दृष्टी || कथा भाग ४ || हृदयस्पर्शी कथा ||



कथा भाग ४

"दृष्टीला उद्या घरी आणायचं या विचारात रात्र निघून गेली. नव्या दिवसाने नवी दिशा या आयुष्याला दिली. क्षितिज आज नेहमी पेक्षा जरा लवकरच उठला होता. सकाळी लवकर आवरून, सर्व कामे पूर्ण करून, दृष्टीला आणायला जायचं या विचारात तो होता. आईच्याही हे लक्षात आलं होत. त्याला आवरताना पाहून ती मध्येच बोलते.

"नाष्टा तरी करणार आहेस की नाही ??"आई मिश्किल हसते.
"हो आई !! करणार आहे !! " तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला.
"ये मग !! तुझ्या आवडीचे मस्त दडपे पोहे केलेत!!"
"मस्तच !!" क्षितिज खुर्चीवर बसत म्हणाला.
"घे ! कधी जाणार आहेस दृष्टीला घरी घेऊन यायला !!!!"
"एक काम आटोपलं की लगेच जाणार आहे !!"
"तिला फोन करून सांगितलंस की नाही ??"
"नाही !! Surprise .!!" क्षितिज गालात हसत म्हणाला.
"छान !!" आई त्याला अजून पोहे वाढत म्हणते.
"वाह काय !! मला टेन्शन आलंय मालती ताईंच!!! त्या परवानगी देतील की नाही माहीत नाही !!"
"देतील रे !! आणि काही तसे म्हणाल्या तर फोन कर मला !! मी सांगेन हवं तर !!"
"हो चालेल!!" क्षितिज हसत म्हणाला. 

डिश मधले पोहे संपवून क्षितिज आता बाहेर निघाला होता. त्यालाही दृष्टीला भेटायची ओढ लागली होती.पण कित्येक वेळ तो कामातच गुंतून राहिला. केव्हा काम संपवून दृष्टीला आणायला जातो आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. अखेर कित्येक वेळ काम केल्यानंतर तो आश्रमात जायला निघाला. मोबाईल पाहतो तर आश्रमातून कित्येक फोन त्याला आले होते. त्याच्या मनात अनेक विचार आले. आश्रमातून इतके कॉल्स कसे काय त्याला काहीच कळत नव्हतं. अखेर तो घाईघाईत आश्रमात पोहचला. समोर मालती ताई उभ्याच होत्या. त्यांच्या जवळ जात क्षितिज बोलू लागला.

"मालती ताई !! आश्रमातून इतके कॉल्स !! सगळं ठीक आहे ना ??" क्षितिज मनात आलेल्या कित्येक विचारांना शांत करत बोलू लागला.
"कुठे होतास तू ?? तुला किती कॉल्स केले !! एकही रिसिव्ह केला नाहीस तू !! अरे दृष्टी !!" 
"काय झालं दृष्टीला??" क्षितिज मध्येच बोलला.
"अरे दृष्टी हा आश्रम सोडून गेली रे !! " मालती ताई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या.
"आश्रम सोडून ?? कुठे !! आणि तुम्ही कोणीच अडवल कस नाही तिला !! पण का सोडून गेली ती ???"

मालती ताई भानावर येत बोलू लागल्या. क्षितिजला झाली हकीकत सांगू लागल्या.
"काल तू गेल्यावर दृष्टीचे आई बाबा कित्येक वर्षांनी तिचा शोध घेत आले होते!! त्यांनी दृष्टी त्यांची मुलगी आहे अस आश्रमातल्या सगळ्या व्यवस्थापकांना पटवून दिलं !! आणि तिचा विरोध असतानाही तिला ते सोबत घेऊन गेले !!"
"सोबत घेऊन गेले ?? असे कसे घेऊन गेले?? इतक्या वर्षांनी कसे काय आले ?? आणि तुम्ही मला आता हे सांगताय !! कालच फोन का केला नाही ??" क्षितिजच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठत होते.
"काल सगळं हे इतकं अनपेक्षित घडत होतं की दृष्टीला सांभाळाताना तुला फोनच करता आला नाही !!!" मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"नाही !! खोटंय हे सगळं !! कोण कुठले लोग !! त्याच्या सोबत असच पाठवून दिलं !! मी दृष्टीला फोन लावतो !! तिला जाब विचारतो !! मला न सांगता तू गेलीस तरी कशी ते !! " क्षितिज खिशातून मोबाईल बाहेर काढू लागला.
"त्याचा काही उपयोग नाहीये !! बंद लागतोय तिचा फोन !! "मालती ताई मध्येच म्हणाल्या.
"कुठे घेऊन गेलेत तिला !! सांगितलं असेल ना त्यांनी ??" 
"नाही !! अस काहीच बोलले नाहीत ते !! " 
"मालती ताई हे काय झालं !! आज तिला मी घरी घेऊन जायला आलो होतो!! आणि ती मला न सांगता निघून गेली!! अस कस करू शकते ती !!" क्षितिज आता डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता.
"मला तिच्याबद्दल काहीही कळाल!! ती कुठे आहे !! तर मी तुला फोन करून सांगेन !! तू पण तिला सारख कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर !! ती जोपर्यंत सुखरूप आहे, हे कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये !! " मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"पण तरीही!! मला अजूनही विश्वास बसत नाहीये की ती मला अस सोडून गेली ते !!" क्षितिज मालती ताईंना मनातलं बोलू लागला.
"तिने केला प्रयत्न !! पण ते सगळं एवढं अनपेक्षित होत की तिला ते सावरून घेता नाही आल. शेवटी जाताना ती एकच म्हणाली, क्षितिजला सांगा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही !! मला तुझ्यासोबत घेऊन चल !! अगदी कायमच !!" मालती ताई क्षितिजला सगळं काही सांगत होत्या.

