दिनविशेष १ मार्च || Dinvishesh 1 March ||


जन्म

१. मेरी कॉम, भारतीय बॉक्सर, खेळाडू (१९८३)
२. मोरिझ सीलेर, जर्मन लेखक (१८९६)
३. नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री (१९५१)
४. बबनराव लोणीकर, भारतीय राजकीय नेते (१९६१)
५. रिचर्ड एच प्राइस, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
६. बुद्धदेव भट्टाचार्य, पश्चीम बंगालचे मुख्यमंत्री (१९४४)
७. जस्टिन बिबर, कॅनाडियन गायक (१९९४)
८. नानासाहेब धर्माधिकारी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते (१९२२)
९. अर्चना जोगळेकर, मराठी अभिनेत्री (१९६५)
१०. हाजी मस्तान, भारतीय चित्रपट निर्माते (१९२६)
११. जॉन पेल , इंग्लिश गणितज्ञ (१६१०)
१२. सलील अंकोला, भारतीय क्रिकेटपटू (१९६८)
१३. शांताबाई कांबळे, मराठी लेखिका (१९२३)

मृत्यु

१. वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९८९)
२. मनमोहन देसाई, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९४)
३. फ्रान्सिस्को रेडी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१६९७)
४. पीटर बारलो, इंग्लिश गणितज्ञ (१८६२)
५. गौरी देशपांडे, लेखिका, कवयत्री (२००३)
६. वसंतराव दादा पाटील, शिल्पकार (१९९४)
७. पॉला फॉक्स, अमेरिकन लेखिका (२०१७)
८. झोर्स अल्फेरोव, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (२०१९)
९. इसाक टोधुंटर,  गणितज्ञ (१८८४)
१०. अलाईन रेसानिअस, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक (२०१४)

घटना

१. अडॉल्फे थिर्स हे फ्रान्सचे पंतप्रधान झाले. (१८४०)
२. येलोस्टोन हे जगातले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाऊ लागले. (१८७२)
३. गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४८)
४. पहिल्यांदाच वाहन परवाना क्रमांक प्लेट्सला सुरुवात झाली. (१९३७)
५. रिओ डी जानिरो या शहराची स्थापना करण्यात आली. (१५६५)
६. सिंहगड किल्ला ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतला. (१८९८)
७. पनामाने आपल्या नव्या संविधानाचा स्वीकार केला. (१९४६)
८. एम एस सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९८)
९. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कामास सुरुवात झाली. (१९४७)
१०. कोयना धरणाच्या बांधनीस सुरुवात झाली. (१९५८)

दिनविशेष २८ फेब्रुवारी || Dinvishesh 28 February ||


जन्म

१. क्रिषण कांत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२७)
२. दिग्विजय सिंग, भारतीय राजकिय नेते (१९४७)
३. वर्षा उसगावकर, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६८)
४. पियरे फतोऊ, फ्रेंच गणितज्ञ (१८७८)
५. रवींद्र जैन , गीतकार, संगीतकार (१९४४)
६. बर्नार्डफ्रँक, फ्रेंच लेखक (१९२७)
७. डॉ शंकर दामोदर पेंडसे, मराठी साहित्यिक, लेखक (१८९७)
८. मनिजिंदर सिंघ सिर्सा, भारतीय राजकीय नेते (१९७२)
९. विदुषी पद्मा तळवलकर, गायिका (१९४८)
१०. विजय बहुगुणा, भारतीय राजकीय नेते (१९४७)
११. त्रिस्टन लुईस, अमेरीकन लेखक (१९७१)
१२. लिनस कार्ल पोलिंग, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०१)

मृत्यु

१. डॉ राजेंद्र प्रसाद , भारताचे पहिले राष्ट्रपती (१९५३)
२. हर्मांन वों देर हर्डत, जर्मन इतिहासकार (१७४६)
३. जॉन रोमने रॉबिन्सन, आयरिश खगोलशास्त्रज्ञ (१८८२)
४. राजा गोसावी, मराठी सुप्रसिद्ध अभिनेते (१९९८)
५. इसान जाफ्री, भारतीय राजकीय नेते (२००२)
६. फ्रेडरिक एबर्ट जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९२५)
७. चार्ल्स नोकॉले, जिवाणू शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९३६)
८. आडोल्फ सचार्फ, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६५)
९. कृष्ण गंगाधर दीक्षित, गीतकार, लेखक(१९९५)
१०. कमला नेहरू, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (१९३६)
११. फिडेल संचेझ हर्नंदेझ, एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष (२००३)
१२. जयेंद्र सरस्वती, हिंदु धर्मगुरू (२०१८)

घटना

१. डॉ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रामन प्रभावचा शोध लावला. (१९२८)
२. अमेरिका आणि मेक्सिको मधील युध्दात मेक्सिकोला हार पत्करावी लागली. (१८४७)
३. इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९२२)
४. थिएटर म्युझियमची स्थापना अमस्टरडॅम येथे झाली. (१९२५)
५. नायलॉनचा शोध वॅलेस कॅरोथर्स यांनी लावला. (१९३५)

महत्त्व

१. राष्ट्रीय विज्ञान दिवस

दिनविशेष २७ फेब्रुवारी || Dinvishesh 27 February ||


जन्म

१. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज , लेखक , कादंबरीकार (१९१२)
२. बी एस युड्युरप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९४३)
३. एलिस हॅमिल्टन, भौतिकशास्त्रज्ञ (१८६९)
४. स्वेईंन भोर्णसून, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१८८१)
५. ज्योत्स्ना देवधर, लेखिका (१९२६)
६. कार्ल श्मिट, रसायनशास्त्रज्ञ (१८९४)
७. मायकेल ए बर्स्टिन, अमेरीकन लेखक (१९७०)
८. प्रकाश झा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५२)
९. ल्हित्सेन ब्रूवर्स, डच गणितज्ञ (१८८१)
१०. बर्नार्ड एफ ल्योट, फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ (१८९७)

