तुझ्याचसाठी सारे || MARATHI POEM ||



तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे
तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे

सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे
राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे

कोऱ्या कागदावर उगाच मग, तुझ्याचसाठी लिहावे
शब्दास त्या ओळख तुझी, पण अनोळखी होऊन जावे

बोलेल ती रात्र खूप काही, सारे गुपित लपवून ठेवावे
चांदण्यात उगाच फिरुनी तेव्हा, नकळत तुला शोधावे

एकांती उगाच लाजून का,तुझेच चित्र काढावे
पहावे कित्येक वेळ त्याकडे आणि, स्वतःच मग पुसावे

नजरेत या भाव कित्येक, तुलाच न दिसावे
दूर तू जाता मग , अलगद मी अश्रू टीपावे

कळले हे प्रेम मंद त्या वाऱ्यास, पण तुला न ते बोलावे
कळली ती ओढ त्या पावसास, पण तुला न त्याने भिजवावे

अधीर त्या वाटेवरती, तुलाच मी पहावे
तुझ्याचसाठी श्वास हा सारा,पण तुलाच न कळावे ...!!

✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

पुतळा || Marathi Kavita || मराठी कविता ||


फुटलेल्या या पुतळ्याचा आता
कसला तू निषेध करतोस ?
निर्जीव आणि अबोल माझ्यात
महापुरुषास त्या शोधतोस ?

राहिले कोणते विचार न इथे
कसली आपुलकी दाखवतोस ?
अरे लाज थोडी ठेवायची होती
जाती धर्मात जेव्हा वाटतोस ?

कधी नमस्कार!! कधी हार!
उगाच नाटक करतोस !!
अरे तुझ्याच स्वार्थासाठी तू
माझाच अपमान करतोस !!

उरले का रे महापुरुष एवढ्यात
त्यांना फक्त माझ्यात तु पाहतोस !!
अरे!! माणसा मला पुजण्या परी
त्याच्या विचारास का न तू पुजतोस!!

नको मला हा एकांत आता
जिथे तू कामा पुरता येतोस!!
पक्षी बोलतात थोडे फार
बाकी एकटाच बोलत असतो!!

उगाच नको ते ओझे मोठेपणाचे
उगाच मला महापुरुष करतोस!!
तुकड्या तुकड्यात विखुरतो जेव्हा
मलाच पाया खाली तुडवतोस ..!!

अरे !! फुटलेल्या या पुतळ्याचा आता
कसला तू निषेध करतोस ????

✍️©योगेश खजानदार

मी आणि माझी आई || सुंदर लेख मराठी ||

" बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. "


    अगदी सहज सुचलेल्या काही ओळी आईला वाचून दाखवल्या आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी आल. 'मी फक्त तुला प्रेम देत राहिले , पण त्या प्रेमाची सुंदर वाख्या तू केलीस हे पाहून खूप बरं वाटलं !!' अस आई म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेली. थोड्या वेळाने जेवायला गेलो तेव्हा ताटात माझ्या आवडीच आम्रखंड होत. मी विचारलं, ' आई आज काय विशेष आम्रखंड  केलंस ते??' तर आई म्हणते कशी , ' असच केलं रे !! अगदी सहजच !! ' पण तिच्या गालातल्या त्या स्मितहास्याने मला सगळं काही सांगितलं. तिच्यासाठी लिहिलेल्या त्या चार ओळी तिला इतक्या आवडल्या की तिने त्याबद्दल मला आम्रखंड दिलं. अगदी मनसोक्त खाल्ल्यावर मी पुन्हा वाचत बसलो.

   कित्येक वेळ पुस्तकाची पाने चाळत असताना अचानक थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग मनात घोळू लागला. मी चार ओळी आईसाठी लिहिल्या, अगदी सहजच. तर तिने मला लगेच माझ्या आवडीचे दिले. मग त्या आईने तर आपल्याला आजपर्यंत किती दिले आणि अजूनही देतच आहे. मग आपण त्या आईचे किती देणे लागतो. केला हिशोब . अगदी आठवून आठवून केला.  आणि सहज तोंडातून शब्द निघाले ' आई!! तुझ्या प्रेमाचे ऋण फिटता फिटत नाही !! सारे आयुष्य खर्ची केले तरी तुझे प्रेम संपता संपत नाही!!' पुढे काही शब्द पुसटसे ओठांवर येऊन परतून गेले. कारण खिडकीच्या बाहेर झाडावर एक चिमणी आपल्या पिलांना घास भरवत असताना दिसली. मी पुस्तक बाजूला ठेवले आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. क्षणभर हरवून गेलो त्या चिमण्यात.  आपल्या चोचीत काहीतरी पकडून आणलं होत तिने आणि पिल आपल्या चोची उघड्या करून आकाशाकडे पाहत होती. चिवचिव करणारी ती पिले त्या घरट्यात खाऊन झाल्यावर आपल्या आईला बिलगुन बसली. कित्येक वेळ मी पहात राहिलो.

