वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||



भाग १४

भेट

पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण आणि अभ्यास सोडून सगळं आयुष्य जगण्याची ओढ, यातून तो पुन्हा गर्ततेत अडकला. पहिल्या सेमीस्टर मध्ये तो नापास झाला. बाबांनी आईनी त्याला याबद्दल खूप सुनावलं. पण त्याच्यावर त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आयुष्य आपलं अनमोल आहे हे तो विसरून गेला. कॉलेजच्या आवारात टवाळक्या करण्यात तो हरवून गेला. पण दोष मात्र आपल्या हरण्याचे दुसऱ्यांवर टाकत गेला. 

"इतकं सगळं करूनही, मी अजूनही अयशस्वी का होत आहे माझंच मला कळत नाहीये !! आई बाबांचा तर विश्वासाचं माझ्यावरून उडून गेलाय. कोणत्या तोंडाने त्यांना बोलावं तेच कळत नाहीये. बारावीला झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून मनापासून अभ्यास केला. पण इथेही तेच. पहिल्या सेमीस्टर मध्ये नापास झालो. नेमक माझं चुकतंय कुठ तेच मला कळतं नाहीये. वैताग आलाय नुसता. " आकाश सिगरेट ओढत कित्येक विचार करत होता. 

"ये आक्या !! चल पटकन !! कॉलेज मध्ये कोणीतरी गेस्ट आलाय !! लेक्चर आहे म्हणे !" 
"तू जा रे !! मला नाही यायचं !! "
"सब्जेक्ट माहितेय का ?? "
"कोणता ??"
"पोर्न फिल्मस, ऑन स्क्रिन अँड रिॲलिटी !!" 
"काय ??  कॉलेज मध्ये ?? बरं असल्या गोष्टीला परवानगी दिली प्रिन्सिपॉलने !!" आकाश हसत म्हणाला आणि सदानंद सोबत कॉलेजच्या हॉल मध्ये आला.

संपूर्ण कॉलेज त्यावेळी भरून गेल होत. त्यातील कित्येक विद्यार्थी फक्त मजा म्हणून आले होते. आकाश आणि सदानंद त्या गर्दीचा एक भाग झाले. तेवढ्यात सुरुवात झाली. 

"हॅलो स्टुडंट्स !!! तुम्ही सगळे एवढ्या प्रचंड संख्येने इथे आलात त्याचाच खरतर आम्हाला आनंद आहे. या पुढच्या १ तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल हे मात्र नक्की, तर मग सुरू करूयात, आणि  यापुढे हा मंच संभाळतील "वर्तुळ " या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिनेश कर्णिक. त्याच्या या संघटने विषयी मी सांगण्यापेक्षा तेच तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील अस मला वाटत, तर सर्व आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात." कॉलेजचे प्रिन्सिपॉल एवढं बोलून आपल्या जागेवर बसले. 
दिनेश कर्णिक माईक जवळ आले, क्षणभर शांत राहिले, आणि बोलू लागले,
"एवढा तरुणवर्ग पाहिला की खरंच खूप आनंद होतो आम्हाला आणि आमच्या संस्थेला ज्याच नाव आहे "वर्तुळ !!" बंधनातून स्वातंत्र्याकडे !! याला !!" 
सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. आणि ते बोलत होते,
"खरतर तुमच्यातील कित्येक विद्यार्थी हे आजच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बघून मजेशीर काहीतरी ऐकायला भेटेल अस समजून आले असतील !! पण माफ करा मित्रांनो अस काहीच होणार नाहीये !! आणि तो विचार जो तुम्हाला मजेशीर म्हणून इथपर्यंत घेऊन आला त्या पोर्न विरोधातच आम्हाला तुम्हा सर्वांना सावध करायचं आहे !! तुम्हाला त्यातून ओढून बाहेर काढायचं आहे. आमची ही संस्था हेच जागृतीच काम विविध शहरात जाऊन !! विविध युनिव्हर्सिटी मध्ये करते. खरतर आम्हाला कित्येक कॉलेजमध्ये असे लेक्चर घेण्यास परवानगीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही कधी कधी असहाय होऊन इंटरनेटच्या जगात ऑनलाईन जनजागृतीच काम करतो. "

"यात काय आली जनजागृती ! ! याला काय माहिती पोर्न म्हणजे काय ते !! कसली  मज्जा येते बघताना!!" आकाश मनातल्या मनात म्हणतो आणि गालातल्या गालात हसतो. 
"काय झालं भाऊ आताच बघून आला ना ??" सदा मध्येच त्याला विचारतो.
"समोर बघ !! रात्री पाठवतो तुला !! नवीन आलाय आपल्या आवडत्या स्टारचा !!"

" पण आमचा शुद्ध हेतू या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा आहे !! कोणी सिगरेट ओढतो त्याला त्याच व्यसन लागत , कोणी दारू पितो !! तसेच हे एकप्रकारे व्यसनच आहे !! यातून होत काय तर आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आपल्या डोक्यात सतत तेच विचार यायला लागतात आणि आपण त्याच्या आहारी जातो. आणि एकदा या गोष्टीचा आहारी गेलो की आपण वास्तावापासून दूर एका आपणच आपल्यात शोधलेल्या खोट्या जगात राहायला लागतो. आणि मग पुढे हस्तमैथून , वैश्या गमन !! अश्या नको त्या मार्गाला जायला लागतो. खरतर आपणच आपल्या शरीराला कमकुवत करतो, भटकत जातो. आलेल्या अपयशाला सामोरे तर जातो पण त्याच महत्त्व , त्याचे कारण आपण कधीच पाहत नाही. कारण आपल्या डोक्याला सुखाची व्याख्या माहीत झालेली असते आणि ती म्हणजे या पोर्न मध्ये पाहणं. खरतर मित्रानो पोर्न इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि तुम्ही त्याचे एक कस्टमर आहात !! म्हणून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे !! कारण हे नुकतंच मिळालेल तरुणपण वाटत तितकं सुखद जरी असल तरी आजच्या होणाऱ्या चुका या भविष्यात त्याची किंमत पूर्ण करून घेतात, म्हणून हा सगळा खटाटोप !! कारण हल्ली, मोबाइलच्या एका क्लिकवर तुमच्या स्क्रीनवर सगळं उपलब्ध होत हे सगळं. पण लक्षात ठेवा तुमच्या नकळत तुम्ही या जगाच्या स्पर्धेतून बाद होत जाता. तुमच्या पैकी कित्येक मित्रांना खूप मोठं काहीतरी करायच आहे पण ते होत नाही त्याच कारण तुम्ही शोधलं पाहिजे . मी म्हणत नाही की पोर्न हेच एक कारण असू शकते !! अति मोबाईलचा वापर, चुकीचे मार्गदर्शन, प्रेमभंग असे कित्येक  कारणे असू शकतात. "
आकाश आता मणलावून सगळं ऐकत होता. त्याला सगळं काही आपल्याच विषयी चालू आहे अस वाटत होत. 

"वर्तुळ या आमच्या संघटने तर्फे आम्ही अश्या आमच्या मित्रांना !! या अश्या कित्येक व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. खरतर बोलण्यासाठी खूप काही आहे !! पण आता विश्राम घेतो !! जाता जाता एक आमच्या संघटनेच पॉम्प्लेट तुम्हा सर्वांना देऊन जातोय. यामध्ये आमचा संपर्क क्रमांक, आमच्या संघटनेशी जोडण्यासाठी आपण त्याच्या वापर करू शकता. किंवा पत्ता ही आहे तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटु सुद्धा शकता. आपल्या संघटनेतर्फे आपण दर आठवड्याला रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो !! मला आशा आहे की आपल्यातील कित्येक विद्यार्थी नक्की आम्हाला येऊन भेटतील !!धन्यवाद !!"

लेक्चर संपताच हॉलच्या दरवजाताच शिपाई सर्वांना पॉम्पलेट देत होता. आकाश आणि सदानंद दोघेही ते पॉम्पलेट घेतात. 
"हे !! काहीही काय !! बकवास बोलत होता तो कर्णिक का फरणिक !! काय तर व्यसन  आहे पोर्न व्यसन !! भावा म्हणावं कधी ये आमच्याकडचे एचडी व्हिडिओ बघायला!! मग कळलं त्याला काय असतं ते !!" सदानंद हातातील पॉम्पलेट फाडत म्हणाला. 
आकाश मात्र कित्येक वेळ त्या पॉम्पलेटला बघत बसला. त्याला पाहून सदानंद म्हणाला.
"ये भाऊ !! जायचा विचार तर नाहीना तुझा !! चल बाबा !! असल्याच्या नको नादी लागू!!"

आकाश हळूच तो कागद आपल्या खिशात ठेवतो. आणि सदानंद सोबत हॉस्टेलवर येतो. 

रात्रभर तो कर्निकांच्या गोष्टीचा विचार करत बसतो. मोबाईल नंबर पाहतो. डायल करतो परत कट करतो. 
"ते म्हणताय ते मला खरतर वाटतंय !! पण वाईट असत हे पाहणं तर आनंद भेटला नसता ना ?? काय वाईट?? काय चांगल??  काही कळत नाहीये मला !! त्यापेक्षा उद्या त्यांना डायरेक्ट जाऊन भेटलो तर !! पण नको !! कॉलेज मध्ये कळलं तर चेष्टा करतील सगळे !! नकोच ते !!"