मृत्यु

१. चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक ( १९३१)
२. बहादूर शाह, मुघल बादशहा (१७१२)
३. इवान पावलोव, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
४. हेन्र लुईस स्मिथ, भौतिकशास्त्रज्ञ (१९५१)
५. आदी मर्जबान, अभिनेता , दिग्दर्शक (१९८७)
६. नेविल्ले कार्डस, लेखिका (१९७५)
७. पॉल ऑस्वाल्ड अह्नर्ट, जर्मन खगोल अभ्यासक (१९८९)
८. गणेश वासुदेव मावलकर, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकिय नेते (१९५६)
९. जॉर्ज एच हितचींग्ज, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९९८)
१०. टिना स्ट्रोबोस, डच भौतिकशास्त्रज्ञ (२०१२)

घटना

१. पहिले महीलांसाठीचे मासिक "लेडीज मर्क्युरी" नावाने प्रकाशित कऱण्यात आले. (१६९३)
२. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली. (१९००)
३. जे एस हेय यांनी सूर्यापासून रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला. (१९४२)
४. मुस्लिम जमावाने अयोध्येहून परतत असताना गोध्रा येथे हिंदु यात्रेकरूंना रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले. गोध्रा हत्याकांड(२००२)
५. डॉमिनिकाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६७)
६. फ्रान्सने अणुबॉम्ब चाचणी मुरूर्का एटोल येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९७८)
७. कारमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात झाखो उत्तर इराक येथे शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
८. अर्सनिय यत्सेण्युक हे युक्रेनचे पंतप्रधान झाले. (२०१४)

महत्त्व

१. मराठी भाषा दिवस, कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस हा दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

शर्यत || कथा भाग ७ || गावाकडच्या गोष्टी || Sharyat Katha ||



कथा भाग ७

सखा दरवाजात येताच त्याला शांताच्या खोकण्याचा आवाज आला. तो लगेच आता पळत गेला. शांता सारखं खोकत होती, तो पटकन तिला पाण्याचा तांब्या देत म्हणाला,
"कशाला काम करत बसतेस !! अधिच तुला बरं वाटतं नाहीये !! त्यातून ही झाडलोट कशाला !! "
"आहों मग कोण करणार ही काम !! "
"मी करणार !! "
"तुम्ही ??" शांता थोड हसत म्हणाली.
"हो मी !!" तिच्या हातातील झाडू घेत सखा म्हणाला.
झाडू एका कोपऱ्यात ठेवून ,सखा आवरू लागला. मध्येच तो शांताला बोलू लागला.
"शांता आता शर्यत जवळ आली !! उद्या आप्पांनी मला महादेवाच्या मंदिराजवळ बोलावलं आहे !! शर्यत काय आहे ते समजावून सांगणार आहे मला !! "
"होका !! आणि साहेब काय म्हणाले ??"
"काही नाही !! शर्यतीवर लक्ष दे म्हणाले !!"
"एकदाका शर्यत जिंकली की मोठ्या गावाला जाऊन तुझा इलाज करू आपण !! "
"मला काही एवढं झालेलं नाही !! तुम्ही काळजी नका करू !! मी होईल बरी !!" शांता सखाला धीर देत म्हणाली. 
"ताप आहे अजून !!" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
शांता काहीच बोलत नाही.

रात्रभर सखाला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात शांता आणि शर्यत यांच्या विचारांची जणू चढाओढ लागली होती. एक मन त्याला सांगत होत सखा सगळं ठीक होईल आणि दुसरं मन त्याला सांगत होत सखा तू म्हणतोस तस झालं नाही तर ?? काय करायचं!! त्या विचारांनी त्याला पुरत वेढून घेतल होत. मध्ये मध्ये शांता खोकत होती त्या आवाजाने पुन्हा तो भानावर येत होता. अशात सारी रात्र निघून गेली. 

सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले.
"व्हा सखा ! बरं झालं लवकर आलास !! आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये !! " आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले ,
"तयार आहात ना रे सगळे !! " 
सगळे एका सुरात म्हणाले.
"हो !!" 
सखा फक्त पाहत राहिला.
"तर सखा तुझ्या हातात गावाच्या वेशीवर असलेला एक झेंडा असेल !! शर्यतीच्या दिवशी इथ पन्नास गावांच स्पर्धक येतील !!तेव्हा आजच तुला सांगणं गरजेच आहे !! " आप्पा सखाकडे पाहत बोलत होते.
"तर या मंदिराच्या खालच्या मैदानावरून शर्यतीला सुरुवात होईल! अगदी सुरुवातीलाच आपल्याला पाडण्याचा , जखमी करण्याचा प्रयत्न होईल !! त्यासाठी घोळक्यातून जेवढं लांबून पळता येईल तेवढं पळायचं !! मध्येच कोणी शिव्या देईल !! एखादा प्रतिस्पर्धी तुला भुलवण्याचा प्रयत्न करेल !! पण आपण फक्त समोर बघत पळत राहायचं !!"
"आप्पा हे सगळं टाळता नाही येत !! मारणं, पाडणं?? त्या देवाच्या जत्रेत हे असं ??"
"सखा !! अरे खुद्द देवाने सुद्धा अशा क्रूर प्रवृत्तींचा सामना केला आहे !! मग आपण तर माणूस आहोत ! आणि तू प्रतिकार केला नाहीस तर सुरू होण्याआधीच संपून जाशील !!! खरतर हे शर्यतीत नाहीच !! पण प्रतिष्ठा पणाला लागली की डावपेच हे होणारच !! पण आपण तरीही चांगल्या मार्गाने जिंकण्याचा प्रयत्न करायचा !!" आप्पा पुढे चालत जाऊ लागले.
आप्पा खालच्या मैदानावर आले. समोर उभा राहून म्हणाले.
"सखा इथून सावंतवाडीच्या मंदिरात जायला तुला कमीत कमी वेळ कसा लागेल याचा प्रयत्न कर !! चल !!"

