वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha ||




भाग २

शरीर

आयुष्याची एक पायरी वर चढून आल्यावर आकाश आता नव्या जागी आला होता. त्याच्या शरीरात विविध बदल होत होते. त्याची जाणीव त्याला नकळत होत होती. आजपर्यंत शालेय शिक्षण घेत असताना त्याला याची कधी जाणीवच होत नव्हती. पण आज जणू तो एका वर्तुळातून बाहेर पडल्यासारखं त्याला वाटत होत. आजपर्यंत बाबांच्या हातात बघितलेला फोन स्मार्ट फोन आता आकाशकडे सुद्धा होता. त्या गिफ्टबॉक्स मध्ये एक सिमही त्याला बाबांनी दिलं होत. सिमकार्ड मोबाईलमध्ये इन्सर्ट करताच त्याने आपल्या जवळच्या वहितून दिपकचा घरचा फोन लावला. फोन उचलताच आकाश त्याला बोलू लागला. 

"हॅलो !!"
"हा कोण बोलतंय ??" समोरून दिपकची आई बोलत होती.
"काकू दीपक आहे का ??"
"हो आहे ना!! कोण बोलतंय ??"
"काकू मी आकाश बोलतोय !!"
"देते त्याच्याकडे थांब हा !!"

दिपकची आई फोन बाजूला ठेवून त्याला हाक मारते. आकाशचा फोन आला आहे म्हटल्यावर दीपक धावत फोनकडे आला. 

"हॅलो आकाश !!"
"दिप्या !! ओळख बर मी फोन कशावरून केलाय ??"
"कशावरून म्हणजे ??"
"अरे म्हणजे कुठून केलाय ओळख ??"
"आता तू कुठून करणार फोन घरूनच ना !!"
"नाही दिप्या मी मोबाईलवरून फोन करतोय !! आणि तेही माझ्या स्वतः च्या !!"
"काय??"
"होय तर !! "
"ये आक्या उगाच टेपा नको मारू !! "
"अरे खरंच तर !! बाबांनी गिफ्ट दिलाय !!! आजच !! पहिला फोन तुला लावतोय !! "
"असही लॅन्डलाईन वरून काही कळतं नाही !! उद्या भेटुयात आपल्या अड्ड्यावर मग कळेलच खर खर !!आणि जर खर असेल तर पार्टी फिक्स मग !!"
"अरे दिली !! "
"मिसळ पावाची ??"
"अरे दिली !! "
"बरं बरं !! उद्या भेटुयात मग संध्याकाळी सात वाजता !!"
"हो नक्की भेटुयात !! ठेवतो आता फोन !! "

आकाश दिपकशी बोलणं झाल्यावर फोन ठेवतो. आणि मोबाईलमध्ये दुसरे फिचर्स पाहत बसतो. इंटरनेटवर जाऊन मोबाईलमध्ये विविध गेम्स डाऊनलोड करतो. पाहता पाहता आकाश मोबाइलच्या दुनियेत अक्षरशः बुडून जातो. बाहेरून आई त्याला जेवणासाठी बोलावते. पण तरीही तो काहीच प्रतिसाद देत नाही. हे पाहून आई आकाशच्या खोलीत जाते. समोर पाहते तर सगळं सामान असताव्यस्त पडून होत. आकाशला आपली खोली अशी कधीच आवडत नसे. तो सगळं सामान नीटनेटके जागच्या जागी ठेवत असे. आईला ही गोष्ट चटकन लक्षात आली. ती खोलीत आली आहे हे सुद्धा आकाशला लक्षात आल नाही. आई पटपट सगळी खोली आवरायला लागते. आवरत असतानाच ती त्याच्याकडे पाहत बोलते,
"आकाश !! "
आकाश काहीच बोलत नाही. तो मोबाईल मध्ये गेम्स खेळण्यात दंग झालेला असतो. आई पुन्हा हाक मारते,
"आकाश !! मी काय म्हणते ते तरी ऐक !!"
"हा !! " आकाश तुटक बोलतो. 
"जेवायचं आहे की नाही तुला ?? का मोबाईलने पोट भरणार आहे तुझं ??"
"आलोच आई तू जा !! आलोच मी जस्ट संपतच आली आहे गेम !!"
 
