किनारा ...

"पावलं चालतात त्या समुद्र किनारी
आठवणीत आहे आज कोणी
सुर्य ही अस्तास जाताना
थांबला जरा मझं जवळी

ती लाट पुसते मज काही
आठवण असते तरी काय ही?
मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना
ओलावते का मन ती

तो बेफान वारा बोलतो काही
आठवण म्हणजे विचारतो काय ती?
मझं सारखे मुक्त फिरताना
जाणवते का मनास ती

ती शुभ्र चांदणी येते आकाशी
सांग म्हणते आठवण काय ती?
मझं सारखे लुकलुकताना
तुटते का अचानक ती

कसे सांगावे काय ती
आठवण असते जाणीव ती
मनातुन चांदणे तुटताना
ओलावते डोळे ती
-योगेश खजानदार


कवितेतुन ती...

ती मला नेहमी म्हणायची
कवितेत लिहिलंस का कधी मला
माझ्यासाठी लिही म्हटलं तर
सुचतंच नाही का रे तुला

इतक सार लिहिताना
आठवलंस का कधी मला
वाटतं एकदा डोकावून
मनातुन वाचावं तुला

तुझ्या शब्दाच्या दुनियेतुन
मनसोक्त पहावं मला
माझेच मी हरवुन जाताना
कवितेतुन मिळावे तुला

तुझ्या डोळ्यांत दिसते ती
मी पहायची आहे मला
शब्दांना सोबत घेऊन
मनातलं बोलायचं आहे तुला

कवितेत तुझ्या एकदा तरी
लिही ना रे मला
का ? माझ्यासाठी लिही म्हटलं तर
सुचतंच नाही का रे तुला ...






आठवणं...

तुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही

कधी स्वतःला विचारलं मी
पण मन मला बोललंच नाही
तुझ्या राज्यातुन ते कधी
परत माझ्याकडे आलंच नाही

माझेच मला परके व्हावे
इतके शब्द ही ऐकत नाहीत
माझ्या कविते मधुन ते
तुला बोलणं सोडतं नाहीत

बेधुंद त्या मनास कधी
सुर ते भेटतं नाही
तुला भेटावंस वाटल तरी
ती वाट कुठे दिसत नाही

सांग कसे समजावु मला
मन काही ऐकत नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता काही येतं नाही

हरवलेले क्षण ...

विस्कटलेल हे नातं आपलं
पुन्हा जोडावंस वाटलं मला
पण हरवलेले क्षण आता
पुन्हा सापडत नाहीत

कधी दुर अंधुक आठवणीत
तु दिसली होतीस मला
वाटलं होतं पुन्हा भेटावं
पण धीरच झाला नाही

वाटा त्या जुन्या आजही
खुनावत होत्या मला
पण त्या वाटांवर चालताना
मला तुच दिसली नाही

एकांतात राहुन आजही
बोलतं ते ह्रदय मला
पण व्यक्त करायला तेव्हा
मला तुच सापडत नाही

डोळ्याच्या कडा आजही
सांगतात ते अश्रुही मला
हरवलेले ते क्षण आता
पुन्हा सापडत नाही
- योगेश खजानदार

बार्शी आणि ... !!

   मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्थी पुरवणी मागितल्या शिवाय राहणार नाहीत. एकंदरीतच काय तर आमच्या बार्शीकरांना बोलण्याची प्रचंड हौस. मग तो विषय कोणताही असो.
मित्रां सोबत चर्चा करणे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकत्र जमल्याचा अनुभव तुम्हाला इथे आल्या शिवाय राहणार नाही. अगदी सुभाषनगरला चालु असलेली चर्चा पांडे चौकात ऐकू आली तर त्यात नवलं ते काय वाटायचं. मग त्यात राजकारण आलं , समाजकारण आलं आणि चेष्टा मस्करी तर काय विचारु नका. असं एकंदरीतच बार्शी म्हणजे स्वतःतच रमलेल छोटं शहर आहे. इथे विविध प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील आणि विरंगुळा मिळेल असे एकही ठिकाण नसले तरी तुम्हचा विरंगुळा झाल्या शिवाय राहणार नाही.
इथे भाषा जरा वेगळीच सापडते !!  त्याचे पण जरा प्रकार आहेत एवढंच. काही दिवस पुण्यात राहुन आलेला एखादा बार्शीकर जर अगदीच शुद्ध आणि सात्विक बोलतोय असं वाटलं तर म्हणायचं याला पुण्याची हवा लागली मग बार्शीचा अत्यंत अभिमान असणारे काही विचारवंत त्याची चेष्टा केल्या शिवाय राहत नाहीत.. काय बेट्या बदलला तु तिकडं जाऊन असे म्हटल्यावर आपल्या रांगड्या बार्शीच्या दोन शिव्या बसल्या की यांची गाडी कुर्डूवाडी रोडचे खड्डे सहन करत बार्शीत येऊन पोहचते.
  प्रेम , जिव्हाळा बार्शीत अगदी पोतं भरेल इतकं मिळेल.  पण भांडण म्हटल की हम किसीसे कम नही !! ची भाषा इथे नक्कीच वापरली जाते. भाषा जरा वरच्या स्वरात असते पण त्यातही एक आपुलकी नक्कीच असते. आपले लोक आपली बार्शी याबद्दल प्रत्येक बार्शीचा माणुस भरपुर सांगेन आणि बार्शीत कधीही न आलेला माणुस कोणालाही न विचारता सारी बार्शी फिरुन येईल यात काही शंका नाही.
  बाकी संध्याकाळच्या वेळी भगवंत मैदानावर विविध खाण्याच्या पदार्थावर ताव मारतं कित्येक बार्शीच्या लोकांची मने तृप्त होतात. नवविवाहित जोडप्यांच तर हे आवडीच स्थळ म्हणायला ही हरकतं नाही. अगदी खुप दिवसांनी भेटणारे मित्र ही पाणीपुरीवर ताव मारताना इथे भेटतात. काही बोलतात तर काही चेहरा 180 अंशाने फिरवुनही जातात मग हा देह फक्त बार्शीत आहे बाकी मेंदु बाहेरगावीच ठावुन आला आहे असं वाटतं बाकी हवा कुठली लागली त्याला विचारायलाच नको..
  बार्शीचं वेगळेपण तस खुप सांगण्या सारखं आहे. इथे तरुण पिढी समाजकारणात मनापासून भाग घेते आणि तेच सशक्त लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. विविध विषयांवर चर्चा होते , शिवकार्यात तर बार्शीचं कौतुक करावं तेवढं मला कमी वाटतं. एकंदरीतच काय तर बार्शी जरी छोटे शहर असले तरी त्याची विविधता खुप आहे. इथल्या भाषेची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे काही शब्द मराठी भाषेत बार्शीतल्याच लोकांनी दिले असणार हे नक्की. इथले वारे जरा वेगळ्याच दिशेने वाहतात हेही तितकेच खरे आहे. . .. !!

एकांतात बसुन ...!!

एकांतात बसुनही कधी
एकट अस वाटतंच नाही
घरातल्या भिंतींही तेव्हा
बोल्या वाचुन राहत नाही

तु एकटाच राहिलास इथे
सोबत तुझ्या कोणीच नाही
आयुष्यभर दुसर्‍यासाठी जगुन
हाती तुझ्या काहीच नाही

मागुन तरी काय मागितलंस
दोन क्षण बाकी काही नाही
तेवढ देण्यासाठी ही तुला
आपल्या लोकांकडे वेळच नाही

बघ एकदा आमच्याकडे
आज ही आम्ही वेगळया नाही
ऊन पावसाच्या खेळां मध्ये
नातं आमच तुटलं नाही

खरंच सांगतो तुला
बरंच झालं आम्ही माणुस नाही
सहज नातं तोडायची
आमच्यात खरंच ताकद नाही

एकांत तुझा आम्हाला
आता पाहावतं नाही
घराशी जोडलेल नातं तुझं
आम्ही कधीच विसरू शकत नाही

म्हणुनच एकांतात बसूनही कधी
एकटं अस वाटतंच नाही
- योगेश खजानदार

हिरमुसलेल्या फुलाला. ..!!