सखा पुढे चालत आला. त्या मैदानावर आप्पांनी आपल्या पायांनी एक रेष ओढली होती. सखा त्यांच्या इशार्याची वाट पाहू लागला. आप्पांनी धावण्याचा ईशारा देताच सखा जोरात धावू लागला. चार पावले पुढे जातो न जातो तोच त्याच्या पायावर जोरात फटका बसला. सखा जमिनीवर जोरात पडला. आप्पा धावत त्याच्या जवळ आले.
"उठवारे !! " बाजूच्या लोकांना आप्पा म्हणाले.
सखा हळू हळू उठला. शेजारच्या एका माणसाने त्याच्या पायावर जोरात चाबूक मारला होता. पायावर लाल जखम दिसू लागली होती.
"सखा मी काय म्हणालो होतो!! या अशा लोकांपासून , अशा डावपेचात तुला पुढं जायचयं ! तू प्रतिकार करायचं नाही असं नाही !! "

सखा पुन्हा त्या रेषेजवळ आला. पुन्हा धावू लागला.चाबूक फिरवणारा पाहताच त्याला हुलकावणी देऊन सखा पुढे धावत सुटला. अगदी जोरात , वाऱ्याच्या वेगाने , त्याला समोर फक्त आता सावंतवाडी मंदिर दिसत होत. सखा धावत होता अगदी जोरात , अचानक मध्येच कोणीतरी अडथळा बनून येत होत. सखा त्याला चुकवून मध्येच ते अंगावर घेऊन धावत होता. पाहता पाहता त्याने सावंवाडीतील महादेवाचं मंदिर गाठलं. पुन्हा तिथे क्षणभर थांबून तो सुतारवाडीच्या मंदिरात आला. आप्पा तिथे त्याची वाट पाहत होते. त्याच्या सोबत धावत गेलेल्या एका पोराला त्यांनी विचारलं
"किती वेळ लागला रे ??"
"मागच्या शर्यतीत धोंडा पाटीलला लागला होता त्यापेक्षा जरा जास्तच लागला !!" 
"म्हणजे माझ्यापेक्षाही कोणीतरी जोरात धावत ??" सखा आश्चर्यचकित होत म्हणाला.
"सखा शर्यत एवढी सोपी नाही बरं !! तुझ्यापेक्षा जोरात आणि तरणे स्पर्धक असतील स्पर्धेला !! त्यांना हरवण सोप्पी गोष्ट नाही !!" आप्पा सखाकडे पाहत म्हणाले.

दिवसभर आज त्यांची शर्यतीचीच पूर्वतयारी चालू होती. शेवटी सुर्य मावळतीला आला आणि आप्पा म्हणाले.
"सखा आता घरी जा !! मी तुला काय सांगितलं ते सगळं काही लक्षात ठेव!! लक्षात ठेव एक चूक खूप महागात पडू शकते आणि आता आपण शर्यतीच्याच दिवशी भेटू, तोपर्यंत आराम कर , आणि शर्यतीच्या दिवशी तयार राहा !! " आप्पा सखाला एवढं बोलून निघाले.
सखा काहीच बोलला नाही. तो फक्त पाहत राहिला.

सगळं काही लक्षात ठेवून तो घरी आला. झालं ते त्याने शांताला सांगितलं, पण पायावर झालेली जखम त्याने सांगितली नाही. शांताने ती पाहिली आणि तिने लगेच विचारल,
"पायाला काय लागलंय एवढं ??"
सखा अडखळत बोलू लागला, त्याला शांताला शर्यत किती जीवघेणी आहे हे सांगायचं नव्हतं. तिला त्या अवस्थेत अजून त्रास द्यायाचा नव्हता.
"काही नाही !! धावता धावता पडलो बाकी काही नाही !! "
शांता पुढे काहीच बोलली नाही.
"आता फक्त थोडा वेळ राहिलाय शांता !! एकदाका ही शर्यत मी जिंकली !! की आपण दोघे मस्त मजेत राहुत !! "
शांता सखाकडे पाहून म्हणाली.
"हो !! तुम्ही शर्यत जिंकणार याची मला खात्री आहेच ! या वयात घेतलेली ही कष्ट तो परमेश्वरी ही वाया जाऊ देणार नाही !! त्या महादेवाला माहितेय सगळं !! तो नक्की तुम्हाला यशस्वी करेन !"
डोळ्यात आलेला एक टिपूस पुसत शांता सखाकडे पाहत राहिली.

सखाला आता शर्यतीच्या दिवसाची ओढ लागली होती. थोड्याच क्षणात त्याला सर्वांची मन जिंकायची संधी मिळणार होती. तो आता शर्यतीत स्वतःला हरवून गेला होता.

क्रमशः

✍️योगेश खजानदार

शेतातली हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. साधारणतः पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा या भागात हुरडा पार्टीचे प्रमाण खूप पाहायला मिळते. यावेळी लोक दिवस दिवस रानात फिरून कोवळी ज्वारीची कणस खास हूर्ड्यासाठी निवडतात तर काही लोक खास आवर्जून हुर्ड्यासाठी ज्वारीच्या पिकाची पेरणी देखील करतात. साधारणतः मकर संक्रांती झाली की हुरडा पार्टीला सूरूवात होते त्यानंतर पुढचे महिना दिड महिना हूर्ड्यासाठी योग्य असतात, त्यानंतर कणसे पिवळी पडायला लागतात.



शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी एखाद्या झाडाखाली ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमिनीत एक आपटी केली जाते ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात. तर ही आपटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या पेटवून विस्तव तयार केला जातो. आग पूर्ण शांत झाल्यावर जो विस्तव पेटता राहतो त्यामध्ये ही कवळी ज्वारीची कणसे भाजली जातात. ती योग्य प्रकारे भाजली जावी याची काळजी घ्यावी लागते. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील भाजलेली ज्वारीचे कोवळे दाणे म्हणजे आपला हुरडा.

