वाट

मी वाट पाहिली तुझी
पण तु पुन्हा आलीच नाही
वाटेवरती परतुन येताना
तुझी सोबत भेटलीच नाही

क्षणात खुप शोधताना तुला
स्वतःस मी सापडलो नाही
मी आणि तुझ्यात तो
माझाच मी राहिलो नाही

सांगु तरी कोणास काही
शब्दांत या भावनाच नाही
कळले जरी तुला भाव ते
तरी तुझ कळतंच नाही

गडगडले आभाळ जरी
एक टिपुस ही पडला नाही
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
ती ओल आता उरलीच नाही

वार्‍या सवे गारवा हा
मनास तुझ्या स्पर्शत नाही
कितीही गुणगुणले ते वारे तरी
तुझ ते ऐकुच येत नाही

भावनांचा पाऊस हा
अखेर आज थांबतच नाही
कितीही व्यक्त केले मन तरी
मनाची वाट भिजलीच नाही
-योगेश खजानदार

अखेर

मी हरलो नाही
मृत्युच्याही डोळ्यात पाहुन
अखेर मी हरलो नाही

मी एकटा ही नाही
अंताच्या या प्रवासात
अखेर मी एकटा नाही

ही वाट ही पुढची नाही
प्रवास हा अनंताचा जिथे
अखेर ही वाट पुढची नाही

मला आता शोधत ही नाही
वाट पहाणारी कोण ती
अखेर मला शोधतही नाही

मी सापडत ही नाही
डोळ्यात साठवत तिला
अखेर मी सापडत ही नाही

मी क्षणात दिसणार ही नाही
ह्रदयात सर्वाच्या रहाणारा मी
अखेर क्षणात दिसणार नाही

आगीत आता झुंज ही नाही
आयुष्यभर लढणाऱ्या माझी
अखेर आगीत झुंज नाही

मी हरलो नाही
राख होऊनही जगताना
अखेर मी हरलो नाही
-योगेश खजानदार





मिठीत माझ्या. ..!!!

आज शब्दांतुन तिला आठवतांना
ती समोरच असते माझ्या
कधी विरहात तर कधी प्रेमात
रोजच सोबत असते माझ्या

बरंच काही लिहिताना
कधी अश्रु मध्ये असते माझ्या
कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत
तर कधी भावनेत असते माझ्या

कधी पुस्तकाच्या पानांत पहाताना
त्या गोष्टीत असते माझ्या
कधी वहीच्या पानांवर कोरताना
ती ह्रदयात असते माझ्या

रागावलेल्या प्रत्येक क्षणात शोधताना
मनात असते माझ्या
रुसलेल्या तिच्या गालावरती हरवताना
ओठांवरती असते माझ्या

क्षणात यावी क्षणात जावी
प्रत्येक घटकेत असते माझ्या
वेळेही थोडी थांबेल तेव्हा
जेव्हा मिठीत असेल ती माझ्या

हो ना .. !!

प्रेम

ती रुसल्यावर कधी
मी खुप तिला मनवायचो
पण मी रुसलेलो कधी
तिला कळालेच नाही

वाट हरवुन जाता तिने
पुन्हा मी वाट दाखवायचो
पण मी हरवुन गेल्यावर कधी
तिने मला शोधलेच नाही

अनोळखी होताच नाती ती
मी पुन्हा ओळख करुन द्यायचो
पण नात्यात उरलोच कधी तर
तिने मला पुन्हा जोडलेच नाही

शोधुनही न सापडता मला
पापण्यात मी तिला पहायचो
पण मी न सापडताच तिने
कधी ह्रदयात पाहिलेच नाही

मनातल्या कवितेत माझ्या
तिच्या सोबत पुन्हा मी जगायचो
पण ओठांवरच्या शब्दांत तिने
कधी स्वतःस पाहिलेच नाही

हे प्रेम मनात माझ्या
तिला का मी पुन्हा सांगायचो
पण काही केल्या तिला ते
कधीच का कळले नाही
-योगेश खजानदार


अनोळखी वाटेवर..

