मुख्य सामग्रीवर वगळा

अशी ही स्री || स्त्रीत्व || Marathi Lekh ||




या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥


ज्या सरस्वतिचे, ज्या विद्येच्या देवीचे आपण वंदन करतो ती देवी सरस्वती एक स्त्री रूपच आहे आणि तिला वंदन करताना स्त्री या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे हे कळल्या शिवाय राहणार नाही. समाज घडला आणि घडत गेला तो  समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासा मधूनच. पुरातन ग्रंथात, कथेतून महिलांचे या समाजातील महत्त्व किती आहे हे वारंवार सांगण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने महिलांनी ते सिद्ध ही करून दाखवले. आणि अशाच प्रकारे घडत गेला तो समाज , एक परिपूर्ण समाज, ज्या मध्ये स्त्री ही फक्त चूल आणि मूूल करणारीच नाही तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी झाली, आणि हेच सशक्त समाजाचे लक्षण आहे. 

 अनिष्ट रुढी आणि परंपरा यात जखडून बसलेल्या आपल्या स्त्रीला त्यातून बाहेर येण्यास वेळ नक्कीच लागला, पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने स्वतःला  सिद्ध केले. त्या काळात सुद्धा कित्येक स्त्रिया अशा होऊन गेल्या की, त्यांनी इतर स्त्रियांना स्त्री म्हणून जगावं कसे हे सांगितलं. या स्त्रियांनी स्वतःलाच नाही तर साऱ्या समाजाला घडवल. आणि अशाच स्त्रियांच्या साक्षीने घडला तो समाज जिथे स्त्री ही फक्त शोभिवंत वस्तू म्हणून फक्त उभी राहायची. 

पाहता पाहता एकविसाव्या शतकात आपण येऊन पोहचलो. आज उच्च पदाधिकारी ते अगदी घरगुती उद्योग करणाऱ्या स्त्रियांचा हा काळ म्हणून आता ओळखला जाऊ लागला. स्त्री आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. स्वतः कमावू लागली. आपल्या पायावर उभी राहिली. जिथे आता फक्त मुलगा हाच वंशाचा दिवा नाही तर मुलगीही त्या घराची शान आहे हे कळू लागलं. आणि स्त्री ही आता आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धावू लागली. 

अस म्हणतात स्त्रीही प्रेमाचं प्रतिक आहे, स्त्री ही आई असताना तिच्यात माया आहे, तिच्यात दया आहे , करुणा आहे. तिची कित्येक रूप आहेत. आपल्या मुलासाठी जीव तुटणारी ती हिरकणी आहे , आपल्या अतुट मैत्रीसाठी झुरणारी कृष्णाची ती राधा आहे, आपल्या पतीची नेहमी सोबत करणारी शंकराची पार्वती आहे. रामासोबत हसत हसत वनवासाला जाणारी सीता आहे.अशी कित्येक रूप या स्त्रीची आहेत. 

अशा या स्त्रीची भूमिका ही आयुुष्यभर बदलत राहते. लहानपणी आपल्या बाबांच्या अंगणात मनसोक्त खेळत राहणारी ती लहान मुलगी होते. आपल्या बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी, त्याच खांद्यावर शांत झोपणारी होते. ती मोठी होते. तेव्हा, मग अचानक बाबांचं अंगण तिला सोडावं लागतं, पण तेव्हा ही बाबांसाठी ती  खांद्यावर डोकं ठेवून रडणारी लहान मुलगीच राहते. आयुष्भर त्यांच्या कडेवर बसून हट्ट करणारी मुलगीच राहते. पण आयुष्य पुढे सरकत जाते, बाबांच्या डोळ्यात फक्त आठवणी उरतात. एक स्री म्हणून ती नेहमीच घडतं राहते. 

संसार या शब्दांनी स्त्रीचं आयुष्य बदलून जात. अल्लड अवखळ वागणारी ती मुलगी आता जबाबदारीने वागू लागते. आपल्या घरासोबत ती आपली स्वप्ने ही  सांभाळू लागते. नवरा , मुलं, त्याच्या जबाबदाऱ्या, ह्या गोष्टी स्त्री इतकं चांगल्या प्रकारे कोणीच हाताळू नाही शकतं हे ही तितकेच खरे आहे. आज मोठमोठ्या शहरांमध्ये  घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रिया पहिल्या की त्यांचं नक्कीच कौतुक करावसं वाटतं. आपली नातीगोती ,आपला मित्र परिवार यांच्यातील तालमेल नक्कीच त्या उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. 

