तु सोबत असावी || Marathi Poem || प्रेम कविता ||



त्या सुंदर संध्याकाळी , तू सोबत असावी!!
रेडिओवरच्या गाण्यानेही, तुझीच प्रीत गावी !!

वाफाळलेला चहा, आणि गप्पाची मैफिल असावी !! 
तू मनसोक्त बोलताना, जणु स्वतःत हरवून जावी !!

कधी नकळत हसू तुझे, जणु पावसाची चाहूल व्हावी !!!
नजरेत तुझ्या पाहताच, माझी ओढ का दिसावी ??

सारं काही इथेच आहे, जगाची तमा नसावी !!
तुझ्या आणि माझ्या मध्ये, कोणाची गरज असावी??

क्षण जणु थांबले इथे, ती झुळूकही थांबावी !!
शब्दही आतुर होता, तू कविता होऊन यावी!! 

सांज ती बोलता अशी, गुपित जणु सांगावी !!
तूझ्या माझ्या मनातले, सहज ओळखून जावी !!

मनातल्या भावनांना, वाट मोकळी करावी!!
जेव्हा त्या संध्याकाळी, तू सोबत असावी !!

✍️ योगेश खजानदार

सकाळ || कविता मनातल्या || Sakal Marathi Kavita ||

पाहाण्यास या सूर्यास मी ,आज पुन्हा तयार आहे !!
भेट घेऊन क्षणांची तो, आज माझ्या पुढ्यात आहे !!



किरणांनी दाखवले ते मार्ग, चालण्यास मी तयार आहे !!
सारे आकाश पसरून जावे, त्यास कवेत घ्यायचे आहे !!

झेप घेत पाखरांच्या , पंखात बळ येत आहे !!
उमलती ती कळीही आता, अलगद वर पाहत आहे !!

कालचे ते मनातले , सारें निघून जात आहे !!
अंधार तो कोपऱ्यातला, सहज पसार होत आहे !!

जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !!
अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !!

पसरल्या त्या धुक्यात, स्वप्न धूसर होत आहे!!
पानावर दवबिंदू होऊन, मला पुन्हा भेटत आहे !!!

कशी ही सुंदर सकाळ , हळूच मला बोलत आहे !!
माझ्या मिठीत येऊन, अलगद ती हसत आहे !!

पाहण्यास या सूर्यास मी, आज पुन्हा तयार आहे !!

✍️ योगेश 

*ALL RIGHTS RESERVED*

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला || Beautiful Marathi Poem ||



ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !!
रोजच्या आठवणींत!!  गिरवायच होत तुला !!
हळूच अलगद गुलाबी थंडीत, बोलायचं होतं तुला !!
तुझ्या नकारातही अलगद तेव्हा, हसू बघायचं होतं मला !!

ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !!
पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !!
कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !!
वळवणावरती वळताना,  अश्रू लपवायचे होते मला !!

ऐक ना !! पुन्हा भांडायच होत तुला !!
कळत नकळत रुसल्यावर, मनवायच होत तुला !!
गालावरच्या रंगास तेव्हा , आरशात दाखवायचं होत तुला !!
सारं काही विसरून तेंव्हा , मिठीत घ्यायच होत मला !!

ऐक ना !! पुन्हा नव्याने पहायचं होतं तुला !!
नकळत त्या नजरेत, कैद करायच होत तुला !
पापण्यात त्या , जपायच होत तुला !!
चोरुन त्या नजरेस, बोलायचं होत मला !!

ऐक ना !! पुन्हा वचन द्यायचं होत तुला !!
प्रत्येक श्वास तेंव्हा, बोलत असेल जेव्हा तुला !! 
आयुष्याचे क्षण जेवढे, सारे देऊन टाकायचे होते तुला !!
आणि मिठीत येताना तू, अशीच सोबत हवी होती मला !!!

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !!!
पुन्हा रोजच्याच आठवणींत, गिरवायच होत तुला !!

✍️ योगेश खजानदार

नभी चंद्र तो || Chandr Marathi Kavita ||



नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!

कधी पुसावे वाऱ्यासही, तुझीच आठवण आहे!!
कधी निखळत्या ताऱ्यातही, तुलाच मागणे आहे !!

डोकावूनी त्या खिडकीतूनी , तुलाच पाहणे आहे !!
नकळत मग तू दिसताच, अलगद लाजणे आहे!!

सांग कशी ही रात्र जणू, मलाच बोलत आहे !!
तुझ्याचसाठी गुणगुणावे , जणू गीत गात आहे !!

थांबल्या त्या क्षणासही , तुझीच ओढ आहे !!
मिठीत घेण्या तुला जणु, ती झुळूक येत आहे !!

मनातल्या आठवांचा, अंत कुठे आहे ??
हा भास की आभास जणु, सारेच अधुरे आहे !!

नभी चंद्र तो चांदण्यासवे , उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे !!

✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

सुरुवात || Manatle Vichar || Marathi Blog ||



 खुप दिवस असे निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत. असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायमच साथ दिली. जे आजची तुझ्या एका हाकेवर आत्ता तुझ्यासाठी धावून आले. कशासाठी ?? तुझ्या मनातलं सार काही व्यक्त करण्यासाठी ?? हो ना ?? मग का राहावं त्या शब्दांपासून दूर कोणा अनोळखी लोकांमुळे ?? ते शब्द आजही सोबत आहेत , फक्त त्यातली ती व्यक्ती हरवून गेली. खरंच !! कुठे हरवून गेली आणि कुठे बदलून गेली. पण मग शब्दांनीच प्रतिप्रश्न केला, आमची ओळख त्या अनोळखी चेहऱ्यात आहे ?? तू म्हणून आमची काहीच ओळख नाही ?? सांग ना !! मी त्या क्षणी निरुत्तर झालो. 

 ठरवून असं काहीच होत नाही. आणि नशीबा पुढे काहीच मिळत नाही. म्हणून तेव्हाच ठरवलं आता स्वतःसाठी लिहायचं. शब्दांच्या दुनियेत आपण आता स्वतः ला पहायचं. आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची. शब्दांना पुन्हा नव्याने बोलायला लावायच. इतकं की शब्दही पुन्हा नव्याने मला मनसोक्त बोलतील. कसं असतं ना !! आपण शेवटी कितीही चेहरे पाहिले तरी आपल्याला आपल्या चेहऱ्याची ओढ ती काही वेगळीच वाटते. तसच काहीस माझं आता झालंय. नेहमी शब्दांच्या दुनियेत अनोळखी चेहरे मी खूप व्यक्त केले आणि एक चेहरा तो नेहमीच राहून गेला, आणि तो म्हणजे स्वतःचा !! पण अलगद या चेहऱ्याला आता मला रंगवायचं आहे. कित्येक भाव मला माझ्या शब्दात मांडायचे आहेत. कित्येक कविता लिहायच्या आहेत ज्यांना शब्दात मला गुंफायच आहे. ना कोणा वाचकाची वाट पाहणे ना कोणा अनोळखी चेहऱ्याची ओढ ! ओढ ती फक्त स्वतःची स्वतःसाठी !! 

