ओझे भावनांचे || मराठी कविताप्रेमी ||


नकळत साऱ्या भावनांचे,
ओझे आज का झाले !!
काही चेहरे ओळखीचे त्यात,
काही अनोळखी का निघाले !!

बोलल्या भावना मनाशी तेव्हा,
सारे गुपित उघडे का झाले !!
क्षणभर सोबती हसवून जाता,
आपलेच का रडवून गेले !!

शोधले खूप उगाच स्वतःस,
अखेर ते शून्य का झाले !!
साथ आयुष्भर देणारे त्यास,
मधेच का सोडून गेले !!

क्षणभर हसून पाहिले असता,
मन थोडे शांत का झाले !!
अचानक अनोळखी कोणी मग,
आठवणी देऊन का गेले !!

हा भार पेलवत उगाच मग,
मन बोलते का झाले !!
भावनांशी खेळ कसला,
स्वतःस रडवून का गेले !!

उरल्या थोड्या क्षणात आता,
मोकळे ते का झाले !!
सारा भार मनास देऊन,
हलके ते का झाले !!

नकळत साऱ्या भावनांचे,
ओझे आज का झाले !!

✍️©योगेश खजानदार

स्मशान कथा || शेवट भाग ||


शेवट भाग

  "आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हाच सरपंच किती रुबाबात बसला होता !!! आज त्याची राख झाली!! ज्या वाड्यासाठी अट्टाहास केला तो तर मिळाला नाहीच !! भेटलं अखेर काय ?? तर ही समाधानाची छोटीशी जागा !! अखेरचं जळण्यासाठी !! पण हे का आणि कशासाठी ?? काल त्या लोहाराच्या कुटुंबाने आनंद दिला !! आणि क्षणात त्या विधात्याने आज सुधाला आजारी पाडून सार सुख हिरावून घेतलं !! माझ्या आयुष्याची सोबतीन सुधा !! माझी अर्धांगिनी सुधा !! माझी मैत्रीण माझं जीवन म्हणजे सुधा !!! सुधा !!! सुधा !!!"शिवा विचाराच्या सागरातून बाहेर आला आणि तडक खोपटात सुधाकडे गेला.
"सुधा !!"
"आत्ताच झोपलीये ती !!" सदा शिवाकडे पाहत म्हणाला.
शिवा सुधाजवळ बसला. त्याला सदाच्या डोळ्यातही काळजी दिसत होती.
"सुधा !! उठ तरी !! मी आहे शिवा !! " सुधाच डोकं मांडीवर घेत शिवा म्हणाला.
डोळे अर्धवट उघडत सुधा शिवाकडे पाहू लागली.
"तुला काही होणार नाही !! थोडा धीर धर !! आता येतील वैद्यबुवा !! मग बघ ठणठणीत बरी होशील तू !! "  शिवाच्या डोळ्यातून ओघळते अश्रू सुधाच्या डोक्यावर पडले.
सदाच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"आई !!! तुला काही होणार नाही !! " सदा जवळ बसत म्हणाला.
सुधा गालातल्या गालात एक पुसट हसली, अगदी हलकेच. तिच्यात आता बोलण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती. शिवाचा हात घट्ट धरून ती उठण्याचा प्रयत्न करू लागली.
"उठू नकोस !! " शिवा तिला नकारार्थी मान हलवून म्हणाला.
"सऽऽदा !! " सुधा पुसट बोलू लागली.
"तू शांत रहा !! तो आहे इथे !! "शिवा सदाला जवळ करत बोलू लागला.
सुधा हातवारे करत शिवाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती.
"काय हवंय तुला ??" शिवा काही न कळल्यामुळे तिला गप्प करत होता.
"ह !! काय ..??! सदा !! आणि मी ...!!!! बरं काय ??? आहोत आम्ही तुझ्या जवळ !!! " सुधा हातवारे करत होती त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न शिवा करत होता.
सुधा नकारार्थी मान हलवून पुढे काही हातवारे करू लागली. सदाच्या डोक्यावर हात ठेवत.
"सदा !! मी !! त्याची काळजी घेऊ !! " शिवा क्षणात मागे सरकला. आणि जोरात म्हणाला.
"तुला काही होणार नाहीये सुधा !! तुला जगायचं आहे !! माझ्यासाठी !!  या सदासाठी !! आपल्यासाठी !! " शिवा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला.
सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण शिवा खोपटातून बाहेर निघून गेला.
   "एवढ्याच साठी हे सगळं होत !! क्षणात निघून जायचं याचसाठी !!!ही राख जर अंत असेल तर कशाला देवा या जगण्याचा भार आमच्यावर ठेवलाय तू !! त्या भावनांचा भार !! त्या नात्यांचा भार !! कशासाठी ?? क्षणात या सगळ्यांना पोरक करून जाण्यासाठी !!! नाही !! देवा नाही !! मला हे दुःख नको आहे !!! " शिवा कित्येक विचार करत थकून गेला. झोपी गेला.
   सकाळच्या त्या किरणांनी रात्रीचे विचारांचे ओझे जणू हलके केले. शिवा झोपेतून उठला ते थेट सुधाजवळ गेला. सदा रात्रभर तिच्या जवळ बसून होता. सूधाची तब्येत आता खूप ढासळली होती. शिवा आणि सदा अगदिक होऊन बसले होते आणि तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले.
"शिवा !! "
शिवा बाहेर येऊन पाहतो तर वैद्यबुवा आले होते.  त्यांना पाहून शिवाला खूप बरं वाटलं.
"अरे !! आत्ता आलो गावावरून !! आलो तर आमची ही म्हणाली !! तू आला होता म्हणून !! तुझी बाय खूप आजारी आहे म्हटली.!! ते तडक इकडं आलो !!" वैद्यबुवा हातातली झोळी ठेवत म्हणाले.
"खूप बरं झालं बुवा तुम्ही आलात !! या ना !! काल सकाळपासून आशीच पडून आहे बघा !! अंग पण गरम लागतय !!"
वैद्यबुवा सुधाला तपासू लागले. काही मात्रा आपल्या झोळीतून काढत तिला देऊ लागले. शिवा आणि सदा दोघांकडे कुतूहलाने बघू लागले.वैद्यबुवा आपल्या झोळीतून काही औषध बाहेर काढत शिवाला म्हणाले.
"ही मात्रा !! थोड्या थोड्या वेळाने देत रहा !! "
"होय बुवा !! " शिवा.
