता मला तिला समजावून नाही सांगायचं . आणि ती म्हणाली मला आता त्याला बोलायचं नाहीये. दोघांचेही मत ऐकून घेतल्यावर मला त्यांना विचारावं वाटलं. गेला महिना याने तुला कित्येक मेसेजेस केले तरीही तुझा राग का गेला नाही?? तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही ?? तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास?? तर त्याच उत्तर अगदी अपेक्षित होत की तू म्हणालास म्हणून. दोघांच्या ही बाजू कित्येक वेळ ऐकून घेतल्या नंतर मी माझे मत मांडले.
  खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला. तिने त्याच्या मेसेजेस मध्ये फक्त तेच वाईट शब्द पाहिले पण त्याची तिच्या बद्दलची काळजी कधी पहिलीच नाही. दोघेही चुकत न्हवते पण नाते कुठे विसरले जाते आहे हे त्यांना कळलं नाही. कित्येक चर्चा अशाच घडत जातात. आपण नेहमी आपल्या नात्यामध्ये  वाईट गोष्ट धरून ठेवतो जी पूर्ण नातं उध्वस्त करून जाते. नात हे खरतर दोघांच्या समजुतीने टिकते, ना की कोणाच्या सांगण्यावरून. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोण दुसऱ्याने सांगितले म्हणून वाईट म्हणणे खरंच चूक असते. खरतर यात त्याच काहीच चुकत नसते नात्यातील कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातून नकळत घडून जातात. कोणीतरी म्हटलं म्हणून, किंवा कोणाकडे पाहून नात कधीच सुधारू शकत नाही.त्याला लागतात एकमेकांमध्ये विश्वासाचे धागे जे कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू नयेत असे . अखेर दोघांनाही कळून चुकलं की नात्यात छोट्या छोट्या वाईट गोष्टी पहायच्या नसतात अशाने नात टिकवायचं अवघड होऊन बसतं. त्या छोट्या मेसेजेस ने त्यांना खूप काही शिकवलं. कोणीतरी सांगितल म्हणून आपल्या व्यक्तीला नाव ठेवायचं नसत हे त्यालाही कळून आले. बाकी नाती काय मनातून सुरू होतात आणि अखंड ओठातून बोलू लागतात .. अगदी अखेर पर्यंत ... हो ना???

✍योगेश खजानदार

शब्द शेवटचे !!

राहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र ठेव

वेडावला असेन धुंद वारा
मुक्त झाल्या असतील भावना
तुला त्रास देण्यास तेव्हा
त्याला नको म्हणू नकोस

कधी येईल एक सर
तुला पाहण्यास सहज
त्या सरी मधे भिजण्यास
खूनावेल ते आभाळ असेच

सांग कशी असेल आपली
वाट पुढच्या एकांताची
माझ्या विरहात तू तेव्हा
स्वतः स हरवूशन जाण्याची

पण एक खंत आहे मनाची
शेवटच्या त्या शब्दाची
अबोल त्या तुझ्या मनास
उगाच दोष देऊ नकोस

काही उरले असेन कदाचित
ठेव जपून तळाशी
कधी अश्रू सोबत आलेच तर
माझ्या कवितेस तू वाचू नकोस !!
✍ योगेश खजानदार

बोलकी एक गोष्ट..

अबोल या नात्याची
बोलकी एक गोष्ट आहे
मनातल्या भावनेस
शब्दांचीच एक साथ आहे

नजरेस एक ओढ
भेटीस आतुर आहे
मिटल्या पापण्यात
ओघळते अश्रू आहे

मला सांग ना
हे अंतर कोणते आहे
तुझ्या विरहात
कोणती हुरहूर आहे

नकोस जाऊ दुर
मनात एक सल आहे
तुझ्या असण्याचे
भास होत आहे

शब्दांचीया सवे
मी तुलाच शोधतो आहे
अबोल या नात्यास तेव्हा
पुन्हा बोलतो आहे

येशील परतुनी तू
हे शब्द सांगत आहे
माझ्या सवे राहून
तुलाच आठवते आहे

कसे हरवले हे नाते
वाऱ्यास पुसतो आहे
आठवणीच्या या जगात तुला
दाही दिशा शोधतो आहे

अबोल या नात्याची
बोलकी एक गोष्ट आहे !!!

