साद त्या भेटीची || Avyakt Prem Kavita ||


साद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??

कुठे कधी भेटावे नकळत
आस कोणती या मनास आहे!!
तुझ्या वाटेवरती उगाच ते
तुझीच वाट का पाहत आहे??

गंध पसरले दाही दिशांनी
तो गंध ओळखीचा आहे!!
तुझ्या येण्याचा भास मग
उगाच मला का होत आहे??

दवबिंदू होऊन पानावरती
मोती होऊन ते पसरले आहे!!
तुझ्या सोबतीचे क्षण जणू ते
पुन्हा मला का दिसत आहे??

ओलावा त्या माती मधला
नात्याची जाणीव होत आहे!!
पुन्हा बहरून येण्या जणू
ती पालवी का फुटली आहे??

नभी दाटल्या त्या ढगांनी
जणू हाक मज दिली आहे!!
तुझ्या नि माझ्या भेटीस
ती सरही आतुर का झाली आहे??

तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब भिजवत आहे !!!

✍️योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

मार्ग || मराठी कविता || सुंदर कविता ||


"शोधावी ती माणसं,
जी स्वप्नांशी झुंजत असतात !!
झोपलेल्या उगाच पाहत,
वेळ वाया घालवू नये !!

शोधावे ते मार्ग,
जे तुम्हाला खुणावत असतात !!
उगाच सगळे जातात म्हणून,
चालत राहू नये !!

शोधावे ते ध्येय,
जे तुम्हाला बोलत असतात !!
उगाच दुसऱ्यात कधी,
स्वतः स पाहू नये !!

शोधावी ती आग,
जी तुम्हाला पेटवत असते !!
दुसऱ्याच्या आगीत कधी,
खाख होऊ नये !!

शोधावी ती जिद्द,
पुन्हा उभा राहण्यासाठी !!
उगाच हताश होऊन,
रडत बसू नये !!

शोधावी ती ओळख,
आपलीच आपल्यासाठी !!
उगाच कोणाच्या सावलीत,
उभा राहू नये..!"

✍️योगेश खजानदार

नकळत || कथा भाग ५ || शेवट भाग ||


कथा भाग ५

त्रिशाला भेटून आल्यानंतर कित्येक वेळ समीर तिच्या आठवणीत रमून गेला. त्याच्या नजरे समोरून तिचा चेहरा हटतच नव्हता. त्याच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.

"आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ?? तो अपंग आहे हे कळल्यावर त्रिशा त्याला नकार देऊ शकली असती !! पण तिने तस केलं नाही फक्त बाबांच्या शब्दासाठी !! बाबांवराच्या प्रेमा साठी !! पण त्यानंतर सुद्धा ती प्रेम देतच राहिली !! मंदार आज तिच्यामुळे जिवंत आहे !! आणि मी पाहिलं आहे, त्रिशाही त्याच्यावर तेवढंच प्रेम करते आता !!  पण या सगळ्यात मी आजही तिथेच आहे!!  नाही का ?? माझ्या आठवणीत त्रिशा आजही तशीच आहे !"
समीर विचारांच्या तंद्रीत असतो. अचानक मेसेज टोन वाजते. तो मेसेज त्रिशाचा असतो.

" समीर ,

तुला आज भेटून खरंच खूप छान वाटलं !! मंदार ही तुझ खूप कौतुक करत होता. खरंच खूप  Thanks. मंदार आज खूप दिवसांनी मनसोक्त बोलला.!! उद्या मी संध्याकाळी निघते आहे !! आपण एअरपोर्टवरच भेटुयात !! गुड नाईट !!"
समीर मेसेज वाचल्यानंतर 'ठीक आहे, उद्या नक्की भेटू!!' असा रिप्लाय करतो.

"खरंतर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आणि त्याचा परिणाम आजही समीर भोगतो आहे !! त्याला वाटलं मी त्याला फसवल !! पण कधी कधी वेळ अशी येते की, आपल्या मनात नसतानाही आपल्या हातून घडायचं नसतं ते घडून जातं !! त्यावेळी समीरला मी सांगितलं असतं तर, कदाचित आज चित्र काही वेगळं असतं, नाही का ?? पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी !! समीर गेला आणि आयुष्यात मंदार आला !! मंदार तसा मनाने खूप छान !! त्या व्हीलचेअरच्या बंधनात तो अडकून पडला आहे !! आणि त्याला माझ्याशिवाय कोणीच सोबत नाही !! आज तस पाहिलं तर माझ्या मनाचा झुकाव मंदारकडे जास्त जात आहे !! तो माझा नवरा आहे म्हणून नाही !!तर त्याला सर्व काही माहीत असूनही तो माझ्यावर तेवढंच प्रेम करतो म्हणून !! आणि हीच गोष्ट मला त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा घेऊन येते !!" त्रिशा समीर निघून गेल्यावर आपल्या खोलीत बसून होती. मनात मंदार आणि समीर यांच्या विचारांचं काहूर माजलं होतं.
तेवढ्यात मंदार खोलीत येतो. थोडा धडपडत असतो. त्रिशा त्याला सावरून घेते. मंदार त्रिशा जवळ आल्यावर म्हणतो.
"आज समीरला मी मनातलं सगळं बोललो !!"
त्रिशा त्याच्याकडे बघत राहते. आणि म्हणते ,
"मग काय म्हणाला तो ??"
"डोळ्यातल्या अश्रूंशिवाय दुसर काहीच म्हणाला नाही तो !!"मंदार त्रिशाच्या डोळ्यात पहात म्हणाला.
क्षणभर थांबला आणि म्हणाला ,
"नकळत त्याच्यावर अन्याय झाला अस वाटत नाही तुला ?? दोष तुझाही नाही ना त्याचाही नाही !! पण ??" मंदार बोलता बोलता गप्प झाला.
"मंदार मला सगळं कळतंय !! त्याच्यावर अन्याय झाला आणि त्याची गुन्हेगार मी आहे हे मान्य आहे मला !!"
"मला तस नव्हतं म्हणायचं त्रिशा !!" मंदार तिला जवळ करत म्हणाला.
"तुला वाटत असेल की मी तुझ हे बोलणं ऐकून त्याच्याकडे निघून जावं !! पण तस काही होणार नाहीये !! " त्रिशा मनातलं बोलली.
" तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो !!"
"तुझ नाही माझ्यावर प्रेम ?? " त्रिशा एकदम बोलते . मंदार गप्प राहतो.
"आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे मंदार !!" त्रिशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्रिशा असे म्हणताच मंदारने तिला मिठी मारली. दोघे कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले.