क्षितिज हताश होऊन परत चालला होता.त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजलं होतं. दृष्टीचा तो सुंदर चेहरा त्याच्या नजरे समोरून हटतच नव्हता.गाडीच्या त्या वेगात त्याच्या विचारांच्या वेगालाही मर्यादा राहिली नव्हती. दिशाहीन वादळा सारखी त्याची अवस्था जणू झाली होती. 

"एखादी व्यक्ती मनात घर करून बसली, की तिच्यासाठी काहीही करावं असं हे मनच त्याला सांगत!! ती व्यक्ती विसरून गेली असेल तर आठवणींच्या विश्वात पुन्हा त्याला जिवंत करावं असं हे मन त्याला सांगत !! त्याच चित्र काढावं अस की त्याचे रंग आपण बनावे अस हे मनच सांगत !! मग हे मन या आठवणीतल्या त्या व्यक्तीला चारही दिशा शोधावं असंही सांगत !! पण तरीही ती व्यक्ती शोधूनही सापडत नसेल तर काय करावं !! हे मन मात्र ते सांगत नाही !! त्या आठवणी कश्या पुसाव्या तेही सांगत नाही !! माझी दृष्टी माझ्यापासून दूर गेली !! कुठे गेली ?? कुठे असेल ?? काही माहीत नाही !! चारही दिशा मी तिला शोधलं पण मला ती काही सापडत नाही !! अगदी कालपर्यंत जीच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे !! तो हतबल होऊन बसला आहे !!" क्षितिज आपल्याच विचारांच्या तंद्रीत बसून राहतो. आश्रमासमोर ,गाडीतच.

अखेर कित्येक वेळ तसाच बसून राहिल्या नंतर क्षितिज घरी जायला निघतो. त्याचे मन मात्र त्या आश्रमातून निघेना. दृष्टीला अजूनही ते मन तिथेच शोधत होते. जड पावलांनी तो जायला निघाला, घरी जायला उशीर झाला. घराचे दार उघडताच आई समोरच उभी होती. दृष्टी येणार म्हणून तिने सगळी तयारी केलेली होती. क्षितिजला एकट्याला पाहून आई विचारते,

"एकटाच आलास !! दृष्टी नाही आली ??" आई प्रश्नार्थक नजरेने पाहते.
"नाही !" क्षितिज थोड तुटकच बोलतो.
" का रे ?? मालती ताईंनी परवानगी दिली नाही का ?? तुला म्हटलं होत मी तसं काही असेल तर मला फोन कर म्हणून !! मी सांगितलं असत त्यांना !!" आई क्षितिजकडे बघत म्हणते. काहीतरी झालं आहे याची जाणीव तिला होते.
"नाही !! तसं काही नाही!!" 
"काय झालं क्षितिज ?? काही सांगशील का ??" 
"आई दृष्टी आश्रम सोडून निघून गेली !! "
"आश्रम सोडून निघून गेली ?? कुठे ?? आणि का ??"
"काल कित्येक वर्षांनंतर तिचे आई बाबा तिला शोधत आले होते म्हणे !! त्याच्या सोबत ती निघून गेली!! " क्षितिज समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
"असे कसे आले आई बाबा ?? आणि कोण कुठली माणसं !! आश्रमातल्या लोकांनी विश्वास ठेवलाच कसा??" 
"त्यांनी त्याच्याकडे काही कागदपत्र दाखवली !! तिची एक जन्मखून सांगितली !! त्यानंतर त्याची खात्री पटली आणि त्यांनी तिला जाऊ दिल !!" क्षितिज बसल्या आवाजात सार काही सांगू लागला.
"जाताना तिला तुझी एकदाही आठवण आली नाही ??"
"तिचा विरोधच होता म्हणे !! मालती ताई सांगत होत्या !! पण अखेर नाईलाज झाला !! आणि ती गेली त्यांच्यासोबत !!कुठे गेली !! आता सुखरूप आहे की नाही !! काहीही माहीत नाही !! " 
"तिचे आई वडील मिळाले याचा आनंद करावा की दुःख काहीच कळत नाहीये !! पण ती तुला अशी सोडून नाही जाणार !! तू नकोस असा हताश होऊस !!" आई क्षितिजला धीर देत म्हणाली.
" मला तर हे सगळं खोटं आहे अस वाटतंय !!" क्षितिज स्वतःला सावरत म्हणाला.