रात्रभर आकाश या गोष्टीचा विचार करत बसला,  त्या रात्री त्याने हस्तमैथुन केल नाही, ना पोर्न पाहिला नाही. तो फक्त विचार करत राहिला. आणि झोपी गेला.

क्रमशः


वर्तुळ || कथा भाग १३ || पुढचा मार्ग ||



भाग १३

पुढचा मार्ग !!

सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता. एक सकाळी बाबा त्याच्यासोबत परगावी आले, त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला. 
अकरावीला ज्या आकाशचा नंबर पहिल्या यादीत लागला होता. त्या आकाशला आता एडमिशन मिळावे म्हणून वणवण भटकाव लागत होत. 
"साहेब यापुढचा नंबर तुमचा आहे !!! प्रिन्सिपॉल साहेब आले आहेत !! "
कॉलेजमधला पिऊन म्हणाला. 
"बरं ठीक आहे !!"  बाबा स्वतःला सावरत म्हणाले. 
थोडा वेळ गेला पुन्हा प्रिन्सिपॉल साहेबांच्या ऑफिसची बेल वाजली. पिऊनने त्यांना आत जाण्याचा इशारा केला.
"आत येऊ सर ??"
समोर बसलेले प्रिन्सिपॉल त्यांना येण्याचा इशारा करतात. 
"बोला !! "
"माझ्या मुलाचं एडमिशन करायचं होत !!"
"यामध्ये मी आपली काय मदत करू शकतो ?? कारण कट ऑफ लिस्ट बाहेर लावली आहे!!"
"साहेब त्यात माझ्या मुलाचं नाव नाहीये !!"
"अच्छा !! बघू त्याचे मार्कशीट !!"
बाबा मार्कशीट देत म्हणाले. 
"त्याला थोडे कमी मार्क्स आहेत त्यामुळे जरा !!"
बाबा बोलता बोलता थांबले प्रिन्सिपॉल साहेबांनी बाबांकडे पाहिलं.
"पंचावन्न टक्के मार्क्स आहेत हे !! बीएससीला आमचे कमीत कमी सत्तर टक्के राहतात. मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन मिळालं नाही म्हणून इकडे येणारे आम्ही घेतच नाही !! कारण कोणतीच डिग्री कमी किंवा जास्त अशी आम्ही मानतच नाही !! "
"माहिती आहे मला सर पण खूप आशेने मी आलोय !! "
"सॉरी साहेब पण मी काही करू शकत नाही !!" प्रिन्सिपॉल साहेबांनी मार्क्सशीट बाबांकडे देत म्हणाले. 
बाबा क्षणभर शांत झाले पुन्हा त्यांनी आकाशला बाहेर जाण्यासाठी सांगितलं . आकाश बाहेर गेला. समोर अंधुक काच होती. त्यातून त्याला अस्पष्ट अस दिसत होत. बाबा जागेवर उभा राहिले. प्रिन्सिपॉल साहेबांकडे पाहत खाली वाकले. त्यांचे पाय पकडून बाबा बोलू लागले.
"साहेब !!कृपा करा पण माझ्या मुलाला तुमच्या कॉलेज मध्ये एडमिशन द्या !!"
प्रिन्सिपॉल साहेब जागेवरून उठले. मागे सरकले.
"आहों !! काय काय !! काय करताय काय तुम्ही !! उठा !! उठा !! समोर बसा बर तुम्ही!! "
बाबा समोरच्या खुर्चीवर बसले.
" हे अस नका करू साहेब , मलाही तुमचं दुःख कळतंय !! मीही एका मुलाचा बाप आहे !!"
"मग काय करू साहेब सांगा ना !! दहावीला वर्गात पहिला आलेला हा !! आज त्याची ही अवस्था पाहवत नाही !! तसा तो खुप हुषार आहे !! पण त्याला काय झालंय काही कळतं नाही !! "
"दहावीनंतर खूप पालकांची हीच तक्रार असते !! आपला पाल्य खूप हुशार आहे म्हणून ते लक्ष देत नाहीत !! आपणही शाळेतून बाहेर पडलो मुक्त झालो म्हणून हे पाल्य बेबंध वागतात !! आणि अगदी आयुष्याच्या वळणावर असलेल्या बारावीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळवतात !! "
"तरी मी त्याला काही कमी पडू दिलं नाहीये !! "
"हेच तर होत ना!! म्हणून तर त्यांना कशाची किंमत वाटतं नाही !! बरं ठीक आहे !! तुमच्याकडे पाहून मी त्याला एडमिशन देतोय !! पण त्याने अभ्यास नक्की केला पाहिजे!!"
"मी सांगतो ना !! तो नक्की करेन अभ्यास !! 
"ठीक आहे ,आता या तुम्ही !! "
प्रिन्सिपॉल साहेबांनी समोर ठेवलेल्या एडमिशन फॉर्मवर सही केली. आणि आकाशच एडमिशन झालं. आपल्या घरापासून दूर ,परगावी. 

बाबा बाहेर येताच आकाशने त्यांना विचारलं.
"काय म्हणाले !!"
"एडमिशन झालंय तुझं !!"
"वा !! ते तर होणारच होत!! दहावीचे मार्क्स काय कमी आहेत काय !!" आकाश क्षणात बोलून गेला. 
बाबा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले. पण ते त्याला काहीच म्हणाले नाही.

दोघे त्या संध्याकाळी पुन्हा आपल्या गावी परतले. बाबांनी घडलेली सगळी गोष्ट आईला सांगितली. आकाश आपल्या खोलीत जाऊन तयारी करू लागला, तेवढ्यात त्याचा फोन वाजला,
"हा बोल दिप्या !!"
"भाई !! इंजिनियरिंग कॉलेज मध्ये एडमिशन झालं तुझ्या भावाच !!"
"वाह !! अभिनंदन !!"
"तुझ काय ?? "
"नगरला बीससीला एडमिशन कन्फर्म झालंय !! " 
"वाह !! तुझंही अभिनंदन !! "
"कसल अभिनंदन !! इथ थर्ड लागलाय सगळा !! जायचं होत एमबीबीएसला आणि आता करतोय काय तर !!जाऊ दे !! परवा निघतोय नगरला !!"
"परवा ?? लगेच !!"
"हो !! आता वैताग आलाय इथला !! "
"कळलय बर मला तुझ आणि सायलीच !! आधीच मला विचारलं असतस तर एवढा मुर्खात नसता निघालास !!"
"काय करावं आता !! आपलंच नशीब !! "
"नशीब बिशिप काही नाही चुत्या आहेस तू!! "
"खरंय भावा !! पण आता तिला विसरण खूप अवघड आहे मला !!"
"काय !! अरे दे विषय सोडून !! असल्या कितीही आल्या नी गेल्या !! "
"मनापासून प्रेम केलं होत रे !!"
"बरं बरं !! ते जाऊदे देवदास !! जायच्या आधी एकदा भेटायला या !! "
"नको रे !! मला खूप आवरा आवर करायची आहे !! "
"काय भाई !! हीच का तुझी दोस्ती !!"
आकाश पुढे काहीच बोलत नाही. फोन ठेवून देतो.

कोणाशीही काहीच जास्त न बोलता आकाश आवरू लागतो. त्याला कधी एकदा नगरला जाईल अस झालेलं होत. त्याच्या मनात कित्येक विचारांचं चक्र घोंगावत होत. 
" आयुष्याच्या मुख्य वळणावर मी माती खाल्ली !! नको त्या लोकांच्या संगतीत राहिलो आणि स्वतःची अवस्था बेक्कार करून ठेवली. याला जबाबदार कोण ?? तेच ज्यांनी मला धोका दिला ,मला पावला पावलांवर अडवल !! ती सायली , ते कॉलेजचे शिक्षक अजून खूप आहेत !! त्या सायली सोबत तर मी एक्झाम वेळी सुद्धा बोलत बसलो !! माझी परवा केली नाही पण तिची काळजी केली मी !! वाटोळं करून घेतलं मी !! पण आता बास झालं !! अशा लोकांना आता माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही !! मी आता इथून निघून जातोय !! निघून जातोय !! कोणी नाहीये माझं इथे !! "

आकाश दोन तीन दिवसांनी नगरला जायला निघाला. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. बाबा त्याला सोडायला येणार होते. 

"आई !! बस् आता !! पुढच्या महिन्यात येतोय मी !!"
"पहिल्यांदा घरापासून एवढं लांब राहणार आहेस !! काळजी घे पोरा !! "
"हो आई !! रडू नकोस आता !!"

बाबा आणि आकाश त्या संध्याकाळी नगरला पोहचले. बॉईज हॉस्टेलवर आकाशची राहायची सोय झाली होती. बाबांनी त्याची सगळी सोय व्यवस्थित आहे ते पाहून त्याला नीट राहण्याचा सल्ला दिला. अभ्यास कर !! म्हणून सांगितलं. आणि बाबा पुन्हा गावी परतले.