आजपर्यंत नात्यांना मी माझ्या शब्दात लिहिलं. रागाला त्या भावनेत व्यक्त केलं, त्या प्रेमाला मी कवितेत मांडलं. पण हे सगळं झालं ते अनोळखी चेहऱसाठी त्यात मी कुठे होतो ?? मलाच माहीत नाही. पण मग आता मी शोधू तरी कुठे स्वतः ला!!  आजही प्रश्न पडतो आणि उत्तरही मिळत. अंतर्मनात!! त्या खोल मनात मी मलाच कुठेतरी दडचून ठेवलंय. ज्याला वर यायचं आहे. मुक्त फिरायच आहे. त्याला शब्दात व्यक्त व्हायचं आहे. त्याला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे. मला पुन्हा लिहायचं आहे !! हो मला पुन्हा लिहायचं आहे !! स्वतःसाठी !!!

✍️ योगेश 

बाप्पा निघाले गावाला || Ganpati Bappa Moraya || Marathi Lekh ||


 बाप्पाच्या आगमना वेळी खरतर बाप्पा पुन्हा जाऊच नये अस नेहमी वाटत राहतं. पण अनंत चतुर्थी येते आणि वरद विनायकाची जायची वेळ येते. मनातल्या भावनांना आवरत गजाननाची निरोपाची तयारी करावी लागते. हो पण बाप्पाच्या विसर्जनाला मस्त मिरवणूक काढली जाते. ढोल ताशा, लेझिम, कुठे डिजे , कुठे भक्तिपर गाणी यांनी हा आसमंत दुमदुमून जातो. "पुढच्या वर्षी लवकर या!!" ही बाप्पाला दिलेली साद वक्रतुंड नक्की ऐकतो. आणि सुरू होते बाप्पाला निरोपाची वेळ. मनात एक सल असते पण तिथेच एक पुन्हा लवकर येण्याची ओढ असते. या द्विधा मनस्थितीत बाप्पा आपल्या पुढच्या प्रवासाला जात. जिथे पुढच्या वर्षी लवकर त्याला पुन्हा परतून यायचं आहे.




बाप्पाला निरोप देताना खरतर लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्व लोकांची अवस्था एकच असते. कोणाच्या डोळ्यात पाणी येते तर कोणी अलगद आपले टिपूस गाळतो अगदी कोणी पाहणार नाही याची दक्षता घेत. आणि ज्या उत्साहात बाप्पाला घरी आणले होते त्याच उत्साहात त्याला निरोप दिला जातो. जाता जाता बाप्पा खूप काही सांगून जातो. पुढच्या वर्षी येई पर्यंत त्याची आठवण रहावी असे करून जातो. आणि जाताना गणाधीश भक्ताला सांगतो आहे की,

१.मी पुन्हा येईपर्यंत तू नक्कीच आपल्या चांगल्या सवयी वाढवण्याचा प्रयत्न करशील.
२.तुझ्या प्रत्येक आठवणीत माझ्या आठवणी तू जपशील.
३. कधीच वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न तू करणार नाही.
४. सत्कर्म ही मला दिलेली खूप मोठी भेट असेल, तेव्हा पुढच्या वेळी येईल!! तेव्हा नक्कीच तू मला अशा खूप सुंदर गोष्टी देशील.
५. माणूस हा कर्म करतो आणि त्याच फळ त्याला नेहमी भेटतं हे कधी विसरु नकोस.
६. मी जरी परत चाललो असेल तरी माझे लंबकर्न तुझी प्रत्येक साद नक्कीच ऐकणार हे लक्षात ठेव.
७. तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील.
८. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल.
९. पुढच्या वर्षी मी लवकर येईल !!
१०. आणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं !!

अस जणू सांगून बाप्पा आता निघाले आपल्या गावाला, त्यांच्या येण्याची वाट नक्कीच पाहत राहू पण त्यांनी सांगितलेले मार्ग यावर नक्की चालू. आणि त्या वर्षभर तिथेच त्या आठवणीत बाप्पाला जपू. 

गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी लवकर या !!

✍️योगेश खजानदार

पैसा बोले!! पैसा चाले!! || Paisa Kavita ||


श्रीमंताची जात पैसा, गरिबाला जात काय ??
विचार थोड स्वतःस तू, इथे तुझं अस्तित्व काय ??

पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !!
श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !!

धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ??
श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !!

सांगू नकोस कोणास काही, सगळं इथं गुपित हाय!!
जात , पात सगळं खोटं, पैसा हीच जात हाय !!

स्वप्न अशी पाहू नको , जिथे तुला जायचं न्हाय !!
श्रीमंताच्या गावी परका, गरिबीत जागा न्हाय !!

फिरून फिरून यावं तिथंच, शोध काही संपणार न्हाय !!
दोन जगात तुला कधी , अस्तित्व तुझं भेटणार न्हाय !!

विचार एवढा करून शेवटी , हाती उत्तर मिळेल काय ??
पैश्याच्या या दुनियेत आज , माणूस नक्की कुठे हाय ??

✍️ योगेश

आगमन गणरायाचे || गणपती बाप्पा मोरया ||


बुद्धीची देवता म्हणून ओळख असावी अश्या गणरायाचे आज आगमन झाले. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या वक्रतुंडांचे आज आगमन झाले. आजपासून पुढचे दहा बारा दिवस या मंगलमूर्तिची मनोभावे सेवा करावी, आणि त्या वरदविनायक विघ्नेश्वराच्या आगमनाने घर आनंदी झाले. सगळीकडे नुसता आनंद आणि प्रत्येकाला त्या विनायकाला घरी आणण्याची घाई. आणि त्या गणराया प्रती असलेली भक्तांची ओढ ही वेगळी सांगावी लागतं नाही.  आज सकाळपासून घरात नुसती लगबग चालू होती. मोदक, वळीव लाडू, अनारसे, बेसनाचे लाडू, करंज्या अश्या कित्येक वक्रतुण्डाच्या आवडीचे पदार्थ करण्याची तयारी चालू होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची हीच खरी ओळख होती. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करून समाजात यामधून एकी, बंधुत्व आणि आपुलकीची भावना निर्माण केली. आणि हीच ओळख या गणेशोत्सवाची झाली. मंडप, उंच उंच मुर्त्या, स्पर्धा, हलती देखावे आणि अशा कित्येक स्वरूपात या उत्सवाचे आयोजन होऊ लागले आणि यामागे एकच भावना, आणि ती म्हणजे त्या गणरायाची मनोभावे प्रार्थना. या प्रार्थनेत पुढचे दहा बारा दिवस कसे आनंदात जातात कळतही नाही. सकाळी आरती , संध्याकाळी आरती आणि त्या आरती मध्ये प्रेमरुपाने आणलेला नैवेद्य म्हणजे विविध पदार्थाची मेजवानीच होते. खरंच या गणरायाच्या आगमनाने चारी दिशा उत्साहाने भरून जातात.