"हिरमुसलेल्या फुलाला
पुन्हा फुलवायचंय
मना मधल्या रागाला
लांब सोडुन यायचंय
ओठांवरच्या हास्याला
पुन्हा शोधुन आणायचंय
सोडुन सारे रुसवे
नातं हे जगायचंय

कधी तरी तिच्या सवे
सार जग फिरायचंय
हातात तिचा हात घेऊन
सोबत तिची व्हायचंय
सुख दुखाच्या लाटांमध्ये
हे जीवन जगायचंय
कधीच नसेल दुरावा असं
नातं हे जगायचंय

आठवणींच्या बाजारात
फक्त तिचंच नाव लिहायचंय
शोधुनही न सापडेन असे
प्रेम तिला द्यायचंय
डोळ्यान मधले भाव तिचे
ओठांवर आणायचंय
विसरुन जाईल रुसावा ती
असं मन फुलवायचंय
आणि तिच्या सवे प्रेमाचं
नातं हे जगायचंय. . !!"
- योगेश खजानदार

लहानपणं...!!

कधी कधी वाटतं
पुन्हा लहान व्हावं
आकाशतल्या चंद्राला
पुन्हा चांदोबा म्हणावं

विसरुन जावे बंध सारे
आणि ते बालपण आठवावं
शाळेत जाऊन त्या बाकावर
आठवणीच पुस्तक उघडावं

मित्रा सोबत पुन्हा एकदा
मनसोक्त बोलावं
कधी मस्ती कधी दंगा
सगळं बालपण दिसावं

आईने रागावलं तरी
डब्यातुन एक लाडु खावं
अभ्यास सोडुन पुन्हा एकदा
बाहेर खेळायला जावं

दादा सोबत पाऊसात
मनभर भिजुन घ्यावं
कागदी होड्यांनाही तेव्हा
पाण्यात सोडुन द्यावं

क्षणांना ही आता
मागे फिरवुन घ्यावं
कारण कधी कधी वाटतं
पुन्हा लहानं व्हावं




बाबा

रात्री आकाशात पहाताना
चांदण्याकडे बोट करणारा
माझ्या लुकलुकत्या डोळ्यात
स्वप्न पहाणारा आणि
त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा
बाबा तुच होतास

कधी मला रागवलास तरी
मायेनं जवळ करणारा
जगाची दुख सहन करून
आपली आसवे लपवताना
मला आनंदी ठेवणारा ही
बाबा तुच होतास

माझा हट्ट पुरवताना
स्वतः काटकसर करणारा
माझ्या छोट्याश्या जगाला
आनंदाने भरणारा
स्वतःच्या कष्टाने उभा करणारा ही
बाबा तुच होतास

माझ्या लटपणार्‍या पायांना
सावरून घेणारा
आणि उडणाऱ्या पक्षाकडे
बोट दाखवताना
पखांना बळ देणारा ही
बाबा तुच होतास

मी हरलो तरी
मला पुन्हा उठवणारा
आणि मी जिंकलो तरी
एका कोपर्‍यात उभारुन
आनंदाने पहाणारा ही
बाबा तुच होतास
- योगेश खजानदार










ती!!

