क्षणिक या फुलास || Marathi Motivational Kavita ||


क्षणिक यावे या जगात आपण,
क्षणात सारे सोडून जावे !!
फुलास कोणी पुसे आता,
क्षणिक बहरून कसे जगावे !!

न पाहता वाट पुढची कोणती,
क्षणाक्षणास गंध उधळीत जावे !!
कोणी ठेविले मस्तकी उगाच अन,
कोणी पायी त्यास तुडवून जावे !!

कधी प्रेमाचे बंध जोडून येता,
त्यासवे प्रणयात हरवून जावे !!
कधी मग अखेरच्या प्रवासातही,
निर्जीव देहाचे सोबती व्हावे !!

कोणी बोलता मनातले खूप काही,
आठवणीत त्याच्या चुरगळून जावे !!
फूलास न मग पुसले कोणी,
वेदनेतही सुगंध कसे देत रहावे !!

अखेरच्या क्षणात राहिले जरी काही,
आयुष्याशी कोणते वैर नसावे !!
सुकल्या पाकळ्यावरती मग तेव्हा,
आपल्या जाण्याचे ओझे नसावे !!

राहता राहिले इथे न काही,
क्षणाक्षणाला आयुष्य जगत रहावे !!
फुलास विचारून बघ तु एकदा,
क्षणिक बहरून कसे जगावे !!

✍️योगेश खजानदार

नववर्षाच्या उंबरठ्यावर || NEW YEAR || Marathi Lekh ||

पाहता पाहता २०१८ वर्ष संपत आले. दिवस सरत जातात मग त्यात नवीन ते काय, असेही वाटू लागले. पण येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी गतवर्षीच्या काही गोष्टी सोबत घेऊनच या नवर्षात पदार्पण करावं लागत हेही सांगु लागले. नववर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे एवढेच जर असते, तर त्याचे एवढे कुतूहल वाटले नसते. पण येत्या वर्षात सोबत कित्येक नवनवीन गोष्टी येतात त्याच कुतूहल असतं. खरतर आयुष्य जगताना आपण विसरून जातो काळ, वेळ आणि बरंचं काही. पण हे लक्षात येतं ते या नववर्षाच्या पूर्वसंध्येला. म्हटलं तर विशेष अस काही घडत नाही. सरत्या वर्षाला निरोप देण्यातही काही अर्थ नाही असही काही लोक म्हणतील, मग येत्या वर्षाच ते कौतुक काय ?? होना !! पण असो, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येत्या वर्षाचा फक्त रात्रीच्या मद्यधुंद पार्टी करण्यासाठीच उपयोग आहे असाही समज चुकीचा ठरतो. गतवर्षीच्या मध्यरात्री जागून पार्टी करणे  हा आपणच नववर्ष साजरे करण्याचा केलेला विकृतपणा आहे. पण यापलीकडे जाऊन या नववर्षाच्या स्वागता करिता काही विचारही आपण करायला हवे असे वाटते. गतवर्षीच्या तुलनेत येत्या वर्षाचा संकल्प तेवढाच चांगला असावा हीच अपेक्षा.







१.गतवर्षीच्या आठवणी.

सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे.  कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता येतील अशा असतात. त्यातील गोडवा पुन्हा एकदा नक्की पहावा . यामुळे येत्या वर्षात आपल्या सोबत एक नवी उमेद , एक नवी आशा भेटेल. त्यातूनच नवीन काही शिकावं आणि येत्या वर्षात वाईट गोष्टीची पुनरावृत्ती टाळावी हे उत्तम.

२. झालेले बदल.

सरत्या वर्षात अश्या काही गोष्टी घडून जातात, की त्याचा प्रभाव आपल्या जीवनशैली मध्ये दिसतो. अशा गोष्टींचा, घटनांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. अशा गोष्टींमुळे येणाऱ्या परिस्तिथीला सामोरे जाण्याची तयारी आपल्याला करता येते. वाईट असो किंवा चांगले, बदल हे नक्कीच आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरत्या वर्षाचा अभ्यास करताना या गोष्टींचाही विचार नक्की करावा.

३.अपूर्ण गोष्टी.

सरत्या वर्षात केलेले संकल्प खरंच आपण पूर्ण केले आहेत का? याचा विचार एकदा नक्की करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. नक्की आपण हे संकल्प , ध्येय गतवर्षात कितपत पूर्ण करू शकलो याचा अंदाजही आपल्याला होतो. आपले मार्ग आपण नीट समजून घेत आहोत का ?? याचाही अंदाज आपल्याला होतो. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला काय करायचं याचा आराखडा तयार करता येतो.