आकाश एकटाच बॉईज हॉस्टेलच्या खोलीत कित्येक वेळ पडून राहिला. समोर अजून दोन कॉट होते. त्यावर कोणाचं तरी सामान अस्ताव्यस्त पडलेल त्यानं पाहिलं. रात्री नवाच्या पुढे कोणीतरी जोरात खोलीचा दरवाजा उघडला, आकाश दचकला , समोर कोणीतरी आहे हे पाहून त्याच्याकडे पाहून हसला,

"ये !! हाय!! न्यू एडमिशन ??"
आकाशने होकारार्थी मान हलवली.
"मी सदानंद दाते !!  बीएसस्सी सेकंड ईअर !!"
"मी आकाश देशपांडे !! मूळचा मी बार्शीचा आहे !!"
"अरे वां !! मस्तच !! लई भारी गाव आहे बार्शी तर !!"
आकाश फक्त त्याच्याकडे पाहत राहिला.  सदानंदने खिशातील मोबाईल काढत फोन लावला,
"ये गंग्या !! भावा आपल्या खोलीत न्यू एडमिशन आलाय !! ये पटकन ये !!"

सदानंदने फोन ठेवला. आणि कित्येक वेळ आपल्या कामात व्यस्त राहिला. समोरून पुन्हा कोणीतरी आतमध्ये आले,

"न्यू एडमिशन ??"
आकाश फक्त त्यांना होकारार्थी मान हलवत असे. अश्यात रात्रीचे बारा वाजले. आकाश हॉस्टेलच्या मेसवर जेवण करून येतो. तिथेही त्याला सतत तोच प्रश्न विचारला जात असे. "न्यू एडमिशन ??" आकाश फक्त मान हलवत असे.

रात्रीच्या एक दीडच्या सुमारास आकाश आणि सदानंद झोपलेले असताना कोणतरी हळूच आकाशच्या जवळ येऊन त्याला उठवू लागलं.
आकाश दचकून जागा होतो. समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती पाहून घाबरतो. 
"आकाश ??"
"हो !!"
"न्यू एडमिशन ??" 
आकाश पुन्हा मान होकारार्थी हलवतो. 
"आता तुझं काही खर नाही!!" आणि तो जोरजोरात हसू लागतो.

"ये गंग्या उगाच नको भीती घालू रे पोराला !! मुतल ते चड्डीत !!" सदानंद खोलीची लाईट लावत म्हणाला. 
गंग्या जोरजोरात हसू लागला.

"अरे भावा !! नव्या दोस्त लोकांचं स्वागत तरी करू दे की मला !!"
" हे अस !! पोरगं मरल की!!"
"ये आपूनका स्टाईल आहे !! बरं भावा माझं नाव गणेश देशमुख !! सगळे दोस्त आपल्याला गंग्या म्हणतात !! "
आकाश डोक्यावरचा घाम पुसत त्याच्याकडे बघून हसतो. 

आकाशच्या आयुष्यात पुन्हा नवे वळण येते. त्याला आता आई बाबांपासून दूर राहावं लागतं होत. त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. नवे मित्र , नवे शहर आणि नवे ध्येय त्याच्या सोबत होते.

क्रमशः


वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||



भाग १२ 

वास्तवाशी सामना

"मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!"
सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता, 
"चांगला मित्र म्हणत असतीस तर माझ्यापासून काही लपवलं नसतं तू !! मीही मूर्ख तुझ्या प्रेमात पडलो !! मला वाटलं ही सायली फक्त माझी आहे !! माझ्यासाठी वेळ काढते !! माझ्यासाठी, माझ्या काळजीपोटी मला बोलते ,मेसेज करते !!"
सायली आकाशचा मेसेज वाचून कित्येक वेळ त्याला रिप्लाय करतच नाही, तिला मनातुन कळून चुकल होत की आकाशला आपल्या प्रेमाबद्दल कळलं आहे. पण ती कळूनही न कळल्या सारखे करत होती.
"बाकी काही बोलू नकोस !! तुझ माझ्यावर प्रेम आहे की नाही ते सांग ??" आकाश तिला पुन्हा विचारतो. 
"आकाश अरे !! आपण खूप चांगले मित्र आहोत रे !!"
"मित्र ?? सगळ्यांपासून चोरून मला भेटायचं !! आपल्याबद्दल कोणाला काही बोलायचं नाही !! सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त बोलत राहायचं !! नाही बोललो तर राग येतो !! नाही भेटलो तर राग येतो ! प्रत्येक सेकंदाला मिस यू पाठवायच !! आणि आपण फक्त मित्र ??"
"पण मी कधी म्हणाले का तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ??"
आकाश पुढे काही बोललाच नाही. थोड्या वेळाने सायलीचा पुन्हा मेसेज आला.
"आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढलास तू !!!"
आकाशने मेसेज पाहताच रिप्लाय केला. 
"हो नक्कीच !! पण ज्याच्यावर तू मनापासुन प्रेम करते आहेस त्यालातरी सगळं खर खर सांग !!! अस माझ्या सारखं अंधारात ठेऊ नकोस त्याला !!"

आकाश आणि सायली रात्रभर चॅटिंगवर बोलत राहतात. सकाळ होते आई बाबा त्याला उठवायला येतात. तरीही तो खोलीतून बाहेर येत नाही. त्याचा राग काही केल्या शांत होत नाही. आपल्याला सायलीने फसवल एवढंच त्याच्या डोक्यात फिरत होत. त्यामध्ये तो आज आपला रिझल्ट आहे हेही विसरून गेला होता. कित्येक वेळ तो आपल्या खोलीतून बाहेरचं आला नाही. 

थोड्या वेळाने त्याच्या खोलीचा दरवाजा आईने ठोठावला. पटकन त्याने दरवाजा उघडला, दरवाजा उघडताच जोरात त्याच्या गालावर चपराक बसली, क्षणभर तो सुन्न झाला, समोर आईला पाहून म्हणाला,
"काय झालंय आई ??"
"काय झालंय ! लाज कशी वाटत नाही तुला विचारायला !! काय कमी केल होत तुला, म्हणून तू असे आमचे पांग फेडले !!"
"काय ??" आकाश पुन्हा पुन्हा आईला विचारतो.
"रिझल्ट लागलाय तुझा हे तरी माहिती आहे का ?? पंचावन्न टक्के पडलेत फक्त तुला !! "

आईच्या तोंडून रिझल्ट ऐकताच आकाश सुन्न झाला. पलंगावर मटकन बसला. त्याला आईला काय बोलावं काहीच कळलं नाही. पुन्हा सावरत त्याने आईला विचारलं, 
"कोणी सांगितलंय तुला हे !! माझा नसेल हा रिझल्ट !!"
"बाबांनी पाहिलाय !! लाज वाटली त्यांना सगळ्या ऑफिस मध्ये तुझी !! काय कमी केल आम्ही तुला , न मागता मोबाईल दिला, तुझ्यासाठी वेगळी खोली दिली, का ?? तर साहेबाना शांत अभ्यास करता यावा म्हणून !! पण तू काय केलंस ?? सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलस तू !! "
आकाश आईच बोलणं गप्प बसून ऐकत होता. पुन्हा पटकन उठला मोबाईल हातात घेऊन रिझल्ट पाहू लागला. 
"गेली तीन ते चार वर्ष झाली !! मी आणि तुझ्या बाबांनी पै न पै गोळा केले !! तुझ्या भविष्यासाठी !! बाबांना मिळालेला बोनस त्यांनी तसाच जपून ठेवला!! तुझ्या भविष्यासाठी !! मित्र म्हणत असतील तुला !! खूप श्रीमंत आहेस तू म्हणून , पण त्यांनी तुझ्या बाबांच्या पायातली फाटकी चप्पल कधी पाहिली नसेल. कशासाठी ती फाटकी, तर तुला काही कमी पडू नये यासाठीच !! फसवलस तू आम्हाला आकाश !! फसवलस !!" 
आई भरल्या डोळ्यांनी खोलीतून निघून गेली. आकाश मात्र सुन्न होऊन पलंगावर पडून राहिला. त्याचा वास्तवाशी सामना झाला होता. हेच खरे सत्य होते. मोबाइलच्या खोट्या जगात, नग्न स्त्रियांच्या फोटो असलेल्या जगात, पोर्न व्हिडिओज मध्ये , आणि सतत हस्तमैथुन मध्ये त्याला हे सत्य कधीच दिसलं नाही. पण तरीही तो या सगळ्या गोष्टींना दोष देतच नव्हता. कारण लागलेल्या व्यसनापासून त्याला दूर जायच नव्हत. कितीही हे वास्तव प्रखर असल तरी त्याला ते खोटं जगच आवडू लागलं होत. 

पुन्हा आकाशने हस्तमैथुन केल. क्षणभर सुखासाठी या वास्तवाला विसरण्यासाठी तो त्यात आनंद शोधत राहिला. पण परोमाच्च आनंद मिळाल्या नंतर पुन्हा तो तिथेच आला जिथे त्याचा वास्तवाशी सामना झाला होता. 

