बंगला नंबर २२ || कथा भाग ३ || डिनर || मराठी हॉरर गोष्ट ||



भाग ३ || डिनर ||

सकाळी ऑफीसला जायची वेळ होताच. श्याम मेन डोअर बेल वाजवतो श्रीधर धावतच दरवाजा उघडतो. समोर पहातो तर श्याम बरोबर अजून कोणीतरी स्त्री होती. श्रीधर तिच्याकडे पाहतो. पुन्हा श्यामकडे पाहत म्हणतो.

"किती उशीर रे !! आणि ही कोण??"
"ही बायको माझी !! काल ताईसाहेब आल्या ना !! म्हणून आजपासून आली. "
"आजपासून म्हणजे ??"
"अहो कामाला !!"
"आता हे कधी ठरलं ??"
"जगतापना माहीत होत !! त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला?? दोन दिवस तुम्ही एकटेच होतात म्हणून मी एकटाच येत होतो !! "
"तू ये आत !! तुला सांगतो !! सगळं लपवून ठेवतो माझ्यापासून !" श्रीधर श्यामकडे पाहत म्हणाला. 
"आता काय लपवलं मी ??"
"तू जा हा आत !!" श्यामच्या बायकोकडे पहात श्रीधर म्हणाला. 
ती आत निघून जाताच. श्रीधर श्यामला म्हणाला. 
"माझी बायको इथे आली आहे हे का सांगितलं नाहीस मला ??" 
"ते होय !! ते त्यांचं काहीतरी प्राइज होत ना म्हणून !!" 
"बरं !! ठीक आहे !!" 
श्रीधर श्यामकडे पाहत आत निघून गेला. 

श्यामची बायको हळूच किचन मध्ये जाते. प्रिया तिथे काहीतरी करत होती. तिला पाहून ती लगेच म्हणाली.
"ताईसाहेब !! द्या इकडे !! तुम्ही कशाला करताय !! मी आले ना !!"
" हो !! पण तू आहेस तरी कोण ??"
"मी श्यामची बायको !! नंदा !!"
"अच्छा !! श्यामची बायको का !! आणि तो कुठे मग ??"
"आहे ना !! आलाय !! साहेबांन सोबत काहीतरी गुपचूप बडबड चालू आहे !!"
"आ !! गुपचूप !" प्रिया आश्चर्याने पाहत म्हणाली. 

तेवढ्यात मागून श्रीधर येतो. प्रियाकडे पाहत म्हणतो. 
"पटकन जेवायला द्या !! म्हणजे मी ऑफीसला निघतो !! परत तुमचं काय चालू राहू द्या गप्पा!!"
"आमच्या गप्पा ?? आणि मग तुमच्या काय चालू होत्या बाहेर गुपचूप ??"
"गुपचूप ?? "
"हो !!" 
"कुठं काय ?? काही नाही !! असच जरा श्यामकडून माहिती घेत होतो.!! इथे कुठे जवळ फिरायला बाग आहे का ?? मॉल आहे का ??"
"व्हा !! मग आहे का ??"
"हो आहे ना !! इथून जवळच एक मॉल आहे !! संध्याकाळी आपण तिथेच जाऊयात फिरायला !! आणि येताना मस्त डिनर पण करून येऊयात !!" 
"अरे व्हा !! कधी नव्हें ते डिनर!! "
"हो !! " श्रीधर प्रियाकडे मिश्किल हसत म्हणाला. 

नंदा या गडबडीत स्वयंपाक करत होती. पोळ्या झाल्या की तीने प्रियाला सांगितलं. प्रियाने पटपट श्रीधरला जेवायला वाढलं. श्रीधर जेवण करून ऑफिसला निघाला. जाताना प्रियाला संध्याकाळी लवकर आवरून ठेवायला सांगितलं. समोर जगताप गाडी घेऊन तयारच होते.

"काय जगताप !! आपण केव्हा येऊन थांबलात !! "
"हे काय आताच आलोय !!"
"मला उशीर नाहीना झाला??" 
"नाही नाही!! "
श्रीधर आणि जगताप गप्पा मारत ऑफिस मध्ये पोहचले. घरी प्रिया नंदा सोबत गप्पा मारत घर आवरू लागली.

"ताईसाहेब संध्याकाळी तेवढं लवकर जाईल बघा मी !! "
"का ग ??"
"तस काही नाही !! पण पोर वाट बघत बसली असतात म्हणून !!" नंदा थोड चाचरतच म्हणाली. 
तेवढयात श्याम किचन बाहेरून बोलला. 
"ताईसाहेब वरच्या बेडरूम पण घेऊ का साफ करून ?? "
"हो घे !! आणि सायली झोपली असेल तर जास्त आवाज नकोस करू !! रात्रभर तिला नीट झोप लागली नाहीये !! सारखी दचकून उठत होती !!"
"दचकून ??" श्याम नंदाकडे पाहत म्हणाला. 
"होरे !! तिला नवीन जागेत लवकर झोप लागतच नाही !! "

श्याम मान डोलवत निघून गेला. वरच्या सगळ्या बेडरूम पुसून घेऊ लागला. सायलीच्या खोलीत येताच तो मोठ्याने ओरडला. समोर त्याला सायली दिसली. पण अगदी विचित्र रुपात. ती भिंतीकडे तोंड करून कोपऱ्यात उभी होती. श्यामचा आवाज ऐकून नंदा आणि प्रिया दोघेही वर पळत आले. 
"काय झालं !! ये झालं काय ??" नंदा श्यामकडे पाहत म्हणाली. 
श्यामने नंदाला कोपऱ्यात बोट करून दाखवले. सायली कोपऱ्यात उभी होती. तिला पाहून प्रिया आत आली आणि म्हणाली. 
"काय करावं या पोरीला काही कळत नाही !! कधी जाणार हीची झोपेत चालायची सवय कोणास ठाऊक !!" 
"सायलीला झोपेत चालायची सवय आहे ??"
" होना नंदा !! मुंबई मध्ये सुद्धा अशीच करते !! म्हणून तर फ्लॅटच्या सगळ्या डोअरला रात्री मी लॉक करून झोपते!! "
"एवढं काय झालं मग ओरडायला !! " नंदा श्यामवर खेकसत बोलली. 

श्याम काहीच न बोलता आपल्या कामाला निघून गेला. प्रियाने सायलीला पुन्हा बेडवर झोपवलं. झोपवताना तिला लक्षात आल. 
"सायलीला तर ताप आलाय !! " नंदाकडे पाहत ती म्हणाली. 
"बघू !!" नंदा डोक्यावर हात ठेवत पाहू लागली. 
"सायली !! ये सायली बाळ !! उठ आता !!" प्रिया तिला उठवू लागली. 

खूप वेळ हाक दिल्यानंतर सायली झोपेतुन जागी झाली.  आईकडे पाहून रडू लागली. 
"आई !! " 
"काही नाही झालं बाळ !मी आहे ना जवळ !!" सायलीला मिठीत घेत प्रिया खोलीतून बाहेर आली. 

नंदा तिच्या मागे मागे आली. प्रिया हातात मोबाईल घेत श्रीधरला फोन लावणार तेवढ्यात नंदा म्हणली.
"ताईसाहेब आपल्या मेन रोडला एक दवाखाना आहे तिथे घेऊन जाऊयात का सायलीला ?"
"हो चालेल चल !! " लावलेला फोन कट करत प्रिया लगबगीने निघाली.

