विरह ...

साऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणीं
सांग सांग काय सांगू
तुझ्या विन न उरे काही

तू तिथे , मी इथे
न उरली आज कहाणी
सांग सांग कसे आता
पुरी करू मी ही गाणी

वाटेवरती वेगळ्या जाताना
न आठवण तुझं आली
माझे माझे म्हणता म्हणता
अनोळखी होऊन गेली

सारी सारी रात ही आता
मझं सतावून गेली
बघ बघ आकाशातून आता
तुझी चांदणी हरवून गेली

शोधशील तिला कुठे जरी
ती तुझी न राहिली
अश्रू बोलतील तुला किती
पण अबोल ती राहिली

बघ बघ चंद्रा मागे एकदा
ती रात्र सांगून गेली
माझ्या आठवणीत एक टिपूस
तिच्या पापण्यात ठेवून गेली

साऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणी ...!

✍©योगेश खजानदार

बंधन ...!!(अंतिम भाग)

विशाल आता शांत होता. त्याच्या नजरे समोर फक्त प्रिती होती. त्याला बोलावंसं वाटत होत, पण बोलता येत नव्हतं. त्याची बोलण्याची धडपड पाहून प्रिती म्हणाली.
"तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!" प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिचा हात धरत विशाल तिला नकारार्थी मान हलवून लागला. कदाचित त्याला म्हणायचं होत "अखेरच्या या क्षणात माझ्या समोरून तू कुठेही जाऊ नकोस प्रिती!!"
प्रिती पुन्हा बसली. त्याला बोलू लागली.
"अरे डॉक्टरला बोलावून आणते !! "  पुढे तिला बोलवेना ती शांत झाली.
तिच्या हातात त्याचा होत होता. तो आयुष्याची शेवटची घटका मोजत होता. चूक कोणाची यावर स्वतःशीच भांडत होता.
"नाही!! ती आज माझ्या समोर आहे !! आणि मला तिला काहीही दोष द्यायचा नाहीये !!! त्या देवाला कशासाठी भांडू मी, या शेवटच्या क्षणी की..!! आयुष्यभर त्याने मला एका खोलीत खितपत मारलं म्हणून, का आनंद मानू त्याचे की त्याने माझ शेवटचं मागणं तरी ऐकलं.!! पण मी म्हणेन आता कसला राग आणि कसलं काय!! या इतक्या वर्षात या खोलीत कधीच इतकं मोकळं वाटलं नाही, ते प्रितीच्या नुसत्या समोर पाहिल्याने वाटलं मला!! मी नाही दोष देणार कोणालाच !! ना तिच्या वडिलांना , ज्यांच्या रागाची शिक्षा आयुष्यभर मला भोगावी लागली, मग नको आता आरोप प्रत्यारोपाच हे घोंगड!! आता फक्त शांत होउन जायचं आहे !!" विशाल शेवटच्या त्या क्षणांना कित्येक मनातलं बोलत होता.
"प्रिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे !!  कदाचित हे सांगायला मी उद्या नसेल !! पण माझ्या आठवणींचा पसारा तुला सगळं काही सांगून जाईल!! उरल्या माझ्या प्रेमाची हीच तुला भेट असेल !! आठवण !! अगदी कायमची!!" विशाल निशब्द झाला. क्षणांशी त्याचा संवाद संपला.