तो संपूर्ण दिवस आकाश खोलीतून बाहेर आलाच नाही. कोणत्या तोंडाने आपण बाबांशी बोलावं हाच त्याला प्रश्न पडला होता. ज्या बाबांनी त्याला सांभाळून घेतलं, वेळोवेळी त्याची पाठराखणं केली त्या बाबांसमोर आता कसं जावं हाच त्याला प्रश्न पडला होता. 
त्या रात्री उशिरा बाबा घरी आले. त्यांना पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आले, तिला पाहून ते लगेच म्हणाले,
"साधना !! रडू नकोस !! एवढं काही झालं नाहीये !!"
"काहीच झालं नाही?? आहो नापास झाला असता तरी चाललं असतं हो आपल्याला !! पण हे अस पास होन ??"
"प्रत्येकवेळी आयुष्यात यश येईलच असं थोडीच असत !!" बाबा आईला सावरत म्हणाले.
"हो पण हा त्याच्या आयुष्याच्या टर्निंग पॉइंट !! आणि त्याने नेमकी आत्ताच कच खाल्ली !! इतका हुशार तो !! काय झालंय त्याला ??"
"साधना !! कधी कधी प्रवाहात पडतो मागे माणूस ! !! "
"तुम्ही मला नका सांगू ,पण तुमच्याही डोळयात मला स्पष्ट दिसते आहे नाराजी , आपलं स्वप्न भंग झाल्याचं दुःख !!"
"दुःख तर आहेच साधना !! पण रागावून सत्य बदलणार आहे का ??"
"हो पण मग व्यक्तही व्हायचं नाही का ??"
" नक्की हो !! पण उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस !!"
बाबा आईला जवळ घेत म्हणाले. नकळत त्यांच्याही डोळ्यातून एक अश्रू ओघळला पण त्यांनी तो आईला कळण्याच्या आत पुसला. त्यानंतर त्यांनी आपलं मन खंबीर केल. कित्येक वेळ आईला बोलत बसले.
"मगाशी रागाच्या भरात मी त्याला थोबाडीत मारली !! "
"तूपण ना साधना !!! "
"सकाळपासून जेवायला पण नाही आला तो !!" आई डोळे पुसत म्हणाली. 
"काय ??" बाबांनी आश्चर्याने विचारल. 
सकाळपासून आकाश जेवलाही नाही हे कळताच बाबा तडक त्याच्या खोलीत गेले, समोर बाबांना पाहून आकाश पटकन उठला. बाबांच्या डोळ्यात पहायची सुद्धा त्याला हिम्मत होत नव्हती. 
"काय रे ! सकाळपासून जेवणं केल नाहीस ते ??"
"भूक नाहीये !! " आकाश तुटक बोलला.
"का भूक नाहीये ?? चल पटकन जेवायला !! आईच्या बोलण्याच एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! तुझ्या काळजीपोटी बोलली ती !!"
"तस काही नाहीये बाबा !! "
"मग कस आहे?? उगाच काही कारण सांगू नकोस चल जेवायला !! मी फ्रेश होऊन आलो मग बसू आपण जेवायला !!" 
बाबा खोलीतून बाहेर गेले. आकाश मात्र तसाच बसून राहिला, विचार करत,

"डॉक्टर व्हायचं होत मला !! आता हे मार्क्स बघून कोणी कंपाऊंडर म्हणून तरी घेईल का ही शंका वाटायला लागली आहे !! डॉक्टर होन या आयुष्यात शक्य नाही !! अभ्यास न करून मी माझ्या आयुष्याची माती केलीये एवढं मात्र नक्की आहे !! माझ्या आईचं , माझ्या बाबांचं मी स्वप्न मोडल हे सर्वात जास्त मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील, त्याच दुःख माझ्या प्रत्येक क्षणात मला सलत राहील. हे दुःख आयुष्यभर माझी साथ देईल !!"
आकाश आपल्या मनात कित्येक गोष्टी साठवू लागला.
"आकाश !! चल जेवायला !! " बाबा पुन्हा आकाशला बोलवायला आले. 
जड पावलांनी तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला. समोर बसलेल्या आई बाबांपासून आपली नजर चोरत तो जेवत होता. बाबांच्या हे लक्षात आलं,
"आकाश !! झालं गेलं आता सगळं विसरून जायचं !! नव्यानं सुरुवात करायची !! "
आकाश काहीच बोलत नाही. 
"ठीक आहे डॉक्टर नाही होता आल तर काय झालं !! जगात कित्येक अश्या गोष्टी आहेत त्या तू करू शकतो !!"
"पण बाबा हे असले मार्क्स पाहून कोण मला एडमिशन देईल ??"
आकाशच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
"अरे !! अस थोडीच आहे !! मिळेल एडमिशन !! नकोस चिंता करू !! " मध्येच आई त्याला बोलते.
आईच्या या वाक्याने आकाशला क्षणभर का होईना बर वाटलं. 
"आता हा विषय बंद करा !! जे आहे ते मान्य करा !! आकाश आता तुझ्या हातात आहे !! तुला भविष्यात काय करायचं ते !! आता तू ते ठरव !!! "

आई बाबांच्या या बोलण्याने आकाशला मनातून थोडा आधार वाटला. आपण चुकलो याची त्याला जाणीव झाली. खोलीतल्या पुस्तकांना पाहताना त्याच्या मनात कित्येक विचार येत राहिले आणि तेवढ्यात मेसेज आला,
"तुला वाटते तशी मी नाहीये रे आकाश !!"
आकाश मेसेज वाचताच मनात एक निर्धार करतो आणि रिप्लाय करतो,
"आयुष्यात खूप माणसे नकळत आपल्या जवळ येतात ! त्यातीलच माझ्या आयुष्यात आलेली तू एक !! पण आता मला विसरून जा सायली !! मी तुझ्यासाठी मेलोय अस समज !! आपण दोघे यापुढे कधीही नाही बोललो तर तेच उत्तम आहे !!"
आकाश सायलीला मेसेज करताच , त्यानंतर तिचा नंबर डिलीट करतो. मोबाईल बाजूला ठेवून देतो आणि पलंगावर पडताच झोपी जातो, पुन्हा नव्या आयुष्याच्या मार्गावर जाण्यासाठी.

क्रमशः

वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||



भाग ११

दिवसा मागून दिवस निघून जात होते, रिझल्टची वेळ जवळ आली होती. पण आकाशला वेगळीच ओढ लागली होती,
"सायली सोबत गप्पा मारताना, तिच्या सोबत बाहेर कुठे असताना मला जणू एक पूर्णत्व येत. कोणतंही टेन्शन असू दे तिचा एक मेसेज तेवढ्यात आला तर सगळं टेन्शन कुठच्या कुठे निघून जात. पण हे तिलाही वाटतं असेलच ना?? तिलाही माझ्याबद्दल त्याच फीलिंग्ज असतील ना ?? उगाच नाही आम्ही दोघे एकमेकांत इतके गुंतून गेलो. पण मी माझ्या मनातलं सांगू तरी कस तिला, हेच मला कळत नाहीये !! " आकाश विचार करत असतानाच सायलीचा त्याला मेसेज येतो,
"हाय !! बिझी आहेस का ??"
आकाश मेसेज पाहून रिप्लाय करतो,
"आता कसलं काम !! निवांत आहे. !!"
"तरीपण विचारावं म्हटलं !! असही मला कोण आहे दुसरं तुझ्याशिवाय बोलायला !!"
"का ?? कोणीच नाही ??"
"नाहीना !! "
"बर बर !!"
मेसेज टाईप करत असतानाच मध्येच दिपकचा फोन येतो. फोन उचलत आकाश बोलतो,
"बोल दिप्या !! "
"भाई परवा आपला रिझल्ट लागतोय !! "
आकाश हे ऐकताच क्षणभर शांत झाला. त्याला काय बोलावं काहीच कळेना,
"आकाश !! ऐकतोस ना ??"
"हा बोल बोल !! कोणी सांगितलं ??"
"टीव्हीवर बातमी आली सकाळीच !! यावर्षी म्हणे लवकर लागणार आहे निकाल !! "
"कन्फर्म ना ??"
"हो !!  बरं ऐक उद्या आपण सगळे भेटतोय !! आपल्या शाळेच्या जवळचा कट्टा आहे ना तिथे !! ये वेळेवर !!"
"बरं येतो !!"

फोन ठेवताच आकाश पुन्हा मोबाईलवर चॅटिंग सुरू करतो. मेसेज टाईप करत असतानाच खोलीत बाबा येतात,
"ये आकाश !! परवा तुमचा रिझल्ट आहे म्हणे !!हे बघ टीव्हीवर सांगतायत !! "
"हो बाबा !! कळलय मला ते आधीच !!"
"बरं ऐक ना !! तुझा रोल नंबर !!बाकी डिटेल्स देऊन ठेव मला !! मला खात्री आहे तू बोर्डात नक्की येणार !! ऑफिस मध्ये सगळ्यांना रिझल्ट दाखवता येईल !!"
आकाश मोबाईल बाजूला ठेवत बोलतो,
"काही गरज नाही बाबा कोणाला रिझल्ट दाखवायची !!"
"अस काय करतोस !! देना !! " बाबा आकाशची कॉलेज बॅग जवळ घेतात. वरच्या कप्प्यात त्यांना हॉल तिकीट सापडते.
"हेच आहे ना !!"
"हो बाबा !! पण मलाही डिटेल्स लागतील ना !!"
"काही गरज नाही !! मीच तुला रिझल्ट सांगतो !! "बाबा खोलीतून बाहेर जात म्हणाले. 