श्रीधर ऑफिस मध्ये आपल्या कामात व्यस्त झाला होता. आज प्रिया इकडे आली यामुळे निर्धास्त होता. आपल्या केबिन मध्ये बसून कामाविषयी चर्चा करत बसला होता. 
"बाकी आपल्या प्रॉडक्ट विषयी जेवढे चांगले फीडबॅक येतील ते पाहा !! आणि कस्टमर काही नवीन सुचवत असतील तर त्याचीही नोंद करून घ्या !!"
"आपले हे प्रॉडक्ट सर मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त विकले जाते !! पण सीईओ साहेबांच्या मते प्रॉफिट म्हणावे तसे मिळत नाही !!" कोणी एक ऑफिसर बोलतं होता. 
"मग याविषयी सुद्धा आपल्याला विचार करावाच लागेल नाही का ?? " 
" हो नक्की !! "
तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडत जगताप आतमध्ये येतात आणि म्हणतात,
"जोशी साहेब सीईओ साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं आहे !! " 
"मला ??" 
"हो !!" जगताप एवढं बोलून आपल्या कामाला निघून गेले. 
श्रीधर मनात विचार करत केबीनकडे निघाला. कशासाठी बोलावले असेल , का ?? माझं काही चुकलं तर नाहीना !! या विचारात तो केबिन समोर येतो.  केबिनमध्ये पाहत येण्याची परवानगी मागतो. 

"येस जोशी ! या !! " 
"मला बोलावलं ते कळलं ! म्हणून लगेच आलो !! "
"हो मीच बोलावलं आहे !! "
"का साहेब ??काही चुकलं  का ??"
"अरे काही चुकलं म्हणून नाही बोलावलं !! तू इकडे आलास ! ऑफिसमध्ये नवीन आलास इथल्या !! म्हणून विचारपूस करावी म्हणून बोलावलं !! "
"ओ !! ऑफिसमध्ये आता जवळ जवळ सगळ्यांशी ओळख झाली माझी !!"
"गुड !! बायको मुलगी आले ना राहायला इथे ??"
"हो !! कालच आले !! "
"यायला काही त्रास नाहीना झाला त्यांना !! "
"नाही साहेब !! ॲक्च्युली ते आलेले मला काल घरी गेल्यावर कळलं !! सरप्राइज दिलं मला त्यांनी !!"
"गुड ! ! आजचा काही प्लॅन मग ?"
"आज संध्याकाळी मॉलमध्ये फिरायला जाव म्हटलं होत !! बंगल्या जवळ आहे म्हणे तिथे !! "
"हो !! आहे जवळ !! मी नेहमी जायचो तिथे !!" देशमुख मध्येच म्हणाले.
"तुम्ही ?? "
"हो !! मी जायचो नेहमी !! बरं ते जाऊदे आज इविनिंगला या मग डिनरला आमच्या घरी सगळे !! तुझ्या बंगल्यापासून अगदी पंधरा मिनिटांवर आहे माझं घर !!" 
"आज ??"
"हो !! त्या निमित्ताने घरच्याची सुद्धा ओळख होईल नाही का ??"
श्रीधर थोडा वेळ शांत राहतो आणि म्हणतो.
"ठीक आहे साहेब !! येतो नक्की !! पत्ता मी जगतापांनकडून घेईन !! येऊ मी !! "

केबिन मधुन बाहेर पडत त्याने प्रियाला फोन लावला. तिला संध्याकाळी डिनरला जायचं हे त्याला सांगायचं होत. फोन वाजताच प्रियाने फोन थोडा उशिराच उचलला. 
"हॅलो प्रिया !"
"बोलना श्रीधर !"
"कुठे आहेस तू ?? आणि फोन उचलायला एवढा वेळ का लावलास ??"
"अरे मी सायलीला घेऊन इथे जवळ दवाखान्यात आली आहे !!"
"दवाखान्यात ? का काय झालं ?? आणि एकटीच कशी काय गेलीस ??"
"अरे हो हो !! एकटी नाहीये नंदा आहे माझ्या सोबत !! श्यामची बायको !! " प्रिया श्रीधरला शांत करत म्हणाली. 
"झालंय काय पण तिला ?? " श्रीधरची चिंता वाढू लागली होती. 
"थोडा ताप आलाय तिला !! बरं तू का फोन केला होतास ते तरी सांग !!"
"ते मी ! मी हे सांगायला फोन केला होता की आज आपल्याला आमचे कंपनीच्या साहेबांनी डिनरसाठी बोलावलं होत."
"अश्या परिस्थितीत डिनर ?? " प्रिया.
"पण आता मी त्यांना येतो म्हणून आलोय !! आता काय करू ?? "
"आता काहीच बोलू नकोस !! संध्याकाळी पाहुयात ! जास्तच वाटलं तर ठरवूया काय करायचं ते !! "
"ऐनवेळी परत नाही गेलो तर राग यायचं त्यांना !!" श्रीधर आपल्या केबिनमध्ये येत म्हणाला. 
"श्रीधर सध्यातरी मला काही सुचत नाहीये बघ ! मी आधी डॉक्टरांना भेटते आणि मग बोलते तुला. "

प्रिया फोन ठेवून नंदा सोबत डॉक्टरांना भेटते. 
"डॉक्टर कशामुळे ताप आला तिला ?"
"व्हायरल आहे !! काळजी करू नका !! एक दोन दिवसात कमी होईल ताप !! " डॉक्टर प्रिस्क्रीप्शन लिहून प्रियाकडे देत म्हणाले.
"जेवायला संध्याकाळी काय देऊ तिला ??"
"साध वरण भात द्या !! आणि मी दिलेल्या गोळ्या त्यावर लिहून दिल्या आहेत तश्या देत रहा ! बाकी काळजी करण्या सारखं काही नाही !!"

डॉक्टरांनी असे म्हणता प्रियाच निम्मं टेन्शन कमी झालं होत. सायली तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. त्या तिघीही थोड्या वेळाने बंगल्यावर आल्या. सायली पुन्हा बेडवर जाऊन झोपली. प्रिया हॉलमध्ये बसून संध्याकाळी श्रीधरच्या बॉसकडे डिनरला जाव की नको याचा विचार करत होती.

सगळ्या या गोष्टीत संध्याकाळ केव्हा झाली कोणालाच कळलं नाही. प्रियाला तर काही दुसरं सुचतच नव्हत. ती सतत सायली जवळ जाऊन तिची विचारपूस करायची. खोलीत गेल्यावर तिच्या बेडजवळ बसून राहायची.
" आई !! संध्याकाळी तू आणि बाबा जा डिनरला! मी आता ठीक आहे !!"
"तुला कोणी सांगितलं डिनर बद्दल ??"
"मघाशी बाबांसोबत बोलत होतीस तेव्हा कळलं मला !!"
"पण तुला सोडून पाय निघायचा नाही बाळा माझा !!"
प्रिया सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. 
"मला काही झालं नाहीये !! " सायली हळू आवजात म्हणाली. 
तेवढ्यात नंदा बेडरूम मध्ये आली. 

"ताईसाहेब मी निघते आता !! "
"ये नंदा ! थांब ना !! मी तासाभरात बाहेर जाऊन येते साहेबान सोबत !! तू सायली जवळ थांबशील प्लिज ??"
"नाही ताईसाहेब !! संध्याकाळ होत आली मला जाव लागेल !! "
"खरतर मला जायची आजिबात इच्छा नाहीये पण टाळता येत नाहीये म्हणून !! आम्ही लवकरात लवकर येऊ !!" 
"ठीक आहे !! पण लवकर या हा !! " नंदा नाईलाजाने बोलली.

