कुटुंब ..!

नको पैसा , नको बंगला
मला फक्त सुख हवं
छोट्याश्या घरात माझ्या
एक हसर कुटुंब हवं

नसेल कोणती हाव त्यास
मिळेल त्यात समाधानी हवं
आलेच अश्रू डोळ्यात तरी
अलगद ते पुसणार हवं

छोट्या छोट्या गोष्टीतही
खूप आनंद घेणार हवं
असेल गरीबी घरात माझ्या
मनाने ते खूप श्रीमंत हवं ...!!

छोट्याश्या घरात माझ्या
एक हसर कुटुंब हवं ..!!

योगेश

भिंत..!!

एक भिंत आहे आता, तुझ्या आणि माझ्या मध्ये

तू मला दिसत नाहीस, आणि तुलाही मी नाही
तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसत नाहीत
आणि माझ्या चेहऱ्यावरचे भावही, तुला दिसत नाहीत
आवाज ही तुझा मला ऐकू येत नाही
आणि तुझ्या हृदयासही माझे बोलणे कळत नाही

कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये
जी आपल्याला पाहूच देत नाही

अंतर मला तुझे कळले नाही, दुरावा माझा तू कधी पाहिला नाही
भिरभिरणाऱ्या डोळ्यास आता, त्या खडकाशिवाय काही दिसत नाही
एकांत बोलतो तुला माझ्या गोष्टी , माझ्याही स्वप्नातून तू जात नाहीस
तरीही तुला मला बोलवत नाही , आणि माझेच मला शब्द बोलू देत नाहीत

कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये
जी आपल्याला बोलूच देत नाही

कळतंय तुलाही तू राहू शकत नाही,
उमगतयं मलाही तुझ्या विरहात मी जगू शकत नाही
श्वास प्रत्येक तुझा, माझेच नाव घेतल्या शिवाय राहत नाही
आणि माझ्या जगण्याला, तुझ्या शिवाय अर्थ नाही

पण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये
जी आपल्याला भेटूच देत नाही

कोणती सल तुझ्या मनात आहे, मला कळत नाही
कोणते राग माझ्या मनात आहेत, तुला दिसत नाहीत
विचारावे म्हटले तरी, तू बोलत नाहीस,
सांगावे म्हटले तरी ,मी ऐकत नाही
समज गैरसमज यांच्यात नातेच टिकत नाही
जोडावे म्हटले तरी, त्यास दोघेही भेटत नाहीत

कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये
जी आपल्याला नातं कळूच देत नाही..!!

✍योगेश खजानदार

बाबा

तुमच्या बद्दल लिहिताना
कित्येक विचार येतात बाबा
आणि प्रत्येक शब्द मला
कित्येक भाव सांगतात

माझ्या पहिल्या श्वासा सोबत
तुम्ही खूप बोललात ना बाबा
पण माझं बालपण आजही
तुमच्या कित्येक आठवणी सांगतात

कधी माझ्यासाठी करताना
किती कष्ट केले तुम्ही बाबा
आणि ते माझे कित्येक क्षण
तुमच्याच सोबत रमून जातात

माझ्या स्वप्नांना नेहमी
तुमच्या डोळ्यात पाहताना बाबा
पण माझ्या स्वप्नांना आजही
तुमचेच आदर्श असतात

मला घडवताना तुम्ही
स्वतःस झिजवलात ना बाबा
पण माझे यश आजही
तुमच्या शिवाय अपूर्ण असतात

किती लिहावे आज
तुमच्याच साठी बाबा
माझ्या कित्येक भावना तरी
अव्यक्तच राहतात

✍योगेश खजानदार

स्वप्न ..!! (कथा भाग ६)

"एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हा प्रयत्न !!एक एक ओळ सुंदर व्हावी म्हणून मी तरी किती कागदांच्या पानांना चुरागळून टाकून द्यायचं! आणि हा अट्टाहास फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना!! आज माझ्या लिखाणाचा शेवट माझा मुलगा आज समाज , देश यासाठी काही तरी करतो आहे याने व्हावा यापेक्षा दुसरी स्वप्नपूर्ती ती काय! पण आजही एक स्वप्न अधुरेच राहिले आणि ते कधीच पुरे झाले नाही. दादांच्या समोर मला कित्येक गोष्टी बोलायच्या होत्या. माझ्यातील एका यशस्वी लेखकाची त्याना भेट घडवायची होती. माझ्या उभरत्या काळात, त्याच्या सारखा दुसरा आत्मविश्वास देणारा कोणी नव्हता. आज ती खंत मला सतत बोलते. पण मुलाच्या या कार्याने मन शांत होते!! बघते पुन्हा स्वतःतील कित्येक स्वप्नात जे पूर्ण झाले काही अधुरे राहिले!! पण आयुष्य म्हटलं की काहींना काही सुटनारच ना!! काही स्वप्न पुर्ण होतात काही अधुरी राहतात!! माझ्या यशस्वी लेखकाची एक कादंबरी दादांच्या हाती द्यायचं स्वप्न अखेर आजही अधुरेच राहिले!! माझ्या स्वप्न या माझ्या आत्मचरित्रात हे स्वप्न अधुरेच राहिले!! पण पुरे झाले ते आभाळाला ही आनंदाने बरसायला सांगेन असे माझ्या मुलाचे स्वप्न !! एक बाप म्हणून त्यासारखा आनंद नाही!! "आप्पा लिहीत राहिले