बाबांनी हॉल तिकीट घेऊन गेल्यानंतर आकाशला अजून जास्त टेन्शन यायला लागत. व्यक्ती जगाला कितीही फसवू शकली तरी ती स्वतः ला कधी फसवू शकत नाही. असच काहीस आकाश सोबत झालं होत. रात्रभर तो झोपलाच नाही. त्याच्या मनात विविध विचार येऊ लागले. पण त्यातूनही सायली आणि त्याची चॅटिंग काही थांबली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आकाश अंघोळ करून, नाष्टा करून आपल्या खोलीत येऊन बसला. आई बाबांशी बोलणं त्यानं टाळल. पण आई बाबाना मात्र त्याच्या रिझल्ट बद्दल खूप उत्सुकता होती. आकाशच्या आयुष्यातील हे नवे वळण आहे अस त्यांचं मत होत. 

आकाश खोलीत बसून मात्र गेम खेळण्यात दंग झाला होता. दिपकचा फोन आला तेव्हा त्याच्या लक्षात आल की  आज त्यांना भेटायचं होत. धावत पळत आकाश आवरून मित्रांना भेटण्यासाठी निघतो. जाताना बाबांना आणि आईला यायला उशीर होईल म्हणून सांगतो. शाळेच्याजवळ असलेल्या कट्ट्यावर आकाश येऊन पोहचतो. दिप्या सुश्या ,पक्या आणि खूप दिवसांनी आलेला मित्र मंदार त्याला भेटतो.

"मग मंदार !! खूप दिवसांनी हा !! कुठे असतोस हल्ली !!" आकाश समोर ठेवलेली कॉफी पित म्हणाला.
"बाहेरगावी गेलो दहावी नंतर शिकायला !! त्यामुळे कोणाशी भेटणं होतंच नाही !! तुम्ही सगळे नेहमी भेटता अस दिप्या म्हणाला!! म्हणून आज आवर्जून त्याला म्हटलं भेटुयात !!"
"ओके !! पण बर वाटलं भेटून !! आमचं काय !! सगळे आम्ही शाळेतून वेगळे झालो पण मैत्री तशीच अजूनही !! काय रे दिप्या !!"
आकाश दिपकला डिवचत म्हणाला. दीपक मात्र मोबाईल मध्ये चॅटिंग करत असतो.
"बाकीचे कोण कोण आहेत अजून काँटॅक्ट मध्ये ??" मंदार आकाशकडे पहात म्हणातो. 
"बाकीचे बघ ,इथे आहेत ते तुम्ही सगळे !! बाकी मुलीत म्हणशील तर नेत्रा, दीप्ती आणि हो सायली एक !!"
"सायली तर सगळ्यांच्या काँटॅक्ट मध्ये आहे !!"
मंदार अस म्हणताच आकाश क्षणभर गप्प बसतो. शेजारी बसलेल्या दिपकचा मोबाईल हातात घेत त्याला बोलतो,
"आम्हाला भेटायला बोलावून तू स्वतः चॅटिंग करत बसलाय ! याला काय अर्थ आहे !! बघू तरी कोणाला बोलतोयस !!"
आकाश मोबाईल मध्ये पाहतो. सायलीच नाव ऐकून चकित होतो. दिपककडे पहात म्हणतो,
"सायली ??"
"हा ना भाई !! आज गेली बॉयफ्रेंडला भेटायला !! तिला ये म्हटलं होत तर काहीही कारण सांगते म्हणून जरा खीचाई करत होतो !!"
आकाश दिपकने जे सांगितल ते ऐकून चकित झाला. त्याला दिपकच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्याला गुदमरल्या सारखं वाटायला लागलं. पण त्याला दीपक बोलतोय यावर अजूनही विश्वास बसत नव्हता. 
"काहीही काय बोलतोय दिप्या !! सायली चांगली मुलगी आहे रे !!"
दीपक जोरात हसला आणि आकाशच्या हातातील मोबाईल घेत त्याला दाखवू लागला,
" हे बघ !! त्यांचे फोटो !! हा त्यांच्या कॉलेज मधला !! हा त्यांच्या पार्टीतला ! क्लासमेट आहे तिचा गेली दीड वर्ष झाली रीलेशनशिप मध्ये आहेत ते !! "
आकाश शांत होऊन सगळं ऐकत होता.
"बघू रे फोटो !! " समोर बसलेला मंदार मोबाईल घेत म्हणाला.
"मध्ये भेटायला आली होती तेव्हाच ओळखल मी !! म्हटलं उगाच नाही ही पोरगी आपल्याला सारखं भेटायला या म्हणत !!"
"म्हणजे !" पक्या मध्येच विचारतो. 
"अरे त्यानिमित्ताने त्याला भेटायला जाता येत ना हिला!! आधी काय करायची आपल्याला भेटायची!! आणि मग त्याच्याकडे जायची !! "
"भारीच की !! पोरगी लई पुढची निघाली राव !!" पक्या हासत म्हणाला.
"मला आधी वाटलं या आकाश सोबतच हीच काहीतरी आहे !! पण नंतर सगळा घोळ लक्षात आला !!"
"मलापण आधी तसच वाटलं होत बरं का !! पण डायरेक्ट कस विचारू म्हणून बोललो नाही !!" मंदार मध्येच बोलला. 
"बरं घरी तिला नीट बोलता येत नाही, चॅटिंग करता येत नाही !! म्हणून ही शहाणी काय करते माहिती का ?"
"काय काय ??" पक्या उत्सुकतेने विचारतो. 
"ही आपल्याला पण चॅटिंग करत बसते!! चार पाच मित्रांसोबत चॅटिंग केली आणि जरी घरच्यांनी पहिली तरी त्यांना वाटत मित्रांशी बोलत बसते म्हणून !! त्या दिप्तीला विचार की तिला तर फुल्ल पिडते !!"
दीपक सगळं मजा घेत सांगत होता. 
"पण दिप्या हे सगळं तुला कस माहिती ??मला नाही वाटत तिने तुला हे सगळं सांगितलं असेल म्हणून !!" पक्या म्हणतो. 
आकाश मात्र गप्प बसून सगळं ऐकत होता. 
"अरे काय झालं !! एक रात्री चॅटिंग झाली आणि मी गुड नाईट म्हणालो!! तर ही समोरून म्हणे गुड नाईट लव यू टेक केअर !! बरं थोड्या वेळाने पुन्हा तिचाच मेसेज आला सॉरी दीपक चुकून तुला लव यू सेंड झालं !! बर मग मी म्हटलं , खर खर सांग कोणाला पाठवणार होतीस !!मी कोणाला काही म्हणणार नाही , आणि नाही सांगितलं तर हा स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकेन !! तेव्हा कुठं सगळं मला कळलं !!"
आकाशने हे सगळं ऐकताच त्याच्या जणू पायाखालची वाळूच सरकली, तो कोणालाही काहीच बोलला नाही , तडक तो घरी निघून येतो,आपल्या खोलीत स्वतः ला कोंडून घेतो. 

"किती मूर्ख आहे मी !! खरच मला आता काय करावं काहीच कळत नाहीये !! मुर्खासारख त्या सायलीवर मी प्रेम करायला लागलो होतो. पण खरतर यात माझी काय चूक ?? " आकाशला हे सगळं ऐकून राग अनावर झाला. त्याच्या मनात कित्येक विचार येऊ लागले. 
"दिवस बघितला नाही !! रात्र बघितली नाही या सायलीला बोलताना मी !! सतत मिस यू म्हणणारी!! आयुष्यात प्रत्येक गोष्ट पहिले मी तुलाच सांगते अशी म्हणणारी ती माझी सायली असूच शकत नाही !! पण मग ते फोटोज् खोटे नाहीत ना बोलत ! !! नाही नाही नाही !! आकाश तू चुत्यात निघाला आहेस !!  तीच गोड बोलणं हे तिच्या स्वार्थासाठी होत आकाश !! फक्त ती तिचा स्वार्थ बघत होती!! तू मूर्ख आहेस जो तिच्या गोड गोड बोलण्याला भुललास !! " 
आकाशच्या डोळ्यात पाणी होत. तो बेडवर पडून विचारात मग्न होता. 

विचारांच्या तंद्रीत असताच मेसेज टोन वाजते, आकाश मेसेज पाहतो,
"हाय !! आज मी नाही येऊ शकले भेटायला !!घरी आई बाबांनी सोडलच नाही मला !! "
आकाश मेसेज वाचून मोबाईल ठेवून देतो. पुन्हा मेसेज येतो,
"बिझी आहेस का ??" आकाश पुन्हा मेसेज वाचून ठेवून देतो.
"सांग ना ??"
आकाश रागात बेडवर उठून बसतो आणि टाइप करायला लागतो,
"का करू मी रिप्लाय !! कोण आहेस तू माझी ??"
"म्हणजे ??" सायली लगेच रिप्लाय करते.
"आपल्यात नात कोणतं ??"
"मैत्रीचं !!"
"मैत्रीचं !! दिवस रात्र चॅटिंग करत बसायचं !! मिळेल तेव्हा भेटायचं !! सतत डोक्यात बोलणं एवढच ठेवायचं !! आणि फक्त मैत्री ??"
" हो !! मग अजून काय असणार !!"
"सायली मी डायरेक्ट बोलतो !! आय लव्ह यू !! तुझही माझ्यावर प्रेम असेलच ना?? नाही कारण सारखं मला मिस करत असतेस म्हणून विचारलं ??"