नंदा सायली सोबत थांबायला तयार झाली की प्रिया लवकर लवकर आवरू लागली. तिने श्रीधरला पण सांगितलं. श्रीधर लवकर घरी आला. सायली सोबत काही वेळ बसला. तिची विचारपूस केली. आणि प्रियासोबत तो साहेबांकडे डिनरला गेला. जगताप यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहचताच तो बघतच राहिला. देशमुख साहेबांचा बंगला म्हणजे जणू राजमहालच होता. बंगल्यात आतमध्ये गेल्यावर मेन डोअर बेल वाजवून ते दोघे दरवाजा उघडण्याची वाट पहात थांबले. थोडया वेळाने दरवाजा उघडला असता समोर साहेबांनी श्रीधर आणि त्याची बायको बघून त्यांना आत यायचा आग्रह केला,
"अरे श्रीधर !!  ये ये !! " 
श्रीधर आत आला. प्रिया मागेच थांबते. क्षणभर देशमुख साहेब प्रियाकडे पाहतात. अडखळत बोलतात. 
"ये ना !! "
श्रीधर आणि प्रिया घरात येतात. त्या घरात ते पहातच राहतात इतकं ते घर सुंदर होत. दोघे हॉलमध्ये बसतात. थोड्या वेळाने तिथे देशमुखांच्या पत्नी येतात. देशमुख त्यांची ओळख करून देतात. त्यांना पाहून श्रीधर आणि प्रिया त्यांच्याकडे पाहत राहतात. कारण त्या देशमुख साहेबांपेक्षा वयाने खूप मोठ्या वाटत होत्या. 
"कधी आलात ??" थरथरत्या आवाजात त्या विचारतात.
"आताच आलोत !! "
"वाह छान !! इथलं वातावरण मानवल ना ?? "
"हो !! तस तर मुंबई आणि पुण्यात फारसा फरक वाटत नाही!!" प्रिया मध्येच म्हणाली.
"हो तेही आहे म्हणा !! " 
देशमुख साहेब लांब बसून फक्त एकटक पाहत होते. 
"चला डायनिंग टेबलवर बसुयात !! सगळी तयारी झाली आहे !! " देशमुखांच्या पत्नी जागेवरून उठत म्हणाल्या.

चौघे डायनिंग टेबलवर बसतात. मनसोक्त गप्पा मारत मारत जेवण करतात. पण या सगळ्यात प्रियाला देशमुख साहेबांची नजर सतत तिच्या स्तनावरुन सगळया शरीरावर फिरते आहे असे वाटत होत. त्यामुळे ती थोडी अन्कम्फर्टेबल होत होती. यासगळ्या गोष्टीत तिच्या मनात सतत  सायलीचा विचार येत होता. पटपट जेवण करून कधी एकदा तिथून निघते आहे अस तिला झालं होत. प्रत्येक घास तिला जड झाला होता. पण काही केल्या देशमुखांची पत्नी तिला सोडत नव्हत्या. शेवटी रात्री उशिरा दोघे घरी यायला निघाले. रस्त्यात प्रिया श्रीधरला म्हणाली,

"श्रीधर !! मला देशमुखांची नजर थोडी वाईट वाटली !! सारखं ते मलाच एकटक बघत होते अस मला वाटतं होत !! "
"नाही ग ! त्यांना तशीच सवय आहे पहायची !!  ऑफिसमध्ये पण त्यांचं असच चालू असतं !!"

श्रीधर आणि प्रिया दोघेही रिक्षाने घरी येतात. खूप उशीर झाला होता त्यामुळे दोघेही पटकन घरी पोहचतात. घरात पाहतात तर सगळ्या लाइट्स बंद होत्या. मेन डोअर मधुन आत जाताच समोर नंदा त्यांना काहीतरी शोधते आहे हे दिसलं. त्या दोघांना अचानक समोर पाहून ती जवळजवळ किंचाळलीच. त्यांच्याकडे पहातच ती घाबरत म्हणाली. 
"साहेब !! लवकर लवकर !!" मध्येच ती थांबली.
"काय झालं ?? नंदा ?? शुध्दीवर ये !! काय झालंय ??" प्रिया तिला मोठमोठ्याने विचारू लागली.
"ताईसाहेब !! सायली कुठे सापडत नाहीये !! "
"काय ??" श्रीधर असे म्हणून पटकन सायलीच्या खोलीत पळाला. पाहतो तर तिथे सायली नव्हती. 

सगळ्या बंगल्यात सायलीला हाक मारत ते दोघे शोधू लागले. नंदा धावत बंगल्यातून बाहेर गेली. 
"सायली !! कुठे आहेस तू ??" श्रीधर मोठ्याने तिला हाक मारू लागला. 

प्रिया तर रडकुंडीला आली. सगळीकडे सायली सायली म्हणत पळत सुटली. 
"श्रीधर ! सायली कुठेच दिसत नाही रे !! कुठे गेली ती !! त्या नंदाने तर काही केलं नाहीना माझ्या सायलीला !!"
"काहीही काय म्हणतेस!! असेल इथेच कुठेतरी शोधुयात थांब !!"
असे म्हणताच मागून त्यांच्या पैंजनाचा आवाज आला. दोघेही त्या दिशेने धावत गेले. सायलीला हाक मारू लागले. पुन्हा पायऱ्यांवरून पैंजनचा आवाज आला. दोघे पुन्हा सायलीच्या शोधात त्या आवाजाच्या मागे पळाले. पळत पळत सायलीच्या खोलीत आले. पाहतात तर काय सायली कोपऱ्यात पुन्हा उभा होती. मोठ मोठ्याने रडू लागली. पण त्या रडण्याचा आवाज विचित्र होता. 
"आई !! आई !! " 
"सायली !! काय झालं तुला!" 
"ये बाळा इकडे ये !" प्रिया तिच्या जवळ जाताच. ती पळून लांब गेली. अचानक खाली बसली. डोळे वटारून दोघांकडे पाहू लागली. 
"नाही !! नाही !! " 
"काय नाही बाळा !" श्रीधर तिच्या पुन्हा जवळ जात म्हणाला. तशी ती लांब जाऊ लागली. 
"नाही !! एकदा म्हटलं ना नाही म्हणून !! लांब हो!! लांब हो !! " सायली विचित्र ओरडू लागली.
"बरं बर ! नाही येत जवळ मी !! " श्रीधर तिथेच उभा राहत म्हणाला.
सायलीची अशी अवस्था पाहून प्रिया रडू लागली. कित्येक वेळ ती तिला जवळ येण्यासाठी मनवू लागली. पण सायलीच हे वागणं पाहून ती अजून खचून चालली . शेवटी श्रीधरने तिला खोलीतून बाहेर जायला सांगितलं. कित्येक वेळ तो तसाच सायलीच्या समोर बसून होता. 
"बाळा ! असं का करतेस तू !! तुला बर नाही ना !! आई बघ बर तुझी वाट पाहतेय बाहेर !!" श्रीधर असे बोलताच सायली शांत झाली. तिच्या वागण्यात क्षणात बदल झाला. ती श्रीधरला जणू आताच समोर पाहिलं असे मीठी मारू लागली. दोघेही थोडया वेळाने खोलीतून बाहेर आले. प्रियाला तिच्याकडे पाहून रडूच आल. कसबस स्वतःला सावरत तिने सायलीला मीठी मारली. 
"बाळा !! ताप वाढलाय तुझा !! " तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रिया म्हणाली. 

