स्वप्न ..(कथा भाग २)

"काय म्हणता मंदा देवी ??" आप्पा मंदाकडे हसत हसत म्हणाले.
"देवी काय हो !!"
"नाही ,मगाशी आपलं वेगळंच रूप पाहिलं !! म्हणून वाटलं मला!! "आप्पा खुर्चीवरून उठंत म्हणाले.
"पोराची काळजी वाटली म्हणून बोलले !! "
"सुनीलची ती काळजी काय करायची मंदा !! आपला पोरगा हुशार आहे!!"
"दिसत तर नाही कुठे !! नुसते फिरण्यात वेळ वाया घालत असतो !! " मंदा आप्पांकडे पहात म्हणाली.
"नाही ग मंदा !! आपलं पोर अस करणार नाही बघ !! मध्यंतरी फुलेंच पुस्तकं वाचताना पाहिलं त्याला !! टीळकांचे पण विचार बोलत होता मध्ये !! डोळ्यात नुसते तेज !!" आप्पा हातात लिहिलेला कागद पाहात म्हणाले.
"त्यांनी पोट थोडंच भरणार आहे?? मला त्याच्या भविष्याची काळजी वाटते !! " मंदा.
"करेल ग नक्की काहीतरी करेन आपलं पोर !! बरं चला झोपा आता, लवकर उठायचं ना उद्या !! " मंदा आप्पांकडे होकारार्थी मान हलवत बघत होती.
  पाहता पहात किरणाची एक माळ पूर्वेकडून आली आणि साऱ्या आसमंतात भरून गेली. सुनील सकाळची न्याहारी आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मंदा त्याची लगबग पाहात होती.
"आज कुठे मग ?? आणि ती सोबतीन आली नाही ती अजून ??" मंदा अगदी जोरात म्हणाली.
"आई सोबतीन काय !! मैत्रीण आहे माझी ती !!" सुनील हतातली पिशवी आवरतं बोलत होता.
"वागते तर तशीच !!! " तेवढ्यात दरवाज्यातून कोणीतरी येत आहे अस मंदाला वाटलं, आणि ती म्हणाली.
" या आपलीच कमी होती !!"
"काकू सुनील ???" सुनीलची खास मैत्रीण आणि त्याची सोबतीन उमा मंदाकडे पाहत म्हणाली.
"हे काय आवरतच आहे तो ..!! "मंदा सुनीलकडे हात करत म्हणाली.
सूनीलची खास मैत्रीण म्हणजे उमा. आता हे दोघे बाहेर काय करतात ते मंदाला सांगूनही कधी कळलं नाही. त्यामुळे त्याचे कित्येक अर्थ काढून ती मोकळी होत असे.
"आई !! आज यायला थोडा उशीर होईल बर !!" अस म्हणत सुनील बाहेर निघून  गेला.
उमा आणि सुनील त्यांच्या रोजच्या जनजागृतीच्या कामास लागले.
"आज कुठे पथनाट्य घ्यायचं म्हटलीस तू उमा??"
"अरे शेजारच्या गावातील बोरुवस्ती म्हणून आहे तिथे !!" उमा सुनीलकडे पाहात होती.
"चला मग !! आणि आपले मित्र कुठे आहेत ?? "
"पोहचले असतील कधीच तिथे !! "उमा आणि सुनील बोरुवस्तीत जाऊ लागले.
सुनील काहीतरी वेगळं करेन या आप्पांच्या वाक्यात कुठे तरी स्वानुभव होता हे नक्कीच. उमा आणि सुनील तिथे पोहचताच त्यांनी वस्तीतल्या लोकांसमोर पथनाट्य सुरू केले. काहीतरी वेगळं आहे की काय अशा नजरेत सारे बघत होते. सुनील आणि उमाचा खणखणीत आवाज साऱ्या वस्तीत फिरत होता.
"अरे यारे !! अरे यारे !! अरे यारे !! यारे यारे यारे!!" सुनील मोठ्याने म्हणाला. आजूबाजूला लोक जमा झाले.
"आहो ताई !! आक्‍का  !! काका !! आणि तात्या !! यारे यारे !!! " उमा म्हणाली.
"सांगतो एक गोष्ट
तुम्ही लक्ष देऊन ऐका
पोरीस द्या शिक्षण
आणि शान वाढवा बरका!! "

अरे यारे !! अरे यारे !! आमचं काही ऐका रे !!!