आकाशचा मेसेज वाचून सायलीने कित्येक वेळ रिप्लाय केलाच नाही. आकाश मात्र वेड्यासारखं तिच्या रिप्लायची वाट पाहत राहतो. या सगळ्या भानगडीत रात्र केव्हा होते त्यालाही कळतं नाही. बाबा खोलीत येऊन त्याला जेवायला चल म्हणून आग्रह करतात. पण आकाश काही केल्या जात नाही. त्याच्या मनातून दिपकने सांगितलेलं जाता जात नाही. ते शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवत राहतात. पण आकाश मात्र अजूनही मनातून सायलीच्या होकाराची वाट पहात राहतो. त्याला मनापासून वाटतं की दिपकने सांगितलेलं सगळं खोटं असावं. सायलीने मनापासून माझ्यावर प्रेम करावं हेच त्याला वाटत राहतं.

मध्यरात्र झाली तरी आकाश जागाच होता. दोन दिवस झाले त्याने नीट झोपही घेतली नव्हती, पण उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीन खोटं बोलून आपल्याला फसवल याची खंत त्याला काही झोप येऊ देत नव्हती. एकटक तो खिडकीतून बाहेर पाहत विचारत करत बसतो, आपण किती मुर्खात निघालो याच विचारात असतानाच मोबाइलमध्ये मेसेज येतो,

क्रमशः


वर्तुळ || कथा भाग १० || कथा एका मुलाची ||



भाग १०

कथा एका मुलाची

दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो. पेपरला लवकर जातो. पण मनात सायलीला भेटायला जायचं हे ठरवून जातो. काल सारखेच एक वर्गशिक्षक येतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देतात. आकाश पेपर लिहू लागतो. पण त्याच लक्ष पुन्हा पुन्हा मनगटावरच्या घड्याळात राहत. त्याला लवकर पेपर लिहून सायलीला भेटायला जायचं होत. तिचा पेपर सुटण्या अगोदर त्याला तिथे पोहचायच होत. जे येत ते लिहून त्याने पेपर पूर्ण केला. फक्त म्हणण्यासाठी पेपर पूर्ण केला. चूक की बरोबर याचा कोणताच विचार त्याने केला नाही. आलेला पेपर फक्त दिला एवढंच त्यातून वाटतं होत. शेवटची पंधरा मिनिटे राहिली, बेल होताच आकाशने पेपर वर्गशिक्षक यांच्याकडे दिला आणि धावत तो कॉलेजमधून बाहेर पडला. त्याच्या कॉलेजपासून सायलीचे कॉलेज दहा ते पंधरा मिनिटांवर होत. आकाश धावत कॉलेजच्या गेटवर येतो. त्याला सेक्युरिटी गार्ड काही केल्या कॉलेजमध्ये सोडत नाही. तरीही तो वाट पाहत राहतो थोड्या वेळात पेपर संपल्याची घंटा वाजते.  त्यानंतर काही वेळात सायली गेटमधून बाहेर येताना त्याला दिसते. तिच्या जवळ जात आकाश तिला हाक मारतो,
"सायली !!"
सायली मागे वळून पाहते, समोर आकाशला पाहून आश्चर्यचकित होते क्षणभर पाहत बसते आणि बोलते,
"आकाश !! तू आणि इथ ??"
"हो मग !! कालपासून मी तुला किती मेसेज करतोय !! एकाही मेसेजचा रिप्लाय नाही ना काही नाही !!"
सायलीच्या मैत्रिणी तिच्याकडे पाहू लागतात. तिच्या ते लक्षात येताच ती आकाशला घेऊन बाजूला येते,
"पेपर आहेत आकाश !! अभ्यास नको करायला !! की चॅटिंग करत बसायचं !!"
"माझेही पेपर आहेत म्हणलं !! " आकाश नाराज होत म्हणाला. 
"हो आहेत ! पण तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे !! तू हुशार आहेस !! माझं अस नाहीना !! "
"काहीही !! सरळ सांग ना बोलायचं नव्हतं म्हणून !! "
"अस का म्हणेन मी आकाश !! " 
"हो मग एक मेसेज करायला काय झालं होत !! सांगायचं उद्या पेपर आहे अभ्यास करत होतीस म्हणून !!"
"आकाश काल मी कोणालाच बोलले नाहीये !! विचार हवं तर माझ्या मैत्रीणीना !!"
" त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही का ??"
"म्हणजे ??" सायली आकाशकडे पाहत म्हणाली. 
"काही नाही जाऊदे !! भेटावसं वाटलं म्हणून आलो !!बाकी काही नाही !!"
"पेपर एवढ्या लवकर सुटला तुझा ??"
"हो ! लवकर झाला पूर्ण म्हणून आलो लवकर !! "
"छान !! बरं चल निघते मी !! बोलुयात आपण नंतर !! "

सायली आकाशकडे न पाहताच निघून गेली. आकाश तिच्याकडे पहात राहिला. त्याला पुढे काय बोलावं काहीच सुचेना. त्याच्या मनात सायली आपल्याशी इतकी रुक्ष का वागली हेच होत. घरी आल्यावरही आई बाबांशी बोलताना त्याच्या मनात सायलीचाच विचार घोळत होता. उद्या कोणता पेपर असेल हेही तो आता विसरून गेला होता. त्यानंतर सायली जवळजवळ आकाशला चॅटिंगवर एकही शब्द बोलली नाही. तिने फक्त त्याचे मेसेज वाचले. परीक्षेचे हे दिवस असेच गेले. आकाश परिक्षेपेक्षा सायली आणि तिचा तो अबोला यातच जास्त गुरफटून राहिला. त्याच्या मनात मात्र नाना प्रकारचे विचार येऊ लागले,

"कालपरवा पर्यंत मला सारखी बोलणारी सायली अचानक मला का बरं बोलत नसेल. त्या दिवशी मी तिच्या कॉलेजवर जाऊन चूक तर नाहीना केली? कदाचित त्याचाच तिला राग आला असणार. पण मग मी तरी काय करू?? मला नाही राहावत आता तिच्याशिवाय कस समजावून सांगू तिला की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते !! पण अशी ती गप्प बसल्यावर मी बोलू तरी काय आता ??" 
आकाशच्या या विचारात त्याची एक्झाम दिवस न दिवस पुढे सरकत केव्हा संपली त्यालाही कळलं नाही. आता त्याची एन्ट्रांस एक्झाम साठी तयारी सुरू झाली. परीक्षेनंतर महिना उलटून गेला. एका सकाळी त्याला दीपकचा फोन आला,
"बोल दिप्या !! "
"काय भाई ! झाली ना एक्झाम !! फोन नाही अजून !! आहेस कुठे ??"
"एन्ट्रांस एक्झामची तयारी करतोय !!"
"आहेच का अजुन !! छान !!"
"बोल ना कशाला फोन केलास ते ??"
"अरे आज सगळे भेटणार होतो आम्ही, म्हटलं येणार का विचाराव !!"
"कोण कोण आहेत ??"
"सगळेच !! मी पक्या , सायली , सुश्या आणि आपले अजून दोघे तिघे मित्र येतायत दहावीचे !!"
"मी नाही येत दिप्या !! मला नाही जमणार !!"
"का रे भाई !! ये ना एका तासाने काय फरक पडतो !!"
"नाही नको दिप्या !!तुम्ही करा एन्जॉय !! "

आकाश फोन कट करतो. त्याच्या मनात जायची खूप इच्छा असूनही तो जात नाही. रात्री आई बाबांसोबत तो जेवण करायला बसतो, अबोल राहतो, बाबांना ही गोष्ट लक्षात येते जेवण करता करता ते त्याला विचारतात,

"आकाश ! झाली ना रे परीक्षा आता !! मग आता कसलं टेन्शन घेतोस ?"
"कसलं टेन्शन ??" आकाश नजर चोरत बोलतो. 
"मग हल्ली मी पाहतोय तू गप्प गप्प असतोस !! जास्त कोणाला काही बोलत नाहीस !! आपल्याच खोलीत सारखा पडून असतोस. "
"अस काही नाही बाबा !! एन्ट्रांस एक्झाम जवळ आली आहे ना !! त्याच थोड मनात चालू होत!!"
"त्यात काय होत मग !! तू हुशार आहेस !! होईल सगळं ठीक !! बाकी प्रेमात वैगेरे नाहीस ना पडला कोणाच्या ??" बाबा मिश्किल हसत म्हणाले.
"प्रेमात आणि मी !! " आकाश चकित होऊन बाबांकडे पाहत राहतो. 
"हो मग !! अस म्हणतात की एका वयानंतर बाप लेकाच नात हे दोन मित्रांसारखं असावं!! त्यामुळे तस काही असेल तर मला नक्की सांग बर !!"
"काहीही काय बाबा ! अस काही नाहीये !! "
आकाशला खरतर बाबांच्या या बोलण्याने मनाला धीर दिल्यासारख वाटलं. आपले बाबा आपल्याला समजून घेतात याची जाणीव त्याला झाली. 