आई आकाशकडे पाहत खोलीतून बाहेर जाते. समोर डायनिंग टेबलवर बाबा केव्हाच जेवणासाठी येऊन बसलेले होते. आईकडे पाहत त्यांनी विचारलं,
"साधना,  आकाश ??"
"मोबाईलवर गेम खेळतोय !! जस्ट संपतच आलीये म्हणतोय !!"
"ओह ह !! साधना आपल्या वेळी अस काही नसायचं ना !! म्हणजे बघ ना !! मी दहावी पास झालो होतो तेव्हा बाबा मिलमध्ये हमाली करत होते !! रिझल्ट घेऊन जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा नेमक मी काय पास झालोय हेही त्यांना कळत नव्हतं. त्यांना आनंद मात्र खूप झाला होता. खिशातले पाच रुपये काढून माझ्या हातात देत त्यांनी समोरच्या हॉटेलात जाऊन मित्रासोबत वडापाव खा म्हटले होते. नंतर पुढचा संपूर्ण महिना ते बाहेर चहा प्यायले नव्हते. माहितेय का ?? त्या मला दिलेल्या पाच रुपयाचा आपल्या खर्चात मेळ घालण्यासाठी. नंतर पायावर डोकं टेकवल तेव्हा शिकून खूप मोठा हो पोरा म्हणून मला आशीर्वाद दिला होता. तो पाठीवरचा स्पर्श अजूनही जाणवतो मला !! " बाबा क्षणभर आठवणींनी गहिवरले. 
"खरंच किती सुंदर होत ना आपलं बालपण !! " 
"हो ना !! थांब आकाशला घेऊनच येतो बरोबर !! "
बाबा खुर्चीवरून उठत म्हणाले. तडक आकाशच्या खोलीत गेले. मोबाईलमध्ये गुंग असलेल्या आकाशला हे कळलं सुद्धा नाही. बाबांनी लगेच त्याच्या हातातला मोबाईल घेतला. आकाशला लगेच त्याचा राग आला आणि तो जवळजवळ खेक्स्तच बोलला,
"बाबा !! मोबाइल द्या बरं !! कळत नाही का तुम्हाला !! "
"आधी जेवायला चल !! "
"मला भूक नाही !!मी करतो जेवण थोड्या वेळाने !!"
"अजिबात नाही !! सकाळपासून काय खाल्लंय सांग बरं !! आणि भूक कशी नाही !!"
"नाही तर नाही ना भूक !! आणि मी जेवतो म्हणलो ना नंतर !!"
"आपल्यात रात्रीच जेवण नेहमी आपण सगळे मिळूनच करतो ना !! चल !! "

आकाश नाईलाजाने खोलीतून  बाहेर पडला. बाबांनी जाता जाता त्याच्या हातात मोबाईल दिला. डायनिंग टेबलवर बसल्यावरही  जेवणास सुरुवात झाली तरी आकाशच सगळं लक्ष मोबाईलमध्येच होत. बाबांच्या हे लक्षात आलं, त्यांनी विषय काढत आकाशला बोलायला सुरुवात केली. 

"आकाश !! आता हे सत्कार दहावीचे मार्क्स हे सगळं ठीक आहे !! पण आता पुढचा काही प्लॅन आहे की नाही !!"
"म्हणजे !!" आकाश बाबांकडे पाहत म्हणाला. 
"म्हणजे !! आकरावीला कुठे एडमिशन घ्यायचं !!कोणती फॅकल्टी निवडायची !! याचा काही विचार केला आहेस की नाही!"
" बाबा त्याला अजून खूप वेळ आहे हो !! " 
"हो पण तरीही आपली तयारी हवीच ना !!"
"बघुयात !! आता नको हा विषय !! "
आकाश खुर्चीवरून उठला. त्याला उठलेला पाहून आई मध्येच बोलते,
"अरे जेवण तरी कर पूर्ण !!"
"झालंय माझं !! 