"बरसल्या सरी अगणित वेळा
त्या शांत कराया मातीस
तूही प्रयत्न कर अगणित वेळा
मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस

कडाडली वीज अगणित वेळा
भेटायला त्या मातीस
तूही लख्ख प्रकाशित जा
चालायला त्या स्वप्न पुर्तीस

बरसून जा अगणित वेळा
अधुऱ्या त्या स्वप्नांच्या पूर्तीस ..!! " आप्पा लिखाण करून शांत बसले.
कित्येक वेळ ते लिहिलेल्या त्या ओळी गुणगुणत राहिले.
"आप्पा !! " सुनील बोलावू लागला.
"आलो रे सुनील!!" म्हणत आप्पा बाहेर गेले.
"काय रे !! "आप्पा.
"सकाळ झाली आणि तुम्ही अजुन लिहिताय !! आप्पा रात्रभर झोपला नाहीत ??"
" अरे लिहिण्यात इतका मग्न झालो की लक्षातच नाही आल!!" आप्पा बाहेरच्या अंगणात बघत म्हणाले.
"बरं चला !! आशीर्वाद द्या !! आणि सोबत चला आमच्या !! "सुनील आप्पांना बाहेर घेऊन येत म्हणाला.
"अरे पण कुठे ??" आप्पा विचारू लागले.
"चला तर सांगतो !! " सुनील आप्पांना म्हणाला.
आप्पा आणि मंदा दोघांनाही घेऊन सुनील शाळेकडे चालू लागला. शाळा जवळ येताच सगळेच दिसू लागले. उमा , सारे मित्र , रखमा , सुहास , आजी, चंदा ,तारा आणि बोरुवस्तितल्या बायका आणि मुले , सारे वाटच पाहत थांबले होते.
"काय रे हे सुनील !!" आप्पा आणि मंदा दोघेही विचारू लागले.
"आई !! आप्पा !! या शाळेच्या नव्या स्वप्नाची वाट आता सुरू झाली आहे !! आमच्या सर्वांची इच्छा आहे की आप्पा तुम्ही आज या साऱ्यांना, आम्हाला मार्गदर्शन करावं !! आणि आमच्या नव्या वाटेस बळ द्यावं.!!" उमा म्हणाली.
"अरे पण !! " आप्पा.
"पण नाही आणि काही नाही!! "उमा आणि सारे लोक त्या नव्या शाळेत बसले.
आप्पा साऱ्यां समोर उभा होते. त्यांना बोलायला.
"खरंतर मी काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे !! तुम्ही मुल इतकी हुशार आहात की माझ्या शब्दांनाही कदाचित आज विचार करावा लागेल. स्त्री शिक्षण !! खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही!! माझ्या सारख्या लेखकाला एका स्त्रीने घडवल ती माझी आई !! तिला त्या जुन्या समाजाने शिकू नाही दिल पण तिने घडवलं आमचं घर !! मग स्त्री शिकली तर अजुन किती बदलून जाईल ना सारं हे !! मुलांनाही शिकायला हवं !! पण या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून शिकायला हवं !! धर्म शिक्षणाने कधीच बुडाला नाही !! उलट कोणताही धर्म आपल्याला प्रत्येकाला कसं जगायचं हे शिकवत असतो!! मग कोणता धर्म तुम्ही शिकू नका असे म्हणेन?? " टाळ्यांचा आवाज सगळीकडे झाला.
" मी जास्त काहीच बोलत नाही !! पण मुलगी आणि मुलगा हा भेद विसरून जायला हवा !! तिलाही शिकायचा अधिकार आहे हे नक्की !! या शाळेत तुमच्या भविष्याची स्वप्न कित्येक घडणार आहेत!! त्या स्वप्नांना फक्त तुम्ही रंग भरा !! आयुष्य खूप सुंदर होईल!! " आप्पा आपल बोलणं पूर्ण करून सर्वांना भेटू लागले.
कार्यक्रम आटोपून आप्पा आणि मंदा आता शाळेतून घराकडे जायला निघाले.
"मंदा !! खरंच आज सूनिलचा मला अभिमान वाटतो !!"
"मंद डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली.
"होणं !! खरंच !! स्वतःसाठी कोणीही जगेन !! पण समजासाठी जगणं खरंच खूप वेगळं!!"
आप्पा आणि मंदाला जाताना सुनील आणि उमा पाहू लागले. आत शाळा सुरू झाली. कित्येक मुले शाळेत शिकायला आले.
"उमा !! हे तर स्वप्न पूर्ण झालं !! पण अजुन एक तसंच राहील आहे !! " सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
"कोणते रे ??" उमा चेहऱ्यावर कित्येक भाव बदलत विचारू लागली.
"तुझ्या सोबत सार आयुष्य जगायचं स्वप्न !! ते तू हो म्हणालीस तर पूर्ण होईल !!" सुनील हसत म्हणाला.
उमा थोडा वेळ शांत झाली. सूनिलकडे हसत पाहत म्हणाली.
" माझं ही एक स्वप्न आहे !! आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची !! तू हो म्हणालास तर पूर्ण होईल !! "
उमा असे म्हणताच दोघेही मनसोक्त हसले. एकमेकांकडे पाहत राहिले. मागे शाळेतून आवाज येऊ लागले.
" तर लक्षात असू द्या !! अ अननसाचा !! कशाचा सांगा बरं !! " वर्गातून सुहासचा आवाज येत होता.
"अननसाचा !! " सगळे विद्यार्थी एकदम म्हणाले.