गणरायाप्रती ही भक्ती खरतर इतकी सुंदर आहे की बालगोपालांना या गणरायाची एवढी आतुरता असते, की ती शब्दात सांगावी कशी असा प्रश्न पडतो. गल्लीत , सोसायटी मध्ये, घराघरा मध्ये या बालगोपालांचा नुसता गोंधळ चालु असतो. सारे एकत्र येऊन एक छोटा मंडप तयार करतात. त्यामध्ये सुंदर आरास बसवतात. घरातून आणलेल्या साड्या नाहीतर एखादे बेडशीट त्या मंडपाची शोभा अजुन वाढवतात. खरतर मला आजपर्यंत मोठमोठ्या गणपती मंडळांपेक्षा या बालगोपालांचे मंडप खूप आवडतात. त्यांची ती लगबग पाहून आपणही लहानपणी असेच गणपती बसवत होतो , तेव्हाही आपण असेच करत होतो अश्या कित्येक आठवणीत मग येतात. घरोघरी जाऊन "गणपतीची पट्टी !!!!!!  " म्हणून सुरात सगळे ओरडायचे. कोणी आकरा तर कोणी एकवीस रुपये वर्गणी द्यायचे. कोणी एकशे एक दिली तर ती आमच्या दृष्टी खूप मोठी वर्गणी ठरायची. शेवटी गोळा केलेली वर्गणी हजार बाराशे पर्यंत जायची. मंडप असा विशेष काही नसायचा त्यामुळे पाच सहा बांबू , दोन पत्रे अस त्यांचं भाड दिवसाला सगळं मिळुन पन्नास ते साठ रुपये जायचं.पुन्हा सर्वांनी जाऊन गणपतीची मूर्ती आणायला जायचं. पण तेव्हा आमच्या सोबत कोणीतरी वडीलधारे लोक असायचे. नाचत नाचत हलगीच्या आवाजात गणपतीची मूर्ती आणायची. मग पुढचे दहा बारा दिवस त्या मंडपामध्येच मुक्काम करायचा. सकाळी अंघोळ आणि दोन वेळच जेवण एवढ्यासाठीच ते काही घरी जायचं. शाळेत जाऊन आल की पहिले मंडपात काय चाललंय हे पाहायला जायचं. मग तिथे मित्रांपैकी कोणीतरी बसलेलं असायचं. कोणी माळा लावत, कोणी उदबत्ती लावत, कोणी बाप्पा समोर लावलेला दिवा नीट करत सगळं कसं सुंदर दिसायचं. मला नेहमी हा प्रश्न पडतो की या बालचमूं मध्ये ही इतकी सुंदरता या गणराया प्रती येते कुठून?? तेव्हा उत्तरही आपोआप मिळत. त्या गणराया प्रती असलेल प्रेम. आणि  हेेच प्रेम या गणरायाबद्दल आज बालगोपालां मध्ये पाहताना मन प्रसन्न होऊन जात.

मोठ व्हावं आणि सामाजिक भान काय असतं हे कळाव तस मोठ्या गणेश मंडळाचं असतं. किती सुंदर देखावे, किती सुंदर त्या गणरायाच्या मूर्ती, अगदी पाहतच राहव अस वाटत राहतं. काही काही मंडळांच तर कौतुक करावं तितकं कमी असतं. या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक विषयाचे हलते देखावे, कुठे कुठे प्रबोधनपर कार्यक्रम , कुठे नाटके अश्या कित्येक माध्यमातून ही मंडळ लोकांना प्रबोधन करत असतात. काही ठिकाणी गरिबांना मदत, कुठे अन्नछत्र, तर कुठे आर्थिक मदत अश्या विविध मार्गाने या गणेश मंडळांची या समाजाप्रती सेवा चालू असते. आणि हीच खरी ओळख असावी या उत्सवाची. यामार्फत कित्येक गरजू कुटुंब या सणात आपल्या चेहऱ्यावर हसू आणत असतील, आणि नक्कीच त्या गणरायाला यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट मोठी नसावी.

गणरायाच्या आगमना नंतर थोड्या दिवसात येतात त्या गौरी. तीन दिवसांसाठी येणाऱ्या गौरी या सणात अजुन आनंदाची भर घालतात. घरात गौरी येणार त्या आदल्या दिवशी मंडप घालतात. त्यांच्या आगमनात घरातील ताट , वाट्या, टाळ, घंटी यांच्या आवाजात मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करतात. मग घरातील स्त्रिया मोठ्या उत्साहात त्या गौरी समोर सुंदर मांडणी करतात. शोभेच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी अश्या विविध वस्तू ठेवून सजवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी या गौरीना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी संध्याकाळी दाखवतात. मग तिसऱ्या दिवशी सर्व महिला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून गौरीला मनोभावे पाया पडतात. या तीन दिवसात मनाला सुंदर आठवणी या गौरी देतात. साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरात आहे अशी भावना त्या वर्षभर त्या आठवणी मधून देत राहतात. खरंच वर्षातले हे दिवस सुंदर असतात.


गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे अशी भावना या वरदविनायका मुळे येते. आणि ते खरंच आहे. गणपती बाप्पा हा आपला मित्र आहे. तो सदैव आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असतो. त्याची आपल्या भक्तांवर तितकीच माया आहे . खरतर या सगळ्यात अवघड गोष्ट असते ती गणरायाच्या परतीची त्याबद्दल काय लिहावे हा प्रश्न . पण त्याबद्दल मी नंतर नक्की लिहितो , तूर्तास गणरायाच्या आगमनाने आनंदित झालेल्या आपल्या सर्वांना हा गणेशोत्सव अगदी आनंदात जावा .. इतका की आयुष्य म्हणजे मोदक होऊन जावं . अगदी गोड गोड , कितीदा जरी खाल्ला तरी पुन्हा पुन्हा खाऊ वाटावा ..असा तो मोदक . ..  होणं ?? 

गणपती बाप्पा मोरया !! 

✍️ योगेश खजानदार

असे कसे हे || Poem || Ase Kase He ||




मनात आहे !! पण ओठांवर येत नाही !!
सारंच काही !! सांगता येत नाही !!

तुला पाहिल्या शिवाय!! करमत ही नाही !!
तुला ते कळू नये!! हे लपवता ही येत नाही !!

आठवांचा पाऊस आता!! थांबत ही नाही !!
चिंब त्यात भिजावे !! मन काही ऐकत नाही !!

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!

सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !!
श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !!

कधी तुझा भास !! मनास कळतं नाही !!
मनातले तुझे चित्र !! आजही पूर्ण होत नाही !!

वेड्या मनाचे तुला !! शोधणे थांबत नाही !!
शोधूनही न सापडावी !! ती तू मला भेटत नाही !!

असे कसे मनाचे !! कोडे हे सुटत नाही !!
मनातले हे भाव !! ओठांवर येत नाही!!

✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

स्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन || Independence Day ||

 दरवर्षी स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो. आपण विविध प्रकारे तो साजराही करतो, आणि तो केलाच पाहिजे. व्हॉट्सअँप , फेसबुक किंवा अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तीपर स्टेटस ठेवून आपण आपल्या मनातली भावना व्यक्त करतो, आणि असे पाहता पाहता दरवर्षी हा स्वतंत्र दिवस येतो आणि जातो. या सर्वांमध्ये आपण विसरून जातो ती एक गोष्ट, ज्याचा कोणीही कधी विचार करत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे राष्ट्राप्रती चिंतन आणि मनन. आता तुम्ही म्हणाल चिंतन मनन म्हणजे तरी काय ?? तर आपल्या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून आपणच घेतलेला एक छोटासा आढावा. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेली संस्थान भारतात विलीन झाली, आणि घडला तो आजचा भारत. त्यानंतर कालचा तो भारत आज कुठे आहे? याबद्दल केलेले आपलेच विचार आपल्याला या देशाप्रती अजुन सखोल विचार करायला लावणारी आहेत. 