पण  जशी एक स्री आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घेऊ लागली होती तशा कित्येक समस्या आता तिला भेडसावत होत्या. समाजात बदल होत गेला पण एक प्रवृत्ती आजही तशीच राहिली, आणि ती म्हणजे वासनेची. वासनेने अंध झालेले कित्येक लांडगे या गगनात भरारी घेऊ पाहणाऱ्य स्त्रियांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा होऊन बसले. 'स्त्री फक्त उपभोग घेण्याची गोष्ट!!' या नालायक विचारधारेला कुठेतरी आता तिलांजली द्यावी लागेल हे मात्र नक्की. या अशा विचारधारेमुळे समाजात आजही स्त्री खुल्या मनाने फिरू नाही शकत. एक भीती नक्कीच कुठेतरी असते ती या लांडग्याची, या असल्या विचारधारेने कित्येक स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. काहींनी तर आपला जीव गमावला. पण मग यावर मार्ग तरी कोणता ??  जसे स्त्रीला तिच्या चारित्र्याला बांधून हा समाज स्वतः मोकळा झाला, तसेच त्याने पुरुषाला ही संस्कारांच्या चौकटीत बांधून निवांत रहावं. पुरुष प्रधान संस्कृती म्हणा अथवा काहीही म्हणा पण त्या संस्कृतीला कोणत्याच स्त्रीचा अपमान सहन झाला नाही पाहिजे, आणि समाज अशा विचारधारेच्या विरुद्ध आता संतापाने पेटून उठला पाहिजे.अश्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

मोकळ्या या आकाशात बेधुंद भरारी घ्यावी हा हक्क प्रत्येकाला आहे. त्यापासून कोणीच कधी वंचित  राहू नये. कित्येक समस्या, सामाजिक सुधारणा, रुढी परंपरा असूनही, आज स्त्रीही  या समाजाला नवी दिशा देते आहे. आजचे हे युग स्त्रियांचेच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज देशाच्या सैन्य दलात कित्येक स्त्रिया कार्यरत आहेत. शत्रूंशी त्या निडर होऊन लढत आहेत, शेतात काम करून या समाजाला सशक्त करत आहेत. ,डॉक्टर असो , इंजिनिअर असो, राजकारण असो , कलाक्षेत्र असो सगळीकडे आज स्त्रियांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे. तेही त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या योग्यतेवर. आज अशा स्त्रियांचा खरंच अभिमान साऱ्या समाजाला वाटल्या शिवाय राहणार नाही.

"गगन भरारी घ्यावी आता
पंख पसरून मी तयार आहे !!
माझी स्वप्ने खूनावती मला
मी एक प्रवासी स्त्री आहे !!

कधी वादळाने घातली भिती
त्यास विरोध मी करते आहे!!
सुखदुःखाच्या या पावसामध्ये
निडर होऊन मी उभी आहे !!

वासनेच्या या जगा मध्ये
कोण अडकवू मज पाहत आहे !!
सांगते आज मी त्याला 
फाडुन तुला टाकणारं आहे!!

आभाळाच्या पल्याड जाऊन
जग हे मला जिंकायचे आहे!!
जमिनी वरती दाही दिशा
गंध होऊन पसरायचे आहे!!

आई, प्रेयसी , मैत्रीण , पत्नी
कित्येक रुपात मी राहत आहे!!
नात्यांच्या या नाजूक बंधनात
प्रेमाची जणू चाहूल आहे !!

माझेच मला पूर्णत्व येता
स्त्रीत्व हे बहरले आहे !!
स्त्री म्हणून जन्माला येणे
खरंच किती भाग्याचे आहे !!

स्त्री म्हणून जन्माला येणे
खरंच किती भाग्याचे आहे !!

गगन भरारी घ्यावी आता
पंख पसरून मी तयार आहे !!


खरंच स्त्रीत्व मिळणं म्हणजे नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. अशी ही प्रवासी स्री म्हणजे , कित्येक वर्ष समाजातील समस्यांना तोंड देत , त्यांच्याशी लढत लढत घडलेली आजची स्त्री , तिने या सर्व गोष्टींवर मात करत स्वतःला सिद्ध केलं. अशा या सर्व स्त्रियांचा अभिमान आहे.

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...