घराचा दिवा पोरगं जणू
घराची वात पोरगी असते
घरात सारे शिकले तर
घराची प्रगती होत असते

अरे यारे !! अरे यारे अरे यारे !! " सुनील आणि त्याचे सोबती सगळे मिळून म्हणू लागले .
  तेवढ्यात गर्दीतून कोणी एकाने सुनीलच्या दिशेने दगड भिरकावला. सुनीलच्या तो डोक्यावर लागला. रक्त आले. कोणी तो एक गर्दीतून म्हणाला.
"निघा रे इथुन लवकर !! तुमची मती बुडाली पण आमची नका बुडवू !! पोरीच शिक्षण म्हणजे!! धर्म बुडाला म्हणजे !! हाकला रे यांना !! " गर्दी आक्रमक झाली.
सुनील अचानक डोक्याचे रक्त पुसत उभारला.
"अरे धर्म शिक्षणाने बुडत नाही !! आणि मुलगी तर दोन घरांची वात !! जाईल तिथे उजेड करेन !!"
"ये तू आम्हाला नको शिकवू रे !! " अस म्हणत सुनील, उमा आणि त्यांच्या मित्रांना वस्तीतून बाहेर काढलं.
घरी येताच मंदाने सारा प्रकार पाहिला. आणि ती रागाने लालबुंद झाली. कित्येक वेळ ती सुनील आणि उमाला बोलत होती. डोक्यावर मलमपट्टी करून सुनील घरी आला आणि मंदा चिडली. तो राग आईच्या मायेचा होता हे सुनीलला कळायला वेळ लागला नाही. रात्री जेवताना आप्पांना सगळी कहाणी सांगून सुनील  आप्पांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता.
"स्त्री ही खूप मोठी शक्ती !! आणि ती शिकली तर समाज अजून पुढे जाईन !! सुनील तुझ्या या कार्याला खरंच  खूप सलाम !! बदल घडेल!! नक्की घडेल !! फक्त तो बदल करण्याची ताकद कमी पडता कामा नये !! " आप्पा सुनीलच्या डोळ्यात पाहात म्हणाले.
"आप्पा !! खरंच तुमच्या या विचारांनी मला अजुन प्रेरित केले !! "
सुनील आणि आप्पा कित्येक वेळ बोलत बसले. रात्री बोलून झाल्यावर आप्पा आपल्या खोलीत आले. लेखणी हातात घेत लिहू लागले.
" कधी कधी आपण आपल्याच बालपणास , तारुण्यास!! आपल्या मुलात पुन्हा पुन्हा अनुभवत असतो. सुनीलच्या रूपाने मला माझे कित्येक जुने क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता आले. पण त्याच्या जन्माच्या आधी आठ दिवस स्वातंत्र्यासाठी कोठडीत राहावं लागलं होत हे आज खुप आठवतं. गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याची आवृत्त्ती आम्ही इकडे आमच्या गावात केली. दादांना काहीही न सांगता मी सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी झालो. पोलिसांनी त्या नंतर आठ दिवस आम्हाला कित्येक अत्याचाराणी त्रस्त केले.  आम्ही मात्र एक पाऊलही मागे झालो नाही. पुन्हा नंतर सोडले तेव्हा दादांची प्रतिक्रिया बाकी मोलाची होती.
"सदा माझ्या पोरा !! देशासाठी झटतो आहेस पाहून मनाला आनंद झाला..!! अरे ते टिळक ,बापू म्ह्णजे या स्वातंत्र्य संग्रामाचे अग्निकुंड रे !! पोरा अभिमान वाटतो तुझा !!!" अगदी मनसोक्त दादा बोलले.
आप्पा हातातली लेखणी खाली ठेवत खोलीतल्या दिव्याकडे एकटक पहात राहिले, कित्येक वेळ.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

स्वप्न..(कथा भाग १)