"विशाल !! विशाल !! " प्रिती विशालला उठवत होती.
"मारिया , बघ ना विशाल उठतं नाहीये!ये विशाल !! तुझे हात किती गार पडले आहेत रे !! उठ बरं !! आपण मस्त उबदार त्या शेकोटी जवळ बसुयात !! ये विशाल!!" प्रिती भावनिक होऊन बोलू लागली.
मारिया प्रितीला सावरू लागली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"कदाचित मी यायला उशिरच केला विशाल , पण तुझ्या असण्याची जाणीव मला नीट जगू देत नव्हती हे मात्र खरं!! मी रमले माझ्या संसारात!! पण तुझं प्रेम कधीच मी विसरले नाही!! तुझी एक सोबत तेवढी होती मला !! पण आज खऱ्या अर्थाने तू मला एकटं केलंस !! तू कुठेतरी आहेस !! सुखात आहेस कदाचित !! ही जाणीव मला जगण्यासाठी प्रेरणा देत होती!! तुझ्या या प्रितीला माफ कर विशाल!! " प्रिती कित्येक वेळ अश्रू ढाळत होती.
"मला एकटं सोडून गेलासचं ना विशाल बेटा!! आता या म्हातारीने कोणाकडे बघून जगायचं हे तरी सांग !! मारिया!! ही तुझी हाक कानावर पडावी म्हणून माझे कान आतुर असायचे!! तुझ असणं माझ्या म्हातारीच्या जीवनाला एक आधार होता!! तू अपंग जरी होतास तरी मला तुझा आधार होता !! विशाल पुन्हा ये माझ्या बाळा !! ही मारिया तुझ्या तोंडून ती हाक ऐकण्यासाठी वाट पाहते आहे रे !! " मारिया विशाल जवळ बसून त्याच्या चेहऱ्याकडे बघत मनाशीच कित्येक वेळ बोलत होती.
"हे बंधन झुगारून मी कदाचित मोकळा होईल असं मला वाटतं होत !! पण मी अडकलो इथेच पुन्हा!! प्रितीच्या अश्रूंमध्ये !! मारियाच्या त्या हाकेमध्ये ..!! मी अडकलो या नव्या बंधनात पुन्हा !! ज्यातून माझी कधीच सुटका नाही !! त्या प्रितीच्या प्रत्येक अश्रुत मी अडकलो!! त्या तिने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मी अडकलो!! ते अपंग होऊन त्या पलंगावर पडून त्या बंधनात राहणं किती सोप होत ना?? पण हे नवे बंध कदाचित मला आता पुन्हा नव्याने जखडून घेत आहेत !! ही बंधने कदाचित मला झुगारून देता येणार नाहीत !! कधीच नाहीत !! कारण मी उरलोय तिथेच फक्त आता !! त्या आठवणीत !! त्या नव्या बंधनात !! " विशालची ती शांत मुद्रा खूप काही सांगून जात होती. जणू शांत तो विशाल कित्येक भाव नकळत सांगून जात होता.
"अखेरच्या क्षणात मी तुझ्या सोबत होते, यापेक्षा त्या देवाने अजून काय द्यावे मला विशाल!! माझ्या या कवितेत अखेर उरलाच तू..