पाहता पाहता रात्र सरून गेली. त्रिशा आणि मंदार परत पॅरिसला जाण्यासाठी तयारी करू लागले. समीरही आपल्या लिखाणात व्यस्त झाला. संध्याकाळी त्रिशाला भेटायचं हे कित्येक वेळा मनात घोकत होता.
"खरंतर प्रेमाची व्याख्या काय लिहावी हेच मला कधी कळल नाही !! पण मंदारला भेटल्यानंतर मी प्रेम काय असतं हे कधीच विसरू शकत नाही !! प्रेम हे आयुष्यभर सोबत राहण्यात असतंच !! पण प्रेम हे ती व्यक्ती आपल्या सोबत नसतानाही असतं !! प्रेम रंग बघत नाही !! रूप बघत नाही !! बघत ते फक्त समोरच्या व्यक्तीचा आनंद !!  आणि गेली दहा वर्ष माझ्या कथेत या भावनेची कमीच राहिली !! ते लिखाण मनाला भावत होत पण मनाशी बोलत नव्हतं !! " समीर लिहित राहिला कित्येक वेळ मनातलं सगळं मनसोक्त मांडत राहिला. आणि तेवढ्यात घड्याळात पाच वाजल्याची बेल झाली.

घड्याळात पाहताच समीर जागेवरच उभा राहिला. पटापट आवरू लागला. त्रिशाला भेटायला जायचं हे लिहिण्याच्या नादात त्याच्या लक्षातच राहील नाही. तो आवरत राहिला. इकडे फोन सारखा वाजत होता. कोणाचा होता हेही त्याने पाहिलं नाही. पाहता पाहता पाचाचे साडे पाच वाजले. समीर आवरून बाहेर जाण्यासाठी दार उघडणार तेवढ्यात बेल वाजते. समीर घाई गडबडीत दरवाजा उघडतो तर समोर आकाश असतो. लगेच तो म्हणतो ,
" किती फोन केलेत बघ !! उचलत का नाहीयेस??"
"सॉरी यार !! पण मी थोडा घाईत आहे !! तू कसकाय इथे ?"
"तुला घेऊन जायला आलोय !! बाहेर मस्त बसुयात कुठे तरी!! घेऊयात मस्त एक एक ड्रिंक !! " आकाश हसत म्हणतो.
"नाही रे !! मला एअरपोर्टवर जायचयं !! पावणे सहा झालेत !! कार आणली आहेसना चल पटकन !! " समीर बोलत बोलत आकाशला खेचतच घेऊन जातो.

दोघेही कारमध्ये बसतात. समीर त्याला सगळं सांगतो. त्रिशाला भेटायची ओढ समीरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रत्येक क्षण त्याला खूप मोठा असल्या सारखा वाटत होता. बघता बघता दोघेही एअरपोर्टवर पोहचतात .समीर अक्षरशः पळतच जातो. आकाश कार पार्किंग होईपर्यंत समीर गेलेला असतो.समीर समोरच्या घड्याळात पाहतो. सहा वाजून गेलेले असतात. समीर हताश होऊन बसतो. स्वतःला दोष देत राहतो.
"आज कित्येक वर्षांनंतर मी त्रिशाला म्हटलं होत, की मला तुला भेटायचं आहे !! पण तेही मला नीट जमलं नाही !! तिला काय वाटलं असेल !! मी मुद्दाम आलो नाही !! की मला तिला पुन्हा भेटायचं नाही !! काय वाटलं काय असेल तिला!! ती आजही खूप प्रेम करते माझ्यावर !! माझं चांगलं व्हावं एवढंच वाटत राहतं तिला !! पण आज मी असा वागलो याचा काय परिणाम झाला असेल तिच्या मनावर !" समीर हताश होऊन विचार करत बसला. समोरच्या घड्याळात पाहात बसला.

"तुझी उशिरा यायची सवय काही जायची नाही बघ समीर !! " हताश समीरकडे पाहत कोणीतरी बोलत होते.
समीर वळून पाहतो तर ती त्रिशा होती. तिला पाहून समीर उठतो आणि म्हणतो.
"त्रिशा !! तू इथेच ?? सहाला फ्लाईट होती ना तुझी!!"
"होती !! पण सहाला नाही सात वाजता आहे !! " त्रिशा समीरकडे हसत पाहत म्हणते.
"म्हणजे !! " समीर विचारतो.
"मला माहित होत तुला उशीर होणार. म्हणून मुद्दाम मी तुला लवकर यायला सांगितलं होत !! कारण मला आपली ही भेट मिस करायची नव्हती !!" त्रिशा समीरकडे पाहत म्हणाली.
समीर फक्त ओठातल्या ओठात हसत प्रतिसाद देत राहिला.
"मंदार ??" समीर म्हणाला.
"बसलाय वेटींग रुममध्ये!!"
"पुन्हा कधी भेटणार ??"
"असच केव्हा तरी !! " त्रिशाला ही तो प्रत्येक क्षण जड वाटू लागला.
"तुझ्या शिवाय हे जग खूप रिकाम वाटत होत !! पण आता नव्याने सुरुवात करावी अस वाटू लागलंय !!" समीर शेजारच्या फुलांकडे पाहत म्हणाला.
"मलाही तुझ्याकडून हेच हवं आहे समीर !! नव्याने सुरुवात कर !! " त्रिशा भरल्या आवजात बोलत होती.
दोघेही कित्येक वेळ शांत राहतात. आणि तेवढ्यात फ्लाईट ची announcement होते. त्रिशा जायला निघते. मागे मंदार व्हीलचेअर वरून येताना दिसतो. समीरला पाहून म्हणतो,
"समीर!! बर झाल तू आलास !! मला ना ऑटोग्राफ हवा आहे या पुस्तकावर ! काल बोलण्याच्या नादात राहूनच गेलं!"
"माझा ऑटोग्राफ !!" समीर हसत म्हणतो.
"हो !! "  मंदार पुस्तक त्याच्याकडे देतो.
समीर पुस्तक घेतो. त्याच मागच्या वर्षी लिहिलेलं "नकळत" हे पुस्तक होत ते. त्यावर ऑटोग्राफ घेऊन मंदार पुढे निघून जातो. जाताना पुन्हा भेटुयात अस ठणकावून समीरला सांगतो.पण त्रिशाचा पाय काही निघता निघत नव्हता. अखेर शेवटची announcement झाल्यानंतर ती निघते. जाताना समीरला बोलते.
"तुझी काळजी घे !! पुढच्या वेळी भेटू तेव्हा मला माझा जुना समीर हवा आहे !! कॉलेज मधला !! " त्रिशा एवढं बोलून समीरला घट्ट मिठी मारते.

जाणाऱ्या त्रिशाला कित्येक वेळ समीर पाहत बसतो.  कार पार्किंग करून आलेला आकाश धावत येतो. स्वतःत गुंग झालेल्या समीरकडे पाहत म्हणतो.
"भेटली ??"
समीर फक्त होकारार्थी मान हलवतो. पाठमोऱ्या जाणाऱ्या तिला आठवतो. आपल्या नव्या आयुष्याची भरारी घेण्यास निघतो. समीर नव्याने जगण्यास निघतो, त्याच जुन्या समीरला भेटण्यास निघतो, जिथे भेट झाली होती त्याची आणि त्रिशाची, त्याच त्रिशाला उगाच म्हणतो,

"भेट व्हावी तुझी नी माझी
नकळत एका वाटेवरी
सोबतीस यावी पुन्हा तू तेव्हा
ओढ कोणती माझ्या मनी

थांबशील तू क्षणभर जेव्हा
वेळ थांबेल क्षणभर जरी
जगून घेईल मी आयुष्य सारे
राहील एक आठवण मनी

सांग नव्याने सारे काही
प्रेमाची ती सुरुवात जरी
लांब तिथे तू असशील जेव्हा
इथे असेल चित्र तुझे मनी

भेट व्हावी तुझी नी माझी
नकळत एका वाटेवरी ..!!"

