उन्हाळ्याच्या सुट्टीत..

   रखरखत्या उन्हात आज जेव्हा सावली शोधु मी लागलो तेव्हा भर उन्हात पोट्टे खेळत होते. माझ्या मनात उन्हाचा त्रास होता आणि मनात भविष्याच्या कित्येक गोष्टी. सुख म्हणून त्या सावलीत लावलेली एक सरबताची टपरी दिसली. १ ग्लास २ ग्लास सरबत पिऊनही अंगाची लाही कमी झाली नाही. आणि मनाला एक प्रश्न पडला त्या लहान मुलांना त्या सूर्याची झळ काहीच का बोलत नाही? तेव्हा उगाच मनाला कित्येक आठवणीच्या झळाया लागल्या. काही गरम होत्या आणि काही अगदीं अचानक थंड वाटणाऱ्या होत्या.
  मन कित्येक वर्ष मागे जाऊ लागले. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत किती धमाल आणि मजा करायचो. सुट्ट्या लागल्या की मी माझ्या आजीकडे महिनाभर राहायला जायचो. आजी राहायला बीडला होती. त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ दोघेही आई बाबां पासून दूर महिनाभर जायचो. माझ्या आठवणीतल्या कित्येक गोष्टीनं पैकी ते एक. तिथे घर अगदी साधं. मागे पिंपळाचे झाड असायचे आणि पुढे रहदारीचा रस्ता. खेळायला तसे बरोबर तिथलेच मित्र. पिंपळाच्या झाडाला लागूनच एक शाळा. मी आणि मित्र त्या शाळेत कित्येक वेळा खेळायला जायचो. वर्ग उघडे बाकांवर नुसती धूळ साचलेली आणि रिकामे फळे. शाळा अगदी भकास वाटायची. त्या पिंपळाच्या झाडाचा आवाज वाऱ्या सोबत एक वेगळेच वातावरण तयार करायचा. अशात आमच्या मित्रांचा नुसता गोंधळ. रोज क्रिकेट, कब्बडी, खोखो , असे कित्येक खेळ आम्ही खेळायचो. पण आता ती आठवण मनात तशीच राहिली. आजी हयात नाही आणि आता तिकडे खास उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जाणं होतंच नाही. खरंतर जस आपण मोठे झालो तस उन्हाळा ही काही सुट्टी राहिलीच नाही. लहानपणी हवाहवासा वाटणारा उन्हाळा आता मोठेपणी नकोसा झाला आणि मोठेपण वयाने आले हे सांगून गेला.
   उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर काहीतरी करायचं म्हणून ठरवायचं आणि त्या सुट्ट्यात कुठे मामाकडे जावं तर काही उन्हाळ्याच्या सुट्ट्या इकडेच व्हायच्या. मग खास उन्हाळ्याच्या सुट्ट्या निम्मित घरात केबल घेतलं जायचं. मग काय दिवसभर नुसते पिक्चर बघायचे , cartoon बघायचे. त्यावेळी अगदी वेगळच वाटायचं घरात केबल आले म्हणजे! Donald duck , mickey mouse , simba अश्या कित्येक cartoons नी नुसते टीव्हीला बांधून ठेवायचे. मग पुढे काही दिवसाने टीव्ही वर चालणारी गेम आणायची. Mario , contra अश्या games ने उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे वेगळीच पर्वणी असायची. मित्रांकडे त्या गेमच्या कॅसेट्स घ्यायला जायचं आणि कधी कधी एकत्र मिळून नुसती धमाल करायची. म्हणजे एकंदरीतच काय तर नुसती धम्माल असायची. त्यावेळी उन्ह खूप लागतंय अस मनातही येत नव्हते. चार वाजले की पुन्हा मैदानात खेळायला जायच ते थेट सूर्यास्त होई तोपर्यंत खेळत राहायचं.
   उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नुसते मुक्त फिरायचे. आताच्या लहान मुलांसारखे summer camp वैगेरे , किंवा हे class ते class लावले अस काही नव्हतं. मुळात माझे बाबानाच ते आवडत नसतं. ते म्हणायचे मुलांना काहीतरी वेगळं करायची संधी ही उन्हाळ्याची सुट्टी देते त्यामुळे त्यांनी मनसोक्त खेळावं , आवडीचे  पुस्तक वाचावे , आवडीचे खावे , अशाने पुढच्या वर्षाची सुरुवात अगदी जोमाने होते. एक नवीन प्रेरणा मिळते. पण त्यांचा हट्ट असायचा की मी दर उन्हाळ सुट्टीत ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावी . आणि ते योग्यच होते ते आज आठवणी पाहताना कळते.