समाप्त

✍योगेश खजानदार

स्वप्न ..!(कथा भाग ५)

  पाहता पाहता सकाळ झाली. सूर्याची किरणं झाडा फुला पानांना बोलू लागली. आज सुनील खूपच आनंदात होता. चंदा आणि तारा त्या बोरुवस्तीतील मुली आज शाळेत शिकायला येणार होत्या. त्याची लगबग पाहून मंदा त्याला बोलू लागली.
"सुनील अरे नाश्ता तरी करून जा बरं !! पुन्हा किती वेळ लागेल तुला माहित नाही!!"
"आई नकोय मला !! उमा जेवायला डबा घेऊन येणारे शाळेतच !!" सुनील आवरत म्हणाला.
"अस का !! बरं बरं !!" मंदा गालातल्या गालात हसत म्हणाली.
सुनील ने मंदा हसली ते बरोबर पाहिलं. आणि मंदाकडे पाहत बोलू लागला.
"काय ग आई !! मी कालपासून पाहतोय !! उमाच नाव घेतलं की तू आणि आप्पा हसताय का बरं ??"
" काही नाहीरे असच !! "
"खरं सांग बर आई !!"
" अरे काही नाही !  उमाला विचार हवं तर !!" मंदा बोलत बोलत स्वयंपाक घरात निघून गेली.
सुनील आवरून बाहेर पडू लागला. उमा समोरून चालतं येत होती. तिला पाहताच सुनील क्षणभर थांबला तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि अचानक भानावर येत बोलू लागला.
"काय किती वेळ !! उशीर का केलास आज !! " सुनील जवळ येत असलेल्या उमाकडे पाहत म्हणाला.
"अरे आवरायलाच उशीर झाला!! आता चल पटकन!! " उमा सूनीलकडे पाहत म्हणाली.
उमा आणि सुनील दोघेही शाळेत आले. त्यांचे मित्र केव्हाच येऊन थांबले होते. आज कित्येक जण वेगवेगळ्या वस्तीत जाऊन जनजागृतीचे कार्य करणार होते. सुनील आणि त्यांची कित्येक वेळ चर्चा झाली आणि ते जाऊ लागले. तेवढ्यात चंदा आणि तारा दोघीही शाळेत आल्या. उमा दोघींना घेऊन त्या बंगल्यात बसली. सुनील बाहेर मित्रांशी बोलू लागला. बंगल्यातल्या खोलीत शिकवणाऱ्या उमाकडे बघू लागला. तेवढ्यात सुनीलचा एक मित्र पळत त्याच्याकडे आला. तो धापा टाकत बोलू लागला.
"सुनील !! अरे !! अरे !! " सुनील त्याला सावरू लागला.
"अरे सुहास झाल काय !! "
"अरे !! बोरुवस्तितील काही लोक इकडे आपली शाळा बंद करायला येतायत!! " सुहास जोरात श्वास घेत बोलू लागला.
"त्यांच्यातला एक म्हणत होता !! यांना आज सोडायचं नाही म्हणून !! "
"काही होत नाही !! आपण खंबीर आहोत सगळे !! "
सुनील बोलत शांत झाला. उमाला सारा प्रकार कळला . ती सुनीलला बोलू लागली.
"सुनील अरे आपण पोलिसांना बोलवायचं का ??"
"नाही नको !! " सुनील शांत बोलत होता.
अचानक बंगल्याच्या बाहेर जोरजोरात लोक बोलू लागले.
"कुठ आहेरे त्यो साला!! " काढा बाहेर त्याला !! " गर्दीतला कोणी एक बोलू लागला.
"ये धर्म बुडव्या येतो का बाहेर !! "
सुनील शांतपणे बाहेर आला. आणि त्यांना बोलू लागला.
"हे बघा !! हे सगळं जे मी करतोय ते तुमच्या मुलांच्या आणि या मुलींच्या भल्यासाठीच आहे !!"
"ये तू नको रे शिकवू आम्हाला !! " गर्दीतील लोक बोलू लागले.
" अरे बघताय काय हाना साल्याना !!!" गर्दी आक्रमक झाली.
सुनील, उमा आणि सारे मित्र निडरपणे उभे होते. अचानक त्या गर्दीला भेदत कोणी एक स्त्री सूनीलकडे आली सुनील वर उगरालेल्या हत्याराला लांब भिरकावत देत सुनील जवळ आली. सुनील आणि सारे बघत राहिले. ती बोलू लागली.
"खबरदार या पोरांना हात लावलं तर !! ये किसण्या लाज वाटते कारे या चांगल्या माणसांना मारायला..!! तुमच्या पोरांना शिकवायच म्हणत्यात ही पोरं!! आणि तुम्ही ह्यांना मारताय !! कारे भाड्या हनम्या सावकाराण गिळली ना जमीन तुझी!! शिकला अस्तास तर अंगठा लावायची येळ आली नसती !! आणि त्या सावकारान काय लीव्हलय ते वाचलं असतस की नाही!!  अरे त्या चंदा आणि तारा रांडच्या पोरी पण शिकायला आल्या !! कारण त्यांना त्या नरकातून बाहेर पडायचं !! " ती स्त्री प्रत्येकाला बोलू लागली. गर्दी सारी मान खाली घालून ऐकू लागली.
सुनील आणि उमा त्या बाईकडे बघतच राहिले. ती कोण कुठली काही माहीत नसताना ती धावली. त्या भविष्यासाठी.
"ये रखमे !! तू बाजूला हो !! धर्म बुडवले याने आपला !! पोरीला शिक्षण असतं का !! " गर्दीतून कोणी एक बोलू लागला.
