द्वंद्व || कथा भाग ५ || हृदयस्पर्शी कथा ||




कथा भाग ५

"या चारही दिशा मला माझ्या सायली जवळ घेऊन जातील का ?? पण ती कुठे आहे हे कसे कळणार !! तिच्या घरी एकदा जाऊन पहावे का??!! पण मी तिला बोलू तरी काय ?? कोणत्या शब्दात तिची माफी मागू !! त्या प्रणयाच्या वेळी तुझ्या डोळ्यात जे प्रेम मला दिसले त्याची एक ठिणगी या हृदयात ही आहे हे मला आता पुरत कळून चुकलं आहे सायली !! थांब जरा !! नको जाऊस !! त्या ओठातून निघालेला तो पायलसाठीचा तो शब्द अखेर मला सत्य काय आहे हे सांगून गेला !! पायल आता भूतकाळ आहे !! पण मी त्याला विसरणार नाही !! कारण तीही माझी तितकीच गोड आठवण आहे !! आणि मला माहिती आहे तू मला त्या आठवणींन सहित स्विकारशील. नक्कीच !!!" 

विशाल आता सायलीच्या घराजवळ आला होता. पण घराला कुलूप होत. शेजारच्या काही लोकांना त्यांनी विचारलं तेव्हा ती कुठे गावाला गेली हे कळाल. तिचे आई बाबा तिच्या सोबत गेले हेही कळालं. विशाल दाही दिशा तिला शोधत होता.

"सायली , माझी सायली!! माझ्यावर प्रेम असुनही पायलला हसत हसत स्वीकारलं. कधी कळुही दिलं नाही, की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. पायल गेल्यावर ही तिने नेहमी मला सांभाळून घेतलं. माझी विद्यार्थीनी म्हणून राहिली. कदाचित सतत माझ्या सोबत राहण्यासाठी." विशाल डोळ्यात आलेला एक अश्रू पुसतो. 

अचानक त्याची नजर समोर कडीला लावून ठेवलेल्या चिठ्ठीकडे जाते. चिठ्ठी घेऊन तो वाचू लागतो.

प्रिय विशाल, 

 मला माहिती आहे तू नक्की मला शोधत येणार!! झालेल्या चुकीची माफी मागायला येणार !! तुझ्या आयुष्यात पायल जशी महत्त्वाची आहे, तसचं माझ्या आयुष्यात तूही तितकाच महत्त्वाचा आहेस. आणि तुला अजुन दुःख देण्याचं माझ्यात धाडस नाही. त्या दिवशी आणावधनाने घडलेल्या त्या प्रणयात ना माझी चूक होती ना तुझी होती!! ती चूक त्या वेळेची होती. पण मला माफ कर, मी पुन्हा कधी तुझ्या आयुष्यात येणार नाही. तुझ्या आणि पायल मध्ये मी कधीच येणार नाही. फक्त तू आनंदी राहा. माझंही सुख यातच आहे. जमल्यास मला माफ कर!!

तुझीच सायली.

पत्र वाचून विशाल क्षणभर शांत राहिला. त्याला काहीच सुचेना. समोरच्या ओट्यावर तो कित्येक वेळ बसून राहिला. नंतर अचानक जागेवरून उठला आणि त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊ लागला.

"ये सुमित !! सांग ना रे !! सायली कुठे जाणार होती तुला काही सांगितलं का रे ??"
"खरंच नाही सर !! मला ती काहीच म्हणाली नाही."

हताश होऊन विशाल घरी जाऊ लागला. मनात विचारांचं अक्षरशः एकमेकांशी द्वंद्व सुरू झालं होत.

"अखेर मी तिला गमावलच ना ??  माझ्यावर माझ्या नकळत प्रेम करणाऱ्या त्या सायलीला मी गमावलं !! जी अस्तित्वातच नाही !! जिला जाऊन दोन वर्ष झाली तिच्या आठवणीत मी आज माझ्या प्रत्येक दुःखात माझ्या जवळ असणाऱ्या, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सायलीला गमावून बसलो. तिचं ते सतत माझ्याकडे येणं!! मला सांभाळून घेणं !! मला माझ्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं !! आज मला त्या गोष्टींची खरंच जाणीव होत आहे!! होणं ?? माणूस आपल्यापासून दूर गेल्यावरच आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव का व्हावी ?? जेव्हा जवळ असतात तेव्हा आपण दुसऱ्याच जगात जगत असतो!! आणि मग अचानक अस्तित्वाची जाणीव होते आणि सगळं पुसून जात !!!" 

विशाल हताश होऊन घरा जवळ येतो. विचार करत करत मुख्य दरवाज्यातून आत येतो आई , सदा समोरच उभे असतात.

"काय झालं विशाल ?? आणि सायलीला शोधायला का गेला होतास ??"
"कारण मला माझी चूक कळली आहे आई !! सायली माझ्यावर मनापासून प्रेम करते ! आणि ती दूर निघून गेल्यावर माझ्याही मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली!!" विशाल समोरच्या खुर्चीवर बसून बोलतो.
"मग भेटली नाही का ती??" आई मध्येच बोलते.
"खूप शोधलं मी तिला !! पण ती कुठेच नाही !!"
"तिचे आई बाबा ?? मित्र ??त्यांना विचारायचं !!"
"घराला कुलूप होत!! मित्रांना विचारलं तर कोणालाच काही माहीत नव्हतं !!"
"दादा !! चहा देऊ का ?जरा बरं वाटेल तुम्हाला "
" नको सदा !! काही सुद्धा खायची, प्यायची इच्छा नाहीये आता !!"
"मी केलेला चहा सुद्धा ??"  मध्येच कोणीतरी बोललं.