तुम्ही म्हणाल हे काम तर सरकारचं आहे, पण ही भावनाच मुळात चुकीची आहे, कारण देशाप्रती विचार, चिंतन मनन करण्याची गरज त्या प्रत्येक नागरिकाला आहे जो या देशाचा सुज्ञ नागरिक आहे. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशातील नागरिक लिहितात, तसेच भविष्यही हेच नागरिक घडवतात. अशावेळी आपण आपल्या देशाप्रती काय विचार करतो हे तितकंच महत्त्वाचं होत. फक्त झेंडा फडकावून किंवा व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर आपली देशभक्ती व्यक्त करून आपली जबाबदारी संपत नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की तसे करू नये उलट उत्साहाने स्टेटस ठेवावे , फेसबुक वर राष्ट्रभक्तीपर विचार शेअर करावे पण त्यासोबत या गोष्टीचा विचारही व्हावा ही माफक अपेक्षा. उलट आजच्या टेक्नॉलॉजीने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक साधन दिले आहे आणि त्याचा वापर नक्कीच करावा, असो. आज २०२० या वर्षी भारतासमोर नेमकी कोणती आव्हान आहेत याचा सामान्य नागरिक म्हणून मी आज विचार करणे आवश्यक आहे. कारण आपले एक छोटेसे पाऊल देशासाठी खूप महत्त्वच आहे.


स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आपण आज जिथे उभा आहोत त्याचा विचार करता प्रत्येक भारतीयाने आपली पावले कशा प्रकारे उभारावी याचा प्रत्येक नागरीकने विचार करावा. आज २०२० ची आव्हाने पाहिली तर, चीन आपल्या सोबत आक्रमक भूमिका घेत आहे. त्याची विस्तारवादी नीती ही नेहमीच भारताला घातक ठरत आलेली आहे. अक्साई चीन वर त्याने यापूर्वीच अतिक्रण केले आहे. पण भारत आणि चीन मध्यें प्रचंड मोठा व्यापार चालतो. भारत आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तू आणि technology यांवर अवलंबून होता. पण जर समोरच्याची बाजू आपणास नेहमी घातकच ठरणारी असेल तर त्याला योग्य पद्धतीने उत्तरही द्यावे लागते. भारतीय सैन्य आपल्या बाजूने त्यांना नेहमीच सडेतोड उत्तर देत आलेले आहे. पण एक नागरिक म्हणून या चिनी मालावर बहिष्कार करून आपण सुज्ञ नागरिक आपल्या बाजूने त्यांना उत्तर देऊ शकतो. जर मनात खोट असेल तर नात कधीच टिकत नाही आणि अशीच काहीशी स्थिती भारत चीन संबंधावर आहे. कारण विस्तारवादी नीती आणि नेहमीच व्यापारी दृष्ट्या देशांवर आर्थिक पकड निर्माण करून समोरील देशाचे नुकसान करणे ही चिनी देशाची नेहमीच ही वाईट नीती राहिली आहे. अशा या चीनला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या मालावर बहिष्कार टाकून आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची गरज प्रत्येकाची आहे. आणि त्या दृष्टीने भारत सरकारने आपली पाऊलेही उचलली आहेत सरकारी कॉन्ट्रॅक्ट मधून चिनी कंपन्या हद्दपार केल्या, कित्येक चिनी मालावर बंदी घातली. नव्या युगातील डिजिटल strike ही झाली कित्येक चिनी ॲप्सवर भारताने बंदी घातली. कारण त्यामुळे भारतीय सुरक्षेला धोका होता. आणि याच स्वागत प्रत्येक भारतीयाने केलं ही खरंच कौतुकाची गोष्ट. 

आत्मनिर्भर भारत खरतर ही संकल्पनाच मुळात भारत कसा असावा हे स्वतःच सांगते. याला कोणत्याही वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाहीये . तर भारत कसा असावा हे या दोन शब्दात कळून जात. आजची आव्हान या देशाला घ्यायची असतील तर त्याला आता आत्मनिर्भर होण तितकंच गरजेचं आहे. स्वावलंबी देश हा नेहमीच जगावर राज्य करतो हे तितकंच खरं आहे. जेव्हा कोणताही देश हा जगाला लागणारी आवश्यक गोष्ट निर्माण करतो तेव्हा त्याची निर्यात करतो आणि कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून त्यांचे उत्पादन स्वगृही म्हणजे आपल्याच देशात निर्माण करतो तेव्हा तो देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर चालतो.आजच्या भारत सरकारची ही नवी आव्हाने आपल्याला तीच सांगतात की आत्मनिर्भर व्हा कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा. कारण जेव्हा परकीय चलन देशात जास्त येते आणि आपले चलन परकीय देशात कमीत कमी प्रमाणत जाते तेव्हाच देशाची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होते. अगदी संपूर्णतः परकीय वस्तूंचा वापर बंद करता येईल हेही तितकंच अशक्य आहे कारण भौगोलिक दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणाने काही गोष्टी या देशात निर्माण करणं शक्य नसतं एव्हाना प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या दृष्ट्या अशा वस्तूंमुळे इतर देशांवर अवलंबून असतोच, पण अशा वस्तूंचा वापर जर कमी करता आला तर त्याचा फायदा देशाला होईल. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा विचार करताना काही उदाहरणे आवर्जून द्यावीशी वाटतात.  या वर्षी संपूर्ण जगात अचानक आलेल्या महामारीमूळे आपल्याला खूप काही शिकवलं. याच उत्तम उदाहरण म्हणजे ppe किट . Ppe किट यापूर्वी भारतात कधीच निर्माण केले जात नसत पण या काळात भारतीयांना स्वावलंबी होण्याची किती गरज आहे यांची जाणिव झाली आणि पाहता पाहता आज देश जगातला दुसरा सर्वात जास्त ppe किट निर्माण करणारा देश झाला. हे सगळं संभव झालं ते आपल्यातील दृढ विश्वास आणि निश्चयामुळे. आणि हीच आत्मनिर्भरता आता आपल्याला सर्व स्तरावर करायची आहे. आणि यातूनच घडवायचा आहे तो उद्याचा एक स्वावलंबी भारत. 