नंतर खूप वेळ सायली प्रियाच्या मिठीत झोपली. श्रीधर आणि प्रिया रात्रभर तिच्या बेडजवळ बसून राहिले. सायलीच्या या वागण्याचं राहून राहून प्रियाला आश्र्चर्य वाटू लागलं होत. कारण ती कधीच एवढी अग्ग्रेसिव वागली नव्हती. तिने मनातली ही शंका श्रीधरला बोलूनही दाखवली,
"तुला आजच सायलीच वागणं थोड विचित्र वाटलं नाही ??" प्रिया श्रीधरकडे पाहत म्हणाली. 
"आजारी आहे ती !! त्यामुळे तिला असा त्रास झाला असावा !! एक दोन दिवसात होईल बरी ती !! नकोस जास्त काळजी करू !!" श्रीधर तिचा हात हातात घेत म्हणाला. 

रात्रभर सायली श्रीधरच्या खांद्यावर डोकं ठेवून होती. दोघेही सायली जवळच बसून होते. 

क्रमशः



बंगला नंबर २२ || कथा भाग २ || सरप्राइज || मराठी भयकथा ||



भाग २ || सरप्राइज ||

धावत धावत तो मागच्या दरवाजात येतो. ते मूल पुन्हा पळून जात.
"काय वैताग दिलाय या पोराने ! कोणाचं आहे काही माहीत नाही !!" श्रीधर दरवाजा बंद करत म्हणतो. 

खिडकीतून बाहेर पाहतो तर त्याला कोणच दिसत नाही. हॉलमध्ये येतो नी टीव्ही चालू करून पाहत बसतो. कित्येक वेळ टीव्ही पाहून झाल्यावर. एकटाच बसून तो जेवण करतो. त्यावेळी तो प्रियाला फोन लावतो. 

"काही नाही ग!! पुण्यापासून थोड बाहेर आहे एवढंच !! तुला मी पत्ता पाठवला होता ना !! "
"हो रे !! पाठवला आहेस तू !!"
"बरं ऐक ना !! याना तुम्ही लवकर इथे !! मला ना आता खूप बोर व्हायला लागलंय !!"
"होका !! एका दिवसात बोर झालास !! "
"तुझ्याशिवाय एक दिवसही करमत नाही माहितेय ना तुला !! "
"होका !! मग कशाला गेलास एवढ्या लवकर !! म्हणाले होते ना मी आपण मिळूनच जाऊया ते !!" 
"तुमचीच गैरसोय होऊ नये म्हणून आलो ना आधी !! सगळा बंगला आवरला !! मस्त टापटीप करून ठेवला !! म्हटलं आल्यावर मॅडम साहेबांना काही त्रास नको !!" श्रीधर हसत म्हणाला.
"बरं बरं !! कळल हा मला !!" प्रिया हसत म्हणाली.
दोघेही कित्येक वेळ बोलत बसले. तेवढ्यात अंगणातून कोणीतरी रडतंय असं श्रीधरला ऐकू आलं.

"प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! "
"अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! " प्रिया बोलतं राहिली. 

श्रीधर फोन बाजूला ठेवून अंगणात गेला. पाहतो तर झोपाळ्यावर कोणी एक स्त्री रडत होती. तिला पाहून त्याला काय करावं काहीच कळलं नाही. तो क्षणभर तिथेच थांबून राहिला आणि धीर करून त्या स्त्री जवळ गेला. 

"बाई कोण ?? कोण आपण ?? आणि इथे आमच्या बंगल्यात काय करताय ??"
ती काहीच बोलतं नाही. फक्त अंग चोरून त्या झोपाळ्यावर बसून राहते. श्रीधर क्षणभर शांत राहतो आणि पुन्हा बोलतो.
"कोण आहात आपण ?? आणि एवढ्या रात्री इथे कश्या काय ?? "
श्रीधर बोलताच ती स्त्री नजर वर करून श्रीधरकडे पाहते. तिने पहाताच श्रीधर मागे सरकतो. त्याला एक वेगळीच आग त्या नजरेत जाणवते. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जागोजागी रक्त येत असल्याचं त्यानं पाहिलं. आणि तो तिला म्हणाला.

"काय झालंय बाई तुम्हाला..!! तुम्हाला खूप लागलंय !! तुम्हाला कोणी त्रास देतंय का ?? मी पोलिसांना फोन करू का ?? " श्रीधर कित्येक प्रश्न तिला विचारू लागला. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्या अनोळखी शहरात तो एकटाच होता. आणि अचानक त्या अनोळखी बाईमुळे तो अजून गोंधळून गेला होता. 

"पोलिसांना नको !! नको ! ! " ती स्त्री पुन्हा पुन्हा बोलू लागली.
"बरं ठीक आहे !! नाही बोलवत ! तुम्ही शांत व्हा !! "
दोघेही थोडा वेळ शांत बसतात. 
"आपण ??" न रहावुन श्रीधर पुन्हा बोलतो.
"मी माया !! इथेच राहते जवळ !! "
"ओके ! !! पण मग रडतं का होतात आपण ??" 
"माझा मुलगा प्रतीक !! सापडत नाहीये !! कुठे गेला काहीच कळत नाहीये !! त्याला शोधून शोधून थकले !!"
"म्हणजे तो रात्री बंगल्यात अंगणात फिरतो तो तुमचा मुलगा ?"
"हो माझाच आहे !! किती वेळा त्याला सांगितलं पण ऐकायचं नाव नाही !! रात्र पहायची नाही , दिवस माहीत नाही !! नुसतं खेळत असतो !!" माया बोलतं बोलतं सगळीकडे पाहत होती. 
"हो पण रात्री अपरात्री तुम्ही त्याला बाहेर येऊच कसे देता ?"
"त्याला मी अडवणारी कोण !! तो तर मुक्त आहे ना !! माझ्या मायेपोटी इथेतरी जवळ फिरतोय !! नाहीतर केव्हाच निघून गेला असता !"
"खरंय !! आईचं प्रेम लेकरू कुठंही असो पुन्हा तिच्याजवळ खेचून आणत त्याला!! " श्रीधर तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
"चला मी निघते !! पाहते कुठे गेलाय तो! तुम्हाला कुठे दिसला तर त्याला एवढंच म्हणा आई तुझी वाट बघतेय !! " माया झोपाळ्यावरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या हाताला लागलेल पाहून श्रीधर न राहून तिला म्हणतो. 
"तुम्हाला खूप लागलंय !! थांबा बर !! मी फर्स्ट एड किट आणतो !! त्या जखमेवर मलम लावल्यावर बर वाटेल तुम्हाला !!" श्रीधर असे म्हणत आत जातो. धावतच पुन्हा बाहेर येतो. पाहतो तर झोपाळ्यावर कोणीच नव्हतं. 

"गेल्या वाटत !! आईची मायाच तेवढी या जगात ताकदवान आहे, जी मुलाला सुधारू शकते!! आणि त्या मायेपुढे आईलाही दुखलं खुपल तरी काहीही वाटत नाही. " श्रीधर स्वतःलाच बडबडत हॉलमध्ये येतो. 

कित्येक वेळ श्रीधर मायाचा विचार करत बसतो. काही केल्या त्याच्या डोक्यातून तिचा चेहरा जात नव्हता. त्या चेहऱ्यावर त्याला एक वेगळाच राग दिसत होता पण काही क्षणांत एक काळजीही वाटत होती. कदाचित त्या मुलाची असेल असे त्याला वाटू लागले. 