आवाज ओळखीचा वाटतो म्हणून विशाल पाहतो. ती सायली होती. तिच्या हातातला कप घेत त्याला काय बोलावं कळतंच नव्हतं. तो फक्त पाहत राहिला.कित्येक वेळ. 

"सायली ?? तू आणि इथे ???"
"सकाळीच आले मी इथे !!तुम्ही झोपला होतात म्हणून मग आई जवळ बसले होते!!"
"आणि मग ते पत्र ???" विशाल कुतूहलाने विचारतो.
"ते सगळं माझं काम होत !!" आई मध्येच बोलते.
"पण का ?? "
"कारण तुला आपल्या जवळच्या माणसाची जाणीव करून देण्यासाठी!! "
विशाल आईकडे पाहत राहतो. आई बोलत राहते.
"सायली येऊन गेल्यावर तुझ्यात झालेला बदल मला नक्कीच नवी दिशा देऊन गेला. तेव्हा मी सायलीला या विषयी बोलले!! तिने मला सगळं सांगितलं !! तुझ्या मनात पायल किती रुतून बसली आहे!! हेही तिने मला सांगितलं !! तेव्हा मीच तिला सांगितलं!! मी सांगेन तोपर्यंत विशाल समोर तू यायचं नाही!! तुझं प्रेम त्याला कळायची गरज होती!! आणि तेच मी केलं !! विरह माणसाला अजुन जवळ आणतो हे खरं आहे !! पण एखाद्याच्या विरहात संपूर्ण आयुष्य विसरून गेलो तर जवळ असलेले, आपल्यावर तितकंच प्रेम करत असलेले लोक आपल्या पासून दुरावतात!! हेच मला तुला यातून सांगायचं होत!! पायलची जागा कोणी घेऊ शकत नाही !! पण विशाल सायलीची जागाही कोणी घेऊ शकत नाही !!!" आई मनापासून बोलली. कित्येक दिवस विशालला बोलायचे होते हे तिला.
"खरं आहे आई !! मला माझी चूक कळली आहे !! आणि मला ती सुधारावी लागणार हेही मला माहित आहे!! पण सायली मला माफ करेन ???" विशाल सायलीकडे पाहत म्हणाला.
सायली क्षणभर शांत राहिली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तेव्हा नकळत ती लाजली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हसू उमटले. आई आपल्या खोलीत निघून गेली. सदा आपल्या कामात गुंग झाला. समोर होते फक्त सायली आणि विशाल.

कित्येक वेळ दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. सायली गालातल्या गालात लाजली. विशाल तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला.
"माझ्यावर इतकं प्रेम करतेस तू ??" विशाल अचानक बोलला.
सायली नकारार्थी मान हलवत त्याच्यापासून दूर जाते.
"सांग ना ?? "
"माहित नाही !! पण ओठांच्या शब्दांना फक्त तूच माहित आहेस !! नजरेच्या त्या पापण्यात तुझीच आठवण ठेवली आहे !!" सायली विशालकडे पाहत म्हणाली.
"मी पायलच्या आठवणीत वेडा होतो तेव्हाही ??"
"हो तेव्हाही !!"
"पण का ??"
"कारण माझ्या प्रेमाला कोणतंच बंधन नव्हतं !! ना विचारांचं द्वंद्व होत !! ते नितांत आहे !! तू सोबत असावा एवढीच त्यात मागणी आहे !! तू मिठीत यावा अस नेहमी वाटलं पण हट्ट त्यात कधीच नव्हता!! " सायली मनातलं सांगत होती.
"आय लव्ह यू सायली!!" विशाल तिला मिठीत घेत म्हणाला.
"माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस !! तुझ्या आठवणीत मी क्षण न क्षण तुला शोधलं आहे !!! तुझ्या रितेपणाची जाणीव खूप वाईट आहे !!नाही ना जाणार ??" विशाल सायालीकडे पाहत म्हणाला.

सायली फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्या ओठांवर पुन्हा कित्येक प्रेमाचे मधुर रस रिते झाले. दोघेही एकमेकात मिसळून गेले, गुंतून गेले.

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!
रिते करावे भाव मनीचे!!
पण अश्रूंची ती वेगळी तऱ्हा!!

नजरेतूनी पाहता आज तुला!!
कवितेत लिहिले मीच मला !!
शोधून पाहिले माझ्यात तुला!!
पण सापडलो ना मीच मला !!

सांग ते प्रेम कळले ना तुला!!
सांगूनही कळले ना मला !!
आठवांचे द्वंद्व असे की 
तुझ्याविना सोबती ना मला !!!

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!!"

विशाल आणि सायली खोलीत कित्येक वेळ समोरच्या चित्रात स्वतःला शोधत राहिले. आपले प्रेम व्यक्त करत राहिले.