उद्याची आव्हान पेलायची असतील तर आपल्याला आज जबाबदारी उचलावी लागणार यात काहीच वाद नाही. एक नागरिक म्हणून मी आज कुठे उभा आहे हे मी पाहिलं पाहिजे. उद्या एकीच आव्हान आमच्या समोर आहे!!  मग आम्ही सर्व धर्मांना , जातीला , पंथना सोबत घेऊन आहोत का ?? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा प्रत्येक महापुरुषावर प्रत्येक भारतीयांचा तेवढाच अभिमान असायला हवा. अमुक अमुक महापुरुषाला अमुक अमुक जातीचेच फक्त आठवण करतात हे जोपर्यंत थांबत नाही आणि प्रत्येक महापुरुषाला एक भारतीय म्हणून मी तेवढाच मान देत नाही तोपर्यंत त्या महापुरुषाला खरी आदरांजली आपण देऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे. प्रखर राष्ट्रभक्त होऊन या भारताची सेवा ही आता आपले पहिले कर्तव्य आहे ही विसरू नका. कारण आजूबाजूचे हे देश आपल्या मातृभूमीला खंड खंड करण्यासाठी क सक्रिय आहेतच. मध्यंतरी नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारतीय भूमीचे काही गाव , प्रदेश आपल्या नकाशात दाखवले, पाकिस्तान नेहमीच काश्मीरला आपला भाग मानत आला आहे आणि यावर्षी त्याने नकाशा द्वारे सांगण्याचा प्रयत्नही केला आहे, आणि चीनची विस्तारवादी नीती. अशा चारही बाजूंनी हे देश आपला अजेंडा चालवत असताना आपण भारतीय नागरिक एक होण्याची किती गरज आहे हे वेगळं सांगावं लागतं नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचा जातीचा अभिमान असावा किंबहुना तो असायलाच हवा पण एक भारतीय नागरिक म्हणून त्याचा त्रास इतरांना होता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिले. कारण राष्ट्र मजबूत असेल तर त्या राष्ट्राची संस्कृती मजबूत राहते आणि त्या संस्कृतीत मग या सर्व गोष्टी अगदी आनंदाने राहतील. त्यामुळे राष्ट्र सर्वप्रथम हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 

तुमची ओळख ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या राष्ट्राचे एक नागरिक आहात यावरून होते आणि तो नागरिक सुज्ञ असावा किंवा तो तसा घडवावा हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. आपली संस्कृती ही खूप जुनी आणि तितकीच सुंदर संस्कृती आहे, हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं असतं. आणि त्याची सुरुवात अगदी लहानपणा पासून झाली पाहिजे. आपला राष्ट्राप्रती अभिमान हा आपल्या राष्ट्राला मजबूत करतो. उद्याच्या आव्हानाला पेलण्याची ताकद देतो. नाहीतर काय हो स्वातंत्र्य दीन दरवर्षीच येतो त्यामध्ये नवल ते काय??,  हे उद्याची पिढी म्हणायला नको एवढीच अपेक्षा. आणि म्हणून उद्याचा पिढीला इतिहास कळावा आणि तो त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटावा हे गरजेच आहे. कारण उद्याचे हे सुज्ञ नागरिक आहेत. येणाऱ्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारसेच महत्त्व पटवून देणं तितकंच गरजेच आहे. आजच्या या परकीय संस्कृतीच्या अतिक्रमणात कित्येक इथल्या जुन्या चालीरीती , भाषा , पेहराव यांचा कुठेतरी र्हास होत आहे याची जाणीव आपल्याला होत आहे. याच्या वाढीसाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने कार्य करण्याची गरज आहे.  कारण एक नागरिक म्हणून तुम्हीच हे जपलं पाहिजे. कोणत्याही प्रखर राष्ट्राची ओळख ही पहिले त्याची राष्ट्रभाषा यावरून होते आणि हीच ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करायची आहे. परकीय भाषा या देशातून हद्दपार करण तितकंच महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती ही आपल्या भाषेतच शोभून दिसते आणि त्याची सुरुवात प्रत्येक भारतीयाने करायला हवी.  आपल्या भारतात विविध भाषा आहेत आणि त्या भाषा जोपासण्यासाठी तिथल्या नागरिकांनी त्या भाषेत बोललं पाहिजे. आज कित्येक ठिकाणी नव्या येणाऱ्या पिढीला आपल्या मातृभाषेत नीटसं बोलताही येत नाही ही सत्य परिस्थीती पाहायल मिळते. खरतर याही परकीय आक्रमणांचा गंभीर विचार आता करण गरजेच आहे . तुमची भाषा तुमची ओळख सांगते आणि हीच भाषा तुमची संस्कृती टिकवते हे लक्षात असण खूप गरजेचं आहे.

अश्या कित्येक मुद्द्यावरती आज मनन चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस जरी असला तरी तो साजरा करण्यासाठी आपल्याला वर्षाचे संपूर्ण दिवस एक तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या ती एकीची, तपश्चर्या ती राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याची, तपश्चर्या करावी लागते ती आपल्या देशाची अखंडता टिकवण्याची , तपश्चर्या करावी लागते ती एक सुज्ञ नागरिक म्हणून या देशाची सेवा करण्याची. तर मग पुन्हा त्या निर्धाराने आपण या स्वतंत्र दिनी पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी राष्ट्राभिमान , राष्ट्रभक्ती, एक सक्षम, आत्मनिर्भर भारत करण्यासाठी कटिबद्ध होऊ. 

जय हिंद!!

✍🏼 योगेश खजानदार

तुझे लाजणे || प्रेम कविता || Love Marathi Poem ||



किती आठवांचा उगा अट्टाहास
नव्याने तुला ते जणू पाहताच!! 
सोबतीस यावी ही एकच मागणी
तुझ्यासवे त्या जणू बोलतात !!

चांदणी ती पाहता तुला शोधणे
रात्रीस त्या जणू हरवणे !!
चांदणे होऊन तू पसरून जावे 
त्या चंद्रास त्या जणू सांगतात !!

जशी छेडली ती तार क्षणांची !!
सूर जणू भेटले त्या सुरांशी !!
गीत होऊन ऐकत रहावे 
ही एकच मागणी जणू मागतात!!

शब्दही ही का प्रेम करत रहावे !!
तुझ्याचसाठी जणू ते सुचावे !!
अलगद त्या कागदावर लिहिताना
कविता होऊन जणू बरसतात !!

सांगशील का तूच आज हे काही ??
आठवांचा हट्ट जणू जातं नाही !!
तेव्हा पाहून लाजणे तुझे असे की
प्रेमात जणू तूझ्या पाडतात !!

✍️ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

सूर्यप्रकाश || Morning Marathi Kavita || Poem ||



खुणावते मशाल पुन्हा, अंधारल्या राती !!
उगाच का शोधिसी सावल्या , स्वतःच्या पाठी !!

चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!

असावी पुन्हा नव्याने एक, चालण्याची गती!!
उन्ह वारा पाऊस नी काय, नसावी कोणती भीती !!

विसावल्या ठिकाणी तेव्हा , भेटावी जुनी नाती !!
हरवलेल्या क्षणासवे , बेभान होऊन नाचती!!

मंदावला तो प्रकाश , देतो आठवण आजची !!
व्यर्थ घुटमळने इथेच का , असावी पुढची भ्रांती !!

तेवत राहावी ही मशाल, हीच खरी उक्ती!!
जिथे नसेल आज भान, व्यर्थ आहे ती शक्ती !!

जावे दूर तेव्हा, आपल्या स्वप्नांच्या देशी !!
जिथे भेटावा तो सूर्यप्रकाश , मारावी त्यास मिठी !!

खुणावते मशाल पुन्हा , अंधारल्या राती!!
उगाच का शोधिसी सावल्या, स्वतःच्या पाठी !!

✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

एक जिद्दी || INSPIRATIONAL MARATHI POEM ||



ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !!
रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

सांग ओरडुन आहे अजुन, शर्यंत ही कोणती !!
इथे अजुन!!  तूही अडून, जणू पाहणारे पाहाती !!
ध्येय एक , ध्यास एक,  चिकाटी असावी सोबती !!
सांगेन मार्ग पुन्हा तेव्हा, तुझ्या प्रयत्नांच्या गोष्टी !!

चालता फक्त चालत राहावे, सोबत नसावी आस ती !
कधी असेल एकांत असा, कधी असेल सोबतीस ती!!
सांग त्या मनास समजून, जगणे जणू रित ती !!
अपयशात रडू एकटे , जिंकता आनंदाच्या भेटी !!

वाचाळता नसावी ओळख, कृतीतून सारे बोलती !!
कुठे गर्व उराशी येता, सारे तिथेच संपून जाती !!
नसावे दोष कोणास काही, न करावी टीका ती !!
वाईट वेळ येईल तेव्हा, असावी सकारात्मक दुष्टी!!

हा मार्ग असा की, नसावी परतीची वाट ती!!
अनोळखी या माणसाची, जणू हीच ओळख ती !!
येणाऱ्या कोणा हातातील, व्हावी एक मशाल ती !!
जणू प्रकाश होऊन पसरावे, तोच खरा जिद्दी !!

✍️योगेश 

*ALL RIGHTS RESERVED*

अनोळखी एक पाहुणा || Marathi Poem ||



अचानक यावा पाहुणा तो अनोळखी!!
जीवन मरणाची त्याच्याकडून भीती !!
तूच घ्यायची आहेस स्वतःची काळजी!!
घरात राहशील तर, ना तुला त्याची भीती !!

समजून घे , आहे फार तो जिद्दी !!
तुझ्या एका चुकीची ,शिक्षा होईल फार मोठी !!
हलगर्जी नसावी , एवढी एकच मागणी !!
नकोस विसरू ,तुझी स्वप्ने आहेत मोठी !!

सारे थांबले आहे , नकोस होऊ दुःखी!!
देव रुपी वैद्य , आहे खूप जिद्दी !!
पराभूत केले त्यास, पाहा त्याने किती !!
संपूर्ण त्याचा अंत, करेन हा जिद्दी !!

अहोरात्र आपल्या सुरक्षेची काळजी !!
तहान भूक विसरून , त्यांनी करावी ती किती !!
वर्दतील त्या पोलिसांची ही कहाणी !!
आपल्या सहकार्याने , सोपी होईल ती किती ??

जणू युद्ध पुकरावे , सारा देश आहे सोबती!!
अनोळखी या पाहुण्यास, वाट दाखवू बाहेरची !!
प्रशासनास सहकार्य, हीच खरी शक्ती !!
मग पाहा , लवकरच या पाहून्यास , वाट दाखवू बाहेरची !!

✍️योगेश

द्वंद्व || कथा भाग ५ || हृदयस्पर्शी कथा ||




कथा भाग ५

"या चारही दिशा मला माझ्या सायली जवळ घेऊन जातील का ?? पण ती कुठे आहे हे कसे कळणार !! तिच्या घरी एकदा जाऊन पहावे का??!! पण मी तिला बोलू तरी काय ?? कोणत्या शब्दात तिची माफी मागू !! त्या प्रणयाच्या वेळी तुझ्या डोळ्यात जे प्रेम मला दिसले त्याची एक ठिणगी या हृदयात ही आहे हे मला आता पुरत कळून चुकलं आहे सायली !! थांब जरा !! नको जाऊस !! त्या ओठातून निघालेला तो पायलसाठीचा तो शब्द अखेर मला सत्य काय आहे हे सांगून गेला !! पायल आता भूतकाळ आहे !! पण मी त्याला विसरणार नाही !! कारण तीही माझी तितकीच गोड आठवण आहे !! आणि मला माहिती आहे तू मला त्या आठवणींन सहित स्विकारशील. नक्कीच !!!" 

विशाल आता सायलीच्या घराजवळ आला होता. पण घराला कुलूप होत. शेजारच्या काही लोकांना त्यांनी विचारलं तेव्हा ती कुठे गावाला गेली हे कळाल. तिचे आई बाबा तिच्या सोबत गेले हेही कळालं. विशाल दाही दिशा तिला शोधत होता.

"सायली , माझी सायली!! माझ्यावर प्रेम असुनही पायलला हसत हसत स्वीकारलं. कधी कळुही दिलं नाही, की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. पायल गेल्यावर ही तिने नेहमी मला सांभाळून घेतलं. माझी विद्यार्थीनी म्हणून राहिली. कदाचित सतत माझ्या सोबत राहण्यासाठी." विशाल डोळ्यात आलेला एक अश्रू पुसतो. 

अचानक त्याची नजर समोर कडीला लावून ठेवलेल्या चिठ्ठीकडे जाते. चिठ्ठी घेऊन तो वाचू लागतो.

प्रिय विशाल, 

 मला माहिती आहे तू नक्की मला शोधत येणार!! झालेल्या चुकीची माफी मागायला येणार !! तुझ्या आयुष्यात पायल जशी महत्त्वाची आहे, तसचं माझ्या आयुष्यात तूही तितकाच महत्त्वाचा आहेस. आणि तुला अजुन दुःख देण्याचं माझ्यात धाडस नाही. त्या दिवशी आणावधनाने घडलेल्या त्या प्रणयात ना माझी चूक होती ना तुझी होती!! ती चूक त्या वेळेची होती. पण मला माफ कर, मी पुन्हा कधी तुझ्या आयुष्यात येणार नाही. तुझ्या आणि पायल मध्ये मी कधीच येणार नाही. फक्त तू आनंदी राहा. माझंही सुख यातच आहे. जमल्यास मला माफ कर!!

तुझीच सायली.

पत्र वाचून विशाल क्षणभर शांत राहिला. त्याला काहीच सुचेना. समोरच्या ओट्यावर तो कित्येक वेळ बसून राहिला. नंतर अचानक जागेवरून उठला आणि त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊ लागला.

"ये सुमित !! सांग ना रे !! सायली कुठे जाणार होती तुला काही सांगितलं का रे ??"
"खरंच नाही सर !! मला ती काहीच म्हणाली नाही."

हताश होऊन विशाल घरी जाऊ लागला. मनात विचारांचं अक्षरशः एकमेकांशी द्वंद्व सुरू झालं होत.

"अखेर मी तिला गमावलच ना ??  माझ्यावर माझ्या नकळत प्रेम करणाऱ्या त्या सायलीला मी गमावलं !! जी अस्तित्वातच नाही !! जिला जाऊन दोन वर्ष झाली तिच्या आठवणीत मी आज माझ्या प्रत्येक दुःखात माझ्या जवळ असणाऱ्या, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सायलीला गमावून बसलो. तिचं ते सतत माझ्याकडे येणं!! मला सांभाळून घेणं !! मला माझ्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं !! आज मला त्या गोष्टींची खरंच जाणीव होत आहे!! होणं ?? माणूस आपल्यापासून दूर गेल्यावरच आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव का व्हावी ?? जेव्हा जवळ असतात तेव्हा आपण दुसऱ्याच जगात जगत असतो!! आणि मग अचानक अस्तित्वाची जाणीव होते आणि सगळं पुसून जात !!!" 

