तुझ्या आठवणीत ...!!✍️

असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही
क्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही
उगाच भांडत बसत ते माझ्याशी
आणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही
सांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही

असं नाही की नजर तुला पाहण्यास आतुर नाही
या नजरेत तुझ्याशिवाय आता कोणी राहतही नाही
पापण्यांच्या आड थोड डोकावून पाहिलं तर
आठवणीच्या अश्रूंन शिवाय काही भेटणारी ही नाही
सोबत करतं मला तुझी आणि गालावरती ओलावतही नाही
कारण तुझ्या आठवणीत ते आता काही बोलतही नाही

असं नाहीं की हा श्वास आता तुझ्याशिवाय राहत नाहीं
प्रत्येक श्वासात मला आता तुझी आठवण देत नाही
उगाच तुझा गंध आता या क्षणासही लावत नाही
अधुऱ्या त्या वाटेवरती तुझी वाटही पाहत नाही
कारण हा श्वास आता तुझ्यावर रागावतही नाही

असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही ..!!

✍️© योगेश खजानदार

अश्रुसवे...✍️

"अश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले

समजावले मनास किती त्या
तुझ्याच जगात हरवून गेले
बोलले किती मला ते आणि
निशब्द होऊन निघून गेले

कधी भास होऊन भेटता
क्षणभर सोबत देऊन गेले
कधी तुझ्या भेटीस मग का
अधुऱ्या मिठीत राहून गेले

सांग कधी येशील भेटण्यास
शब्दही तुझ विचारून गेले
वहितल्या त्या पानावरती
तुझ्याच साठी झुरून गेले

ओढ तुझी लागली नजरेस
कित्येक भाव सांगून गेले
उरल्या या कित्येक क्षणात
तुलाच पापण्यात साठवून गेले

अश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले...!!"

✍️©योगेश खजानदार

नव्याने पुन्हा..✍️

नव्याने पुन्हा ती वाट दिसली
जिथे आजही तुझी ओढ आहे
नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले
नजरेत आजही तुझाच चेहरा आहे

कसे सावरू या मनास आता
ते पारिजातक जिथे सुकून गेले आहे
आठवांचा तो गंध पसरला जिथे
त्या वळणावरती तुझीच सोबत आहे

सांग कसे विसरून जावू त्या क्षणास
जिथे ती पाऊलखुण आजही बोलकी आहे
सांग कसे हरवून जाऊ मी स्वतःस
जिथे तुझा सहवास सतत सोबत आहे

सावरू कसा मी डोळ्यातील अश्रुस
जिथे आयुष्यभराचे वचन तू दिले आहे
आजही ती मिठी जणू पुन्हा बोलताना
हृदय माझे का चिंब भिजत आहे

उरल्या काही फांद्यावरती पुन्हा आज का
नव्याने ती जणू पालवी फुटली आहे
नात्यांच्या या नाजूक वळणावरती
पुन्हा एकदा तुझी भेट होत आहे

एक झुळूक कानाशी येऊन तेव्हा
हळूच मज का सहज बोलते आहे
तुझ्या असण्याची जाणीव मज तेव्हा
अलगद का करून देत आहे

✍️©योगेश खजानदार

विरुद्ध..✍(कथा भाग ५) अंतिम भाग.