*समाप्त*

✍️ योगेश

द्वंद्व || कथा भाग ४ || मराठी प्रेम कथा ||




कथा भाग ४

"हे कोणतं स्वप्न आहे !! काहीच कळत नाही!! सायली मला सोडून जावी आणि तिला थांबवण्याचा एवढा प्रयत्न मी करावा ?? तिचा तो चेहरा आजही डोळ्यासमोरून का जात नाहीये !!! तो स्पर्श पुन्हा पुन्हा जाणवावा !! नाही हे चूक आहे !! ज्या पायल शिवाय मी कधीही इतर कोणाचा विचारही केला नाही तिला मी आज फसवलं आहे !! पण मग सायलीच काय ?? तिच्या मनात माझ्याबद्दल काय भाव असतील आता!! मी तिचा विश्वासघात तर केला नाही ना ?? मग पायलच नाव घेताच सायली माझ्या मिठीतुन दूर का व्हावी ?? तिच्या ओठात मला तो प्रेमरस का भेटावा ?? सायली माझ्यावर प्रेमतर करत नाहीना ??  की नकळत मीही तिच्यावर प्रेम करतो आहे ?? एवढा विचार तो का व्हावा ?? इतके प्रश्न, पण उत्तर एकही माझ्याकडे का नाही ?? " विशाल पलंगावर पडून विचार करत राहिला.

रात्रभर विचार करुन करून विशाल झोपलाच नाही. सकाळी लवकर उठून आवरून बसला. खोलीतून बाहेर येत समोर आईला बोलू लागला.

"आई !! कोणी आलं होत का ग ?" मनातल्या भावना अचानक ओठांवर याव्या तसे विशाल म्हणाला.
"एवढ्या सकाळी??  कोण येणार होत का ??"  कुतूहलाने विचारू लागली.
"नाही !! कोणी नाही !!" विशाल आई समोर बसत म्हणाला.
आई आपल्या कामात व्यस्त होती. समोर ठेवलेल्या रिकाम्या चहाच्या कपकडे पाहून त्याने सदाला हाक मारली.
"सदा !! चहा !!"
विशाल हाक मारेपर्यंत सदा चहा घेऊन आला.
"हे घ्या !! तुम्हाला पाहिलं तेव्हाच चहा घेऊन यायला लागलो होतो !! म्हटलं तुम्हाला आता चहा नक्की लागेल !!" सदा हसत म्हणाला.

विशाल चहाचा कप हातात घेत समोरच्या मुख्य दरवाज्याकडे एकटक पाहू लागला. चहा कपमध्ये तसाच राहिला. सदा बाजूला उभारलेला, त्याला लक्षात येते तो मध्येच बोलतो.
"दादा चहा घ्या !! गार होईल !!"
विशाल भानावर येत चहाचा कप घेऊन आत आपल्या खोली मध्ये जातो.

"काय रे  सदा!! हल्ली विशाल कुठे गुंग असतो काही कळत नाही ??कोणत्या विचारात गुंतला आहे काय माहित !!!"
"बाईसाहेब !! काल सायली येऊन गेल्यापासून हे असच चालू आहे बघा!!"
"काल सायली आली होती घरी ?? मला कसं माहित नाही मग ??"
"तुम्ही तेव्हा आत मध्ये होतात !!"
" काय झालं आहे पण ??" आई कुतूहलाने विचारते.
" ते काय माहित नाही मला !!! "
"बर ठीक आहे !!" 

एवढं बोलून आई आपल्या कामात पुन्हा व्यस्त होते पण तिला सायली आणि विशालचे विचार कामात मन लावू देत नव्हते. विचारावे तरी कसे म्हणून आई गप्प राहिली. आपल्या कामात व्यस्त राहिली.

विशाल खोलीत आपल्या चित्राकडे उगाच पाहत राहिला कित्येक वेळ, आणि बडबडू लागला.

" ही पायल आहे !! नाही ही सायली आहे ! नाही ही सायली नाही !! अरे !! ही पायल नाही !! हा कोणता प्रश्न आहे ?? या चित्रात मला पायल शिवाय कधी कोण दिसलेच नाही !! मग आज या चित्राचा चेहरा मला सायली सारखा का वाटावा ?? ती सायली जीचा स्पर्श मला तिच्यात हरवून गेला. जिच्या डोळ्यात मी पाहिला आहे तो प्रेमाचा अथांग समुद्र !! फक्त माझ्यासाठी !! पण मग माझी पायल कुठे आहे??  ती पाहा त्या आठवणीत ! त्या आमच्या आठवणीच्या चित्रात ती मला स्पष्ट दिसते आहे !! पण तिचा तो स्पर्श आठवत नाही आता !! पण आठवांचा स्पर्श जाणवतो आहे मला !!! सायली ही अस्तित्व आहे की पायल ?? की हा सारा भास आहे माझा !! ते पहा !! ती सायली माझ्यापासून दूर जात आहे ! पण ती पायल आहे ना ?? नाही सायली आहे !!! थांब सायली !!" विशाल त्या चित्राला जवळ घेत म्हणाला.

थोड्या वेळाने पुन्हा विशाल खोलीतून बाहेर आला. सदाला त्याने हाक मारली. सदा समोर येताच त्याने विचारले.
"सदा कोणी आले होते का रे माझ्याकडे ??" 
"नाही दादा कोणी नव्हते !!! "
"बर ठीक आहे !!! " अस म्हणत विशाल पुन्हा खोलीत गेला.