उरल्या क्षणात आता
शोधू मी कुठे तुला
सावल्याही आज माझ्या
अबोल का झाल्या मला

श्वास जणू आज हे
साथ न देता तुला
आठवणीच्या या खोलीत
छळते ते का मला

सांग मनीचे आज सारे
न कोणते बंधन तुला
खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला

खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला!! " पण बोलायला विशाल तू राहिलासचं कुठे !! मला एकटं सोडून गेलास !!! " प्रिती  एकटक पाहत होती.
  अखेर त्या जळत्या चितेत जणू सारी बंधने जळत होती. पण ती शरीराची , मनाची बंधने तशीच होती. आठवणीत , त्या क्षणात , त्या हृदयात !! अगदी कायमची. प्रिती आणि मारिया कित्येक वेळ त्या जळत्या चितेकडे पाहत बसली होती. आपल्या विशालला शेवटचं बंधनातून मुक्त होताना पाहत होती.

*समाप्त*

©योगेश खजानदार

बंधन ...!✍ (कथा भाग ४)

"तुझ्यासाठी कित्येक कविता लिहिल्या विशाल !! माझ मन मला सांगत होत, तू कुठेतरी नक्कीच वाचत असणार!! पण ते असं !! याचा कधीच विचार मी केला नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं !! एक प्रेयसी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून यावं !! एवढीच इच्छा होती माझी!!" प्रिती विशाल समोर व्यक्त होत होती.
"पण .. ते ... अस भेटावं .. अस मला ..ही नको होत!! " विशाल हळू आवाजात प्रितीला बोलू लागला. बोलताना  त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला.
हे सगळं पाहून प्रिती त्याला सावरायला पुढे आली. मारिया बाहेर विशालसाठी पाणी आणायला गेली.
"तू गेल्या नंतर कित्येक दिवस मला काहीच सुचत नव्हते!! आई आणि बाबांनी नंतर लग्नासाठी हट्ट धरला
, आणि लग्न केले. पण त्या नंतरही मला तुला विसरण अवघड होतं. पण संसार मात्र चांगला केला. आपल्या प्रेमाचं दुःख संसारावर पडू दिलं नाही. तुझ्या आठवणी होत्याच सोबत , नंतर लिखाणाला सुरुवात केली. तुला तिथे जपलं , माझ्या जवळ ठेवलं. अगदी कायमचं!! " प्रिती विशालला खूप काही सांगु लागली.
तेवढ्यात मारिया खोलीत आली. पाण्याचा ग्लास प्रितीकडे देत ती म्हणाली.
" पाणी !!!"
प्रिती मारियाकडे पाहत पाण्याचा ग्लास घेत विशाल जवळ आली. विशालला मानेला अलगद आधार देत थोड उठवत पाणी पाजू लागली. पण पाणी पिताच विशालला खोकला लागला.
"हळू !!" प्रिती.
"मारिया , तुला आठवत !! जेव्हा तू आम्हाला पहिल्यांदा सोबत पाहिलं होतस तेव्हा काय म्हणाली होतीस!!"
प्रिती ग्लास तिच्याकडे देत बोलू लागली.
"आठवत ना !! " मारिया थोड स्मित करत म्हणाली.
"पण बघ ना !! आज मात्र मी तशी नाहीच !! खूप काही बदल झाला आता !!" प्रिती.
तेवढ्यात विशाल काहीतरी बोलू लागला. मारिया आणि प्रिती त्याच्याकडे पाहत होत्या.
"मी तरी... कुठे .. आता तसा ... राहिलो... मीच मला हरवून गेलो !! या बंदिस्त खोलीत हरवून गेलो .... हरवून ... गेलो... !! " विशाल स्वतः ला सावरत म्हणाला.
"गप्प बस !! उगाच ....!!" प्रितीला पुढचं बोलवेना. ती खोलीतून बाहेर गेली. तिच्यामागे मारिया ही आली.
"मारिया !! मला खर खर सगळं सांग !! विशालची ही अवस्था का झाली. तो असा अंथरुणाला खिळून का आहे??? सांग मारिया !!" प्रिती मारियाल विचारू लागली. कित्येक अश्रू तिला बोलू लागले.
"प्रिती !! कस सांगू !! विशाल !!! " मारिया खोलीकडे पाहू लागली.