वैतागुन तो रात्री कित्येक वेळ टीव्ही पाहत बसला. टीव्ही पाहत असतानाच त्याला आपल्याकडे वाकून पलिकडच्या खोलीतून कोणीतरी पाहतंय अस वाटू लागलं. तो हळू हळू त्या खोलीकडे जाऊ लागला. त्याला वाटले एवढ्या रात्री चोरपावलांनी बंगल्यात चोर आले असावे. म्हणून तो त्या बाजूने जाऊ लागला. 
"कोण आहे तिथे ??" 
श्रीधर बोलताच त्या खोलीतून पळण्याचा आवाज आला. श्रीधर धावतच तिकडे गेला. तर तिथे त्याला कोणीच दिसलं नाही. तो पुन्हा खोलीतून बाहेर हॉलमध्ये जाताना, अचानक ते मूल त्याच्या समोर आले. 
"हा !! " मोठ्या आवाजात ते ओरडले. 
श्रीधर भिऊन मागे गेला. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही. पण नंतर तो सावरला. समोर पाहतो तर ते मुल त्याच्याकडे पाहून हसत होत. श्रीधर सावरून त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला.
"काय भीती घालतोस रे !! तू प्रतीक ना ??"
ते मूल त्याच्याकडे पाहून फक्त हसत होत. श्रीधर त्याच्या हसण्याकडे पाहत म्हणाला.
"किती आगाव आहेस रे !! कालपासून नुसता गोंधळ घातला आहेस !! मघाशी तुझी आई आली होती तुला शोधत !! " 
आई म्हणताच त्या मुलाचे हसू गेले आणि चेहरा रडकुंडीला आल्या सारखा झाला. श्रीधरला हे लक्षात आलं. आणि तो म्हणाला.
"रडू नकोस !! जा आई तुझी वाट पाहतेय !!" 
श्रीधर असे बोलताच ते मुल वाऱ्याच्या वेगाने पळून गेले. श्रीधर त्याच्याकडे फक्त पाहत राहिला. 

त्यानंतर ते मूल त्याला कुठेच दिसल नाही. तो रात्री उशिरा झोपी गेला.सकाळी उठला ते थेट श्याम कामावर आल्यावरच. 

"काय साहेब !! एवढा वेळ झोपता!! "श्याम किचन मध्ये जात म्हणाला.
श्रीधर समोर लावलेल्या घड्याळात पाहत पटापट आवरायला लागतो. 

"चला चला !! खरंच आज उशीर झाला !! आज ऑफिसचा माझा पहिला दिवस आजच उशीर नको व्हायला !! श्याम पटकन उरक रे !! मी आलोच अंघोळ करून !!" श्रीधर एवढं बोलून पटकन् अंघोळीला पळाला. 
"नका टेन्शन घेऊ साहेब !! दहा मिनिटात जेवणच देतो तुम्हाला !!" श्याम बोलून किचनमध्ये जात असतानाच मेन डोअर बेल वाजते. ती ऐकताच श्याम तिकडे जातो. 
"घाईच्या टायमिंगला कोण आलंय कोणाला माहिती !! " श्याम दरवाजा उघडतो.
समोर दत्तू जगताप याना पाहून म्हणतो. 
"अरे !! जगताप साहेब !! या या !! "
"साहेब उठले का नाही रे ??" 
"आताच उठलेत !! अंघोळीला गेलेत !! येतीलच एवढ्यात आवरून !!" 
"बरं बर ! त्यांना काही कमी जास्त सगळं नीट पाहतोय ना ??"
"काळजी नका करू साहेब !! एकदम मस्त जेवण करून देतोय त्यांना !! काल सगळा बंगला आवरून दिला !! " 
"व्हा छान !! असच काम करत रहा !! " 
जगताप हॉलमध्ये सोफ्यावर बसत म्हणाले. श्याम न रहावुन त्यांना म्हणाला. 
"साहेब ! जोशी साहेबांना  दुसरा बंगला नव्हता का हो ?? इथेच यायचं होत !!"
जगताप असे ऐकताच उठून त्याच्या जवळ येत म्हणाले,
"ये श्याम्या उगाच त्या साहेबांच्या डोक्यात भलतंच काही घालू नकोस बर का !! गपचुप काम करायचं नाहीतर मालकांना सांगून तुझी सुट्टी करून टाकेन !!"
"नाही साहेब !! मी कशाला काय म्हणतोय !! फक्त रात्रीच मी लवकर निघणार एवढं मात्र ध्यानात ठेवा !!"
"काम केल्यावर कधीही निघ !! "

श्याम आणि जगताप यांच बोलणं चालू असतानाच श्रीधर आवरून बाहेर येतो. श्रीधरला पाहून जगताप त्यांच्याकडे पाहून हसत म्हणतात. 
"नमस्कार साहेब !! मी दत्तू जगताप ! आपल्या कंपनीत ऑफिसर म्हणुन कामाला आहे !!मी !! मी काल फोन केला होता आपल्याला !!"
श्रीधर त्यांच्याकडे क्षणभर पाहत राहतो. पन्नाशीचा तो माणूस पाहून श्रीधर त्यांना बोलतो. तेवढयात श्याम किचन मध्ये जातो. 
"हो हो !! आपलं बोलणं झालं होत याआधी !! "
"चला मग !! मी कार घेऊन आलोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी !! "
"ठीक आहे चला !!" श्रीधर जायला निघतो. तेवढ्यात श्याम किचन मधुन बाहेर येत त्याला थांबवतो,
"थांबा साहेब !! जेवण झालंच आहे !! मस्त डब्बा घेऊन जा !!"
"ठीक आहे दे !!" श्रीधर श्यामकडे हसत पाहून बोलला. 

पाच दहा मिनिटे वाट पाहिल्यावर डब्बा घेऊन श्रीधर आणि जगताप दोघंही निघतात. पंधरा ते वीस मिनिटांनी ऑफिसमध्ये पोहचतात. ऑफिसमध्ये पोहचताच जगताप श्रीधर सोबत सर्वांची ओळख करून देतात. 
" साहेब आपल्या ऑफिसमध्ये ऐकून ३५० कर्मचारी आहेत !! हेड ऑफिस मध्ये फक्त !! सर्वांशी ओळख करून देत बसलो तर रात्र इथेच होईल !!" जगताप मिश्किल हसत म्हणाले. आणि दोघेही चालत चालत सीईओ साहेबांच्या केबिन जवळ गेले.  बाहेर बसलेला सेक्युरिटी गार्ड त्यांना पाहून आतमध्ये ते आल्याचे सांगायला जातो. थोडा वेळ लागतो आणि बाहेर येत त्यांना आतमध्ये जाण्यास सांगतो. 

श्रीधर केबिनमध्ये समोर ठेवलेली पारितोषीक पाहत जातो. जगताप त्यांना बसण्याचा इशारा करतात. श्रीधर बसणार तेवढ्यात मागून एक साधारण साठीचा इसम चालत येतो. त्यांना पाहून जगताप उठून उभारतात. श्रीधरही उभा राहतो. 