अनोळखी वाटेवर
ती मला पुन्हा भेटावी
सोबत माझी देण्यास तेव्हा
ती स्वतःहून यावी

थांबावे थोडे क्षणभर तिथे
ती वाट वाकडी पहावी
माझ्यासवे चाललेली ती
आठवणींची पाऊलखुण दाखवावी

मनास सगळं कळुन जाता
ती नजर का चुकवावी
वाचलेच चुकुन नजरेचे भाव तर
तिची ओढ मज का दिसावी

सुटलेल्या क्षणात पहाता
ती वाट ही हरवुन जावी
चालता चालता दुर जावे
तेव्हा परतीची तमा नसावी

वेड्या मनात आता
आठवणीची सर यावी
चिंब जावी भिजुन वाट ती
प्रेमाची ती पालवी फुटावी

बहरलेली प्राजक्त ही आता
एकमेकांस मनसोक्त बोलावी
आणि अनोळखी वाटेवर तेव्हा
ती मला पुन्हा भेटावी
-योगेश खजानदार









आई ...!!!

असंख्य वेदनांचा त्रास मी पहाता पहाता विसरुन गेले जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाळा तुला पाहिलं. तुझे भिरभिरणारे डोळे फक्त मला पहात होते आणि मीही फक्त तुला पाहत होते. ती तुझी आणि माझी पहिली भेट. त्या पहिल्याच भेटीतले तुझे ते मला आपलेसे करने आणि आई म्हणून मी तुला मिठी मारने खरंच खुप मनाला आनंद देऊन गेले. पण बाळा आईपण इथेच संपले नाही त्याची तर ती सुरुवात होती.
   तु लहान होतास माझ्या हातात आनंदाने रहात होतास. माझ्याकडे पाहुन तुझ्या कुतुहल मनाला एक शांतता होती. माझी आई आहे जवळ तेव्हा तुला या जगाची भिती नव्हती. हळूहळू तु रांगत चालायला लागलास या आईच्या जवळ येण्यासाठी धडपड करायला लागलास. मलाही तुझ्या कित्येक आठवणींच गाठोडं भरायचं होतं आणि ही तर खरी सुरुवात होती. मला आठवतं तु पहिला शब्द 'आई' म्हणाला होतास. तेव्हा माझ्या मनाला काय आनंद झाला होता, ते कसं मी सांगु!. तुझ्या खोड्या वाढतं होत्या सोबत तु आता घरभर पळायला लागला होतास. एक आई म्हणुन माझ्या डोळ्यात हे सगळं मी साठवुन घेतं होते.
पुढे तु शाळेत जायला लागलास तेव्हा बाळा मी तुझा एक फोटो काढुन ठेवला होता. तो आजही माझ्या खोलीत आहे. कारण ते तुझ या जगास पहाण्याच पहिलं पाऊल होतं. या आईच्या पंखातुन बाहेर पडुन या जगात मुक्त फिरायच ते एक पाऊल होतं आणि तिथुनच पुढे या जगात एक माणुस म्हणुन तु कसा असावास याचे संस्कार तुझ्यावर होने गरजेचं होतं. एक आई म्हणुन मला जिजाऊ व्हायचं होतं, एक आई म्हणुन मला राधामाता व्हायचं होतं. एक आई म्हणुन मला माझं बाळ घडवायचं होतं. तुला शिवरायांचे , राम,कृष्णांचे संस्कार द्यायचे होते एका आईची ती एक परिक्षाच होती.
   पण बाळा हे सगळं मला फक्त तुझ्याचसाठी करायचं होतं. पुढे तु उच्चशिक्षणात पास झालास तेव्हा तु पहिले माझ्या पायांवर मस्तक ठेवले होतेस तो तुझा स्पर्श आजही माझ्या पायास जाणवतो. एक आई म्हणून मला एक माणुस घडवायचा होता आणि तुझ्या रुपात मी तो पाहु शकत होते. आई होनं खरंच छान असतं हे तेव्हा मला जाणवलं होतं. पण बघता बघता माझं बाळ मोठं झालं होतं. त्या माझ्या बाळाच्या आयुष्यात आता एक नवीन कोणीतरी आलं होतं. त्याची काळजी करणारं त्याला आपलंस करणारं. पण या आईला त्याचा ही आनंद झाला होता कारण माझं बाळ आता मोठं झालं होतं.
  या आईपणात वर्ष सरुन जातात. बघता बघता बाळ मोठे होतात. आणि या आईच म्हातारपण येतं. केस पांढरे होतात तर हात ही थकुन जातात पण थकतं नाही ते आईपपण तिच्यातील ते प्रेम. आजही ते तुझ्यासाठी तसेच आहे. एक आई म्हणुन तु आजही माझा तो लहान बाळच आहेस अस वाटतं. माझे हात थकुन गेलेत पण माझं बळ तु आहेस हे मला माहिती आहे. माझे डोळे कमजोर झालेत पण तुझ्या डोळ्यातुन हे जग मला दाखवशील हेही मला बाळा माहितेय. हे वय थकुन जातं रे!! पण आईपण नाही! ते सतत वाहत असतं नदी सारख.