माझ्या कित्येक कवितेत 'ती'चा उल्लेख नेहमी होतो. माझे मित्र मला विचारतात की  ' योग्या तुझी ती कोण आहे! ! जिच्यासाठी तु आजपर्यंत इतक्या कविता लिहिल्या आणि लिहित असतोस !! तेव्हा त्यांना काय सांगावं हा प्रश्नच पडतो. आता ती कोण आहे हे सांगाणार तरी कसं. 'स्वप्नातुन ती अगदी समोर जरी आली तरी तुझी लेखणी तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यात गुंग होऊन जाईल एवढं तिचं कौतुक कवितेतुन करतोस ..!' अस म्हणारा माझा मित्र नक्की मला काय सुचवतो तेच कधी कळत नाही. ' बाकी योग्या तूझ्या कवितेतील ती माझ्या आयुष्यात आली ना तर आयुष्यच बदलून जाईल ना माझं!! असं म्हणारा तुष्या माझ्या कवितेतील 'ती' शोधतोय तेही स्वतःसाठी असही मला गुप्तचर यंत्रणे कडुन कळलंय. असो ती त्याला लवकरच मिळेल ही.
   उदास किंवा अगदी प्रेमभंग झालेल्या माझ्या कविता वाचणारे लोक माझ्या भुतकाळात मला कोणी ती सोडुन गेली असणार असा अंदाजही लावतात. शेवटी त्याची तरी काय चुक म्हणा. ' योगेश सांगत नाही आपल्याला पण नक्कीच त्याची प्रेयसी त्याला बोलत नाही बघं !! अरे पैज लावून सांगतो ना!!  त्याच्या कवितेतुनच कळतना!! ' मग बहुदा त्यांनी माझ्या मोजक्याच कविता वाचल्या असाव्यात अशी मी आपली मनाची समजुत करुन घेतो आणि ती चा विषय बाजुलाच ठेवतो. शेवटी प्रत्येक कवितेला काही पार्श्वभुमी असते हे नक्कीच मग अशा कविता का लिहिल्या याचा विचार मी तरी करत नाही. पण मनातील ती ला प्रत्येक नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न करतो मग त्यात प्रेम व्यक्त करणं , विरह , ओढ आणि अशा कित्येक प्रेमाच्या छटा मी माझ्या कवितेतुन लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रत्येक छटां मध्ये ती ला पाहण्याचा प्रयत्न करतो.
  अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा न कळो. माझ्या प्रत्येक कवितेत मी 'ती' च्या सोबत जगलोय. प्रत्येकांच्या मनात तो किंवा ती चा चेहरा असतोच मग तो चेहरा काहीजण मनात लपवुन ठेवतात तर काही माझ्या सारखे त्याला कवितेत मांडुन हजारो रुप देतात. मी ही तेच केलंय. आज सगळ्यांना माझ्या मनातील ती कोण हे जाणुन घ्यायचंय कारण प्रत्येकाच्या मनात कोठेतरी ती नक्कीच असते जी माझ्या कवितेतुन त्यांना 'ती' ची आठवणं करुन देते .. हो ना?
 

लपुन छपुन

न राहुन पुन्हा पुन्हा
मी तुला पाहिलं होतं
लपुन छपुन चोरुन ही
मनात तुला साठवलं होतं

कधी तुझ हास्य
डोळ्यांत मी भरलं होतं
कधी तुझ्या अश्रु मधलं
दुख मी जाणलं होतं

तु न दिसता कुठेच
मन हे बैचेन झालं होतं
तुला शोधत शोधत ही
दुरवर जाऊन आलं होतं

प्रेम तुझ्यावर करताना
तुझ्या पासुन लपवलं होतं
आठवणीत तुला लिहिताना
शब्दात ते मांडलं होतं

कधी तुझी वाट पहाताना
वाटांवर भरकटलं होतं
तुझ्या विरहात ही
मन खुप रडलं होतं

पहायच तुला पुन्हा पुन्हा
मन हे बोलतं होतं
आणि लपुन छपुन चोरुन ही
मनात तुला साठवतं होतं
- योगेश खजानदार




नातं आपलं

क्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं

विचार एकदा मनाला
तिथे कोण राहत होतं
कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये
सतत माझं नाव होतं

तु रुसावंस मी चिडावं
नातं हे दुरावलं होतं
तु न बोलावंस मी ही रागवावं
सगळच इथे बिघडलं होतं

मी माझा विसरून जावं
तुही कुठे हरवुन जावीसं
मग सारे बंध तुटावेत
इतक ते सैल नव्हतं

कधी आठवणीत पहावं
राग सारा विसरुन बघावं
नातं हे आपल आजही
तिथेच आपली वाट पाहतं होतं
- योगेश खजानदार

दोन श्वास ..!!