"बसा !!बसा !! " समोरच्या खुर्चीवर बसत तो म्हणतो. 
"साहेब श्रीधर जोशी !! आपले जनरल मॅनेजर !!"
"येस !! श्रीधर !! यंग मॅन !! वेरी हार्ड वर्किंग !! टॅलेन्टॆड पर्सन !! अस मी नाही तुझे सहकारी म्हणतात !! मी भास्कर देशमुख !! या कंपनीचा फौंडर आणि सीईओ !! "
श्रीधर फक्त त्यांच्याकडे पाहून हसतो. कंपनीच्या मालकांनी त्याची स्तुती केलेली पाहून तो आनंदून जातो.
"हो साहेब !! आपली भेट झाली होती मुंबईला !! मागच्या वर्षी आपल्या कंपनीच्या फॅमिली फंक्शनला आपण आला होतात !! तेव्हा मी ऑफिसर म्हणुन काम करत होतो !! "
"हो का !! ठीक अस आठवत नाही पण आपण पहिले भेटलो आहोत हे ऐकून छान वाटलं !! "
श्रीधर फक्त त्यांच्याकडे पाहून हसतो. 
"राहायची सोय नीट झाली ना ??" 
"हो साहेब !!एकदम मस्त बंगला आहे !! त्यामुळे काही प्रोब्लेम नाही !!"
"गुड !! करा मग सुरुवात कामाला !! "
"हो साहेब !!" 
श्रीधर आणि जगताप खुर्चीवरून उठत बाहेर जाऊ लागले. तेवढ्यात पुन्हा देशमुख म्हणाले.
"जोशी !! पुण्याला एकटच आलात की फॅमिली घेऊन ?"
"सध्यातरी एकटाच आलोय !! बायको आणि मुलगी उद्या किंवा परवा येतील !!" 
"ओके गुड !! बंगला तसा प्रशस्त आहे त्यामुळे आरामात राहाल सगळे !! आणि काही अडचण आली तर जगताप आहेतच !! "
" हो साहेब नक्की !!" श्रीधर साहेबांकडे पाहत हसला. आणि केबिनमधुन बाहेर आला.

सर्वांच्या गाठीभेटी,ओळख करण्यात एवढा वेळ गेला की त्याला संध्याकाळ केव्हा झाली हे कळलंच नाही. कार घेऊन तो ऑफिस संपल्यावर घरी आला. पाहतो तर घराचा दरवाजा उघडाच होता. आतमध्ये सगळ्या लाइट्स चालू होत्या. हॉलमध्ये येऊन पाहतो तर टीव्ही सुद्धा चालू होता. 

"श्याम तर केव्हाच गेला असेल ! मग लाइट्स चालू कश्या !! दरवाजा उघडा कसकाय ?? का हा श्याम सगळं उघड ठेवून असाच गेला. त्याच काही सांगता येत नाही !! संध्याकाळ झाली की सगळं टाकून पळाला असेल !!" श्रीधर टीव्ही बंद करत म्हणाला. आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जाऊ लागला. तेवढ्या वेळात त्याला पैंजनाचा आवाज येऊ लागला. कोणीतरी मुलगी पायऱ्या वरून वर पळत जातानाचा भास त्याला झाला. तो त्या दिशेने जाऊ लागला.
"कोण आहे ?? कोण आहे तिकडं ??" अस बोलताच लाइट्स बंद होतात. श्रीधर मोबाईलची टॉर्च लावून तिकडे जातो. बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच, बेडरूमच्या लाइट्स चालू होतात आणि मोठ्याने,
"सरप्राइज !! " असे आवाज येतात. 
श्रीधर अचानक समोर कोण आले हे पाहून क्षणभर घाबरतो, आणि प्रिया आणि सायलीला पाहताच आनंदी होतो. आणि त्याला आश्चर्यही वाटतं 
"सायली !! प्रिया !! तुम्ही दोघी इथे ??" 
"येस पप्पा !! " सायली श्रीधरला मीठी मारत म्हणते.
"केव्हा आलात तुम्ही ??" मला साधं कळवायच तरी होत ना !! "
"तुला सरप्राइज द्यायला मुद्दामच नाही सांगितलं !!" प्रिया मध्येच म्हणाली.
"हो का !" श्रीधर दोघींनाही मीठी मारत म्हणाला. 

त्यानंतर तिघेही एकत्र बसून जेवले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. या सगळ्या राड्यात रात्र हळू हळू पुढे सरकू लागली होती. त्या शांत बंगल्यात आता आवाज करणारी माणसे आली होती. 

क्रमशः



बंगला नंबर २२ || कथा भाग १ || शोध || Marathi Horror Story ||



टीप :" बंगला नंबर २२ " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच या कथेत कोणत्याही अंधश्रध्देचे समर्थन लेखक करत नाहीत. त्यामुळे वाचकांनी ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशानेच वाचावी. 


कथा भाग १ || शोध ||

"ये !! कोणी आवाज करू नका रे !! जा जा जा इथून माझं बाळ झोपतय!! नाही हा माझ्या बाळा !! तुला कोणी बोलतं नाहीये !! झोप तू !! अरे झोप नारे !! या भयाण बंगल्यात फक्तं तू आणि मीच आहोत रे !! तुझे बाबा येथील आता !! आपल्याला घेऊन जातील सोबत !! बाबा येतील बर का !! खरंच कोणी येईल का रे इकडे ?? कोणी येईल का रे ?? " ती मोठ्याने ओरडली. पण तीच ऐकणार कोणीच नव्हतं तिथे. 

"आज कित्येक वर्ष उलटून गेली. मी वाट पाहतेय माझ्या त्यांची. येतील ते आणि मला आणि माझ्या मुलाला आपलंसं करतील. मग मध्ये जे घडून गेलं ते होत तरी काय?? आहे का रे कोण माझं ऐकणार इथे ??" ती पुन्हा ओरडली.

बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. कोणीतरी आतमध्ये येत होत. 
"अरे नाही रे !! ऑफिसने मला राहायला मस्त बंगला दिलाय. टेन्शन नको घेऊस. दोन तीन दिवसात प्रिया आणि सायली पण येणार आहेत. मुंबईला दोघी ऐकट्याच काय करणार ना !!" कोणीतरी एक इसम मोबाइलवर बोलतं घरात आला.
घरात तो सर्वत्र पाहू लागला. आणि फोन ठेवत स्वत:लाच बडबडू लागला.
"बापरे !! काय धूळ झालिये इथे !! हे सगळं आता मला साफ करावं लागणार !!"
थोडा वेळ गप्प बसून पुन्हा बोलू लागला.
"जाऊदे आता !! रात्रही खूप झालिये !! सकाळी उठून करूयात !! असही उद्या ऑफिसला जायचं नाहीचे !!"

बेडरूम मध्ये जात असताना त्याचा फोन पुन्हा वाजतो. फोन उचलून तो बोलू लागतो,
"नमस्कार !! कोण बोलतंय ??"
"नमस्कार साहेब !! आपण श्रीकांत जोशी ना ??"
"हो श्रीकांत जोशी बोलतोय !! " 
"मी दत्तू जगताप बोलतोय !! आपल्या पुण्याच्या शाखेचा ऑफिसर !! "
"अरे हो बोला !! "
"आपण आलात पुण्यात ?? भेटला आपल्याला बंगला नंबर २२ ?"
"हो भेटला!! म्हणजे शोधावा लागला !! पुण्याच्या थोडा बाहेर आहे म्हणून वेळ लागला !! काय माणसं आहेत !! कोणी सांगायला तयारच होईना !! आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर भुतासारखे तोंडाकडे बघायचे !!"
"काय आहे ना साहेब !! एवढ्या रात्री तुम्ही तिथे फिरताना पाहून आश्चर्य वाटलं असेल त्यांना !!"
" होना !! "
"आणि हो तुमच्या सेवेसाठी एक नोकर पण आहे तिथे !! येईल उद्या सकाळी !!"
"ठीक आहे !! काही हरकत नाही !!"
एवढं बोलून श्रीकांत फोन बाजूला ठेवून फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जातो. फ्रेश होऊन पुन्हा वरच्या बेडरूम मध्ये येऊन झोपतो !!"

"कोण कुठला हा माणूस !! माझ्या घरात आलाय !! ये !! निघ इथून !! बाळा तू आत जा !! नाहीतर हा तुला मारून टाकणार !! जा बाळा जा !! "
त्या शांत वाड्यात अचानक खोलीतून बाहेर कोणीतरी पळत जातानाचा आवाज आला. श्रीकांत त्या आवाजाने जागा झाला. खोलीतून बाहेर येत त्याने चारी बाजूला पाहिलं. त्याला कोणीच दिसलं नाही. तो पुन्हा खोलीत आला आणि झोपी गेला. कोणता तरी भास झाल्यासारखं त्याला वाटलं. 

