पैसा बोले!! पैसा चाले!! || Paisa Kavita ||


श्रीमंताची जात पैसा, गरिबाला जात काय ??
विचार थोड स्वतःस तू, इथे तुझं अस्तित्व काय ??

पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !!
श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !!

धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ??
श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !!

सांगू नकोस कोणास काही, सगळं इथं गुपित हाय!!
जात , पात सगळं खोटं, पैसा हीच जात हाय !!

स्वप्न अशी पाहू नको , जिथे तुला जायचं न्हाय !!
श्रीमंताच्या गावी परका, गरिबीत जागा न्हाय !!

फिरून फिरून यावं तिथंच, शोध काही संपणार न्हाय !!
दोन जगात तुला कधी , अस्तित्व तुझं भेटणार न्हाय !!

विचार एवढा करून शेवटी , हाती उत्तर मिळेल काय ??
पैश्याच्या या दुनियेत आज , माणूस नक्की कुठे हाय ??

✍️ योगेश

आगमन गणरायाचे || गणपती बाप्पा मोरया ||


बुद्धीची देवता म्हणून ओळख असावी अश्या गणरायाचे आज आगमन झाले. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या वक्रतुंडांचे आज आगमन झाले. आजपासून पुढचे दहा बारा दिवस या मंगलमूर्तिची मनोभावे सेवा करावी, आणि त्या वरदविनायक विघ्नेश्वराच्या आगमनाने घर आनंदी झाले. सगळीकडे नुसता आनंद आणि प्रत्येकाला त्या विनायकाला घरी आणण्याची घाई. आणि त्या गणराया प्रती असलेली भक्तांची ओढ ही वेगळी सांगावी लागतं नाही.  आज सकाळपासून घरात नुसती लगबग चालू होती. मोदक, वळीव लाडू, अनारसे, बेसनाचे लाडू, करंज्या अश्या कित्येक वक्रतुण्डाच्या आवडीचे पदार्थ करण्याची तयारी चालू होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची हीच खरी ओळख होती. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करून समाजात यामधून एकी, बंधुत्व आणि आपुलकीची भावना निर्माण केली. आणि हीच ओळख या गणेशोत्सवाची झाली. मंडप, उंच उंच मुर्त्या, स्पर्धा, हलती देखावे आणि अशा कित्येक स्वरूपात या उत्सवाचे आयोजन होऊ लागले आणि यामागे एकच भावना, आणि ती म्हणजे त्या गणरायाची मनोभावे प्रार्थना. या प्रार्थनेत पुढचे दहा बारा दिवस कसे आनंदात जातात कळतही नाही. सकाळी आरती , संध्याकाळी आरती आणि त्या आरती मध्ये प्रेमरुपाने आणलेला नैवेद्य म्हणजे विविध पदार्थाची मेजवानीच होते. खरंच या गणरायाच्या आगमनाने चारी दिशा उत्साहाने भरून जातात.