"हो रे !! धर्म बुडवले ना! पोरगी शिकली की धर्म बुडणार !! अरे तुझा धर्म याच पोरिनी वाढवला ना रे !! मग तिलाच हा अधिकार का नाही ??" सगळी गर्दी शांत झाली.
"रखमे तू बरोबर नाहीं केलास !! " असं म्हणत सगळी गर्दी निघून गेली.
सुनील आणि उमा त्या स्त्रीला त्या रखमाला बोलू लागले.
"बाई आज तुम्ही अगदी वेळेवर आलात!! "
"तुम्ही खरंच खूप चांगला दम दिला त्यांना!!" उमा म्हणली.
"परवा तुम्ही आलात तेव्हाच बघितलं होत मी तुम्हाला!! मला वाटलं काय खरं तुमचं!! पण तुम्ही माग नाही सरला !! आणि तिथंच ठरिवलं की तुमच्या या कामात आपण पण येणार म्हणून!!" रखमा दोघांकडे बघू लागली.
"बाई तुम्ही या कार्यात येताय याचा आम्हाला आनंद आहे !!" सुनील रखमाकडे बघत म्हणाला.
"आहो हे तर काहीच नाही!! उद्या वस्तीतल्या दहा बारा बाया यायचं म्हणतायत शिकायला!!" रखमा उमाकडे पाहत म्हणाली.
"आहो पण या लोकांच काय करायचं  !! " उमा चिंतेच्या स्वरात म्हणाली.
"त्यांची काही काळजी करू नका !! उद्या यांच्या बायकाच येनारायत शिकायला !!" रखमा हसत म्हणली.
सुनील आणि उमा दोघे ही हसू लागले.
"उमा पुन्हा बंगल्यात गेली. चंदा आणि ताराला शिकवू लागली. बघता बघता संध्याकाळ झाली. उमा आणि सुनील घरी जायला निघाले.
"काय ग उमा मला एक विचारायचं होत तुला!!" सुनील उमाकडे बघू लागला.
"काय ?"
"हल्ली आप्पा आणि आई तुझ्याबद्दल फारच विचारतात मला !! आणि काही बोललं की हसतात!!" सुनील चालत चालतं बोलू लागला.
"होका !!" एवढंच बोलून उमा हसू लागली.
"आता हे काय !! तूही हसतेयस !!" सुनील उमाला विचारू लागला.
"अरे हसू नको तर काय करू !! जे आप्पा आणि आईला कळलं ,ते सारखं माझ्या सोबत असणाऱ्या तुला कळलं नाही !! म्हणून हसतात ते !! "
"म्हणजे ??" सुनील प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला.
"अरे सुनील!! कस सांगू आता मी!! " उमा सूनिलपासून लांब जात म्हणाली.
"सांग ना !! " सुनील विचारू लागला.
"नाही सांगता येणार रे !!" उमा वळून पाहत म्हणाली.
"मग मी आप्पा आणि आईला विचारतो !!"
" हो विचार !! नक्की विचार !! मी तुझ्यावर प्रेम करते हे त्यांना नक्की विचार हा तू !! आणि त्यांनाच सांग तुज माझ्यावर प्रेम आहे की नाही ते !! " उमा झटकन खोट्या रागात असल्यासारखे भराभर चालू लागली.
सुनील मागेच राहिला.
"अशी काय बोलते ही !! मी तिच्यावर प्रेम करतो हे मी आप्पा आणि आईला का सांगेन !! ते तर हिलाच सांगितलं पाहिजे ना!!" सुनील अचानक कित्येक भावना बोलून दाखवू लागला.
त्याला काय बोलावं तेच कळेना. पुढे निघून गेलेल्या उमाला त्याने थांबवलं. उमा वळून मागे पाहू लागली.
"माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुलाच सांगितलं तर चालेल का??" सुनील हळुवार हसत म्हणाला.
"नाही नको !! आप्पा आणि आईलाच सांग !!"
" बर ठीक आहे !! ते तर सांगेन मी !! "
" पण तुझ्यावर माझं प्रेम आहे हे नक्की !! तुझ्या असण्याने मला पूर्णत्व आहे !! "
"मलाही तुझ्या प्रेमाची सावली हवी आहे सुनील !!"
सुनील आणि उमा त्या सांजवेळी एकमेकांच्या मिठीत सामावून गेले. प्रेम व्यक्त झाले. ओठातून ओठांवर नकळत आले. उमाला सोडून सुनील घरी गेला. दरवाजातून तो आप्पा आणि आईला हाक मारू लागला.
"आप्पा !! कुठे आहात !! "
"अरे असणार तो कुठे मी !!" आप्पा खोलीतून बाहेर येत म्हणाले.
मंदा बाहेर येत बोलू लागली.
"काय रे सुनील !!काय झाल एवढं !! "
"काही नाही आई !! तुझ्या आणि आप्पांच्या हसण्याच गूढ कळलं बर मला !! "
"चला म्हणजे कळलं तर एकदाच !! " आप्पा सुस्कारा सोडत म्हणाले.
"बाकी शाळेत आज खूप काहीं झाल!! " सुनील आप्पांकडे बघत म्हणाला.
"काय रे !!"
सुनील आप्पा आणि मंदा शाळेत काय घडल यावर कित्येक वेळ बोलले. सुनीलने सारी हकीकत सांगितली. नंतर रात्री जेवण आटोपून आप्पा लिहायला बसले.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