दिवसातून कित्येक वेळा त्याने सदाला विचारले पण सदाचे उत्तर काही बदलले नाही. आई झाला प्रकार पाहत होती.  विशालच्या मनाची अवस्था तिला कळली होती. विशालही समजू लागला होता. पण स्वतःला थांबवू शकत नव्हता. कित्येक वेळ उगाच बसून राहिला आणि तेवढ्यात बाहेरून सदा हाक मारू लागला.

"दादा !! बाहेर तुमचे विद्यार्थी आले आहेत !!"
विशाल जागेवरून उठला. यात नक्की सायली असणार म्हणून तो लगबगीने बाहेर जाऊ लागला. बाहेर येत समोर पाहू लागला. तेव्हा एक विद्यार्थी बोलला.
"सर ! काल आम्ही आलो नव्हतो म्हणून आज आलो आहोत !! वर्गासाठी नाही पण काही प्रश्न होते त्यांची उत्तरं विचारायची होती!! "
"बरं बरं!!  विचाराना !! "

विशाल आणि ते विद्यार्थी कित्येक वेळ प्रश्न आणि उत्तरे असा संवाद करत राहिली. त्या मध्ये विशालची नजर सतत सायलीला शोधत होती. पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. अखेर विशालने त्यांना विचारलेच,

"सायली कुठे दिसत नाही ते ??"
"ती कुठे गेली कोणालाच माहित नाही !! सकाळी मी जाऊन आले पण तिच्या घरी कुलूप होत." एक विद्यार्थीनी म्हणते.
"कुठे गेली काय माहिती ??" 
"नाही !! काहीच माहीत नाही !! माझी आणि तिची पर्वापासून भेटच नाही."
"बाकी कोणाला ??"
सर्वांनी नकारार्थी मान डोलावली.

विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन परत गेली. पण विशालच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठले. 

"काल पासून सायली कुठेच नाही ?? गेली तरी कुठे म्हणायचं ही ?? काहीच कळत नाही !! तिने जीवाचं काही बरंवाईट केलं असेल तर ?? नाही पण ती तस करणार नाही !! सायली इतकी कमकुवत नाही!! कित्येक वर्ष झालं मी तिला ओळखतो आहे !! ती सतत सोबत होती माझ्या !! पायल जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हाही ती सर्वात पहिले पुढे होती!! माझ्या प्रश्नाचं उत्तर होती ती !! आणि आज प्रश्नही तीच आहे !! सायली !! एकदा बोलायची संधी दे !! एकदा भेट मला !!" विशाल अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिला, सायलीला आपल्या विचाराच्या विश्वात शोधत राहिला.

"विशाल ?? अरे जेवायचं नाही का रे ??" आई अचानक समोर येत विशालला बोलू लागली.
भानावर येत विशाल बोलला.
"हो आई जेवायचं आहे !!"
समोर ताट देत आई म्हणाली.
"घे !! आणि जरा पोटभर जेव !! सारखं ते चित्र नाही तर वर्ग !! "
"तू कशाला घेऊन आलीस ?? मी आलो असतो !!" विशाल ताट हातात घेत म्हणाला.
"कामात व्यस्त होतास !! म्हणून मी घेऊन आले !!"
विशाल काहीच म्हणाला नाही. आई क्षणभर शांत राहिली आणि पुढे म्हणाली.
"सकाळपासून पाहते आहे !!कामात लक्ष नाहीये तुझ? काही झालंय का ??"
"काही नाही आई !! "
"मनात असतं ते बोलून टाकावं विशाल !! नाहीतर मनात विचारांचे कित्येक डोंगर तयार होतात !! मग ते आपल्यालाच उगाच मोठे वाटायला लागतात." आई मनसोक्त बोलत होती.
"पण ते बोलता येत नसेल तर काय करावे मग ??" विशाल.
"कोणतीच गोष्ट व्यक्त करता येत नाही असे होत नाही, एकतर आपण ती व्यक्त करताना उगाच भीती बाळगतो !! म्हणून ती तशीच आत राहते !! मनातल्या कोपऱ्यात !!" 

विशाल फक्त आई कडे पाहत राहतो. आई त्याच्याकडे क्षणभर पाहते आणि आपल्या खोलीत निघून जाते. विशाल जेवण करतो आणि आपल्या खोलीत जातो. रात्रभर तो झोपतच नाही. समोरच्या चित्राना उगाच एकटक पाहत राहतो.

"आज मला भूतकाळ आणि वर्तमान यातला फरक तो कळतो आहे. पायल हा माझा भूतकाळ आहे, ते बघ त्या चित्रात ती माझ्या सोबत आहे. पण आज तिचा स्पर्श आठवणी शिवाय कुठेच नाही. ती सायली माझा वर्तमान आणि भविष्य आहे. आता मनात माझ्या कोणतेच द्वंद्व नाही. मला कळून चुकले ते सायलीचे पुन्हा पुन्हा माझ्याकडे येणे !! माझ्यावर नितांत प्रेम करणे !! पण हे कळले तरी केव्हा !! जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा !!! पण नाही, आता हा भास नाही !! आता शोध आहे तो अस्तित्वाचा !! ज्याला मी नेहमी दुर्लक्ष करत राहिलो!! नाही मला तिला शोधायला हवं !! मला तिला शोधायला हवं !!" विशाल भानावर येतो.  क्षणभर शांत झोपी जातो.