"माझ्यासारखा नतध्रष्ट आणि स्वार्थी माणूस शोधूनही सापडायचा नाही. हो करतात काही लोक माझ्या लिखाणाचं कौतुक !! पण ते सगळं निरर्थक !! तुम्ही म्हणालही कदाचित!!  एवढा मोठा लेखक स्वतः बद्दल हे काय लिहून ठेवतोय. पण जे काही आहे ते खरेच आहे !! दादांच्या जाण्याने या सगळ्या गोष्टी नजरेस पडल्या एवढंच. कोणी डॉक्टर झाले , कोणी मोठ्या हुद्द्यावर पोहचले. पण आम्ही झालो एक मूर्ख लेखक. ज्याला ना सुरुवात ना अंत! उगाच शब्दांशी खेळत बसायचं हाच तो काय आमचा प्रपंच!! आणि आत्मचरित्र म्हणजे आमच्यातला वेडा माणूस उगाच सर्वांना दाखवायचा! बाकी मी फक्त लिहिणारा, आता यातून काय हाती लागते ते तुमचे तुम्हावर सोपवून मी हा प्रपंच करतो आहे. दादांच्या जाण्याने आयुष्याची खरतर दुसरी बाजू सुरू झाली. मंदा सारखी सर्वगुण संपन्न बायको आयुष्यात आली , काही दिवसात सुनील माझा मुलगा आमच्या आयुष्यात आला. पण दुःख याचंच होत की दादा!! माझे वडील हे सर्व पाहायला नव्हते. नाही म्हणायला तेवढी माझी आई आजही माझी सोबती आहे. मी आत्मचरित्र लिहितोय म्हटल्यावर शेजारच्या कुमी बद्दल त्यात काही लिहू नकोस असं तिने अगदी गमतीने सांगितल.!! आता कुमी कोण हा प्रश्न नसावा एवढीच माफक अपेक्षा !! असो, या पुस्तकाच्या रूपाने मी अगदी स्वतःशीच पुन्हा भेटेन!!  तारुण्याची मज्जा अगदी दुरून का होईना अलगद पाहून घेईन ..!! " आप्पा वहीत लिहिताना अचानक दरवाजा वाजू लागला बाहेरून आवाज आला.
"आप्पा !! आप्पा!! जेवायला येताय ना ?? "सुनील विचारू लागला.
"अरे आलोच !!" असे म्हणत आप्पा दरवाजा उघडून बाहेर आले.
"काय हो आप्पा !! एवढं काय लिहीत असता हो दरवाजा बंद करून ??"
"वेडेपणाचे खेळ रे सगळे !! बाकी काही नाही!! आमच्या सारख्या शब्द वेड्यांना काय असणार ध्यास दुसरा !!  प्रियसिची तगमग !! शांत निथळ समुद्र !! आणि एक वेडा प्रेमी!! " आप्पा मनसोक्त हसत म्हणाले.
"चला आता !! " सूनीलही हसत हसत स्वयंपाक घरात जाऊ लागला.
"आज दक्षिणोत्तर दिशा एकाच बाजूला येऊन बसल्या की काय !!! "
" अगदीच अस काही नाही !! पण आप्पांच्या खोली पासूनच एकत्र आल्या आहेत !! "  आप्पा अगदी गमतीने म्हणाले.
" बरं चला जेवायला बस!!! " आजी आप्पांची आई अचानक मध्येच म्हणाली.
जेवायला बसताच आप्पांच्या आपल्या आई सोबत कित्येक गप्पा चालू झाल्या. अचानक मंदा मध्येच म्हणाली.
"पुढच्या वर्षी सूनीलला आपण तालुक्याच्या कॉलेजात घालुयात !! शिकून मोठा झाला तर  त्याचच कल्याण होईल !! "
"आई मी कुठंही जाणार नाहीये !! "
"तुला शिकायचं नाहीये का पुढे ??"मंदा एकदम रागात येत म्हणाली.
"तसं नाहीये पण मला दुसरं काही करायचं आहे !! माझी स्वप्न माझी ध्येय वेगळी आहेत..!! " सुनील अगदी जोरात म्हणाला.
"अरे हो पण तू ते तिकडे जाऊनही करू शकतोस ना ??" आप्पा अगदी मध्यस्था सारखे बोलले.
"नाही !! मला ते इकडेच राहून करायचं !! "
"कशाच काही नाही करायचं त्याला !! नुसतं फिरायचे आहे !! "
"आई तू आता काहीही बोलू नकोस बर!! "
"अरे जेवताना तरी नकोस ना बोलू त्याला !!" आई मंदाकडे पाहत म्हणाली.
"आहो पण कधीतरी हे बोलायलाच हवं ना!!"
"मला ना बोलायचं नाहीये तुम्हाला !! "  सुनील अगदी रागारागाने ताटावरून उठून गेला.
"अरे सुनील !! थांब जेवण तरी करून जा !! " आप्पा पाठमोऱ्या सूनीलकडे पाहून म्हणाले.
  कित्येक वेळ पुन्हा आप्पा आणि मंदा दोघेच बोलत बसले.
"मंदा यापुढे तू त्याला कसलाच विषय बोलू नकोस !! "
"आहो, पण मी त्याच्या भल्यासाठीच बोलत होते ना!!!"  मंदा डोळ्याला पदर लावत म्हणाली.
"मंदा हे वयंच अस असतं की मन दुसऱ्या कोणाचं ऐकतंच नसतं !! काहीतरी करायचे आहे म्हणून धडपडत असत !! आणि मंदा मी सुनीलच्या डोळ्यात ती चमक पाहिली आहे !! मला वाटतं आपण त्याला बळजबरी करू नये !! "
"आता तुम्हीच असे म्हणताय म्हटल्यावर प्रश्नच मिटला.!! " मंदा निघून जात म्हणाली.
आप्पा खोलीत येत कित्येक विचारांशी बोलत होते. मनात कित्येक शब्द खेळत होते वहिवर येण्यास उत्सुक होते.
"आत्मचरित्र लिहिताना कदाचित मी किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन !! पण ते सगळं ढोंग असेल !! मी हट्टी आहे !! मनाला हवं ते करणारा आहे!! कॉलेजात होतो तेव्हा तर भयंकर हट्टी!! कोणाला विचारायचं नाही !! मनाला वाटेनं ते करणारा !! एकदा असेच दादांच्या सोबत जेवायला बसलो होतो, तेव्हाचा एक प्रसंग,
"कारे सदा !! " आता सदा कोण ते विचारू नका तो मीच सदाशिवराव उर्फ आप्पा.
"फुकणीच्या !! तुला पोस्टात नोकरी लावून देतो म्हटलं तर सरळ नाही म्हणालास.
"दादा!!! आहे एवढ्या मोठ्या जमिनदाराच्या पोरान पोस्टात काय नोकरी करावी बर !! "
"अरे !! जमीनदार मी !! मेल्या तुझी ती लायकी काय रे !!  उद्या वाटलं तर  एक दमडी तुझ्या नावे करणार नाही की रे !! "
"नका करू !! " मी अगदी सरळ बोलून गेलो.
"आयुष्याचे काही गणित मांडलेस की असेच फुकाचे दिवस ??" दादा अगदी ताटावर दोन बोट चढून म्हणाले.
"हो मांडलेत तर !! पण वेळ आल्यावर सांगेन !! "
"मेल्या उद्याची उद्या तालुक्याला निघून जा !! "
"दादा मला काहीतरी वेगळं करायचं आहे हो !!! " अस म्हणत मी ताटावरून उठून निघून गेलो.
यावरून दादांचं आणि माझ नात अगदी कस होत हे कळेन. पण अगदीच हाडवैर अस काही नव्हतं. दादांचं प्रस्थ काही वेगळंच होतं . ते मला नेहमी म्हणायचे,