गणरायाप्रती ही भक्ती खरतर इतकी सुंदर आहे की बालगोपालांना या गणरायाची एवढी आतुरता असते, की ती शब्दात सांगावी कशी असा प्रश्न पडतो. गल्लीत , सोसायटी मध्ये, घराघरा मध्ये या बालगोपालांचा नुसता गोंधळ चालु असतो. सारे एकत्र येऊन एक छोटा मंडप तयार करतात. त्यामध्ये सुंदर आरास बसवतात. घरातून आणलेल्या साड्या नाहीतर एखादे बेडशीट त्या मंडपाची शोभा अजुन वाढवतात. खरतर मला आजपर्यंत मोठमोठ्या गणपती मंडळांपेक्षा या बालगोपालांचे मंडप खूप आवडतात. त्यांची ती लगबग पाहून आपणही लहानपणी असेच गणपती बसवत होतो , तेव्हाही आपण असेच करत होतो अश्या कित्येक आठवणीत मग येतात. घरोघरी जाऊन "गणपतीची पट्टी !!!!!!  " म्हणून सुरात सगळे ओरडायचे. कोणी आकरा तर कोणी एकवीस रुपये वर्गणी द्यायचे. कोणी एकशे एक दिली तर ती आमच्या दृष्टी खूप मोठी वर्गणी ठरायची. शेवटी गोळा केलेली वर्गणी हजार बाराशे पर्यंत जायची. मंडप असा विशेष काही नसायचा त्यामुळे पाच सहा बांबू , दोन पत्रे अस त्यांचं भाड दिवसाला सगळं मिळुन पन्नास ते साठ रुपये जायचं.पुन्हा सर्वांनी जाऊन गणपतीची मूर्ती आणायला जायचं. पण तेव्हा आमच्या सोबत कोणीतरी वडीलधारे लोक असायचे. नाचत नाचत हलगीच्या आवाजात गणपतीची मूर्ती आणायची. मग पुढचे दहा बारा दिवस त्या मंडपामध्येच मुक्काम करायचा. सकाळी अंघोळ आणि दोन वेळच जेवण एवढ्यासाठीच ते काही घरी जायचं. शाळेत जाऊन आल की पहिले मंडपात काय चाललंय हे पाहायला जायचं. मग तिथे मित्रांपैकी कोणीतरी बसलेलं असायचं. कोणी माळा लावत, कोणी उदबत्ती लावत, कोणी बाप्पा समोर लावलेला दिवा नीट करत सगळं कसं सुंदर दिसायचं. मला नेहमी हा प्रश्न पडतो की या बालचमूं मध्ये ही इतकी सुंदरता या गणराया प्रती येते कुठून?? तेव्हा उत्तरही आपोआप मिळत. त्या गणराया प्रती असलेल प्रेम. आणि  हेेच प्रेम या गणरायाबद्दल आज बालगोपालां मध्ये पाहताना मन प्रसन्न होऊन जात.

मोठ व्हावं आणि सामाजिक भान काय असतं हे कळाव तस मोठ्या गणेश मंडळाचं असतं. किती सुंदर देखावे, किती सुंदर त्या गणरायाच्या मूर्ती, अगदी पाहतच राहव अस वाटत राहतं. काही काही मंडळांच तर कौतुक करावं तितकं कमी असतं. या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक विषयाचे हलते देखावे, कुठे कुठे प्रबोधनपर कार्यक्रम , कुठे नाटके अश्या कित्येक माध्यमातून ही मंडळ लोकांना प्रबोधन करत असतात. काही ठिकाणी गरिबांना मदत, कुठे अन्नछत्र, तर कुठे आर्थिक मदत अश्या विविध मार्गाने या गणेश मंडळांची या समाजाप्रती सेवा चालू असते. आणि हीच खरी ओळख असावी या उत्सवाची. यामार्फत कित्येक गरजू कुटुंब या सणात आपल्या चेहऱ्यावर हसू आणत असतील, आणि नक्कीच त्या गणरायाला यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट मोठी नसावी.

गणरायाच्या आगमना नंतर थोड्या दिवसात येतात त्या गौरी. तीन दिवसांसाठी येणाऱ्या गौरी या सणात अजुन आनंदाची भर घालतात. घरात गौरी येणार त्या आदल्या दिवशी मंडप घालतात. त्यांच्या आगमनात घरातील ताट , वाट्या, टाळ, घंटी यांच्या आवाजात मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करतात. मग घरातील स्त्रिया मोठ्या उत्साहात त्या गौरी समोर सुंदर मांडणी करतात. शोभेच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी अश्या विविध वस्तू ठेवून सजवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी या गौरीना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी संध्याकाळी दाखवतात. मग तिसऱ्या दिवशी सर्व महिला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून गौरीला मनोभावे पाया पडतात. या तीन दिवसात मनाला सुंदर आठवणी या गौरी देतात. साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरात आहे अशी भावना त्या वर्षभर त्या आठवणी मधून देत राहतात. खरंच वर्षातले हे दिवस सुंदर असतात.


गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे अशी भावना या वरदविनायका मुळे येते. आणि ते खरंच आहे. गणपती बाप्पा हा आपला मित्र आहे. तो सदैव आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असतो. त्याची आपल्या भक्तांवर तितकीच माया आहे . खरतर या सगळ्यात अवघड गोष्ट असते ती गणरायाच्या परतीची त्याबद्दल काय लिहावे हा प्रश्न . पण त्याबद्दल मी नंतर नक्की लिहितो , तूर्तास गणरायाच्या आगमनाने आनंदित झालेल्या आपल्या सर्वांना हा गणेशोत्सव अगदी आनंदात जावा .. इतका की आयुष्य म्हणजे मोदक होऊन जावं . अगदी गोड गोड , कितीदा जरी खाल्ला तरी पुन्हा पुन्हा खाऊ वाटावा ..असा तो मोदक . ..  होणं ?? 

गणपती बाप्पा मोरया !! 

✍️ योगेश खजानदार

असे कसे हे || Poem || Ase Kase He ||




मनात आहे !! पण ओठांवर येत नाही !!
सारंच काही !! सांगता येत नाही !!

तुला पाहिल्या शिवाय!! करमत ही नाही !!
तुला ते कळू नये!! हे लपवता ही येत नाही !!

आठवांचा पाऊस आता!! थांबत ही नाही !!
चिंब त्यात भिजावे !! मन काही ऐकत नाही !!

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!

सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !!
श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !!

कधी तुझा भास !! मनास कळतं नाही !!
मनातले तुझे चित्र !! आजही पूर्ण होत नाही !!

वेड्या मनाचे तुला !! शोधणे थांबत नाही !!
शोधूनही न सापडावी !! ती तू मला भेटत नाही !!

असे कसे मनाचे !! कोडे हे सुटत नाही !!
मनातले हे भाव !! ओठांवर येत नाही!!

✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

स्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन || Independence Day ||

 दरवर्षी स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो. आपण विविध प्रकारे तो साजराही करतो, आणि तो केलाच पाहिजे. व्हॉट्सअँप , फेसबुक किंवा अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तीपर स्टेटस ठेवून आपण आपल्या मनातली भावना व्यक्त करतो, आणि असे पाहता पाहता दरवर्षी हा स्वतंत्र दिवस येतो आणि जातो. या सर्वांमध्ये आपण विसरून जातो ती एक गोष्ट, ज्याचा कोणीही कधी विचार करत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे राष्ट्राप्रती चिंतन आणि मनन. आता तुम्ही म्हणाल चिंतन मनन म्हणजे तरी काय ?? तर आपल्या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून आपणच घेतलेला एक छोटासा आढावा. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेली संस्थान भारतात विलीन झाली, आणि घडला तो आजचा भारत. त्यानंतर कालचा तो भारत आज कुठे आहे? याबद्दल केलेले आपलेच विचार आपल्याला या देशाप्रती अजुन सखोल विचार करायला लावणारी आहेत. 

तुम्ही म्हणाल हे काम तर सरकारचं आहे, पण ही भावनाच मुळात चुकीची आहे, कारण देशाप्रती विचार, चिंतन मनन करण्याची गरज त्या प्रत्येक नागरिकाला आहे जो या देशाचा सुज्ञ नागरिक आहे. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशातील नागरिक लिहितात, तसेच भविष्यही हेच नागरिक घडवतात. अशावेळी आपण आपल्या देशाप्रती काय विचार करतो हे तितकंच महत्त्वाचं होत. फक्त झेंडा फडकावून किंवा व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर आपली देशभक्ती व्यक्त करून आपली जबाबदारी संपत नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की तसे करू नये उलट उत्साहाने स्टेटस ठेवावे , फेसबुक वर राष्ट्रभक्तीपर विचार शेअर करावे पण त्यासोबत या गोष्टीचा विचारही व्हावा ही माफक अपेक्षा. उलट आजच्या टेक्नॉलॉजीने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक साधन दिले आहे आणि त्याचा वापर नक्कीच करावा, असो. आज २०२० या वर्षी भारतासमोर नेमकी कोणती आव्हान आहेत याचा सामान्य नागरिक म्हणून मी आज विचार करणे आवश्यक आहे. कारण आपले एक छोटेसे पाऊल देशासाठी खूप महत्त्वच आहे.


