मनातील सखे ..✍

कधी कधी या वेड्या मनाला
समजावून सांगता येत सखे
पण डोळ्यातले अश्रू आजही
खरं बोलून जातात

पाहून ही न पाहता कधी
लपवता येत या नजरेस
आणि अधीर त्या वाटा
मला तिथेच घेऊन जातात

आठवूनही कधी न बोलता
विसरून जाता येत त्या वेळेस
पण क्षणा क्षणाला तुझ्या आठवणी
मला खूप पाहून जातात

कधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात

हवंय काय या मनाला तरी
विचारलं मी कित्येक वेळेस
आणि हे मन मला तेव्हा
तुझ्याच प्रेमात घेऊन जातात

उरल्या त्या अखेरच्या श्वासात
तुलाच फक्त पहायचंय सखे
पण तुझी कित्येक वचने
मला माझ्यात अडकवून जातात

✍योगेश


सैनिक

आठवणींच्या जगात आज मी
सहजच हरवून गेलो आहे
पण भारतमाते तुला रक्षण्या
मी निडर होऊन इथे उभा आहे

आठवण त्या मातेची येते
जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे
पण त्या मातेस तुला रक्षण्याचे
वचन मी देऊन आलो आहे

कुठे खांद्यावर हलकेच माझ्या
तो हात मखमली जाणवला आहे
पण भारतमाते मला उमगले
आईचे दुसरे रूप ही तू आहे

हो पाहते वाट माझी सखी
तिच्या नजरेत मी आज आहे
पण ती ओढ मग तुझ्या प्रेमाची
मला पुन्हा पुन्हा बोलते आहे

अनोळखी त्या शत्रू सोबत
मी अखेर पर्यंत लढणार आहे
पण मनात मला माझ्या मित्रांची
साथ नेहमीच भेटते आहे

एक सैनिक होऊन जगताना मी
तुला कित्येक वेळा वंदन करतो आहे
हे भारतमाते तुला रक्षण्या
हे आयुष्य माझे मी दिले आहे

हे भारतमाते तुला रक्षण्या
हे आयुष्य माझे मी दिले आहे !!

✍योगेश

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करतात असच वाटत. आजोबापण खूप छान असतं हे तेच सांगतात आणि मनात असंख्य भावनांचा कल्लोळ होतो. 'आजोबा' अश्या कित्येक हाक कानावर पडतात आणि धावत येणार ते निरागस रोपट या वठलेल्या झाडास येऊन बिलगतं. घरात छोट्या पावलांनी फिरणार ते बाळ मला स्वतः सोबत घेऊन जात. अगदी राजा राणीच्या कथेथही, आणि मन अगदी पुन्हा माझ्याही बालपणात जातं.
  या आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोप येई पर्यंत आजोबा आणि आजी याच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेलं आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आल. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार  या चिमुकल्या मनावर करताना मी आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. ही जाणीव कदाचित मला माझ्यातील आजोबाला पुन्हा पुन्हा बोलायला भाग पाडते. इकडून तिकडे धावणारी ती छोटी पावले कदाचित माझ्यासारख्या थकलेल्या पावलास स्वतः सोबत धावायला लावतात पण शेवटी वय बोलत आणि थकलेल्या या हाताला त्याचा आधार मागतात. आधार कदाचित कधी थकलेल्या शरीराला नाही तर मनालाही मागतात. त्या छोट्या पावलांनी घरभर फिरताना या आजोबा आणि आजी भोवती फिरावं अस सतत वाटत राहतं.
  हे म्हातारपण एकटं असल तर किती भयाण वाटत हे कधी कधी कळून जातं. एकांतात बसल्यावर कित्येक विचार येतात आणि या नातवाच्या कित्येक खोडकर गोष्टी आठवल्या की सारं काही विसरून जात. आजच्या काळाशी जुळवून घेताना कदाचित आमच्या सारख्या म्हाताऱ्यांची दमछाक होत असेलही पण या नव्या फुलांना कित्येक संस्कारांचा ठेवा द्यायचा आहे ही जाणीव मनात कुठे तरी असते. एक आजोबा किंवा एक आजी ही घरातली वयस्कर व्यक्तीचं नाही तर एक अनुभवी व्यक्तीही असते. आयुष्याच्या शर्यती मध्ये कुठेतरी गुंतल्यावर आपल्या मुलांस योग्य संस्कार झालेच पाहिजेत असे सगळ्याचं आई वडिलांना वाटत पण कदाचित घरातल्या गरजाच इतक्या असतात की वेळ कुठल्या कुठे निघून जाते कळतही नाही. अगदीच दूर जाऊन पहायची गरजही नाही. आज आजोबापण कधी आणि कसे आले कळलेही नाही. कालपर्यंत एक वडील म्हणून भूमिका करताना कित्येक कठोर निर्णय मी घेतले पण आज एक आजोबा झाल्यावर कदाचित तो कठोरपण कुठेतरी राहून गेला आणि त्या नातवां सोबत आपणही पुन्हा लहान व्हावं अस वाटू लागलं आणि ते निरागस चेहरे या आजोबाला अगदी हसत हसत आपलस करून घेऊ लागले. कधी आम्ही कित्येक जुन्या दंतकथा मध्ये हरवून जावू लागलो, कधी नकळत कित्येक उत्तम संस्कार मी त्याच्यावर घडवू लागलो. मग कधी कधी वाटतं की इतकं सुंदर हे आजोबाच  आणि नातवाच नात असताना कुठेतरी ते का विरून जात. वृद्धाश्रमात आपल्या म्हातारपणावर कुढत का बसावं लागत, तर कदाचित तिथे या नात्याला कधी मुक्त अस फुलूचं दिलं नाही अस वाटत.
प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात हे नक्कीच नात फुलू दिलं तर ते सुंदर फुलतं पण फुलयाच्या आधीच जर ते खुडून टाकलं तर कदाचित त्याचं सौंदर्य आपल्याला कळलंच नाही अस म्हणाव लागेल. आजच्या काळात सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसणारी लहान मुले कदाचित आजी आणि आजोबा या सुंदर नात्याला मुकतात हे तितकंच खर आहे.  खरतरं त्यांना सांगावसं वाटत की बाळा त्यापेक्षा आपण सुंदर कथेतल्या एखाद्या राजकुमाराला भेटून येऊयात. पण सारच राहतं आणि आजी आणि आजोबा म्हणजे एक म्हातार माणूस एवढीच संकल्पना उरते.
  आजी आणि आजोबा घरात असणारी घरं ही तितकीच सुंदर भासतात हे मात्र नक्की. आपल्याला या वयातही एकही आजार नाही यापेक्षा नातवाने आपल्याला आजोबा म्हणून मारलेली हाक सर्वात जास्त आनंद देऊन जाते यात तिळमात्र ही शंका नाही.त्याच्या दुडक्या पावलांनी घरभर केलेला दंगा कदाचित रेडिओ वर जुनी गाणी लागल्यावर होणाऱ्या आवजापेक्षा ही सुंदर वाटतात हे मात्र खरं. अगदीच अखेर सांगायचं तर आजी आणि आजोबा नावाचं सुंदर पान सर्वांच्याच आयुष्यात असावं हेही तितकंच खरं,