"स्वप्नातल्या ध्येयास तू
उगाच फुंकर घाल
वेड्या मनास आज तू
उद्याची साद घाल
नसेल सोबती कोणी तरी
एकटाच तू पुढे चाल
मागे उरले काय ते पाहण्या
मनास आवर घाल..!!

मागे उरले काय ते पाहण्या .. मनास आवर घाल!! " दादांच्या ओळी सतत मनात असायच्या . आयुष्यात ध्येय गाठायचे असेल!! तर काय राहिले हे पहात बसण्यात व्यर्थ वेळ दवडू नकोस असे ते नेहमी सांगायचे...!!"
अचानक मंदा खोलीत आली. आप्पा लिहिता लिहिता थांबले.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

एक ती ...!!

एक अल्लड नटखट रूप सुंदरी
पाहता क्षणी मनात भरली
शब्दांसवे खूप बोलली
कवितेतूनी भेटू लागली

कधी गंधात त्या दरवळून गेली
कधी फुलांसवे हरवून चालली
कधी त्या स्वप्नी येऊन गेली
कधी अलगद मिठीत विरली

लख्ख त्या चांदण्यात उगा शोधली
पावसाच्या सरीत चिंब भिजलेली
हळुवार ती झुळूक जणू बोलली
प्रेम हे माझे पाहून गेली

निरागस भाव तिचे टिपू लागली
ओठांवरील हसू तिचे शोधू लागली
कधी कधी उगाच रागावून गेली
कधी कधी उगाच रुसू लागली

वाट तिची कोणती विचारू लागली
वेलीस, पानास , फुलास बोलून गेली
पुन्हा पुन्हा तिथेच येऊ लागली
चेहरा तिचा पाहू लागली

मनास या माझ्या घेऊन गेली
नजरेस या माझ्या ओलावून गेली
शब्दासावे मज खूप बोलली
कवितेत अखेर राहून गेली

एक अल्लड नटखट रूप सुंदरी
कवितेतून मज असे भेटू लागली..!!

✍योगेश

भेट ..!