कित्येक वेळ ती खोलीतल्या वरच्या माळ्यावरून त्याला पाहत राहिली. 

"त्या खोलीत कोणीतरी येतंय !! प्रिया !! तू उठ !! उठ प्रिया !! कोणीतरी चोरपावलांनी येताणा दिसतंय !!पण मी इतका हतबल का ?? त्याच्या हातात चाकू आहे !! प्रिया उठ !! !!" 

"उठ प्रिया ! उठ !!! " श्रीधर झोपेतुन दचकून जागा झाला मोठ्याने ओरडतच. घामाने चिंब भिजून गेला होता. आजूबाजूला पाहतो तर भयाण अंधार पसरला होता. 

शेजारीच ठेवलेल्या आपल्या मनगटातील घड्याळाकडे पाहत त्याने वेळ पाहिली.
"स्वप्न होत होय !! हुश्श !! काय रे !! आजची रात्र जाता जाईना ! ! एकतर प्रवासाने जीव थकून गेलाय आणि या नवीन जागेत मला झोप काही लागेना !! एक काम करतो पुस्तक वाचत बसतो !! "

श्रीधर पुस्तक घेण्यासाठी खाली हॉल मध्ये येतो तर समोर मेन डोअर उघडाच होता. त्याला बंद करायला जात तो बोलू लागला,
"घ्या ! मेन डोअर तर तसाच उघडा ठेवलाय !! एखादा चोर आला तर पहिल्याच दिवशी मला या शहरात कंगाल करुन जायचा !!"
श्रीधर दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याच्या पाठीमागून कोणी पाच सात वर्षाचा मुलगा दरवाजातून बाहेर जातो. त्याला पाहून श्रीधर क्षणभर भीतो. त्या मुलाच्या हसण्याच्या आवाजाने तो मागे सरकतो. आणि त्याच्याकडे पाहून बोलू लागतो.
"ये कोण रे तू !! आणि एवढ्या रात्री इथे काय करतोयस !! "
ते मूल त्याच्याकडे बघून फक्त हसत आणि त्याच्यापासून लांब पळत जात. श्रीधर त्याच्या मागे जातो. समोरच असलेल्या झाडाच्या मागे ते मूल जाऊन लपत. श्रीधर त्याच्या मागे मागे जातो.
"कोण रे तू !! हे बघ तुला पकडलं पकडलं !! हा पकडलं !! " श्रीधर झाडाच्या मागे पाहत म्हणतो. 
तिथे त्याला कोणीच भेटत नाही. पुन्हा ते मूल त्याच्या घरात जाताना त्याला दिसत.
"ये थांब !! ये थांब ! अरे ते माझं घर आहे !कोणाचा आहेस रे तू !! आणि एवढ्या रात्री या इथे काय करतो आहेस !! " श्रीधर घरात पळत जाऊ लागतो. तेवढ्यात मेन डोअर जोरात बंद होतो. 
"अरे !! काय आगाव कार्ट !! माझ्याच घरात शिरून ! मलाच घराबाहेर काढलं !! "
श्रीधर कित्येक वेळ दरवाजा वाजवतो पण दरवाजा काही उघडला जात नाही. शेवटी तो मागच्या खिडकीने आत शिरतो. 

"कुठं आहेस रे कार्ट्या!! हे बघ निघ इथून !! तुझी आई काळजी करत असेल ना ?? "
"नाही ओ काका !! " 
श्रीधरला मागून आवाज आला. तो मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं. कित्येक वेळ तो त्याला शोधत राहिला. पण ते मूल त्याला काही सापडलं नाही. अखेर त्याला ते मुल मुख्य दरवाजातून बाहेर पळून जाताना दिसलं. त्यानंतर श्रीधर बेडरूममध्ये वाचत बसला. वाचता वाचता झोपी गेला.

सकाळ झाली तरी श्रीधर उठलाच नाही. अखेर मेन डोअर कोणीतरी मोठ्याने वाजवतंय या आवाजाने तो जागा झाला.

"आलो रे !!" कोण आलंय एवढ्या सकाळी सकाळी !! " दरवाजा उघडत श्रीधर म्हणाला.
"काय राव साहेब एवढा वेळ !! म्हणलं आजुन पाच मिनिट तुम्ही दरवाजा उघडत नाहीतर मी हे निघालो असतो बघा !!"
"तू कोण ??"
"मी श्याम !! तुमचा नोकर कम फ्रेंड !!"
"अच्छा म्हणजे तुला दत्तूने पाठवल तर !! " 
"होय साहेब !! " 
"बरं बरं !! "

श्याम घरात आला. इकडे तिकडे बघू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती दिसू लागली. त्याने न रहावुन श्रीधरला प्रश्न विचारला.

"साहेब रात्री किती वाजता आलात मग ??"
"१२.३० वाजले. काय रे तुमच्या गावातली लोक लवकर कोणी सांगेना मला बंगला नंबर २२ !! "
"इथली लोक असेच आहेत बघा !! "
"लोक !! अरे पोर सुद्धा !! काय एका आगावं कार्ट्याने मला त्रास दिलाय !! माझ्याकडून चुकून दरवाजा उघडा राहिला तर सगळ्या घरभर नुसता गोंधळ घातला त्याने!! तेही रात्री तीन साडेतीन वाजता !! वैताग नुसता !!"
"तीन वाजता !! " श्याम थोड तुटक बोलला.
"नाहीतर काय !! दिसू दे पुन्हा !! चांगली अद्दल घडवतो त्याला !!"
"जाऊ द्या साहेब !! पोर आहेत ती !! " 
"बरं ते सगळं जाऊदे !! तुझी काय ओळख ते तरी सांग!!"
"मी होय !! मी श्याम !! या सोसायटीच्या सुरवातीला एक झोपडपट्टी लागते तिथे राहतो मी !! एक बायको ,दोन मुलं असा सुखी संसार आहे बघा!! गेली पंचवीस वर्ष झाली इथे राहतोय !!"
"व्हा छान !! "

श्याम त्यानंतर कित्येक वेळ आपल्या कामात व्यस्त राहतो. श्रीधर आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवू लागतो. श्याम राहून राहून चारी बाजूला पाहत असतो. 
"श्याम झाला का रे नाष्टा ??"
"हे काय !! झालाच की !! सगळं आवरलं आणि पहिलं नाष्टा केला !!"
"काय केलंस ??" श्रीधर गॅसवर ठेवलेली कढई उघडून पाहतो. 
"व्हा पोहे !! "
"हो !! आता लवकरात लवकर तेच करता आले !!" श्याम पोह्यांची डिश श्रीधरकडे देत म्हणाला.