सकाळच्या सूर्य किरणांनी नवी दिशा दिली. विशाल झोपेतून उठला. त्याने मनाला आज पक्क केलं होत, आज तो सायलीला शोधणारा होता. त्यामुळे तो आज लवकर आटपून बाहेर आला. आई समोरच होती तिच्याकडे पाहून तो म्हणाला.

"आई मी बाहेर जातोय !! "
"एवढ्या सकाळी !! अरे पण कुठे ??"
"सायलीला शोधायला !! तिला पुन्हा घेऊन यायला !!"

आई फक्त पाहत राहिली. विशाल मुख्य दरवाज्यातून बाहेर गेला.

क्रमशः 

✍️योगेश

द्वंद्व || कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||



 कथा भाग ३

 विशालच्या खोलीतून बाहेर येताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जणू ते तिला खूप काही बोलत होते. रात्रभर ती अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिली. विशाल आणि त्याच्या या वागण्याबद्दल तिच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.तिच्या मनात सदाचे ते वाक्य सारखे घुमू लागले.

"बाईसाहेब !! विशाल दादांना आपण वैद्यबुवांना दाखवू या ??" पण क्षणात आई भानावर येत होती. तिला विशालचे हे वागणे आता विचित्र वाटायला लागले होते.

"जी आता अस्तित्वात नाही तीच नसणं अमान्य करणं, याला काय म्हणावं तेच कळतं नाही. का ती फक्त आपणच आपल्याशी केलेली फसवणूक आहे ?? माहित नाही !! पण याची नक्कीच किंमत आपल्याला मोजावी लागते, हो ना?? विशालच्या बाबतीत ती किंमत कदाचित सायली तर नसेल ना ?? तीच आता त्याला या भूतकाळाच्या जाळ्यातून बाहेर काढू शकेल !! तीच नितांत प्रेम आहे विशालवर !!" 

विचारांच्या तंद्रीत सकाळ केव्हा झाली कळलच नाही. खुर्चीवर विचार करत करत झोपी गेलेल्या आईकडे पाहून सदाने आईला जाग करण्यासाठी हाक मारली.

"बाईसाहेब !! बाईसाहेब !!" 
झोपितून जागे होत, आई समोर उभ्या सदाला पाहू लागली. सदा पुढे बोलू लागला.

"बाईसाहेब !! रात्रभर तुम्ही इथेच झोपलाय होय ?? खोलीत तरी जायचं !!!"
"नाहीरे सदा !! बसल्या बसल्या कधी झोप लागली कळलच नाही !!" आई खुर्चीवरून उठत म्हणाली.
"चहा आणू??"सदा आईकडे पाहत म्हणाला.
"हो आन!! मी आवरते तोपर्यंत !! काय रे सदा !! विशाल उठला का रे ???"
"केव्हाच उठून बसले आहेत दादा !! आवरून पण झालं !! कुठ बाहेर जायच्या तयारीत आहेत वाटत!!"
"नेहमीचच रे ! पायलला आणायला जायचा हट्ट !! दुसरं काय !!" आई आपल्या खोली जात म्हणाली.

इकडे विशाल आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मध्येच सदाला हाक मारत होता.
"ये सदा ! इकडे ये रे !चहा घेऊन ये !"

लांबुनच सदा येतो म्हणून विशालला सांगत होता. तेवढ्यात मुख्य दरवाज्यातून सायली आत येत होती. सदा तिला पाहून म्हणाला.

"अरे !सायली !! ये न !! "
"सर आहेत ??"
"हो आहेत !! खोलीत आहेत !!"
"चहा मी घेऊन जाऊ !" सदाच्या हातातला चहा पाहून सायली म्हणते.
"ठीक आहे !!" सदा चहाचा कप हातात देत म्हणाला.

सायली चहा घेऊन खोलीत येते. विशाल समोर उभा असतो. तिला पाहून विशाल म्हणतो.
"सायली तू !! आणि आता ???" 
"आज वर्ग आहेत सर !!" चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली.
"हो मग एकटीच ??"  विशाल चहा पित म्हणाला.
"बाकीचे आज सगळे फिरायला गेले आहेत !! म्हणून मग एकटीच आले आज !!"
"चला बर झाल!! मलाही आता वेळ नाहीये !! आपण मी आल्यावर वर्ग सुरू करूयात !!" विशाल चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला.
"मला आहे ना वेळ !!" सायली अगदिक होत म्हणाली.
"हो पण मला नाहीये  !!" विशाल एकदम बोलून गेला.

सायली क्षणभर शांत राहिली काहीच बोलली नाही. विशालच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. विशाल लगबगीने बाहेर जाऊन लागला आणि अचानक समोरच्या खुर्चीला अडकून पडणार तेवढ्यात, सायलीने त्याला सावरलं. तो तिच्या मिठीत केव्हा गेला त्यालाही कळलं नाही. तो स्पर्श तिच्या हातांचा त्याच्या हातावर जाणवू लागला होता. ती नजर त्या नजरेत हरवून गेली होती. सायली ही स्वतःला सांभाळू शकत नव्हती. कित्येक वेळ ते एकमेकांत हरवू गेले होते आणि नकळत ओठ ओठांवर स्पर्श करून गेले. तो स्पर्श खूप काही बोलत होता. सायली आणि विशाल आता एक झाले होते. आता विशालच्या त्या मिठीत सायली हरवून गेली, फक्त विशालची राहिली. विशाल बेधुंद होऊन तिच्या ओठांवर नकळत प्रेमाचे कित्येक गोड क्षण रिते करत होता. त्या सुखाच्या परमोच्च क्षणात कदाचित सायली आणि विशाल आता जणू भान हरपून गेले होते. 