वैद्यबुवा आणि शिवा खोपटातून बाहेर आले. वैद्यबुवा काही म्हणायच्या आत शिवा त्यांना विचारू लागला.
"बरी होईल ना सुधा !! "
"हे बघ शिवा !! तापेचा जोर चांगलाच वाढलाय !! आणि त्याचा परिणाम खूप वेळ झाल आहे !! मी काही औषध दिली आहेत !! पण सगळं त्या देवाच्या हाती आहे !! होता होईल तेवढी काळजी घे तिची!!" बुवा आपली झोळी हातात घेत म्हणाले.
पाठमोऱ्या वैद्यबुवांकडे जाताना शिवा कित्येक वेळ पाहत राहिला. त्याला वैद्यबुवांचे शब्द आठवू लागले. होता... !! होईल तेवढी काळजी घे !!" शिवाला काय करावं काहीच कळत नव्हतं. तो बाहेर कित्येक वेळ बसून होता. समोर दत्तू आलेला सुद्धा त्याला कळल नाही.
"शिवा !! अरे कुठं आहे लक्ष !!"
शिवा भानावर येत दत्तुला बोलू लागला.
"दत्तू तू कधी आला ?? "
"हे काय आत्ताच आलोय !! आणि कायरे बायको एवढी आजारी ते साधं कळवल पण नाही लेका!आता बुवा रस्त्यात भेकले तेव्हा ते म्हणाले!!"
"अरे कालपासून काय कळणा झालंय बघ दत्तू!!"
"अरे होय पण आशा वेळी नाहीतर कधी मित्राला सांगायचं !!"
दत्तू शिवाला कित्येक वेळ बोलत बसला. सदा वैद्यबुवांनी दिलेली मात्रा सुधाला देत होता. क्षण न क्षण जड होत चालला होता. आणि अचानक जोरात ओरडला...
"आ..... ई ....!!!!"
शिवा आणि दत्तू त्या आवाजाने धावत खोपटात गेले. समोर सुधा सदाच्या हातात तसाच हात ठेवून होती!! डोळ्यात पुन्हा शिवाला शेवटचं पाहण्याची एक ओढ जणू दिसत होती. शिवा हे पाहून मटकन खाली बसला.
"सुधा !! उठ !! उठ !! नाही ना! ना !!! नाही !! तू अशी जाऊ नाही शकत !! ये !! सुधा !! उठणा !! हे बघ सदा तुझ्यासाठी !! तुझ्या तोंडून सदा म्हणून घेण्यासाठी हट्ट करून बसलाय!! सुधा !!! " शिवा सुधाला कवेत घेऊन रडू लागला.
दत्तू शिवाला आवरू लागला.सदा आईच्या पायाजवळ बसून कित्येक अश्रू ढाळू लागला. दत्तू शिवाला बाहेर घेऊन आला. खिन्न मनानं शिवा बसला.
"आबा !! " सदा खोपटातून बाहेर येत शिवाला मिठी मारत रडू लागला.
शिवा काहीच बोलत नव्हता. तो शांत होता. कित्येक क्षण असेच गेले आणि दत्तू म्हणाला.
"उठ !! उठ शिवा !! आता सार काही तुलाच करायचं आहे !!"
"नाही !! माझ्यात ती ताकद नाही दत्तू !! "
"पण करावं लागेल शिवा !! हे चुकणार नाही !! उठ रच ती चीता !! " दत्तू जड मनाने शिवाला उठवत होता.
शिवा थरथरत्या हातांनी लाकडाना हात लावू लागला. शिवा आपल्या मनात कित्येक सूधाच्या आठवणी आठवत होता. ते सरपण रचत होता.
"नाही !! माझ्यात ही ताकद नाही !! आजपर्यंत कित्येक वेळा मी ही चीता रचली !! पण आज माझे हात काम करत नाहीयेत !! त्या सरपणाला!!! काय ते आपले !! अणि परके !! त्यांना फक्त एकच धर्म !! आणि तो म्हणजे राख !! मग तो कोणीही असो !! आजपर्यंत मी कधी डगमगलो नाही !! पण आज माझे हात ढळत आहेत !!"
  शिवा चीता रचून बाजूला झाला. मागे सदा डोळ्यातून अश्रू पुसत उभा होता. दत्तू त्याला सांभाळत होता. आणि पाहता पाहता चीता पेटली. आज त्या चीतेची दाहकता शिवाला आतून जाळत होती. कित्येक वेळ ती चीता जळत होती. शिवा त्याच्या बाजूला बसून सुधाच्या आठवणीत पुरता बुडाला होता. दिवस सरून रात्र झाली तरी शिवा तिथेच बसून होता.
"आबा !! " सदा शिवाजवळ येत म्हणाला.
शिवा काहीच बोलला नाही फक्त सदाकडे पाहू लागला.
"आबा !! आज मला ही जागा स्मशान वाटू लागली ! आज "
सदाकडे पाहून शिवाला रडू कोसळले. दोघेच कित्येक वेळ त्या राख झालेल्या  सुधा जवळ बसून होते. दत्तू खोपटा जवळ आडवा झाला होता. रात्र सरून तेव्हा पूर्वेकडे उजेड आला होता.
"सदा ! चल !! झाल का ??"
"हा आबा !! आलो !!"
दत्तू या आवाजाने उठला. काय चाललंय हे पाहायला तो डोकावून पाहू लागला. शिवा आणि सदा कसली तरी तयारी करत होते.
"दत्तू !! चल येतो मी !!" शिवा डोकावून पाहणाऱ्या दत्तूला म्हणाला.
"काय चाललंय तुझ शिवा !! कुठ जाणार तू ??"
"अरे !! हे जग किती मोठं आहे !! जाईल कुठ पण !!पण आता इथ नको !! "
"नको जाऊ मित्रा!! " दत्तू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
"नको अडवू मला आता दत्तू !! या स्मशानात खूप काही पाहिलं मी !! प्रेम , स्वार्थ , इर्षा , आनंद आणि एक अधुरी साथ !! सगळं काही या राखेत संपताना पाहिलं मी !!माहितेय मला !! माझाही शेवट इथच आहे !! पण तो येई तोपर्यंत यापासून दूर जायचं मला!! सुधाच्या आठवणी क्षणाक्षणाला इथ मला जाळत राहतील रे !! " शिवा मनातलं बोलू लागला.
"विसरू नको या मित्राला..." दत्तू शिवाला घट्ट मिठी मारत म्हणाला.
"नाही !! " शिवा हातात थोड समान घेऊन निघाला.
सदा आणि शिवा दोघेही निघाले. हातात काही समान आणि मनात सुधाच्या आठवणी घेऊन.
"आबा !! आपण आता कुठ जायचं ??"
शिवा सदाच्या या प्रश्नानं थोडा वेळ शांत राहिला. कित्येक वेळ चालत राहिला.
"या स्मशान पासून दूर !! त्या आठवणींन पासून दूर जायचं !! "
शिवा आणि सदा चालत चालत लांब गेले. दत्तू त्यांना कित्येक वेळ जाताना पाहत राहिला. स्मशानात त्या धगधगत्या राखेस कित्येक वेळ पाहत राहिला.