एक गोड मावळती रेंगाळूनी
तिच्या नजरेच्या कडात हरवूनी
उरल्या कित्येक आठवणींत
ती बोलकी एक भेट

जणू ती अबोल न राहावी
कित्येक शब्दात मज बोलावी
उरल्या कित्येक भावनेत
तिने शोधावा एक शब्द

मी शांत सारे ऐकुनी
तिच्यात जावे बेधुंद होऊनी
ओठांवर तिच्या नजरेस अडवून
पाहावे एक गोड स्वप्न

सावल्यास जरा थांबुनी
बोलावी सल मनातूनी
विरहात तिच्या न द्यावा
मनास कोणता एक भास

नको ती वाट परतीची
थांबवावी ती वेळ क्षणाची
हात हातात तिचा घेताना
जणू द्यावे एक वचन

पुन्हा इथेच भेटण्याची
वाट तिची इथेच पाहण्याची
पाठमोऱ्या तिला जाताना पाहून
मनात उरली फक्त एक सांजभेट..!!

✍योगेश

उन्हाळ्याच्या सुट्टीत..

   रखरखत्या उन्हात आज जेव्हा सावली शोधु मी लागलो तेव्हा भर उन्हात पोट्टे खेळत होते. माझ्या मनात उन्हाचा त्रास होता आणि मनात भविष्याच्या कित्येक गोष्टी. सुख म्हणून त्या सावलीत लावलेली एक सरबताची टपरी दिसली. १ ग्लास २ ग्लास सरबत पिऊनही अंगाची लाही कमी झाली नाही. आणि मनाला एक प्रश्न पडला त्या लहान मुलांना त्या सूर्याची झळ काहीच का बोलत नाही? तेव्हा उगाच मनाला कित्येक आठवणीच्या झळाया लागल्या. काही गरम होत्या आणि काही अगदीं अचानक थंड वाटणाऱ्या होत्या.
  मन कित्येक वर्ष मागे जाऊ लागले. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत किती धमाल आणि मजा करायचो. सुट्ट्या लागल्या की मी माझ्या आजीकडे महिनाभर राहायला जायचो. आजी राहायला बीडला होती. त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ दोघेही आई बाबां पासून दूर महिनाभर जायचो. माझ्या आठवणीतल्या कित्येक गोष्टीनं पैकी ते एक. तिथे घर अगदी साधं. मागे पिंपळाचे झाड असायचे आणि पुढे रहदारीचा रस्ता. खेळायला तसे बरोबर तिथलेच मित्र. पिंपळाच्या झाडाला लागूनच एक शाळा. मी आणि मित्र त्या शाळेत कित्येक वेळा खेळायला जायचो. वर्ग उघडे बाकांवर नुसती धूळ साचलेली आणि रिकामे फळे. शाळा अगदी भकास वाटायची. त्या पिंपळाच्या झाडाचा आवाज वाऱ्या सोबत एक वेगळेच वातावरण तयार करायचा. अशात आमच्या मित्रांचा नुसता गोंधळ. रोज क्रिकेट, कब्बडी, खोखो , असे कित्येक खेळ आम्ही खेळायचो. पण आता ती आठवण मनात तशीच राहिली. आजी हयात नाही आणि आता तिकडे खास उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जाणं होतंच नाही. खरंतर जस आपण मोठे झालो तस उन्हाळा ही काही सुट्टी राहिलीच नाही. लहानपणी हवाहवासा वाटणारा उन्हाळा आता मोठेपणी नकोसा झाला आणि मोठेपण वयाने आले हे सांगून गेला.
   उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर काहीतरी करायचं म्हणून ठरवायचं आणि त्या सुट्ट्यात कुठे मामाकडे जावं तर काही उन्हाळ्याच्या सुट्ट्या इकडेच व्हायच्या. मग खास उन्हाळ्याच्या सुट्ट्या निम्मित घरात केबल घेतलं जायचं. मग काय दिवसभर नुसते पिक्चर बघायचे , cartoon बघायचे. त्यावेळी अगदी वेगळच वाटायचं घरात केबल आले म्हणजे! Donald duck , mickey mouse , simba अश्या कित्येक cartoons नी नुसते टीव्हीला बांधून ठेवायचे. मग पुढे काही दिवसाने टीव्ही वर चालणारी गेम आणायची. Mario , contra अश्या games ने उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे वेगळीच पर्वणी असायची. मित्रांकडे त्या गेमच्या कॅसेट्स घ्यायला जायचं आणि कधी कधी एकत्र मिळून नुसती धमाल करायची. म्हणजे एकंदरीतच काय तर नुसती धम्माल असायची. त्यावेळी उन्ह खूप लागतंय अस मनातही येत नव्हते. चार वाजले की पुन्हा मैदानात खेळायला जायच ते थेट सूर्यास्त होई तोपर्यंत खेळत राहायचं.
   उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नुसते मुक्त फिरायचे. आताच्या लहान मुलांसारखे summer camp वैगेरे , किंवा हे class ते class लावले अस काही नव्हतं. मुळात माझे बाबानाच ते आवडत नसतं. ते म्हणायचे मुलांना काहीतरी वेगळं करायची संधी ही उन्हाळ्याची सुट्टी देते त्यामुळे त्यांनी मनसोक्त खेळावं , आवडीचे  पुस्तक वाचावे , आवडीचे खावे , अशाने पुढच्या वर्षाची सुरुवात अगदी जोमाने होते. एक नवीन प्रेरणा मिळते. पण त्यांचा हट्ट असायचा की मी दर उन्हाळ सुट्टीत ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावी . आणि ते योग्यच होते ते आज आठवणी पाहताना कळते.
    अगदीच काय तर उन्हाळा सुट्टी म्हणजे अगदी मुक्त फिरावे असे कारण. त्या संध्याकाळी अगदी हातपाय तोंड धुवून देवाला पाय पडणे, रोज संध्याकाळी मित्रांन सोबत रोज एकांच्या घरी असे डब्बा भोजन करणे, गप्पा मारणे आणि कित्येक विषयावर चर्चा करणे. अश्या कित्येक गोष्टी व्हायच्या. रोज भेटणारा वर्गमित्र त्या सुट्टीत कुठे गायब व्हायचा ते थेट सुट्टी संपल्यावर दिसायचा. वर्गात रोज दिसणारे मित्र क्वचित या सुट्टीत भेटायचे. त्यावेळी मोबाईलचं प्रस्थ एवढं नव्हतं. Landline फोन असायचा त्यावरूनही अगदी मोजकेच फोन करायचे. काटकसर म्हणा किंवा आईची शिस्त. आज मात्र त्या गोष्टी आठवले की ओठांवर एक स्मित हास्य येते. त्यावेळी मित्रात उगाच फोन करण्याचं प्रस्थ अचानक वाढलं होत मीही कित्येक फोन मित्रांना लावायचो तेव्हा आईने फोनला lock लावला होता. पण त्या आठवणी अगदी छानच.
  त्या दोन अडीच महिन्यात काय करावे आणि कितीच आनंद घ्यावा असे व्ह्यायचे. मामाकडे जायचे , नाहीतर आजीकडे जायचे नाहीच कुठे गेलो तर घरीच मज्जा करायचे असे कित्येक प्लॅन ठरायचे. गच्चीवर जाऊन मच्छरदाणी लावून झोपायच त्यावेळी आकाशातल्या चांदण्या बघत बसायचो ते कित्येक वेळ. पण बघता बघता सुट्ट्या अशाच संपून जायच्या. शाळा पुन्हा सुरू होणार म्हणून कित्येक गोष्टी ठरवायचा. नवीन पुस्तकं, नवीन वर्ग , पुन्हा ते सारे मित्र एकत्र येणार आणि पुन्हा नुसता गोंधळ. उन्हाळ्याची सुट्टी संपणार याच दुःख तर होतंच पण पुन्हा शाळा सुरू होणार याचा आनंद ही असायचा. म्हणजे एकंदरीत काय तर लहानपण म्हणजे क्षणाक्षणाला आनंद देणारे. उन्हाळा संपला म्हणून नाही की शाळा पुन्हा सुरू होणार म्हणून नाही. प्रत्येक क्षणाला नुसत्या आठवणी गोळा करायच्या. पुढचे कित्येक दिवस नुसते उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली धमाल मित्रांना सांगत मनसोक्त हसायचे. आणि हसत हसत कधी तिमाही परीक्षा येते कळतही नसायचे.
  अश्या कित्येक आठवणीच्या गोष्टी सांगत बसायचे . उगाच जुन्या क्षणांकडे पाहून बालपण पुन्हा बोलवायचे कदाचित यातच असते पुन्हा पुन्हा त्याला आठावायचे. आणि आठवणीत लिहायचे, त्या मुलांना उन्हाच्या झळां काहीच का बोलत नाहीत याचं उत्तर कदाचित माझेच मला भेटले होते, मलाच ते बोलत होते जणू

आठवणींचा तो क्षण
पुन्हा तिथेच येऊन बसला
मला कित्येक गोष्टी बोलून
मनास त्याची ओढ लावून गेला

ते बालपण ती शाळा
सारे चीतारून गेला
आज आठवणींच्या सावलीत
एक झुळूक होऊन गेला

भेटून ये पुन्हा साऱ्या त्यांना
मला उगाच सांगून गेला
शब्दात लिहून ठेव त्या आठवणी
उगाच भांडत बसला

त्या बाकावराती शाळेत
उगाच जाऊन बोलला
इथेच होते कित्येक मित्र
पुन्हा शाळेत घेऊन गेला

कुठे वेचावी कित्येक वर्षे
तो सारी चित्र रंगवून बसला
आठवणींचा तो क्षण पुन्हा
तिथेच येऊन बसला ..!!