क्षितिज आई सोबत कित्येक वेळ आपल्या मनातलं बोलून अखेर आपल्या खोलीत आला. कित्येक वेळ आज झालेल्या गोष्टी आठवून विचार करत बसला. दृष्टी आज अचानक कुठे निघून गेली हे त्याला काहीच केल्या कळतं नव्हतं. त्याने कित्येक वेळा तिचा फोन लावून पाहिला पण अजूनही बंदच लागत होता. आश्रमात विचारून पाहिलं तिथेही ती कुठे गेली काहीच कळतं नव्हतं. 

रात्र अशीच गेली, रात्रभर क्षितिज झोपलाच नाही. दृष्टीच्या आठवणींनी त्याला पुरत वेडून घेतलं होत. "तिला दृष्टी नाही, तरी ती माझ्या नजरेतून ही दुनिया पाहत होती. पण आता न सांगता निघून गेली , मग आता ही दुनिया ती कशी पाहत असेल ??दृष्टी !! कुठे आहेस तू ?? तुझ्या आठवणी खूप छळतात मला !! तुलाही माझी आठवण येत असेलच ना?  कुठे आहेस ?? कशी आहेस ?? " तुझ्या आठवांचा हा पाऊस सतत मला भिजवत आहे." 

"हरवून गेल्या दिशांना 
व्यर्थ उगाच शोधणे!!
डोळ्यातल्या अश्रूंना
तुझीच ओढ लागणे!!

व्यर्थ सारी स्वप्ने ही
एकांत मनी तो दिसणे!!
तुझ्या आठवांच्या जगात
उगाच फिरुनी येणे!!

हात तुझा हाती असावा
क्षणाचे हे बोलणे !!
आयुष्यभराची आठवण तू
हेच खरे जगणे !! "

क्षितिज कित्येक वेळ त्या अंधारात त्या खोलीत बसून राहिला.

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

दृष्टी || कथा भाग ३ || Marathi love Stories ||




कथा भाग ३

क्षितिज खोलीतून लगबगीने बाहेर येतो. कारची चावी शोधू लागतो. त्याची ही लगबग आईच्या लक्षात येते. आई विचारते.
"काय झालं क्षितिज ??"
क्षितिज गडबडीत बोलतो.
"आई दृष्टी खोलीत पडली !!"
"काय ? कसं काय ?? लागलंय का तिला खूप ??" आई विचारते.
"माहित नाही !! पण भावनाचा फोन आला होता!! आई कारची चावी कुठे दिसतेय का बघ ना !!"
"अरे ही काय समोरच तर आहे !!" टेबलावरची चावी क्षितिजला देत आई म्हणते.
"येतो मी !!" लगबगीने क्षितिज घरातून बाहेर पडतो.
" सांभाळून जा !!" आई पाठमोऱ्या क्षितिजकडे पाहत म्हणते.

आश्रमात जाई पर्यंत क्षितिजचा जीव अगदी कासावीस झाला होता. तिला लागलं तर नसेल ना जास्त. तिला नेमक झालं तरी काय असेल. कशी अशी पडली ती.कोणी सोबत नव्हतं वाटत तिच्या. क्षणही जरा सावकाश जात आहेत असंच त्याला वाटत होत. क्षण न क्षण त्याला दृष्टीच्या चिंतेन व्याकुळ केलं होतं. लगबगीने तो आश्रमात आला. समोर मालती ताई होत्या त्यांना पाहून क्षितिज क्षणभर जागीच थांबला. मालती ताईंनी त्याला आत येण्यासाठी खुनावल. तेव्हा क्षितिज आत आला. त्यांच्या जवळ जात विचारू लागला.

"काय झालं दृष्टीला ??"
"खोलीत अडखळून पडली ती!!"
"खूप लागलंय का ??"
"डावा हात जरा दुखतोय तिचा !! डॉक्टरांनी दोन तीन दिवस रेस्ट घ्यायला सांगितलं आहे !!!"
"मी पाहू शकतो तिला !!"
मालती ताई फक्त होकारार्थी मान हलवतात. 

क्षितिज आणि मालती ताई दृष्टीच्या खोलीकडे येतात. दृष्टी आपल्या पलंगावर शांत झोपली होती. तिला नुकतंच डॉक्टरांनी औषध दिलं होत.
"डॉक्टरांनी आत्ताच औषध दिलं तेव्हा तिला बरं वाटायला लागलं!! इतका वेळ डावा हात खूप दुखतोय म्हणून खूप रडत होती!!" मालती ताई क्षितिजला सांगत होत्या.
क्षितिज काहीच बोलत नाही. फक्त ऐकत राहतो. मालती ताई आणि तो दृष्टीच्या समोरच थोड लांब बाकावर बसतात. क्षितिज ऐकटक दृष्टीकडे पाहत राहतो. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यांना लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न तो करतो. मालती ताई त्याच्याकडे पाहून बोलतात.