    अगदीच काय तर उन्हाळा सुट्टी म्हणजे अगदी मुक्त फिरावे असे कारण. त्या संध्याकाळी अगदी हातपाय तोंड धुवून देवाला पाय पडणे, रोज संध्याकाळी मित्रांन सोबत रोज एकांच्या घरी असे डब्बा भोजन करणे, गप्पा मारणे आणि कित्येक विषयावर चर्चा करणे. अश्या कित्येक गोष्टी व्हायच्या. रोज भेटणारा वर्गमित्र त्या सुट्टीत कुठे गायब व्हायचा ते थेट सुट्टी संपल्यावर दिसायचा. वर्गात रोज दिसणारे मित्र क्वचित या सुट्टीत भेटायचे. त्यावेळी मोबाईलचं प्रस्थ एवढं नव्हतं. Landline फोन असायचा त्यावरूनही अगदी मोजकेच फोन करायचे. काटकसर म्हणा किंवा आईची शिस्त. आज मात्र त्या गोष्टी आठवले की ओठांवर एक स्मित हास्य येते. त्यावेळी मित्रात उगाच फोन करण्याचं प्रस्थ अचानक वाढलं होत मीही कित्येक फोन मित्रांना लावायचो तेव्हा आईने फोनला lock लावला होता. पण त्या आठवणी अगदी छानच.
  त्या दोन अडीच महिन्यात काय करावे आणि कितीच आनंद घ्यावा असे व्ह्यायचे. मामाकडे जायचे , नाहीतर आजीकडे जायचे नाहीच कुठे गेलो तर घरीच मज्जा करायचे असे कित्येक प्लॅन ठरायचे. गच्चीवर जाऊन मच्छरदाणी लावून झोपायच त्यावेळी आकाशातल्या चांदण्या बघत बसायचो ते कित्येक वेळ. पण बघता बघता सुट्ट्या अशाच संपून जायच्या. शाळा पुन्हा सुरू होणार म्हणून कित्येक गोष्टी ठरवायचा. नवीन पुस्तकं, नवीन वर्ग , पुन्हा ते सारे मित्र एकत्र येणार आणि पुन्हा नुसता गोंधळ. उन्हाळ्याची सुट्टी संपणार याच दुःख तर होतंच पण पुन्हा शाळा सुरू होणार याचा आनंद ही असायचा. म्हणजे एकंदरीत काय तर लहानपण म्हणजे क्षणाक्षणाला आनंद देणारे. उन्हाळा संपला म्हणून नाही की शाळा पुन्हा सुरू होणार म्हणून नाही. प्रत्येक क्षणाला नुसत्या आठवणी गोळा करायच्या. पुढचे कित्येक दिवस नुसते उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली धमाल मित्रांना सांगत मनसोक्त हसायचे. आणि हसत हसत कधी तिमाही परीक्षा येते कळतही नसायचे.
  अश्या कित्येक आठवणीच्या गोष्टी सांगत बसायचे . उगाच जुन्या क्षणांकडे पाहून बालपण पुन्हा बोलवायचे कदाचित यातच असते पुन्हा पुन्हा त्याला आठावायचे. आणि आठवणीत लिहायचे, त्या मुलांना उन्हाच्या झळां काहीच का बोलत नाहीत याचं उत्तर कदाचित माझेच मला भेटले होते, मलाच ते बोलत होते जणू

आठवणींचा तो क्षण
पुन्हा तिथेच येऊन बसला
मला कित्येक गोष्टी बोलून
मनास त्याची ओढ लावून गेला

ते बालपण ती शाळा
सारे चीतारून गेला
आज आठवणींच्या सावलीत
एक झुळूक होऊन गेला

भेटून ये पुन्हा साऱ्या त्यांना
मला उगाच सांगून गेला
शब्दात लिहून ठेव त्या आठवणी
उगाच भांडत बसला

त्या बाकावराती शाळेत
उगाच जाऊन बोलला
इथेच होते कित्येक मित्र
पुन्हा शाळेत घेऊन गेला

कुठे वेचावी कित्येक वर्षे
तो सारी चित्र रंगवून बसला
आठवणींचा तो क्षण पुन्हा
तिथेच येऊन बसला ..!!

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...