रात्री आपल्या बेडरूम मध्ये आल्यानंतर आकाश मोबाइलवर गेम खेळत बसला. त्याच्या समोर पुस्तके तशीच पडून होती. गेम खेळून झाल्यावर मोबाईल बाजूला ठेवत असताना मेसेज टोनने त्याच लक्ष पुन्हा मोबाईलमध्ये गेल, मोबाईलमध्ये पाहताच त्याला क्षणभर आनंद , सायलीचा त्याला मेसेज आलेला होता. 
"आज तू भेटायला का आला नाहीस ??"
आकाश मात्र मेसेज पाहूनही खूप वेळ रिप्लाय करत नाही. पण पुन्हा सायलीचा त्याला मेसेज येतो,
"खूप दिवस झाले बोलणं झालं नाही आपलं !! आणि त्या दिवशी कॉलेज समोर तुझ्याशी मी खूप रुडली बोलले ! पण एक्झाम मध्ये मला बोलताच आल नाही. मला माहित होत तू मला भेटायला आलास पण माझ्या अश्या वागण्यामुळे तुला नक्कीच हर्ट झालं असणार ते !! एम रिअली सॉरी !"
आकाश मेसेज वाचून म्हणतो, आज आठवण आली का माझी , मी नाही रिप्लाय करणार,पण पुन्हा मेसेज येतो,
"एक्झाम संपल्यावर मी तुला फोन करणार होते ! पण म्हटलं प्रत्यक्ष भेटून तुझा राग घालवावा ! आज तेच मी ठरवलं होत !! पण तू आलाच नाहीस !! प्लिज रिप्लाय कर !!"
आकाश न राहवून मेसेज टाईप करू लागतो,
"राग येणार नाही तर काय होईल सांग ना !! अस अचानक बोलायचं बंद केल्यावर मी काय समजायचं ??"
"मी म्हटलं ना माझं चुकलं म्हणून !!" 
"सारखं नकोस माफी मागुस !! पण मला सांग माझी काय अवस्था झाली होती माहितेय तुला !! कुठच लक्ष लागत नव्हतं माझं !! "
"आता लागेन ना लक्ष ??"
"नाही माहित मला !! पण अस एकदम बोलणं बंद केलंस तर काय करणार मी !!"
"बरं जाऊदे !! आता आपलं सगळं पूर्वीसारखं असू दे !! बेस्ट फ्रेंड्स सारखं !!ओके ??" सायली प्रेमाचे इमोटिकॉन पाठवत विचारते.
"ओके !! " आकाश स्माईलचे एमोटिकॉन पाठवत म्हणाला. 

त्या दिवसापासून आकाश आणि सायली पुन्हा पहिल्या सारखे रात्रंदिवस मोबाईलवर चॅटिंग करू लागले. आकाशही जुन्या गोष्टी विसरून सायली सोबत बोलू लागला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची एन्ट्रांस एक्झाम झाली. आता फक्त त्याला त्याच्या रिझल्टची चिंता लागली होती. पण तेही तो सायली सोबत बोलत विसरून जात होता. आज तिला मनातले सांगेन उद्या तिला मनातलं सांगेन यातच त्यांचे दिवस जात होते. आता दोघे चोरून कोणालाही न सांगता कॉफी प्यायला भेटत होते. जणू दोघांचे एक वेगळच जग तयार झाले होते. 

सगळं काही ठीक चालू होते. पण आकाशला एक चिंता राहून राहून वाटत होती आणि ती म्हणजे त्याच्या निकालाची, पाहता पाहता निकालाचे दिवस जवळ येऊ लागले. आई बाबा आकाशच्या भविष्याचा विचार करू लागले, कोणत्या कॉलेज मध्ये जायचं , पुढे पदवीचे शिक्षण कोणत्या शहरात करायचं, पण आकाश यापासून वेगळाच होता ,कारण तो आता सायलीच्या जगात हरवून गेला होता, सायली सोबत चॅटिंग, मोबाईलमध्ये पोर्न व्हिडिओज पाहणे आणि त्यानंतर हस्तमैथुन करून आपल्या शरीराला सुख देणे यामुळे आकाश अनिभिज्ञ होता आपल्या वास्तवापासून, पण तरीही ती चिंता त्याची पाठ सोडत नव्हती, कारण ते सत्य होते.

क्रमशः

वर्तुळ || कथा भाग ९ || वेगळी एक कहाणी ||



भाग ९

वेगळी एक कहाणी

आकाश फोनमध्ये पाहताच लगेच  कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो,
"काय सूम्या !! कसल्या घाण टायमिंगला फोन केलाय तू !!"
"का रे ?? स्टडी करतोयस का ??"
"नाही रे !! जाऊदे तू बोल !! "
"परवाच्या पेपरचा अभ्यास झाला का ???"
"परवा पेपर आहे आपला??"
"हो !! टाइम टेबल बघितलं नाहीस का तू ??"
"अरे अभ्यासाच्या नादात राहून गेलं !!" आकाश सुमितला खोटं बोलतो. 
"बरं !! अभ्यास कर नक्की !! तुझ्या जीवावर आहे मी!! तुझ्या मागेच नंबर आहे माझा!! "
"काळजी नको रे करू !! लिहू आपण पेपर !!"
"ओके !! कर मग अभ्यास !! आपण डायरेक्ट आता पेपरलाच भेटुयात !!"
"नक्की !!" 

आकाश सायलीच्या स्वप्नातून खडबडून जागा होतो, मोबाईलमध्ये टाइम टेबल बघतो. परवा या विषयाचा पेपर आहे तर, अस म्हणत तो त्या विषयाचं पुस्तक शोधू लागतो, कित्येक वेळ पुस्तक शोधल्या नंतर तो अभ्यास करायला बसतो, 
मनात त्याच्या विचार चालूच असतात,
"हे सगळे पेपर झाले की सायलीला प्रपोज करेन मी !! असही फक्त हो म्हणायचं राहील आहे तिच !! आज तर चक्क मला ती मिस यू म्हणाली !! पण अस करतो परवा पेपर झाले की तिला भेटुन येतो !! तिला जाताना एखाद चॉकलेट घेऊन जातो म्हणजे खुश होईल ती !! आक्या तो विचार नंतर करू आधी पेपरचा अभ्यास कर रे !!"

आकाश आता मोबाईल बाजूला ठेवून मनलावून अभ्यास करत बसतो , आई बाबा बेडरूम मध्ये त्याला अभ्यास करताना पाहून खुश होतात, आई त्याला सगळं जागेवर आणून देते, चहा , नाष्टा आणि नंतर जेवणही. बाबा टीव्हीचा आवाज एकदम बारीक करून पाहू लागतात जेणेकरून आकाशला त्याचा त्रास होऊ नये म्हणून, रात्रभर आकाश अभ्यास करत बसतो , दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा अभ्यासाला बसतो,
"काल सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास झालाय !! आता फक्त रिविजन झाली की झालं सगळं !! " आकाश समोर ठेवलेलं पुस्तक हातात घेतो.
पुस्तक हातात घेताच मोबाईलची मेसेज टोन वाजते, आकाश मेसेज वाचतो, सायलीने त्याला मेसेज केला होता,
"गुड मॉर्निंग डियर !!"
आकाश पटकन तिला रिप्लाय करतो,
"वेरी गुड मॉर्निंग !!"
"आज दिवसभर काय प्लॅन आहे ??"
"फक्त अभ्यास एके अभ्यास !! उद्यापासून आमची बोर्डाची परीक्षा सुरू होतेय !!"
"हो का!! मग कर तू अभ्यास !! मी नाही डिस्टर्ब करत तुला !! "
"नाही बोल ना !! डिस्टर्ब काय त्यात असही माझा अभ्यास झालाय !! "
"हो विसरलेच मी !! हुशार माणसं तुम्ही !!" सायली हसण्याचा इमोटिकॉन पाठवत रिप्लाय देते.

आकाश सायली सोबत कित्येक वेळ बोलत बसला. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तो गमावू लागला. उद्या आपला पेपर आहे हेही तो विसरला.
"माझेही पेपर जवळ आलेत आकाश ! असे काही लांब नाहीत !! उद्या तुझा पेपर आहे आणि परवा माझा !! मलाही अभ्यास करावा लागेल !! "
"झाला नाही अजून अभ्यास ??"
"नाही ना !! काल करत होते , नंतर तुझ्याशी बोलत बसले आणि राहून गेला !! "
"सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुझा अभ्यास राहिला का ??"
"ये नाही रे !! अस काही नाही !! पण आता तू कर अभ्यास आपण बोलुयात नंतर !!"

आकाश बोलणं झाल्यावर मोबाईल बाजूला ठेवून देतो घड्याळात पाहतो तर संध्याकाळचे पाच वाजले होते, पटकन तो पुस्तक हातात घेतो आणि रीविजन करायला लागतो,
"पाच वाजले !! आता पटापट एक रिविजण पूर्ण करतो म्हणजे उद्याच्या पेपरच टेन्शन नाही राहणार !!"

आकाश तास दोन तास रिविजण करत बसतो, पुन्हा प्रश्नपत्रिका संच सोडवायला घेतो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्याला काहीच सुचत नाही, थोड्या वेळापूर्वी वाचलेलं त्याचा लक्षात राहत नव्हतं, तो पुन्हा पुन्हा पुस्तकात पाहून ते आठवण्याचा प्रयत्न करत होता, शेवटी वैतागून तो मनातच स्वत: ला बोलतो,
"काय झालंय मला !! काहीच कळत नाहीये !! एवढी रिविजण करतोय पण माझ्या लक्षात का राहत नाही !! यापूर्वी मला अस कधीच झालं नाही !! दहावीच्या पेपर वेळी मी एकदा वाचलं तरी सगळं पुन्हा लिहायचो!! " खुर्चीवर बसून आकाश कित्येक वेळ विचार करत बसला. 