*समाप्त*

✍️ योगेश खजानदार

नकळत || कथा भाग ४ || प्रेमाच्या कथा ||


कथा भाग ४

त्रिशाला भेटून समीर घरी गेला.तेव्हा आकाश त्याची बाहेर वाटच पाहत होता.
"काय सम्या किती वेळ !! वैतागलो बाहेर थांबून !! " आकाश समीरला जवळ येताना पाहून म्हणाला.
"Sorry!! अरे भेटायला गेलो होतो मित्राला म्हणून उशीर झाला!!" समीर फ्लॅटचा दरवाजा उघडत बोलत होता.
बोलत बोलत दोघेही आत गेले. आकाश सोफ्यावर बसतं म्हणाला.
"कोणाला भेटायला गेला होतास ?"
आकाशच्या या प्रश्नाने समीर शांत राहिला. आकाश पुन्हा म्हणाला.
"अरे कोणाला गेला होतास भेटायला.?"
समीर पुन्हा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला,
"त्रिशाला!!"
आकाश हे ऐकून अचानक बोलला,
"काय ?? त्रिशाला ??"
"हो !!"
"अरे पण कस काय ?? म्हणजे !! अरे !! तिला ?काय म्हणाली मग ती ?" आकाश कित्येक प्रश्न विचारू लागला.
"अरे काही नाही सहजच भेटायला बोलवलं होत तिने .!! खूप वर्षांनी भेट झाली ना म्हणून !! बर ते जाऊदे !! तू इथे कसाकाय ??"
"आमच्या हीचे नातेवाईक आलेत घरी !! उगाच डोक्यात जातात, म्हटलं चला आज इथे राहुयात!! चालेल ना ??"
आकाश समीरकडे पाहून हसला.
"म्हणजे काय यार !! हे काय विचारणं झालं!! "

समीर आणि आकाश दोघेही कित्येक वेळ बोलत बसले. गॅलरी मध्ये बसून जुन्या आठवणीत गुंग झाले.
"म्हणजे बाबांच्या मर्जीसाठी तिने त्या मंदारशी लग्न केलं तर !"
समीर काहीच बोलला नाही. फक्त मान हलवून होकारार्थी उत्तर देत राहिला.
"आणि उद्या तू भेटायला जाणार आहेस तिला??"
"हो " समीर मध्येच बोलला.
अजुन पुन्हा म्हणाला.
"पण जाऊ कारे भेटायला मी ??"
"म्हणजे काय !!! जा ना !! हे बघ समीर झालं गेलं यात तुझी काहीच चूक नव्हती ना तिची काहीं चूक होती!!  जे काहीं राहून गेलं यात कोणाचीच चूक नाही अस मानायच आणि सगळं विसरून जायचं !!" समीर सिगरेट ओढत म्हणाला.
"पण मला काय बोलावं काहीच कळणार नाही त्याला !! "
"सगळं विसरून जा भेटायला !!"
समीर आणि आकाश बोलता बोलता झोपी गेले. मध्यरात्री पर्यंत ते बोलत राहिले.

दिवस उजाडला तसे समीरला त्रिशाकडे जाण्याची ओढ लागली. खरतर पुन्हा भेटावं अस त्याला कधीच वाटलं नव्हतं. पण आता त्यालाही मंदारला भेटायचं होत. त्रिशा सुद्धा त्याची वाट पाहत होती.
सगळं आवरून झालं. आकाश सकाळीच आपल्या घरी निघून गेला. जाताना समीरला, नक्की भेटून ये अस निक्षून सांगून गेला. तस समीर आवरून निघाला. क्षणभर त्याचे पाय घुटमळले पण पुन्हा त्या भेटीस आतुर झाले. दिलेल्या पत्त्यावर तो थोड्याच वेळात पोहचला. दरवाजाची बेल वाजवुन थांबला. थोड्याच वेळात दरवाजा उघडला समोर त्रिशा होती.
"समीर !! ये ना !! ये "
त्रिशा समीरला पाहून खुश झाली. त्याला घरात ये म्हणत ती आत गेली. समीर एकटाच बसून होता. समोर त्रिशा आणि मंदारचा फोटो भिंतीवर पाहून तो क्षणभर त्याला पाहत राहिला. त्रिशा बाहेर येत पुन्हा समीरला बोलू लागली.
"तुला पत्ता शोधायला काही अडचण नाहीना झाली !!"
"नाही लगेच मिळाला पत्ता !!" समीर थोडा हळू आवाजात बोलला.
दोघेही थोडा वेळ बोलत बसले. आणि तेवढ्यात कोणीतरी त्रिशाला हाक मारत होतं , तो मंदार होता. त्रिशा आत गेली आणि त्याला बाहेर घेऊन आली. समीर आणि मंदार समोरासमोर आले. समीरला काहीच बोलायचं कळेना. त्रिशा त्याला व्हीलचेअर वर घेऊन आली होती. मंदारला चालता येत नाही. हे त्याला कळलं. तो निशब्द झाला.
"Hii !!मी मंदार !! " व्हीलचेअर वर बसलेला मंदार हात पुढे करत म्हणाला.
"Hii !!" समीर निशब्द झाला.
"खूप ऐकलंय बर तुझ्या बद्दल मी त्रिशाकडून !! "मंदार हसत म्हणाला.
समीर फक्त त्याच्याकडे पाहून ओठातल्या ओठात हसत प्रतिसाद देत होता. त्रिशा मागे उभी राहून समीरकडे पाहत होती. तिला समीरला काय बोलावं हे कळत नाही लक्षात आल होत.
"तुम्ही दोघे बोलत बसा !! मी आलेच !!" त्रिशा एवढं बोलून आत निघून गेली.

कित्येक वेळ मंदार आणि समीर बोलत राहिले. समीर खूप कमी बोलू लागला, मंदारला ते लक्षात आल त्यामुळे तो लगेच म्हणाला,
"समीर !! तुझी पुस्तक मीपण वाचली आहेत बर !!"
"होका !! तुलाही वाचायला आवडत का ??"
"नाहीरे !! त्रिशा तुझी एवढी मोठी फॅन आहे की तिच्यामुळे मीपण वाचत असतो !!" व्हीलचेअरच्या चाकाकडे पाहत मंदार म्हणाला.
समीरला काय बोलावं तेच कळल नाही, त्याला पाहून मंदार पुन्हा म्हणाला.
"मज्जा केली रे ! मीपण वाचतो पुस्तक खूप वेळ !! काय आहेना या व्हीलचेअर बसून वेळच जाता जात नाही !! मग वाचत असतो कित्येक पुस्तक !!!" मंदार थोडा भावनिक होत म्हणाला.