"किती गोड क्षण असतात ना !! आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत, आणि त्या व्यक्ती सोबत कित्येक वेळ बोलत बसायला लावणारी ती एक कॉफी !! त्या समुद्रावरील माझे आणि प्रियाचे सोबतीचे क्षण किती सुंदर होते ना !! आणि आता हे काही क्षण !! " सुहास हॉलमध्ये बसून विचार करत होता.
तेवढयात प्रिया कॉफीचा कप घेऊन आली.
"सुहास !! घे कॉफी !! "प्रियाच्या डोळयात वेगळीच चमक दिसत होती.
"बस ना!! " सुहास कॉफीचा कप घेत म्हणाला.
"तुझ्या सोबतचे हे क्षण कधीच विसरणार नाही मी प्रिया !! खरतर सगळं संपलं म्हणून मी हताश झालो होतो!! पण तू अचानक आलीस आणि जगण्याची नवी प्रेरणा मिळाली !! पुन्हा नाहीना मला सोडून जाणार ??" सुहास कित्येक डोळ्यातले भाव बोलत होता.
"नाही !! कधीच नाही !! " प्रिया थोडी तुटक बोलली.
"घेणं !!! तुझ्यासाठी खास बनवली आहे मी कॉफी !! " प्रिया कॉफीचा एक घोट घेत म्हणाली.
"मग तर घ्यायलाच हवी !! " सुहास कॉफी घेत म्हणाला.
"क्या बात है !! तुझ्याच सारखी झाली आहे कॉफी !! एकदम सुंदर !! " सुहास कप बाजुला ठेवत म्हणाला.
"सगळं काही विसरून नव्याने नात सुरू करण्याची मजाच काही वेगळी असते ना !! "
सुहासच्या या बोलण्याला प्रियाने फक्त एक हासू देऊन प्रतिक्रिया दिली.
"विशालच्या नादी लागून  खरंच खूप मोठी चूक केली रे सुहास !!" प्रिया अगदी शांत बोलत होती.
"जाऊदे !! जे होत ते चांगल्यासाठीच होत !! " सुहास थोडा अस्वस्थ होऊ लागला.
"पण यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही सुहास !! " प्रिया त्याच्याकडे पाहून बोलत होती.
"यापुढे ...!!!"सुहास बोलता बोलता थांबला. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची धडपड बघून प्रिया त्याच्या जवळ आली.
"काय होतंय सुहास !! "
"काही नाही !! थोड बैचेन वाटतंय मला !!"
"शांत बस जरा !! बरं वाटेल !! " प्रिया त्याला बसवत म्हणाली.
"नाही !! खूप ... कसतरी होतंय मला...!! चक्कर येते!! प्रिया ....!!!!!" सुहास स्वतःला सावरत होता.
"होणारच ना सुहास !! "प्रिया भेसूर हसत म्हणाली.
सुहास जमिनीवर कोसळला. प्रिया फक्त बघत होती. त्याची मृत्यूशी धपडपड चालली होती.
"तुला कायमच माझ्या आयुष्यातून घालवायला आले होते सुहास मी !! तुझ्या नंतर ही सगळी संपत्ती माझी होणार !!! मी आणि विशाल मजेत राहणार !! तुझ्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नको होती मला सुहास !! मला  माफ कर !! पण तुझ्या जाण्यातच माझं सुख आहे !!" प्रिया मनातलं विष ओकत होती.
सुहास कित्येक वेळ धडपडला. आयुष्याशी अखेर जुंज संपली. विश्वासाची किती मोठी किंमत मोजावी लागली.
"तुला माहितेय !! अखेरच्या क्षणी सुद्धा माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होत प्रिया!! विश्वास होता त्याचा घात केलास तू !! अखेर तुझ्या मागुन विशाल येताना मी पाहिला आणि डोळे मिटले !! अगदी कायमचे !!! " सुहासचां प्रत्येक अखेरचा श्वास त्याला बोलत होता. तो शांत पडला होता.
"आणि अखेर माझ्या या देहाला ती शिक्षा भेटलीच पाहिजे !! त्याला त्या मागच्या अंगणात पुरून टाकलं म्हणे यांनी !! नाही ती शिक्षा त्याला व्हायलाच हवी !! कारण त्याच्यातील मला त्याची शिक्षा मिळते आहे !! सुटका नाहीच ना !! इथेच या घरात आजही मी तसाच आहे !! विश्वास आणि विश्वासघात या दोघांचे भांडण बघत !!   शेवटच्या श्वासानंतर ती मला कधीच दिसली नाही !! विष दिलं मला तिने !! तिला वाटलं माझी सुटका झाली!! पण त्या नंतर या घरात माझ्या शिवाय पुन्हा मला कोणंचं दिसल नाही!! धुळीत पडलेले ते कॉफीचे दोन कप आजही तसेच आहेत !! कोणी त्याला उचलतंही नाही !! कारण कोणी आता इकडे येतही नाही !! "
"मी म्हटलं होत ना ही कथा माझी आहे !! विश्वासाला तडा जाणारी आहे !! खरतर सांगायची नव्हती मला !! पण तरीही मी सांगीतली आहे !! कारण या मृत्यू नंतरच्या या शिक्षेतून मला खरंच सुटका हवी आहे !! कुठे आहे प्रिया !! जिच्यावर मी इतके प्रेम केले !! तिला बोलावून घ्या इकडे आणि मला या एकांताच्या शिक्षेतून सोडवं म्हणून सांगा !! ना मला भूक आहे !! ना मला तहान !! ना मी अस्तित्व आहे !!ना आभास !! हो मी एक झुळूक आहे !! ज्याला ना कुठे जायचे आहे !! ना कुठे थांबायचे आहे.!! "
शेवट माझा अजूनही अपूर्ण आहे ....

*समाप्त*

✍©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...