स्मशान कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||


कथा भाग ३

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला.
"आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.
धावत शिवा त्या बाजूने गेला. त्याला समोर तीन चार माणसे दिसली. एका बांबूला झोळी करून त्याला दोघांनी धरल होत.  शिवाला काही कळायच्या आत, तिसऱ्या एका समोरच्या माणसाचे मानगूट त्याने धरले.
"काय रे !! कोण तुम्ही !! आणि हिकड काय करताय ??"
शिवा अगदी अंगावरच आल्यानं ती माणसं थोडी भीत भितच त्याला बोलू लागली.
"अरे !! ऐक तरी !! " डोक्यावर टोपी, चांगल्या धाग्याचे कपडे घातलेला तो इसम बोलू लागला.
"काय ऐकू !! आणि ह्या झोळीत बाई का ओरडती ??"  शिवा त्या माणसाला खाली पाडत त्याच्या छातीवर बसून विचारू लागला.
"अरे बाबा !! ऐक तरी!! मी विठा लोहार ! !! अंजनगाव आहे ना तिथला मी !! माझी बायको पोटुशी आहे !! गावची म्हातारी म्हटली पोरं आडलं आहे म्हणून !! तिला काही जमणार नाही म्हणाली !! "  विठा शिवाला सगळं सांगू लागला.
शिवा विठाच्या अंगावरून उठला. त्याला उभा करत त्याला म्हणाला.
"मग इकडं कुठ ??"
"अरे !! या पुढच्या गावचा वैद्य लई गुणी आहे म्हटली म्हातारी!! त्योच करील म्हटला सुटका यातून माझ्या बायकोची.!! लवकर नाही घेऊन गेलो तर खर नाही म्हणाली.!! " विठा आपल्या बायकोला धीर देत शिवाला बोलू लागला.
विठाची बायको असह्य वेदनेने विव्हळत होती.तिचा तो आवाज त्या स्मशानी शांतता चिरत होता.
"अस होय !! " शिवा आता थोडा शांत होत बोलू लागला.
"चला मग पटकन !! मी मदत करतो तुम्हाला !! "
"खूप उपकार होतील तुमचे !! पण आता या अवस्थेत अजुन अस घेऊन जाणं सहन होत नाहीये तिला!! "विठा आपल्या बायको जवळून उठून शिवा जवळ जात म्हणाला.
"मग आता ??"शिवा प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागला.
"तुमच्या दिशेने दिव्याचा उजेड दिसला म्हणून तर चाललो होतो तिकडं !! "
"ते माझं घर आहे !!! चला पटकन !! " शिवा पुढे होत कंदील हातात घेत म्हणाला.
"सदा !! पुढे जा !! आम्ही मागून येतो!!"
  सदा धावत पुढे निघून गेला. शिवा विठाला घेऊन मागे मागे येऊ लागला. सुधा काळजी करत खोपट्याच्या बाहेरच थांबली होती.
सदाला धावत येताना पाहून थोडी गोंधळून गेली.
"सदा !! काय झालं काय !! आबा कुठ आहेत ??"
"माग आहेत !! "
तेवढ्यात शिवा त्या सगळ्यांना घेऊन आला. सुधाला काय प्रकार आहे तो कळायला वेळ लागला नाही. ती लगेच त्या बाईचे हात धरून तिला धीर द्यायला पुढे सरसावली.
"तुम्ही थांबा इथच !! वैद्यबुवाला इकडचं घेऊन येतो मी !!! " शिवा विठाला म्हणून लगेच धावत निघाला.
विठा चिंतित होऊन खाली बसला.
शिवा धावत धावत गावाच्या वेशित शिरला. वैद्याच घर दिसताच बाहेरून कडी वाजवू लागला. थोड्या वेळात वैद्यांनी दरवाजा उघडला. शिवाला एवढ्या रात्री पाहून वैद्य जरा आश्चर्याने पाहू लागले, आणि म्हणाले,
"शिवा !! एवढ्या रात्री इथ कसकाय तू ???"
"बुवा !! पटकन चला !! बाई नडली ओ एक !! वाटसरु आहेत !! तुमच्याकडेच यायले होते !!पण बाईला सहन होईना !! आपल्या माळावरच थाबलेत ते !! "
"अस म्हणतोस !! आलोच थांब !! " अस म्हणत वैद्यबुवा आत निघून गेले. शिवा त्यांची घराबाहेर वाट पाहू लागला.
