नात्यातील सुगंध ..!!

आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही ना ? कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत. सुटतात काही गोष्टी ज्या पुन्हा कधी भेटतही नाहीत. खुप पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आल्या तरी वेळ निघुन गेलेली असते. मग उरतो काय तर फक्त तिरस्कार. पण असं होतं ना!! जवळच्या व्यक्तीने कितीही दुखावलं तरी तिरस्कार मात्र आपण कधी करुच शकत नाहीत,  हेही तितकंच खरं असतं. पण नातं पुन्हा जुळायला वाट थोडीच पहावी लागते. ते तर कधीही जुळु शकतं. फक्त आपली भावना निर्मळ हवी. दुखावलो , रागवलो , चिडलो तरी नातं मात्र तसंच हव अगदी कधीही न तुटण्या सारखं. त्यात स्वार्थ नसावा, खोटेपणा नसावा . फक्त असाव ते एक गोड नातं. खुप विचार करावा असंही नातं काय उपयोगाचा!! नाही का??
आपल्यामुळे कोणाला त्रास तर होतं नाही ना याचाही विचार करायला हवा. कारण कित्येक गोष्टी या आपण कोणावर लादत तर नाहीत ना याचाही विचार केला पाहिजे. उगाच बळजबरी म्हणुन नातं कधीच टिकु नये त्यात समजुदारपणा हवाचं. शिवाय नातं हे एका बाजुने कधीच टिकत नाही. त्यासाठी दोन्ही बाजुने तेवढाच समतोल हवा. कारण एकाचाही तोल गेला तर नातं हे ताणलं जातं आणि त्रास दोघांनाही होतो.
  पण नातं जुळवायचं म्हणजे समोरचाही नातं पुन्हा सुरू करायला तयार असावा. कारण आयुष्यात पुढे गेल्यानंतर काहींना आपला भूतकाळ नको असतो. तो खोडता तर येतं नाही पण पुन्हा समोर यावा अस नको असतं मग कराव तरी काय? जुन्या या नात्याला असंच सोडुन द्याव? तर अजीबात नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसलो किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ आजही नसली तरी नातं हे संपत नाहीच ना. त्या नात्याची काळजी तुम्ही स्वतः घेऊच शकता. फक्त त्या व्यक्तीला आपला त्रास होता कामा नये.  पण आपलं मन खरंच त्या नात्याला टिकवतं असेल जिवंत ठेवतं असेल ना तर ती व्यक्ती पुन्हा सर्व विसरून आपल्या आयुष्यात येईल हे नक्कीच.
  शेवटी नातं हवं तरी कशाला असतं. आपलंस अस कोणीतरी वाटायला. आपल्या सोबत मनसोक्त आनंद लुटायला. कधी रडावंस वाटलं तरी सोबत जवळ बसायला. अगदी आयुष्यभराची साथ द्यायला हवी असतात ना ही नाती मग हे टिकवताना कशाला उगाच रुसायचं. झालं ते अगदी तिथेच विसरुन जायचं. कारण कधी कोणतं नातं हे कायमची आठवण होऊन जाईल ते कसं सांगायचं.  पुन्हा हुरहुर कशाला काहीतरी मनात राहिल्याची. आणि कशाला गुंतागुंत या नात्याची ..

नातं असावं एक सुंदर
वेलीवरच्या फुलांसारखं
उमलावं ते अगदी अलगद
मनातल्या भावना सारखं

  वाटतं ना असं की नातं हे एक सुंदर वेलीसारखं असावं. उमलावी ती कळी नात्याची जणु की उघडावी दारे मनाची. नातं हे असच असतं फुलासारख नाजुक. ते उमलु द्यावं लागतं त्या विश्वासाच्या वेलीवर. तरंच त्या फुलांचा त्या नात्याचा सुगंध आनंद देऊन जातो.

सुगंध हा दरवळे असा का
मनास खेचे फुलापाखरा सारखे
ओढं त्या वेड्या फुलाची
पहावे त्यास वाटते सारखे

एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं. कारण नातं हे प्रेमच देत राहतं. अगदी कायमं. म्हणुन नातं हे आयुष्यात खुप गरजेचं असतं. मग ते नातं कोणतही असो. कारण आपल्या व्यक्ति शिवाय हे आयुष्य शेवटी अधुरच असतं.

सुकता ते वेलीवरच फुलं
आठवणचं देऊन जातं
राहतं काय मनातं तर
ते वेडं हातात सुगंध ठेवुन जातं...!!! हो ना?
- योगेश खजानदार

 

तुझ्यात मी..

