द्वंद्व || कथा भाग १ || मराठी प्रेम कथा ||




टीप :" द्वंद्व  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

प्रिय पायल,

 प्रत्येक क्षणात जेव्हा आपण आपल्या माणसाला शोधायला लागतो ना तेव्हा त्याचं नसण मनाला खूप वेदना देत. आज पुरती दोन वर्ष झाली तुला माझ्यापासून दूर जाऊन पण तरीही तू परत येत नाहीस. तुला कित्येक वेळा पत्र लिहिली मी, पण एकाही पत्राच तू साधं उत्तरही दिलं नाहीस. पण तरीही मी हा पत्र प्रपंच करत राहीन. अगदी शेवट पर्यंत!!  माझ्या विना एक क्षणही न राहू शकणारी तू आज दोन वर्ष माझ्या शिवाय राहते आहेस.तुला माझी एकदाही आठवण आली नाही?? सांग ना ?? एकदा ही नाही !! पण माझे प्रत्येक क्षण तुझी आठवण काढल्या शिवाय राहत नाहीत. कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि तुझ्याकडे यावं, एक दोन वेळा प्रयत्न केलाही मी, पण आईच्या वचनात मी गुंतून गेलो. कारण तू पुन्हा नक्की येणार याचा तिलाही तेवढाच विश्वास आहे. पण आता माझ्या आठवांचा बांध फुटेन की काय असे वाटू लागले आहे.यावेळी नक्की तू पत्राच उत्तर देशील याची मला खात्री आहे. तुझ्या पत्राची वाट पाहतोय. तुझ्या येण्याची वाट पाहतोय. माझ्या चित्रात पुन्हा तुझे रंग भरण्याची वाट पाहातोय.

तुझाच विशाल.

कित्येक वेळ मनातलं कागदावर लिहीत बसलेला विशाल अखेर थांबला. कागदावरती लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचू लागला. वाचता वाचता त्याने मोठ्याने हाक मारली.
"सदा !! ये सदा ! " 
लांबून लगबगीने सदा चालत आला. केस पिकलेले, डाव्या खाद्यावर गमजा,पांढर धोतर घातलेला तो सदा, आपल्या हातातले काम बाजूला ठेवून स्वतःला सावरत आला, बोलू लागला.
"बोला विशाल दादा !! काय काम आहे !!"
" हे पत्र तेवढं पोस्टात टाकं बर !! आणि आजची आज टाकं !!"
क्षणभर सदा स्तब्ध उभा राहिला. काहीच बोलला नाही अखेर त्याच्याकडे पाहून विशाल पुन्हा बोलला,
"काय म्हणतोय मी सदा !! एकातोयस ना ??"
सदा भानावर येत म्हणाला,
"आ !! हो !! हो !! आजची आज पोस्टात टाकतो !! 
"नक्की टाकं !!"

होकारार्थी मान हलवत सदा बाहेर जाऊ लागला. समोर विशालची आई आपल्या कामात गुंग होती. सदा आईच्या जवळ गेला आणि म्हणाला.

"बाईसाहेब !! " 
आई वर न पाहताच बोलली.
"काय झाल सदा ??"
सदाने पत्र पुढे केले.
पत्र पाहताच आईने हातातले काम तसेच ठेवले, पत्राकडे पाहून बोलू लागली.
"आज पुन्हा पत्र लिहिलं विशालने!!"
सदा फक्त पाहत राहिला. आई पुढे बोलू म्हणाली,