"चल पटकन!! " वैद्यबुवा डोक्यावरची टोपी नीट करत बाहेर येत म्हणाले.
शिवा कंदील हातात घेऊन पुढे पुढे चालू लागला. रस्त्यात त्याने बुवांना सगळी हकीकत सांगितली.
   इकडे मसनवाट्यात ती बाई जोरात ओरडत होती.तिचा आवाज त्या भयाण शांततेत अगदी घुमत होता. विठा बाहेरचं घुटमळत होता. त्याच्या सोबतीची माणसे त्याला धीर देत होती. सदा थोड्या थोड्या वेळाने गावाच्या दिशेने पाहत होता. सारं काही असह्य झाल होत. क्षण न क्षण जड होत चालला होता. ती बाई ओरडुन ओरडुन अंगातलं आवसान गाळू लागली होती. सुधा तिला बोलत होती.
तेवढ्यात शिवा येताना सदाला दिसला. तो लगबगीने खोपटाकडे गेला आणि म्हणाला.
"आबा आलेत!! "
शिवा धावत धावत आला. वैद्यबुवा लगबगीने आत गेले.विठा जागेवरून उठून आत पाहू लागला. वैद्यबुवा सुधाला हाताशी घेऊन उपाय करू लागले.
"सगळं नीट होईल विठा !! काळजी करू नका !!" शिवा त्याच्याकडे पाहत म्हणाला.
विठा काहीच न बोलता गालातल्या गालात हसला.
   वेळ हळू हळू धावु लागली. तशितशी विठाच्या मनाची घालमेल वाढू लागली. आणि अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज साऱ्या मसनवाट्यात झाला. विठा आनंदाने शिवाला मिठी मारुन आत जावू लागला. तेवढ्यात वैद्यबुवाच बाहेर आले.
विठाला समोर पाहून म्हणाले.
"पोरगी झाली !!! अगदी आईसारखी !! "
विठा हे ऐकताच आनंदाने नाचू लागला. शिवा विठाला अस पाहून हसू लागला.
"पण !! बायकोची तब्येत जरा नाजूक आहे !! तिला विश्रांती घेऊ द्या !! आणि मग आपल्या गावाला जावा !! " वैद्यबुवा नाचणाऱ्या विठाला थांबवून म्हणाले.
"होय बुवा !! " विठा आनंदाने बोलला आणि खिशातील पैशाची पिशवी बाहेर काढत बुवांच्या हातात ठेवून आत गेला.
   शिवा बुवांना सोडायला पुन्हा गावात गेला. परतून येईतो पर्यंत निम्मी रात्र होऊन गेली होती.
  आता जणु सुधा त्या बाळाला सोडायलाच तयार नव्हती. त्या बाळाची आई शांत झोपली होती. विठा बाहेर आता शिवाला बोलत बसला होता.
"इथून मागच्या टेकडीला ओलांडून गेलं की गाव आमचं !! सुतारवाडी!! तिकडं लोहारकाम करतो मी !! "
"अरे व्वा !! चांगलंय की !! हे कोण बाकी!! "
"भाऊ आहेत माझे !! आम्ही सगळे सोबतच राहतो!! "
"बरं बरं !! " शिवा जवळच बसलेल्या सदाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. सदा आता झोपी जाऊ लागला होता. आणि हळूच तो शिवाच्या मांडीवर झोपी कधी गेला त्यालाही कळलं नाही .
" पण काय हो !! तुम्ही इथ अस गावाबाहेर ???" विठा चाचरतच विचारू लागला.
"मी इथंच असतो !! हे माझ घर  !! आणि काम पण इथंच !!" शिवा सदाला थापटत बोलू लागला.
"म्हणजे ??" विठा कुतूहलाने विचारू लागला.
"मी राखणदार आहे ना याचा !! या मसनवाट्याचा !!"
"मसनवाटा??" विठा जरा भीत भीतच म्हणाला.
"होय की !! हे बघा की !! ही राख त्या तिथं दिसती का ?? आणि त्या पलीकडच्या अंगाला थडगे आहेत !! "
आपण कुठे आहोत याचं विठाला भानच नव्हतं. पण जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्याला काय बोलावं तेच कळलं नाही.
"म्हणजे माझ्या पोरिनी !! मसनवाट्यात जन्म घेतला ??" आश्चर्याने विठा शिवाकडे पाहत होता.
"हो तर !!" शिवा अगदी हसत म्हणाला.