समीरला ते लक्षात आलं .तेवढ्यात त्रिशा किचन मधुन बाहेर आली. सोबत आणलेली कॉफी देत ती बोलू लागली.
"मंदार आणि मी तुझ्या कित्येक कविता गुणगुणत असतो !! "
त्रिशा आणि मंदार एकमेकांस पाहून हसतात. समीर निशब्द असतो.
तेवढ्यात मंदाराच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. तो मोबाईल मध्ये पाहतो आणि त्रिशाला बोलतो.
"Confirm !!"
त्रिशा फक्त त्याच्याकडे पाहते. आणि म्हणते ,
"आलेच मी !!" आणि ती किचन मध्ये निघून जाते.
समीर पाठमोऱ्या तिला जाताना पाहत राहतो. आणि मग मंदार बोलायला लागतो.
"समीर पण माझी एक कंप्लेंट आहे बर तुझ्याकडे !!"
"कोणती !! " समीर मंदारकडे पाहत बोलतो.
"कथेत नायक आणि नायिका भेटलेच, तरच प्रेम पूर्ण होत अस नायकाला वाटत राहतं हे !!"
"पण प्रेम केलं तर ते भेटायला हवंच ना?" समीर एकदम प्रश्न विचारतो.
"न भेटताही प्रेम करता येतं ना ??" मंदार समीरच्या डोळ्यात पहात बोलतो.
समीर क्षणभर गोंधळतो. आणि पुन्हा मंदार बोलतो.
" त्रिशा तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करते समीर !!पण ती माझ्यात अडकून पडली आहे !! मी म्हटलं तिला !! तू माझा विचार करू नकोस !! मी काय राहील छान !! पण तू तुझ्या समीरकडे परत जा !! " मंदार डोळ्यात येणाऱ्या अश्रुस आवरत म्हणाला.
"मंदार !!" समीरच्या ही डोळ्यात मंदारच बोलणं ऐकून पाणी आल. तो उठला आणि मंदार जवळ जात म्हणाला.
"प्रेमाची व्याख्या लिहिताना मी किती छोटा आहे हे मला आज समजतंय!! पण मंदार तुझी ही अवस्था ??"
समीर मंदारकडे पाहत बोलू लागला.
"लग्नाआधी हे जग फिरायची इच्छा होती माझी!! आणि एका अपघाताने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. !! खरतर जीव द्यावा असा मनात विचार होता. पण मी असा असूनही माझ्याशी लग्न करायला तयार असलेल्या त्रिशाला पाहून पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळाली. !!" मंदार समीरला मनातलं बोलू लागला.
"तुला माहितेय पहिल्यांदा पाहिलं ना मी तिला !! तर तिच्या प्रेमातच पडलो मी !! आजही क्षणाक्षणाला ते वाढतच आहे !! " मंदार समीरकडे एक स्मितहास्य करत म्हणाला.

दोघांत बोलणं चालू असतानाच त्रिशा बाहेर येऊ लागली. समीर आणि मंदार स्वतःला सावरत नीट बसले. मंदार तिला पाहून म्हणाला.
"काहीही म्हणा त्रिशा !! आपण ज्यांचे लिखाण वाचतोना !! त्यांना भेटण्यात वेगळीच मजा असते ! "
"होणं !! " त्रिशा समीरकडे पाहत म्हणाली.
समीर कित्येक वेळ बसला. आणि पुन्हा तिथून निघाव अस त्याला जाणवू लागलं.
"चल त्रिशा !! मंदार !! मी निघतो आता !! जावं लागेल मला !! "
मंदार हे ऐकून एकदम म्हणाला .
"अरे !! अस कस !! जेवण कर आणि मग जा !"
"खरंच नको !! मी पुन्हा येईल जेवायला कधीतरी!! " समीर त्रिशाकडे पाहून म्हणाला.
"मग तुला पॅरिसला यावं लागेल बरं का !!" मंदार थोडंसं हसत म्हणाला.
"पॅरिसला ??" समीर प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.
त्यात मध्येच त्रिशा बोलू लागली.
"आम्ही उद्याच पॅरिसला निघतोय !! दोन तीन वर्ष झाली तिकडेच होतो !! मागच्या महिन्यातच इकडे भारतात आलो होतो !! सगळ्यांशी भेट होईल या निमित्ताने !!" त्रिशा कित्येक वेळ समीरकडे पाहत राहिली.
"आत्ताच आला मेसेजपण फ्लाईट ची tickets book झाली म्हणून!!" मंदार मोबाईल मध्ये पाहतो.
समीर क्षणभर निशब्द झाला आणि म्हणाला,
"उद्या किती वाजता निघत आहात ??"
"संध्याकाळी सहा वाजता आहे फ्लाईट !!" त्रिशा शांत बोलत होती. तिच्या आवाजात एक दुःख जाणवत होत.
"ओके!!"
एवढं बोलून समीर आता निघाला.

त्रिशा त्याला सोडायला बाहेर पर्यंत आली. समीर तिला येताना पाहून म्हणाला.
"मी जातो आता !! "
"नक्की !!" त्रिशा अगदिक होत म्हणाली.
समीर दोन पावले पुढे गेला आणि मागे फिरून तिला म्हणाला.
" जायच्या आधी एकदा भेटशील मला??"
समीर असे म्हणताच त्रिशाच्या डोळ्यात पाणी आले. तिला काय बोलावं कळलंच नाही. मान होकारार्थी हलवत ती फक्त हो म्हणाली.
समीर निघाला त्याला जाताना त्रिशा कित्येक वेळ पाहत राहिली.

क्रमशः.

✍️ योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ५ || शेवट भाग ||

नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||


समीर,

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! "
समीरने मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.

"नाही!! मला तुला भेटायचं नाहीये !!  Sorry!!"
मेसेज केल्या नंतर कित्येक वेळा नंतर त्रिशाचा पुन्हा रिप्लाय आला.
"एकदा भेटशील फक्त !! खूप काही बोलायचं आहे रे मला !!"
"नको पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करुस त्रिषा!! तू तुझ्या संसारात खुश रहा !! मला बाकी काही नको !! " पुन्हा समीरने रिप्लाय केला.
"तू नाही भेटलास तर मी कधीच खुश नाही होऊ शकणार !!" समीर या मेसेज नंतर कित्येक वेळ विचार करत राहिला आणि पुन्हा  त्याने मेसेज केला.
"ठीक आहे !! कुठे भेटायचं ??"
"आपण दोघे पूर्वी भेटायचो त्याच कॅन्टीन मध्ये भेटुयात !! कॉलेज शेजारी! सकाळी १० वाजता! "
"Ok !!"