*समाप्त*

©✍️योगेश खजानदार

स्मशान कथा भाग ४ || marathi Katha ||


कथा भाग ४

दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला.
"अरे !! एवढं काय काम काढलंय दत्तू !! धापा टाकत आलास !! हे बघ काही दुसरं  काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ !! सरपंचाच काम करतोय !!! नाही केलं तर ओरडलं मला परत !!"
" अरे शिवा !! सरपंच !!!" दत्तू आता शांत होत बोलू लागला.
"काय?? सरपंचांनी बोलावलंय ??" शिवा मोठ्या आवाजात बोलू लागला.
"त्यांना म्हण !! तुमचंच काम करतोय !! झाल की येतो !!!"
"अरे जरा शांत बस की !!" दत्तू चिडून म्हणाला.
"अरे सरपंच गेले !!! "
"काय ??" शिवाला हे ऐकुन काय बोलावं तेच कळेना.
"कधी ?? कस काय ??"
"अरे हो तर !! आता तिथूनच आलोय !! रात्री झोपला ते उठलाच नाहीं सकाळी !!! बायकोन बघितलं तर काहीच हालचाल करत नव्हता!! वैद्यबुवा आले आणि बघितलं !! तर म्हटले इलाज करून काही उपयोग नाही !! सरपंच गेलेत म्हणून!!"
"मायला, वाईट झाल म्हणायचं !!! तू हो पुढं !! मी आलोच मागून !!!" शिवा जागेवरून उठतं म्हणाला.
दत्तू आला तसा निघून गेला. शिवा काम आवरून तिकड निघाला. सुधाला सांगायला तो खोपटात गेला.
"सुधा !! "
"काय हो!! " सुधा झोपेतून उठतं म्हणू लागली.
"सरपंच गेले !! "
"काय ??" सुधाला यावर विश्वास बसत नव्हता.
"हो!! आताच दत्तू सांगून गेला. मी तिकडं जाऊन येतो !! परत इकडं सगळी तयारी करावी लागल मला."
"बर !! " सुधा खालच्या आवाजात म्हणाली.
शिवाला सुधाचा बदललेला आवाज लगेच जाणवला आणि तो म्हणाला.
"काय झाल सुधा ??"
"काही नाही !! जरा अंग कणकण करतंय !!" सुधा अंगावरच पांघरूण काढत म्हणाली.
शिवा तिच्या जवळ जात तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलू लागला.
"ताप पण आलाय तुला!! "
"होईल ठीक !! तुम्ही जाऊन या !!!"सुधा जवळच ठेवलेल्या पेल्यातले पाणी पीत म्हणाली.
"सदा गेला ना शाळेत??"
"हो !!!" सुधा पुन्हा पांघरुण घेत बोलली.
"बरं !! मी जाऊन येतो !! आणि येताना वैद्यबुवाकडून औषध घेऊन येतो !! बर वाटेल तुला!!" शिवा बाहेर जात म्हणाला.
"बर !! " एवढंच तुटक बोलत सुधा पुन्हा झोपी गेली.
   शिवा धावतच गावात गेला. सरपंचाच्या घरी पाहतो तर भली मोठ्ठी गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात उभा राहून तो सगळं पाहू लागला. सरपंच रुबाबदार माणूस पण आज अगदी भेसूर वाटू लागला. बायको एकटी रडत होती. बाप एका कोपऱ्यात आपल्या अपंगत्वाला दोष देत मुलाकडे पाहून आसवे गाळत होता. शिवा सगळं काही पाहत होता. रात्रीच्या जागरणामुळे शिवाचे डोळे लालबुंद झाले होते. तेवढ्यात दत्तू शिवा जवळ येऊन बोलू लागला.
"सरपंचाच काय काम करत होता रे तू !! आणि तेपण मसनवाट्यात??"
दत्तूच्या या प्रश्नानं शिवाला काय बोलावं तेच कळलं नाही.
"काही नाही !! असच नेहमीचच !!" शिवाने वेळ काढून घेतली.
"बरं !!  जा तू पुढ मसनवाट्यात आणि तयारी कर सगळी !! निघतीलच आता तिकडं!!!"
"तसचं करतो !! " शिवा दत्तूलं म्हणत लगेच निघाला.
मसनवाट्यात येताच तो सरळ खोपटात गेला. सुधा तापेन फणफणत होती.
"सुधा !! ताप किती वाढलाय ?? " तिच्या डोक्यावर हात ठेवत शिवा बोलू लागला.
सुधा आता जागेवरून न उठताच शिवाकडे पाहू लागली. कित्येक वेळ दोघे तसेच बसून राहिले. शिवाला सुधाची काळजी वाटू लागली. आणि तेवढ्यात,
"शिवा !! " खोपटाच्या बाहेर दत्तू येऊन हाका मारू लागला होता.
"आलो आलो !!" शिवा बाहेर येत म्हणाला.
बाहेर पाहतो तर दत्तू आणि बाकी सगळे तिथे केव्हाच आले होते. सरपंचाला तसे पाहून शिवा अगदी सुन्न होता. क्षणभर थांबून तो लगेच कामाला लागला. सरपंचानेच सांगितलेली लाकड तो रचू लागला. कोपऱ्यात दोघांनी खांद्यावरून धरलेला सरपंचाचा बाप आसवे गाळत होता. बाकी रडावं अस कोणी राहीलच नव्हतं. सरपंचाचा मुलगा विलयातेत होता त्याला येणं शक्य नव्हतं अस दत्तू म्हणत होता.