थोड्या वेळाने जेवण करून आला ,पुन्हा अभ्यासाला बसला, पुन्हा तेच, कितीही वेळा घोकल तरी ऐनवेळी त्याला काहीच सुचत नव्हतं, शेवटी वैतागून तो पलंगावर येऊन पडला, विचारांच्या तंद्रीत तसाच पडून राहिला, उद्याच्या पेपरची त्याला मनातून भीती वाटू लागली. शेवटी त्याने हस्तमैथुन केला. आणि तो जणू आता काही होणारच नाही या आविर्भावात पडून राहिला. झोपी गेला, जणू कोणत्याही गोष्टीला, टेन्शन असताना ,सुख असताना , दुःख असताना, आव्हान असताना त्यापासून त्याला एकच पर्याय दिसू लागला आणि तो म्हणजे हस्तमैथुन.

एवढं सगळं होऊन तो सकाळी लवकर उठला, सकाळी पाच वाजल्यापासून तो अभ्यास करू लागला. होता होईल तेवढं वाचू लागला. त्याच्या समोर घड्याळाचे काटे जणू धावू लागले, आणि बघता बघता पेपरची वेळ जवळ आली, आकाश आई बाबांचा आशिर्वाद घेऊन परीक्षेला निघाला, परीक्षा केंद्रावर येऊन पोहचला, समोर त्याचे वर्गमित्र सगळे त्याच हसून स्वागत करत होते, आकाश आपला नंबर शोधू लागला, समोर त्याला तेवढ्यात सुमित दिसला, आकाशला पाहताच त्याने त्याला बोलवलं,
"आकाश !! इथे आहे नंबर आपला !! तुझा माझ्या पुढे आहे !! बस !!"
"अभ्यास झालाय ना सुम्या??"
"पहिले चार तर झालेत  बघ !! बाकी तुझ्या जीवावर आहे मी!"

आकाश आणि सुमित बोलत असतानाच पेपर सुरू झाल्याची घंटा वाजते, सगळे विद्यार्थी आपापल्या जागेवर बसतात. तेवढ्यात एक शिक्षिका वर्गात येते, सगळे उठून उभे राहतात, थोडा वेळ झाला की पुन्हा एक बेल वाजते, शिक्षिका सगळ्यांना उत्तरपत्रिका वाटत असतात आणि मध्येच बोलतात,
"कोणाकडे काही चिट्टी, पेपर, गाईड असल्या प्रकारच्या कॉपी जर असतील तर आत्ताच बाहेर फेकून द्या !! पुन्हा जर सापडलात तर मी काही बोलू देणार नाही !! सरळ पेपर मधून बाहेर काढेन आणि कारवाई होईल !! आहे का कोणाकडे काही ??" शेवटचं वाक्य त्या शिक्षिका दोन तीन वेळा म्हणतात.
सगळे मुलंही नाही हे एका सुरात बोलतात, थोड्या वेळाने सर्वांना प्रश्नपत्रिका दिल्या जातात. आकाश प्रश्नपत्रिका नीट वाचू लागतो, पेपरची सगळी माहिती लिहून झाल्यावर पेपर लिहायला सुरुवात करतो, कित्येक वेळ जे येत ते तो लिहू लागतो, एक दोन प्रश्न त्याला व्यवस्थित जातात पण पुढे त्याला काहीच सुचेनास होत, जे वाचलं होतं तेही त्याला आता सुचत नव्हतं, आपल्या मेंदूला ताण देऊन तो आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच सुचत नव्हतं, एका क्षणी तो लिहिण्याच थांबतो आणि विचार करू लागतो,
"इतकी घोकंपट्टी करूनही मला काहीच का सुचत नाहीये ?? माझ्या स्मरण शक्तीला झालंय तरी काय !! मी असा कमकुवत का झालोय माझंच मला कळतं नाहीये !! आजचा पेपर जसा जातोय मला !! माझे पास व्हायचे सुद्धा वांदे होणार आहेत अस मला वाटतंय !! या सुम्याला विचारू का काही !!असही याला काय येत असणार !! हाच माझ्या जीवावर आलाय , याला काय विचारू आता !!" तेवढ्यात शेवटचे पंधरा मिनिटे राहिल्याची बेल वाजते, आकाश भानावर येतो, जे येतंय ते पटापट लिहू लागला. 

आकाशच्या लिखाणाचा वेग प्रचंड वाढला. तो जे सुचेल ते लिहू लागला. शेवटच्या दहा मिनिटात त्याने जेवढे लिहिता येतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे लिहिली पण तरीही तो मागेच राहिला, पेपर सुटल्याची बेल वाजली , वर्ग शिक्षिका सर्वांचे पेपर गोळा करू लागल्या, तरीही आकाश लिहितच होता, अखेर त्या शिक्षिकेने  उत्तरपत्रिका त्याच्या जवळून खेचून घेतली. आकाश फक्त पाहत राहिला. आणि अखेर तो भानावर आला, आजचा पेपर त्याच्या अपेक्षे प्रमाणे त्याला सोडवता आलाच नाही. मी अगदी सहज सगळे पेपर लिहू शकतो हा त्याचा गर्व क्षणात मोडला. त्याचे डोळे लख्ख उघडले. 

वर्गातल्या मित्रांना काहीच न बोलता आकाश थेट घरी निघून आला, घरी येताच आई बाबा त्याची वाटच पाहत बसले होते, त्याला बाबांनी पाहताच म्हणाले,
"साधना !! आकाश आला बघ !!"
आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. आकाशला बघताच ती म्हणाली,
"कसा गेला पेपर आकाश ?? सगळे प्रश्न नीट सोडवलेस ना तू ??"
आकाश मात्र काहीच बोलत नव्हता, फक्त आई बाबांपासून आपली नजर चोरत होता.
"कसा म्हणजे काय साधना मस्तच गेला असणार पेपर त्याला !! हुशार आहे आकाश आपला !!" बाबा आकाशकडे पाहून हसत म्हणाले.
"बरं !! जा फ्रेश होऊन ये !! मी मस्त तुझ्यासाठी आज श्रीखंड पुरी केली आहे !!तुला आवडते ना म्हणून !!"
आई स्वयंपाक घरात जात म्हणाली. 
आकाशने कॉलेजची बॅग जवळ ठेवली आणि तो फ्रेश व्हायला गेला. पण आल्यापासून तो गप्पच होता. आई बाबा मात्र त्याला पेपर चांगलाच गेला असणार म्हणून खुश होते , आईने थोड्या वेळाने त्याला श्रीखंड पुरी खायला दिली. तेवढ्यात त्याला बाबांनी विचारलं,
"कोणता प्रश्न अवघड तर नाहीना गेला ??"
"नाही !! " आकाश तुटक बोलला आणि गप्प बसून श्रीखंड पुरी खाऊ लागला. 
"मग ठीक आहे !! एकदा का चांगला रिझल्ट लागला की मग चांगल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायला मोकळे, तुझ्या ऍडमिशनसाठी मी गेली दोन वर्ष पैसे जमा करतोय !!" बाबा श्रीखंड पुरी खात बोलत होते.
आकाश बाबा बोलल्यावर काहीच त्यावर बोलला नाही. तो गप्प राहिला. नंतर आपल्या बेडरूम मध्ये गेला. मोबाईलमध्ये सायलीचा त्याला एकही मेसेज नाही पाहून त्याला आश्चर्य वाटलं, त्यानेच तिला मेसेज केला,
"आत्ताच जस्ट पेपरवरून आलोय !! आजचा पेपर एकदम मस्त गेला !! "
खुप वेळ होऊनही सायलीचा त्याला रिप्लाय येत नाही , थोड्या वेळाने पुन्हा आकाश मेसेज करतो
"बिझी आहेस का ??"
पण तरीही सायली मेसेज पाहात नाही. आकाश मात्र इकडे बैचेन होतो.
दर दहा मिनिटाला तो तिला मेसेज करू लागतो. आणि शेवटी वैतागून म्हणतो, 

"आजच्या या पेपरच्या टेन्शनमुळे तिला भेटायला जायचं राहील पण उद्या असही तिचा पेपर आहे तेव्हा भेट होईलच !! फक्त मला लवकर तिच्या कॉलेजवर जाव लागेल !! ठरलं तर मग !! उद्या जातोच भेटायला !! " आकाश तिला भेटण्याचे ठरवतो.

पण न रहावुन तिला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करत राहतो, आपल्या अभ्यासात त्याच लक्ष लागतच नाही. पण नंतर थोड्या वेळाने त्याला येणाऱ्या पेपरची काळजी वाटू लागते आणि आता आपल्या पुढच्या पेपरच्या तो तयारीला लागतो, पण सवईप्रमाणे तिला मेसेज करत राहतो , पण तिचा काहीच रिप्लाय येत नाही. आकाश पाच पाच मिनिटाला पुस्तक बाजूला ठेवून मोबाईलमध्ये पाहत राहतो, तिचा रिप्लाय आला की नाही हे पाहत राहतो, पण त्या रात्री तिचा रिप्लाय आलाच नाही , आकाश मात्र ती का रिप्लाय करत नाही याचं विचारात अडकून पडतो, 

रात्रभर जागून तो अभ्यास करत राहतो पण त्याच्या मनात सतत सायलीला बोलण्याची इच्छा होत राहते, पण ती काही केल्या रिप्लाय करत नाही, आणि इकडे आकाशच लक्ष अभ्यासात लागत नाही.

क्रमशः

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...