प्रजासत्ताक दिनी...

प्रजासत्ताक दिनी...!!!

   सर्वात प्रथम माझ्या सर्व बांधवांना "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!" प्रजासत्ताक शब्द तसा खूप सोपा वाटतो पण प्रजा म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे अंमल. जिथे लोकांचा अंमल असतो त्याला लोकशाही म्हणातात, आणि अशाच लोकशाहीची घटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारतास लागू झाली. आज गेली ६९ वर्षे अशी ही लोकशाही गुण्यागोविंदाने राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार. त्यांनी लिहिलेली ही घटना साऱ्या भारताने एकमुखाने स्वीकारली.
    लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून केले जायचे. शाळेतील मुलांनी केलेली महिनाभर तयारी त्या एका दिवसासाठी असायची. शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी जमा होऊन" राष्ट्रगीत" म्हणताना छाती अगदी गर्वाने भरून यायची. "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत!!" हे म्हणताना खरंच एक्याची आपुलकीची भावना मनात यायची. विविध कार्यक्रम झाल्या नंतर शाळेतर्फे गोड गोड पदार्थ वाटले जायचे. त्या गोडीची चव आजही मनात तशीच आहे. प्रजासत्ताक दीन म्हणजे साऱ्या भारतीयाची गर्वाची आणि आपुलकीची बाब. खरंच आपला देश विविधतेत एक आहे ते म्हणतात ते यासाठीच.
   आज कित्येक वर्षांनंतर सुधा ती आठवण मनात तशीच आहे. आता कित्येक संकल्पणा बदलल्या आहेत एवढंच. त्यावेळी शाळेत ध्वजवंदन करताना मनात एक गर्व असायचा की मी या भारताचा एक नागरिक आहे आणि आज त्याचा अभिमान वाटतो. प्रांतवार रचना करून सर्व भारतीय एक झाले ते याच प्रजेची सत्ता स्थापन करण्यासाठी. आज भारतात कित्येक भाषा बोलल्या जातात, कित्येक धर्म आहेत, कित्येक जाती ,पोटजाती आहेत, कित्येक संस्कृती आहेत पण हा भारत एक झाला तो स्वतंत्र भारतास प्रगती पथावर नेण्यासाठी. आज भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. स्वतंत्र भारताचे आज जगावर एक वेगळे प्रभुत्व आहे ते याच प्रजेच्या सत्तेमुळे.
  आज स्वतंत्र भारत जो उभा आहे त्यामागे त्याला स्वतंत्र करण्यासाठी झटलेल्या कित्येक क्रांतिवीरांचे योगदान आहे ज्यात स्वातंत्रवीर सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी ,  भगत सिंग , चंद्रशेखर आझाद  आणि कित्येक अशा क्रांतिवीर चे नाव घ्यावे. या सर्वांनी घडवला आजचा भारत. स्वतंत्र भारतात आज आपण कित्येक स्वप्न पाहू शकतो पण यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं आणि ते म्हणजे स्वतंत्र भारत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या सर्वांना अभिवादन.
   ६९ वर्षानंतरही आज जेव्हा भारताची लोकशाही मजबूत आहे हे पाहिलं जात तेव्हा स्वतंत्र भारतास एक योग्य दिशा देणाऱ्या आपल्या थोर पुरुषांचे, विचारवंतांचे कौतुक वाटते. आज भारत जगात आणि अवकाशात ही अग्रेसर आहे ते याच लोकशाहीमुळे. याच लोकशाहीने आपल्याला अब्दुल कलामांन सारखे महान राष्ट्रपती दिले, ज्याचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतात. अटल बिहारी वाजपेयी सारखे कवी मनाचे पंतप्रधान लाभले, ज्याच्या कविता आजही कित्येक लोकांना भुरळ घालतात. आणि हीच मजबूत लोकशाहीची खरी संपत्ती आहे.
  असे असले तरी भारत आजही काही ठिकाणी मागे आहे हे ही मान्य करावेच लागेल, पण सर्वांनी मिळून त्या सर्व उण्या बाजू भरून काढायला हव्यात आणि ते प्रत्येक भारतीयाच आद्य कर्तव्य आहे. आपला भारत कित्येक प्रश्नांशी लढतो आहे. महागाई , आतंकवाद , जातीयवाद  अशा कित्येक गोष्टी आता समुळ नष्ट करून एका नव्या भारताची सुरुवात करण्याची गरज आज प्रत्येक भारतीयाची आहे. एखाद्याची जात पात धर्म पाहताना शाळेत असताना म्हणायचो ती प्रतिज्ञा नेहमी आठवली पाहिजे ,की " सारे भारतीय माझे बांधव आहेत!! "  तरच समता प्रस्थापित होईल. आपण कोण हे सांगताना आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना वाढली पाहिजे. तरिही आज कित्येक धर्माचे जातीचे लोक अगदी सुखाने या लोकशाहीत राहतात आणि हेच खरं यश या प्रजेच्या सत्तेच आहे. भारतीय असल्याची भावना प्रत्येकाने मनात नेहमी ठेवली पाहिजे. कारण हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे नागरिक आहोत.