सारी तयार झाली आणि शिवा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. सरपणान बघता बघता पेट घेतला. आणि त्या आगीच्या लोटात कित्येक विचार जणू शिवाला जळताना दिसू लागले, जणू त्याला बोलू लागले.
"बापाची चिता पेटवायला आतुर झालेला हा सरपंच आज स्वतःच जळून खाख झाला!! आपल्या बापासाठी ज्याने त्या बापाच्या जिवंतपणी सरपन रचले !! त्याच सरपणात स्वतःच जळून खाक झाला!! कोणासाठी केलं त्याने एवढं सगळं !!त्या मुलासाठी ज्याला बाप गेला तरी यायला वेळ नाही त्याच्यासाठी!!! अखेर कोणीच नाही आज इथे !! तो बघा तो माणूस !! त्या दिवशी सरपंचाच्या हो ला हो करणारा !! निघूनही चालला !! पेटत्या ज्वाला आणि हा निर्जीव देह एकटा सोडून !!! या लोकांची साथ फक्त जगताना !! मेल्यावर तर काय साथ देणार ?? दुसऱ्यासाठी जमा केलेली लाकड स्वतःलाच जाळून गेली !! यापेक्षा ते वाईट काय !! म्हणून तर आयुष्य आहे तोपर्यंत दुसऱ्याच चांगलं करत राहायचं म्हणतात ते यासाठीच!" शिवा जागेवरून उठला.
   एव्हाना आता सगळे निघून गेले होते. उरले होते ते फक्त काही लोक , शिवा आणि त्याचा मित्र दत्तू. त्या जळत्या चीतेकडे बघत.
  काही वेळात दत्तुही निघून गेला. पाहता पाहता सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. शिवा कित्येक वेळ सरपंचाच्या जळत्या चितेस राखण करत बसला होता. सुधा आत आजारी आहे याचं भानही त्याला राहिले नव्हते. तेवढ्यात सदा शाळेतून आला. आत खोपटात गेला आणि धावतच बाहेर आला.
"आबा !! "
शिवा सदाच्या आवाजाने भानावर आला आणि खोपटाकडे पाहत म्हणाला.
"काय रे सदा ???शाळेतून कधी आला तू ???"
सदा घाबरत घाबरत म्हणाला.
"आईला जास्त त्रास होतोय !!!"
शिवाला हे कळताच तो धावतच आला. खोपटात शिरत सुधा जवळ आला.
"माफ कर सुधा !! कामात मी खरंच विसरलो !! माफ कर !!!"
"आहो ठीक आहे !! एवढं काही झाल नाहीये मला!!" सुधा स्वतःला सावरत म्हणाली.
शिवा सुधाचे डोके आपल्या मांडीवर ठेवत म्हणाला.
"नाही कस !! ताप वाढलाय सुधा !! मी आत्ता जातो आणि वैद्यबुवाला घेऊन येतो!" शिवा उठायचा प्रयत्न करू लागला.
सुधा त्याला थांबवत म्हणू लागली.
"थांबा हो जरा वेळ !! काही होत नाही मला!!मी एकदम ठीक आहे !!"
"गप्प बस तू !! तुला काही कळत नाही !सदा आईजवळ थांब!!! मी आलोच जाऊन!!"शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
सदा सुधाजवळ बसला. शिवा धावत धावत वैद्यबुवांकडे गेला.एव्हाना सगळीकडे अंधार झाला होता. शिवा वैद्यबुवाच्या घरासमोर येऊन दरवाजा वाजवू लागला. थोड्या वेळानं दरवाजा उघडला.
"बुवा आहेत का ??" समोर वैद्यबुवांची बायको पाहून शिवा म्हणाला.
"बुवा तर नाहीत घरी !! आताच थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या गावाला गेलेत!! कोणीतरी माणूस आला होता त्यांच्या सोबत गेले !!!"
"कधीपर्यंत येतील ??"शिवा अगदिक होऊन विचारू लागला.
"माहीत नाही!!!" बुवांची बायको शिवाची तगमग पाहून पुढे म्हणाली.
"काय झालंय एवढं शिवा??"
"बायको खूप आजारी आहे !!! तापानं अंग नुसतं गरम झालंय !!!" शिवा.
"तू अस कर !! तू जा घरी !! ते आले की पाठवून देते मी तुझ्याकडं !!! "
"लई उपकार होतील तुमचे !!!" शिवा हात जोडत म्हणाला.
   शिवा धावत धावत पुन्हा मसनवाट्यात आला.सुधाला अश्या अवस्थेत पाहून त्याला काय करावं तेच कळतं नव्हतं. सदा सुधाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. पण तरीही ताप काही कमी होत नव्हता.शिवा हतबल होऊन एकटक समोरच्या धगधगत्या चितेकडे पाहत बसला होता. एकटाच.