✍योगेश खजानदार


जागतिक महिला दिनानिमित्त...!!

माझ्यातल्या "मी" ला
शोधायचं आहे मला
मी एक स्त्री आहे
खूप बोलायचं आहे मला

मी जननी आहे मी मुलगी आहे
तरी स्वत:ला पहायचं आहे मला
कधी पंख पसरून या नभात
मुक्त फिरायच आहे मला

कधी क्षणास फिरवून
बाबांची परी व्ह्यायच आहे मला
त्या हसऱ्या परीला
काही बोलायचं आहे मला

शोधता शोधत कधी उगाच
हरवायच आहे मला
सासरी चाललेल्या माझ्या डोळ्यातील
अश्रू पाहायचे आहेत मला

ममत्व माझे पाहताना
माझ्या बाळास बोलायचं आहे मला
आई म्हणून घडवताना
माझ्या मिठीत घ्यायचे आहे मला

एक स्त्री शोधताना
माझेच भेटले मी मला
कधी मुलगी होऊन , कधी आई होऊन
आरश्यात पाहिले मी मला

बायको म्हणून जगताना
शोधू कसे मी मला
माझा मधल्या स्त्रीला
वेगळे पाहू कुठे मी मला??

✍ योगेश खजानदार

कविता संसाराची

संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती

सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी
चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी

कधी कधी विसरून गेलो तर किती रागावते ती?
आहो विसरून गेलात म्हणून, संसारात बघा म्हणते ना मी

संसाराचा गाडा सुरळीत चालवतोच ना मी??
पण थोड लक्ष द्या म्हटलं तर कुठ बिघडल म्हणते मी ??

सकाळी उठून ऑफिसला जातोच मी ?
ऑफिसला जाताना न चुकता डबा देतेच ना मी.

खरंच सांग आता मला ,तुझ्या मनातल ओळखू कस मी ?
हे पाहिजे ते पाहिजे तुझ्या मागण्या किती ?

आता निघालाच विषय म्हणून सांगते आहे मी
घरातलं काही संपलं तर सांगायचं कोणाला मी

सारखं सारखं काहींना काही संपत कस म्हणतो मी ??
माझ्या माहेरचे येत नाहीत संपवायल सांगते बरं मी

संसाराच्या या कवितेत कशी बोलते बघा ती
आहो आधीच म्हणाले ना चुकलं काही तर माफी मागते मी

घरात बसून नुसती हुकुम सोडते बघा ती
घरातलं सार काम करते ,त्याच कौतुक करा म्हणते का मी

कष्ट करून पैसा कमावतोच ना मी
आहो त्यामुळेच तर मानाने बाहेर फिरतच ना मी

कसे असतात संसाराचे सांगू कसे मी
कधी वाद कधी प्रेम यातच नेहमी सापडते मला ती

म्हणूनच संसारात कधी ते बोलतात कधी मी
प्रश्न त्यांचे असतात आणि उत्त्तर देते मी !!!