दोघेही हॉलमध्ये बसून पोहे खाऊ लागले. श्याम राहून राहून चारी बाजूला पाहत राहतो. 
"काय रे काय झालं??"
"काही नाही साहेब !!" श्याम क्षणभर थांबतो आणि पुन्हा बोलतो
"साहेब तुम्हाला दुसरा बंगला नव्हता का हो ??"
"का रे ?? यात काय वाईट आहे !! मस्त आहे की हा बंगला ??"
"नाही म्हणजे आहे हा मस्त !!पण जरा जुनाट वाटतो म्हणून म्हटलं !!"
"ऑफिसन आता हाच सांगीतला त्यामुळे मला तरी पर्याय नाही बघ !!" श्रीधर पोहे खात म्हणाला.
"काय होणार नाही ??"
"नाही !! पण तुला काय रे एवढं ??"
"साहेब अस म्हणत्यात की या बंगल्यात भूत आहे !!"
"काय ??" श्रीधर मोठ्याने हसत म्हणाला.
"चेष्टा नाही साहेब !! काल तुम्हाला जे पोरगं दिसलं ते भूतच होत !!"
"काहीही काय श्याम !! अरे इथलच कुठलतरी होत पोरगं ते !! मी पाहिलं ना त्याला पळून जाताना !! "
"मी सांगायचं काम केलं !! पण एक सांगतो आंधार पडायच्या आत मी माझं काम उरकून निघून जाणार !!"
"बरं बरं !! सगळी नाटकं आहेत तुझी काम चुकवायची ना ! असुदे असुदे !! आणि हो उद्या परवा माझी मुलगी आणि बायको पण येणार आहेत त्यांच्यासमोर असलं काही बडबडू नकोस म्हणजे झालं!! आधीच माझी बायको प्रिया भित्री आहे !!"
"बायको आणि पोरगी ! साहेब कशाला उगाच रिस्क घेताय दुसरीकड बघा ना घर !! "
"नाहीरे श्याम !! ऑफिसने सांगितलय त्यामुळे नाकारता येणार नाही ! !! बाकी भुताची आयडिया मस्त हा ! जा बाबा लवकर घरी जा !! मी काही बोलणार नाही!"

दिवसभर श्याम आणि श्रीधर घर आवरत बसले. सगळ्या घरातली धूळ झटकून घेतली, खोल्या पुसून साफ केल्या. एवढ्या सगळ्या कामात संध्याकाळ केव्हा झाली. कळलंच नाही. श्याम घड्याळात पाहतो तर संध्याकाळचे सात वाजायला आले होते.

"बापरे सात वाजत आले!! साहेब !! मी निघतो लवकर !! तुम्हीपण जरा जपूनच राहा बर !! "
"हो रे !! "
श्रीधर मेन डोअर बंद करत म्हणाला. आणि मागे वळून खोलीत जाऊ लागला तेवढ्यात त्याला पुन्हा ते लहान मुल दिसलं.
"अरे तू पुन्हा आलास !" श्रीधर त्याच्या मागे धावू लागतो.

क्रमशः 

हरवून रात्र ती जावी || Beautiful Marathi Poem || Marathi Kavita ||



छोट्या छोट्या आठवांची, सोबत ती किती असावी !!
मी सहज लिहावे, जणू कविता ती व्हावी !!

हळुवार त्या सरी, बरसत ती वेळ जावी !!
ओढ त्या कोणाची, मग मज ती लागावी !!

एकटा तो मी, एकटी ती वाट दिसावी !!
सोबत येण्यास मग, नकळत का साथ मागावी ??

न यावी ती, न सोबत घेऊन जावी !!
ओळख ती माझी, अनोळखी ती जणू वाटावी !!

अव्यक्त प्रेमाची ही, कहाणी अधुरी का रहावी ??
नजरेतून ती बोलता, शब्दातून व्यक्त का करावी ??

छोट्या छोट्या गोष्टींनी, पुन्हा ती प्रेमात पाडावी !!
मी सहज पाहावे, नी हरवून रात्र ती जावी !!

✍️© योगेश खजानदार

जणू प्राजक्त ती बहरावी || अव्यक्त प्रेम कविता || मराठी || Poetry ||



ओढ मीठीची अशी ती जणू, वेड मला का लावी ?
हळूवार स्पर्श जाणवतो असा की, जणू प्राजक्त ती बहरावी !!

आठवांच्या सरी त्या बरसत, मग त्यात ती शोधावी !!
चिंब भिजून जावे मी पण,  ती न तिथे दिसावी !!

कुठे असावी सखी ती मग , कवितेतून त्या आज लिहावी !!
शब्द असावे जणू माझे ते पण , भावनेत ती आज असावी !!

वाटेवर का सांजवेळी उगाच त्या, वाट तिची मग पहावी !!
एकटा उभा मी तिथे असाच पण, वाट न ती बोलावी !!

भास तिचा मग व्हावा असा की, चित्र होऊन ती यावी !!
थांबावी ती तिथे क्षणभर नी मग, पुन्हा दूर ती दिसावी !!

दिवस असा नी रात्र अशी की, प्रत्येक श्वासात ती भेटावी !!
भेटीत त्या वाटे असे जणू मज की, आयुष्यभराची सोबत ती व्हावी !!

✍️ योगेश खजानदार

*All Rights Reserved*

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री || १९६०-२०२२ || संपूर्ण लिस्ट ||




१. एकनाथ शिंदे ३० जून २०२२ ते सध्याचे शिवसेना
२. उद्धव ठाकरे  २८ नोव्हेंबर ते २९ मुन २०२२ शिवसेना
३. देवेंद्र फडणवीस २३ नोव्हेंबर २०२२ ते २७ नोव्हेंबर २०२२ भाजपा
राष्ट्रपती राजवट १२ नोव्हेंबर २०१९ ते २२ नोव्हेंबर २०१९
४. देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोंबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ भाजपा
राष्ट्रपती राजवट २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोंबर २०१४
५. पृथ्वीराज चव्हाण ११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१४ काँग्रेस
६. अशोक चव्हाण ७ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २००९ काँग्रेस
७. अशोक चव्हाण ८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोंबर २००९ काँग्रेस
८. विलासराव देशमुख १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ काँग्रेस
९. सुशीलकुमार शिंदे १८ जानेवारी २००३ ते २९ ऑक्टोंबर २००४ काँग्रेस
१०. विलासराव देशमुख १८ ऑक्टोंबर १९९९ ते १५जानेवारी २००३ काँग्रेस
११. नारायण राणे  १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोंबर १९९९ शिवसेना
१२. मनोहर जोशी १४ मार्च १९९५ ते ३० जानेवारी १९९९ शिवसेना
१३. शरद पवार ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ काँग्रेस
१४. सुधाकरराव नाईक २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ काँग्रेस
१५. शरद पवार ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ काँग्रेस
१६. शरद पवार २६ जून १९८८ ते ३ मार्च १९९० काँग्रेस
१७. शंकरराव चव्हाण १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ काँग्रेस
१८. शिवाजीराव निलंगेकर  ३ जून १९८५ ते ५ मार्च १९८६ काँग्रेस
१९. वसंतदादा पाटील २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ काँग्रेस
२०. बाबासाहेब भोसले २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ काँग्रेस
२१. अब्दुल अंतुले ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ काँग्रेस
राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी ते ७ जून १९८०
२२. शरद पवार १८ जुलै १९७८ ते १५ फेब्रुवारी १९८० काँग्रेस
२३. वसंतदादा पाटील ५ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ काँग्रेस
२४. वसंतदादा पाटील १७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८ काँग्रेस
२५. शंकरराव चव्हाण २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ काँग्रेस
२६. वसंतराव नाईक १३ मार्च १९७२ ते २२ फेब्रुवारी १९७५ काँग्रेस
२७. वसंतराव नाईक १ मार्च १९६७ ते १२ मार्च १९७२ काँग्रेस
२८. वसंतराव नाईक ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ काँग्रेस
२९. बाळासाहेब सावंत २५ नोव्हेंबर १९६३ ते २ डिसेंबर १९६३ काँग्रेस
३०. मारोतराव कन्नमवार २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ काँग्रेस
३१. यशवंतराव चव्हाण १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ काँग्रेस

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...