विशाल सायलीला घट्ट मिठीत घेऊन होता.
"माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे पायल !! मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत !! "
 विशालच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. सायली क्षणात भानावर आली. स्वतःला विशाल पासून दूर करत सावरू लागली.
"पायल !! माझी पायल !! तू आलीस !!" विशाल बोलत होता.
सायली फक्त पाहत राहिली. आता विशालही भानावर आला. त्याला काय झाले हे कळायच्या आत, सायली खोलीतून बाहेर निघून गेली.

दरवाज्यातून बाहेर जात अश्रू पुसत ती निघून जाऊ लागली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. विशालही झाल्या प्रकारात स्वतःला शोधत होता.

"ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तो आज मला मिठीत घेताना खरंच किती आनंद झाला होता. ते सुख आयुष्यातील इतर सुखापेक्षा खूप सुंदर होत. पण त्या सुखात फक्त मी होते !! तो कुठेच नव्हता. तो होता फक्त शरीराने माझ्याजवळ!! पण मनाने तो आजही त्या पायलचां होता. मग मी त्याला उगाच का शोधत आहे??  मलाच कळतं नाहीये !! आजपर्यंत नितांत प्रेम केलं मी त्याच्यावर !! आज त्याच्या मिठीत असताना फक्त एकदा त्याच्या तोंडून माझं नाव यावं एवढंच वाटत होत मला, होना !!पण तीही इच्छा पूर्ण झाली नाही माझी!! कदाचित विशाल ही आजची आपली शेवटची भेट !! " सायली विचाराच्या वादळात होती.

"आज मला हे काय झालं मलाच कळलं नाही !! ज्या सायलीला मी कधीही त्या नजरेने पाहिल नाही !! ती सायली आज माझ्या मिठीत होती. पण मी कुठे होतो. पायलच्या विश्वात मी हरवून गेलो होतो. काय वाटलं असेल सायलीला !! काय विचार करत असेल ती आता !माझी खूप मोठी चूक झाली!! ! नक्कीच !!" विशाल खुर्चीवर बसून विचारात गुंग होता.

आई कित्येक वेळ विशालची वाट पाहत होती. तिला मनातुन भीतीने ग्रासले होते. जेव्हा विशाल पायलला आणायला निघेल तेव्हा काय म्हणून मी त्याला आडवणार आहे माहीत नाही. पण दिवस मावळतीला आला तरी विशाल आपल्या खोलीतून बाहेर आलाच नाही. आईला आश्चर्य वाटत होत. ती न राहवून विशालच्या खोलीत गेली.

"विशाल !! ये विशाल !! "
स्वतःला सावरत विशाल खूर्चीवरून उठला आणि म्हणाला.
"हा आई !! ये ना !! "
"आज खोलीतून बाहेरच आला नाहीस??"
"हो ते जरा !! चित्र काढण्यात व्यस्त होतो.!!" विशाल तुटक बोलत होता.
"का रे काही झालं का??" आई म्हणाली.
"नाही ग आई !! मी ठीक आहे !!"
"बर बर !!" 

आई एवढेच बोलून खोलीतून बाहेर आली. रात्री जेवतानाही विशालच लक्ष नव्हतं हे तिने ओळखलं होतं. पण कसे विचारावे म्हणून ती शांतच राहिली. जेवण करून विशाल पलंगावर पडून राहिला. कित्येक वेळ विचार करत राहिला. 

विचार करता करता त्याला झोप कधी लागली हे त्यालाही कळल नव्हतं.

"थांब !! जाऊ नकोस !! थांब जाऊ नकोस !!! माझ्यापासून अस लांब जाऊ नकोस !! थांब !! तो जाणारा प्रत्येक पाऊल मला पुन्हा अंधारात घेऊन जाईल !! हे द्वंद्व मला पुरते हैराण करून सोडते आहे !! तुझा हात हाती दे माझ्या !! तुझा हात असाच राहू दे आता !!! सायली !!! या द्वंद्वा मधून सोडवं मला !! थांब सायली जाऊ नकोस !!!"

विशाल अचानक झोपेतून जागा झाला. 


क्रमशः 

✍️योगेश 

द्वंद्व || कथा भाग २ || Marathi love Stories ||




कथा भाग २

 समोरच खुर्चीवर बसलेल्या आईने सायली खोलीतून बाहेर येताच प्रश्न विचारला.
"सायली!!  चाललीस ??"
"हो आई !! येते मी !! सर आपल्या कामात गुंग झालेत !! आणि मला ना आता कंटाळा आलाय !!"
"हो का !! असंच आहे बघ विशालच !! एकदा चित्र काढण्यात गुंग झाला की काही कळत नाही त्याला !!"
"हो तर !!" सायली बाहेरच्या बाजूने जात म्हणाली.
"बरं येते मी ! " दरवाजा बाहेर जात सायली म्हणाली.