"सदा तुला आठवत, विशाल आणि पायल यांचं थाटामाटात लग्न लावून देण्याचा किती हट्ट केला होता मी !!आणि तितक्या थाटात मी ते केलही ! पण तो थाट जास्त दिवस उरलाच नाही रे !! नजर लागावी तशी या गोड नात्याला नजर लागली. जीव तुटतो रे सदा विशालसाठी !! काय करावं काही कळत नाही !!"
"बाईसाहेब तूम्ही नका एवढं वाईट वाटून घेऊन !! हळू हळू विसरून जातील दादा सगळं !! थोडा धीर ठेवा !!" सदा आईला सावरायला सांगू लागला.
"याच तर एका आशेवर जगते आहे रे मी !! आणि त्याच्याशिवाय कोण !!आधार तरी कोण आहे माझा !!"आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणू लागली.
मागून विशाल केव्हा आला कळलच नाही, अचानक सदाला पाहून तो म्हणाला,

"तू गेला नाहीस अजून सदा ?? जा बर पत्र टाकून ये !! उशीर व्हायला नको !!"
"हो दादा !! जातोय मी !! "
सदा निघून गेला. आईच्या पदरा खाली ते पत्र तसेच राहिले.

"विशाल आज काय विशेष पत्राचं ??"
"काही नाही ग आई !! आज पायलला पत्र लिहिलं!! आज तिला माहेरी जाऊन पुरती दोन वर्ष झाली, पण तिचा पुन्हा इकडे यायचा काही निर्णय होत नाहीये !! आणि तिला आणायला जावं म्हटलं तर तू जाऊ देत नाहीयेस !! "
"अरे !! येईल ती मनाने म्हणून मी तुला जाऊ देत नाहीये !! "
"आई अस म्हणता म्हणता दोन वर्ष झाली !!"
"माहितेय रे मला !! पण मला वाटतं तू उगाच हट्ट करू नये तिला !! ती येईल तेव्हा येईन !!"
"तुझ्या शब्दांच्या बाहेर आहे का मी ?? तू म्हणशील तस !!" विशाल आईकडे हसत पाहत म्हणाला.

आईशी बोलून विशाल पुन्हा आपल्या खोलीत गेला. आई विशालकडे पाहून कित्येक विचारात गुंग झाली.

"माणूस इतका प्रेमात का गुंतून जातो की त्याला अस्तित्वाची जाणीव कधीच का होत नाही? जग ते फक्त तेवढंच राहत जेवढं ते स्वतः पाहत राहत. या जगात एकतर तो तरी असतो नाहीतर कोणीच नसतं. विशालच काहीस असच झालं आहे. त्याला अस्तित्वाची जाणीवच का होत नाहीये मला हेच कळत नाहीये. मलाच त्याला या दुनियेत पुन्हा आणावे लागेल का ?? माहित नाही !! पण हे भूतकाळाचे वर्तमान काळाशी असलेले द्वंद्व नक्की कोणाला जिंकू देईल हे तो क्षणच सांगेन !!"

"आई!!" अचानक कोणीतरी हाक मारली.
"कोण ??
"मी !! सायली !!"
"ये ना सायली !! बस !! " आई स्वतःला सावरत म्हणाली.
"विशाल सर ??" सायली प्रश्नार्थक विचारू लागली.
"आहेत मी बोलावते त्यांना !! तू बस ना !"
"हो !! " सायली समोरच्या बाकावर बसत म्हणाली.

आई लगबगीने आत गेली. विशालला सायली आल्याचं सांगितले. विशाल बाहेर येत म्हणाला.

"सायली आज तर आपला वर्ग आहे हे ठरलं नव्हतं ना ?? "
"ठरलं नव्हतं !! पण म्हटलं तुमच्याकडे जाऊन तुम्ही नवीन कोणती चित्र काढत आहात ते पाहत बसाव म्हणजे तेवढीच उजळणी पण होईन !!"
विशाल क्षणभर शांत राहिला. आणि म्हणाला, 
"आज पुरते ठीक आहे पण रोज हे चालणार नाही !! मी दिलेल्या वेळेतच यावं लागेल !! 

ती थोडी स्वतःला सावरणारी. थोडी लाजरी सायली काहीच बोलली नाही.