"मारिया !! त्याला मी काही बोलत नाही!!"
मारिया आता प्रितीला सगळं सांगायचं या निर्धाराने बोलू लागली.
"तुझ्या आणि विशालच्या प्रेमाला खरंतर तुझ्या बाबांनीच वेगळं केलं प्रिती !!"
हे ऐकताच प्रिती प्रश्नार्थक मुद्रेने मारीयकडे पाहू लागली आणि म्हणाली.
"माझे बाबा !! कसे काय !! आणि विशालच्या अवस्थेला ते कसे जबाबदार ??"
"तुला भेटायचं म्हणून विशाल त्या दिवशी घरातून बाहेर पडला. पण तुला भेटायच्या आधी त्याला तुझ्या बाबांची भेट झाली. त्यांचा तुमच्या या नात्याला विरोध होता. विशालने खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते नाहीच समजू शकले. बोलताना तुझ्या बाबांचा राग अनावर झाला आणि !!!" मारिया बोलता बोलता थांबली.
"पुढे काय मारिया !! " प्रिती अगदिक होऊन म्हणाली.
"पुढे जे झाल ते तू पहातेच आहेस !! तुझ्या बाबांनी रागात विशालला धक्का दिला !! रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे दोघे, पण तुझ्या बाबांच्या धक्क्याने विशाल रस्त्याकडे फेकला गेला . रस्त्यावरून जाणारे वाहन विशालला धडकले!! आणि त्याला त्यात त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले!!" मारिया डोळे बंद करून ते सगळं बोलू लागली.
"नाही मारिया !! हे सगळं खोटं आहे !! "
"पहिल्यांदा मलाही हे खरं वाटलं नाही !! पण जेव्हा तुझे बाबाच त्याला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा त्यांनीच मला हे सगळं सांगितलं.!! त्याची चूक झाली अस ते म्हणाले !!" मारिया.
प्रिती हे सगळं ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावं तेच कळेना. कित्येक क्षण दोघीही शांत होत्या. मारिया पुन्हा बोलू लागली.
"हे सगळं घडल्या नंतर तुझे बाबा रोज विशालकडे येत होते !! आपल्या केलेल्या चुकीची माफी मागायला. पुढे आज कित्येक वर्ष या खोलीत तो पडुन आहे !!  त्यामुळे कित्येक आजारांनी त्याला त्रस्त केलंय!!"
"पण बाबांनी हे केलं ! माझ्या प्रेमाला अशी शिक्षा का?  प्रेम मीही केलं होत !! मग त्याची शिक्षा मला द्यायची !! " प्रिती मनातलं बोलू लागली.
तेवढ्यात खोलीतून आवाज आला. प्रिती आणि मारिया दोघीही पळत खोलीत गेल्या.
"विशाल !! विशाल !! " प्रिती विशालच्या जवळ जात बोलू लागली.
"मारिया !! विशालला दवाखान्यात घेऊन जाऊयात का?"
मारिया काहीच बोलली नाही. ती फक्त पाहत होती.
"तुला .. शेवटचं .. पहायचं .. ही एकच .. इच्छा होती माझी !! पण तेही माझ्या ... आठवणीतून .. तू मला कधी ... पुन्हा ... भेटूच नये ... असच वाटायचं ... " विशाल अडखळ त बोलत होता.
"का ?! माझ्या लिखाणावर प्रेम केलंस !! मग ती पत्र पाठवलीस !! निरंजन म्हणून पाठवलेलं प्रत्येक पत्र मला निरंजनाचा नाही ,तुझ्या प्रेमात पाडत होत !! पुन्हा पुन्हा!! मी फक्त तुझ्याच सारखा अजून कोण आहे हेच पाहायला आले होते !!" प्रिती विशालच्या हात हातात घेत म्हणाली.
विशाल फक्त हसला. तिचा हात घट्ट पकडत तो बोलू लागला.
"तुझ्या लिखाणाने ... मला तू... माझ्यापासून ... दूर .. आहेस असं .. कधी .. वाटलच नाही ... !! न. .. राहवून मी तुला ..... पत्र लिहायचो....! मला तुझ्या त्या ... चार .. ओळी खूप .. आवडतात..... पहिल्या ... पावसाच्या .... सरी "