"प्रेमात लोक रूप बघतात, पैसा बघतात, स्टेटस बघतात तू काय पाहिलंस दृष्टी मध्ये क्षितिज ??"
क्षणभर क्षितिज मालती ताईंकडे बघतो आणि म्हणतो.
"नितांत प्रेम !! फक्त प्रेम !! तिच्या ओठातून येणाऱ्या प्रत्येक शब्दावर प्रेम !! माझ्या आठवणीत स्वतःच झुरणाऱ्या त्या क्षणांच प्रेम !! माझ्यासाठी ,मला आनंदी राहता यावं म्हणून माझ्या नजरेतून हे जग पाहण्यावर प्रेम !! " 
"इतकं कोणी कोणावर प्रेम करू शकत ???"
क्षितिज काहीच बोलत नाही ओठांवरती एक स्मित फक्त येत.
"दृष्टी खरंच बोलली होती!! रक्ताच्या नात्यां पलिकडे जाऊन नाती कशी असतात ते नक्की इथेच आल्यावर कळत !!!"
मालती ताई आणि क्षितिज एकमेकांकडे पाहत हसतात.

दृष्टी आता हळूहळू झोपेतून जागी होऊ लागली होती. ती जागी झालेली पाहून मालती ताई आणि क्षितिज दोघेही तिच्या जवळ जातात.
"आता कस वाटतंय दृष्टी??" मालती ताई विचारतात. 
"बर वाटतयं!!" दृष्टी थोड्या बसल्या स्वरात बोलते.
"तुला भेटायला कोण आलंय माहिती का ??"
"कोण ??" दृष्टी उत्सुकतेने विचारते.
"आता कस वाटतंय दृष्टी ?? बरी आहेस ना ??"
"कोण ?? क्षितिज ?? " दृष्टी जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत बोलते.
"हो मीच आहे !!! "
दृष्टीला काय बोलावं काहीच कळत नाही. "मालती ताई ??" एवढंच ती बोलते.
"हो मीच सांगितलं होत भावनाला !! क्षितिजाला फोन करून कळवायला !!!"

दृष्टीला क्षणात दुखणे विसरल्या सारखे झाले. क्षितिज जवळ आहे या विचारांनी तिला मनातून खूप आनंद झाला.
"तुम्ही दोघे बसा बोलत !! मी येते जरा जाऊन !!" मालती ताई खोलीच्या बाहेर जात म्हणाल्या.

दृष्टी क्षणभर शांत बसली आणि जवळच बसलेल्या क्षितिजाला म्हणाली.
"क्षितिज !! जरा जवळ ये ना !!" 
"काय !! जवळ येऊ !! कशाला ???"
" ये ना !! सांगते !! "
क्षितिज तिच्या जवळ येत.
"हा आलो !!!बोल !!"

क्षितिज जवळ येताच त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला.एका हाताने घट्ट तिने क्षितिजाला मिठी मारली. क्षितिजं ने ही तिला घट्ट मिठी मारली.ओठांच्या स्पर्शात ओठ हरवून गेले. त्या क्षणात दृष्टीच्या आयुष्याच्या क्षितिजा मध्ये कित्येक तारे बहरून गेले. एकमेकांस सावरत क्षितिज पुन्हा शेजारच्या खुर्चीवर बसला.
"आता किती दिवस अस पडून राहायचं ??"
"आता अशी बरी होईल मी !!"
"हो पण !! डॉक्टरांनी दोन तीन दिवस आराम करायला सांगितला आहे हे विसरू नकोस !!"
"तू आहेस ना आता सोबत !!  क्षणात नीट होईल मी !!" 
"हो का ?? छान !! पण जरा दुसऱ्याच ऐकावं माणसानं!!" 
"हो म्हणजे मी तुज ऐकत नाही अस म्हणत आहेस ना ??"
"तस नाही !!! "
"मग कस ??" 
"मी सांगू ???" मागून येणारी भावना दोघांच्या मध्येच बोलते.
"कोण भावना ? तू आता इथे कशी काय ?? "
"आले होते !! ताईसाहेब बऱ्या आहेत का त्या पाहाल्या!!"
"पण आता क्षितिज दादा आला म्हटल्यावर काय ठीकच असणार !!"
"ये!! भावना आगाऊ पणा करू नकोस हा !! "
"राहील तर मग !!!" एवढं बोलून भावना बाहेर पळतच जाते.

क्षितिज कित्येक वेळ दृष्टी जवळ बसून राहतो. दिवसाची रात्र होत आलेली असते. घड्याळात सहा वाजल्याचे ठोके पडतात.
"क्षितिज तू जा घरी !! संध्याकाळ झाली!! घड्याळात बघ किती वाजले ते !!"
"नाही मी कुठेही जाणार नाहीये !! तुला पूर्ण बर वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही!!"
"खरंच मला बर वाटतंय आता !उगाच तू तुझ्या तब्येतीची हेळसांड करू नकोस !! "
"मला काही होत नाही !!" 