गरम गरम हा हुरडा आपल्या समोर आल्यानंतर त्याला खाण्याचा मोह आवरणार नाही हे नक्की. म्हणून त्यासोबत चवीने खायला गूळ, खारमुरे, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, शेव , फरसाण असे विविध प्रकार घेतले जातात. त्यामुळे चवीने खावा असा हुरडा खरंच खूप मस्त लागतो. ती धगधगणारी आपटी, ते सोबत खायच्या पदार्थांचे सुवास काही वेगळीच मजा आणतात. पुन्हा रानात फिरून खाल्लेला ऊस, ढाळा म्हणजे वेगळेच सुख असतं.


अशावेळी कित्येक हुरडा प्रेमी लोकांचा दिवस फक्त हुरडा खाण्यातच जातो. यासोबतच रानात जेवण्याची मजा काही वेगळीच असते कित्येक ठिकाणी अशा जेवणाचे बेतही होतात. रानातल्या चुलीवर केलेली भाकरी आणि भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. अशावेळी माणूस नेहमी पेक्षा जास्त जेवणार हे नक्की असतं. कारण रानातल्या वाऱ्याचा परिणाम तोच असतो. आभाळ म्हणजे छत , काळी माती खाली आणि समोर ठेवलेले ते सुंदर भाजी भाकरीचे ताट म्हणजे स्वर्ग म्हणावा अस काही. 

तसेच यामध्ये आपण ज्वारीचे पीक कोणत्या प्रकारे घेतो त्यावरूनही हुरड्याची चव बदलत जाते. जसे की गुळभेंडी,  मालदांडी, लालबोंडी, पिवळी असे ज्वारीचे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये गुळभेंडी चवीने छान लागते. तसे बाकीचेही प्रकार खायला सुंदर लागतात पण चवीत फरक जाणवतो. हुरडा एक दीड किंवा दोन दोन महिने देखील खायला योग्य असतात. पण एकदा कणसे पिवळी पडू लागली की मग त्याचा हुरडा होत नाही. ते पूर्ण पिकलेले ज्वारीचे पीक होते. 



अशा या हुरडा पार्टी निमित्ताने दर वर्षी रानात जाऊन जेवणाचे बेत नक्की ठरतात. त्यानिमित्त कित्येक मित्रांना पुन्हा भेटण्याचे कारण मिळते, घरच्यांसोबत मज्जा मस्ती करता येते, सर्वांसोबत गप्पा टप्पा करत आणि हातातला तो हुरडा चवीने खात रहावा एवढेच वाटत राहते. 

✍️योगेश खजानदार

शर्यत || कथा भाग ६ || Sharyat Katha Bhag 6 ||




कथा भाग ६

 रात्रभर शांता मध्ये मध्ये झोपेतून उठत होती. तिला मध्येच खोकला येत होता . सखाला तिच्या आजाराबद्दल काळजी वाटू लागली होती. पण तरीही तो तिला धीर देत होता. रात्र सखाच्या काळजी करण्यातच गेली.
सकाळी आवरून सखा कामावर जायला निघाला. त्याला कामावर जावं की नको अस वाटू लागलं. शांताकडे पाहून तो म्हणाला.
"शांता !! वैद्यबुवा म्हणाले होते !! तुझी तब्येत काळजी नाही घेतली तर अजून बिघडेलं म्हणून !! मी आज नाही जात कामावर !! " 
शांता सखाकडे पाहत म्हणाली.
"मला माहितेय तुमचा जीव माझ्यात अडकलाय !! पण तुम्हाला कामावरही जायचंय !! तुम्ही नका काळजी करू माझी !! मी बरी आहे !!!" शांता आलेली उबळ दाबत म्हणाली.
"माझं मन मला तुझ्याकडे खेचत आहे शांता !! कसा जाऊ मी कामावर !! " 
"जावं तर लागणार !! नाहीतर हे असच चालू राहणार !!" शांता सखाला समजावत सांगत होती.

सखा जड पावलांनी कामावर जायला निघाला. त्याच एक मन शर्यतीबद्दल विचार करत होत आणि एक मन शांताबद्दल विचार करत होत. या विचारांच्या द्वंद्वात त्याला काहीच सुचत नव्हतं. तसाच तो रखडत रखडत आप्पासमोर जाऊन उभा राहिला. सखाला पाहून आप्पा खुश झाले आणि म्हणाले
"व्हा !! व्हा !!सखा आलास तू !! बरं झाल रे !! सकाळपासून तुझी वाट पाहत होतो मी !! 
सखा काहीच बोलला नाही . पुन्हा कामावर आल्याबद्दल त्याला आनंद झाला होता. पण शांताकडे पाहून त्याचा धीर खचला होता. 
"सखा !! आज साहेबांनी तुला तिकडं बोलावलंय बरं !! सावंतवाडीला !! म्हणाले, सखा आला की ताबडतोब त्याला माझ्याकडं पाठवून दे !! "
"बरं आप्पा !! मग जाऊ का मी तिकडं !! " 
"हो जा !! " 
सखा जायला निघाला . पण तेवढ्यात आप्पांनी त्याला हाक मारून बोलावून घेतल.
"काय झालं आप्पा ?? " 
हातातला डबा देत आप्पा म्हणाले. 
"डबा कोण घेऊन जाणार ??"
"विसरलोच जरा !! द्या !! "