४.गतवर्षीच्या कामाचा आलेख.

दरवर्षी आपण करत असलेल्या कामाचा एक आलेख पाहायला हवा. त्यात नक्की आपण आपल्या कामात यशस्वी होतो आहोत की आपला आलेख उतरता आहे हे कळतं. त्याप्रमाणे आपण केलेल्या कामाचा एक आलेख पाहण्याचा प्रयत्न नक्कीच नववर्षाच्या पूर्वसंध्येला करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्या समोर किती आवाहन आहेत हे कळत. काही पूर्ण झालेल्या गोष्टींचा आनंदही होतो. तर राहून गेलेल्या गोष्टींचा येत्या वर्षात पुन्हा एक संकल्प केला जातो. नक्कीच जाणारे वर्ष हे नुसते सेकंदाला पाहत बसणे एवढेच नसते हे मात्र खरे. त्यामुळे गतवर्षीच्या कामाचा आलेख करणही खूप महत्त्वाचे असते.

५.वाईट अनुभव.

प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात. गतवर्षीच्या वाईट आठवणी, अनुभव हे त्याचं वर्षात सोडून द्यावे हेच उत्तम. येत्या वर्षात त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात होता कामा नये. येत्या वर्षात नवीन संकल्पातून पुढे जात राहायचे. काही नाती अबोल होतात त्यांना पुन्हा आपलेसे करायचे. काही वाईट अनुभव गतवर्षात सोडून द्यायचे. कारण येत्या वर्षाला आनंदाने जवळ करायचे.

६.संकल्प.

नवीन वर्ष म्हटले की नवनवीन संकल्प करण्याची जणू प्रथाच पडली आहे. खरंतर या खूप छान गोष्टी आहेत. कोणी रोज व्यायाम करण्याचे संकल्प करतात, कोणी दारू , सिगारेट सोडण्याचे संकल्प करतात, कोणी नवीन घर घेण्याचे. असे कित्येक संकल्प लोक करतात. चांगल्या गोष्टी या अशातूनच सुरू होतात. त्यांना फक्त एक कारण हवं असतं. संकल्प करणे यातूनच आपले आपल्या ध्येयावर कीती प्रेम आहे हे कळते. ठीक आहे काही संकल्प पूर्ण होतही नाहीत, पण त्याची सुरुवात तरी झाली यातच आनंद असतो. संकल्प मोडला तरी तो पुन्हा करायचा, यातूनच आपल्याला जे साध्य करायचे आहे ते होते. त्यामुळे येत्या वर्षात एकतरी चांगला संकल्प करायलाच हवा.

७. नववर्षाचे ध्येय.

सरत्या वर्षात काही गोष्टी राहून गेल्या पण त्या पूर्ण नक्की करायच्या या ध्येयाने प्रेरित होऊन नववर्षात पदार्पण करायला हवं. येत्या वर्षात आपल्या समोर कित्येक ध्येय असावी. नवनवीन संकल्प करताना आपण आपल्या डोळ्या समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करतो आहोत ना याचा विचार करायला हवा. येत्या वर्षात पूर्वीच्या चुका टाळायला हव्या. मागच्या वर्षाचा आलेख डोळ्यासमोर ठेवून नव्याने ध्येयपूर्तीसाठी नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे.

८. positive energy.

सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही शिकायला मिळाले आणि त्यातून सकारात्मक शक्ती मिळाली या एका विचाराने, पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी. आयुष्य सरत जात. त्यात हे असे क्षण पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सकारात्मक शक्ती घेऊन येणाऱ्या या काळास सामोर जायला हवं आणि यातूनच येणारे प्रत्येक नवीन वर्ष आपल्यास अजुन चांगली उमेद, चांगले संकल्प, ध्येय घेऊन येतात.

  त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा गंभीर विचार करत बसण्यापेक्षा अगदी हलके जरी गतवर्षाकडे पाहिले तरी नववर्षाचे ध्येय आपल्याला मिळून जातात. अगदी कित्येक तास विचार करायला हवा असही काही नाही. फक्त आपण मागच्या वर्षी जे काम केलं त्याहूनही अधिक जोमाने येत्या वर्षात करू या संकल्पातुनच नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे .. कारण वर्ष सरत जातात पण जात नाहीत त्या आठवणी...त्यामुळे येत्या वर्षाचे स्वागत अगदी जोरात करायला हवे .. पण मद्यधुंद होऊन नाही तर .. ध्येय समोर ठेवून .. !!!

✍🏼 योगेश खजानदार

सांग सांग सखे जराशी || मनातल्या कविता ||







सांग सांग गार वारा, उगाच तुला छळतो का ??
रित्या रित्या तुझ्या मिठीस, माझी आठवण देतो का ??