उद्या भेटायचं अस सांगून समीर त्रिशाच्या कित्येक आठवणीत गुंतला. स्वतःला त्या जुन्या कॅन्टीन मध्ये पाहू लागला. डोळ्या समोर कित्येक चित्र फिरू लागले. आणि जणू बोलू लागले.
"मी आणि त्रिशा तासनतास त्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसायचो. गप्पा, मस्करी , वाद-विवाद सगळं काही व्हायचं तिथे. पण मनभेद कधीच झाला नाही. मी त्रिशा, आकाश ,सायली, मन्या , ओंक्या आमचा नुसता गोंधळ असायचा तिथे. काय दिवस होते यार !! " समीर सिगारेट ओढत कित्येक वेळ तसचं बसून राहिला. पाहता पाहता आठवणींच्या शहरातून बाहेर येई पर्यंत सकाळ झाली होती.

समीर घड्याळात पाहतो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. लगबगीने तो उठतो आणि आवरू लागतो. मनात कितीही राग असला तरी ते प्रेम त्याला तिच्याकडे खेचत होत. त्यालाही ते माहीत होत. की आपण कधीच निष्ठुर वागू शकणार नाही. राग असेल पण तो प्रेमाच्या वाटेवर असेल हेही त्याला माहित होत. कितीही प्रयत्न केला तरी त्याला निघायला उशीर झाला. रात्रभर तो जागाच राहिला होता त्यामुळे त्याचा चेहरा सुकून गेला होता. अखेर तो त्या कॅन्टीन जवळ येतो.  तेव्हा त्रिशा त्याच्या आधीच तिथे येऊन बसली होती. कित्येक वेळ झालं त्याची वाट पाहत होती. समीर तिच्या जवळ जातो.

"Sorry !! थोडा late झाला!! " समीर त्रिशाकडे पाहत म्हणतो.
त्रिशा त्याच्याकडे पाहून हसते. अगदी हलकेच पाहते, आणि म्हणते,
"काही हरकत नाहीरे !! मीपण आत्ताचं आले आहे !!" त्रिशा कित्येक वेळ वाट पाहत बसली होती हे ती त्याला सांगतच नाही.
समीर समोरच्य खुर्चीवर बसतो. दोघे कित्येक वेळ काहीच बोलत नाहीत. तेवढ्यात कॅन्टीनचा वेटर मध्येच येतो आणि म्हणतो.
"मॅम !! तीन तास झालं बसलाय तुम्ही इथे !! आता तरी काही ऑर्डर द्या ना !"
त्रिशा क्षणभर गोंधळून जाते आणि म्हणते
"दोन कॉफी !! "
आणि वेटर निघून जातो.
समीर फक्त त्रिशाकडे पाहत राहतो. त्याला जे म्हणायचं होत ते नकळत तिला कळल होत, आणि मग न राहवून त्रिशा बोलायला सुरुवात करते.

"दहा वर्षात किती काही बदलून गेलं ना समीर !!"
समीर काहीच बोलत नाही , फक्त त्रिशाकडे एकदा पाहतो.
"या दहा वर्षात कुठे होतास ,कसा होतास !! मला काही माहीत नव्हतं. अस नाही की मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण मी माझ्यातच एवढी गुंतून गेले की मला तुझ्यापर्यंत पोहचताच आलं नाही. " त्रिशा मनातलं बोलू लागली.
"मग आज पुन्हा भेटण्याचं कारण काय ?" समीर अगदी तुटक बोलला.
"या दहा वर्षात खूप काही साचलं आहे रे या मनात !! तुझ्या कित्येक आठवणी आहेत !! तू आहेस आणि !!!"
"आणि काय ?" समीर प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला.
"आणि मंदार आहे !!" त्रिशा लगेच बोलली.
"मंदार कोण ?"
"My husband!!"
त्रिशा असे म्हणताच समीर क्षणभर अस्थिर झाला. आणि म्हणाला.
"चल मी निघतो !! "
"नाही समीर !! थांब !! खूप वर्षांनी मला माझं मन मोकळं करायचं आहे !! "
"पण माझं मन नाही ऐकू शकणार हे !! तुला माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणासोबत पाहणं मला नाही शक्य होणार !!"
समीर जागेवरून उठतं म्हणाला. त्रिशा त्याचा हात धरून त्याला बसवू लागते.
"मला तुझी ही स्थिती बघवत नाहीरे समीर !! " त्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
समीर तिच्याकडे पाहाताच खाली बसला.

समीर बसताच त्रिशाही पुन्हा समोरच्या खुर्चीवर बसली. आणि बोलू लागली.
"तुला वाटत की तुला न सांगता तुझ्या आयुष्यातून निघून गेले !! पण तस नाहीरे समीर !!"
"नकोस पुन्हा यात गुंतुस त्रिशा !! " समीर फक्त एवढंच म्हणाला.
"पण तुला ऐकावं लागेल समीर !! एकदा ऐकून घे !! "
समीर आता शांत झाला होता. तो त्रिशाच सगळं बोलणं शांत ऐकू लागला.
"कॉलेज मध्ये आपण एवढं गुंग होतो की बाहेर काय चालतं हे आपल्याला माहीतच नसतं !! तू होतास आणि मी !! आपलं तस दुसरं जगच नव्हतं !! पण आपली ही सगळ्यात मोठी चूक होती. आपलं घर हे ही एक वेगळं जग आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत. आणि तसचं काहीस माझं झालं !! तुला माहितेय लास्ट इअर नंतर आपण पिकनिकला गेलो होतो !! "
"हो ! कसा विसरेल मी !! ती आपली शेवटची भेट !!" समीर कॉफी घेत म्हणाला.
"त्यावेळी बाबांचा फोन आला!! मला लगेच ये म्हणाले.!! खूप अर्जंट आहे !! मी तसचं निघाले !! कोणाला काहीही न सांगता !! आणि कारणं, काय झालं आहे हे मलाही माहित नव्हतं !! " त्रिशा अगदी अगदिक होऊन म्हणाली.
"तू न सांगताच गेली होतीस !!"
" पण ती वेळच तशी होती रे !! बाबांचा शब्द मोडायचा नको म्हणून मी काहीच तुला बोलले नाही !मला म्हणाले कोणाला काही बोलत बसू नकोस !! लगेच ये! तडक नाशिकला निघून गेले !तेव्हा तिथे पहाते तर बाबा गेले होते !जायच्या आधी त्यांनी मला कॉल केला होता! मी येई पर्यंत खूप काळजी करेन म्हणून त्यांनी फोनवर मला काहीच सांगितलं नव्हतं !! " त्रिशा डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती. तीचं बोलणं ऐकून समीरही आता तिला सावरत होता.
"पण पुन्हा तू कधीच मला काही नाही भेटलीस ?? मला खरंच हे आज कळतंय तुझ्याकडून, तुझ्या बाबांन बद्दल !!"
"कारण बाबांनी माझं भविष्य आधीच ठरवलं होत !! मंदारशी लग्न ठरवलं होत.!! आणि बाबांची शेवटची इच्छा म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं !! " त्रिशा आता सावरली होती.
समीर आता तिला मनमोकळ बोलू लागला. कित्येक रागाचे बंध आता तुटून पडले होते.
"खरंच ..!! मला माफ कर त्रिशा !!! मी तुला समजून न घेता !! तुला दोषी ठरवल !!पण तू अशी निघून गेलीस की मला तुझा राग आला !! पण यानंतर तरी तू पुन्हा कधीच भेटायचा प्रयत्न केला नाहीस!!!"
"तुझ्या समोर यायचं धाडस होत नव्हतं रे !!"
"राग होता तुझ्याबद्दल!!पण प्रेम आजही कमी नाही !! " समीर एक गोड स्मित करत म्हणाला.
दोघेही क्षणभर शांत झाले. आणि अचानक समिरचा फोन वाजतो. समीर फोन उचलतो आणि बोलतो.