समोर तु असताना
तुझ्यात मी मिळून जाते
तुझ्यासाठी कविता लिहिणारे
ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते

शोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहते

डोळ्यात तुझ्या पाहताच
तुझ्याकडेच का ओढली जाते
मिठीत तुझ्या यावे आज
ती रात्र का बोलत राहते

सख्या मनातले माझ्या
मनातच का आज राहुन जाते
तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या
अबोल ओठांवरच का राहते

समजुन घे ना मनास या
डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते
मिठीत तुझ्या तेव्हा ते
तुला घट्ट धरून राहते

आणि तु समोर असताना
तुझ्यातच मी मिळून जाते
-योगेश खजानदार


मनातले प्रेम ...

मनातले सांगायचे कदाचित
राहुन गेले असेनही
पण डोळ्यातले भाव माझ्या
तु वाचले नाहीस ना

हात तुझा हातात घेऊन
तुला थांबवायचे होते ही
पण तु जाताना तुझा हात
मी सोडला नाही ना

सांग प्रिये दुर तु असताना
तुला भेटायचे राहिले असेनही
पण जवळ तु असताना माझा मी
माझ्यातच राहिलो नाही ना

अबोल राहून प्रेम करताना
मन हे तुला बोलले असेनही
पण कधी ते तुझेच नाव घेताना
तु ऐकले नाहीस ना

हे प्रेम मनातील माझ्या
तुझ्यासाठीच फक्त होते
पण तुला ते सखे कधी
कळलेच नाही ना
-योगेश खजानदार




रात्र ती..!!

"माझ्यासवे रात्र आज ती
का उगाच जागते
कोण तुज सतावते मनी
का मज ती पुसते

आठवणींच्या कट्ट्यावर ती
रोज मला येऊन भेटते
मनात कोण माझ्या
का डोकावून पहाते

डोळ्यातल्या अश्रूंसही ती
आज माझ्या बोलते
ह्रदयातील त्यास कुठेतरी
पापण्यां मध्ये शोधते

कसे सांगु रात्रीस त्या
आठवणीत कोण असते
कोणाची सावली आज
मनात माझ्या पडते

चांदणे मोजता कीती ते
मनात त्याची साथ असते
प्रत्येक चांदण्यात आता मी
अनोळखी त्यास पहाते

रात्र ती गोंधळून गेली
उगाच का ती जागते
माझ्या मनातील सावलीस
स्वतःच्या सावल्यांत शोधते. ..!!"

वेडी प्रित.. !!

आठवणींचा समुद्र आहे जणु
तु सतत लाट होऊन का यावीस
कधी मन ओल करुन माझे
तु पुन्हा का परतावी

वार्‍यासवे कधी वाहताना
मी तुझी वाट त्यास सांगावी
ती प्रत्येक झुळुक तेव्हा
तुझा भास होऊन का यावी

कधी त्या रात्रीस उगाच मी
तुझी वेडी आस का लावावी
तुला भेटण्यास तेव्हा त्या
चंद्राने ही वाट का पहावी

तुला शोधण्यास आज ती
वेडी रात्र का निघावी
तुझ्या सावल्यांची तेव्हा ती
उगाच खुण का शोधावी

सांग सखे का असे ही
वेडी प्रित मी जपावी
तु नसताना या मनाची
कोणी समजुत घालावी
-योगेश खजानदार






एक तु...

त्या वार्‍यानेही तुला छळावे
सतत तुझे केस उडावे
तु त्यास पुन्हा सावरावे
तरी तो ऐकत नाही ना

बघुन एकदा तुला जावे
पुन्हा पुन्हा परतुन यावे
तरी त्या पानांस आज
करमत नाही ना

सांग सखे फुलास आज तु
हसले का ते बघ नीट तु
समोर तु येताच त्याच्या
ते प्रेमात तर पडले नाही ना

कसे हे घुटमळने फुलपाखराचे
सतत वेड तुला पाहण्याचे
तुझ्या जवळ येऊन ते
काही बोलले तर नाही ना

ही सांजवेळ बघते काय ती
ही मावळती लाजते का ती
थांबलेल्या त्या क्षणात आज
ती तुला साठवत तर नाही ना

तुलाच पाहुन हसताना ती
तुझ्याच जवळ असताना ती
माझ्याच मिठीत तुला पाहुन
ती रात्र झोपली तर नाही ना..
-योगेश खजानदार















ओळखुन बघ..