✍योगेश खजानदार

सुनंदा (कथा भाग ५) अंतिम भाग

"आजे , उठवण श्यामला!! " सुनंदा अगदी केविलवाणा चेहरा करून आजीकडे पाहू लागली.
आजी श्यामला आपल्या जवळ घेत पाहू लागली. तिच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला.
"बाळा , अस नाही करायचं बर!! हे असं !!! " आजी हुंदके देत बोलू लागली. तिच्या मनाला कित्येक गोष्टी कळून चूकल्या होत्या.
"आजे , रडायला काय झाल ..!! माझा श्याम उठतं का नाहीये !!! " सुनंदा अगदी मोठ्याने बोलत होती.
"सुनंदा , सावर बाई स्वतःला!!! श्याम गेलाय !!! " आजी तिला जवळ घेत बोलत होती.
"काहीही काय म्हणतेस आजे!!! माझा श्याम असा जाणार नाही !!! नाही !!! " सुनंदा श्यामला जवळ घेत म्हणाली.
"सुनंदा, सावर स्वतःला!!! " अस म्हणताच सुनंदा कित्येक मोठ्याने आक्रोश करत आजीकडे पाहू लागली.
"माझा श्याम !!! माझा गुणी श्याम !!! गेला ?? नाही आजे गेला नाहीये तो !!! बघ एकदा त्याला बोल म्हणाव मला !!!  आईची कसली रे लावली ही चेष्टा !!! ये श्याम !!! श्याम!!!! उठ रे बाळा!! आता तुला माझी शप्पथ आहे बर !! " सुनंदा कित्येक अश्रू पुसत बोलत होती. सुनंदाच्या आवाजाने वस्तीतील लोकांनी गर्दी केली.
  काही केल्या सुनंदा श्यामला सोडायला तयार नव्हती. कित्येक प्रयत्ना नंतर श्यामच्या त्या देहाला स्मशानात आणलं होत. सुनंदा आता एक शब्दही बोलत नव्हती. ती फक्त पहात होती. सरणावर ठेवलेल्या आपल्या मुलाचा चेहरा शेवटचा पहात होती. हळू हळू ते पेट घेत श्यामला आपल्यात सामावून घेत होते. हो ती चिता रचली होती.
"या दोन्ही जगात तुला कधीच सुख मिळालं नाहीच ना रे!! इकडे तुला माझ्या पासून दूर केलं!! आणि त्या समाजाने नेहमीच रांडेच पोर म्हणून हिणवलं!! पोरा पण का सोडून गेलास मला ?? माझ्यासाठी तरी !! पण त्या देवाला कदाचित तुझ्यासारख गोड पोर पाहिजे होत म्हणून ते त्याने बोलावून घेतल, तू रांड आहेस, तू वेश्या आहेस तुझी तेवढी लायकी नाहीये हे गोड पोर सांभाळायची म्हणून कदाचित तुला त्याने बोलावून घेतलं!! हो बाळा सुटलास तू !! माझ्या सारख्या बाईला पण प्रेम करायचं शिकवून गेला तू!! माय काय असते हे सांगून गेलास तू !!! श्याम !!! " सुनंदा पेटत्या ज्वालाकडे शांत पहात विचार करत होती.
"सूनंदे , चल पोरी घरी !!! "आजी सूनंदेला उठवू लागली. स्मशानात फक्त त्या दोघीच राहिल्या होत्या. बाकी लोक केव्हाच निघून गेले. विसुरू गेले.
"आजे !! बघणं !! होत्याचं नव्हतं झालं !! कालपर्यंत आई आई करणार पोर !! आईला न बोलताच दूरच्या प्रवासाला निघून पण गेलं!! " सुनंदा भरल्या डोळ्यांनी बोलत होती.
"असच असतं पोरी!! जीव लावणारी माणसं लवकर दुरावतात!! "
"आणि आयुष्याची आठवण ठेवून जातात!! " सुनंदा शांत बोलत होती.
सुनंदा घरी येताच कित्येक वेळ एकटीच त्या खोलीत बसून रडत होती. ज्या श्यामसाठी जगायचं तोच निघून गेला मला सोडून, मग आता जगायचं तरी कोणासाठी. अस म्हणत कित्येक वेळ ती बसून होती. श्यामच्या कित्येक वस्तू तिला त्याची आठवण करून देत होते." श्याम !! माझं पोर श्याम!! त्या सरपंचाच्या डोळ्यात सलनारा श्याम!!! त्या शाळेतल्या पोराला रांडेच पोर वाटणारा श्याम !! सतत आई आई करणारा माझा श्याम !! आई तू पण झोप ना म्हणत माझी काळजी करणारा श्याम !! " सुनंदा श्यामच्या आठवणीत पुरती बुडाली होती.
"ये सुनंदे !! " बाहेरून दरवाजा जोरात वाजत होता.
"कोण आहे !! " सुनंदा स्वतः ला सावरत म्हणाली.
"मी आहे सरपंच !! दरवाजा उघड !! " सरपंच जोरात ओरडला.
"सरपंच तुम्ही जावा इथून !! " सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
"काय ग ये रांडचे !! मला काय जा म्हणती तू?? कोण जास्त पैसे देणार भेटलं का काय तुला?? "  सरपंच सुनंदा वर हात उगरात बोलला.