"हॅलो !!हा बोल आकाश !! "
"अरे सम्या कुठे आहेस तू !! तुझ्या घरी आलो मी !! "
"आलोच मी थोड्या वेळात !! थांब तू ! "
"हो ये !! मी थांबतो तोपर्यंत !! "
"ओके "

त्रिशा फोनवर बोलत असलेल्या समीरकडे बघत असते . समीर फोन ठेवतो आणि त्रिशा बोलते.
"कुठे जायचं आहे का तुला ? "
"Actually !! आकाश आलाय घरी !! !" समीर थोड खुर्चीवर स्वतःला सावरून बसतं म्हणतो.
"ठीक आहे मग आपण पुन्हा भेटुयात !! किंवा अस कर ना !! उद्या माझ्या घरीच का येत नाहीस !! मंदारला ही भेटणं होईल तुला !! "
समीर हे ऐकून थोडा वेळ शांत बसतो. पण तेवढ्यात त्रिशाच बोलते.
"ये ना रे !! प्लीज !! "
त्रिशा कित्येक वेळ त्याला मनवते. आणि अखेर समीर बोलतो.
"ठीक आहे येतो नक्की !! नक्की येतो !!"
त्रिशा हे ऐकुन खुश होते .
"ठीक आहे !! Address मी तुला मेसेज करते!! मग उद्या भेटुयात !! संध्याकाळी !! ओके !!"
"ओके"

समीर आणि त्रिशा दोघेही जायला निघतात. त्रिशाला आपल्या मनावरच ओझ कमी झाल्यासारख वाटत होत. समीर ही आता त्रिशा बद्दल राग विसरून नव्याने विचार करू लागला होता.

पुन्हा उद्या भेटण्याचं वचन देऊन दोघेही गेले. समीर घरी आला. तिथे आकाश त्याची वाटच पाहत होता.

क्रमशः

✍️ योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ४ || प्रेमाच्या कथा ||

नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

 

कथा भाग २

  समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती.
"आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. "

"त्रिशा !! लक्ष कुठ आहे तुझ ??" शेजारीच उभी असलेली सायली तिला बोलत होती.
सायली आणि आकाश बोलत बोलत त्रिशापासून वेगळे झाले. दोघेच बोलत बसले. त्रिशा कित्येक वेळ एकटीच बसून होती. काही मित्र मध्येच येऊन क्षणभर बोलून जात होते एवढंच. पण समीर काही तिच्याकडे येत नाही हे तिला लक्षात आले. एका बाजूला समीरही एकटाच बसून होता. अखेर त्रिशाच उठून समीरकडे गेली. तिला आपल्या जवळ येताना पाहून समीर थोडा गोंधळून गेला.

"Hii..!!" त्रिशा समीर समोर येत म्हणाली.
समीर थोडा हळू आवाजातच बोलला.
"Hii!!"
"कसा आहेस ??"
"मी ठीक,, तू कशी आहेस ??" समीर तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मीपण मजेत !!"
"कधी आलास ??"
"Just आत्ताचं आलोय !!"
"बाकी ??"
"मस्त !!"

समीर आणि त्रिशा मनमोकळ बोलतच नव्हते. त्यांनाही ते जाणवून आलं. नात्यावर कित्येक वर्षांची धूळ बसली होती. कदाचित त्याची जाणीव दोघांनाही झाली होती.
"तुझं पुस्तक वाचलं मी मध्ये !! खूप छान लिहिलंय !!" त्रिशा लांब उभारलेल्या आकाशाकडे पाहू लागली. तोही त्या दोघांकडे फक्त पाहत राहिला.
"तू वाचलंस माझं पुस्तक ??" समीर आश्चर्य होऊन पाहू लागला.
"तुझी आतापर्यंतची सगळी पुस्तकं वाचली मी !!" आता त्रिशा थोडी मनमोकळ बोलू लागली.
"Nice !! " पण  अजुनही समीर तुटकच बोलत होता.
त्या छोट्याश्या get-together मध्ये सगळे गुंग झाले होते. जुन्या मित्रांन मध्ये कित्येक आठवणी जाग्या करत होते. पण या जुन्या आठवणीत एक हळूवार प्रेमाची आठवणही आपली पान उलगडू पाहत होती. समीर आणि त्रिशा आपल्यात हरवून गेली होती. मध्येच एखादा मित्र यायचा आणि दोघांना बोलत बसायचा. पण दोघेही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. बोलायचं खूप होत पण दोघांनाही शब्द भेटत नव्हते.

"तुझ्या प्रत्येक कथेत , नायक आणि नायिका यांचं प्रेम अखेर अधुरेच राहिलं हे थोड मनाला लागत रे !!" त्रिशा समीरला अगदिक होऊन म्हणाली.
"मलाही ते खटकत खूप ! " समीर त्रिशाकडे पाहत राहिला. तिला पुढे काय बोलावं सुचेचना. ती क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यात अलगद एक अश्रू आला. पण तिने तो समीरच्या नकळत पुसला.
"आयुष्यात फक्त सोबत असणं यालाच प्रेम म्हणतात ??" त्रिशा शांत म्हणाली.
"नाही !! पण न सांगता निघून जाणं याला तरी कुठ प्रेम म्हणायचं ??" समीर त्रिशाकडे कित्येक वेळ नजर रोखत म्हणाला.
त्रिशा आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. सायली आणि आकाशही रमले होते. बघता बघता get-together पार्टी संपत आली होती. सगळ्यांनी खूप मजा केली. अखेर निघताना सगळे एकमेकांना पुन्हा भेटण्याचं वचन देऊ लागले.
"चल सायली !! पुन्हा भेटू आपण !! नंबर तर घेतला आहेच तुझा !! उद्या call करतो..!! " आकाश सायलीला मिठी मारत बोलत होता. शेजारीच त्रिशा आणि समीर उभे होते.