विठा आणि शिवा कित्येक वेळ बोलत बसले. तेवढ्यात सुधा घरातून बाहेर आली. हातात एक गोंडस परी घेऊन. तिने अलगद ती परी शिवाकडे दिली.तेव्हा मांडीवर झोपलेला सदा डोळे मिचकावत उठला. त्यालाही ते बाळ पाहून खूप आनंद झाला. इवल्याश्या डोळ्यातून ते बाळ शिवाला एकटक पाहु लागले. शिवा त्या बाळाला पाहून कित्येक विचारात गेला,
"आजपर्यंत मी इथे लोक आयुष्य संपून गेल्यावर येताना पाहिले !! पण बाळा तू पहिली आहेस की जिने इथे जन्म घेतला...!! लोक म्हणतात स्मशान म्हणजे आयुष्याचा अंत !! पण तू तर सुरुवात झालीस !!! मी कित्येक लोक इथे रडताना पाहिलेत, अगदी मन पिळवटून टाकणारी माणसं पाहिलेत !! पण आज तुझ्या रडण्याने मला आनंद झाला ! !! जिथं आयुष्य संपतं तिथून तुझी सुरुवात आहे बाळा !! जिथं लोक यायला भितात, तिथे तू आलीस. तुला ना आता भय असेल ना या क्षणांची भिती !!!"
   त्या बाळाचे कित्येक मुके घेऊन शिवा तिला सुधाकडे देऊ लागला. सुधा त्या बाळाला घेऊन पुन्हा खोपट्यात गेली. आणि कित्येक क्षण गेल्या नंतर पाहता पाहता रात्र सरून सकाळ होत आली. शिवा रात्रभर झोपलाच नाही !! विठा आणि त्याचे भाऊ जरावेळ झोप काढून उठले !! विठा आत आपल्या बायकोला बोलू लागला. सुधा त्यांना रस्त्यात जाताना लागेल अशी शिदोरी बांधून देत होती.
"बर !! निघतो आता शिवा भाऊ !! " विठा शिवाचा हात हातात घेत म्हणू लागला.
"नीट जावा !!" शिवा.
सुधा आत विठाच्या बायकोला म्हणू लागली.
"काळजी घे बाई !!  आणि जाताना जास्त त्रास होईल तर थांब जरावेळ कुठं!! "
"होय ताई !! " विठाची बायको जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण तिला उठता येत नव्हतं.
"राहू दे !! अशीच पडून रहा !! या झोळीतूनच पुन्हा गावाकड जा !! "
"ताई !! तुमचे उपकार कधी विसरणार नाही मी !! "
"आग !! उपकार कसले त्यात !!" अस म्हणत सुधा हातातली शिदोरी तिच्या जवळ ठेवत म्हणाली.
विठा आणि त्याचे भाऊ पुन्हा झोळी करून, त्यात आईला आणि बाळाला घेऊन निघाले. शिवा आणि विठा एकमेकांना मिठी मारुन निरोप घेऊ लागले. शिवा त्यांना लांब टेकडीपर्यंत सोडायला गेला. पुन्हा येताना त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता.
सुधा त्याला पाहून हसली आणि जवळ येणाऱ्या त्याला म्हणाली,
"काय झालं एवढं हसायला??"
"सुधा !! आजपर्यंत आपण इथे येणारा माणूस फक्त रडत येतानाच पाहिला !! पण आज खरंच या मसनवाट्यातून कोणीतरी हसत गेलंय !! आनंद देऊन गेलंय !!! खरंच त्या देवाची लीलाच काही न्यारी आहेना ???"
सुधाही गालातल्या गालात हसली आणि म्हणाली.
"खरंय तुमचं !! आजपर्यंत आयुष्य संपवून राख झालेली माणसं पाहिली !! पण आज मसनवाट्यात आयुष्य सुरु केलेली ती गोड परी क्षणात लळा लावून गेली.!!" सुधा लांब जाणाऱ्या त्या लोकांकडे एकटक पाहत म्हणाली.
सदा इकडे झोपेतून उठून आवरून लागला. शाळेत जायला उशीर होईल म्हणून लगबग करू लागला. शिवा आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. आणि तेवढ्यात दत्तू लगबगीने येताना पाहून शिवा उठला आणि जवळ दत्तू येताच म्हणाला.
"काय रे दत्तू !! काय काम काढलस सकाळ सकाळ ??? "

क्रमशः. ...

©✍️योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग ४ || marathi Katha ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...