जय हिंद ...!!

वंदे मातरम् !!!

वंदे मातरम्!!!

वंदे मातरम्!!!

✍योगेश खजानदार
 

रंग प्रेमाचे..!!

   प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी मनापासून बोलावं लागतं. कधी तिच्या कधी आपल्या मनातल आपोआप ओळखावं लागतं. कधी हिरवळ असते मनात तर कधी उजाड आठवणींचा डोंगर आणि त्यात प्रेमासाठी आसुसलेली ती मनातली व्यक्ती. सगळं काही आपलं असतं पण ते मन मात्र कोणाचं तरी झालेलं असतं. सतत ते आपल्याला बोलत असत की त्या व्यक्तीला त्याला पहायचं असत. त्या व्यक्ती समोर व्यक्त व्हायचं असतं. पण कस व्हावं व्यक्त कळतच नसत आणि मनाची घालमेल शांत बसूच देत नसते. कस करावं व्यक्त प्रेम मनातल आणि कस सांगावं त्याला ज्याला हे आवडेल आपले मन. कुठेतरी हा मनाचा गोंधळ प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा असतो ! ती नाही म्हणाली तर काय करायचं आणि मग मनाला कस सावरायचं अश्या असंख्य विचारांचा गोंधळ प्रेमात पडलं की सुरूच होतो.
 
डोळ्यातला तो भाव माझ्या
तुझ्या मनास कळेल का
प्रेम माझे किती तुझ्यावर
तुला न सांगता कळेल का!!

  खरंच ना!! मनातल प्रेम त्या व्यक्तीला न सांगताही कळेल ना!!  मनातली ती सुंदर तिची आठवण पुन्हा तिला बघेन ना! असे मनाचे कित्येक भाव मनाच्या पटलावर तरंगत राहतात आणि आपण फक्त त्यात वाहत राहतो. व्हॅलेंटाईन डेला तिला सांगुनच टाकायचं की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते !! असे ठरवून कित्येक मन त्या दिवशी व्यक्तही होतात. अखेर मनाला जे हवं ते तेच करत राहत. आपल्या आवडत्या व्यक्तीला हवं ते द्यायचं अस मन म्हणत असतं, पण मन फक्त प्रेम मागत असतं. अगदी प्रेम व्यक्त करताना त्या व्यक्तीला आपलं मन कळण खूप गरजेचं असतं. मग ते प्रेम कसे ही व्यक्त केले तरी. प्रेमाला ना पैसा लागतो ना प्रेमाला मोठी गिफ्ट त्याला फक्त प्रेम हवं असतं. ते मनापासून सुरु होत आणि मनापाशी जावून थांबतं.