✍योगेश खजानदार

माझेच मला ..!!

झाल्या कित्येक भावना रित्या
सुटले कित्येक प्रश्न आता
कोण ओळखीचे इथ भेटले
अनोळखी झाल्या वाटा

साथ कोणती हवी या क्षणा
मी असूनी का आहे एकटा
नसावी त्या सावल्यांची आस
कोणत्या या मनाच्या छटा

शोध संपला सुटल्या दिशा
मुक्त वाहतो तो आज वारा
ओढ नाही मनास आता कोणती
कसल्या बंधनाचा आता मारा

का असे भेटलो मी कोणा
विसरून सारे गुंग त्या जगा
पुन्हा भेटण्यास यावे का कोणा
की विसरून जावे माझे मला

मनात पाहुनी ओळखीचा चेहरा
मी भेटलो आज माझेच मला
ओळखले मी माझेच मला नी
हरवून गेलो मी साऱ्या जगा

झाल्या कित्येक भावना रित्या
सुटले कित्येक प्रश्न आता ..!!

✍योगेश

माझी आई !! ✍

अथांग भरलेल्या सागराचे
कोणी मोजेल का पाणी
त्या सम माझ्या आईचे प्रेम

नजरेत दिसते आकाश सारे
सामावून घ्यावे मिठीत वारे
त्या सम् माझ्या आईचे मन

त्या मंदिरी बैसला देव एक
त्याची पहावी अनेक रूपं
त्यात सर्वात सुंदर माझ्या आईचे रूप

ती आठवते आजही कुस
नसे चिंता कोणती असता त्यात
ती मायेची ऊब तो आईचा पदर

घडल्या अनेक मूर्ती कोरले अनेक शिल्प
आठवणीत राहिले कित्येक विचार
सोबतीस माझ्या आईचे संस्कार

उन्हात सारी तळपती झाडे
सावल्यात त्यांच्या सुखावून जावे
त्या सावल्या सम माझ्या आईचा सहवास

गडगडल्या ढगातून सरी पडव्या
पाण्यास व्याकुळ त्या जमिनीस मिळाव्या
त्या सम मी समावतो आईच्या मिठीत

जगात शोधून कोणी दुसरे नाही
आईच्या जवळ सारी दुनिया राही
त्या दूनियेस नमन माझ्या आईचे चरण

✍योगेश

सहवास !! (कथा भाग ६ ) अंतिम भाग.

सुमेधाने मनोजला पत्र पाठवले होते. त्याला ते सगळे अनपेक्षित होते.तो पुढे वाचू लागला.