"सरपंच माझं पोर आताच गेलं!! आणि आता तुम्ही कधीच नाही आलात तर चाललं मला!! "
"चला घाण गेली एकदाची !! पोर लैच त्रास देत होतं !!"
"सरपंच !!!" अस म्हणत त्याच्या कानाखाली मारत सुनंदा त्याच्याकडे कित्येक वेळ पहात होती. सरपंचाला हे अनपेक्षित होत.
"साली रांड !! आली ना लाईकी वर !! चल आत !! खूप झाली तुझी नाटक !! साली छिनाल !!! "  सरपंच सूनंदाला खेचत खोलीत घेऊन जाऊ लागला.
"सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! " सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली.
"अरे भाड्या जरा तरी दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की!! वासनेची भूक एवढी कसली रे तुला!!! जा एकदा स्मशानात जाऊन बघ !! तिथं प्रेम ,वासना , राग , तिरस्कार सगळं काही राख झालंय !!"
"जास्त बोलू नको सुनंदे !! गप्प चल आत!! आणि कित्येक लोकासोबत झोपणारी तू !! तुला कसली आलीय प्रेम आणि माया !! " सरपंच पुन्हा तिला खेचू लागला.
"यावेळी नाही !! नाहीच !!" सुनंदा हात सोडवत घरातून बाहेर पळाली.
"सुनंदा !! " पळत जाणाऱ्या सुनंदाकडे पाहत आजी हाक मारू लागली.
सरपंच हळूच निघून गेला. सुनंदा कुठे आहे हे त्याने पाहीलही नाही. पण आजी थकत थकत सूनंदाच्या मागे मागे जाऊ लागली.
"सुनंदा!! " आजीचा आवाज सुनंदा पर्यंत पोहोचलाच नाही.
ती फक्त पळत होती. हो या दुनियेपासून , ती फक्त पळत होती. तिला भान नाहीं राहिले स्वतःचे , स्वतःचे अस्तित्व विसरून ती पळू लागली. कित्येक वेळ. त्या वस्तीपासून दुर लांब कुठेतरी !! पण कुठे हे माहीतच नव्हते.
"आई , ती दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप !! " श्यामचं हे बोलणं तिला अचानक आठवल. मग मी जाऊ कुठे बाळा ??" सूनंदाच्या मनाने हा प्रश्न केला.
"आई !!! इथे ना मला खूप बरं वाटतंय !! आणि कोणी काही बोलत पण नाहीये !! कोणी उठवत पण नाहीये !! कोणी हाकलून पण देत नाहीये !! " सुनंदा पळत पळत स्मशानभूमीत आली होती. ती राख कदाचित तिला बोलत होती.
"आई , आता ही राख पाहून कोणी ओळखणार पण नाही मला !! की मी रांडेच पोर आहे म्हणून!! " आई तू नकोस उगाच पळू!! कारण ते जग खूप वाईट आहे, तुला ते कसही धरनारच !!! " सुनंदा फक्त पहात होती.
"काय करू मी पोरा !! तुझ्याशिवाय मला एक क्षणही राहवत नाही!! " कस जगू मी !!! "सुनंदा त्या राखेकडे पहात बोलत होती.
बोलता बोलता ती अचानक गप्प झाली, चालत चालत बाहेरच्या नदीजवळ आली. आपल्या आयुष्याची ही कथा इथेच संपवायची या निर्धाराने ती चालू लागली. कदाचित नदीला आपलस करायला निघाली.
  कित्येक वेळा नंतर आजी तिथे पोहचली. सूनंदाच्या प्रेताकडे पहात बोलू लागली.
"ये सुनंदे !!! " उठ की ग !!" आजी रडत बोलत होती.
गर्दीतल्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करत होती. मदतीसाठी!!
"कोण हो ही ? " गर्दीतला एक माणूस दुसऱ्या माणसास बोलत होता.
"रांड साली !!! " वरच्या वस्तीतली !! मेली बघा !!! "
  " हो !!! रांड साली !!! कित्येक वेळा वासनेच्या तुझ्या सारख्या कुत्र्याला सांभाळणारी मी सुनंदा रांड !! अरे रांड मी नाही रांड तुझी वासना आहे !!! जिला ना भावना कळतात , ना प्रेम !! फक्त हवी आहे मी एक रांड म्हणुन!! उपभोगायला फक्त !!! " कदाचित ते सूनंदाचे प्रेत असेच काही सांगत होते .
अखेर त्या वस्तीतल्या घरात वासना आणि प्रेम या दोघांचाही अंत झाला होता, ना वासना जिंकली ना प्रेम, उरल्या होत्या भिंती काही आठवणीच्या साक्षी देत , स्वतःशीच बोलत.
"बाळा शिकून मोठा झालास ना की तू या नरकातून बाहेर पडशील!!!"
"पण आई !! ते जग खूप वाईट आहे !!!! "