तेवढ्यात आतमध्ये कोणी एक मुलगी जेवणाचे ताट घेऊन येते. शेजारी ताट ठेवून ती म्हणते.
"ताई जेवायचं ताट आणलय!! उठ बरं!! " तिला अलगद उठवून बसत ती म्हणते. क्षितिज ही तिला उठून बसायला मदत करतो.
"मालती ताईंनी तुम्हाला ही जेवून जायला सांगितलय !! हे दुसरं ताट तुमच्यासाठी !!" क्षितिज फक्त तिच्याकडे हसून पाहतो.
ती मुलगी बाहेर निघून जाते. आणि तेवढ्यात दृष्टी बोलते.
"वाह !! आज चक्क जेवण !! तेही क्षितिजला !!"
"मनाने खूप चांगल्या आहेत मालती ताई !! " क्षितिज नकळत बोलतो.
"तुला म्हटलं होत ना मी !!"
"हो !!"

क्षितिज आणि दृष्टी दोघेही एकत्र जेवण करतात.थोडा वेळ गप्पाही मारतात. नंतर औषध घेतल्या नंतर दृष्टीला नकळत झोप लागते. तिला व्यवस्थित झोप लागली हे पाहताच क्षितिज आता जायला निघतो, पण क्षणभर तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहतो..त्यात हरवून जातो,

"नको दुरावा आज हा 
सोबतीस राहावे मी सदा !!
भाव या मनीचे ओळखून
मिठीत घ्यावे मी तुला !!

रेंगाळला का क्षण असा 
आठवांचा नकोसा जाच हा!!
ओठांवरचा गोडवा तो 
टिपून घ्यावा मी सदा !!

सांग सखे !! तू मला !!
भेटणे ते, कधी पुन्हा ??
हरवून जावे मी तुझ्यात
नी हरवून जावे या क्षणा!!

वाटते मज का उगा !!
सोबतीस रहावे मी सदा !! "

क्षितिज आता आश्रमातून बाहेर येऊ लागला होता. समोर मालती ताईंना पाहून क्षणभर थांबला. उद्या पुन्हा तिची भेट घ्यायला येईन हे सांगून तो घरी निघाला.घरी आई त्याची वाटच पाहत बसली होती. दरवाजा उघडून क्षितिज घरात येताना पाहून आई बोलू लागली.

"कशी आहे दृष्टी ??"
"बरी आहे आता !! हाताला थोड लागलंय तिच्या !! पण बरी होईल दोन तीन दिवसात !!"
"बर !! मी काय म्हणत होते क्षितिज !! तिला दोन तीन दिवस इकडेच आणले तर??"
"खरंच ??" क्षितिज चेहऱ्यावर हसू येत म्हणाला.
"अरे हो खरंच !! इथे तिची चांगली काळजी पण घेतली जाईल !!"
"मालती ताई नाहीत परवानगी देणार !!"
"एकदा विचारून तर बघ !!" आई क्षितिजकडे पाहत म्हणते .
"ठीक आहे !! विचारतो !!तू जेवलीस ??" क्षितिज आई जवळ बसत म्हणाला.
"नाही रे !! तुझी वाट पाहत बसले !! तू जेवून आलास का ??"
"हो !! म्हणजे आश्रमातच झालं !! पण चल ना !! तुझ्यासोबत बसेन मी !! चल !!"

क्षितिज आणि आई दोघेही एकत्र बसले. आई सोबत क्षितिज तिचे जेवण होईपर्यंत बसून राहिला.

उद्या दृष्टीला घरी घेऊन यायचं या विचाराने त्याच मन सुखावून गेलं होतं.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार

दृष्टी || कथा भाग २ || मराठी रंजक कथा ||



कथा भाग २

 घरी पोहचताच क्षितिजने दृष्टीला फोन लावलेला असतो.
"बोल ना क्षितिज !! पोहचला तू घरी ??" 
"हो !! आत्ताच आलो !! " क्षितिज आपल्या खोलीत येत म्हणतो.
"बर जेवण केलंस की नाही अजुन ??" दृष्टी विचारते .
"नाही !! आता करणार आहे !!"