स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आपण आज जिथे उभा आहोत त्याचा विचार करता प्रत्येक भारतीयाने आपली पावले कशा प्रकारे उभारावी याचा प्रत्येक नागरीकने विचार करावा. आज २०२० ची आव्हाने पाहिली तर, चीन आपल्या सोबत आक्रमक भूमिका घेत आहे. त्याची विस्तारवादी नीती ही नेहमीच भारताला घातक ठरत आलेली आहे. अक्साई चीन वर त्याने यापूर्वीच अतिक्रण केले आहे. पण भारत आणि चीन मध्यें प्रचंड मोठा व्यापार चालतो. भारत आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तू आणि technology यांवर अवलंबून होता. पण जर समोरच्याची बाजू आपणास नेहमी घातकच ठरणारी असेल तर त्याला योग्य पद्धतीने उत्तरही द्यावे लागते. भारतीय सैन्य आपल्या बाजूने त्यांना नेहमीच सडेतोड उत्तर देत आलेले आहे. पण एक नागरिक म्हणून या चिनी मालावर बहिष्कार करून आपण सुज्ञ नागरिक आपल्या बाजूने त्यांना उत्तर देऊ शकतो. जर मनात खोट असेल तर नात कधीच टिकत नाही आणि अशीच काहीशी स्थिती भारत चीन संबंधावर आहे. कारण विस्तारवादी नीती आणि नेहमीच व्यापारी दृष्ट्या देशांवर आर्थिक पकड निर्माण करून समोरील देशाचे नुकसान करणे ही चिनी देशाची नेहमीच ही वाईट नीती राहिली आहे. अशा या चीनला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या मालावर बहिष्कार टाकून आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची गरज प्रत्येकाची आहे. आणि त्या दृष्टीने भारत सरकारने आपली पाऊलेही उचलली आहेत सरकारी कॉन्ट्रॅक्ट मधून चिनी कंपन्या हद्दपार केल्या, कित्येक चिनी मालावर बंदी घातली. नव्या युगातील डिजिटल strike ही झाली कित्येक चिनी ॲप्सवर भारताने बंदी घातली. कारण त्यामुळे भारतीय सुरक्षेला धोका होता. आणि याच स्वागत प्रत्येक भारतीयाने केलं ही खरंच कौतुकाची गोष्ट. 

आत्मनिर्भर भारत खरतर ही संकल्पनाच मुळात भारत कसा असावा हे स्वतःच सांगते. याला कोणत्याही वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाहीये . तर भारत कसा असावा हे या दोन शब्दात कळून जात. आजची आव्हान या देशाला घ्यायची असतील तर त्याला आता आत्मनिर्भर होण तितकंच गरजेचं आहे. स्वावलंबी देश हा नेहमीच जगावर राज्य करतो हे तितकंच खरं आहे. जेव्हा कोणताही देश हा जगाला लागणारी आवश्यक गोष्ट निर्माण करतो तेव्हा त्याची निर्यात करतो आणि कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून त्यांचे उत्पादन स्वगृही म्हणजे आपल्याच देशात निर्माण करतो तेव्हा तो देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर चालतो.आजच्या भारत सरकारची ही नवी आव्हाने आपल्याला तीच सांगतात की आत्मनिर्भर व्हा कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा. कारण जेव्हा परकीय चलन देशात जास्त येते आणि आपले चलन परकीय देशात कमीत कमी प्रमाणत जाते तेव्हाच देशाची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होते. अगदी संपूर्णतः परकीय वस्तूंचा वापर बंद करता येईल हेही तितकंच अशक्य आहे कारण भौगोलिक दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणाने काही गोष्टी या देशात निर्माण करणं शक्य नसतं एव्हाना प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या दृष्ट्या अशा वस्तूंमुळे इतर देशांवर अवलंबून असतोच, पण अशा वस्तूंचा वापर जर कमी करता आला तर त्याचा फायदा देशाला होईल. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा विचार करताना काही उदाहरणे आवर्जून द्यावीशी वाटतात.  या वर्षी संपूर्ण जगात अचानक आलेल्या महामारीमूळे आपल्याला खूप काही शिकवलं. याच उत्तम उदाहरण म्हणजे ppe किट . Ppe किट यापूर्वी भारतात कधीच निर्माण केले जात नसत पण या काळात भारतीयांना स्वावलंबी होण्याची किती गरज आहे यांची जाणिव झाली आणि पाहता पाहता आज देश जगातला दुसरा सर्वात जास्त ppe किट निर्माण करणारा देश झाला. हे सगळं संभव झालं ते आपल्यातील दृढ विश्वास आणि निश्चयामुळे. आणि हीच आत्मनिर्भरता आता आपल्याला सर्व स्तरावर करायची आहे. आणि यातूनच घडवायचा आहे तो उद्याचा एक स्वावलंबी भारत. 