सायलील लांब जाताना आई कित्येक वेळ पाहत राहिली. मनात कित्येक विचार तिच्या येत होते.

"सायली म्हणजे आमच्या पेंडसे मास्तरांची पोर !! गोड सालस !! तिचा विशालवर पहिल्यापासून जीव !! तशी ती वयाने विशाल पेक्षा जेमतेम एक दोन वर्षांनीच लहान असेल !! पण ती नेहमी राहिली ती विशालची विद्यार्थीनींच !! कारण विशालच्या जवळ राहण्यासाठीचा एक केविलवाणा प्रयत्न आहे तो!! कधी कधी मला खरंच नवल वाटत तीच !! विशाल बद्दल एवढं सगळं माहीत असूनही ती आजही विशालवर तितकंच प्रेम करते!! अगदी मनापासून !!!" आई सायलीच्या विचारात गुंग झाली होती. 

आतमध्ये खोलीत विशाल चित्र काढण्यात अगदी स्वतःला विसरून गेला होता.
"विशाल !!". एक अनामिक आवाज मागून त्याला आला.
"कोण ??" विशाल मागे वळून पाहू लागला.
"मी आहे !! तुझी सखी , सोबती .. !! 
विशाल क्षणभर गोंधळून गेला. त्याला काय बोलावं काहीच कळेना. समोर कोण आहे याचा त्याला विश्वासाचं बसेना.
"तू !! तू!! पायल !! तू !!!" 
"हो !! मी आले आहे विशाल !! तुझ्या जवळ!! अगदी कायमची !!"
विशालच्या हातातील चित्र काढण्याचा ब्रश खाली पडला. तो क्षणभर शांत झाला. त्याला जणू चित्रातली त्याची सखी प्रत्यक्षात समोर आल्या सारखे वाटू लागले.
"कुठे होतीस तू ??दोन वर्ष !! दोन वर्ष मी तुझी किती वाट पाहिली माहिती आहे ??"
"म्हणून तर मी आले ना !! तुला भेटायला !! तुझ्या कुशीत यायला !! तुझ्या मिठीत सामावून जायला !!"
"येना !! पायल !! माझ्या मिठीत ये !! तुझ्याविना हे जग सार मला अगदी फिक वाटायला लागलं होत!!" विशाल अधीर होऊन बोलू लागला.
"हो ना ! माझीही अवस्था काही वेगळी नव्हती विशाल !! हे सारं जग मला तुझ्याविना अगदी उदास वाटत होत रे !!" 
"होका !! मग का राहिलीस माझ्यापासून दूर इतकी तू ??का?? सांग ना ??"
"माझा नाईलाज होता रे विशाल !! माझा नाईलाज होता !! "
"आता तर नाहीना सोडून जाणार मला तू ??"
"नाही कधीच नाही रे !!" 
विशाल हळू हळू पुढे जाऊ लागला. तशी ती त्याच्या पासून दूर जाऊ लागली.
"ये पायल!! माझ्या जवळ ये!! या माझ्या हृदयाला तुझ्या प्रेमाची ओढ लागली आहे !! येणा !"
"विशाल मी मजबूर आहे रे !!" 
"कोणती अशी मजबुरी आहे सांग तरी ??" विशाल थोडा मोठ्या आवाजात बोलू लागला.
"नाही रे !! मी नाही सांगू शकत !! " 
"तुला सांगाव लागेन !!"
"मला माफ कर !!" पायल मध्येच बोलत होती.
"तुझं माझ्यावर प्रेम नाही !!" विशाल डोळ्यातून येणाऱ्या अश्रुस पुसत म्हणाला.
"अस नाही रे ! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे !!!" असे म्हणताच ती मागे मागे जाऊ लागली.
"मग मला सोडून जाऊ नकोस!!" विशाल विनवणी करू लागला.
"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!!" पायल आता एवढंच बोलू लागली.
"नाही नाही !! तुझं माझ्यावर प्रेम नाही !! मला सोडून जाऊ नकोस पायल!!"
विशाल हळू हळू पुढे येऊ लागला. पायल मागे मागे जात असल्याचे त्याला वाटले.
"मला सोडून जाऊन नकोस पायल!! " विशाल मोठ्याने ओरडत दरवाजाकडे धावत जाऊ लागला.
"पायल पुढे पुढे निघून जात आहे!! मला तिला अडवल पाहिजे !! आता पुन्हा तिला मी माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही !!!पायल !!"

विशालच्या आवाजाने आई भानावर आली. आतमध्ये सदा काम करत असलेला धावत बाहेर आला. बाहेर पळत चाललेल्या विशालला त्याने अडवल.
"कुठे जाताय विशाल दादा !!"
"सोड मला सदा !! पायल निघून जाते आहे !! मला तिला आडवयाला पाहिजे !!!"
आई लगबगीने विशाल जवळ आली.त्याला सावरत म्हणाली.
"कोणी नाहीये विशाल तिथे !! शुध्दीवर ये विशाल !! कोणी नाहीये !!"
"आई पायल जाते आहे !! तिला थांबवना !! तिला जाऊ देऊ नकोस !! "
"अरे जी या जगातच नाही ती पुन्हा कशी येईल विशाल !! भानावर ये रे !! सत्य स्वीकार आता तरी !!"
"काहीतरी काय म्हणतेस आई !! आत्ता माझ्या समोर होती ती !! "
"तो तुझा भास होता !!" आई विशालला सावरू लागली.
"चला खोलीत दादा !! चला !! आहो कोणी नाहीये इथ !!"