स्वप्न ..!!!(कथा भाग ४)

नव्या स्वप्नाची ती चाहूल होती. ते प्रेम अलगद मनात घर करत होते.
"उमा !! सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच !! " अचानक बाहेर जाताना सुनील बोलला.
"अरे !! काही नाही असच !! "
दोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.
"अरे सुनील !! बोरुवस्तित आपले पोरं परत जाऊन आले!! त्यांनी आतमध्ये सुधा येऊ दिलं नाही!!" सूनीलचा मित्र त्याला म्हणाला.
"प्रयत्न करूयात रे !! आपण नक्की यशस्वी होणार !! " सुनील आत्मविश्वासाने म्हणाला.
"या समाज आणि रुढी परंपरा यांनी आजपर्यंत या लोकांना जखडून ठेवलंय!! हे शिक्षण म्हणजे मुलीला नवीन आयुष्य नाही तर नवी स्वप्न आहेत !! हे त्यांना कळतं का नाहीये !!! " उमा अगदिक होऊन म्हणाली.
"नक्कीच यांना कळेल एक दिवस !! आपण नाही हार मानायची!!" सगळे सूनिलकडे पाहू लागले.
  दुपार झाली. संध्याकाळ होत आली तरी शाळेत कोणी येईना. सुनील उमा सगळे निराश झाले. सुनील घरी जायला निघाला. उमा ही घरी जाऊ लागली. शाळा बंद झाली.
"तुम्ही शाळा सुरू करणार का??" अचानक सुनील जाताना त्याच्या मागून आवाज आला.
सुनील मागे वळून पाहू लागला. आणि एका स्त्रीला बघून म्हणाला.
"हो!! गरीब मुलांसाठी शाळा!! खासकरून मुलींना शिक्षण द्यायचं हा उद्देश !!"
"मग पोरी येतात शाळेत ??"ती स्त्री अचानक म्हणाली.
"अजुन तरी नाही !! पण एक दिवस नक्की येतील!!"
"मी आणि माझी बहिण आलो तर चाललं ??" ती स्त्री बोलली आणि सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"चाललं म्हणजे काय !! चालेलंच..!! " सुनील आनंदाने म्हणाला.
"बरं मग मी उद्या येते!! " स्त्री जात म्हणाली.
"आहो पण तुमचं नाव काय ??" सुनील.
"चंदा !! आणि माझी बहिण तारा !! आम्ही बोरुवस्तीतल्या आहोत !! " ती निघून जात म्हणाली.
सुनीलला काय बोलावं तेच कळेना. त्याने उमाला अचानक मिठीच मारली.
"उमा पाहिलंस !! आपलं स्वप्न पूर्ण होणार !! त्या गरीब मुलींना शिकवायच हे कार्य अजुन वाढवायचं!!"
उमा निशब्द होती . ती फक्त सुनीलच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपत होती.
"येते मी !! " भानावर येत उमा म्हणाली.
"चाललीस काय उमा !! थांब ना जरा !! "
"अरे नको !! उद्या भेटुयात ना !! "
उमा बोलून निघून गेली. सुनील सरळ घरी गेला. त्याला ही गोष्ट कधी एकदा मंदा आणि आप्पाला सांगेन अस झाल होत.
"आप्पा !! आप्पा!! कुठे आहात ?" सुनील बाहेरूनच आप्पांना हाक मारत आला.
आप्पा आणि मंदा दोघेही घराच्या अंगणात गप्पा मारत बसले होते. सुनील तिथे पोहचताच आप्पांनी त्याच्याकडे पाहिलं.
"काय सुनील !! एवढ काय झालं !! आधी बस, शांत हो!! "
"आप्पा !! आज घडलेच तसे ना !! "
"काय झालं !!" मंदा सूनिलकडे पाहत म्हणाली.
"आई!! बोरुवस्तीतून उद्यापासून दोन मुली शाळेत येतायत !!! "
अरे वां!! ही तर खरी आनंदाची गोष्ट !! सुनील पोरा उत्तम कार्य करताय तुम्ही!!" आप्पा मनसोक्त बोलले.
"पण मला भीतीच वाटते बाई !! ती माणसं खूप वाईट आहेत म्हणे!!" मंदा चिंतेच्या सुरत म्हणाली.
"त्यात काय भ्यायच मंदा !! आपली पोरं काय त्यांचं नुकसान नाही करत !! " आप्पा बोलले.