नको मला कोणते वचन
फक्त तुझी सोबत हवी
तुझ्या असण्याची जाणीव
फक्त मनास देत राहावी

  ती जाणीव त्या मनाला आपलंसं करते. कधी सोबत मागते आणि कधी एकाकी आठवणीत रडते.  अश्या या मनाला कस व्यक्त करावं . कारण त्याला फक्त ती व्यक्ती हवी असते. हळुवार झुळूक यावी आणि तिची सोबत असावी. प्रेम मनात असले तरी, ती सतत समोर असावी. ती प्रत्येक झुळूक आपल्याला बोलावी आणि आपण मनातली गोष्ट तिला सांगावी. अगदी सूर्यास्त होताना, तिला समुद्र किनारी त्या लाटांच्या आवाजात आपलं मन मोकळं कराव आणि तिने मंद हसून ती संध्याकाळ गोड करावी. बाकी काय हवं या मनाला! असे कित्येक विचार आणि कल्पना फक्त त्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी. फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी.
   हो ना? फक्त व्यक्त करण्यासाठी!!  माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे शब्दात सांगण्यासाठी. अगदी मनापासून बोलण्यासाठी. ही मनाची धडपड फक्त त्या व्यक्तीला आपलं करण्यासाठीच. कधी समोर ती येताच नजरेतून तिला पाहण्यासाठीच. कधी नुसती ऐकून घेण्यासाठी, तर कधी मनसोक्त बोलण्यासाठी. ही धडपड मनाची फक्त त्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी. त्या वाटेवर चालताना सोबत हवी फक्त तिची आणि त्या मनाला आपलंसं करण्याची ओढ. खरंच किती सुंदर आहे ना मनातली ती भावना! क्षणाक्षणाला प्रेम करताना फक्त नजरेतून भरून घ्यायचं, अल्लड होऊन राहायचं. आपलंसं अस कोणी आहे ही भावना मनाला अजुन आनंद देते आणि ती व्यक्ती आपली झाल्यावर तिच्यासाठी काहीही करायला तयार होते. कधी तिला पाहायला तळमळत असते, कधी आपलंसं करायला धडपडत असते, हे मन फक्त प्रेम करत असते.

नाजुक या नात्याची सुरुवात
मनाच्या एका कोपऱ्यात होते
आपण आपले असलो तरी
ते मन मात्र दुसऱ्याचे होते

  प्रेम !! खरंच खूप छान असतं. प्रेमात पडलं की माणसाला दुसरं काही सुचत नसतं. प्रेमाला वय नसतं ना प्रेमाला जात नसते, प्रेमाला धर्म नसतो ना प्रेमाला नाव नसते, प्रेम फक्त प्रेम असते, हळू हळू सुरू झालेल्या या भावनांचा खेळ पुढे आयुष्य व्यापून टाकतो आणि उरते अखेर पर्यंत प्रेम. आपण त्याचा तिरस्कार करू शकत नाही ना आपण त्याला विसरू शकत नाही. फक्त व्यक्त करू शकतो, कधी शब्दाने तर कधी कृतीने.
कधी नजरेने तर कधी स्पर्शाने. प्रेम खरंच प्रेम राहते. आयुष्याची संध्याकाळ होताना ती माझ्या सोबत हवी जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. नकोच मला बाकी काही!! अखेरचा श्वास तिच्या नावावर करायचा आहे !! एवढंच हवं या मनाला. कारण, आपण पुढे सोबत नसलो तरी ते प्रेम तसच राहतं, आठवणीत , नजरेच्या कडांमधे आणि आपल्या शब्दांमधे ते तसंच राहतं, शेवटी प्रेम तरी काय म्हणत,

साऱ्या श्र्वासांचे हे ओझे
मी फक्त तुझ्यासाठी पेलले
अखेरचा ही श्वास मी
तुझ्यासाठीच खर्ची केला