उद्याची आव्हान पेलायची असतील तर आपल्याला आज जबाबदारी उचलावी लागणार यात काहीच वाद नाही. एक नागरिक म्हणून मी आज कुठे उभा आहे हे मी पाहिलं पाहिजे. उद्या एकीच आव्हान आमच्या समोर आहे!!  मग आम्ही सर्व धर्मांना , जातीला , पंथना सोबत घेऊन आहोत का ?? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा प्रत्येक महापुरुषावर प्रत्येक भारतीयांचा तेवढाच अभिमान असायला हवा. अमुक अमुक महापुरुषाला अमुक अमुक जातीचेच फक्त आठवण करतात हे जोपर्यंत थांबत नाही आणि प्रत्येक महापुरुषाला एक भारतीय म्हणून मी तेवढाच मान देत नाही तोपर्यंत त्या महापुरुषाला खरी आदरांजली आपण देऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे. प्रखर राष्ट्रभक्त होऊन या भारताची सेवा ही आता आपले पहिले कर्तव्य आहे ही विसरू नका. कारण आजूबाजूचे हे देश आपल्या मातृभूमीला खंड खंड करण्यासाठी क सक्रिय आहेतच. मध्यंतरी नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारतीय भूमीचे काही गाव , प्रदेश आपल्या नकाशात दाखवले, पाकिस्तान नेहमीच काश्मीरला आपला भाग मानत आला आहे आणि यावर्षी त्याने नकाशा द्वारे सांगण्याचा प्रयत्नही केला आहे, आणि चीनची विस्तारवादी नीती. अशा चारही बाजूंनी हे देश आपला अजेंडा चालवत असताना आपण भारतीय नागरिक एक होण्याची किती गरज आहे हे वेगळं सांगावं लागतं नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचा जातीचा अभिमान असावा किंबहुना तो असायलाच हवा पण एक भारतीय नागरिक म्हणून त्याचा त्रास इतरांना होता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिले. कारण राष्ट्र मजबूत असेल तर त्या राष्ट्राची संस्कृती मजबूत राहते आणि त्या संस्कृतीत मग या सर्व गोष्टी अगदी आनंदाने राहतील. त्यामुळे राष्ट्र सर्वप्रथम हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 