विशाल हताश होऊन घरा जवळ येतो. विचार करत करत मुख्य दरवाज्यातून आत येतो आई , सदा समोरच उभे असतात.

"काय झालं विशाल ?? आणि सायलीला शोधायला का गेला होतास ??"
"कारण मला माझी चूक कळली आहे आई !! सायली माझ्यावर मनापासून प्रेम करते ! आणि ती दूर निघून गेल्यावर माझ्याही मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली!!" विशाल समोरच्या खुर्चीवर बसून बोलतो.
"मग भेटली नाही का ती??" आई मध्येच बोलते.
"खूप शोधलं मी तिला !! पण ती कुठेच नाही !!"
"तिचे आई बाबा ?? मित्र ??त्यांना विचारायचं !!"
"घराला कुलूप होत!! मित्रांना विचारलं तर कोणालाच काही माहीत नव्हतं !!"
"दादा !! चहा देऊ का ?जरा बरं वाटेल तुम्हाला "
" नको सदा !! काही सुद्धा खायची, प्यायची इच्छा नाहीये आता !!"
"मी केलेला चहा सुद्धा ??"  मध्येच कोणीतरी बोललं.

आवाज ओळखीचा वाटतो म्हणून विशाल पाहतो. ती सायली होती. तिच्या हातातला कप घेत त्याला काय बोलावं कळतंच नव्हतं. तो फक्त पाहत राहिला.कित्येक वेळ. 

"सायली ?? तू आणि इथे ???"
"सकाळीच आले मी इथे !!तुम्ही झोपला होतात म्हणून मग आई जवळ बसले होते!!"
"आणि मग ते पत्र ???" विशाल कुतूहलाने विचारतो.
"ते सगळं माझं काम होत !!" आई मध्येच बोलते.
"पण का ?? "
"कारण तुला आपल्या जवळच्या माणसाची जाणीव करून देण्यासाठी!! "
विशाल आईकडे पाहत राहतो. आई बोलत राहते.
"सायली येऊन गेल्यावर तुझ्यात झालेला बदल मला नक्कीच नवी दिशा देऊन गेला. तेव्हा मी सायलीला या विषयी बोलले!! तिने मला सगळं सांगितलं !! तुझ्या मनात पायल किती रुतून बसली आहे!! हेही तिने मला सांगितलं !! तेव्हा मीच तिला सांगितलं!! मी सांगेन तोपर्यंत विशाल समोर तू यायचं नाही!! तुझं प्रेम त्याला कळायची गरज होती!! आणि तेच मी केलं !! विरह माणसाला अजुन जवळ आणतो हे खरं आहे !! पण एखाद्याच्या विरहात संपूर्ण आयुष्य विसरून गेलो तर जवळ असलेले, आपल्यावर तितकंच प्रेम करत असलेले लोक आपल्या पासून दुरावतात!! हेच मला तुला यातून सांगायचं होत!! पायलची जागा कोणी घेऊ शकत नाही !! पण विशाल सायलीची जागाही कोणी घेऊ शकत नाही !!!" आई मनापासून बोलली. कित्येक दिवस विशालला बोलायचे होते हे तिला.
"खरं आहे आई !! मला माझी चूक कळली आहे !! आणि मला ती सुधारावी लागणार हेही मला माहित आहे!! पण सायली मला माफ करेन ???" विशाल सायलीकडे पाहत म्हणाला.
सायली क्षणभर शांत राहिली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तेव्हा नकळत ती लाजली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हसू उमटले. आई आपल्या खोलीत निघून गेली. सदा आपल्या कामात गुंग झाला. समोर होते फक्त सायली आणि विशाल.

कित्येक वेळ दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. सायली गालातल्या गालात लाजली. विशाल तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला.
"माझ्यावर इतकं प्रेम करतेस तू ??" विशाल अचानक बोलला.
सायली नकारार्थी मान हलवत त्याच्यापासून दूर जाते.
"सांग ना ?? "
"माहित नाही !! पण ओठांच्या शब्दांना फक्त तूच माहित आहेस !! नजरेच्या त्या पापण्यात तुझीच आठवण ठेवली आहे !!" सायली विशालकडे पाहत म्हणाली.
"मी पायलच्या आठवणीत वेडा होतो तेव्हाही ??"
"हो तेव्हाही !!"
"पण का ??"
"कारण माझ्या प्रेमाला कोणतंच बंधन नव्हतं !! ना विचारांचं द्वंद्व होत !! ते नितांत आहे !! तू सोबत असावा एवढीच त्यात मागणी आहे !! तू मिठीत यावा अस नेहमी वाटलं पण हट्ट त्यात कधीच नव्हता!! " सायली मनातलं सांगत होती.
"आय लव्ह यू सायली!!" विशाल तिला मिठीत घेत म्हणाला.
"माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस !! तुझ्या आठवणीत मी क्षण न क्षण तुला शोधलं आहे !!! तुझ्या रितेपणाची जाणीव खूप वाईट आहे !!नाही ना जाणार ??" विशाल सायालीकडे पाहत म्हणाला.

सायली फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्या ओठांवर पुन्हा कित्येक प्रेमाचे मधुर रस रिते झाले. दोघेही एकमेकात मिसळून गेले, गुंतून गेले.

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!
रिते करावे भाव मनीचे!!
पण अश्रूंची ती वेगळी तऱ्हा!!

नजरेतूनी पाहता आज तुला!!
कवितेत लिहिले मीच मला !!
शोधून पाहिले माझ्यात तुला!!
पण सापडलो ना मीच मला !!

सांग ते प्रेम कळले ना तुला!!
सांगूनही कळले ना मला !!
आठवांचे द्वंद्व असे की 
तुझ्याविना सोबती ना मला !!!

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!!"

विशाल आणि सायली खोलीत कित्येक वेळ समोरच्या चित्रात स्वतःला शोधत राहिले. आपले प्रेम व्यक्त करत राहिले.

*समाप्त*

✍️ योगेश

द्वंद्व || कथा भाग ४ || मराठी प्रेम कथा ||




कथा भाग ४

"हे कोणतं स्वप्न आहे !! काहीच कळत नाही!! सायली मला सोडून जावी आणि तिला थांबवण्याचा एवढा प्रयत्न मी करावा ?? तिचा तो चेहरा आजही डोळ्यासमोरून का जात नाहीये !!! तो स्पर्श पुन्हा पुन्हा जाणवावा !! नाही हे चूक आहे !! ज्या पायल शिवाय मी कधीही इतर कोणाचा विचारही केला नाही तिला मी आज फसवलं आहे !! पण मग सायलीच काय ?? तिच्या मनात माझ्याबद्दल काय भाव असतील आता!! मी तिचा विश्वासघात तर केला नाही ना ?? मग पायलच नाव घेताच सायली माझ्या मिठीतुन दूर का व्हावी ?? तिच्या ओठात मला तो प्रेमरस का भेटावा ?? सायली माझ्यावर प्रेमतर करत नाहीना ??  की नकळत मीही तिच्यावर प्रेम करतो आहे ?? एवढा विचार तो का व्हावा ?? इतके प्रश्न, पण उत्तर एकही माझ्याकडे का नाही ?? " विशाल पलंगावर पडून विचार करत राहिला.

