मुख्य सामग्रीवर वगळा

आगमन गणरायाचे || गणपती बाप्पा मोरया ||


बुद्धीची देवता म्हणून ओळख असावी अश्या गणरायाचे आज आगमन झाले. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या वक्रतुंडांचे आज आगमन झाले. आजपासून पुढचे दहा बारा दिवस या मंगलमूर्तिची मनोभावे सेवा करावी, आणि त्या वरदविनायक विघ्नेश्वराच्या आगमनाने घर आनंदी झाले. सगळीकडे नुसता आनंद आणि प्रत्येकाला त्या विनायकाला घरी आणण्याची घाई. आणि त्या गणराया प्रती असलेली भक्तांची ओढ ही वेगळी सांगावी लागतं नाही.  आज सकाळपासून घरात नुसती लगबग चालू होती. मोदक, वळीव लाडू, अनारसे, बेसनाचे लाडू, करंज्या अश्या कित्येक वक्रतुण्डाच्या आवडीचे पदार्थ करण्याची तयारी चालू होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची हीच खरी ओळख होती. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करून समाजात यामधून एकी, बंधुत्व आणि आपुलकीची भावना निर्माण केली. आणि हीच ओळख या गणेशोत्सवाची झाली. मंडप, उंच उंच मुर्त्या, स्पर्धा, हलती देखावे आणि अशा कित्येक स्वरूपात या उत्सवाचे आयोजन होऊ लागले आणि यामागे एकच भावना, आणि ती म्हणजे त्या गणरायाची मनोभावे प्रार्थना. या प्रार्थनेत पुढचे दहा बारा दिवस कसे आनंदात जातात कळतही नाही. सकाळी आरती , संध्याकाळी आरती आणि त्या आरती मध्ये प्रेमरुपाने आणलेला नैवेद्य म्हणजे विविध पदार्थाची मेजवानीच होते. खरंच या गणरायाच्या आगमनाने चारी दिशा उत्साहाने भरून जातात.

गणरायाप्रती ही भक्ती खरतर इतकी सुंदर आहे की बालगोपालांना या गणरायाची एवढी आतुरता असते, की ती शब्दात सांगावी कशी असा प्रश्न पडतो. गल्लीत , सोसायटी मध्ये, घराघरा मध्ये या बालगोपालांचा नुसता गोंधळ चालु असतो. सारे एकत्र येऊन एक छोटा मंडप तयार करतात. त्यामध्ये सुंदर आरास बसवतात. घरातून आणलेल्या साड्या नाहीतर एखादे बेडशीट त्या मंडपाची शोभा अजुन वाढवतात. खरतर मला आजपर्यंत मोठमोठ्या गणपती मंडळांपेक्षा या बालगोपालांचे मंडप खूप आवडतात. त्यांची ती लगबग पाहून आपणही लहानपणी असेच गणपती बसवत होतो , तेव्हाही आपण असेच करत होतो अश्या कित्येक आठवणीत मग येतात. घरोघरी जाऊन "गणपतीची पट्टी !!!!!!  " म्हणून सुरात सगळे ओरडायचे. कोणी आकरा तर कोणी एकवीस रुपये वर्गणी द्यायचे. कोणी एकशे एक दिली तर ती आमच्या दृष्टी खूप मोठी वर्गणी ठरायची. शेवटी गोळा केलेली वर्गणी हजार बाराशे पर्यंत जायची. मंडप असा विशेष काही नसायचा त्यामुळे पाच सहा बांबू , दोन पत्रे अस त्यांचं भाड दिवसाला सगळं मिळुन पन्नास ते साठ रुपये जायचं.पुन्हा सर्वांनी जाऊन गणपतीची मूर्ती आणायला जायचं. पण तेव्हा आमच्या सोबत कोणीतरी वडीलधारे लोक असायचे. नाचत नाचत हलगीच्या आवाजात गणपतीची मूर्ती आणायची. मग पुढचे दहा बारा दिवस त्या मंडपामध्येच मुक्काम करायचा. सकाळी अंघोळ आणि दोन वेळच जेवण एवढ्यासाठीच ते काही घरी जायचं. शाळेत जाऊन आल की पहिले मंडपात काय चाललंय हे पाहायला जायचं. मग तिथे मित्रांपैकी कोणीतरी बसलेलं असायचं. कोणी माळा लावत, कोणी उदबत्ती लावत, कोणी बाप्पा समोर लावलेला दिवा नीट करत सगळं कसं सुंदर दिसायचं. मला नेहमी हा प्रश्न पडतो की या बालचमूं मध्ये ही इतकी सुंदरता या गणराया प्रती येते कुठून?? तेव्हा उत्तरही आपोआप मिळत. त्या गणराया प्रती असलेल प्रेम. आणि  हेेच प्रेम या गणरायाबद्दल आज बालगोपालां मध्ये पाहताना मन प्रसन्न होऊन जात.