क्रमशः

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : स्मशान कथा || शेवट भाग ||

स्मशान कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||


कथा भाग ३

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला.
"आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.
धावत शिवा त्या बाजूने गेला. त्याला समोर तीन चार माणसे दिसली. एका बांबूला झोळी करून त्याला दोघांनी धरल होत.  शिवाला काही कळायच्या आत, तिसऱ्या एका समोरच्या माणसाचे मानगूट त्याने धरले.
"काय रे !! कोण तुम्ही !! आणि हिकड काय करताय ??"
शिवा अगदी अंगावरच आल्यानं ती माणसं थोडी भीत भितच त्याला बोलू लागली.
"अरे !! ऐक तरी !! " डोक्यावर टोपी, चांगल्या धाग्याचे कपडे घातलेला तो इसम बोलू लागला.
"काय ऐकू !! आणि ह्या झोळीत बाई का ओरडती ??"  शिवा त्या माणसाला खाली पाडत त्याच्या छातीवर बसून विचारू लागला.
"अरे बाबा !! ऐक तरी!! मी विठा लोहार ! !! अंजनगाव आहे ना तिथला मी !! माझी बायको पोटुशी आहे !! गावची म्हातारी म्हटली पोरं आडलं आहे म्हणून !! तिला काही जमणार नाही म्हणाली !! "  विठा शिवाला सगळं सांगू लागला.
शिवा विठाच्या अंगावरून उठला. त्याला उभा करत त्याला म्हणाला.
"मग इकडं कुठ ??"
"अरे !! या पुढच्या गावचा वैद्य लई गुणी आहे म्हटली म्हातारी!! त्योच करील म्हटला सुटका यातून माझ्या बायकोची.!! लवकर नाही घेऊन गेलो तर खर नाही म्हणाली.!! " विठा आपल्या बायकोला धीर देत शिवाला बोलू लागला.
विठाची बायको असह्य वेदनेने विव्हळत होती.तिचा तो आवाज त्या स्मशानी शांतता चिरत होता.
"अस होय !! " शिवा आता थोडा शांत होत बोलू लागला.
"चला मग पटकन !! मी मदत करतो तुम्हाला !! "
"खूप उपकार होतील तुमचे !! पण आता या अवस्थेत अजुन अस घेऊन जाणं सहन होत नाहीये तिला!! "विठा आपल्या बायको जवळून उठून शिवा जवळ जात म्हणाला.
"मग आता ??"शिवा प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागला.
"तुमच्या दिशेने दिव्याचा उजेड दिसला म्हणून तर चाललो होतो तिकडं !! "
"ते माझं घर आहे !!! चला पटकन !! " शिवा पुढे होत कंदील हातात घेत म्हणाला.
"सदा !! पुढे जा !! आम्ही मागून येतो!!"
  सदा धावत पुढे निघून गेला. शिवा विठाला घेऊन मागे मागे येऊ लागला. सुधा काळजी करत खोपट्याच्या बाहेरच थांबली होती.
सदाला धावत येताना पाहून थोडी गोंधळून गेली.
"सदा !! काय झालं काय !! आबा कुठ आहेत ??"
"माग आहेत !! "
तेवढ्यात शिवा त्या सगळ्यांना घेऊन आला. सुधाला काय प्रकार आहे तो कळायला वेळ लागला नाही. ती लगेच त्या बाईचे हात धरून तिला धीर द्यायला पुढे सरसावली.
"तुम्ही थांबा इथच !! वैद्यबुवाला इकडचं घेऊन येतो मी !!! " शिवा विठाला म्हणून लगेच धावत निघाला.
विठा चिंतित होऊन खाली बसला.
शिवा धावत धावत गावाच्या वेशित शिरला. वैद्याच घर दिसताच बाहेरून कडी वाजवू लागला. थोड्या वेळात वैद्यांनी दरवाजा उघडला. शिवाला एवढ्या रात्री पाहून वैद्य जरा आश्चर्याने पाहू लागले, आणि म्हणाले,
"शिवा !! एवढ्या रात्री इथ कसकाय तू ???"
"बुवा !! पटकन चला !! बाई नडली ओ एक !! वाटसरु आहेत !! तुमच्याकडेच यायले होते !!पण बाईला सहन होईना !! आपल्या माळावरच थाबलेत ते !! "
"अस म्हणतोस !! आलोच थांब !! " अस म्हणत वैद्यबुवा आत निघून गेले. शिवा त्यांची घराबाहेर वाट पाहू लागला.
"चल पटकन!! " वैद्यबुवा डोक्यावरची टोपी नीट करत बाहेर येत म्हणाले.
शिवा कंदील हातात घेऊन पुढे पुढे चालू लागला. रस्त्यात त्याने बुवांना सगळी हकीकत सांगितली.
   इकडे मसनवाट्यात ती बाई जोरात ओरडत होती.तिचा आवाज त्या भयाण शांततेत अगदी घुमत होता. विठा बाहेरचं घुटमळत होता. त्याच्या सोबतीची माणसे त्याला धीर देत होती. सदा थोड्या थोड्या वेळाने गावाच्या दिशेने पाहत होता. सारं काही असह्य झाल होत. क्षण न क्षण जड होत चालला होता. ती बाई ओरडुन ओरडुन अंगातलं आवसान गाळू लागली होती. सुधा तिला बोलत होती.
तेवढ्यात शिवा येताना सदाला दिसला. तो लगबगीने खोपटाकडे गेला आणि म्हणाला.
"आबा आलेत!! "
शिवा धावत धावत आला. वैद्यबुवा लगबगीने आत गेले.विठा जागेवरून उठून आत पाहू लागला. वैद्यबुवा सुधाला हाताशी घेऊन उपाय करू लागले.
"सगळं नीट होईल विठा !! काळजी करू नका !!" शिवा त्याच्याकडे पाहत म्हणाला.
विठा काहीच न बोलता गालातल्या गालात हसला.
   वेळ हळू हळू धावु लागली. तशितशी विठाच्या मनाची घालमेल वाढू लागली. आणि अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज साऱ्या मसनवाट्यात झाला. विठा आनंदाने शिवाला मिठी मारुन आत जावू लागला. तेवढ्यात वैद्यबुवाच बाहेर आले.
विठाला समोर पाहून म्हणाले.
"पोरगी झाली !!! अगदी आईसारखी !! "
विठा हे ऐकताच आनंदाने नाचू लागला. शिवा विठाला अस पाहून हसू लागला.