क्षितिज असे म्हणत असतानाच खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडत होतं. क्षितिज कुतूहलाने पाहतो. 
"कोण आहे ??"
खोलीत कोणी आत येताना पाहून म्हणतो. आणि क्षणात बोलतो.
"आई तू !! ये ना !! "
आईकडे पहात पुन्हा फोनवर बोलतो.
"मी तुला नंतर फोन करतो !!! आणि हो ऐक उद्या सकाळी येतोय मी तुझ्याकडे !! तेव्हा तयार रहा !!!" एवढं बोलून क्षितिज फोन बंद करतो. समोर उभी आई म्हणते.
"पुन्हा दृष्टी ?? मी किती वेळा सांगितलय तुला क्षितिज !! या मुलीच्या मागे तू तुझं आयुष्य नको वाया घालू !!! "
"आई प्लीज !!! आता पुन्हा नकोस बर सुरू करू !!!" क्षितिज आईला मध्येच बोलतो.
"माझं बोलणं तुला एवढ लागत?? अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना !! कोण कुठली अनाथ मुलगी !!! आणि त्यातही आंधळी !! काय पाहिलंस देव जाणे !!"
"नितांत प्रेम काय असत !! ते पाहिलं मी !! "
"प्रेम !! या पैश्या पुढे !! संपत्ती पुढे !! प्रेम कुठच टिकत नाही !!"
"खरंय आई !! या पैश्या पुढे प्रेम कुठेच टिकत नाही !! म्हणूनच तू बाबांना फक्त ते गरीब आहेत म्हणून सोडलं !! का तर हा पाहणारा समाज तुला नावं ठेवेन म्हणून !! "
"क्षितिज !!! काय बोलतोयस कळत का तुला !! " आई थोडी रागात येत म्हणाली.
"नाही कळत मला आई !! पण मला एवढं कळत की हा समाज बघतो !! म्हणून खोटी आभूषण मिरवण !! खोटी नाती जपणं !! याला काय म्हणायचं ?? त्यापेक्षा मला माझी दृष्टी खूप वेगळी वाटली !! तिने माझ्याकडे काहीच मागितलं नाही आई !! ना तिला माझ्यात काही दिसलं !! तिने फक्त माझ्यावर प्रेम केलं !! अगदी हृदयातून !! "
"तुझ्याशी ना बोलण्यात अर्थच नाही!! ! वेड लागलंय तुला !!" 
एवढंच बोलून आई खोलीतून बाहेर निघून जाते. क्षितिज तिला आडवतही नाही.

क्षणभर क्षितिज शांत बसून राहतो. मनात कित्येक विचारांचा गोंधळ घालत राहतो.
"दृष्टी !! जिच्या आयुष्यात दृष्टीच नाही !! ती माझी दृष्टी !! या देवाने तिची दृष्टी हिरावून घेतली ,पण आयुष्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे सांगायचं विसरला नाही तो तिला !! आणि त्याच ऐकून !! त्याला कधीच दोष न देता !! जगणारी ही दृष्टी मनाच्या कोपऱ्यात अगदी कायमच घर करून बसली आहे!! कसं सांगू मी आई तुला !! जेव्हा माझी आणि तिची पहिली भेट झाली होती, तेव्हा ती दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत होती. समोरच्या मैदानात खेळणाऱ्या आपल्या सर्व अनाथ बांधवांना प्रोत्साहन देत होती. अस दुसऱ्यासाठी जगायला खरंच ताकद लागते. अशी ही माझी दृष्टी !! पैसा ,संपत्ती याही पेक्षा मला जगण्याची प्रेरणा देते. नात्याला नुसती दृष्टी असून भागत नाही !! तर प्रेमही असावं लागतं !! " 

क्षितिज अचानक भानावर आला.त्याला काहीतरी आपल्याकडून चुकल्या सारखे वाटू लागले. तो खोलीतून बाहेर येत आईला शोधू लागला. आई समोरच होती. डोळ्यातून येणारे अश्रू क्षितिजाला कळू नये म्हणून त्याला पाहताच लगेच पुसून घेत होती.
"आई !!"
आई काहीच बोलत नाही. त्याला पाठमोरी उभा राहून आपल्या कामात व्यस्त राहते.
"आई माझं चुकलं !! मला माफ कर !!"
आई काहीच न बोलता निघून जाऊ लागते. तिला थांबवत क्षितिज पुन्हा बोलतो.
"आई !! खरंच माझं चुकलं!! मगाशी मी तुला अस बोलायला नव्हतं पाहिजे !! "
"बोलून झालं की सगळे असेच म्हणतात!! " आई डोळ्यात आलेला अश्रू पुसत बोलते.
"आई खरंच माझं चुकलं !! " 
"तुझं नाही माझंच चुकलं क्षितिज !! मी बाबांपासून का वेगळं झाले !! हे कधी मी तुला सांगितलंच नाही !! तू तुझ्या मनाला वाटेल ते तर्क लावत राहिलास !!"
क्षितिज फक्त ऐकत राहिला.
"लग्नाआधी तुझ्या बाबांनी मला खूप स्वप्न दाखवली !! कित्येक वचनही दिली !! पण लग्नानंतर मात्र तुझ्या बाबांना कोणतीच जबाबदारी नकोशी वाटू लागली !! तुझा जन्म झाला!! खिशात पैसा नाही !! बाबांना म्हटलं तर त्यांनी हात झटकून दिले !! "
"मग पुढे !!" क्षितिज कुतूहलाने विचारू लागला.
"पुढे मग मी तुझ्या बाबांना सोडायचा निर्णय घेतला !! कारण असा नाकर्ता नवरा आयुष्यात असाण्यापेक्षा आपण आपला वेगळा मार्ग निवडावा !! हे मी ठरवलं !! मग पुढे छोटा उद्योग सुरू केला !! आणि वाढत वाढत आज हे सगळं राज्य निर्माण केलं !! तुझे बाबा त्या तिथंच कायमचे राहिले!! "
"मला तू हे कधीच सांगितलं नाहीस !!"
"कारण तशी वेळच कधी आली नाही !! पण एक भीती वाटते म्हणून मी तुला बोलते !! दृष्टी डोळ्याने अधू आहे !! तिची साथ कधीच सोडू नकोस!! कारण आयुष्यात जबाबदारी बदलत जाते !! लग्नाआधी वाटणार प्रेम !! हे लग्नानंतर जबाबदारी होते.जर आयुष्यभर तिची साथ देण्याची तयारी असेल तरच तिच्यावर प्रेम कर !!"
"आई मी तुला खरंच ओळखू शकलो नाही !! मला माफ कर !! आणि मी तुला वचन देतो की मी तिची साथ कधीच सोडणार नाही !!!" क्षितिज आईचा हात हातात घेत बोलतो.