  मनात असंख्य विचार माझ्या नेहमीच गोंधळ घालत असतात. पण त्या दिवशी ती चिमणी आणि तिची पिले एवढाच विचार माझ्या मनात घोळत होता. राहून राहून वाटायचं , मला बोलता येत , मला लिहिता येत ,मला व्यक्त करता येत म्हणून मी लिहिलेल्या चार ओळी आईला वाचून दाखवू शकलो. त्यामुळे माझे तोंडही गोड झाले . पण या मुक्या पक्षाचं , प्राण्याचं काय ?? ती पिल आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगत असतील आपल्या भावना ?? कस सांगत असेल वासरू आईचं प्रेम ??? पण मनात विचार आला !! या प्रेमाला, या आई आणि पिलाच्या नात्याला!! खरंच शब्दांची गरज आहे ??नाही ना ?? मग कशी होतात व्यक्त हे मुकी जनावरे ?? असंख्य विचार , नुसते शब्द, शब्द आणि शब्द एवढंच असतं का प्रेम ?? तर नाही !! आपल्याला बोलता येत पण त्यांना नाही, पण तरीही ती पिले आईला आपलं प्रेम व्यक्त करतात. तिच्या पंखाच्या सावलीत ,वादळात तिच्यावर विश्वास ठेवतात. ती नक्की आपल्याला चिऊचा घास घेऊन येईल या आशेवर आपल्या आईची वाट पहात बसतात. खरंय मुके पक्षीही आपलं प्रेम आईला अगदी त्यांच्या भाषेत सांगतात. आपल्या मऊ स्पर्शाने सांगतात.

  वेळ येताच आई आपली मार्गदर्शक होते. वेळ येताच आपण कुठे चुकलो तर आपल्याला योग्य सल्ला देते !! आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा जिद्दीने उभ राहायला बळही देते !! आई आयुष्याचं सार्थक करते !! समोरच्या त्या घरट्यात ती चिमणी पिलांना आकाशात झेप कशी घ्यावी ते कदाचित शिकवत होती. मी मात्र त्यांच्या भावना माझ्या शब्दात समजून घेत होतो. कदाचित प्रत्येक आई आपल्या पिलाला , बाळाला?? मुलाला?? सगळे सारखेच !! नाही का ?? हेच सांगत असणार . शिकावं कस !! जगाव कस ! मग ते शब्दात असो की कृत्यातून !! माणूस असो की पक्षी, आई ही शेवटी आईचं असते. तीचं प्रेम कधीचं कमी होत नाही. आपल्या पिल्लांना शिकवताना कित्येक वेळा ती पिल्लं धडपडत होती , चिमणी पुन्हा पुन्हा त्या पिल्लाला सावरून घेत होती. आई !! आयुष्य कसे असावे ते सांगत होती !! अगदी मुक्याने ?? हो !!

  माझ्या लक्षात येण्या अगोदर एक मस्त कॉफीचा कप माझ्या शेजारी खिडकीत ठेवला गेला. मी क्षणभर वळून पाहिले तर ती आई होती !! मला जाताना एवढंच म्हणून गेली ' थंड होण्या आधीच पिऊन घे !! '  मी काहीच बोललो नाही . माझं लक्ष बाहेरच त्या चिमण्या सोबत मुक्त संचार करत होत, ती धडपड पाहत होतं, आपल्याला शोधत होतं. आणि पाहता पाहता साऱ्या चिमण्या आकाशात भुर्र्रर करत उडाल्या. साऱ्या आसमंतात फिरून आल्या. जरा चिवचिवाट जास्तच करत होत्या घरट्यात आल्या तेव्हा. बहुतेक आयुष्याची पहिली झेप आनंदाने साजरी करत असतील. हो ना ?? एक पिल्लू आपल्या आईला बिलगुन बसलं होत. आपलं प्रेम तर व्यक्त नाहीना करत ते ?? कदाचित असेलही !! तो कॉफीचा कप अलगद उचलत मी घरात पाहू लागलो, पाठमोऱ्या आईकडे पाहत राहिलो , ती आपल्या कामात व्यस्त होती आणि माझ्या ओठातून नकळत ओळी बाहेर आल्या .

आई !! तुझ्या प्रेमाचे ऋण, फिटता फिटत नाहीत!!
सारे आयुष्य खर्ची केले तरी, तुझे प्रेम संपता संपत नाही !!
कधी नकळत सांगितले मी , कधी अबोल राहिलो मी !!
आई !! तुझे हे प्रेमरूप, शब्दात सांगता येत नाही !!

आई !! तुझे हे प्रेमरूप,शब्दात सांगता येत नाही !!

©✍️योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...