प्रिती पुढे त्या ओळी म्हणू लागली.
"पहिल्या पावसाच्या सरी
हळुवार भिजली ती माती
त्या मातीच्या वासात जणू
आठवांचा गंध गवसला

तुझ्या असण्याची ती जाणीव
प्रत्येक थेंबात तुला शोधून
त्या थेंबात जणू मज तेव्हा
तुझाच चेहरा पुन्हा दिसला

कश्या पुन्हा नव्याने आता
त्या वेली जणू बहरल्या
साऱ्या हिरवळती जणू मज
नव्याने मज तू भेटला

दाटून आल्या आभाळी
ढगांच्या कित्येक लहरी
हळुवार वाऱ्यासवे तेव्हा
जणू तूच सख्या, पुन्हा बरसला

अगदी मनसोक्त !!!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत शांत झाली. क्षणभर ती स्वतःलाही हरवून बसली भानावर येताच ती विशालकडे पाहू लागली. विशाल शांत होता .
"विशाल !!! विशाल !!! " प्रिती विशालकडे पाहून बोलू लागली.

क्रमशः ...

©✍योगेश खजानदार

बंधन ..!✍(कथा भाग ३)

  विशाल आता अस्वस्थ झाला होता. प्रिती त्याला भेटायला येणार हे कळल्या पासून त्याच मन कशातच लागतं नव्हते.
"तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला !! पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला!! कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये !! किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड !! माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये !! " विशाल मनात कित्येक विचार करत होता.
विचारांच्या तंद्रीत विशाल झोपी गेला.  रात्रभर मारिया त्याच्या जवळच बसून होती. विशालची तब्येत नाजूक होत होती.
"बाळ विशाल !!" मारिया बसल्या जागीच झोपून गेली होती. उठल्या उठल्या तिने विशालला हाक दिली.
विशाल किंचित डोळे उघडून मारियाकडे पाहू लागला.
"मी डॉक्टरांना बोलावते !! " मारिया उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात विशालने मारियाला नकारार्थी मान हलवली.
"आजार वाढलाय विशाल! " मारिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.
पुसट अश्या आवाजात विशाल हळू बोलू लागला.
"प्रि.. ती.. !!" विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"भेटायचं ना ??" भरल्या आवाजात मारिया बोलत होती.
विशालने फक्त होकारार्थी मान हलवली. मारिया कित्येक वेळ तिथेच बसून आसवे गाळत होती. विशालची ही अवस्था तिला पाहवत नव्हती. तिने विशालचा विरोध असतानाही डॉक्टरांना बोलावले. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं. अशात कित्येक दिवस गेले. रोजचा दिवस फक्त कित्येक आठवणी घेऊन येत होता. विशाल अडकत अडकत बोलू लागला होता. पण परिस्थिती नाजूक होती. मारियाला फक्त विशाल नीट व्हावा एवढचं वाटत होत. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात कोणीच नव्हते. कसाही असला तरी तो तिच्यासाठी आधार होता. रक्ताचा नसला तरी मुलापेक्षा कमी नव्हता.
"माझे श्वास आज माझ्याशीच का भांडत आहेत !! आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत!! पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून कदाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत !! तो निष्ठुर नाहीये !! खऱ्या प्रेमाची त्यालाही कदर आहे !! तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल !! " विशाल श्वास आणि क्षण यातील अंतर पाहत होता. स्वतःतच गुंतला होता.
"कित्येक वर्षांपूर्वी विशालला भेटण्याची ओढ अशीच होती मला !! त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली!! पण तो आलाच नाही !! पुन्हा ना त्याच कधी पत्र आले!! ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही !! माझा विशाल असा कधीच नव्हता!! आणि नाहीच !! त्याच्यासाठी लिहिलेल्या कित्येक कविता कथा यांचे भाव, ते लिहीत असतानाचे माझे विचार, अचूक कोणी ओळखले असतील तर ते निरंजन ने !! " प्रिती आज निरांजानाला भेटायला निघाली होती.