तुमची ओळख ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या राष्ट्राचे एक नागरिक आहात यावरून होते आणि तो नागरिक सुज्ञ असावा किंवा तो तसा घडवावा हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. आपली संस्कृती ही खूप जुनी आणि तितकीच सुंदर संस्कृती आहे, हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं असतं. आणि त्याची सुरुवात अगदी लहानपणा पासून झाली पाहिजे. आपला राष्ट्राप्रती अभिमान हा आपल्या राष्ट्राला मजबूत करतो. उद्याच्या आव्हानाला पेलण्याची ताकद देतो. नाहीतर काय हो स्वातंत्र्य दीन दरवर्षीच येतो त्यामध्ये नवल ते काय??,  हे उद्याची पिढी म्हणायला नको एवढीच अपेक्षा. आणि म्हणून उद्याचा पिढीला इतिहास कळावा आणि तो त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटावा हे गरजेच आहे. कारण उद्याचे हे सुज्ञ नागरिक आहेत. येणाऱ्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारसेच महत्त्व पटवून देणं तितकंच गरजेच आहे. आजच्या या परकीय संस्कृतीच्या अतिक्रमणात कित्येक इथल्या जुन्या चालीरीती , भाषा , पेहराव यांचा कुठेतरी र्हास होत आहे याची जाणीव आपल्याला होत आहे. याच्या वाढीसाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने कार्य करण्याची गरज आहे.  कारण एक नागरिक म्हणून तुम्हीच हे जपलं पाहिजे. कोणत्याही प्रखर राष्ट्राची ओळख ही पहिले त्याची राष्ट्रभाषा यावरून होते आणि हीच ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करायची आहे. परकीय भाषा या देशातून हद्दपार करण तितकंच महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती ही आपल्या भाषेतच शोभून दिसते आणि त्याची सुरुवात प्रत्येक भारतीयाने करायला हवी.  आपल्या भारतात विविध भाषा आहेत आणि त्या भाषा जोपासण्यासाठी तिथल्या नागरिकांनी त्या भाषेत बोललं पाहिजे. आज कित्येक ठिकाणी नव्या येणाऱ्या पिढीला आपल्या मातृभाषेत नीटसं बोलताही येत नाही ही सत्य परिस्थीती पाहायल मिळते. खरतर याही परकीय आक्रमणांचा गंभीर विचार आता करण गरजेच आहे . तुमची भाषा तुमची ओळख सांगते आणि हीच भाषा तुमची संस्कृती टिकवते हे लक्षात असण खूप गरजेचं आहे.

अश्या कित्येक मुद्द्यावरती आज मनन चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस जरी असला तरी तो साजरा करण्यासाठी आपल्याला वर्षाचे संपूर्ण दिवस एक तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या ती एकीची, तपश्चर्या ती राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याची, तपश्चर्या करावी लागते ती आपल्या देशाची अखंडता टिकवण्याची , तपश्चर्या करावी लागते ती एक सुज्ञ नागरिक म्हणून या देशाची सेवा करण्याची. तर मग पुन्हा त्या निर्धाराने आपण या स्वतंत्र दिनी पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी राष्ट्राभिमान , राष्ट्रभक्ती, एक सक्षम, आत्मनिर्भर भारत करण्यासाठी कटिबद्ध होऊ. 

जय हिंद!!

✍🏼 योगेश खजानदार

तुझे लाजणे || प्रेम कविता || Love Marathi Poem ||



किती आठवांचा उगा अट्टाहास
नव्याने तुला ते जणू पाहताच!! 
सोबतीस यावी ही एकच मागणी
तुझ्यासवे त्या जणू बोलतात !!

चांदणी ती पाहता तुला शोधणे
रात्रीस त्या जणू हरवणे !!
चांदणे होऊन तू पसरून जावे 
त्या चंद्रास त्या जणू सांगतात !!

जशी छेडली ती तार क्षणांची !!
सूर जणू भेटले त्या सुरांशी !!
गीत होऊन ऐकत रहावे 
ही एकच मागणी जणू मागतात!!

शब्दही ही का प्रेम करत रहावे !!
तुझ्याचसाठी जणू ते सुचावे !!
अलगद त्या कागदावर लिहिताना
कविता होऊन जणू बरसतात !!

सांगशील का तूच आज हे काही ??
आठवांचा हट्ट जणू जातं नाही !!
तेव्हा पाहून लाजणे तुझे असे की
प्रेमात जणू तूझ्या पाडतात !!

✍️ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...