समाप्त.

✍योगेश खजानदार

सुनंदा...!!(कथा भाग ४)

" ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! " सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
"बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना पटकन!! चल बर आपण वैद्यांकडे जाऊयात!! तुला बरं व्हायचंय श्याम माझ्यासाठी!!! " सुनंदा श्यामला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.
"सुनंदा , पहिलं त्याला कडेवर घे !! आपण त्याला वैद्याकडे घेऊन जाऊयात!! "  आजी गडबडीत बाहेर गेली. शेजारच्या एका पोराला तिने बैलगाडी आणायला सांगितली. श्यामला त्यात बसवून सुनंदा आणि आजी शेजारच्याच वाडीत जायला निघाले.
"आजी , श्याम बोलत का नाहीये मला!! " ये श्याम उठ ना !! बाळा मी पुन्हा तुला कधी सोडून नाही जाणार!! "
"होईल पोर नीट , तापेन पोराला सुधरत नाहीये !! " आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
"देवाच्या चरणी बाकी काही मागं नाहीये माझं आजी !! हे पोर आहे म्हणून मी कसेतरी दिवस काढते आहे बघ!! तो नीच सरपंच, नुसतं बाई सोबत झोपायला पाहिजे त्याला!! पोर आजारी आहे म्हटल्यावर तरी निघून जाईल वाटलं होत , पण नाही !! " सुनंदा रागाच्या स्वरात म्हणली.
"वासनेच्या आहारी गेलेल पिसाळलेल कुत्र आहे ते !! याला कसल्या आल्या भावना आणि मन !! " आजी एकदम बोलून गेली.
बघता बघता वाडीच्या जवळ बैलगाडी आली. वैद्याच घर जवळ येताच सुनंदा खाली उतरली, धावत जाऊन तिने वैद्याच्या घराचा दरवाजा वाजवला.
" कोण आहे !! " आतून वैद्य बोलता झाला.
"वैद्यबुवा , मी शेजारच्या गावची सुनंदा  !! माझं पोर तापानी फणफणतय!! " सुनंदा असे म्हणताच वैद्यबुवानी दरवाजा उघडला. श्यामला घरात घेऊन जात वैद्य म्हणाले.
"कधीपासून आहे ताप !!"
"दोन दिवस झाले!! " आजी वैद्यानकडे पहात म्हणाली.
"मग यायला इतका उशीर का केला!! "
वैद्यांनी अस विचारताच दोघीही काहीच न बोलता एकमेकांकडे पाहू लागल्या.
"बरं !! तापेचा जोर भयंकर आहे !! मी काही औषधं देतोय !! थोड्या थोड्या वेळाने त्याच्या जिभेवर ठेवत जा !! "
" बुवा , बरा होईल ना माझा श्याम ???"
"तापेचं जोर खूप आहे बाई !! होईल तेवढी काळजी घे !! बाकी सगळं त्याच्या हाती आहे !!! " अस बोलतच सुनंदा थोडी शांत झाली. परतीच्या प्रवासात तिने श्यामला आपल्या जवळ मांडीवर झोपवलं .
"आजी , या पोराची अवस्था अशी व्हायला मीच कारणीभूत आहे ना??" सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
"नाही ग पोरी!! तुझ्या नशिबाला जे आहे त्याच्याशी तू खंबीर पणे लढते आहेस !! त्यातूनही या पोराला तू घडवतेस!! " या पोराला कधीही नसती भेटली अशी आई तू आहेस!!! " आजी सुनंदाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.
"पण या नरकात त्याला दोष नसतानाही भोग का भोगावे लागतात ??"
"तुझ्यासारखे कित्येक वर्ष झाली मीही या प्रश्नाची उत्तरे शोधतेय बघ !! "आजी बैलगाडीतून उतरत म्हणाली. बघता बघता त्या दोघी घरी आल्या. सुनंदा श्यामला कडेवर घेऊन घरात आली. पलंगावर झोपवून. घरात काम करायला गेली.