"आयुष्याची कित्येक वर्ष या पोराने इथेच या खोलीत काढली. ना कोणी येत भेटायला , ना कोणी जात !! फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला!! आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले!! पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे !! आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते!! पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे !! प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत !! " मारिया स्वयंपाक घरात देवाला प्रार्थना करत होती.
तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला. मारिया पटकन बाहेर गेली. एक सुंदर स्री समोर उभी होती.     मारिया समोर येताच ती बोलू लागली.
"हे निरंजन देशमुख यांचच घर ना ??" मारियाने क्षणात प्रितीला ओळखलं.
ती काहीच न बोलता प्रितीला आत येण्यास खुणावत होती. प्रिती घरात येताच तिलाही थोडे नवल वाटले. तिथे समोरचं तिने लिहिलेले  पुस्तक ठेवले होते.
"आपण चहा घेणार की कॉफी?"  मारिया पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली.
"नाही !! काही नको मला!! मला खरतर निरंजन यांना भेटायचं होत !! ते आहेत का ??  मी प्रिती सरदेसाई!!" प्रिती मारियाकडे पाहून बोलू लागली.
"हो भेटतील ना!! " मारिया डोळ्यात आलेले पाणी लपवत म्हणाली आणि पुढे म्हणाली.
"चला माझ्या सोबत !! ". मारिया असे म्हणताच प्रिती तिच्या मागे जाऊ लागली.
खोलीचा दरवाजा उघडताच प्रिती आणि मारिया खोलीत आले. पलंगावर पडलेल्या विशालकडे पाहताच प्रिती निशब्द झाली. डोळ्यातले अश्रू अगदी मनसोक्त वाहू लागले. प्रिती विशालला बिलगली.
"विशाल ??" तिच्या चेहऱ्यावरचे कित्येक भाव बदलले.
"हो विशालचं!! प्रिती तू ज्याला निरंजन समजतं होतीस तो तुझा विशालच आहे !!" मारिया तिला सावरत बोलू लागली.
"हे काय झालं तुला विशाल!!तुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही !!अस का केलस तू?? तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं ?? का विशाल??? का  लपवलसं सार हे माझ्यापासून?? " प्रिती कित्येक मनातले भाव बोलत होती. आपल्या मनातल सांगत होती. बोलत होती.
"मला......!! माफ ... कर !!" विशालच्या या तुटक बोलण्याने प्रिती शांत झाली.
मारिया प्रितीला खोलीतून बाहेर घेऊन आली. प्रितीला सावरत ती तिला खूप काही सांगू लागली.
"पण मारिया !! हे कस आणि कधी झालं ?? माझा विशाल असा कधीच नव्हता !! आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही !!" प्रिती अगदिक होऊन बोलू लागली.
"हे कधी आणि का झालं !! हे काहीच आता विचारू नकोस प्रिती !! कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे !!" मारिया आपला हुंदका दाबत म्हणाली.
"त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये !! "
असे म्हणताच प्रिती कित्येक वेळ आपले अश्रू गाळत राहिली. आत विशाल जवळ येत ती बोलू लागली.
"तुला बरं व्हायचं आहे !! माझ्यासाठी !!" प्रिती विशाल जवळ बसली.
विशाल तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. तिच्या शेजारी ठेवलेल्या तिनेच लिहिलेल्या पुस्तकाकडे पाहून फक्त तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागला.
"क.. वि..ता!!!" प्रिती त्याला काय म्हणायचं आहे ते पाहू लागली.
प्रिती ते पुस्तक उचलत म्हणाली.
"यातली कविता ?? वाचु???"
विशाल होकारार्थी मान हालवुन हो म्हणाला. प्रिती ते पुस्तक उघडून त्यातली एक कविता म्हणू लागली.