विशाल तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. सगळीकडे कित्येक त्याने काढलेली चित्रे ठेवली होती. त्यांना पाहतच रहावं अस वाटत होत.

विशाल चित्र काढण्यात गुंग झाला. त्याला चित्र काढताना कित्येक वेळ सायली पाहू लागली आणि मध्येच बोलू लागली.

"सर !! मला काही विचारायचं आहे !! विचारू ??"
विशाल तिच्याकडे पाहत फक्त 'हो विचार!!' एवढंच म्हणाला.
"तुमच्या कित्येक चित्रात स्त्रिचा चेहरा हा एक सारखाच असतो !!! अस का ?? तेच बोलके डोळे, तीच ओढ!!"
विशाल फक्त सायलीकडे पाहत राहिला. काहीच बोलला नाही.

कित्येक वेळ कोणीच बोललं नाही. सायली कंटाळून म्हणाली.

"नुसती चित्र काढण्यात तुम्हाला कंटाळा येत नाही सर??"
"ज्या गोष्टीत आनंद मिळतो !! त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही !!"
सायली काहीच बोलली नाही. कंटाळून अखेर ती म्हणाली.
"सर मी येते !!"

विशाल काहीच म्हणाला नाही. एकदा फक्त त्याने सायलीकडे पाहिले आणि चित्र काढू लागला, सायलीही फक्त त्याच्याकडे क्षणभर पाहत राहिली स्वतःत हरवून गेली.

"न राहवे माझ्यात मी
शोध घ्यावा कुठे तो आता !!
चित्र ते काढावे त्याचे
रंग कोणता भरावा आता !!

आज बोलते माझेच मला
तुझ्यात पहावे कसे मी आता!!
ओठांवरील प्रेमास आता
शब्द कोणते द्यावे मी आता ??

सायली खोलीतून बाहेर केव्हा निघून गेली विशालला कळल ही नाही.

क्रमशः 

✍️योगेश 


एक आठवण ती || विरह मराठी कविता ||



विसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !!

सांगावी तुला ती, पण निशब्द मी आहे !!
तुझ्या सोबतीची, उगा ओढ आहे !!
भेटावी कधी अचानक, मना वाटतं आहे!!
परी आभास का , आज होत आहे !!

साऱ्या चांदण्यात आज, तूला शोधले आहे!!
पण ती चांदणी एक, कुठे हरवली आहे ?
चंद्र तो त्याविन, अधुरा भासतो आहे!!
चांदणे ते पौर्णिमेचे, तुला बोलते आहे !!

पहावी ती सांज, झुळूक एक आहे !!
बोलते ते ती काही, मन हे ऐकते आहे!!
हात हातात घेऊनी, वचन देत आहे !!
आयुष्यभराची सोबत, एवढेच मागणे आहे !!

नजरेत भरुनी घ्यावे, तुझेच चित्र आहे !!
अश्रू हे ओघळता, नजरेस हरकत आहे !!
समजवावे कोणास , हाच प्रश्न आहे!!
मन हे अल्लड, मी अधीर आहे !!

सारी पाने पहावी, तुझेच नाव आहे!!
कवितेत त्या लिहिताना, भाव तूच आहे !!
शब्दांच्या पलीकडे पाहता, गाव तेच आहे !!
जिथे तुझे नी माझे , घर एक आहे !!!

एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!!

✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

जिथे मी उरावे || अबोल प्रेम कविता || Poem ||



जिथे मी उरावे ! तिथे तू असावे !!
जिथे मी पहावे !! तिथे तू दिसावे !!

कधी न कळावे!! नजरेतूनी पहावे !!
लपवून मी ठेवता!! तुला ते कळावे !!

सांग या मना रे !! सांगते का तुला रे !!
गाणे या ओठांवरी!!  गाते का सख्या रे !!

ओढ ती कोणती!! तुला न जानवावे!!
माझ्यात मला मी!! तुझ्यात का शोधावे !!