आयुष्यात आपल्यावर विश्वास ठेवून येणारी व्यक्ती ही आपली जबाबदारी असते हे क्षितिजाला कळल होत.खरतर प्रेम करणं खूप सोपं असतं पण ते निभावणं खूप कठीण असतं हेच आईला सांगायचं होत. दृष्टीला पाहता येत नाही. तिची हीच बाजू उद्या आयुष्यभर त्याला सांभाळायचं होती. क्षितिज आपल्या खोलीत गेला. आईने त्याला सांगितलेलं सगळं काही आठवून त्यावर विचार करत राहिला.

"आईच म्हणणं खरंच बरोबर आहे !! माझं हे प्रेम दृष्टी साठी आयुष्यभर असंच राहणार !! आई तुला मी वचन देतो !!" 
क्षितिज डोळे मिटून कित्येक वेळ विचार करत राहतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजते.

क्षितिज डोळे उघडत फोन कोणाचा आहे हे पाहतो.
"हॅलो !! कोण !!"
"दादा मी आश्रमातून भावना बोलते आहे !!"
"बोलणं भावना !! कसा काय फोन केलास!!"
"दादा !! दृष्टी दीदी खोलीत पडली !!"
क्षितिज जागेवर उभा राहतो , गोंधळून जातो आणि भवनाला कित्येक प्रश्न विचारतो.
"कधी ?? कुठे ?? बरी. आहे ना ती ???मी येतो लगेच थांब !!"
एवढं बोलून क्षितिज जायला निघतो.

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : दृष्टी || कथा भाग ३ || Marathi love Stories ||

दृष्टी || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||




टीप :"दृष्टी " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

"त्या डोंगराच्या पलीकडे सूर्य आता हळूहळू मावळतो आहे आणि त्या तिथे पलीकडे छोट्या टेकडीवर इवले इवले दिवे दिसत आहेत. बहुतेक तिथे छोटी वाडी असावी. आणि हे काय !! आकाशात तर पक्ष्याचे थवेच्या थवे जात आहेत!! बहुतेक घराकडे जाण्याची ओढ लागली असावी. ही सांज असतेच तितकी सुंदर!! आपल्या लोकांच्या सहवासात असावं !! अशी ओढचं लावते ती !! त्या दूर पायवाटेवर खाली कोणी शेतकरी आपले गाय वासरू घराकडे घेऊन जात आहेत !! आणि गंमत म्हणजे तो निवांत पुढे चालतोय आणि ते गाय वासरू मनाने त्याच्या मागे येतायत !! मुक्या जनावरांना सुद्धा माया, प्रेम कळतं !! " क्षितिज बोलता बोलता थांबला. 

त्याला ऐकणारी दृष्टी क्षणभर शांत बसली आणि म्हणाली.

"थांबलास का सांग ना मला !! अजुन कशी आहे ही संध्याकाळ ?? त्या बुडणाऱ्या सूर्याचा रंग कसा आहे?? सांग ना ?? त्या पक्ष्यांना क्षणभर थांबायला सांग ना !! मला ना मनमोकळ बोलायचं आहे त्यांना !! क्षितिज !! बोल ना रे !!" दृष्टी उत्सुकतेने बोलू लागली होती.

क्षितिज तिचा हात हातात घेत तिला बोलू लागला.
" ही संध्याकाळ तुझ्या इतकीच सुंदर आहे दृष्टी !! " 
दृष्टी गालातल्या गालात हसते आणि म्हणते.
"पण ही संध्याकाळ रंगांची उधळण करते क्षितिज !! मला तर रंग काय तोही माहीत नाही !! या नजरेला ती संध्याकाळ दिसतच नाही !!" दृष्टी उदास होत म्हणते.
"माझ्या नजरेतून तूही पहाते आहेस ना ?" क्षितिज तिच्या जवळ जात म्हणत होता.
"पण??" दृष्टी मध्येच म्हणाली.
"आता पण नाही आणि काही नाही !! क्षितिज जागेवरून उठत म्हणाला. 