आप्पा मंदा आणि सुनील कित्येक वेळ बोलले . अचानक आप्पांनी सुनीलला विचारले.
"उमा काय म्हणते !!"
"काय म्हणणार !! ऐकून खुश झाली !! " सुनील आप्पाकडे पाहू लागला.
"बास एवढंच??" आप्पा मिश्किल हसले.
"अजुन काय म्हणायला हवी ती !! "सुनील आप्पांना विचारू लागला आणि म्हणाला.
असंही आज काय झालं होत की तिला.!! गप्प गप्पच होती दिवसभर !! विचारलं तर काही सांगितलं नाही तिने!!!"
"समाज कार्य करतायत !! जरा त्यातूनही दुसरीकडे बघा म्हणजे कळेल!!" आप्पा खुर्ची वरून उठत म्हणाले.
"म्हणजे !! " सुनील प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
"म्हणजे !! म्हणजे !!! तेही आम्हीच सांगायचं !! " आप्पा खोलीत निघून गेले.
मंदा सूनीलकडे हसून स्वयंपाक घरात निघून गेली. सुनील कित्येक वेळ विचार करत राहिला.
"लेखणीच्या आधारावर कित्येक गोष्टी मी अशा स्वप्नातून सत्यात आणल्या. नाटकाद्वारे किंवा माझ्या पुस्तकांद्वारे, पण एक गोष्ट सत्य होती की हे सारं खोटं आहे." आप्पा खोलीत येताच वहीत लिहू लागले.
"आणि या खोट्या गोष्टींच्या मागे धावताना मला खऱ्या क्षणांची कधी जाणीवच झाली नाही. मंदावर माझं प्रेम आहे हे कित्येक वेळा मला कळलंच नाही. ते खोटे मुखवटे , ती खोटी पात्रे!!! आणि माझ्या सत्यातील ती मंदा !! कुठेतरी विसरते आहे,  ही जाणीव तेव्हा झालीच नाही !! आणि जेव्हा झाली तेव्हा तो क्षण खूप सुखाचा होता. माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आलेली ती नाजूक आणि देखणी मुलगी माझ्या पुस्तकावर स्वाक्षरी मागते आहे आणि मी नकळत त्यावर स्वतःच स्वतःला हरवतो आहे हे कळलंच नाही. ज्यावेळी हे लक्षात आलं तेव्हा मंदा माझ्यासमोर होती. प्रेम अलगद मनात सांगत होती." आप्पा क्षणभर लिहिताना थांबले. आणि पुन्हा लिहू लागले.
"माझ्या कवितासंग्रहा मधील प्रत्येक कविता तिला अगदी तोंडपाठ असायच्या. एखाद्या लेखकावर कोणी इतकं प्रेम करू शकत,?? हे मला तेव्हा कळाले! आजही मंदा माझ्या लिखाणाची पहिली वाचक असते. आजही ती तेवढ्याच उत्साहाने माझ लिखाण कविता वाचते,प्रेम होत नकळत !! आपण फक्त त्याला ओळखू शकत नाहीत !! पण खूप वेळ होण्या आधीच ते कळलं पाहिजे !! म्हणूनच व्यस्त आयुष्याच्या वेळेतून आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे !! " आप्पा थांबले त्यांच्या आणि मंदाच्या जुन्या तारुण्यातल्या फोटोकडे पाहून हसले. त्या भिंतीवरून जणू तो फोटो डोकावून आप्पांचे लिखाण वाचू लागला.
"आहो !! येतायना जेवायला!!" मंदा बाहेरूनच आप्पांना बोलू लागली.
आप्पा खोलीचा दरवाजा उघडत बाहेर आले. दोघेही स्वयंपाक घरात बसून जेवू लागले.
"सुनील कुठे दिसत नाही !! "
"झोपला आज लवकर !!"मंदा म्हणाली.
"मंदा !! तुला आठवत !! तुझी आणि माझी पहिली भेट केव्हा झाली होती.
"आज काय नवीन आता !!"
"काही नाही ग !! असच आठवण आली !!"
"तुमच्या लिखाणाच्या शाईतून आठवले दिसतायत जुने क्षण !!" मंदा हसून म्हणाली.
"हो!! " आप्पा मिशिकील हसले.
जेवण झाल्यावर आप्पा आणि मंदा आप्पांच्या वहीत लिहिलेले वाचत बसले. कित्येक जुन्या आठवणी आठवू लागले.