सखा डबा घेऊन निघाला. सख्याच काहीतरी बिनसलंय हे आप्पांच्या लक्षात आल. पण ते काहीच म्हणाले नाही. सखा धावत धावत सावंतवाडीला निघाला. मनात एकच विचार शांता बरी झाली पाहिजे !! 
"जिच्यासाठी मी एवढा अट्टाहास करतोय तीच आज अंथरुणाला खिळून बसलीय !! याच मला राहून राहून वाईट वाटतंय !! कित्येक दिवस आम्ही दोघांनी भिकारी म्हणून दिवस काढले.. आता कुठे चांगले दिवस येतायत, तर मागे शांताच आजारपण लागावं. पुन्हा त्या वैद्याकडे जावं तर पैसा लागणार. तो आणावा कुठून हेच मला कळत नाही. शांता बरी व्हावी एवढच मला वाटत . बाकी काही नको !! " सखा धावत धावत सावंतवाडीला पोहचला. समोर दुकान येतच आतमध्ये गेला. साहेब आपल्या कामात गुंग होते. त्यांनी एकदा सखाकडे पाहून त्याला थांबायचा इशारा केला. सखा दरवाजातच थांबला. साहेब कित्येक वेळ काम करत राहिले आणि नंतर समोरची वही बंद करत उठले.

"काय सखा !! आता बरा आहेस ना रे ?? कसं वाटत आता कामावर येऊन ??"
"जी चागलं वाटतंय !!" सखा तुटक बोलला.
"छान छान !! घे डबा इकडे !!" साहेब हात पुढे करत म्हणाले.
सखा साहेबांना डबा देतो डबा उघडताच त्यातून खमंग भाज्यांचा वास सर्वत्र दरवळतो. सखाकडे पाहत साहेब म्हणाले.

"काय सखा !! आज यायला उशीर तो केलास !! आणि डबा ही थोडा सांडलेला वाटतोय ??" 
"चुकी झाली साहेब !! येताना चुकून झालं असलं!! "
"बरं बरं !!" साहेब सखाच्या चेहर्याकडे पाहत म्हणाले आणि लगेच पुढे बोलू लागले,
"काही झालंय का सखा ?? का पुन्हा शिरपान त्रास दिला ??"
"नाही नाही साहेब !! शिरपा नाही !! माझी बायको शांता !! ती आजारी आहे कालपासून !! काल तुमच्या इथून गेलो, तर घरात बेशुद्ध होऊन पडली होती!! रात्री थोडी बरी झाली, तर सकाळी पुन्हा तब्येत खराब झाली."
"अरे मग पहिले नाहीका सांगायचं !! बरं जाताना आप्पाकडून पन्नास रुपये घेऊन जा !! चांगल्या वैद्याला दाखव तिला !! "
"उपकार झाले साहेब !! " सखा हात जोडत म्हणाला. 
"सखा ते तर तुला एक मदत म्हणून रे !! पण लक्षात ठेव सखा !! शर्यत आता फक्त तीन दिवसांवर आली आहे ! जत्रेला उद्यापासून सुरुवात होईल !! शर्यत परवा असेल !! तुला त्यात जिंकायचं आहे !! आपल्या गावाचा मान वाढवायचा आहे तुला लक्षात ठेव!! " साहेब जोरात बोलले.
सखा फक्त बघत राहिला.
"तुझ्या बायकोची तब्येत लवकर बरी होईल काळजी करू नकोस !! जा आता !!"

सखा पुन्हा धावत पळत सूतारवाडीला आला. साहेबांनी त्याला पन्नास रुपये देऊ केले याच त्याला राहून राहून नवल वाटत होत. त्याच्या मनात साहेबांविषयी आदर वाढला होता. सुतारवाडीला येताच त्याने आप्पांना सगळं काही सांगितलं.

"सखा सकाळी आलास तेव्हा एका शब्दान मला काही बोलला नाहीस !! सांगायचं तरी ना मला !!
"आप्पा काय करावं काही कळतं नव्हतं !! पण साहेबांनी खूप विचारलं तेव्हा सांगावं लागलं. " सखा शांत बोलत होता.
"बरं आता एक काम कर !! इथून पलिकडच्या गावात एक वैद्य आहेत त्यांना तू दाखव ते काय म्हणतात ते बघ !! खूप प्रसिध्द आहेत !! "
"बरं !!"

 आप्पांनी सखाला पन्नास रुपये दिले. तसा सखा धावतच घरी निघाला. त्याला कधी एकदा घराकडे जाईल असे झालं होत. धावत धावत तो घरी आला. शांता शांत झोपली होती. सखाच्या येण्याच्या आवाजाने ती जागी झाली. तिच्याजवळ जात सखा म्हणाला.
"आता बरं वाटता??" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
"मी बरी आहे हो !! " शांता दबक्या आवाजात म्हणाली.
सखा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.
"ताप आहे शांता तुला!!  आजार पण वाढतोय !! चल पटकन आपण वैद्यांकडे जाऊयात !! " 
"आहों पण पैसे ??"
"साहेबांनी पन्नास रुपये दिलेत !! " 
"आहों पण कशाला !! मी होईन बरी !! "
"हट्ट करू नकोस !! चल !!"

सखा शांताला घेऊन निघाला. जवळच्या ओळखीच्या एकाची बैलगाडी घेऊन शांताला घेऊन तो निघाला. रात्रभर बैलगाडी त्या गावाकडे जात होती. हळूहळू रस्ता मागे टाकत होती. पहाटे पहाटे सखा त्या गावी पोहचला. समोर त्या वैद्याचे घर दिसताच. त्याने बैलगाडीतून उतरून त्यांना हाक दिली. अर्धवट झोपेतून उठून वैद्यबुवा आले. त्यांनी लगेच परिस्थिती ओळखली. शांताला आत घेऊन या अशी खून त्यांनी केली.
बैलगाडी सोबत आलेला त्याने आणि सखाने शांताला हळूच उचलून घरात आणलं. क्षणभर सगळे शांत होते. तापेन शांतेच अंग फणफणत होत. तिचा श्वास दीर्घ झाला होता.

"हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! "
"काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." 
"बरं बरं !!" वैद्यबुवा सगळं ऐकून एक मात्रा शांताच्या ओठांवर ठेवत म्हणाले.
"हे बघा !! वयामूळ शरीर साथ देत नाहीये !! पण एक औषध देतो !! ते दर एक तासाला दुधात टाकून त्यांना देत राहा !!" बुवा औषधाची डबी सखाकडे देत म्हणाले.
"बरी होईल ना ती ??" सखा अगदिक होत म्हणाला.
"हे बघा !! प्रयत्न करणं आपलं काम आहे !! बाकी त्या देवाच्या मनात काय असेल ते !! पण ही मात्रा चुकवू नका !! या आता !!"

सखा शांताला घेऊन पुन्हा सूतारवाडीला आला. त्याला शांताची ही अवस्था आता बघवत नव्हती. दुपारपर्यंत ते घरी आले. शांता झोपेतून कशीबशी जागी झाली. तिला दर एक तासाला औषध सखा देऊ लागला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा नव्हता. पण पुन्हा कामावर जायची वेळ आली होती. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. त्याची ही घालमेल शांताने ओळखली आणि ती म्हणाली
" तुम्ही जरावेळ झोप घ्या!! आणि मग जा कामावर. मला आता ठणठणीत बरं वाटतंय !! " शांता अंथरुणावरून थोड वर उठत म्हणाली.
"माझा पाय निघत नाहीये !! " सखा तिच्याकडे पाहून म्हणाला.
"जावं तर लागेल ना ! साहेबांचा किती विश्वास आहे पाहिलं ना !! एका क्षणात त्यांनी पन्नासची नोट काढून दिली !! ती दिली नसती तर आज माझा इलाज करता आला असता का ?? "
"होना !! त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत !! थोडा वेळ पडतो !! आणि जातो !! डबा देतो आणि त्यांना सांगून घरी येतो लगेच !! "
शांता काहीच बोलत नाही. होकारार्थी मान हलवते. 

सखा जरा वेळ झोप घेतो. उन्ह डोक्यावर आल्यावर तो पुन्हा कामाला लागतो. दुकानावर त्याला पाहताच आप्पा विचारतात
"काय सखा जाऊन आलास का वैद्यानकडे ??"
"हो आप्पा !! जाऊन आलो !! औषधं दिलंय त्यांनी !! आता बरं वाटतंय तिला !!"
"पण सखा आता तुला काळजी घ्यायला हवी तिची आणि शर्यतीची सुद्धा !! सखा शर्यत दोन दिवसांवर आली आहे !! तुला त्याबद्दल सांगायचं आहे !! साहेब म्हणाले आता सखाला दुसरं कोणतं काम नाही !! फक्त शर्यत !!"
"साहेब म्हणतील तस आप्पा !! बोला मला काय करावं लागेल!!" 
"आधी शर्यत काय आहे ते ऐक !! आपल्या महादेवाच्या मंदिरापासून ते सावंतवाडीच्या महादेवाच्या मंदिरापर्यंत ही शर्यत असेल!! या शर्यतीचा नियम फक्त एकच !! जो जिंकला त्याची सत्ता !! त्यामुळं कोणी शर्यतीत तुझ्यावर वार करेल !! तुझा जीव घेण्याचाही प्रयत्न होईल !! पण त्याला प्रतिकार करत तुला तिथं पोहोचाव लागेल. जर कोणी जास्तच अंगावर आला तर जीव घ्यायलाही मागेपुढे बघू नकोस !!"
"जीव घ्यायचा !??" सखा डोळे विस्फारून बघू लागला.
"होय सखा !! जीव घ्यायलाही !!"
"आणि लोक अस करतात ??"
"होय !! कित्येक लोकांचा जीव गेलाय यात !! पण तरीही ही शर्यत जिंकली पाहिजे म्हणून नवीन लोक उतरतं राहतात पटांगणात !! शेवटी राजाच्या दरबारात मान कोणाला नको वाटेल!! "
"मला जमलं ??"
"का नाही जमणार ?? तुला फक्त पळायचं आहे !! तू नकोस कोणाच्या अंगावर जाऊ !!" आप्पा सखाच्या जवळ जात म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला. त्याला काय बोलावं तेच कळेना. 
"आजपासून तुला एवढच काम आहे सखा !! उद्या ठीक सकाळी दहा वाजता महादेवाच्या मंदिरात भेट शर्यतीची पूर्वतयारी करायची आहे आपल्याला !!"

सखा सगळं ऐकू. घरी जायला निघाला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. शर्यत ती जीवघेणी असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. मग नको म्हणावं का शर्यतीला असाही त्याचा मनात विचार आला. पण मग आपण साहेबांशी नमक हरामी केल्यासारखं होईल. त्यांनी एका क्षणात पन्नास रुपये दिले त्याची तरी जान ठेवावी लागेल. आणि नाही म्हणालो तर ते परत करावे तरी कसे मग !! अशाशा कित्येक विचारांनी सखा वेडावून गेला. 

सांजवेळी सखा पुन्हा घरी आला.

क्रमशः 

✍️योगेश खजानदार

कातरवेळी || kataraveli || कविता || प्रेम ||




सहज लिहावं, नी कविता व्हावी !!
कातरवेळी , जणू ती दिसावी !!
क्षणात माझ्या, मिठीत यावी !!
चारोळी ती, जणू पूर्ण व्हावी !!

सहज पहावं, नी प्रेमात पाडावी !!
सखी नजरेतून, मज का बोलावी !!
माझ्यातील मला, जणू ती मिळावी !!
उगाच का मग, कुठे ती शोधावी ??

हळूवार फुंकर, आठवांची द्यावी !!
जीर्ण पानांची , पानगळती व्हावी !!
कुठे हुरहूर, का उगाच लागावी ??
उरल्या क्षणात, भेट तिची व्हावी !!