प्रिय मनोज ,

      खरतर त्या दिवशी कित्येक गोष्टी मी मनमोकळेपणाने तुला बोलले. मनाला हलकं वाटलं. २५ वर्ष मनात साठून राहिलेल, त्या दिवशी सगळं रित केलं मी. तुझ्या मनाचा खरंच विचार न करता मी माझ्या आयुष्याच्या कित्येक निर्णयांवर ठाम राहिले. पण तू माझ्यावर प्रेम करायच्या या एकाच निर्णयावर आजही ठाम आहेस. २५ वर्ष मी नको त्या माणसा सोबत, त्याच्या सहवासात काढले, आणि तू तेच वर्ष माझ्या आठवणीच्या सहवासात काढले. तू त्या दिवशी लग्न केलच नाहीस म्हणालास आणि मनातल्या कित्येक भावना मलाच दोष देऊ लागल्या. तुझ्या एकटेपणाचा दोष माझ्याच माथी मारू लागल्या. हो मी तुझी गुन्हेगार आहे हे नक्की.पण मला माफ करशील एवढं मात्र नक्की.
  त्या दिवशी अचानक समोर आलास आणि मनाला आनंद झाला. तुझ्या सोबतच्या कित्येक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पण ही वेळ पुन्हा भेटण्याची नाहीये.  कदाचित पुन्हा कधीच न भेटण्याची आहे. तुला हे सगळे वाचून थोडे दुःख होईल पण मी हे शहर सोडून जाते आहे. कायमची!!  मला पुन्हा भेटण्याचं वचन नको !!  पण माझ्या त्या गोड आठवणी तशाच जपून ठेव एवढं मात्र मी हक्काने सांगेन .त्यावेळी मी अचानक लग्नाचा निर्णय घेतला म्हणून तू रागावलास पण आज या माझ्या निर्णयाने रागावू नकोस.
   रमण गेला!! पण आयुष्याची सारी गणिते सांगून गेला. मला मिळवलं त्याने !!! पण माझा होऊ नाहीं शकला तो कधी. याच एका दुःखाने त्याला मरण जवळ करावासं वाटलं. या त्याच्या सहवासात काही पहिली वर्ष सरली द्वेशाची !!  पण त्याने नंतर खूप प्रेम केलं माझ्यावर. पहिल्या साऱ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न ही केला त्याने. पण त्याचच मन त्याला आतून खात राहील. आयुष्याच्या संध्याकाळी त्याने फक्त मला एवढंच मागणं मागितलं होत की माझ्या नंतर मला अग्नी दिल्यावर अखेरपर्यंत मी तिथे थाबावं. आणि त्याची ती इच्छा मी पूर्ण केली. शेवटची ती राख ही मला माफी मागते आहे असा मला भास झाला." मनोज डोळ्यातील अश्रू पुसून पुढे वाचत होता.
"सगळं सहन करूनही अखेर माझ्याच माणसांनी मलाच दोषी धरले याची खंत खूप आहे मला. पण माझ्याच कोणीतरी अखेरपर्यंत माझाच होऊन राहावं हेही खूप काही बोलत मनाशी. हो मनोज!! तुझ्या या प्रेमा समोर मी निशब्द झाले. खरंच इतकं का रे प्रेम करतोस माझ्यावर तू??  कदाचित या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी अनुत्तरितच राहील.असो जास्त काही अजुन लिहिणार नाही!!  आयुष्यात कोणाचा तरी सहवास हवा असतो !! तुला माझ्या आठवणींचा आहे आणि मला तुझ्या आठवणींचा!! काळजी घे !!

तुझीच

सुमेधा ...

  पत्र टतसेच हातात ठेवून मनोज कित्येक वेळ खिडकीतून बाहेर बघत राहिला. जणू मनाशी कित्येक गोष्टी बोलू लागला.
"आयुष्यात माणूस खऱ्या प्रेमाला का मुकतो!! तेच मला कधी कळत नाही!! कित्येक वर्ष सुमेधाच्या आठवणी या उराशी बाळगून होतो मी. ती पुन्हा भेटली तर जाऊ नाही द्यायचं तिला!! अस मनाशी पक्क ठरवल होत ना !! मग आता कुठे जाऊ शोधायला पुन्हा तिला!! की जाऊन भेटाव सुमेधाला आणि खडसावून सांगावं की पुन्हा निघून गेलीस तर बघ !!! पण शोधावं तरी कुठे तिला?? त्या दाही दिशांनी एकच कल्लोळ केला असे का भास व्हावे !! जायचं असेन तर खुशाल जा म्हणावं तिला!! पण या आठवणींचा सहवास नको आता मला !! घेऊन. जा त्याही सोबत !! " अचानक मनोज भानावर आला.
आयुष्यात एकदा नाही तर दोनदा प्रेम केलं.  पण दोन्ही वेळा ती ओंजळ फक्त आठवणींनीच भरून गेली.
मनोज पुन्हा त्या जुन्या कट्ट्यावर गेला. एकटाच जणू भरलेल्या आठवणीची ओंजळ रिकामी करण्यास. पण तिथे आज कोणचं का नव्हते?? त्या कल्लोळातही तो एकटेपणा खूप काही सांगत होता.  सुमेधा पुन्हा आपल्याला आठवणीच्या सहवासात सोडून गेली !! जणू  कायमची !!

आठणींचा तो सहवास
उगाच मला का छळतो
तुझ्या असण्याचे खोटे भास
मनास आज का देतो

शोधतो दाही दिशा
पुन्हा पुन्हा तिथेच येतो
तू ना दिसताच त्यास
बावाऱ्या मनास का बोलतो

सांगु कसे मी त्याला
उगाच का व्यर्थ शोधतो
आठवणीतल्या तुला
माझ्या अश्रू मध्ये रोज भेटतो !!

मनोज कित्येक वेळ त्या कट्ट्यावर बसून होता. सुमेधाच्या आठवणींच्या सहवासात ...!!!

*समाप्त*

✍योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...