संध्याकाळ सरून आता रात्र झाली होती. दृष्टीला घेऊन क्षितिज आता परतीच्या वाटेवर निघाला होता. जाता जाता तिला तिच्या आश्रमात सोडायचे होते, या विचाराने त्याच्या मनात नुसता गोंधळ घातला होता. न राहवून तो म्हणाला.
"तुला मी किती वेळा सांगितलय दृष्टी की तू त्या आश्रमात राहू नकोस म्हणून !! माझा एक फ्लॅट बंदच आहे!! तिकडे राहा म्हणून !! "
"मी तरी तुला किती वेळा सांगितलं क्षितिज की मी नाही राहू शकत रे!!  मला जस कळायला लागलं तेव्हापासून मी तिथे, त्या आश्रमात राहते आहे !! तिथं माझी जिवाभावाची माणसं आहेत !! माझी एक बहिणही तिथेच आहे !तीही माझ्यासारखी अनाथ आहे!!  तिला सोडून कस येऊ मी तिकडे ??"
"पण मला तू तिथे राहणं आवडत नाही !! "
"कधी आलास तर कळेल तुला !! की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेम करणारी माणसं असतात तरी कशी !! "
"येऊ तरी कसा !! तुमची ती केअर टेकर मला नुसतं खाऊ की गिळू अस पाहत असते !! " क्षितिज अगदी रागात येत म्हणतो.
दृष्टी क्षितिजच्या बोलण्यावर हसते. आणि बोलते.
"कोण मालती ताई !! अरे मनाने खूप चांगल्या आहेत त्या !! "
"अस तुला वाटत !! "
"अरे नाही खरंच !! एकदा भेट तू त्यांना म्हणजे कळेल !! "
"भेटायला कश्याला हवं समोरच आहेत त्या !!"
"म्हणजे ?? " दृष्टी प्रश्नार्थक चेहरा करत विचारते.
"म्हणजे आपण पोहचलो ! आला आश्रम !!"

क्षितिज दृष्टीला कार मधून उतरायला मदत करू लागला. समोर दृष्टीची अनाथ बहीण भावना तिला पाहताच लगेच तिला घ्यायला जवळ आली. क्षितिजकडे पाहून ती हसली. दोघीही आत आश्रमात जाऊ लागल्या. क्षितिज दृष्टी आत जाई पर्यंत तिला पाहत राहिला. 

दृष्टी आत येताच मालती ताई समोरच होत्या. तिला पाहून त्या बोलू लागल्या.
"दृष्टी!! "
आवाजाने दृष्टी चपापली. 
"कोण ?? मालती ताई ??"
"हो मीच !! "
"बोला ना ताई !!"
"कुठे गेली होतीस दृष्टी ??"
"सूर्यास्त पहायला !!" दृष्टी म्हणाली.
"तू पाहिलास ??" मालती ताई तिला जवळच्या खुर्चीवर बसवत म्हणाल्या.
"हो !! पाहिला मी सूर्यास्त !! क्षितिजच्या नजरेतून !! " 
"छान !! हे सगळं ठीक आहे दृष्टी !! पण तू हे विसरू नकोस की तू एक अंध अनाथ मुलगी आहेस ! आणि क्षितिज एक सुंदर देखणा श्रीमंत घरातला मुलगा आहे !!" 
"पण क्षितिज माझ्यावर प्रेम करतो !!"
"हे वय असतच अस पोरी !! तुम्ही दोघंही तरुण आहात !! तूही सुंदर आहेस !! उद्या काही अनुचित घडू नये म्हणून तुझी काळजी वाटते!!" मालती ताई दृष्टीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या.
"माझा क्षितिज असा नाही !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !!"
"मलाही असंच हवं आहे मुली !! तुझ्या या अश्या असण्यामुळे आधीच तू खूप काही भोगलं आहेस !! तुझं भविष्य सुंदर व्हावं एवढंच वाटत मला ! "

दृष्टी नकळत मालती ताईला मिठी मारते. मालती ताई भावनाला तिच्या खोलीत घेऊन जायला सांगते. जवळ उभी भावना तिला उठवत म्हणते
"चल दृष्टी ताई !!"
 हातातली काठी बाजूला ठेवून दृष्टी खोलीत जायला निघते. तेव्हा शेजारीच उभ्या काही मुली उगाच तिच्याकडे पाहून हसतात. भावना त्यांच्याकडे रागाने पाहत खोलीत जाते. दृष्टीला पलंगावर बसवून ती बाहेर निघून जाते. पलंगावर बसलेल्या दृष्टीच्या कानात मालती ताईचे ते शब्द घुमू लागतात.

"तू एक गरीब अनाथ अंध मुलगी आहेस !! आणि तो श्रीमंत घरातला मुलगा!!"

"माझा क्षितिज असा नाहीये !! हो मला माहितीये !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !! मी अनाथ अंध मुलगी असूनही त्यानं माझ्यावर नितांत प्रेम केलं !! हे पुरेस नाही का ?? माझा क्षितिज , या आंधळ्या मुलीला जग दाखवणारा !! तिची क्षणोक्षणी दृष्टी होणारा !! मला क्षणात सोडून जाणार नाही !! नाही !! नाही !!" अचानक दृष्टी बैचेन झाली आणि तितक्यात तिच्या पर्स मधून मोबाईल फोनची रिंग वाजली. ती भानावर येतं चाचपडत चाचपडत फोन शोधते. क्षणभर शोधल्यावर फोन सापडतो.

फोन उचलत ती बोलू लागते.

"हॅलो!! कोण बोलतंय ??"

"क्षितिज बोलतोय !!!" पलीकडून आवाज ऐकू येतो.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...