प्रेम असे का?? नकळत आज व्हावे !!
सांगावे परी तुला!! ओठांवरी का रहावे !!

अशी एक मी!! एक तु आज व्हावे!!
तुझ्यात मी गुंतता, परी एकच रहावे !!

आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!

एक ती वाट!! श्वास एकच व्हावे !!
हात हातात तुझ्या!! आयुष्य मी जगावे !!

✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

मराठी उखाणे || नव्या नवरिचे उखाणे || Marathi ukhane ||



नव्या नवरिचे उखाणे ..

१. संसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!
    ... रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !!

२. नव्या वाटेवरती चालताना, हात देते हाती
     ..... रावांच्या सोबतीने, संसार होईल सुखी !!

३. सात पाऊले, सात फेरे , साता जन्माची साथ जणू !!
     ..... रावांच्या सोबत असेन, झाडा सोबत सावली जणू !!

४. साक्ष त्या देवाब्रांह्मणांची, साक्ष आहे त्या अग्नीची !!
    .... रावांच्या साथीने , साक्षी होईन सुखी संसाराची !!

५. माप ओलांडून येताच, मिळाली कित्येक नवी नाती !!
    ... रावांच्या सोबत, बहरून येतील ही नातीगोती !!!

६. आईची माया, बाबांचे विचार , एवढीच शिदोरी आणली सोबत !! 
    येईल उन्ह नी वारा ,पाऊस नी वादळ, नेहमीच राहील ... रावा सोबत !!

७. साथ असेल , हाती हात असेल , एवढा विश्वास आहे सोबत !!
    ..... रावांच्या जीवनात येताना , साऱ्यांचा आशीर्वाद घेईन सोबत !!

८. अक्षता पडल्या डोक्यावर, साक्ष आहे त्या अग्नीची !!
    ..... रावांच्या सोबत आता, सुरुवात झाली संसाराची!!!

९. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना , आशीर्वाद द्यावा सर्वांनी!!
      .... रावांच्या सोबत असेल, लिहून घ्यावं त्या क्षणानी !!

१०. मुहूर्त मिळाला, अक्षता पडल्या, साथ त्या वचनांची !!
      ...... रावांचे आयुष्यात येणे, चाहूल नव्या स्वप्नांची !!

११. संसार करेन सुखाचा , सांगते या मंगल क्षणी !!
       .... रावांचे नाव घेते , थोरामोठ्याना नमस्कार करुनी !!

१२. नमस्कार करते देवाला, पहिलं पाऊल टाकताना !!
      सोबत देईन आयुष्यभर, ... रावांच्या स्वप्नांना !!! 

१३. सुखाच्या या क्षणांचे, सारे चित्र मनी या रंगले !!
       ... रावांच्या सोबतीने, मला पूर्णत्व आज मिळाले !!

१४. उंबर्यावरच्या मापाला ,अलगद ओलांडून यावे !!
      ... रावांच्या सोबतीने, स्वप्नातील घर सजवावे !!!

१५. हळव्या क्षणांची माळ विणली, नव्या आयुष्याची सुरुवात झाली!!
       .... रावांच्या सोबत आता, माझ्या स्वप्नांची पहाट झाली !!

१६. साथ हवी होती, साता जन्माची, हात हाती घेऊन !!
       ... रावांच्या रुपाने भेटले, टाकते पहिले पाऊल !!

१७. विखुरणाऱ्या क्षणांना, आनंदाने कवेत आज घ्यावे !!
      .... रावांच्या सोबतीने, आयुष्य मनभर जगावे !!!

१८. सात जन्म  ,सात वचन , जणू इंद्रधनुचे रंग भरावे !!
       ... रावांच्या सोबतीत आता, प्रत्येक रंगात रंगून जावे !!

१९. मंगळसूत्र जणू गाठ कायमची, कपाळी कुंकू, निशाणी सौभाग्याची !!
       ... रावा सोबत, साथ आयुष्याची , हीच आहे, सुरुवात संसाराची !!