बघ बघ ते अभाळ, तुझ्यासाठी बरसेल का ??
माझ्या आठवणींचा पाऊस जरा, तुझ्यासाठी आणेल का ??

नाही नाही म्हणता म्हणता, ती वाट तुझ बोलेल का ??
माझ्या गावास येण्यासाठी, सोबत तुझी करेल का ??

थांब थांब सखे जराशी, काही तरी विसरतेस का ??
प्रेम आहे तुझे माझ्यावर, खरचं तू म्हणतेस का ??

खरं खरं सांगता सांगता, हलकेच तू हसतेस का ??
मनातल्या भावना कळताच, अलगद तू लाजतेस का ??

कुठे कुठे पाहता आता, ते गंध सर्वत्र पसरले का ??
तुझ्या मनात प्रेमाचे हे फुलं, खरंच बहरले का ??

नको नको वाटते जरी ते, हृदय ऐकत नाही का ??
तुझ्या मनात नाव माझे , सतत लिहिले जाते का ??

एका एका क्षणात आता, मीच मी उरलो का ??
माझ्याविना क्षणांची तुझ,  भिती आता वाटते का ??

सांग सांग गार वारा , उगाच तुला छळतो का  ??

✍️©योगेश खजानदार

अल्लड ते हसू ..!!😊

अल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्षणभर जरा नी
ओठांवरती जणू विरले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा तुझ्यात हरवून बसले

बोलले त्या नजरेस काही
मनात ते साठवून ठेवले
येणाऱ्या शब्दासही उगाच
आपलेसे करून घेतले
गंधाळलेल्या त्या फुलासही
उगाच भांडत बसले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा नव्याने बहरताना दिसले

कधी त्या चांदणी सवे
चंद्रास सतावताना भासले
सांजवेळी बुडणाऱ्या सूर्यास
पाहणारे जणू मज वाटले
मंद ते उनाड वारे जणू
वाटेवरती त्यास भेटले
गालातल्या खळीस पाहून का
पुन्हा नव्याने प्रेमात पडले

अल्लड ते तुझे हसू मला का
नव्याने पुन्हा भेटले ...!!!

✍️©योगेश खजानदार

सांग सखे ...🤔

मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही

उरल्या या मिठीत माझ्या प्रेमाचा जणू गंध
तुझ्या श्वासात तू कधी ओळखलाच का नाही
भेटीस ती ओढ जणू छळतात ते पंख
त्यास तू कधी मुक्त जणू केलेच का नाही

सांग तू आता सांगू तरी काय आता
रित्या त्या मार्गावर तू दिसलीच का नाही
भेटली एक झुळूक बोलली मझ कित्येक
तुझ्या स्वप्नातले गाव तेव्हा भेटले का नाही

बरसल्या बेफाम पावसाच्या सरी अनेक
चिंब तुला पाहून अश्रुसवे बोलल्या का नाही
रंगवून कित्येक रंग आकाशातले ते इंद्रधनुष्य
तुझ्या नी माझ्या प्रेमाचे चित्र काढले का नाही

हात हातात घेऊन हळुवार ते डोळे भरून
अलगद ते तुझ पाहताना दिसलेच का नाही
माझे मलाच शोधताना उगा आरशात पाहताना
शोधूनही मला तेव्हा मी भेटलोच का नाही

सांग सखे एकदा ,

मनातले तुला कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही ...!!!

✍️©योगेश खजानदार




नेतृत्व कसे असावे..✍️

     तुमचे विचार, तुमची वागण्याची पद्धत हे तुमचं नेतृत्व कोण करत यावर ठरतं, आणि त्यामुळेच आयुष्यात प्रत्येकाला योग्य नेतृत्वाची गरज असते याला काहीच दुमत नाही. तुमच्या वाचनातून , तुमच्या शिक्षणातून , तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात कित्येक संस्कार तुमच्यावर होतात आणि अशाच संस्कारात आपलं नेतृत्व कस असावं हे ठरत. पण याला कोणी रोखू शकत नाही कारण ते परिस्थितीतून निर्माण होत. आणि कधी कधी चुकीचं नेतृत्व आपल्याला खूप वाईट अनुभव देऊन जात. त्यामुळेच कधी आपला नेता , आपला आदर्श, आपले मार्ग आणि त्या मार्गावर आपले साथ देणारे किंवा नेतृत्व करणारे कसे असावे याचा नेहमी खूप विचार करणं गरजेचं असतं. अगदी आवडते , सुंदर वाटणारे नेतृत्व आपल्याला चुकीच्या मार्गाने तर नाहीना घेऊन जात याचा गंभीर विचार करूनच पाऊलें टाकायला हवी. नाहीतर असे नेतृत्व करणारा स्वतःही संपतो आणि आपल्याला ही संपवतो. या सर्वांच्या मुळाशी खरतर एकचं गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमचे विचार, कारण हे विचारच आपल्याला नेतृत्वाच्या मागे खेचण्याच काम करतात. मान्य आहे कधी कधी पर्याय नसतानाही चुकीच्या नेतृत्वाची साथ मिळते पण त्यामुळे आपल्या विचारांना तिलांजली देणे म्हणजे त्या नेतृत्वाला स्वीकारणं असेच होतं. अशा नेतृत्वाला कित्येक गुण असावेत ज्याने चांगल्या विचारांचा मार्ग तयार होतो. अशा नेतृत्वाला कोणते विचार , गुण, ताकद असायला हवी याचा थोडा विचार करूयात..