क्रमशः

✍योगेश खजानदार

स्वप्न ..!(कथा भाग ३)

आप्पा कित्येक वेळ तसेच बसून होते. रात्री तसेच बसल्या बसल्या झोपी गेले. सकाळी जाग आली तेव्हा मंदा खोली आवरत होती. मंदाच्या आवाजाने जागे होत आप्पा मंदाकडे पाहू लागले. आजही मंदा आप्पाना तशीच पूर्वीची मंदाच वाटत होती.
"आज काय अगदी गोड दिसतेस मंदा तू !!"
"कायतरीच काय हो तुमचं !!"मंदा लाजेने चूर होत म्हणाली.
"वाटलं ते बोललो !त्यात काय लाजायचं !!"
"मुलगा लग्नाचा झालाय म्हटलं !! डोक्यावरचं पण पांढरं झालं !!त्याचा विचार करा आता !!" मंदा चेष्टेच्या सुरात म्हणाली.
"अरे !! पांढरे केस झाले म्हणून काय झालं !! मन अजून जवान आहे !!" असे म्हणताच मंदा लाजून खोलीतून निघून गेली.
आप्पा बाहेर येताच सुनील आणि उमा समोरच बसलेले दिसले. आज कुठे काय करायचं, कुठे पथनाट्य करायचं !! किती गरीब मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं सगळं व्यवस्थित ठरवत होते. आप्पा स्वयंपाक घरात जाऊन मंदाशी बोलू लागले.
"उमा बद्दल तुझ काय मत आहे ??"
"खूप गोड मुलगी आहे ती !! काल सुनीलला लागलं तेव्हा तिनेच सांभाळलं त्याला !! नेहमी काळजी घेत असते ती त्याची !! " मंदा अगदी तोंडभरून कौतुक करत होती.
"आज एवढं कौतुक ?" आप्पा मंदाकडे पाहून म्हणाले.
"आहेच मला कौतुक दोघांचही!!  ते जे करतायत त्याच आहेच !! त्यांना रागावते मी, पण तो राग त्यांच्या काळजीपोटी असतो!! " आप्पा फक्त ऐकत होते.
  काहीच न बोलता आप्पा थेट सुनील आणि उमा जवळ जाऊन बसले. कित्येक वेळ त्यांचं बोलणं ऐकत असता अचानक सुनील काहीतरी विसरलं म्हणून आणायला खोलीत गेला. उमा आणि आप्पा दोघेच तिथे होते. आप्पा नी थोडा वेळ घेत उमाला विचारलं.
"उमा!! ऐक विचारू ?"
"आहो आप्पा विचारांना !! "
"हे जे तुम्ही कार्य करताय त्याचा तुम्हाला काही फायदा आहे ?? "
"आप्पा समाज शिकला, त्यातूनही जर मुलगी शिकली तर समाज सुधारेलच ना!! आणि त्याचा फायदा तुम्हाला मला सगळ्यांना होईल!! " उमा अगदी बिंधास्त बोलली.
"हो पण !! आजकाल मुल शिकतात !! मोठ्या पदावर जातात !! परदेशात भले मोठे पगार मिळवतात !! मग ते सारं सोडून इथे हे असं करत बसायचं म्हणजे !! "
"आप्पा !! कधीपर्यंत आपण दुसऱ्या देशांकडे असे जात राहणार!! इथे सुधारणा झाली तर बाहेर जायचा प्रश्नच येणार नाही!! आणि तिकडे जाऊन भले मोठी पगार मिळवणे हे आमचं स्वप्न नाहीच !! हा समाज सक्षम करणं !! त्याला स्वतः च्या  मार्गावर चालवणं ही गरज आहे !! "