२०. आशीर्वाद असावा सर्वांचा , पहिले पाऊल टाकताना !!!
       ..... रावांचे नाव घेते , माप ओलांडून येताना !!

२१. बंध रेशमाचे, बंध आयुष्यभराचे, बंध जुळले साता जन्माचे!!
       .... रावांच्या सोबतीने आता, बहरून येतील क्षण हे जगण्याचे !!

२२. उमलून आल्या फुलाचा, गंध पसरला चारी दिशा !!
       .... रावाच्या येण्याने जणू, मला मिळाली नवी उषा !!

२३. वाजले सनई चौघडे, मुहूर्त तो लग्नाचा !!
       ... रावांच्या सोबत आता, प्रवास हा साताजन्माचा !!!

२४. सारे सुख या जणू, ओंजळीत येवून राहावे !!
       .... रावांच्या सोबतीने, वाटे जग हे आता पहावे !!

२५. मंत्रोच्चारात सारे, विधी आज पार पडले !!
      ... रावांच्या सोबत, नवे आयुष्य सुरु झाले!!

२६. सहज सुचेलं ते , नाव आता मी घेते !!
       .... रावांच्या सोबत, नाव माझं मी जोडते !!

२७. धागा धागा सुखाचा, विणते मी आता!!
       ... रावांच्या सोबतीने , स्वप्न पाहते मी आता !!

२८. सात पावलांची सप्तपदी, आयुष्यभराची साथ !!
      ... रावांच नाव घेते , आता येऊ का मी घरात ??

२९. नव्याने बहरावी ती पालवी, बहरून यावी नाती तशी!!
      ..... रावांच्या सोबत आता, मिळावी मला नवी ओळख जशी !!

३०. नाव घ्यावे म्हणून , आठवते मी उखाणा!!
      ... रावांचे नाव घ्यायला, कशाला हवा बहाणा !!

३१. हळूवार क्षणांनी , सोबत मला दिली!!
      ... रावांच्या सोबत , सारी स्वप्न मी लिहिली !!

३२. कुलदैवताला पाया पडून , मागते एक मागणे !!
     .. .. रावांची सोबत हवी, एवढेच एक सांगणे !!

३३.हवी होती साथ, हवा होता हातात हात!!
      ... रावांच्या सोबत आता, बांधली कायमची गाठ!!

३४. शब्दांच्या पलीकडे जाऊन, नात हे लिहावं !!
      ... रावांच्या सोबत आता, सार आयुष्य हे बहरावं!!

३५. नात्यास या नाव आज द्यावे, बहरून येण्या मुक्त हे करावे !!
       हृदयातल्या एका कोपऱ्यात, ... रावांचे नाव आज कोरावे!!

३६. क्षणही थांबला क्षणभर आता, नाव आज घेते!!
       ... रावांचे नाव आता , माझ्या नावाशी जोडते !!

३७. बहरलेल्या फुलांचा, गंध पसरला चोहीकडे!!
       ... रावांच सोबत आता, पाहते मी स्वप्नांकडे!!

३८. नाव घे, नाव घे , सगळ्यांनी केला आग्रह !!
      ... रावांचे नाव घेताना, लिहावा वाटतो कविता संग्रह !!

३९. हरवून जावे या क्षणात, क्षण हे आनंदाचे !!
       ... रावांच्या सोबतीने, सोने झाले आयुष्याचे !!

४०. आयुष्य सोबत जगण्यासाठी, धरला मी हात !!
       ... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल पडले घरात !!

४१. अक्षता वाटल्या सर्वांना, मंगलाष्टक म्हटले ब्राह्मणांनी!
       ... रावांच्या सोबत आता, नाते जोडले देवांनी !!

४२. बहरून आल्या वेलीचा , सुगंध दरवळला चारी दिशा !!
      ... रावांचे नाव घेते,ही नव्या आयुष्याची नवी उषा !!