"सावरले ते क्षण कालचे
तुझ्या विरहाने भिजले जरासे
मज एक भेट हवी तुझी
सांग त्या मनास तू जरासे

थांबली वाट ,भीक या श्र्वासांची
झुळूक विचारते हे कोणते गंधही
सांग कधी भेट होईल सख्या
तुझ्या विरहात भान न कशाचे

उरलास तूच फक्त माझ्यात
कित्येक आसवात आणि श्वासात
मी वाट पाहील तुझी अखेर पर्यंत
उरले मागणे हेच अखेरचे   ...!!"

प्रिती स्वतःचे अश्रू अवरत होती. पुस्तकं मिटून ती कित्येक वेळ विशाल जवळ बसून त्याला बोलत होती.

क्रमशः

©✍योगेश खजानदार

बंधन ..✍(कथा भाग २)

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी.
" उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!"  विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
"काय विशाल बेटा , झाली का झोप??" मारिया खोलीत येत म्हणाली.
"हो !! " विशाल शेजारच्या पुस्तकांकडे पाहत म्हणाला.
मारिया आपल्या कामात व्यस्त झाली. विशाल एकटक खिडकीतुन बाहेर पाहत होता. जणू ते सूर्याचं तेज त्याला खूप काही बोलत होतं.
"रोजच कसं प्रसन्न होऊन जगायचं!! आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्यांना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही !! नाही का ??
" विशाल !! विशाल !! " मारिया विशालकडे पाहून बोलू लागली.
विशाल आपल्याच विचारात मग्न होता. मारियाच्या आवाजाने तो भानावर आला.
"काय मारिया !! "
"तुला, चहा हवाय??" विशालच्या होकारार्थी उत्तराने मारिया खोलीतून बाहेर निघून गेली.
विशाल आज सकाळपासून पलंगावर होता. मारिया चहा घेऊन आली आणि हातात तिच्या काहीतरी आहे हे विशालने पाहिलं.
"काय आहे ते ??"
"पत्र आहे!! " मारिया चहा विशालकडे देत म्हणाली.
"कोणाचं ??" विशाल कुतूहलाने विचारू लागला.
"प्रिती सरदेसाई!!" मारिया पत्र विशालकडे देत म्हणाली.
विशालला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. या आधी प्रितीच पत्र कधीच आल नव्हतं. आज अचानक तिचं पत्र आलं आणि विशाल निशब्द झाला.
"तूच !! तूच वाच पत्र !! " विशाल मारियाकडे पत्र देत म्हणाला.
मारिया पत्र हातात घेत वाचू लागली.
"नमस्कार निरंजन !! " मारिया विशालकडे पाहू लागली.
"मी निरंजन या नावाने पत्र लिहीत होतो !! " मारिया काहीच न बोलता पुढे वाचू लागली.
"तुमचे कित्येक पत्र मला मिळाली , माझ्या लिखाणावर इतकं प्रेम करणारे कोणी वाचक आहेत ह्याचा मला खरंच खूप आनंद झाला. खूप शोधल्या नंतर मला तुमचा पत्ता मिळाला. तरी माझी एक इच्छा आहे , की मी पुढच्या आठवड्यात तुमच्याच गावी येणार आहे. तरी मला तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे !! माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं !! त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे !! तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच !! तर भेटुयात नक्की !! " मारिया पत्र वाचून शांत झाली.
"मला भेटायचं म्हणते !! नाही .!! मला नाही भेटायचं पण तुला !! " विशाल अचानक अस्वस्थ झाला. खूप काही बोलू लागला.
"मारिया !! कागद आणि पेन घेऊन ये !! मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे !! मारिया जा ना !! घेऊन ये लवकर !!! " विशाल उठण्याची धडपड करू लागला. आणि अचानक पलंगावरून खाली पडला.
खाली पडलेल्या विशालला सावरायला मारिया पुढे आली आणि म्हणू लागली,
"अरे !! येऊ देत ना विशाल !! त्याने काय होणार आहे !! तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ !!"
"नाही मारिया !! ती मला भेटू नये कधी !! ती आली तरी तिला सांग !! मी नाही म्हणून !! "
प्रिती विशालला भेटायला येणार या विचाराने विशाल अस्वस्थ झाला.
"कशाला येणार आहेस मला भेटायला !! निरुपयोगी मला पाहायला !! की अजून स्वतः ला त्रास करून घ्यायला !!! नको प्रिती तुला नाही सहन होणार हे !! मी एक रुबाबदार !! तुझ्यासाठी वाट्टेल ते करणारा विशाल !! असा असाहाय पहायचा आहे का तुला ?? देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत !! हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे !! " विशाल प्रितीच्या त्या पत्रास हातात घेऊन विचार करत होता.
मारिया त्याला कित्येक वेळ समजावत होती.
"मारिया !!आपण एक महिनाभर कुठे निघून जाऊया का ??"
"बेटा !! मी तुला अस काही करू देणार नाही !! "
"पण मला तिला भेटायचं नाहीये !! " विशाल मोठ्या आवाजात बोलत होता.
"तू नकोच भेटू तिला !! एक लक्षात ठेव !! तू कदाचित लपवून ठेवशील तुझं हे दुःख आयुष्यभर तिच्यापासून !! पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल !! " मारिया अगदी मनापासून सांगत होती.
विशाल मारियाच्या या बोलण्याने शांत झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
प्रिती सुधा निरंजला भेटायला अतुर झाली होती. कधी एकदा त्याच्या समोर जाऊन,
"तुला माझ लिखाण इतक आवडत, की तू त्या लिखाणातील माझे भाव कसे काय ओळखू शकतोस ??" हेच जणुकाही तिला विचारायचं होतं.
"आपल्या अगदी जवळच्या कोणीतरी आपल्याशी बोलल्या सारखं का वाटावं. निरंजनच पत्र आलं की ते वाचायची एवढी ती काय उत्सुकता असावी बर मला!!  की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी!! जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला !! खरंच किती वेड असेल ना ते माझ मन !! ते आजही त्याचाच विचार करत !! कुठे असेल?? कसा असेल ?? काही काही माहीत नाही !! माहिती तर एकच !! त्याच प्रेम !! " प्रिती निरंजन ला भेटण्यासाठी आतुर झाली. आपल्याच वहीच्या पानांना खूप काही सांगू लागली.

क्रमशः

©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...