तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते. 



प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत असतो. मुळात त्यात चूक असे काहीच नाही. पण त्या विचारांना त्या तत्वांना आपल्या विचारांनी पाहण्याची आपली स्वतः ची बाजू मांडण्याची ताकत ज्या व्यक्तीत असते तो खरा तत्वनिष्ठ असतो असे मला वाटते. यामध्ये सखोल विचार करून पाहिले तर असे जाणवून येते की एखाद्या व्यक्तीच्या तत्वांना पाहताना आपण आपले अस्तित्व विसरता कामा नये याला म्हणावे आपल्या विचारां सोबत जगणे.



मुळात यामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा आहे की आपल्या आयुष्यात नक्कीच आपल्याला कोणी ना कोणी व्यक्ती, गुरु अथवा मार्गदर्शक आवश्य आहे. तो नकळत आपल्याला भेटतो ही. आणि ते हवेच असते. कारण योग्य मार्ग दाखवणार जीवनात हवाच. पण यावेळी आपण स्वत्वाला विसरून फक्त त्याच्याच विचारांवर चालणे याला आंधळे विचार असे म्हणता येईल. कारण आपण ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी अनेक प्रसिद्ध लेखकांचे विचार , त्यांचे नियम , त्यांची तत्व वाचतो. त्यांच नकळत अनुकरण ही करतो. पण त्यातून प्रेरणा घेऊन आपले स्वत्व जो जपतो. आपले प्रखर विचार निर्भिड मांडतो. तोच पुढे नेतृत्वाची क्षमता ठेवतो अस मला वयक्तिक वाटत. असो पण यामध्ये आपल्या विचारात जर काहीच वेगळं मत येत असेल तर त्याला हसून जो स्वीकारतो जर ते योग्य असेल तर त्यात बदल करतो तो पुढे आपल्या विचारांची पेरणी नव तरुणाईत करतो हेही तितकेच खरे आहे. 


माणूस शेवटी शिकतो ते आपल्या अनुभवातून आणि त्याला योग्य मार्ग दाखवणारे त्याच्या तत्वांना फुंकर घालणारे योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याला चूक दाखवणारे खरे व्यक्ती आपल्या सोबत असावे ही खरी मोठी बाब आहे. कारण स्वामी विवेकानंद हेही रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. पण पुढे त्यांनी आपल्या विचारांनी आपल्यातील स्वस्त्व जागृत करून नव्या तत्वांची नव्या विचारांची पेरणी केली. म्हणजे काय तर माणसाने व्यक्तिनिष्ठ असावे पण अश्या व्यक्तीस की त्यांच्या सोबतीने माणूस तत्वनिष्ठ होईल. खरतर यामध्ये आपण खूप गुरु शिष्यांची उदाहरणे घेऊ शकतो जिथे गुरूने आपल्या शिष्यास त्यांच्या स्वत्वाची जाणीव करून दिली आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना तत्वनिष्ठ बनवले. आणि तेही पुढे येणाऱ्या व्यक्तिनिष्ठ लोकांना मार्ग सांगणारे त्यांच्यातील तत्वांना जागृत करणारे बनले. 



विचारांचा डोंगर ज्यावेळी उभा राहिला तेव्हा मला एक गोष्ट नक्की जाणवली. की जेव्हा मी या विचारांचा डोंगर रचत होतो तेव्हा तत्व आणि व्यक्ती दोघेही सोबतच वर चढत होते. यामध्ये कोणीच कुठे थांबले नाही. जिंकले ते दोघेही , कारण विचारांशी झुंजत असताना असे जाणवले की व्यक्ती हा कुठे ना कुठे व्यक्तिनिष्ठ असतोच आणि तो जिथे आपल्या तत्वाने चालतो तिथे तो तत्वनिष्ठ होतो फक्त गल्लत  ती अशी होऊ नये की व्यक्तिनिष्ठ होताना आपल्या तत्त्वाना विसरू नये आणि आपल्या तत्वांनी चालताना व्यक्तिनिष्ठ गुरुजनांचा आदर , त्यांचे विचार कधी विसरू नये. हेच खरे मार्ग आपल्याला आपले स्वत्व मिळण्याचे प्रमाण. 


✍🏼 योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...