घरभर छोट्या पावलांनी
अगदी मनसोक्त फिरावं
माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच
दुसरं टोक त्यांनी धरावं

कधी द्यावा आधार म्हातारपणात
तर कधी कुशीत यावं
या म्हाताऱ्याला फक्त आता
आपलसं करून घ्यावं

होतील कित्येक संस्कार मनावर
आजोबांचं बोलणं त्यांनी ऐकावं
कधी राजकुमाराच्या कथेत
अगदीच हरवून जावं

चार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा ...!!! एका आजी आणि आजोबाची !!!

✍योगेश

चेहरे ..!!

पाठीवरती हात फिरवता
खंजीर त्याने मारला होता
तोच आपुलकीचा सोबती
ज्याने घाव मनावर दिला होता

अश्रू पुसण्यासाठी हात येताच
कित्येक वेळ आपुला वाटला होता
त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो
चारचौघात करत बसला होता

सोबती चालण्यास मला तो
वाट त्याची दाखवत होता
चार पाऊले चालता चालता
पाय अडकवून पाडत होता

मनाच्या तळाशी विश्वास होऊन
तोच का दिसत होता
डोळे झाकून आपुला म्हणातना
तोच परका झाला होता

मी आणि माझ्यातील मी
तोच चांगला ओळखत होता
कित्येक  नवीन चेहऱ्यात आता तो
मला अनोळखी आज झाला होता

भेटला एक  आपुलकीचा तो
जो खरंच माझा झाला होता
चुकतात लोक माणसं ओळखायला
शेवटी मात्र  सांगायचं  राहिला होता

✍योगेश

तो पाऊस ..!✍

तो पाऊस आणि ती खिडकी
मला खूप काही बोलतात
आठवणींच्या कित्येक थेंबात
मला चिंब भिजवून जातात

कधी अगदी मनसोक्त बरसून
माझ्या सवे ते गातात
कधी अगदी सरी त्या निवांत
माझ्यात हरवून जातात

खिडकी जवळ मला कधी
उगाच बोलावून घेतात
भिजलेल्या अंधुक आठवणीत
ते भास मज का होतात

बेफाम बरसताना भान हरपून
त्या सरी पाहत राहतात
सोबतीस आज नाही कोणी
मलाच का ते विचारतात

तो वाफाळलेला चहा पीत
असेच क्षण निघून जातात
तिच्या कित्येक प्रश्नाची उत्तरे
मनातच अखेर राहतात

अबोल मला बोलण्यास त्या
सरी कित्येक वेळ बरसत राहतात
खिडकी जवळ येतात आणि
एकट्याच बोलत राहतात

अगदी मनापासून ...!!

✍योगेश



भेट ..!!

मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही

सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही

उरली सांज थोडी पापण्यात
तुलाच ती दिसली नाही
त्या लाटांच्या आवाजात जणू
तुलाच ती बोलली नाही

घालमेल ही मनाची आज
सांग तुला का कळत नाही
माझ्या कित्येक अबोल शब्दांचे
भाव तुला का कळत नाही

विरून गेले क्षण माझ्यात
ते पुन्हा का तुज दिसले नाही
राहून गेली तू माझ्यात
तुलाच का तू दिसली नाही

पाठमोऱ्या तुला पाहताना मी
तू मागे वळूनही पाहिले नाही
पुन्हा भेटण्याचे वचन मज तेव्हा
जाताना तू दिले नाही ..!!

✍योगेश















Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...