एवढं बोलून आकाश खोलीत निघून जातो. आई आणि बाबा एकमेकांस क्षणभर पाहत राहतात,

"आपण मोबाईल देऊन काही चूक तरी नाहीना केली ??"
"मला तरी नाही वाटत !! माणसानं काळाप्रमाणे बदलत जाव अस मला वाटत !! आता आपल्यावेळी हे आपल्याला मिळू शकलं नाही म्हणून आपण आपल्या मुलांनाही तसच करावं हे मला काही पटत नाही !! "
"पण या मोबाईलमुळे त्याच वागणं क्षणात बदलून गेलं !! "
"जास्त दिवस नाही व्हायचं हे अस !! कस असत नवीन आहेना त्यामुळे उत्सुकता असते , कौतुक असतं ! "
"जास्त दिवस टिकू पण नये हे !! आता पाहता पाहता बारावीला जाईल तो !! मला तर आत्तापासूनच त्याच्या बारावीची काळजी वाटू लागली आहे !!"
"साधना नको एवढा विचार करुस सगळं काही नीट होईल."
"होप सो !!"

आई बाबा नंतर कित्येक वेळ आकाशबद्दल बोलत बसले. त्यांना त्याच्या भविष्याची चिंता वाटत होती. बाबा या सगळ्या गोष्टींना जास्त मनावर घेत नव्हते. पण आईच्या मनात चिंता वाढत होती. ती कित्येक वेळ आपल्या अंथरुणावर पडून विचार करत होती. आणि विचार करता करता केव्हा झोपी गेली हे तिलाही कळलं नाही. 

पण सकाळच्या वेळी आजही सगळं सुरळीत चालू होत. बाबा लवकर उठून योगासने करत होते. आई घराची आवराआवर करत होती. अंगण स्वच्छ करत होती. पण आकाश मात्र कुठेच नव्हता. आईने न राहवून विचारलं,
"काय हो आकाश आला नाही आज योगासने करायला??"
बाबा आईकडे पाहत म्हणाले,
"मीच उठवलं नाही त्याला !! म्हटलं दहावीचं संपूर्ण वर्ष न चुकता रात्री लवकर झोपून पहाटे लवकर अभ्यास करण्यासाठी उठायचा ! आज देऊयात म्हटलं सुट !!"
 " कशाला हवी सूट ?? आपण का कधी घेतो सुट्टी ??"
"जाऊदे ग !! लहान आहे तो !!"
"म्हणे लहान !! " 