"वाह!! पोरी तुमचे विचार ऐकून आज मला खरंच खूप बरं वाटलं !!पण प्रत्येकाला वाटत की आयुष्य अशा प्रकारे जगायचं असेल तर जोडीदारही तसाच हवा !! " आप्पा उमाकडे बघत राहिले.
"हो!! पण सगळ्यांनाच तसा मिळेल अस कस !! आपण जे कार्य करतोय त्यात आपल्या जोडिदाराचा सहवास मिळाला तर कोणाला नको वाटेनं !! "
"तुला मिळेल असा जोडीदार !! " आप्पा अचानक बोलून गेले.
उमा अगदी गोंधळून गेली . इतक्या वेळ स्पष्ट बोलणारी उमा जरा चाचरत बोलू लागली. सुनील गेला त्या खोलीकडे पाहू लागली. आप्पा तिच्याकडे पाहत बोलले.
"आमच्या सूनिलला कोण भेटेन काही कळत नाही बघ !! "
"भेटेन ना नक्की !! त्यांच्यासारखी !! "  उमा आता मात्र गोंधळून गेली.
"बरं उमा आमच्या सुनील बद्दल तुला काय वाटतं ??"
असा प्रश्न विचारताच उमाला काय बोलावं तेच कळेना . ती शांत झाली. फक्त आप्पाकडे बघून हसली. सुनील तेवढ्यात खोलीतून बाहेर आला.
"काय आप्पा !! काय बोलताय उमा सोबत !! "
"असच रे !! सहजच !! " आप्पा उमाकडें पाहत हसले आणि निघून गेले. जाताना उमाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र त्यांनी आपल्या डोळ्यात टिपले. सुनील बद्दलच प्रेम त्यात स्पष्ट दिसत होत.
"चल उमा निघुयात !! "
उमा स्तब्ध होती.
"उमा !! उमा !! चल !! " विचारांच्या तंद्रीतुन उमा अचानक भानावर आली.
तिच्या मनात सुनील बद्दल प्रेम होत, पण ते कधी तिला कळलंच नाही. आप्पांनी फक्त उमाला त्याची जाणीव करून दिली.
" उमा!! आज तो पडका बंगला पूर्ण स्वच्छ करून घेऊयात बघ !! आपली शाळा तिथेच सुरू करूयात !! आणि बोरुवस्तीत पुन्हा जाऊन त्यांना समजावून सांगुयात !! उमा ऐकतेयस ना तू ??" सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
पण उमाच्या मनात प्रेमाचे तरंग उठत होते. त्या सगळ्या गोष्टींशी सुनील अनभिज्ञ होता. सुनील बोलत होता उमा फक्त त्याच्याकडे पाहत होती. मनात कित्येक भाव उमटत होते जणू  तिला बोलत होते

"वेड्या मनाने माझ्या
प्रेम अंतरीचे ओळखले
त्याच्या नजरेत पाहता
माझेच मला मी दिसले

कधी हरवून जाता
स्वतः स मी शोधले
व्यक्त करावे म्हटले तरी
ओठणावरच का विरले

वेड्या मनाने माझ्या
प्रेम अंतरीचे ओळखले !!! "

उमा भान हरपून सूनीलकडे पाहतंच राहिली. प्रेमाची ती चाहूल मनाला देत राहिली.

✍योगेश

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...