तेवढ्यात त्रिशाचा फोन वाजतो. ती उचलते आणि बोलते .
" हॅलो !! हा बोल !! हा आलेच !! लगेच आले !! Wait !! " एवढं बोलून ती फोन कट करून कोणाला काहीही न बोलता निघून जाते. समीर आकाश फक्त बघत राहतात. सायली तिच्या मागे अक्षरशः पळत जाते. तिलाही काही कळत नाही.
"समीर !! " आकाश समीरकडे पाहतो आणि बोलतो.
"चल यार !! निघू आता !! तुला जाताना सोडायचं आहे !! आणि मग पुन्हा खूप उशीर होतो!! "
समीर आणि आकाश दोघेही पुन्हा घरी जायला निघतात. Get-together चे कित्येक सुंदर क्षण सोबत घेऊन जातात.
कार मध्ये जाताना दोघेही एकमेकांशी खूप काही बोलत असतात. त्रिशा तिची भेट, सायली काय म्हणाली. वगैरे वगैरे.
"मग !! काय झालं का बोलणं ??" आकाश हसत समीरला विचारतो.
"खास अस काही नाहीरे !! " सहजच झालं बोलणं!! विशेष अस काही नाही."
"हा तरीपण बोललीना ती !! भेटलात ना तुम्ही !! "
" हो पण !! आकाश यार ! तीचं लग्न झालं !! आणि ती पूर्वीच्या सगळ्या आठवणींतून बाहेर पडली असावी असच वाटलं मला!! मी भेटलो त्रिशा सरदेसाईला !! पण ही माझी त्रिशा नव्हती रे !! माझी वाटलीच नाही"
"काय म्हणतोय सम्या तू काही कळल नाही बघ!!"
"She's married !! मी त्रिशाला भेटलो !! पण मी जिच्यावर प्रेम करत होतो ती ही नाहीरे !! तीच वागणं बोलणं सगळं सारखं होत !! पण ती माझं प्रेम नाही, तर कोणाचं तरी आयुष्य झाली होती.!!" समीर डोळ्यात आलेला एक अश्रू पुसत म्हणाला.
"अरे यार सम्या !!! एवढं इमोशनल नको होऊस यार !! हे बघ !! आपण कॉलेज नंतर दहा वर्षांनी भेटत आहोत !! तीच लग्न झालेलं असणार !! त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! छोड ना यार !! " आकाश समीरला समजावून सांगत होता.
"आजही ती न सांगता निघून गेली !!आजही तिची ती सवय काही गेली नाही !! "
"काहीतरी काम असेल अर्जंट !! आकाश सावरत म्हणाला.

   आकाश समीरला त्याच्या घरी सोडून गेला. समीर एकटाच कित्येक वेळ फ्लॅटमध्ये रात्रभर त्रिशाच्या आठवणीत जागत राहिला.
"आज दहा वर्षा नंतर भेटलो तेव्हा खरंतर एका क्षणाला आनंद वाटला होता. पण तिच्या केसाच्या मध्ये हलकंस असलेलं कुंकू मला खूप काही बोलून गेलं. ती समोर आली तेव्हा एक क्षण मी हरवून गेलो तिच्यात, पण ते माथ्यावरच कुंकू मला खूप काही सांगून गेल. आयुष्यभर तिच्या आठवणीत एकटं राहायचं ठरवल होत. ती साथ द्यायला नक्की येईल कधीतरी, अस मन सतत म्हणत होत. पण एका क्षणात सार काही संपलं. ती येणार ही आशा मला एकांतात साथ देत होती. पण ती कधीच आता येणार नाही ही जाणीव मला एक एक क्षण जाळत आहे !!"समीर सिगरेट ओढत कित्येक वेळ बसला.
त्या सिगारेटच्या धुरात सगळं काही अंधुक झालं होत. आणि मध्येच मोबाइलची मेसेज टोन वाजते. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला ते समीर पाहतो.  तर तो त्रिशाचा असतो.

समीर मेसेज वाचू लागतो.

क्रमशः

✍️योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||

नकळत || कथा भाग १ || कथा ||



टीप :" नकळत  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

  "आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतलं चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं. पण मनाचा निर्धार मी आता केला आहे. ती समोर आली तरी तिला बोलणार नाही. पण खरंच इतका निष्ठुर वागू शकेल का ? माझंच मला नाही सांगता येणार. पण एवढं मात्र नक्की की तिला आयुष्यभर मी माफ नाही करणार. भेटलीच कधी तर .. तर?? नाही नको .!! मला नाही पुढचं लिहिता येणार ..!! " समीर लिहिता लिहिता थांबला. आणि तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलताच बोलू लागला.

" हा बोल आकाश !! "
फोनवर आकाश त्याचा जुना मित्र समीरला बोलू लागला.
"आज येतोयस ना तू संध्याकाळी!! "
"संध्याकाळी काय ?? " समीर म्हणाला.
"अरे !! विसरला तू !! Get-together आहे यार आपलं !! "
"अरे !! नाही ..!! मी नाही येत यार आकाश !!"
"ये नाही वैगेरे काही चालणार नाही बरं !! भेटायचं आहे संध्याकाळी  !! चल बाय !! "
आकाश लगेच फोन कट करतो.

समीर कित्येक वेळ विचार करत बसतो. त्याला तिथे जायचं नसतं. पण तरीही त्याला जावं लागत होत.

"आज कित्येक वर्ष लोटून गेल्यावर पुन्हा त्याच जुन्या सुंदर आठवणीत कोणाला जाऊ वाटणार नाही !! पण त्या आठवणी जर नकळत त्रासच देणार असतील तर !! मग कशाला भेटाव पुन्हा त्यांना !! पण नको म्हणूनही त्या समोर येत असतील तर...!! काय करावं !!आठवणीतल्या त्या कप्प्यात पुन्हा तिच्याशी भेट होणार.!! तिला पाहून मी पुन्हा तिच्याकडे खेचला जाणार. त्यापेक्षा गेलोच नाही तर ..!! पुन्हा सगळ्या मित्रात उगाच उलट सुलट अर्थ निघतील. त्यापेक्षा गेलेलच बर..! " समीर आपल्याच विचारात कित्येक वेळ बसून होता.

"ती वेळच सुंदर असते ना !! जेव्हा आपल्या आवडती व्यक्ती आपल्या सोबत असते !! तिच्यासोबत फिरायच , बाहेर जायचं, मजा करायची.कित्येक गोष्टी करायच्या, ज्या मनाला आनंद देतील. आपलं सुख , आपलं दुःख सगळं काही वाटून घ्यायचं. पुन्हा अचानक वेळ बदलून गेली की, त्यांनीही बदलायच आणि अस बदलायच की एका क्षणाचाही  विचार न करता एकटं टाकून सोडून जायचं. मग उरलं काय ते फक्त आपण पाहत बसायचं. त्या आठवणी उगाच जवळ घेऊन बसायचं. फक्त तिच्यासाठी."
समीर डोळ्यातले अश्रू पुसत उठला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. या विचारात कित्येक वेळ गेला हे त्याला कळलंच नाही, आणि जाण्यासाठी आवरू लागला. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. फोन उचलत समीर काम करु लागला.
"हा बोल आकाश !!"
"अरे कुठे आहे सम्या तू !!"
"अरे आवरतोच आहे !! पाच मिनिटं फक्त !! "
"लवकर आवर !! तुझ्या बिल्डिंग खाली थांबलोय !! "
"अरे आलो !! आलोच !! "
समीर लगबगीने आवरातो. आणि पटकन आवरून खाली जातो. समोर आकाश कित्येक वेळ झालं येऊन थांबला होता.