कारण बाळा ,

असंख्य वेदनांचा त्रास होऊनही
सहन करणारी फक्त आईच असते

कधी सहज तर कधी कठोर वागणारी
मनास संस्कार देणारी आईच असते

पहिला घास भरवणारी ती
काळजी करणारीही ती आईच असते

बोटं धरुन चालवणारी तिचं
जगात जगायला शिकवणारी आईच असते

आई असते या देवाचंच दुसर रुप
म्हणुनच जगात प्रेमरुपी ईश्वर ती आईच असते

-योगेश खजानदार









पाहुनी तुझ एकदा ..!!

"पाहुनी तुझला एकदा
मी पुन्हा पुन्हा का पहावे
नजरेतुनी बोलताना
ते शब्द घायाळ का व्हावे

घुटमळते मनही तिथेच
तुझ्या वाटेवरती का फिरावे
तुला भेटण्यास ते पुन्हा
कोणते हे कारण शोधावे

उडणाऱ्या केसा सोबत
हे मन वेडे का भिरभिरावे
तुझ्याच त्या स्पर्शाने ही
ते ऊगाच का मोहरुन जावे

प्रेम असे हे मनात या
ओठांवरती न दिसावे
तुझ्या समोर मी असताना
हे प्रेम व्यक्त का न व्हावे

सांग सखे नजरेस या
मनातले प्रेम डोळ्यात का दिसावे
तुझ कळताच जेव्हा ते
तु गोड हसुन का जावे

ते हसने तुझे पहाताच
मी पुन्हा पुन्हा का प्रेमात पडावे
आणि पाहुनी तुझला मी एकदा
पुन्हा पुन्हा का पहावे ...!!"
-योगेश खजानदार

मनास या ..!!

वादळास विचारावा मार्ग कोणता
रात्रीस विचारावा चेहरा कोणता
लाटेस विचारावा किनारा कोणता
की मनास या विचारावा ठाव कोणता

उजेडास असेल अंधाराशी ओळख
पाण्यास असेल त्रुश्नेशी ओळख
मातीस असेल त्या रस्त्याची ओळख
की आठवणीस असेल आपल्याची ओळख

वेळ ही क्षणाला विसरून जाईल
माती या आकाशास विसरून जाईल
झाड या पानांस विसरून जाईल
की ही आठवण आपल्यास विसरून जाईल

पहाटेस ओढ या किरणांची राहिलं
चांदण्यास ओढ या चंद्राची राहिलं
ढगांस ओढ या पावसाची राहिलं
की मनास ओढ या आठवणीची राहिलं

चंद्रास सोबत त्या आकाशाची असेल
झाडास सोबत त्या वार्‍याची असेल
समुद्रास सोबत त्या लाटांची असेल
की जणु मनास सोबत या आठवणींची असेल ..

अगदी कायमची ...!!!
-योगेश खजानदार

मला माहितेय ..!!

खुप बोलावंसं वाटतं तुला
पण मला माहितेय आता
तु मला
बोलणार नाहीस

सतत डोळे शोधतात तुला
पहाण्यास एकदा आता
नजरेस तु पुन्हा
दिसणार नाहीस

कधी भेटशील मझला तु
वाट बघते ते वळण आता
पण मला माहितेय
तु येणार नाहीस

साथ या मनास एक तु
साद घालते तुलाच आता
पण मला माहितेय
तुला कळणार नाही

हे वेड की प्रेम माझे तु
शब्द ही भांबावले ते आता
पण मला माहितेय
तुझ्या ह्रदयास ते कळणार नाही

खुप बोलावंसं वाटत तुला
पण तु बोलणार नाहीस
-योगेश खजानदार

आपल्यास...!!