"पण !! बायकोची तब्येत जरा नाजूक आहे !! तिला विश्रांती घेऊ द्या !! आणि मग आपल्या गावाला जावा !! " वैद्यबुवा नाचणाऱ्या विठाला थांबवून म्हणाले.
"होय बुवा !! " विठा आनंदाने बोलला आणि खिशातील पैशाची पिशवी बाहेर काढत बुवांच्या हातात ठेवून आत गेला.
   शिवा बुवांना सोडायला पुन्हा गावात गेला. परतून येईतो पर्यंत निम्मी रात्र होऊन गेली होती.
  आता जणु सुधा त्या बाळाला सोडायलाच तयार नव्हती. त्या बाळाची आई शांत झोपली होती. विठा बाहेर आता शिवाला बोलत बसला होता.
"इथून मागच्या टेकडीला ओलांडून गेलं की गाव आमचं !! सुतारवाडी!! तिकडं लोहारकाम करतो मी !! "
"अरे व्वा !! चांगलंय की !! हे कोण बाकी!! "
"भाऊ आहेत माझे !! आम्ही सगळे सोबतच राहतो!! "
"बरं बरं !! " शिवा जवळच बसलेल्या सदाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. सदा आता झोपी जाऊ लागला होता. आणि हळूच तो शिवाच्या मांडीवर झोपी कधी गेला त्यालाही कळलं नाही .
" पण काय हो !! तुम्ही इथ अस गावाबाहेर ???" विठा चाचरतच विचारू लागला.
"मी इथंच असतो !! हे माझ घर  !! आणि काम पण इथंच !!" शिवा सदाला थापटत बोलू लागला.
"म्हणजे ??" विठा कुतूहलाने विचारू लागला.
"मी राखणदार आहे ना याचा !! या मसनवाट्याचा !!"
"मसनवाटा??" विठा जरा भीत भीतच म्हणाला.
"होय की !! हे बघा की !! ही राख त्या तिथं दिसती का ?? आणि त्या पलीकडच्या अंगाला थडगे आहेत !! "
आपण कुठे आहोत याचं विठाला भानच नव्हतं. पण जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्याला काय बोलावं तेच कळलं नाही.
"म्हणजे माझ्या पोरिनी !! मसनवाट्यात जन्म घेतला ??" आश्चर्याने विठा शिवाकडे पाहत होता.
"हो तर !!" शिवा अगदी हसत म्हणाला.
विठा आणि शिवा कित्येक वेळ बोलत बसले. तेवढ्यात सुधा घरातून बाहेर आली. हातात एक गोंडस परी घेऊन. तिने अलगद ती परी शिवाकडे दिली.तेव्हा मांडीवर झोपलेला सदा डोळे मिचकावत उठला. त्यालाही ते बाळ पाहून खूप आनंद झाला. इवल्याश्या डोळ्यातून ते बाळ शिवाला एकटक पाहु लागले. शिवा त्या बाळाला पाहून कित्येक विचारात गेला,
"आजपर्यंत मी इथे लोक आयुष्य संपून गेल्यावर येताना पाहिले !! पण बाळा तू पहिली आहेस की जिने इथे जन्म घेतला...!! लोक म्हणतात स्मशान म्हणजे आयुष्याचा अंत !! पण तू तर सुरुवात झालीस !!! मी कित्येक लोक इथे रडताना पाहिलेत, अगदी मन पिळवटून टाकणारी माणसं पाहिलेत !! पण आज तुझ्या रडण्याने मला आनंद झाला ! !! जिथं आयुष्य संपतं तिथून तुझी सुरुवात आहे बाळा !! जिथं लोक यायला भितात, तिथे तू आलीस. तुला ना आता भय असेल ना या क्षणांची भिती !!!"
   त्या बाळाचे कित्येक मुके घेऊन शिवा तिला सुधाकडे देऊ लागला. सुधा त्या बाळाला घेऊन पुन्हा खोपट्यात गेली. आणि कित्येक क्षण गेल्या नंतर पाहता पाहता रात्र सरून सकाळ होत आली. शिवा रात्रभर झोपलाच नाही !! विठा आणि त्याचे भाऊ जरावेळ झोप काढून उठले !! विठा आत आपल्या बायकोला बोलू लागला. सुधा त्यांना रस्त्यात जाताना लागेल अशी शिदोरी बांधून देत होती.
"बर !! निघतो आता शिवा भाऊ !! " विठा शिवाचा हात हातात घेत म्हणू लागला.
"नीट जावा !!" शिवा.
सुधा आत विठाच्या बायकोला म्हणू लागली.
"काळजी घे बाई !!  आणि जाताना जास्त त्रास होईल तर थांब जरावेळ कुठं!! "
"होय ताई !! " विठाची बायको जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण तिला उठता येत नव्हतं.
"राहू दे !! अशीच पडून रहा !! या झोळीतूनच पुन्हा गावाकड जा !! "
"ताई !! तुमचे उपकार कधी विसरणार नाही मी !! "
"आग !! उपकार कसले त्यात !!" अस म्हणत सुधा हातातली शिदोरी तिच्या जवळ ठेवत म्हणाली.
विठा आणि त्याचे भाऊ पुन्हा झोळी करून, त्यात आईला आणि बाळाला घेऊन निघाले. शिवा आणि विठा एकमेकांना मिठी मारुन निरोप घेऊ लागले. शिवा त्यांना लांब टेकडीपर्यंत सोडायला गेला. पुन्हा येताना त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता.
सुधा त्याला पाहून हसली आणि जवळ येणाऱ्या त्याला म्हणाली,
"काय झालं एवढं हसायला??"
"सुधा !! आजपर्यंत आपण इथे येणारा माणूस फक्त रडत येतानाच पाहिला !! पण आज खरंच या मसनवाट्यातून कोणीतरी हसत गेलंय !! आनंद देऊन गेलंय !!! खरंच त्या देवाची लीलाच काही न्यारी आहेना ???"
सुधाही गालातल्या गालात हसली आणि म्हणाली.
"खरंय तुमचं !! आजपर्यंत आयुष्य संपवून राख झालेली माणसं पाहिली !! पण आज मसनवाट्यात आयुष्य सुरु केलेली ती गोड परी क्षणात लळा लावून गेली.!!" सुधा लांब जाणाऱ्या त्या लोकांकडे एकटक पाहत म्हणाली.
सदा इकडे झोपेतून उठून आवरून लागला. शाळेत जायला उशीर होईल म्हणून लगबग करू लागला. शिवा आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. आणि तेवढ्यात दत्तू लगबगीने येताना पाहून शिवा उठला आणि जवळ दत्तू येताच म्हणाला.
"काय रे दत्तू !! काय काम काढलस सकाळ सकाळ ??? "