४३. सप्तपदी , सात पावले ,आयुष्य सारे फुलून जावे!!
       .... रावांची सोबत असता, सारे क्षण जगून घ्यावे !!

४४. सोबत करण्या माझी, हाती हात माझ्या द्यावा!!
      .... रावांच्या आयुष्यात, प्रत्येक क्षण मी पहावा!!

४५. खुदकन हसली मेहंदी, आज जरा जास्तच रंगली !!
      ... रावांचे नाव घेताच, हळूच ती लाजली !!

४६. वळणावरती त्या, अचानक भेट आमची झाली !!
      .... रावांच्या सोबत, आयुष्याची पहाट आज झाली !!

४७. एक एक पाऊले पुढे चालताना, सोबत आहे यांची !!
     ... रावांचे नाव घेते, वाट एक ती जीवनाची !!

४८.अक्षता पडल्या जेव्हा, माझी ना मी राहिले!!
     ... रावांच्या आयुष्यात , स्वतः स मी जोडले !!

४९. इतकं सुंदर व्हावं सार,  मन प्रसन्न होऊन जावं !!
       ... रावांच्या सोबत, मन माझे फुलून जावं !!

५०. साऱ्या स्वप्नाची, आज खोलावी दारे !!
      ... रावांचे नाव घेते , सुखाने भरून जा रे !!


✍️© योगेश

अशी ही स्री || स्त्रीत्व || Marathi Lekh ||




या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥


ज्या सरस्वतिचे, ज्या विद्येच्या देवीचे आपण वंदन करतो ती देवी सरस्वती एक स्त्री रूपच आहे आणि तिला वंदन करताना स्त्री या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे हे कळल्या शिवाय राहणार नाही. समाज घडला आणि घडत गेला तो  समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासा मधूनच. पुरातन ग्रंथात, कथेतून महिलांचे या समाजातील महत्त्व किती आहे हे वारंवार सांगण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने महिलांनी ते सिद्ध ही करून दाखवले. आणि अशाच प्रकारे घडत गेला तो समाज , एक परिपूर्ण समाज, ज्या मध्ये स्त्री ही फक्त चूल आणि मूूल करणारीच नाही तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी झाली, आणि हेच सशक्त समाजाचे लक्षण आहे. 

 अनिष्ट रुढी आणि परंपरा यात जखडून बसलेल्या आपल्या स्त्रीला त्यातून बाहेर येण्यास वेळ नक्कीच लागला, पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने स्वतःला  सिद्ध केले. त्या काळात सुद्धा कित्येक स्त्रिया अशा होऊन गेल्या की, त्यांनी इतर स्त्रियांना स्त्री म्हणून जगावं कसे हे सांगितलं. या स्त्रियांनी स्वतःलाच नाही तर साऱ्या समाजाला घडवल. आणि अशाच स्त्रियांच्या साक्षीने घडला तो समाज जिथे स्त्री ही फक्त शोभिवंत वस्तू म्हणून फक्त उभी राहायची. 

पाहता पाहता एकविसाव्या शतकात आपण येऊन पोहचलो. आज उच्च पदाधिकारी ते अगदी घरगुती उद्योग करणाऱ्या स्त्रियांचा हा काळ म्हणून आता ओळखला जाऊ लागला. स्त्री आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. स्वतः कमावू लागली. आपल्या पायावर उभी राहिली. जिथे आता फक्त मुलगा हाच वंशाचा दिवा नाही तर मुलगीही त्या घराची शान आहे हे कळू लागलं. आणि स्त्री ही आता आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धावू लागली. 