"काय सम्या किती उशीर !! " आकाश त्याला येताना पाहून म्हणतो.
"Sorry रे ..!! थोड लिहित बसलो आणि मग लक्षातच आल नाही वेळेचं !! "
"तू पण ना !! " आकाश कार मध्ये बसतं म्हणतो.
दोघेही आता कारमध्ये बसून निघतात. कारमध्ये बसल्या नंतर आकाश बोलू लागतो.

" सम्या आज कोण येणार आहे माहित आहे का !! सायली देशमुख !! तुला सांगतो !! जाम फिदा होतो रे कॉलेज मध्ये असताना मी !!तुला तर सगळं माहितीच रे !!!  पण तिने त्या कान्याशी लग्न केलं . वाटलं नव्हतं बर कान्या बद्दल !! डिग्री आणि पोरगी दोन्ही घेऊन गेला !! "  आकाश समीरकडे पाहून बोलायचं थांबला. त्याच लक्ष आपल्या बोलण्याकडे नाही हे त्याला कळलं.

" ये सम्या !! अरे लक्ष कुठ आहे ?? "
" कुठ नाही बोल ना !! "
"कसला एवढा विचार करतोय रे ??"
"काही नाही रे असच !!"
"दोस्त आहे मी तुझा साल्या !! मला वाटलं होतं आता बोलशील नंतर बोलशील पण नाही !! त्रिशाचा विचार करतोयस ना ??"
"नाही रे !! खरंच नाही !! "
" हे बघ !! सगळ्यापासून लपव पण माझ्या समोर नकोसं नाटक करू !!तुझा चेहराच सांगतोय सगळं !! सांग आता !!"
"खरंच काही नाहीरे तस !! " समीर आकाशाकडे पाहत म्हणाला.
"सांग!!"आकाश नजर रोखून त्याला म्हणाला.

"काय बोलू खरंच काही कळत नाही रे !! जिच्यावर मनापासून प्रेम केलं, ती आज कित्येक वर्षांनंतर पुन्हा समोर येणार !! हा विचारच सहन होत नाही रे !! एक मन म्हणत की पुन्हा कशाला तेच, आणि दुसरं म्हणत की भेट तरी एकदा !! पण यांच्या गोंधळात मला काहीच कळत नाही !! कशी असेल , कुठे होती , आता ती खुश आहे की नाही ! आणि असेल तर पुन्हा तेच आठवून कशाला द्यायचं !! काहीच कळत नाही !! तू म्हटल्या पासून काहीच सुचत नाहीये !! एवढं लिहिणारा मी पण त्रिशा समोर असेल तर शांत होतो.!! " समीर अगदी मनातलं बोलत होता.

"पण तू असा विचार करूच नकोस की ती आता कशी असेल वैगेरे !! ती येणार आहे की नाही तेही नीटसं बाकीच्यांनी मला सांगितलं नाही !! पण मला वाटतं जरी ती आली तरी तू तिला मनमोकळ बोलावंसं .!! कोणताही राग किंवा पूर्वीच काही मनात ठेवून नाही !!!आणि तू तर प्रेम केलंस ना तिच्यावर !! मग तर सोड ना यार !! ती खुश असेल तर आपणही खुश व्हायचं !! आणि दुखी असेल अस आपणच नाही विचार करायचा.!!"
"एवढं सहज आहे हे !!"
"नसलं तरी आपण करायचं !! मनाला कधी कधी फसवण्यात पण वेगळंच सुख असतं रे !! "

समीर पुढे काहीच बोलला नाही आणि कारमध्ये फक्त गाणं वाजत राहिलं. दोघेही get-together जिथे होणार होत तिथे येऊन  पोहचले. त्यांच्या अगोदर थोडेफार मित्र तिथे आले होते. समीर आणि आकाशाला पाहून सगळे खुश झाले. एकमेकांना भेटू लागले
"अरे यार !! मन्या कसा आहेस यार !! " समीर त्याला मिठी मारत बोलू लागला. आकाशही तसाच भेटला. जुन्या मित्रांना भेटून दोघेही हरवून गेले. पण समीरची नजर इकडे तिकडे फिरत होती. त्या सर्वांत त्रिशा कुठेच नव्हती.सगळ्यांच्या भेटी झाल्या कित्येक वेळ निघून गेला तरी ती आलीच नाही. आकाश समीरची तिला भेटण्याची तळमळ पाहत होता.
"सगळे आले का रे ??" आकाश दुसऱ्या एका मित्राला मुद्दामच विचारतं होता.
"हो आले ना !! "
"खरं ??" आकाश तोंड वाकड करून म्हणाला. कारण सायली ही अजुन आली नव्हती.
"अरे नाही यार !! अजुन त्रिशा नाही , सायली नाही !! ओंक्या सुधा आला नाही अजुन !! "
" सायली , त्रिशा येतो म्हणाल्या होत्या ??"
"Confirm नाही म्हणे काही !!म्हणून तर सगळे आलेच म्हणायचं ..!! "
एवढं सगळं विचारून झाल्यावर. अचानक तो मित्र बोलला.
"अरे आल्याचं त्या !! त्या बघ !! "
समीर ते ऐकतो आणि मागे पाहतो. तर त्रिशा समोरून येत होती. तिला कित्येक वर्षांनंतर पाहून तो एका क्षणात स्वतःतच हरवला.

" कित्येक वर्ष लोटली तरीही आज सुद्धा त्रिशा तशीच आहे !! ते लांब केस, ते डोळे तशेच अगदी मनातलं बोलणारे !! बदलं असा काहीच वाटत नाही !! अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला पाहिलं होत तसचं आजही वाटतंय !! होणं!! पण ..."

समीर भानावर आला. आणि नजर चुकवून दुसऱ्या मित्रांना भेटायला गेला.

क्रमशः

✍️ योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग २ || Marathi Katha ||

सांजवेळ || मनातल्या कविता ||


ती झुळूक उगा सांजवेळी,
मला हरवून जाते  !
मावळतीच्या सुर्यासवे,
एक गीत गाते !
त्या परतीच्या पाखरांची,
जणू ओढ पहाते !
ती झुळूक उगा सांजवेळी,
गंध पसरवून जाते !

कधी नभी ,कधी लाटांवर,
मनसोक्त फिरते !
जाता जाता क्षणभर थांबून,
आठवांचा पाऊस देते !
थेंब होऊन पानावरती,
दवबिंदू होऊन जाते !
ती झुळूक उगा सांजवेळी,
आपल्यास जाऊन भेटते !

आज इथे , उद्या तिथे,
क्षणभर न थांबते !
कोण इथे , कोण तिथे,
मनातलं गुपित ओळखते !
अबोल राहिले मी तरी,
सगळं काही ऐकते !
ती झुळूक उगा सांजवेळी, 
सोबतीस माझ्या येते !

✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...