सहज हसू ते , ओठांवरती आणावी !!
गालावरच्या खळीने , अजून ती खुलावी!
पाहता एकदा , पुन्हा ती पाहावी !!
सखी नजरेतून , कूठे आज न जावी !!


रातराणी जणू , मज ती भासावी !!
कातरवेळी अलगद, जणू ती बहरावी !!
कळी ती झाडावरची , जणू ती असावी !!
गंध तो पसरावा , तशी ती पसरावी !!

सहज लिहावं, नी कविता व्हावी !!
कातरवेळी , जणू ती दिसावी !!

✍️ योगेश खजानदार

शर्यत || कथा भाग ५ || Sharyat katha bhag 5 ||




कथा भाग ५

सखा भरभर घराकडे निघाला. त्याला कधी एकदा सगळं शांताला सांगेन अस झाल होतं.
"शांता ऐकून खुषच होईल !! साहेबांनी एवढा मोठा विश्वास दाखवला माझ्यावर !!! एकदा शर्यत जिंकलो की मग सगळं काही नीट होईल !! शांता मी दोघं सुखान राहू. चांगलं छप्पर असलेलं घर येईल , सकाळ संध्याकाळ जेवण मिळलं. शांताला गल्लो गल्ली जाऊन कामासाठी भिक मागायची वेळच येणार नाही. सगळं काही चांगलं होईल. " सखा चालत चालत घरासमोर आला.

"शांता !! शांता !! कुठंय तू ??" 
सख्याला शांता कुठच दिसत नव्हती. तो सगळीकडे तिला पाहू लागला. घराच्या मागे समोर तिला शोधू लागला. त्याची नजर तिला सगळीकड शोधत होती.अचानक सख्याला शांता झाडाच्या जवळ पडलेली दिसली. धावतच तो तिच्याकडे गेला. तिचे डोळे मिटलेले होते. सखा तिला उठवू लागला. 
"शांता !! उठ !! उठ शांता !! काय झालंय तुला ?? " 
शांता डोळे उघडतं नव्हती. तिला कसबस उचलत सखा वैद्यांनकडे घेऊन जाऊ लागला. धावत धावत तो वैद्यांच घर पाहू लागला. त्याचा जीव कासावीस झाला. शांताला अश्या अवस्थेत पाहून त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तिला सारखं उठवण्याचा प्रयत्न करतं होता. रखडत रखडत तो वैद्यांच्या घराजवळ आला. समोरच्या अंगणात शांताला ठेवून तो वैद्यांना बोलावू लागला.

"वैद्यबुवा !! वैद्यबुवा !! " 
दोन तीन वेळा हाक मारल्या नंतर वैद्यबुवा खोलीतून बाहेर आले. त्यांना पाहताच सखा त्यांच्या जवळ गेला. त्यांना हात जोडून बोलू लागला.
"वैद्यबुवा माझ्या बायकोला काय झालंय बघा !! ती डोळे उघडतं नाही !! काही बोलत नाही !!"
वैद्यबुवा सख्याला केसांपासून नखापर्यंत नीट पाहतात आणि म्हणतात,
"कुठल्या वस्तीवरून आला ??"
"इथ सुतारवाडीवरून आलोय !!"
"बरं बरं !!पैसे आहेत ना इलाज करायला ??" 
सखा क्षणभर शांत बसला आणि म्हणाला. 
"किती लागतील?? " 
" दहा रुपये लागतील !! आणि दवादारूचे वेगळे !!" 
"दहा रुपये !! एवढे तर नाहीत माझ्याकडे!! " सखा नाराज होऊन म्हणाला. 
"मग कसं रे !! " वैद्यबुवा सख्याकड पाहत म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला 
"बुवा तुमचे पैसे नक्की देतो मी, नाहीतर मला काही काम सांगा ते करून देतो त्याबदल्यात !!"
"अस !! बरं !! जा मग पलिकडच्या विहिरीतून पाणी या कळशित घेऊन ये आणि या हौदात भर !! सगळा हौद भरला की झाले पैसे !!"
"बरं बुवा !! पण आधी माझ्या बायकोला बघा तरी !!!"

बुवा शांताला तपासू लागले , काही औषधे तिला देऊ लागले. सखा शांत सगळे पाहत होता. 

"काय काम करती रे बायको तुझी ??" वैद्यबुवा सखाकडे पाहत म्हणाले.
"पडलं ती काम करती माझी बायको!! कष्टाची आहे खूप !!"
"तेच कष्ट भोवलय तिला !! "
"म्हणजे ??"
"अशक्तपणा आलाय तिला !! त्यामूळे चक्कर येऊन पडली !! औषध दिलंय मी, एका तासात येईल शुद्धीवर !!" 
"लई उपकार झाले बुवा !!" सखा बुवाकडे पाहत म्हणाला.
"उपकार वैगेरे काही नाही !! माझं कामच आहे हे !! आता ती शुद्धीवर येई पर्यंत तू हौद भरून घे !!"
" हो !! लगेच करतो काम !!"

सखा समोर ठेवलेली कळशी घेऊन विहिरकड गेला. भराभर त्या विहिरीतून पाणी उपसू लागला. वैद्यबुवाची बायको घरातून मिश्किल हसत सखाकडे पाहत होती. जणू त्याला त्याच्या गरिबीची जाणीव करून देत होती. सखा राहून राहून बेशुद्ध पडलेल्या शांताकडे पाहत होता. तिच्या विचारात तिला जणू बोलत होता.