आई जरा रागातच म्हणाली. आणि आपल्या कामाला लागली. बाबांनी योगासने झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि कामाला जाण्यासाठी आवरू लागले. पाहता पाहता वेळ जाऊ लागली. बाबा ऑफीसला जाण्यासाठी निघू लागले तेवढ्यात त्यांनी विचारलं ,
"अजून नाही उठला ??"
"नाही !!"
"उठवतोच त्याला थांब !"
बाबा आकाशच्या खोलीकडे जात म्हणाले. 
"कशाला ?? झोपू द्याना अजून !! नको ते लाड !!"
"साधना तूपण ना !! "
बाबा आकाशच्या खोलीच्या दरवाज्यावर थाप मारू लागले,
"आकाश !! ये आकाश !! अरे उठ आता !! किती वेळ झोपायच !! "
बाबांनी खूप वेळ हाक मारल्यानंतर आकाशने दरवाजा उघडला. आकाशकडे पाहताच त्यांनी विचारलं,
"काय रे ?? डोळे का एवढे लाल झालेत ?? रात्रभर जागरण केलंस की काय ??"
आकाश रात्रभर मोबाईलवर गेम्स खेळत बसला होता त्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. पण उगाच तो बाबांपासून हे लपवण्याचा प्रयत्न करत होता. 
"चल पटकन बाहेर !! नाष्टा कर !! आवरून घे !! "
"हो बाबा !!" 
आणि अचानक त्याला मोबाईलची आठवण येते आणि स्वतःलाच तो म्हणतो,
मोबाईल ??"
आणि मोबाईल घेण्यासाठी आकाश धावतच बेडजवळ जातो. बाबा तसेच समोर उभे होते , ते त्याला पाहून म्हणतात,
"मी जातोय आकाश ऑफिसला !! बाय !!"
आकाश मोबाईल शोधण्यात दंग झाला. त्याला बाबा कधी निघून गेले याच भानही राहील नाही. मोबाईल सापडताच तो स्वतःच  पुटपुटला
"अरे यार मोबाईल तर स्विच ऑफ झालाय !! पटकन चार्जिंगला लावतो आणि तेवढ्यात सकाळच सगळं आवरून घेतो. 

मोबाईल चार्जिंग करायला ठेवून आकाश खोलीतून बाहेर गेला. जणू मोबाइलच्या रेंज मध्येच आता तो राहू लागला. आकाश मोबाइलच्या वर्तुळात अडकत जाऊ लागला. 

क्रमशः

वर्तुळ || कथा भाग १ || मराठी कथा ||




टीप : वर्तुळ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून, याचा कोणत्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेत उल्लेख केलेले नाव, स्थळ, जात, धर्म, पंथ, विचार , घटना हे सर्व लेखकांच्या विचारांतून लिहिलेले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.


भाग १

मोबाईल 

" दहावीत उत्तम मार्क मिळालेल्या सर्व विद्यार्थांचे मी मनापासून अभिनंदन करते. तुमच्या पुढे आता आयुष्याचे कित्येक मार्ग खुले झाले आहेत, तुमच्यातील कोणी पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेईल ,कोणी कला ,तर कोणी कॉमर्स या शाखेत जाईल पण विद्यार्थ्यांनो तुमचं मूळ मात्र एकच राहील आणि ती म्हणजे आपली शाळा. आणि या शाळेचं नाव मोठं करण्याचं काम आता तुम्हा सर्वांवर आहे , सुंदर पुस्तक वाचा , अभ्यास करा , शिका आणि मोठे व्हा. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. " सर्वत्र टाळ्यांचा आवाज झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या पाहुण्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या.

"खूप खूप धन्यवाद सुनेत्रा मॅम , आपण दिलेल्या या विचारांचा नक्कीच भविष्यात विद्यार्थ्यांना सदुपयोग होईल !! " निवेदिका क्षणभर थांबून पुन्हा म्हणाल्या, "आणि आता दहावीच्या परीक्षेत आपल्या शाळेतून पहिला , दुसरा आणि तिसरा आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते." आणि त्यांनी विद्यार्थ्यांची नावे घेण्यास सुरुवात केली.

"आपल्या प्रशालेतून दहावीच्या परीक्षेत तिसरी आलेली आहे, सीमा करंजकर !!" निवेदिका अगदी चढ्या आवाजात बोलल्या.
विद्यार्थ्याच्या रांगेतून एक चुणचुणीत मुलगी मंचावर आली. प्रमुख पाहुण्यांनी तिचा सत्कार केला. ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. दुसऱ्या विद्यार्थाचे नाव घेताच त्यानेही मंचावर जाऊन सत्कार स्वीकारला.