क्रमशः. ...

©✍️योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग ४ || marathi Katha ||

स्मशान कथा भाग २ || हृदयस्पर्शी कथा ||


कथा भाग २

"आबा !!" हातातून रक्त येतंय तुमच्या !!! " कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता.
"काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! " शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला.
"पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! "
"म्हटलं होत ना बाळा !! मेलेल्या भुतापेक्षा जिवंत भूत लई बेकार म्हणून !! "
"खरंय आबा !! "
या सगळ्या गोष्टीत रात्र कशी सरली कळलंच नाही. शिवा पहाटे निर्धास्त झोपी गेला. सदा तांबड फुटताच शाळेत जायला निघाला. सुधा त्याला आवरायला मदत करत होती.तेवढ्यात दत्तू तिथे आला.
"शिवा !! "दत्तू बाहेरूनच हाका मारू लागला.
"झोपलेत अजुन !! " सुधा बाहेर येत म्हणाली.
"दिस डोक्यावर आलाय आणि झोपलाय अजुन !!"
"रात्री कोहल्याची टोळीनं झोपू दिलं तर ना !! " सुधा दत्तूला पेल्यात पाणी देत म्हणाली.
"म्हणजे ! रात्री कोल्हे आलते काय !! " दत्तू आश्चर्याने म्हणाला.
"होय तर !! सारखी इथच घुटमळत होती!!" सुधा आत पाहत म्हणाली.
तेवढ्यात शिवा झोपेतून उठला आणि बाहेर येत दत्तुला म्हणाला.
"काय रे दत्तू !! काय काम काढलसं सकाळ सकाळ??"
सरपंचानी बोलावलंय तुला!! "
"का म्हणून ??"
"आता ते मला काय माहीत !!ये पटकन !! मी जातो पुढं !!" दत्तू एवढं म्हणून निघून गेला.
पाठमोऱ्या दत्तुला जाताना शिवा जरावेळ थांबला. लगेच लगबगीने उठला. सकाळची न्याहारी करून सरपंचाकडं जायला निघाला.
सरपंचाच घर म्हणजे आलिशान वाडा. कित्येक नोकर चाकर दिमतीला. शिवा बारक्या दरवज्यातून आत वाड्यात आला. सरपंच समोरच बसलेले पाहून त्यांना नमस्कार करू पुढे आला. शिवाला पाहताच सरपंच म्हणाले.
"काय शिवा !! आजकाल तोंडपण दाखवणं झाला तू तर !! मोठा झाला का लई !!" सरपंच जरा चिडक्या आवाजात बोलू लागले.
"तस नाही सरकार !! सध्या काम लई आहेत म्हणून येणं झाल नाही !!!"
"मसनवाट्यात कसली आली रे काम !! पेटल की झाल!! " सरपंच हसत म्हणाले.
सरपंच हसलेले पाहून शेजारीच बसलेले दोन तीन गावकरी पण हसू लागले.
"चूक झाली सरकार !! " शिवा खाली मान घालून म्हणाला.
"बर ऐक !! या दोन तीन दिवसात आमचा म्हातारा खपायच्या मार्गावर आहे !! तर त्याला चंदनाची लाकड आणून ठिव !! एवढंच सांगायला बोलावलं होत तुला !! "
"जी सरकार !! प्रयत्न करतो !!"
" प्रयत्न काय?? पाहिजेतच मला!! " सरपंच मोठ्या आवाजात बोलू लागले.
शिवा शांत सगळं ऐकत होता. गावातली या सरपंचाची जवळची माणसं त्याला साथ देत होती.
"मायला !! वैताग नुसता !! तुम्हाला सांगतो तात्या !! हे म्हातारं गेली चार वर्ष झाली मरणा झालंय !! जागेवर पडून नुसता !! पण जीव हित या शरीरात !! मायला म्हातारा मेला म्हणजे सगळा हा वाडा आपलाच होईल बघा !! आणि त्या खालच्या बाजूची शेती !! पैसा सगळं आपलं होईल !! " सरपंच डोळ्यात कित्येक तीव्र भाव आणून बोलत होते.
"आणि नाही मेला ना तर मी मारील बघा त्याला !! आईला वैताग नुसता !! " सरपंच अस म्हणत शिवाकडे पाहू लागले.
शिवा जागेवरून उभा राहिला.सरपंच एकदम त्याचावर खेकसले.
"तुझ काय आता !! झाल तुझ काम !! निघ आता !! आणि सांगितलय ते काम झाल पाहिजे बघ !! माझ्या अब्रूचा प्रश्न आहे !! नाहीतर गाववाले म्हणतील !! एवढा मोठा सरपंच आणि बापाला असाचं जाळला म्हणून !! "
"जी सरकार !! " शिवा मागे सरकत म्हणाला.
गावाच्या वेशीवर येऊन शिवा थांबला. जणू त्याच्या मनात कित्येक विचारांचं द्वंद्व सुरू झालं होत.
"मेलेल्या मड्याचे लचके तोडू नये म्हणून काल मी रात्रभर त्या भुकेल्या कोह्ल्यांशी लढलो ! कशासाठी ?? त्या निर्जीव शरीराला वाचवण्यासाठी !! की अजून कशासाठी !!ती भूक त्यांना तिथे घेऊन आली होती !! त्यांची काय चूक होती ?? खरंच काय चूक होती ?? माझेच मला समजतं नाहीये !! त्या जंगलातल्या प्राण्यांची भूक ती केवढी .!! संपून जाईल लगेच !! पण या जिवंत माणसांची भूक ती कोणती ?? याला अंत नाही ?? त्या मसनवाट्यात खरंच या माणसाच्या भुकेचा अंत आहे ???आयुष्यभर काय कमावलं त्यांनी !! सार काही राख होताना मी पाहिलंय ! !" शिवा गावाच्या वेशीबाहेर येत आपल्या खोपट्याकडे जाऊ लागला. मागे न पाहता, त्या माणसाच्या वस्तीकडे न पाहता, पुढे चालत राहिला.
  दुपारच्या रखरखत्या उन्हात शिवा स्मशानात राखेच्या शेजारी जाऊन बसला.अजूनही ती राख धगधगत होती. तेव्हा जणू सरपंचाचे शब्द त्याच्या मनात घोळत होते.तो तिथे कित्येक वेळ बसला. दुपारची वेळ जाऊन सांज होत आली. आणि तेवढ्यात सुधा खोपट्यातून शिवाला पाहून त्याच्याकडे धावत आली.
"काय हो!! अस का बसलाय इथ???" सुधा थोड्या घाबाऱ्या आवाजात म्हणाली.
"काही नाही !! असच बसलो होतो !! " शिवा शांत म्हणाला.
"सरपंच काही म्हणाले का ??"
" ते काय म्हणणार !! " शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
"मग इथ अस !! " सुधा कुतूहलाने विचारू लागली.
"काही नाही चल !! संध्याकाळ होत आली !! सदा येईल आता !! आल की पोरगं भूक भूक करत !! त्याला खायला कर काहीतरी !! " शिवा सुधाच्या पुढे चालत जात म्हणाला. सुधा क्षणभर थांबली आणि शिवाच्या मागे खोपटाकडे गेली. बाहेर तेवढ्यात सदा आलाच होता . हातपाय धुऊन स्वच्छ कपडे घालून निवांत अंगणात बसला होता.
"आई !! कुठ गेला होतात दोघं तुम्ही ??"
"अरे !! इकडचं पलीकडे बसलो होतो!! " सुधा आत जात म्हणाली.
शिवा हातपाय धुऊन धोतरान अंग पुसून सदाच्या जवळ जाऊन बसला. सदा पुस्तक उघडून अभ्यास करू लागला. त्याला पाहून शिवा क्षणभर गालातल्या गालात पुसटसा हसला. मनातला कित्येक गोंधळ क्षणभर विसरला. सदा पुस्तकातून डोकं वर घेत शिवाकडे पाहत होता. त्याला पाहून शिवा म्हणाला.
"काय असतं रे या पुस्तकात ??" शिवा सदाला कुतूहलाने विचारू लागला.
"थोर पुरुष , विज्ञान , चांगलं काय, वाईट काय सगळं असतं या पुस्तकात !!! " सदा म्हणाला.
"अस्स होय !! चांगलंय !!मन लावून कर आभ्यास !! "शिवा जागेवरून उठतं बोलला.
सदा क्षणभर गालातल्या गालात हसला आणि पुस्तकात पाहून वाचू लागला.
सुधा खोपट्यातून बाहेर येत म्हणाली.
"चला जेवायला !! परत उशीर होतो !!"
एव्हाना आता रात्र होतच आली होती. शिवा आणि सुधा जेवायला बसले. सदा पुस्तक ठेवून खोपट्याच्या बाजूला क्षणभर थांबला. दुर असलेल्या गावाच्या त्या मिणमिणत्या दिव्यांकडे कुतूहलाने पाहू लागला. मसनवाट्यात गडद अंधार दिसत होता.अगदी समोरचं माणूसही दिसणार नाही इतका अंधार होता.
   सदा आत जाऊ लागला. तेवढ्यात मसनवाट्याकडे काही कंदील लूकलूकताना त्याला दिसले. गोंधळलेला सदा घाईघाईत आत आला.
"आबा!! " सदा जोरात ओरडला.
"अरे झाल काय?? " शिवा जागेवरून उठतं म्हणाला. हातातला घास तसाच पुन्हा ताटात ठेवला.
"मसनवाट्याच्या बाजून कंदील दिसायेलेत !!" सदा शांत होत म्हणाला.
शिवा बाहेर गेला. हातात कंदील घेत चालू लागला. तसेतसे ते दिवे जवळ जवळ येऊ लागले. सदा शिवा सोबत मागे मागे चालत होता.
"आबा !! एवढ्या अंधाराच कोण आलं असेल !! " सदा घाबऱ्या आवाजात म्हणाला.
"बघुयात तरी !! " शिवा जोरात पुढे चालत चालत म्हणाला.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||