आयुष्याची संध्याकाळ म्हणजेच म्हातारपण. ते जर आपल्या लोकांन सोबत असेल तर या संध्याकाळचा एकांत प्रखर जाणवत नाही. आपली मुल आपले नातु जवळ असावेत एवढच वाटत रहातं. आपली पत्नी जी आपल्या सोबत म्हातरपणात ही असावी असे वाटते. अखेर सगळं झाल्यानंतर आपल्याच लोकांनचा सहवास असावा. आधार देणारा आपला मुलगा , छोट्या छोट्या नातवंडाना राजा राणीच्या गोष्टी सांगन हीच खरी आयुष्याची संध्याकाळ असते  .. असं प्रत्येक आयुष्य सरलेल्या माणसास वाटत राहतं.. म्हणुनच ..
एक कविता ...

'आपल्यास' ..

"या निर्जीव काठीचा आधार
मला आता आहेच
पण तुझ्या हातांचा आधार असावा
एवढच वाटतं मला

खुप खुप एकांतात असताना
आठवणींचा खजिना भेटतोच
पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा
तेच हवंसं वाटतं मला

कधी विसरुन जाताना मला
ते वय आठवण करुन देतंच
पण त्या लहान पावलां सोबत
पुन्हा खेळावस वाटतं मला

राजा राणीच्या गोष्टींत हरवुन जाताना
मन थोडं मागे जातंच
पण ते ऐकणारी ती छोटीशी प्रजा
खुप पहावीशी वाटते मला

हे वयंच असतं ना असं
सगळं अंधुक होतं जातंच
पण पुन्हा ते नव्याने समोर दाखवणारं
आपलंस कोणी असावं वाटत मला

या श्वासांचा जप अखेर
कधी ना कधी संपेलच
पण शेवटच्या श्वावसात सोबत असणारं
माझं घर जवळ असावं वाटत मला..!!"
- योगेश खजानदार

माझं घर..

या निर्जीव काठीचा आधार
मला आता आहेच
पण तुझ्या हातांचा आधार असावा
एवढच वाटतं मला

खुप खुप एकांतात असताना
आठवणींचा खजिना भेटतोच
पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा
तेच हवंसं वाटतं मला

कधी विसरुन जाताना मला
ते वय आठवण करुन देतंच
पण त्या लहान पावलां सोबत
पुन्हा खेळावस वाटतं मला

राजा राणीच्या गोष्टींत हरवुन जाताना
मन थोडं मागे जातंच
पण ते ऐकणारी ती छोटीशी प्रजा
खुप पहावीशी वाटते मला

हे वयंच असतं ना असं
सगळं अंधुक होतं जातंच
पण पुन्हा ते नव्याने समोर दाखवणारं
आपलंस कोणी असावं वाटत मला

या श्वासांचा जप अखेर
कधी ना कधी संपेलच
पण शेवटच्या श्वावसात सोबत असणारं
माझं घर जवळ असावं वाटत मला
- योगेश खजानदार

अधुरी प्रित...

'तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस , अनोळखी नजरेस ओळखू शकलो नाही!!' मंदार प्रियाच्या नजरेत नजर रोखुन सगळं बोलतं होता. प्रिया फक्त त्याच्याकडे पहातं होती. तिची ती शांतता त्याला नकोशी वाटतं होती.
'सांग ना मला प्रिया!! हवं तरं भांड माझ्याशी, पण हा अबोला नको!! ती अनोळखी नजर तुझी,  मला पाहुन न पाहिल्या सारखे करणे खरंच असह्य होतंय मला!! त्याच्या बोलण्यातुन त्याच तिच्यावरच प्रेम शब्दांतुन जाणवंत होतं. त्या भेटीत त्याला खुप काही बोलायचंय तिच्या मनातल्या रागास कुठेतरी संपवायचंय हे तिला कळत होतं. मनात मात्र प्रिया खुप काही बोलतं होती आपल्या कित्येक भावना ती सांगत होती तिच्या मनातल्या भिंती त्या सर्व ऐकत होत्या पण मंदारच्या मनात त्या ऐकु जातं नव्हत्या.
खुप काही सांगायचय रे मला पण कस सांगु ज्यावेळी खरंच मला तुझी गरज होती त्यावेळी तु कुठे होतास हे कस मी सांगु. नातं हे अस नसतं रे तुझ्या मनात येईल तेव्हा तु चिडायचं वाटेल तेव्हा निघून जायचं आणि पुन्हा माझी आठवण येताच मला मनवायचं असं किती रे दिवस हे चालणार. मनात सार प्रिया हे बोलत होती पण ओठांवर ते काहीच येऊ देतं नव्हती. कारण तिला मंदारला दुखवायचं नव्हतं.
  मंदारची चिडचीड पाहुन तिलाही दुखः वाटतं होतं पण हळव्या या मनास तिला कुठेतरी कठोर करायचं होतं. मंदारच हे वागणं आता असह्य झालं होतं. प्रिया त्याच्या प्रेमासाठी त्याला काहीच बोलतं नव्हती. पण अखेर तिने ही मंदारला मनातल सगळं सांगितलं. तिचा तो अबोला संपताचं ती बोलली.
'मंदार माझं न बोलणं, तुझ्याकडे पाहुनही न पाहिल्या सारखे करणे यांचा तुला त्रास होतो ना? मग अस तुही माझ्याशी वागताना माझ्या मनाचा विचार केलायस कधी? छोट्या भांडणातही तु माझ्याशी कित्येक दिवस बोललाच नाहीस ज्यावेळी आलास त्यावेळी तुला कोणीतरी बोललं म्हणुन तुला माझी आठवण आली ! खरं ना?? म्हणजे माझं स्थान तुझ्या आयुष्यात कुठे आहे हेच मला कळत नाहीये. तुला वाटेल त्यावेळी तु नातं जोडतोस आणि पुन्हा गरज संपताच ते तोडुन टाकतोस त्यावेळी नात्यांची किंमत तुला कधी कळतच नाही रे.!!
'प्रिया, खरंच माझं चुकलं मला माफ करं !!' मंदारच्या डोळ्यात पाणी आले होते.
'नाही मंदार प्रत्येक वेळी सगळं झाल्यावर माफी मागण्यात काय अर्थ असतो सांग ना? कित्येक वेळा हा मनास दुखवायचा आणि पुन्हा काही झालेच नाही असे म्हणुन माफी मागण्याचा खेळ चालणार? मला आता याविषयी काहीच बोलायच नाही आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही असं मी ठरवलंय! !
प्रियाच्या या निर्णयाचा मंदारला चांगलाच धक्का बसला त्याला काय बोलावे तेच कळेना. माफी तरी काय म्हणुन मागावी. आणि त्याचा आता काही अर्थ ही नव्हता. अखेर प्रिया जाण्यास निघाली मंदारने खुप तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण वेळ आता निघुन गेली होती. होतं त्यावेळी नातं जपता आलं नाही आणि आता ते दुर जाताना मंदारला त्याचा त्रास होत होता.
'माझं खरंच चुकलं मला करं !! मंदारचे हे शब्द प्रियाच्या मनापर्यंत पोहचलेच नाहीत आणि पोहचतील ही कसे मंदारनेच ते मन दुखाच्या वेदनेने घायाळ केले होते तिथे त्याचे  शब्द ऐकायलाही ते मन आता तयार नव्हतं पुन्हा नव्याने सुरू करण्यास तिचा मन आता तयार नव्हते.
कित्येक वेळ मंदार ती निघुन गेल्यावर तिथेच बसुन होता. हरवलेल्या नात्यास कुठेतरी शोधत होता. 'प्रिया, नकोस जाऊ तु मला सोडुन!! आठवणींना तो सांगत होता. आणि हरवुन गेलेल्या पाखरास उगाच एकटाच शोधत होता.
-योगेश खजानदार

मन आणि तु..!!

एका मनाची ती अवस्था
तुला आता कसे मी सांगू
तुझ्याचसाठी त्याचे रुसणे
त्यास आता कसे मी समजावू

तु नसताना तुझ्याचसाठी
त्याचे आठवणे कसे मी विसरु
तु असताना तुझ्याचसाठी
त्याचे गुणगुणे कसे मी ऐकवु

रेखाटले ते चित्र तुझे जेव्हा
माझ्या ह्रदयातुन कसे मी पुसु
भेटले ते तुला कधी तर
त्यास आता कसे मी आडवु

हे मन वेडे तुझ्याचसाठी
कविता करताना कसे मी वाचु
ओठांवरती येता ते शब्द
तुझ्याच समोर ते कसे मी म्हणु

प्रेमात पडताच विसरले मलाही
माझीच ओळख कसे मी करू
विसरुन गेले मलाच ते मन
तुला विसरण्यास कसे मी सांगु

मनात माझ्या तुच तु आता
स्वतःस आता कसे मी शोधु
एका मनाची ती अवस्था
तुला आता कसे मी सांगु
-योगेश खजानदार




Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...