"यावर्षी आपल्या प्रशालेत दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, आकाश देशपांडे !!" सर्वत्र टाळ्यांचा आवाज घुमला. 
समोरच्या रांगेत बसलेला एक मुलगा धावत मंचावर गेला. शिक्षकांनी त्याच तोंडभरून कौतुक केल. तो आपल्या जागेवर जाऊन बसला. सर्वांच्या नजरा कित्येकवेळ त्याच्यावरच होत्या. मागे उभ्या आई बाबांना त्याचे कौतुक वाटतं होते. 

थोड्या वेळाने सत्कार समारंभ संपला. त्या गर्दीत आकाश आपल्या हातातील पुष्पगुष्छ संभाळत शाळेतून बाहेर आला. सगळे विद्यार्थी त्याला आवर्जून बोलत होते, त्याच अभिनंदन करत होते. तेवढ्यात समोर आईला पाहून आकाश धावत तिच्याकडे गेला. आईला त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली होती. आपल्या मुलाचं एवढं यश पाहून ती भारावून गेली होती. बाबा एका कोपऱ्यात उभा राहून सगळं आनंदाने पाहत होते. 

"चल आकाश, घरी जायचं ना आता !! " आई त्याला मिठी मारत म्हणाली. 
"हो आई एक पाच मिनिट !! मित्रांना सांगतो नी निघू आपण !!" 
"बरं ठीक आहे !!" 
आई आणि बाबा कारमध्ये जाऊन बसले. ते लांबूनच आकाशकडे पाहत होते. 
"साधना आज त्याला ते गिफ्ट द्यायचं ना ??"
"तुम्हाला नाही वाटतं आपण त्या गोष्टीची जरा घाई करतोय ते !!"
" नाही ग !! उलट उशीर झालाय !! आजच्या या काळात त्याला या सगळ्यांसोबत चालायचं असेल तर त्याची गरज आहेच !!"
"ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा !! "
आई बाबा दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.

"आपण भेटू रे लवकर !! असही अकरावी म्हणजे नुसता आराम आहे !! पुन्हा आहेच बारावी !!" आकाशचा मित्र दीपक आकाशला म्हणतो. 
"पण लक्षात ठेव एकच कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचं आहे हे विसरू नकोस !!"
"एकाच कॉलेज मध्ये ?? अरे तू ९८ टक्क्यावाला आम्ही सत्तरचे !! कसा मेळ बसायचा !! "
"ते बघू आपण ! आता! येतो मी आई बाबा वाट पाहतायत !! आणि सुश्या, पश्या, विक्या आणि धोल्याला सांग परवा सगळे भेटू म्हणून !! "
"हो नक्की "

आकाश गाडीत येवून बसला. गाडी घराकडे निघाली. 
"आकाश आज तुझ्यासाठी गिफ्ट आहे बरं का ??"
"गिफ्ट माझ्यासाठी ??"
"हो!!" आई आकाशकडे पाहून बोलते. 
"काय आहे सांगा ना गिफ्ट !!"
"घरी गेल्यावर कळेलच ना तुला !!"
"तरीपण सांगा ना !!" आकाश बाबांना विनवणी करतो.
"ना बेटा !! मग गिफ्टची मजा ती काय!!"
"असही घर यायला पाचच मिनिट राहिले आहेत !!"

आकाश कारच्या मागच्या बाजूस शांत बसतो. त्याला राहून राहून मनात आपण पुन्हा त्या शाळेत जाणार नाहीत याचं वाईट वाटतं होत. तो वर्ग , ते वर्गमित्र ,ते शिक्षक आणि तो शाळेचा परिसर त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे जणू बोलवत होता. पण आता ती एक फक्त आठवण राहणार होती. त्याच्या मनात कुठेतरी. 

आकाश आपल्या शाळेच्या आठवणींत रमला होता , तो राहुन राहुन आपल्या हातातील पुष्पगुच्छ पाहत होता. 