स्मशान कथा भाग १ || मराठी रंजक कथा ||


कथा भाग १

  "आगीच्या या लोटात सार का संपून जातं असेल ?आणि उरलेच काही चुकून तर ही गिधाडं तुटून का पडतात त्याचा फडशा पाडायला. पण उरतच काय?? निर्जीव शरीर आणि कोणतीही इच्छा न राहिलेलं एक नाव.तेही काही क्षणात संपून जाण्यास !! बस् !! हेच आहे आयुष्य !! आणि हाच खरा शेवट!! जिथं शांतता आहे !! जिथं लोक भितात यायला !! का तर म्हणे स्मशानात भूत असतात !! ज्यांनी आपल्याच लोकांना जाळलं तीच ही माणसं आता त्याच लोकांना भूत होऊन फिरताना भितात !! पण मग मी ?? मी कोण ?? एक जिवंत भूत ?? की माणूस ?? कोण आहे कोण मी !! या स्मशानाचा राखणदार .!! बस एवढीच काय ती ओळख आहे का माझी ?? नाही !! मी एक माणूस आहे !!! मी जिवंत आहे !! मी शिवा आहे !! " शिवा स्वतःच्या तंद्रीत समोर जळणाऱ्या चीतेस बघत होता.
तेवढ्यात गावचा दत्तू पळतच शिवाकडे आला. त्याला हाका मारू लागला.
"ये शिवा !! " शिवा मात्र आपल्याच तंद्रीत होता.
"ये लेका शिवा !! कुठ हाय लक्ष !! "
शिवा अचानक भानावर आला. पुढे दत्तुला पाहून लगबगीने उठला.
" का रे दत्तू ?? एवढं धावत का आला ??"
"अरे !! श्याम्याची आई गेली!! यायचं लागलेत मागनं!! सरपन तयार ठीव सांगायला आलतो !! "
"बर बर लगेच करतो!!"
दत्तू धावत धावत निघून गेला. शिवा शेजारच्या सरपणाच्या खोलीत जाऊन सरपण रचू लागला.
"श्याम्याची आई म्हणजे वस्ताद बाई !! पण मनानं साधी !! आईचं बोट भाजल म्हणून हेच श्याम्या पोरगं !! तालुक्याला जाऊन त्याचा मलम घेऊन आलत !! किती माया आईवर !! आता क्षणात जळून खाक होईल म्हातारी !! मग त्या मनात किती यातना होतील त्या श्याम्याला माहिती !! " शिवा जणू त्या लाकडांकडे पाहून त्यांना मनातल्या मनात बोलत होता.
"जन्मभर नुसतं मागत राहायचं !! आणि शेवट तो काय असेल कोणास ठाऊक!! त्या इस्पितळात मरतोय !! की घरात !! की अजून वेगळं ते काय !! देवाची करणीच भारी !! आयुष्य गेलं लोकांच्या सरणावरची लाकड रचताना !! कोणतं लाकूड मलाच जाळतय ते त्या परमेश्वरालाच माहीत !! "  शिवा गालातल्या गालात पुसट हसला.
तेवढ्यात मागून शाम, दत्तू सगळे आले. सगळे विधी करू लागले. शिवा कोपऱ्यात उभा राहून बघत होता. दत्तू त्याच्या जवळच होता. श्याम्याला रडताना पाहून त्यालाही राहवलं नाही. आणि तो त्याला सावरायला गेला. शिवा पुढे गेलाच नाही.
दत्तू पुन्हा काही वेळात परत येऊन शिवा जवळ उभा राहिला आणि म्हणाला.
"पोट्ट कुठ दिसत नाही तुझ ??"
"शाळेत गेलंय !! येईलच इतक्यात !! "
"शाळेत ?? " दत्तू आश्चर्याने म्हणाला.
"हा !! " शिवा शांत उत्तरला.
"शिकून कुठ मास्तर व्हणाराय पोट्ट तुझ !! तुला मदत करायची सोडून नाहिते कशाला उद्योग करत बसायचे !!!"
"आवड आहे त्याची !!"
"असली काय कामाची आवड !! "
शिवा काहीच न बोलता. समोरच्या पेटत्या आगिकडे पाहू लागला.बघता बघता लाकडांणी पेट घेतला आणि आलेली माणसं निघून जाऊ लागली. श्याम आणि दत्तू जरावेळ थांबले आणि तेही निघून गेले.
संध्याकाळची वेळ झाली. शेजारीच शिवाच दोन खोल्याच एक खोपट होत. त्यात बसून तो आणि त्याची बायको सुधा गप्पा मारत होते.
"यंदाच्या वर्षी आपला सदा पहिला येईल बघ !! बघ तू!त्याला काय आयुष्यभर लोकांची चीता पेटवायला नाही लावणार मी !!! मोठा करणार!! शिकू देणार !! " शिवा सुधाकडे पाहत बोलत राहिला.
" होय तर !! होईल की !! " सुधा शांत म्हणाली.
सूर्य पूर्वेकडे झुकला आणि लांब सावल्या सगळीकडे नाचू लागल्या. त्यात एक सावली ओळखीची दिसली.
"आबा !! अजुन बाहेरच बसलाय तुम्ही !! " सदा शिवाचा पोरगा हातातली शाळेची पिशवी ठेवत म्हणाला.
"अरे ! राखण करत बसलोय !! "
"कशाची !! या भुताच्या वाडीची ??" सदा जरा हसतच म्हणाला.
"आबा इकडं कोणी येत नाही बघा !!गावाच्या बाहेर आहे किती!! म्हणत्यात की वरच्या लिंबाकड म्हणजे या मसनवाट्याकड रात्री भूत फिरतेत म्हणून.  आणि तुम्ही कोणाची राखण करताय !! या जळणाऱ्या मुडद्याची !! की त्या पलीकडं थोड गेल्यावर पुरलेल्या मुडद्याची."सदा थोडा हसतच म्हणाला.
"तुला नाही कळायचं बाळा !! मेलेल्या मुडद्यांपेक्षा !! जिवंत भूत लई बेकार!!! तुला नाही कळायचं !! " शिवा लांब बुडत्या सूर्याकडे एकटक पाहत म्हणाला.
एव्हाना आता अंधाराने चादर ओढली होती. शिवा , सदा आणि सुधा तिघेही जेवण करून बाहेर बसले होते. उघड्या त्या आभाळ खाली. धगधगत्या त्या विस्तवाकडं बघत.
"आबा तुम्हाला माहितेय !! शाळेतली पोरं तर मला सुद्धा बोलायला भितेत ..!! म्हणे तुझ्या अंगात एखाद भूत असल ! उगा लागायचं आमच्या माग !! "
"आरे मग होय म्हणायचं !! " शिवा तोंड वाकड करत.भुताची नक्कल करत म्हणाला.
शिवा आणि सदा मनसोक्त हसले. तेवढ्यात शेजारच्या रानातून कोल्हे , ओरडताना आवाज झाला. शिवा सावध होत उठला. खोपट्यात गेला. हातात भाला घेऊन बाहेर धावत आला. सदाला काही कळायच्या आत शिवा धावत पुढे गेला.
"आबा !! आबा !! "सदा मागून हाका मारू लागला.
सुधा खोपट्याच्या बाहेर येऊन सदाला बोलावू लागली.
"सदा !! थांब !! अरे कोल्ह्याची टोळी आलिये मसनवाट्यात !! भाला घेऊन जा !! आबाला मदत कर !!"
सदा धावतच आईकडे आला. तिने भाला त्याच्याकडे दिला. धावतच स्मशानात गेला. पाच सहा कोल्हे अर्धवट जळलेल्या प्रेताचे लचके तोडायचा प्रयत्न करत होते . शिवा त्यांना हुस्कुवून लावायचा प्रयत्न करत होता.
"आबा !! " सदाने हाक मारताच शिवा म्हणाला.
"सदा मागच्या बाजूनं हान त्याला !! "
सदा मागे फिरला . कित्येक वेळ झटापट झाली. शिवाच्या उजव्या हाताला कोल्ह्यान चावा घेतला. सदाने एका फटक्यात एकाला गारद केला. थोड्या वेळाने ती भुकेली कोहल्याची टोळी माग सरकली. थकली.
शिवा आणि सदा तिथंच बसून राहिली. जळत्या त्या प्रेताला राखण करत. कित्येक वेळ.
"कळलं पोरा !! इथ का राखण करावी लागते ती !!" शिवा उठतं म्हणाला.
सदा कित्येक वेळ विचार करत बसला. त्याच्या समोर अस पहिल्यांदाच घडत होत.
शिवा परत खोपट्याकड आला. सुधा वाटच पाहत होती.
"गेली का पिसाळलेला कोल्ही !! "
"हुसकून लावली ..!! " शिवा तोंडावर गार पाणी मारत म्हणाला.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग २ || हृदयस्पर्शी कथा ||

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...