१. योग्य दिशादर्शक नेतृत्व.

नेतृत्व म्हटलं की एक दिशा ठरवली जाते. त्या मार्गावर कस जायचं याचा संपूर्ण निर्णय नेतृत्व कोण करत यावर ठरवला जातो. त्यामुळे अशा वेळी आपला दिशादर्शक किंवा आपला नेता ज्याच्याकडे त्या मार्गावर जायचा पूर्ण विचार असतो. येणाऱ्या परिस्तिथीला कस समोर जायचं याचा विचार असतो. अशा योग्य नेत्याची निवड करणे यालाच म्हणायचं योग्य दिशादर्शक नेतृत्व. ज्याला आपण आपल्या गटाचा मुखिया किंवा नेता म्हणतो त्याचा हा विचार संपूर्ण स्पष्ट असायला हवा. ज्यामुळे त्याच्या सोबत येणारे सर्व योग्य मार्गावर चालतील.

२.अभ्यासू नेतृत्व.

तुम्ही ज्याला आदर्श मानता किंवा जो तुमचे नेतृत्व करतो असा माणूस तितकाच अभ्यासू असणं खूप गरजेचं असतं. अशा नेतृत्वाला आपण अभ्यासू नेतृत्व म्हणतो. अशा नेतृत्वामुळे आपल्यावर त्याच्या विचारांचा प्रभाव पडतो आणि आपणही तसाचं विचार करायला लागतो. अभ्यासू नेतृत्व कधीही त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांना मागास किंवा अज्ञानी राहू देत नाही आपल्या सोबत घेऊन जाणं त्याच्या समस्या त्याचे दुःख आपलंसं करणं हे अशा नेतृत्वाला सांगायची गरज पडत नाही. तसेच असे नेतृत्व आपल्याला येणाऱ्या परिस्तिथीला अभ्यासपूर्वक समोर जायला शिकवते.

३.विश्वासू नेतृत्व.

आपल्या विचारांचं किंवा आपल्या संघटनेच नेतृत्व करणारा नेता हा विश्वासू असायला हवा यात काहीच शंका नाही. आपण कोणतीही गोष्ट त्याच्यासमोर अगदी कोणताही संकोच न बाळगता बोलता आली पाहिजे अशा नेतृत्वाला विश्वासू नेतृत्व म्हणायला हवं. आपण त्याच्या निर्णयात अगदी कोणताही वाद किंवा भिती न बाळगता विश्वास ठेवायला हवा असे वाटणे म्हणजेच असे नेतृत्व हे विश्वासू असते. असा विश्वास त्या नेत्यावर सर्वांचा असायला हवा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण ज्याला आदर्श मानतो ज्याच्या विचारांचं आपण पालन करतो अशा व्यक्तीच्याही विचारांवर आपला तितकाच विश्वास असायला हवा. तरच ते नेतृत्व उपयोगी ठरेल.

४. चारित्र्यसंपन्न नेतृत्व.

आपला नेता चारित्र्य संपन्न आहे की नाही यावर आपलेही याबद्दलचे विचार ठरतात असे म्हणायला काहीच हरकत नाही. चारित्र्य चांगले असणे खूप महत्त्वाचे असते कारण त्यावरून त्या नेत्याची आपल्या नेतृत्वा बद्दलची योग्यता ठरवली जाते. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी आपण करतो आहोत का? किंवा केल्या आहेत का? की ज्याचा परिणाम आपल्या विचारांवर चालणाऱ्या लोकांवर होईल. याचा विचार नेतृत्व करणाऱ्यांनी करायला हवा हे मात्र नक्की. आणि आपला आदर्श असणारे नेते अशा चारित्र्य संपन्न नेतृत्वात बसतात का याचा त्यांचे विचार पाळणाऱ्यानी ही करावा.