"शांता !! माझ्या आयुष्याची जणू ती, श्वास आहे असच मला वाटतं!! तिच्या या अशा बेशुद्ध पडण्यान, मला आज एका क्षणात या निर्दयी जगात एकटं पडल्याची जाणीव होऊन गेली. तिचे ते मिटलेले डोळे मला खूप काही सांगून गेले. तिच्या शिवाय हे जग माझं नाही !!! सखा प्रत्येक कळशी हौदात ओतत असताना त्याला पुन्हा ते पाणी कमी झाल्यासारख वाटत होतं. तो भरत होता पण तरीही ते भरत नाही याची जाणीव त्याला वेळोवेळी होत होती. जणू तो हौद त्याला सांगत होता ,आयुष्याच ही असच आहे सखा, तू कितीही भरण्याचा प्रयत्न केलास तरी तो लवकर भरतं नाहीच !! आणि जेव्हा भरेन तेव्हा सार काही संपलेल असेल!!" सखा खूप वेळ पाणी भरत राहिला. 

थोड्या वेळातच शांताला जाग आली. ती कुतूहलाने सगळीकडे पाहू लागली. समोर बसलेल्या वैद्यबुवांकडे पाहत ती म्हणाली.

"कोण तुम्ही ?? आणि मी इथे कशी ??"
बाई तू बेशुद्ध पडली होतीस तुझ्या घरी !! तुझा नवरा तुला इथे घेऊन आलाय !!"
"कुठे आहेत ते ??" 
"तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!"
शांताला हे कळताच तिला रडू कोसळलं. आपल्या पदराला मुठीत आवळून आपला हुंदका तिने दाबला आणि पटकन उठली, तरातरा चालत ती विहीर जवळ आली.
"कशासाठी एवढी कष्ट ?? मी जगावं म्हणून ना ?? पण तुमच्या जीवाचा तरी विचार करा !!" शांता सखाच्या जवळची कळशी घेत म्हणाली.
"शांता मग करायचं तरी कोणासाठी सांग ना ?? हे शरीर देवाने एवढं टिकवल ते उगाच नाही !! जा बस तिथे माझं झालाच आहे !! " 
" नाही ! मीपण मदत करणार तुम्हाला !!" 
"नाही म्हटलं ना !! जा !!"

शांता भरल्या डोळ्यांनी साखकडे पाहत राहिली. थोड्या वेळात सखा काम पूर्ण करून आला. दोघेही घरी जायला निघाले.
"बाई !! शुद्ध जरी आली तरी लगेच काम करत बसू नको !! जरा आराम कर !! वेळच्या वेळी जेवण कर !! नाहीतर आज नुसती चक्कर आली!! उद्या जीवावर बेतू शकतं बरं !! "  वैद्यबुवा जाता जाता सखा आणि शांताकडे पाहून म्हणाले.

दोघेही तसेच हळू हळू चालत घरी आले.सखा आता शांताची काळजी घेऊ लागला.घरी येताच शांता अंथरुणात पडून राहिली. सखा घरातील सगळी कामं करू लागला. थोड्या वेळाने तिला बरं वाटतंय हे पाहून त्याने साहेबांचा विषय काढला. त्याने जे काही घडलं ते सगळं सांगितलं. 

"हजार रुपये ?? आणि राहायला घ. .ऽऽ. र ??" शांताला बोलता बोलता खोकल्याची उबळ आली. सखा लगेच पाणी घ्यायला धावला. 
पाण्याचा तांब्या तिच्याकडे देत म्हणाला.
"हो तर !! साहेब म्हणाले उद्यापासून ये कामाला!!"
"मग काय ठरवलंय तुम्ही ??"
"ठरवायचं काय त्यात !! शांता मी शर्यतीत धावणार !! आणि जिंकणारच !! बघ तू !! हे घर !! हे फाटके कपडे सगळं काही बदलणार !! खिशात पैसा येणार !! तुला आता कोणाच्या घरची चाकरी करायची वेळ येणार नाही !! दहा रुपयांनसाठी मला कोणाकडे पाणी भरायची वेळ येणार नाही !! आपले दिवस बदलणारं शांता !! आपले दिवस बदलणारं !!" सख्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली. 
"हो बदलतील !! तुम्ही शर्यत जिंकणार हे माहितेय मला !!"  शांता आता दबक्या आवाजात बोलत होती.

दोघेही पोटभर जेवले. खूप वेळ पुढं काय करायचं याची चर्चा करत बसले. भविष्याला वर्तमानात जगत बसले. थोड्या वेळात शांता झोपी गेली. तिला पाहून सख्याला समाधान वाटत होत. तिच्याकडे पाहत तो आपली सगळी कष्ट विसरून गेला होता.

"माझ्यासारख्या दरिद्री माणसा सोबत कसा काय संसार केला असेन हे या शांतालाच माहीत. तिच्याकडे पाहून खरंच मला अभिमान वाटतो.ही गरिबी काही जन्मजात नाही. आपल्याच लोकांनी ज्यावेळी नाती तोडली , तेही रक्ताच्या, तेव्हा मिळालेली ही गरिबी आहे. शांताच माहेर म्हणजे लक्ष्मीचं घर,  लक्ष्मी पाणी भरते म्हणातात ते तिथे जाणवत. पण माझ्यासाठी , माझ्या स्वाभिमानासाठी तिन्ही सगळ्यांची भीक नाकारली. मी एकदाच म्हणालो होतो माझ्या मुलांना , जेव्हा त्यांनी मला घरातून बाहेर काढल तेव्हा , या मनगटात ताकद आहे तोपर्यंत मी स्वाभिमानाने जगेन , ज्या दिवशी ती ताकद संपली तो अंत माझा !! आणि ती तो स्वाभिमान अजूनही सांभाळत आहे ती , पडेल ते काम करेन पण फुकटची एक दमडी घेणार नाही कोणाची!!"

सखा रात्रभर शांताची काळजी घेत राहिला. सकाळ झाली तेव्हा तिला थोड बरं वाटू लागलं. पण अंथरुणातून उठायची काही ताकद तिला येत नव्हती. अशात सखा पटापट आवरून लागला. शांताला काय हवं नको विचारू लागला. त्याला पुन्हा कामावर जायची ओढ लागली होती. 

क्रमशः

✍️योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...