"ये सुनंदा, दार उघडं !!! "
"कोण आहे !!! "
"मी आहे !! सरपंच!! " सुनंदा दार उघडायला बाहेर आली.
"सरपंच आताच आले मी शेजारच्या वाडीतून!!! "
"तिथं कोणाकड गेली होतीस झोपायला?? " सरपंच अस म्हणत जोरात हसला.
"पोर खूप आजारी आहे !! तापेने त्याचा डोळा पण उघडत नाहीये !! त्यालाच वैद्याकड दाखवायला घेऊन गेलते !! "सुनंदा सरपंच कडे पाहत म्हणाली.
"ते पोर होय!! बरं ते जाऊ दे !!! त्याला उचल आणि बाहेरच्या अंगणात झोपाव !! उरक चल!!! "
"सरपंच या वेळी नाही जमणार !!! तुम्ही जावा इथून!!" सुनंदा सरपंचाला हात जोडून बोलत होती.
"ये रांडिचे !! माझ्यासमोर असली नाटक चालायची नाहीत!!! जा त्याला बाहेर झोपाव ...!! नाहीतर आताच्या आता या वस्तीतून आणि गावातून हाकलून देईन!! माहितेय ना मी कोणाहे ते !!! " सरपंच डोळ्यातून आग ओकत बोलला.
"सरपंच !! मला माफ करा!!! मी भिक मागते तुमच्यासमोर !!" सुनंदा अश्रू पुसत बोलली.
अस म्हणताच सरपंच तावातावत श्यामला पलंगावरून उचलून घेत बाहेर अंगणात ठेवून आला.सुनंदा त्याला आडवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण सरपंच तिला ओढत पुन्हा खोलीत घेऊन गेला. वासनेच्या मदमस्त नशेत बुडण्यासाठी. एक माणूस राक्षस झाला, कित्येक बलात्कार झाले, पण त्या खोलीने आणि सूनंदाच्या घराशिवाय कोणी दुसऱ्याने पाहिलेच नाहीत.
   दारू पिऊन रस्त्याने हत्ती चालावा तेव्हा त्याला काहीच कळत नाही. तो फक्त चालत असतो आपल्याच धुंदीत, तसच कदाचित वासनेची धुंदी नसानसात भिनलेली ही जमात फिरत असते. कित्येक वेळ ते पोर तसच बाहेर पडून होत जमिनीवर. आतमध्ये चाललेल्या त्या सगळ्या गोष्टींना अनभिज्ञ. पण आतून एक आई ओरडते आहे. पोरा मला माफ कर रे!! ही आई तुझ्यासाठी आपुरी पडते आहे!! माझं आईपण फक्त आता रडते आहे !! बाळा काळजी घेशील ना रे स्वतःची ??
सकाळ उजडली सरपंच दबल्या पावलांनी निघून गेला. सुनंदा पळत पळत श्यामकडे आली.त्याला जवळ घेत कित्येक वेळ रडु लागली.
"पोरा ,माफ कर रे मला!!! "श्यामच्या डोक्यावर आपले ओठ ठेवत सुनंदा म्हणत होती.
माझ्या सारख्या बाईला आईपण नाहीरे सहन होत!! ही आई !!माझ्यातील आई ,या माझ्या बाळाची आई मला एका दगडापासून पुन्हा स्त्री करते !! तुझ्यासाठीच भावना माझी तीळतीळ तुटते आहे रे !!! "
श्यामच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली.
"अंग गार लागतय रे श्याम !! ताप पण गेला आता तुझा !! "सुनंदा श्यामकडे पहात म्हणाली. दरवाजाचा आवाज होताच ती पाहू लागली, आजी आतमध्ये येत होती.
"ये आजी बघ ना !! श्यामचा ताप पण गेला!! अंग गार लागतय त्याच !! ये श्याम आता तरी उठ !! बघ आता तरी आईकडे !! बघ या आईची काय अवस्था झालीय ते !!! उठ ना!!! सुनंदा श्यामकडें पहात बोलतच होती.
आजी सूनंदाचा जवळ आली.

क्रमशः ...

✍योगेश खजानदार
 

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...