बाजार होतो ह्या शरीराचा
पण कधी मनाचाही करुन बघ
कोणी घेईल का दुखः तुझ
एकदा स्वतःलाच विचारुन बघ

वासनेची ही दुनिया सारी
थोडं तिला ओळखुन बघ
तोडतील लचके हे लांडगे ही
अश्रु थोडे पुसुन बघ

आपलं अस कोणी आहे
एकदा तु विचारुन बघं
मनातल्या भावना कधी एकदा
आपल्यास कोणा सांगुन बघ

राहिलंय काय शेवटी इथे
शरीरातल मन एकदा तु बघ
वासनेच्या बाहेर येऊन कधी
नातं एकदा जोडुन बघ

दिसत ते जग नसतं इथे
हेच जरा आठवुन बघ
आपलं अस म्हणताना कोणी
जवळ का येते तु ओळखुन बघ
- योगेश खजानदार

मन आणि मी

सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे का?.. मन का सारख काहीतरी विचार करतं.. आणि काहीच न सापडल्यावर उदास होऊन गप्प बसतं.. असंख्य विचारांच हे वादळ आता का कुठे थांबत नाही? ?. की विचार करुच नये आणि त्यावेळी मनाने अजुन असंख्य विचाराच गाठोडं समोर उघडून बसावं.. काहीच कळेनासं झालंय.. मनातल्या कोपर्‍यात कोणीतरी सतत का आठवावं .. विसरुन जावं त्यास म्हटलं तरी त्याने पुन्हा पुन्हा समोर का यावं ... असा गोंधळ झालाय सगळा म्हटलं तरी मन कोणाची तरी खुप आठवणं काढतंय अस सांगावं.. की सांगुच नये कोणास.. मग मनाच वादळ थांबेल तरी कस .. असा प्रश्न येतो.. मी आणि माझ मन म्हटलं तरी हे तिसर कोण येतं आमच्या मध्ये... आमच्या गप्पा मध्ये ही तिसरी कोण जिचा विषय हे मन सारखं काढतंय..  . गप्प बस रे मना.. म्हटलं तर त्याने पुन्हा पुन्हा तेच बोलावं.. समोरची व्यक्ती गप्प बसतवता येते.. पण या मनाच काय करावं.. फक्त आठवणं.. पण असं म्हणतात की आपल्याला ज्या व्यक्तीची आठवणं सारखी येते ती व्यक्तीही आपली तेवढीच आठवणं काढत असते.. खरंच अस असत का ??.. की फक्त मनाचे खेळ सगळे हे.. नकोच तो विचार पुन्हा आता.. नको रे मना .. तुलाही सहन होतं नाही आणि मलाही.. जाऊ दे तो विषय .. मग मन बंड करून उठावं.. हातात लेखणी घेऊन स्वतःस पानांवर उतरावं. . तरीही शांत झालं तर ठीक हे मन नाहीतरी पुन्हा मला छळत रहावं.. खरंच मनाचा ठाव शोधता येईल का??.. ..
-योगेश खजानदार...

बाबांची परी

बाबा म्हणारी ती राजकुमारी
एवढी लवकर का मोठी व्हावी
तिच्या आयुष्यात राजकुमार यावा
आणि या राजाची झोप का उडावी

कधीतरी जायचंच होतं तिला
ती वेळही आज लवकर का यावी
तिच्या सवे घालवलेल्या क्षणांची
तिने त्यास एक भेटच आणुन द्यावी

थांब रे राजकुमारा थोड
राजाची ही विनंती तु ऐकावी
राजकुमारीच्या या बाबांची आज
मनाची घालमेल का व्हावी

ही गोड परी आठवणीत माझ्या
स्वप्नातल्या घरात आज का रहावी
तुझ्या सवे जाताना तिची
पाऊले बाबांनाकडे आज का वळावी

लहान होऊन राजकुमारी ही आता
राजास या मिठी का मारावी
बाबा बाबा म्हणताना आता
ती पुन्हा का लहान होऊन जावी

राजकुमार घेऊन गेला परीस त्या
आठवणीत ती राजाच्या सतत का रहावी
आणि बाबा म्हणारी ती राजकुमारी
एवढी लवकर मोठी का व्हावी..  !!!
-योगेश खजानदार




आठवणं...

इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच
की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची
नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी
की रुतून जावी पाऊले ही मनाची

कधी आठवतो तो चंद्र पोर्णिमेचा लख्ख
की उजाळुन टाकतो घरे ही स्वप्नांची
कधी असतो नुसता अंधार जणु
की न दिसावी आपुली माणसे ही जवळची

डोळ्यातील हे अश्रूंही ओळखतात त्यांना
की कथा काहीसी जुन्या क्षणांची
ओठांवरचं हसु ही शोधत का जणु
ती आनंदाची पर्वणी होती आपुल्यांची

एक एक येते आता पुन्हा पुन्हा का तरी
की व्यापुन टाकते जागा या जीवनाची
एकटे बसुन ही कधी कधी बोलते जणु
की साथ देते माझ्या एकांताची

अखेर केला हिशोब या जगण्याचा जेव्हा
की एक ओढ होती काय मिळाल्याची
मनाच्या पेटीत ओझे होते आठवणींचे
की आयुष्यभर सोबत होती फक्त त्यांची
- योगेश खजानदार





Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...