५.संघटित करणारे नेतृत्व.

समाज हा वेगवेगळ्या विचारधारेत चालणारा आहे, पण त्या सर्वांना संघटित करून सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाला संघटित नेतृत्व म्हणावं लागेल. हल्लीच्या काळात अशे नेतृत्व मिळणं खूप महत्त्वाचं आहे , कारण कित्येक लोक  जाती ,धर्म , पंत अश्या कित्येक गोष्टीत विभागून गेले आहेत. अशा लोकांना एका विचारधारेत आणण्याची गरज आता आहे. आणि अश्या नेतृत्वाचा अभाव जाणवतो आहे.त्यामुळे आपण आपला आदर्श , आपल्या विचारधारेचा मार्ग निवडताना असा नेता , नेतृत्व निवडायला हवा की ज्याला अशा वेगवेगळ्या विचारधारेला एकत्रित करण्याची ताकद आहे.

६. निर्णयक्षम नेतृत्व.

कधी कुठे कोणती परिस्थिती येईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. पण त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाणे यालाच म्हणायचं निर्णयक्षम नेतृत्व. अशा निर्णयामुळे आपल्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांवर परिणाम होतो. निर्णय अशी गोष्ट आहे की ज्याचा परिणाम वाईट किंवा चांगला या प्रकारात सांगता येईल. पण निर्णय घेणारा कसा आहे त्याच्यावर हे सारं अवलंबून असतं हे मात्र खरं. त्यामुळे आपण एखाद्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतो का ?? या एका प्रश्नाच्या उत्तरात या नेतृत्वाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण जे विचार स्वीकारतो , ज्याला आदर्श मानतो अशा गोष्टींमुळे होणाऱ्या बदलात , बदलणाऱ्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवायला हवी.

७.निडर नेतृत्व.

नेतृत्व करणं हे इतकं सोप्पं नसतं. मग ते कोणत्याही बाबतीत असो. त्यामुळे कित्येक आपल्या सोबत चालणारे , आपल्या विचारांवर चालणारे , आपल्या निर्णयावर चालणारे याच्यावर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना अगदी निडर होऊन निर्णय घेणारा नेताच खंबीर नेतृत्व करू शकतो. अशा नेतृत्वाला क्षणात परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची ताकद असायला हवी. ज्याच्या प्रभाव होणाऱ्या बदलात भेटतो. आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य याचाही विचार व्हायला हवा. घेतलेल्या एका निर्णयावर पुन्हा माघार नाही अशाच नेतृत्वाला साहजिक कित्येक लोक साथ देतात. अशा लोकांचे विचारही आत्मसात केले जातात. त्यामुळे नेतृत्व निडर असायलाच हवं.

८.प्रभावी नेतृत्व.

आपल्या नेतृत्वाखाली, कित्येक आपले विचार लोक आत्मसात करत असतात याचा कदाचित खूप कमी लोक विचार करतात. पण आपण ज्याच्या विचारांवर चालतो त्याचा प्रभाव नक्कीचं सर्वांवर असायला हवा. नाहीतर संघटना मध्ये विचारांची दुफळी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आपले विचार प्रभावीपणे मांडायची ताकद नेतृत्वात असायला हवी. अशा प्रभावी नेतृत्वाखाली लोक नक्कीचं खूप प्रगती करतात हे मात्र नक्की.

९.कार्यक्षम नेतृत्व.

नेतृत्व म्हटलं की जबाबदारीच काम आलेच. अशावेळी कार्यक्षम असणं खूप गरजेचं असतं. कारण नेतृत्व करणाऱ्या लोकांमुळे इतर लोक प्रभावित होतात आणि त्याच्या सारखे वागायला जातात. यालाच कदाचित विचारांचा प्रभाव म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नेतृत्व करणारा नेता हा कधीही कार्यक्षम आणि उत्तम कार्य करणारा असावा. कोणतीही जबाबदारी क्षणात स्वीकारणार असायला हवा. त्यामुळं अशा नेतृत्वाला कार्यक्षम नेतृत्व म्हणतात. ज्याचा परिणाम आपले विचार , आपल्याला आदर्श मानणाऱ्या लोकांवर होतो. कारण असे लोक आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी नेतृत्व जर उत्तम कार्य करणारे असेल तर त्याचे सोबती नक्कीच उत्तम कार्य करतील यात काहीच शंका नाही.

१०.सकारात्मक नेतृत्व.