  "खिडकी मधुन येणारा वारा आठवणीचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसुन होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचंय हे त्याला ऐकायच होतं. पण शब्द तिच्या ओठांवर येतंच नव्हते. बहुधा तेही रुसले असावेत कारण ती त्याची साथ अर्ध्यावरच सोडुन चालली होती. त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि मनात दुखाचा आक्रोश.
  पण प्रयत्न करुन ती बोलली.. ' मी निघुन गेल्यावर तु पुन्हा नव्याने आयुष्य सुरु कर !! माझ्या आठवणी कायमच्या पुसुन टाक !! आणि मला माफ कर मी तुला दिलेल वचन पुर्ण नाही करु शकले!! ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आठवणींच्या कित्येक गोष्टी ती त्याला सांगत होती . शेवटच एकदा त्याला मनभर बोलतं होती. जीवनाच शेवटचं पानं लिहित होती.
'तु निघुन गेल्यावर मी जगायचं तरी कोणासाठी सांग ना?' तो तिला विचारात होता. ' तिच्याकडे एकटक बघत होता. ' माझ्या मनाचा विचार न करता तु का जातेयस !! छोट्याश्या भांडणात  एक क्षण जरी नाही बोललो तरी न राहावणारा मी,  तु कायमची माझ्या पासुन अशी दुर गेल्यावर मी राहु तरी कसा सांग ना?' त्याच दुख त्याला सहन होत नव्हत. मनातल्या भावनांचा गुंता त्याला सुटत नव्हता. कित्येक गोष्टी फक्त तो सांगत होता.
पण नियतीच काही वेगळंच ठरलं होतं. क्षणात सारं संपलं होतं. तो तिला खुप काही सांगत होता. पण तिच पानं लिहुन झालं होतं. तिचा हातं तसाच त्याच्या हातात होता. खिडकीतून दिसणारा सुर्य केव्हाच मावळला होता. सावल्यांनी केव्हाच मनात घर केलं होतं. आठवणींचा अंधार आता सर्वत्र दिसत होता. तो तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता पण आता ती त्याला कायमचं सोडुन गेली होती.
ते बोलनं ती अर्धवट सोडून गेली होती. तिच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. पण तरीही तो बोलतंच होता. तिच्या शांत चेहर्‍याकडे फक्त बघत होता. मनात तिला साठवत होता अगदी कायमचं.. तीच ते शांत रुप त्याला खुप काही बोलत होतं. मिटलेल्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. आणि ते अश्रु त्याला जणु सांगतं होते..

श्वासांचा हिशोब करताना
शेवटचे दोन श्वास
मी राखुन ठेवले होते

एक श्वास तुला पहायला
एक श्वास तुला बोलायला

मनातल काही सांगायला
तुझ्या मनातल ऐकायला

तुझा हात हाती घ्यायला
माझा हात
तुझ्या हाती द्यायला

आठवणी जाग्या करायला
डोळ्यातले अश्रु पुसायला

दोन क्षण जगायला
आणि प्रत्येक श्वासांवर
तुझच नाव लिहायला
मी .. शेवटचे दोन श्वास
राखुन ठेवले होते...!!"
- योगेश खजानदार

एक गीत... !!

गीत ते गुणगुणावे
त्यात तु मझ का दिसे
शब्द हे असे तयाचे
मनात माझ्या बोलते असे

तु राहावी जवळ तेव्हा
सुर जे छेडले असे
हुरहुर ही कोणती मनाची
ठाव मझ माझा नसे

फितुर झाले शब्द जेव्हा
गीत ते माझे असे
भाव हे माझ्या मनीचे
सांगतो तुला असे

ऐक ना तु एकदा
गीत हे माझे असे
तुझ्यातील तु मला
भेटशील का रे असे

हरवुन गेली वेळ जेव्हा
भास हा होतो असे
न कळावे नजरेस तेव्हा
का तुला शोधसी असे

हे गीत गावे पुन्हा पुन्हा
मन हे का ऐकते असे
शब्द हे असे तयाचे
त्यात तु मझ का दिसे
- योगेश खजानदार