आयुष्य जगलो मी फक्त ज्या व्यक्ती वर प्रेम केलं तिच्यासाठी. अगदी अखेरचा श्वास हि मी तिच्यासाठीच दिला, अस प्रेम आयुष्यभर सोबत हवं . कधी अबोल होऊन रहावं, कधी हळूच येऊन हसावं , कधी उगाच रुसून बसावं, तर कधी अचानक घट्ट मिठीत यावं, पण हे प्रेम सतत सोबत असाव. अगदी वयाच्या संध्याकाळी ही त्याने ते सतत व्यक्त व्हावं. कारण प्रेम कधीच म्हातारं होतं नाही, ते तरुणच राहतं . अगदी मनात मनाच्या कोपऱ्यात ते सतत अजून प्रेम करत राहत. कधी ती व्यक्ती क्षणभर ही दुरावली तर तिच्या विरहात राहत, तिला जवळ करण्यास धडपडत राहत, पण हे मन प्रेम करत राहतं. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ते सांगणं खूप गरजेचं असतं. मनाला व्यक्त व्हावं लागतं त्याच्या समोर ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
  अखेर आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती ही आपल्यावर प्रेम करावी अस काहीच नसतं. आपण फक्त प्रेम करायचं असतं. कारण प्रेमात कोणतं बंधन नसतं. प्रेम ही फक्त द्यायची गोष्ट असते, आणि प्रेम आपण करुत तसे ते आपल्यालाही मिळतच असते. प्रेमात वेळ द्यावा लागतो, समोरच्याला ही आपलं अस कोणी आहे हे जाणवू द्यावं लागतं. त्यामुळे ती व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत नसेल तर आपण लगेच नाराज नसतं होऊन जायचं. कारण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करायला अजुन तेवढी अशी तयार नसते. आपण फक्त प्रेम करायचं. शब्दातून , आपल्या वागण्यातून , आपल्या मनातून फक्त प्रेम करायचं. पण प्रेम व्यक्त मात्र नक्की करायचं , मनात नाही ठेवायचं.

कसे हे भाव प्रेमाचे
मनास काही कळले का
किती हे प्रेम माझे तरी
तिला ते कधी कळेल का?

   अश्या अनेक छटा प्रेमाच्या किती आणि कशा सांगाव्या . प्रेम ही संकल्पना समजून नाही तर अनुभवातून कळते. अगदी वयाच्या ६० वर्षातही एक प्रेमी जोडपे व्हॅलेंटाईन डेला न चुकता आपले प्रेम व्यक्त करते. अगदी क्षणाक्षणाला व्यक्त करते. हे प्रेम खरंच किती सुंदर असते...  हो ना???.

नाजुक नात्यांची अलगद सुरुवात
मनातून मनापाशी जावून मिळावी
घट्ट व्हावी ती नाती प्रेमाची
अखेरच्या क्षणी ही ती अतूट राहावी ...

  प्रेम शेवटपर्यंत कायम तसेच रहावें. कितीही रुसवे फुगवे असले तरी साथ तशीच हवी.  आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ती सतत जाणवावी. कारणं प्रेम कितीही केलं तरी शेवटी ते कमीच असतं. पण व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. पण व्यक्त करणं म्हणजे तरी काय नक्की हेही कळायला हवं. प्रेमात आपल्या प्रियकराचा स्वभाव लक्षात घ्यायला हवा. कधी एकांत हवा असतो तर कधी सोबत. प्रेमात आपण समोरच्याला समजून घेणं गरजेचं असतं. कधी कधी प्रेम कवितेतून व्यक्त होत तर कधी प्रेम अबोल राहूनही व्यक्त होत. प्रेमाच्या या रंगाला समजून घेतलं पाहिजे. तिच्या मनातल आपल्याला न बोलताही समजल पाहिजे. अगदी डोळ्यातील अश्रूही प्रेमात खुप काही बोलतात. तर कधी हसण्या मागचे प्रेमही कळायला हवे. शेवटी प्रेमात दोघांनाही एकमेकांच्या मनाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. ती रागावली तर याने रुसवा काढायला हवा. ती कधी उदास असेन तर याने तिला आनंदी करायला हवं. ती कधी आनंदी असेन तर मनातल सगळ दुःख विसरून तिच्या सोबत मनसोक्त हसायला हवं. शेवटी प्रेम हे समजून घेण्यातच असतं.