सकारात्मक या एका शब्दातच नेतृत्व कस असावं हे कळून येत. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या व्यक्ती कश्या असाव्यात तर त्या नेहमी सकारात्मक विचार मांडणाऱ्या असाव्यात आणि अशा नेतृत्वाला सकारात्मक नेतृत्व म्हणाला हवे. अशा नेतृत्वामुळे आपल्या विचारांणाही एक सकारात्मक पाहण्याची सवय होते. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाताना सकारात्मक विचार मांडणाऱ्या आपल्या नेत्यांमुळे आपले निम्मे काम तिथेच पूर्ण होते यात काहीच शंका नाही. आणि आपण चालत असलेल्या मार्गावरही एक वेगळीच ऊर्जा मिळते हे वेगळं सांगायची गरज पडत नाही ते आपण आपल्या विचारातून , कामातून दाखवून देतो हे मात्र नक्की. त्यामुळे नेतृत्व नेहमी सकारात्मक असायलाच हवं.

    अशा काही मुद्द्याकडे पाहिल्यावर आपण नक्कीचं याचा विचार करायला लागतो यात काही शंका नाही. खरंतर नेतृत्व ही संकल्पना खूप मोठी आहे. विचारांचे नेतृत्व , म्हणजे आपण कोणते विचार आत्मसात करतो त्याला एक प्रकारे नेतृत्वच म्हणायला हवं. त्यामुळे विचार कोणाचे , कशे निवडतो हे नक्कीच पहा. राजकीय नेतृत्व हे नक्कीच चाणाक्ष , हुशार आणि निडर असायला हवं यात काहीच शंका नाही. राजकारण करायचं म्हणजे डोक्याचा खेळ अशावेळी आपण कोणाचे नेतृत्व स्वीकारतो किंवा करतो यावर सगळं ठरत. मैत्री मधील नेतृत्व ही म्हणा, कारण मित्र हा सुद्धा खूप ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावत असतो हे विसरून चालणार नाही,  त्याचे विचार हे नक्कीच योग्य असायला हवे. अशा गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण आपल्या आयुष्यात आपले नेतृत्व , विचार कसे असावे याचा गंभीर विचार करुत हे मात्र नक्की, कारण नेतृत्व विचार ठरवतात आणि विचार आयुष्याची दिशा ....

✍️©योगेश खजानदार

उध्वस्त वादळात..✍️

न उरल्या कोणत्या भावना
शेवट असाच होणार होता
वादळास मार्ग तो कोणता
त्यास विरोध कोणता होता

राहिल्या तुटक्या काहीं आठवणी
त्यास आधार काहीच नव्हता
पापण्यात साठवून ठेवण्यास
कोणताच अर्थ उरला नव्हता

काही शिल्लक ते मनात आहे
तोच सारा आधार होता
सांगू तरी कोणास आता
आपुल्यांचा चेहरा हरवला होता

माझ्यातील तो आज का
कित्येक प्रश्न विचारत होता
वादळात साथ सोडली त्यास
कोणता दोष देत होता

उध्वस्त हे नात्यातील मज का
कित्येक चेहरे दाखवत होता
खऱ्या खोट्या वचनास मग तो
क्षणात नाहीसे करत होता

एकांतात उरल्या मला का
आपुलासा करत होता
उरल्याच न कोणत्या भावना
मग,शेवट असाच होणार होता ...!

✍️© योगेश खजानदार

हो मला बदलायच आहे ...✍️

   आयुष्य जगताना खरंतर खूप काही गोष्टी आपल्याकडून अनवधानाने होऊन जातात. मग त्या गोष्टीचा पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. आपण कधी कधी असे वागून जातो की आपणच आपल्याला विचारतो की हा मीच आहे का ?? कारण आपल्या मध्ये आपल्यालाच माहीत नसलेला एक छुपा चेहरा नेहमी दडलेला असतो जो आपल्याला आपल्या ढासळलेल्या मनाच्या अचानक एका कोपऱ्यात मिळतो , कधी आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तर कधी अचानक गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया देतो , कधी अचानक खूप रागावतो तर कधी जे करायचं नसतं ते करून जातो , याला म्हणायचं आपल्यातला एक लपलेला चेहरा, सहसा हा आपल्यालाही अज्ञात असतो पण खूप काही जे करायचं नसतं ते करून जातो , अशा परिस्थितीत काय करावं खरंतर कोणालाच काही सुचत नाही आणि मग कधी कधी स्वतःलाच केलेल्याला गोष्टीचं वाईट वाटायला लागतं. त्यामुळे मिञांनो काही गोष्टीवर खरंचं नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं त्यामुळें पुढे नको त्या परिस्थतीतही आपण चुकीचं वागत नाही. याची खरतर हळू हळू सवय लावायला हवी. अचानक तुम्हीं हे करू शकाल अस होत नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ना...