सांजभेट


तुला आठवतात ते दिवस जेव्हा आपण खुप बोलायचो. पण त्यावेळी नेमकं बोलण्याच साधन कमी पडायचं. मोबाईलला बॅलेन्स नाही, रोजचे मेसेज संपले अशा कित्येक कारणांनी आपलं बोलन अर्धवटच राहायचं. तेव्हा आपण दुसर्‍या दिवसाची आतुरतेने वाट पहायचो. सकाळच्या मेसेजेस ने सुरुवात करताना बोलन सुरु व्हायचं ते थेट रात्री गुड नाईट म्हणे पर्यंत. हे असे कित्येक क्षणांच्या आठवणी तो तिला सांगत होता.
पण बघ ना काळ बदलला आणि सगळच बदलुन गेल. आता पुर्वी पेक्षा जास्त साधन आले आहेत बोलायला. कित्येक अॅप्स, मेसेंजर .. जीवन अगदी स्मार्ट झालं ना यामुळे? पण सगळंच बदलय  .. तु ही मी पण ..!!  आता बोलायला वेळच नाही आपल्याला.  बॅलेन्स भरपुर आहे पण काय बोलायचं आणि का? हा प्रश्नच आहे. आपण एकमेकां पासुन खुप दुरावलो आहोत अस वाटतंय मला. निखळ हास्य विनोद करणारा मी आणि त्यावर तुझी अगदी मनसोक्त दिलेली हास्याची लकेर आता कुठेतरी हरवलीये गं!! बघ ना विनोद हा विनोद होतंच नाही ना आता त्यांच भांडणात रुपांतर व्हावं. हा कोणता दोष आहे ते तरी बघावं ना!! मनात कुठेतरी माझं जुन रुप तु दडवुन ठेवलं असशीलच ? ते एकदा नीट आठवुन बघ , तासनतास बोलणारे आपण, त्या बागे जवळ भेटण्याची ओढ, आणि त्या भेटी मध्ये मी दिलेल एक चाॅकलेट. त्या चाॅकलेटची गोडी आजही मनात तशीच आहे ना ? की बदलुन गेलंय सगळं आज?
  त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती आपल्या पासुन दुरावतेय याच दुख त्याला वाटतं होतं. तिलाही ते कळतं होतं. तेव्हा ती त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली . हे सगळं तुलाही आठवतं याचच मला समाधान आहे.  काळा सोबत प्रेमाची ओहोटी होणारी जोडपी कित्येक पाहिली पण तु तस कधी होऊच दिलं नाहीस. मला आठवतात ते दिवस. काळ बदलला पण प्रेम तसेच आहे. कुठेतरी मनात काहीतरी सलतय तुझ्याही आणि माझ्याही. मला हेच पाहिजे होतं. कधीतरी हे सगळं मोकळ करन खुप गरजेचं होतं रे!! चुक माझी ही असेन तुझी ही असेन आपण मिळुन त्या समजुन घ्याव्यात अस मला ही वाटतं. तिच्या या बोलण्याने तो कित्येक वेळ फक्त तिच्याकडे पहातच होता. तिने अगदी मनाचे दरवाजे त्याच्यासाठी मोकळे केले.
  दोघे कित्येक वेळ त्या समुद्र किनारी बसुन मनातील सल सांगत होते. दोघां मधील ते अंतर केव्हाच कमी झालं होतं. ती त्याला मनमोकळेपणाने सगळं सांगतं होती. त्या रुसलेल्या नात्याला कुठेतरी पुन्हा भरती आला होती. समुद्राची प्रत्येक लाट त्याच बोलण ऐकण्यास पायां जवळ येत होती. पण त्या दोघांना आता कोणाची चिंता नव्हती. होती फक्त ती आणि तो यांची एक सुंदर सांजभेट ..
मज वाट एक अधुरी दिसते
तुझी साथ हवी होती
त्या वळणावरती एकदा
तुज पहायची ओढ होती

मनात तुझ्या एक सल
तुला बोलायची होती
माझ्या मनाची बैचेनी
तुला सांगायची होती

ती आठवण पुन्हा
तुला करुन द्यायची होती
नात्याची गोडी आपल्या
पुन्हा अनुभवयाची होती

तुझ्या ओठांवरच्या शब्दांना
पुन्हा साथ द्यायची होती
तुझ्या सवे समुद्र किनारी
एक भेट व्हायची होती

तु सोबत असावी मज
आस एक मनाची होती
ती वाट अधुरी दिसते
तुझी साथ मला हवी होती
- योगेश खजानदार