अस म्हणतात स्त्रीही प्रेमाचं प्रतिक आहे, स्त्री ही आई असताना तिच्यात माया आहे, तिच्यात दया आहे , करुणा आहे. तिची कित्येक रूप आहेत. आपल्या मुलासाठी जीव तुटणारी ती हिरकणी आहे , आपल्या अतुट मैत्रीसाठी झुरणारी कृष्णाची ती राधा आहे, आपल्या पतीची नेहमी सोबत करणारी शंकराची पार्वती आहे. रामासोबत हसत हसत वनवासाला जाणारी सीता आहे.अशी कित्येक रूप या स्त्रीची आहेत. 

अशा या स्त्रीची भूमिका ही आयुुष्यभर बदलत राहते. लहानपणी आपल्या बाबांच्या अंगणात मनसोक्त खेळत राहणारी ती लहान मुलगी होते. आपल्या बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी, त्याच खांद्यावर शांत झोपणारी होते. ती मोठी होते. तेव्हा, मग अचानक बाबांचं अंगण तिला सोडावं लागतं, पण तेव्हा ही बाबांसाठी ती  खांद्यावर डोकं ठेवून रडणारी लहान मुलगीच राहते. आयुष्भर त्यांच्या कडेवर बसून हट्ट करणारी मुलगीच राहते. पण आयुष्य पुढे सरकत जाते, बाबांच्या डोळ्यात फक्त आठवणी उरतात. एक स्री म्हणून ती नेहमीच घडतं राहते. 

संसार या शब्दांनी स्त्रीचं आयुष्य बदलून जात. अल्लड अवखळ वागणारी ती मुलगी आता जबाबदारीने वागू लागते. आपल्या घरासोबत ती आपली स्वप्ने ही  सांभाळू लागते. नवरा , मुलं, त्याच्या जबाबदाऱ्या, ह्या गोष्टी स्त्री इतकं चांगल्या प्रकारे कोणीच हाताळू नाही शकतं हे ही तितकेच खरे आहे. आज मोठमोठ्या शहरांमध्ये  घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रिया पहिल्या की त्यांचं नक्कीच कौतुक करावसं वाटतं. आपली नातीगोती ,आपला मित्र परिवार यांच्यातील तालमेल नक्कीच त्या उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. 

पण  जशी एक स्री आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घेऊ लागली होती तशा कित्येक समस्या आता तिला भेडसावत होत्या. समाजात बदल होत गेला पण एक प्रवृत्ती आजही तशीच राहिली, आणि ती म्हणजे वासनेची. वासनेने अंध झालेले कित्येक लांडगे या गगनात भरारी घेऊ पाहणाऱ्य स्त्रियांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा होऊन बसले. 'स्त्री फक्त उपभोग घेण्याची गोष्ट!!' या नालायक विचारधारेला कुठेतरी आता तिलांजली द्यावी लागेल हे मात्र नक्की. या अशा विचारधारेमुळे समाजात आजही स्त्री खुल्या मनाने फिरू नाही शकत. एक भीती नक्कीच कुठेतरी असते ती या लांडग्याची, या असल्या विचारधारेने कित्येक स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. काहींनी तर आपला जीव गमावला. पण मग यावर मार्ग तरी कोणता ??  जसे स्त्रीला तिच्या चारित्र्याला बांधून हा समाज स्वतः मोकळा झाला, तसेच त्याने पुरुषाला ही संस्कारांच्या चौकटीत बांधून निवांत रहावं. पुरुष प्रधान संस्कृती म्हणा अथवा काहीही म्हणा पण त्या संस्कृतीला कोणत्याच स्त्रीचा अपमान सहन झाला नाही पाहिजे, आणि समाज अशा विचारधारेच्या विरुद्ध आता संतापाने पेटून उठला पाहिजे.अश्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