१.रागावर नियंत्रण ठेवणे.

कधी कधी आपण इतकं रागावतो की आपण काय बोलत आहोत याचं भानच आपल्याला नसतं. रागाच्या भरात कित्येक गोष्टी अशा घडून जातात की ज्या घडायला नको असतात. एका क्षणाचा राग आयुष्यही उध्दवस्त करून टाकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण खरचं करण्याचा प्रयत्न करायला हवा. कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रथम स्वतःला समजून सांगायला हवं की खरंच ते तस आहे का ?? याचाही विचार करावा. खूप काही गोष्टी या रागात उध्वस्त होतात हे मात्र नक्की. आणि नात्यात तर याचा खूप विचार करायला हवा. क्षणाचा राग कदाचित सारं नात उध्वस्त करत. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होईल तिथे नक्कीच रागावर नियंत्रण मिळवायला हवं. हळू हळू आपण अशा परिस्थितीत विचाराने वागायला सुरुवात करतो , कधी कधी चिडून बोलून परिस्थिती बिघडवतो. त्यामुळे नक्की प्रयत्न करायला हवा.

२.चालढकल टाळणे.

प्रत्येक माणसात थोडी का होईना पण ही सवय नक्की असते. आजच्या गोष्टी उद्यावर टाकणे किंवा आजच्या परिस्थितीला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणे. या गोष्टीमुळे सोप्या गोष्टीही अवघड होऊन जातात. कोणत्याही बाबतीत आपण चालढकल करणे या
एका कारणामुळे नियंत्रणात असलेली परिस्थितीही आपल्या हातातून निघून जाते. खरतर आपण ज्या गोष्टीची चालढकल करतो त्या टाळल्या जाऊ शकतचं नाहीत. आज नाही तर उद्या त्या कराव्या लागतातच. वेळ तेवढी बदलते बाकी परिस्थिती तशीच राहते. त्यामुळे चालढकल करणे ही पळवाट होऊच शकत नाही. त्याला फक्त परिस्थितीला सामोर न जाणे एवढंच म्हणायचं. त्यामुळे चालढकल टाळावी हे मात्र नक्की.

३. आळसाला शत्रू बनवणे.

"आळस हा माणसाचा शत्रू असतो !!" त्यामुळे शत्रूला शत्रू सारखंचं वागवयाला हवं . आळस करणे या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या गोष्टींपासून दूर घेऊन जातात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कित्येक गोष्टी करण्यात आपण आळस करतो. कित्येक लोक तर उठल्यापासून आळस करतात ज्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो. आळस ही सवय असते पण स्वभाव होण्या अगोदर त्याला दूर करणं खूप चांगलं असतं. आळस झटकून काम कारण आणि त्याच जोमाने कामाला सुरुवात करणं यापेक्षा दुसरा आनंद कुठेच मिळणार नाही. तुम्हाला आवडत्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीचा आळस किंवा कंटाळा करून कसे चालेल. नाही का .!! त्यामुळे आळस हा शत्रूच आहे हे लक्षात ठेवा.

४.वाईट गोष्टींपासून दूर राहणे.

वाईट गोष्टी दिसायला नेहमीच छान असतात. सुरुवातीला त्या करताना ही खूप छान वाटत. पण त्याचा परिणाम शेवटी आपल्याला वाईटच असतो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून दूर राहणे कधीही उत्तमच. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपण लांब राहतो. वाईट गोष्टीचा नाद म्हणा किंवा सवय म्हणा लागायला वेळ लागत नाही. पण त्याचा परिणाम कधी कधी आपलं आयुष्यही उध्दवस्त करून टाकत. आणि हे वेळीच कळायला हवं.

५. खर्चावर नियंत्रण ठेवणे.

आपण किती कमावतो या गोष्टीपेक्षा आपण जे कमावतो त्याचा उपयोग आपण कसा करतो याला जास्त महत्त्व असतं. कारण आपल्या येणाऱ्या काळात त्याचा योग्य उपयोग आपल्याला झाला पाहिजे. पैसा हा योग्य मार्गासाठी उपयोगी आला तर त्याचे कित्येक चांगले फायदे आपल्याला भेटतात. अवास्तव खर्च हा आपल्या कित्येक मोठ्या कमाई वर सुधा भारी पडू शकतो. त्यामुळे योग्य खर्च करणे हे कधीही उत्तमच.

६.नियमांवर ठाम राहणे.

आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले निर्णय हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठीही तितकेच महत्वाचे आणि उपयोगी असावे. एखादा निर्णय घेतल्यावर सुरुवातीला आपल्याला त्रास होईल पण त्याचा परिणाम चांगला होणार असेल तर न डगमगता त्या निर्णयावर ठाम राहणं खूप गरजेचं असतं. कधी कधी आपल्या एका निर्णयावर आपल्या घराचं भविष्य ठरत. अशावेळी योग्य निर्णयावर ठाम राहणं हेच उपयोगच असतं. आपण प्रत्येक वेळी निर्णय सोयीनुसार बदलत गेलो तर अशाने आपल्या निर्णय क्षमतेवर ही प्रश्न केले जातात त्यामुळे घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचं असतं.

७. खचून जाऊ नये.

माणसाच्या आयुष्यात खूप काही चांगल्या आणि वाईट गोष्टी येतात. कधी कधी वाईट परिस्थिती माणसाला संपूर्ण बदलवून टाकते. अशा वाईट परिस्थितीमध्ये माणसाने खचून जाऊ नये. त्यामुळे कदाचित आलेली परिस्थिती अजुन वाईट होते. प्रत्येक वेळी नव्याने उभा राहील पाहिजे. आलेल्या गोष्टीशी लढल पाहिजे . प्रत्येक वेळी स्वतः लां विचारलं पाहिजे की, आपण यापेक्षा चांगलं करू शकतो नक्कीचं करू शकतो. वेळ बदलत राहते त्यासमोर हतबल होऊन कस चालेल . नाही का...!! त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला शरण नाही जायचं.

८.वेळेचा सदुपयोग करणे.

आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी माणसाने वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा असतो कारण तो पुन्हा आयुष्यात कधीच येत नाही. त्यामुळे आहे त्या वेळेचा उपयोग कसा करावा हे मनाशी पक्के असणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही नक्कीच तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगा पण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची विसरू नका. प्रवासात रस्तावर चोहोबाजूंनी दिसणारे सुंदर निसर्ग आपल्याला मोहित नक्कीचं करतात पण आपण तिथेच थांबत नाही पुढची वाटचाल सुरू असतेच ना !! तसचं वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी करायलाच हव्या.

९. पुनरावृत्ती टाळणे.

आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करणार असतोल तर येणारा परिणाम नक्कीचं बदलणार नाही. आपल्या आयुष्यात आपण पूर्वी काही चुका केल्या असतील तर पुन्हा तेच करणे याला मूर्खपणा म्हणातात. मग ती कोणत्याही बाबतीत असो. अशी पुनरावृत्ती टाळणं खरंच खूप गरजेचं असतं. एखाद्या नात्यात आपण विश्वासघात सहन केला असेल आणि अशा व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवत असतोल तर हे मूर्खपणाच असतं. कदाचित बदल झाला असेल पण ते नीटस सांगता येणं खूप अवघड असतं. एखादा निर्णय , एखादी सवय , एखादी घटना ज्यामुळे फक्त नुकसानच झाल होत अशा गोष्टी खरंच टाळणं उत्तमच.

१०. भिती हे अपयशाचा मुख्य कारण आहे.

कोणत्याही गोष्टीची भिती वाटणे हे आपण करत असलेल्या कामाचं निम्मं अपयश असत. आपण कोणाची भिती बाळगतो याचा विचार करणं फार गरजेचं असतं. समोर असलेल्या कित्येक गोष्टी या त्यामुळेच आपण करत नाहीत. भिती हाही माणसाचा तितकाच मोठा शत्रू आहे जितका आळस. परीक्षा असताना पेपर ची भिती आपल्या कित्येक चांगल्या गोष्टीही आपल्यापासून दूर घेऊन जाते.त्यामुळे जिथे आपण उतम गुणांनी उत्तीर्ण होणार असतो तिथे ही भिती आपल्याला मागे खेचण्याच काम करते. त्यामुळे कोणतंही काम निर्धास्त करायला हवं.  त्यामुळे आपण स्वतःला संपुर्ण झोकुन देऊन ते काम करतो. बघा नक्की विचार करा.

   तर हे आहेत आपल्यात लपून बसलेल्या त्या अनोळखी चेहऱ्याचे कित्येक रूप जे नियंत्रणात आणणे खूप गरजेचं असतं आणि  या १० सूत्रांचा वापर जर नक्की केला तर आपण नक्की हे करू शकु आणि त्यामुळे कित्येक गोष्टी सहज सोप्या होतील यात काहीच वाद नाही. चांगल्या लोकांची संगत , वेळेचा सदुपयोग, खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला लागणे , भिती आणि आळस यांना शत्रू करणे. यामुळे नक्कीचं आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत होईल हे नक्की..!!!

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...