"चला !! आलो घरी एकदाचे !! " बाबा हातातील कारची चावी टेबलावर ठेवत म्हणाले. 
तेवढ्यात आकाश भानावर आला. त्याला बाबांच्या गीफ्टची आठवण झाली. तो धावत त्यांच्याकडे गेला.
"बाबा गिफ्ट ??"
"आत्ता लगेच ??"
"हो मग !! " 
"आकाश !!" मागून आई त्याला हाक मारते. 
आकाश मागे वळून पाहतो. आईच्या हातात गिफ्टचा बॉक्स होता. आकाशने तो पाहताच खुश झाला. आईने हळूच तो त्याच्याकडे दिला. त्यावेळी त्या बॉक्समध्ये काय आहे हे पाहण्यासाठी आकाशची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याने पटकन तो बॉक्स उघडला आणि आश्चर्याने तो आईकडे बघत म्हणाला,
"मोबाईल ??"
"हो !! " आई आनंदाने म्हणाली. 
"बाबा मोबाईल " 
"हो तुझ्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !! हल्ली अस म्हणतात सगळं जग या एका मोबाईल मध्ये सामावल आहे !!"
"थॅन्क्स बाबा !!"
आई बाबा आकाशकडे फक्त पाहत होते. आकाश मोबाईल बघण्यात गुंग झाला. 

"पण !! पण !! आकाश !!" बाबा आकाशच्या हातातील मोबाईल घेत म्हणाले. 
"या मोबाइलच्या जगात तुला जे योग्य आहे , जे तुझ्या फायद्याचं आहे तेच घ्यायचं आहे हे लक्षात ठेव !! हा मोबाईल मी फक्त तुझ्या सोयीसाठी दिला आहे."
"हो बाबा !! मी लक्षात ठेवेन हे सगळं !!

एवढं बोलून आकाश मोबाईल घेऊन आपल्या खोलीत निघून गेला. आई बाबांना आज त्याच्याकडे पाहून आनंद झाला. आकाश नव्या जगात पाऊल ठेवू लागला.

क्रमशः

लेखक : योगेश खजानदार

क्षणभर सखे || kshanbhar || मराठी || कविता ||



क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!!
तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !!
शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !!
सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!

का उगाच मग कल्लोळ, भावनांचा त्या होतो!!
तुझ्याविण न भेटल्या का ? शब्दास विसरून जातो !!
लिहितो कित्येक पानावरी जणू, तुझाच स्पर्श होतो !!
नकळत मग जगात त्या, अलगद निघून जातो !!

दिसे चेहरा कोणता मग, भास तुझा होतो !!
चिंब भिजल्या वाटेवरी का ?? उगाच पाहत जातो !!
थांबून पुसता फुलांस त्या, तोही अनोळखी होतो !!
सरी त्या बरसत राहतात, मी चालत जातो !!

सांग सखे कोणते मी, नाते जपत होतो !!
श्वास तो असा की? हळूवार बोलून जातो !!
हाक ती मनापासून येता, आवाज बंद होतो !!
प्रेम मी व्यक्त करता,  तुझ्यात मिसळून जातो !!

प्रेम मी व्यक्त करता, तुझ्यात मिसळून जातो !!

✍️© योगेश खजानदार

चित्र || Chitr || Marathi Poem ||



मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!

नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!

का ? कधी? कसे ?नी कुठे? , प्रश्नाचं उत्तर भेटतच नाही !!
काल, आज ,उद्या नी परवा, सोबत माझ्या कोणीच नाही !!

क्षण जपावे म्हणालो मी जरी, हाती माझ्या काहीच नाही !!
विचारले मी मनास माझ्या नी, एकांता शिवाय काहीच नाही !!

मग कसली उठाठेव उगाच आता, माझेच मला कळत नाही !!
शब्दांच्या या दुनियेत मग का ?? माझेच मला लिहीत नाही !!

कोण इथे ? कोण का तिथे?? मनात तर कोणीच नाही !!
सांग रे वेड्या मना मला, ते चित्र कसे विसरत नाही !!

ते चित्र कसे विसरत नाही !!

✍️© योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...