मोकळ्या या आकाशात बेधुंद भरारी घ्यावी हा हक्क प्रत्येकाला आहे. त्यापासून कोणीच कधी वंचित  राहू नये. कित्येक समस्या, सामाजिक सुधारणा, रुढी परंपरा असूनही, आज स्त्रीही  या समाजाला नवी दिशा देते आहे. आजचे हे युग स्त्रियांचेच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज देशाच्या सैन्य दलात कित्येक स्त्रिया कार्यरत आहेत. शत्रूंशी त्या निडर होऊन लढत आहेत, शेतात काम करून या समाजाला सशक्त करत आहेत. ,डॉक्टर असो , इंजिनिअर असो, राजकारण असो , कलाक्षेत्र असो सगळीकडे आज स्त्रियांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे. तेही त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या योग्यतेवर. आज अशा स्त्रियांचा खरंच अभिमान साऱ्या समाजाला वाटल्या शिवाय राहणार नाही.

"गगन भरारी घ्यावी आता
पंख पसरून मी तयार आहे !!
माझी स्वप्ने खूनावती मला
मी एक प्रवासी स्त्री आहे !!

कधी वादळाने घातली भिती
त्यास विरोध मी करते आहे!!
सुखदुःखाच्या या पावसामध्ये
निडर होऊन मी उभी आहे !!

वासनेच्या या जगा मध्ये
कोण अडकवू मज पाहत आहे !!
सांगते आज मी त्याला 
फाडुन तुला टाकणारं आहे!!

आभाळाच्या पल्याड जाऊन
जग हे मला जिंकायचे आहे!!
जमिनी वरती दाही दिशा
गंध होऊन पसरायचे आहे!!

आई, प्रेयसी , मैत्रीण , पत्नी
कित्येक रुपात मी राहत आहे!!
नात्यांच्या या नाजूक बंधनात
प्रेमाची जणू चाहूल आहे !!

माझेच मला पूर्णत्व येता
स्त्रीत्व हे बहरले आहे !!
स्त्री म्हणून जन्माला येणे
खरंच किती भाग्याचे आहे !!

स्त्री म्हणून जन्माला येणे
खरंच किती भाग्याचे आहे !!

गगन भरारी घ्यावी आता
पंख पसरून मी तयार आहे !!


खरंच स्त्रीत्व मिळणं म्हणजे नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. अशी ही प्रवासी स्री म्हणजे , कित्येक वर्ष समाजातील समस्यांना तोंड देत , त्यांच्याशी लढत लढत घडलेली आजची स्त्री , तिने या सर्व गोष्टींवर मात करत स्वतःला सिद्ध केलं. अशा या सर्व स्त्रियांचा अभिमान आहे.

✍️योगेश खजानदार

संवाद || मराठी कविता || मनातल्या कविता ||



हल्ली तुझ्यात नी माझ्यात !
वादच होत नाहीत !! 
कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात
संवादच होत नाहीत !!

ओळखीची ती वाट आपली!!
पण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही !!
कारण , हल्ली तू आणि मी
सोबत असूनही सोबत नाहीत !!

तो आपुला क्षण, सांगतो खूप काही!
आता पुन्हा तो आठवांचा पाऊस नाही !!
बरसत आहेत कित्येक सरी त्या !!
पण ती ओल कुठेच दिसत नाही !!

तुलाही हे कळतंय, मलाही हे कळतंय !!
पण मनापर्यंत पोहचतच नाही!!
कुठे काय बिनसले आहे !!
दोघांनाही आता कळत नाही !!

शब्दांची गरज आहे या नात्यात !!
पण नजरेने बोलणं थांबवलं ही नाही !!
शोधलं खूप मी तुला , शोधलं तू खूप मला !!
पण शोधुनही आपण सापडलो नाहीत !!

विसरून जाऊ आपण अनोळखी जगात !!
जिथे आपले कोणीच नाही !!
आहे वेळ अजूनही या नात्यात !!
जिथे आपल्या शिवाय कोणीच नाही !!

फेकून द्यावी मनातली जळमटे!!
ज्याचा काहीच उपयोग नाही !!
कारण, तुझ्यात नी माझ्यात !!
यामुळे नातच टिकत नाही !!!

✍️© योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...