किल्ला

किल्ला ..एक आठवण .. एक लेख

  दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड,  विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात. मधुनच आईची एक हाक ऐकु यायची 'जास्त मातीत खेळु नका रे !!' आणि त्याला आम्ही 'हो आई नाही खेळत!!' म्हणुन उत्तर द्यायची. मग सकाळी जे सुरुवात करायची किल्ला बांधण्याची ती थेट 2 3 दिवस चालायची.
  सुरुवात व्हायची ती माती घेऊन येण्या पासुन. घरातील एक जुनाट पोत घ्यायच, आई नको म्हणत असताना ही आणायचं. 'ही माती चांगली आहे.. घ्या रे .! 'भैया ने सांगायच कारण आमचा मुखीया तोच असायचा. मग शेजारच्या मित्रानी आणि मी भराभर माती घ्यायची आणि घरा जवळ आणायची. पुन्हा सुरुवात ती मोठा दगड हुडकून आणायची. तो कुठे भेटलाच की कसा आणायचा ही एक मज्जाच असायची. कित्येक वेळा बोट सापडन, कापण , खरचटन असले प्रकार सर्रास व्हायचे.
  सगळ्या आवश्यक गोष्टी एकत्र केल्या नंतर भैया मातीत पाणी ओतुन त्याचा व्यवस्थित चिखल करुन किल्ला बांधणीचं उदघाटन करायचा. सर्वाच्या मताने किल्ला कसा झाला पाहिजे याची चर्चा सुरू व्हायची. एमताने नंतर शेवटचं ठरायच आणि मग सगळेच किल्ला बांधण्यात व्यस्त होऊन जायचे. एकदा सुरुवात झाली की किल्ला बांधनीसाठी अजुन आमचे मित्र कधी जमायचे कळायचंही नाही दोनाचे पाच व्हायचे. शेवटचा हात मार योग्या त्या बुरुजाच्या बाजुने!!  अस भैया म्हटला की अखेर किल्ला बांधणीच काम पुर्ण झालं अस समजायचं.
  आता राहता राहिला प्रश्न सजावटीचा तर मग किराणा दुकानातुन लाल कलर त्याला काव म्हणायचे तो आणायचा आणि चुना. मग तटबंदीला मस्त लाल कलर लावुन चुण्याची सजावट म्हणुन उपयोग व्हायचा. किल्ला सुंदर आणि आकर्षक दिसावा म्हणुन आळीव आणि काही धान्य टाकायचं. दोन तीन दिवसात ते उगवुन यायचं. मग रोज त्याला वेळेवर पाणी घालायचं काम माझ्याकडे असायचं.
   किल्ला पुर्ण झाला की स्वच्छ हात पाय धुवुन थेट स्वयंपाक घरात जायचं. दिवसभर केलेल्या मेहनती मुळे प्रचंड भुक लागायची. आई तयारच असायची प्लेट भरुन फराळ देण्यासाठी.  मी , भैया आणि आमचे मित्रमंडळी मस्त ताव मारायचो त्यावर. करंजी , चिवडा , चकल्या किती पहावं तेवढे फराळाचे प्रकार खाऊन पुन्हा किल्ल्या  जवळ सगळे यायचो. आता किल्लावर शिवाजी महाराजांची मुर्ती आणि मावळे ठेवले जायचे. संध्याकाळी किल्लावर दिवे लावुन त्यासमोर आई रांगोळी काढायची. अशी एकूण सजावट झाली की किल्लाकडे नुसत पाहातच राहवस वाटायचं. त्या दिव्याच्या प्रकाशात किल्ला आणि शिवरायांची मुर्ती अगदी जिवंत वाटायची. साक्षात शिवरायच आपल्या घरी आले आहेत अस वाटायचं.
  अशी सगळी धमाल दिवाळीत व्हायची किल्ला , फटाके आणि फराळ यांनी नुसती भरुन जायची. तो आनंद तो उत्साह वेगळाच होता. लहानपण परतुन यावं म्हणतात ते यासाठीच अस मला वाटतं. इथे ना कोणत्या गोष्टींची चिंता होती ना ओढ. होतं ते फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंदाच जगणं.. अगदी क्षणाक्षणात.. प्रत्येक मनातं... आज जुने फोटो पहाताना ते मनात पुन्हा जगल्या सारखं वाटलं.. :)

माझ्या सर्व मित्रांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! !!

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...