कधी रुसवा कधी गोडवा
प्रेमाचे हे कित्येक रंग
कधी अश्रू कधी हसू
मनात असतात कित्येक तरंग

  अशा या प्रेमाच्या दुनियेत सगळ्यांनी अगदी हरवू जावं . आपल्या आवडत्या व्यक्तीला मनसोक्त प्रेम द्यावं . क्षणाक्षणाला हे प्रेम वाढतच जावं. आणि प्रेमाच्या कित्येक रंगात न्हाऊन जावं. सोबतीस असावी ती कविता जी फक्त तिच्यासाठीच लिहावी. प्रत्येक शब्दावर फक्त तिचीच आठवण असावी. आणि चिंब पावसात भिजणारी एक ती गोड सोबत असावी, अगदी कायमची.
✍योगेश खजानदार

पांथस्थ

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची
त्या सावलीतला मी एक पांथस्थ
हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी
पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज

कधी भेटे कोणी ,कधी मी हरवूनी
माणसातला मी उरतो इथे फक्त
वेगळे वेष दिसूनी, वेगळी भाषा बोलूनी
आठवणींचा पसारा राहतो आहे एक

कित्येक पावले चालूनी, एकांती स्वतः स भेटूनी
रात्रितल्या चांदण्या ओळखतात मला फक्त
थकतात पावले दोन्ही, डोळ्यात आहे पाणी
मागे वळून पाहताना होतात मग ते व्यक्त

खचते मन जेव्हा, पावले अबोल राहतात तेव्हा
पुढच्या वाटेस दोष देत, भांडतात तेव्हा ते शब्द
तरी चालतं जाताना, नव्या वाटेस भेटताना
विसरून जाते मन लगेच ते सारे दुःख

हा प्रवास माझा असा, सांगावा तरी कसा
वाटा बोलतात आणि मी ऐकतो त्यास फक्त
जणू चालत राहावे , अनुभव घेत राहावे
कारण, त्या सावलितला मी एक पांथस्थ
✍ योगेश खजानदार


मकर संक्रांत


आपलं नात छान असावं
तिळगुळा सारखं गोड असावं
रुसव्याला तिथे स्थान नसावं
आनंदाचं इथे घर असावं

आपलं नात अबोल नसावं
गुळात मिळालेला गोडवा असावं
तिळगुळ खाऊन मस्त असावं
फक्त गोड शब्दांचे मोती असावं

आपलं नात एक आठवण असावं
ओठांवरच हास्य असावं
अतूट एक बंधन असावं
कधीही न विसरण्या चे वचन असावं

-योगेश खजानदार

अबोल राहून...!!

अबोल राहून खूप काही बोलताना
तिच्याकडे फक्त बघतच रहावं
तिच्या प्रत्येक नखऱ्याला
डोळ्यात फक्त साठवून घ्यावं

नसावी कसली भीती तिला
तिच्यासारखं आपणही बिंदास रहावं
अल्लड प्रेमाची भावना समजून घेताना
उगाच आपणही हरवून जावं

ओढ असावी ही मनात तिच्या
तिने ते नजरेत बोलून दाखवावं
मी मात्र उगाच शोधताना
मनात माझ्या तिला पहावं

असे हे नाते मनाचे
नेहमीच नव्याने तिने फुलवाव
कधी हसू कधी रडु
पण सतत माझ्या सोबत रहाव

कितीदा भेटाव तिला तरी
पुन्हा पुन्हा त्या वाटेवर जावं
तिच्या येण्याकडे तेव्हा
नजर लावून पहात रहाव




शोधायचं आहे मला...!!!

शोधायचं आहे आज
माझेच एकदा मला
कधी कोणत्या वळणावर
भेटायचं आहे मला

कधी अनोळखी होऊन
विचारायचं आहे मला
कधी हरवलेल्या विचारात
पहायचं आहे मला

नसेल चिंता कशाची
मुक्त फिरायच आहे मला
बांधलेल्या हातास आता
सोडायचं आहे मला

आपल्यात आपण, सगळ्यात सगळे
अस्तित्व पाहायचे आहे मला
वेगळं होऊन या दुनियेत
जगायचं आहे मला

मी ,माझा , माझ्यात मीच
कोण आहे बघायचं आहे मला
कधी स्वतःस भेटून एकदा
विचारायचं आहे मला

उधळून, फेकून, जाळून ही
ही लखतर फेकायची आहेत मला
माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला

हो !!माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला !!!
✍योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...