कित्येक वेळ समजावून सांगितल्या नंतर विशाल आपल्या खोलीत गेला. विचार करत बसला हा भास होता की सत्य. आई विशालच्या या वागण्याने हतबल झाली. विशालला खोलीत व्यवस्थित सोडून सदा पुन्हा आईकडे आला.

"बाईसाहेब !! एक बोलू !!"सदा आईच्या समोर येत म्हणाला.
"बोल ना सदा !!" 
"म्हणजे !! राग येणार नसेल, तर बोलतो !!"
"नाही येणार बोल !!" आई डोळ्यात आलेले पाणी पुसत म्हणाली.
"आपण विशाल दादाला एखाद्या वैद्यांकडे दाखवूयात का ??"
"म्हणजे तुला म्हणायचं आहे ! विशालला वेड लागलंय??"
"नाही !! तसं नव्हतं म्हणायचं मला !! पण त्यांची ही अवस्था बघवत नाही आता !!"
"मलाही आजचं त्याच वागणं पाहून काय बोलावं काहीच कळत नाहीये !! "आई अगदिक होऊन म्हणाली.
"माफ करा बाईसाहेब !!" 
"नाही रे सदा !! तू सुधा त्याच्या चांगल्यासाठी म्हणालास !!"

आई आणि सदा कित्येक वेळ बोलत राहिले. त्यांना आजच्या विशालच्या वागण्याने काय करावे काहीच कळतं नव्हतं. तेवढ्यात विशालच्या खोलीतून आवाज येतो.

"सदा !! ये सदा !! इकडे ये!!"
सदा लगबगीने जाऊ लागला. पण त्याला थांबायला सांगून आई विशालच्या खोलीत गेली. विशालच्या समोर जात बोलू लागली

"काय झालं विशाल ??"
"डोकं खूप दुखतंय आई ! चहा हवा होता !!!"
"ठीक आहे मी सांगते सदा ला !! " 
अस म्हणत आईने हाक मारून सदाला चहा घेऊन यायला सांगितलं.

"काय रे विशाल !! एवढी चित्र काढतोस !! मोठ मोठे त्यांचे प्रदर्शन भरवतोस !! पैसा एवढा कमावतो !! मग कधी एखाद माझं आणि तुझ्या बाबांचं चित्र काढलास का रे ??"
"हो मग !! काढलं ना !! "
"दाखवतोस ??" आई त्याला आग्रह करते.
"थांब !! " विशाल त्याच्या कित्येक चित्रातून ते एक चित्र शोधू लागला. चित्र मिळताच ते आईला दाखवू लागला.
"खूप छान आहे ना !! केव्हा काढलस !! कधी कळू पण दिलं नाहीस !!"
"बाबा जायच्या काही दिवसांपूर्वी काढलं होत !!"
"किती वर्ष झालीना बाबांना जाऊन !! "
"पंधरा वर्ष !" विशाल आई जवळ बसत म्हणाला.
"पण बघ ना !!आजही मला ते माझ्या सोबत आहेत असच वाटत!! अगदी या चित्रातल्या रंगाप्रमाने !! जिवंत !! माझ्या आठवणीत !! माझ्या श्वासात !पण हा भुतकाळ झाला!! त्यांचं अस्तित्व आहे आठवणीत !! हृदयात !! "
"होणं!! आजही ते आपल्यात असल्या सारखेच वाटतात!!" विशाल आईला मिठी मारत म्हणाला.
"आयुष्य यालाच म्हणावं विशाल !! जो गेला तो आठवणीत असतोच !! जात कधीच नाही !! म्हणून काही भूतकाळाला आपल्या वर्तमान काळावर वर्चस्व गाजवू द्यायचं नाही !! हो !!जावं कधी त्या भूतकाळात हरवून !! पण काही क्षणा पुरतच !!"
"हो !! कळतंय मला आई !तुझ्या आयुष्यात बाबांच्या आठवणी नेहमीच जिवंत असतात !! जश्या माझ्या मनात पायलच्या !! ती पुन्हा परत आली की सारं काही पहिल्या सारखं होऊन जाईल !!" विशाल त्याने काढलेल्या चित्राकडे पाहत म्हणाला.
"बाळा !! भूतकाळाला वर्तमान काळावर वर्चस्व गाजवू देऊ नकोस !!" आई अगदिक होऊन पुन्हा बोलू लागली.
"पण आई माझं भूत , भविष्य आणि वर्तमान एकच आहे !!" विशाल मध्येच म्हणाला.

आई क्षणभर शांत राहिली. काहीच न बोलता ती खोलीतून बाहेर निघून जाऊ लागली.तिला जाताना पाहून विशाल पुन्हा बोलला.
"आई !! मला पायलला आणायला जायचं आहे !! जर तुझी परवानगी असेल तर !!"
"अरे पण उद्या तुझे वर्ग आहेत ना ??"
"ते जाऊदे ग आई , सायलीला सांगेन मी काहीतरी !! उद्या मला पायलला आणायला जायची परवानगी देशील??"
"ठीक आहे जा तू उद्या !! पण शांत झोप आता !!"

क्रमशः 

✍️योगेश

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...