मोठ व्हावं आणि सामाजिक भान काय असतं हे कळाव तस मोठ्या गणेश मंडळाचं असतं. किती सुंदर देखावे, किती सुंदर त्या गणरायाच्या मूर्ती, अगदी पाहतच राहव अस वाटत राहतं. काही काही मंडळांच तर कौतुक करावं तितकं कमी असतं. या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक विषयाचे हलते देखावे, कुठे कुठे प्रबोधनपर कार्यक्रम , कुठे नाटके अश्या कित्येक माध्यमातून ही मंडळ लोकांना प्रबोधन करत असतात. काही ठिकाणी गरिबांना मदत, कुठे अन्नछत्र, तर कुठे आर्थिक मदत अश्या विविध मार्गाने या गणेश मंडळांची या समाजाप्रती सेवा चालू असते. आणि हीच खरी ओळख असावी या उत्सवाची. यामार्फत कित्येक गरजू कुटुंब या सणात आपल्या चेहऱ्यावर हसू आणत असतील, आणि नक्कीच त्या गणरायाला यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट मोठी नसावी.

गणरायाच्या आगमना नंतर थोड्या दिवसात येतात त्या गौरी. तीन दिवसांसाठी येणाऱ्या गौरी या सणात अजुन आनंदाची भर घालतात. घरात गौरी येणार त्या आदल्या दिवशी मंडप घालतात. त्यांच्या आगमनात घरातील ताट , वाट्या, टाळ, घंटी यांच्या आवाजात मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करतात. मग घरातील स्त्रिया मोठ्या उत्साहात त्या गौरी समोर सुंदर मांडणी करतात. शोभेच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी अश्या विविध वस्तू ठेवून सजवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी या गौरीना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी संध्याकाळी दाखवतात. मग तिसऱ्या दिवशी सर्व महिला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून गौरीला मनोभावे पाया पडतात. या तीन दिवसात मनाला सुंदर आठवणी या गौरी देतात. साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरात आहे अशी भावना त्या वर्षभर त्या आठवणी मधून देत राहतात. खरंच वर्षातले हे दिवस सुंदर असतात.


गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे अशी भावना या वरदविनायका मुळे येते. आणि ते खरंच आहे. गणपती बाप्पा हा आपला मित्र आहे. तो सदैव आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असतो. त्याची आपल्या भक्तांवर तितकीच माया आहे . खरतर या सगळ्यात अवघड गोष्ट असते ती गणरायाच्या परतीची त्याबद्दल काय लिहावे हा प्रश्न . पण त्याबद्दल मी नंतर नक्की लिहितो , तूर्तास गणरायाच्या आगमनाने आनंदित झालेल्या आपल्या सर्वांना हा गणेशोत्सव अगदी आनंदात जावा .. इतका की आयुष्य म्हणजे मोदक होऊन जावं . अगदी गोड गोड , कितीदा जरी खाल्ला तरी पुन्हा पुन्हा खाऊ वाटावा ..असा तो मोदक . ..  होणं ?? 

गणपती बाप्पा मोरया !! 

✍️ योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...