रात्रभर विचार करुन करून विशाल झोपलाच नाही. सकाळी लवकर उठून आवरून बसला. खोलीतून बाहेर येत समोर आईला बोलू लागला.

"आई !! कोणी आलं होत का ग ?" मनातल्या भावना अचानक ओठांवर याव्या तसे विशाल म्हणाला.
"एवढ्या सकाळी??  कोण येणार होत का ??"  कुतूहलाने विचारू लागली.
"नाही !! कोणी नाही !!" विशाल आई समोर बसत म्हणाला.
आई आपल्या कामात व्यस्त होती. समोर ठेवलेल्या रिकाम्या चहाच्या कपकडे पाहून त्याने सदाला हाक मारली.
"सदा !! चहा !!"
विशाल हाक मारेपर्यंत सदा चहा घेऊन आला.
"हे घ्या !! तुम्हाला पाहिलं तेव्हाच चहा घेऊन यायला लागलो होतो !! म्हटलं तुम्हाला आता चहा नक्की लागेल !!" सदा हसत म्हणाला.

विशाल चहाचा कप हातात घेत समोरच्या मुख्य दरवाज्याकडे एकटक पाहू लागला. चहा कपमध्ये तसाच राहिला. सदा बाजूला उभारलेला, त्याला लक्षात येते तो मध्येच बोलतो.
"दादा चहा घ्या !! गार होईल !!"
विशाल भानावर येत चहाचा कप घेऊन आत आपल्या खोली मध्ये जातो.

"काय रे  सदा!! हल्ली विशाल कुठे गुंग असतो काही कळत नाही ??कोणत्या विचारात गुंतला आहे काय माहित !!!"
"बाईसाहेब !! काल सायली येऊन गेल्यापासून हे असच चालू आहे बघा!!"
"काल सायली आली होती घरी ?? मला कसं माहित नाही मग ??"
"तुम्ही तेव्हा आत मध्ये होतात !!"
" काय झालं आहे पण ??" आई कुतूहलाने विचारते.
" ते काय माहित नाही मला !!! "
"बर ठीक आहे !!" 

एवढं बोलून आई आपल्या कामात पुन्हा व्यस्त होते पण तिला सायली आणि विशालचे विचार कामात मन लावू देत नव्हते. विचारावे तरी कसे म्हणून आई गप्प राहिली. आपल्या कामात व्यस्त राहिली.

विशाल खोलीत आपल्या चित्राकडे उगाच पाहत राहिला कित्येक वेळ, आणि बडबडू लागला.

" ही पायल आहे !! नाही ही सायली आहे ! नाही ही सायली नाही !! अरे !! ही पायल नाही !! हा कोणता प्रश्न आहे ?? या चित्रात मला पायल शिवाय कधी कोण दिसलेच नाही !! मग आज या चित्राचा चेहरा मला सायली सारखा का वाटावा ?? ती सायली जीचा स्पर्श मला तिच्यात हरवून गेला. जिच्या डोळ्यात मी पाहिला आहे तो प्रेमाचा अथांग समुद्र !! फक्त माझ्यासाठी !! पण मग माझी पायल कुठे आहे??  ती पाहा त्या आठवणीत ! त्या आमच्या आठवणीच्या चित्रात ती मला स्पष्ट दिसते आहे !! पण तिचा तो स्पर्श आठवत नाही आता !! पण आठवांचा स्पर्श जाणवतो आहे मला !!! सायली ही अस्तित्व आहे की पायल ?? की हा सारा भास आहे माझा !! ते पहा !! ती सायली माझ्यापासून दूर जात आहे ! पण ती पायल आहे ना ?? नाही सायली आहे !!! थांब सायली !!" विशाल त्या चित्राला जवळ घेत म्हणाला.

थोड्या वेळाने पुन्हा विशाल खोलीतून बाहेर आला. सदाला त्याने हाक मारली. सदा समोर येताच त्याने विचारले.
"सदा कोणी आले होते का रे माझ्याकडे ??" 
"नाही दादा कोणी नव्हते !!! "
"बर ठीक आहे !!! " अस म्हणत विशाल पुन्हा खोलीत गेला.

दिवसातून कित्येक वेळा त्याने सदाला विचारले पण सदाचे उत्तर काही बदलले नाही. आई झाला प्रकार पाहत होती.  विशालच्या मनाची अवस्था तिला कळली होती. विशालही समजू लागला होता. पण स्वतःला थांबवू शकत नव्हता. कित्येक वेळ उगाच बसून राहिला आणि तेवढ्यात बाहेरून सदा हाक मारू लागला.

"दादा !! बाहेर तुमचे विद्यार्थी आले आहेत !!"
विशाल जागेवरून उठला. यात नक्की सायली असणार म्हणून तो लगबगीने बाहेर जाऊ लागला. बाहेर येत समोर पाहू लागला. तेव्हा एक विद्यार्थी बोलला.
"सर ! काल आम्ही आलो नव्हतो म्हणून आज आलो आहोत !! वर्गासाठी नाही पण काही प्रश्न होते त्यांची उत्तरं विचारायची होती!! "
"बरं बरं!!  विचाराना !! "

विशाल आणि ते विद्यार्थी कित्येक वेळ प्रश्न आणि उत्तरे असा संवाद करत राहिली. त्या मध्ये विशालची नजर सतत सायलीला शोधत होती. पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. अखेर विशालने त्यांना विचारलेच,

"सायली कुठे दिसत नाही ते ??"
"ती कुठे गेली कोणालाच माहित नाही !! सकाळी मी जाऊन आले पण तिच्या घरी कुलूप होत." एक विद्यार्थीनी म्हणते.
"कुठे गेली काय माहिती ??" 
"नाही !! काहीच माहीत नाही !! माझी आणि तिची पर्वापासून भेटच नाही."
"बाकी कोणाला ??"
सर्वांनी नकारार्थी मान डोलावली.

विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन परत गेली. पण विशालच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठले. 

"काल पासून सायली कुठेच नाही ?? गेली तरी कुठे म्हणायचं ही ?? काहीच कळत नाही !! तिने जीवाचं काही बरंवाईट केलं असेल तर ?? नाही पण ती तस करणार नाही !! सायली इतकी कमकुवत नाही!! कित्येक वर्ष झालं मी तिला ओळखतो आहे !! ती सतत सोबत होती माझ्या !! पायल जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हाही ती सर्वात पहिले पुढे होती!! माझ्या प्रश्नाचं उत्तर होती ती !! आणि आज प्रश्नही तीच आहे !! सायली !! एकदा बोलायची संधी दे !! एकदा भेट मला !!" विशाल अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिला, सायलीला आपल्या विचाराच्या विश्वात शोधत राहिला.

"विशाल ?? अरे जेवायचं नाही का रे ??" आई अचानक समोर येत विशालला बोलू लागली.
भानावर येत विशाल बोलला.
"हो आई जेवायचं आहे !!"
समोर ताट देत आई म्हणाली.
"घे !! आणि जरा पोटभर जेव !! सारखं ते चित्र नाही तर वर्ग !! "
"तू कशाला घेऊन आलीस ?? मी आलो असतो !!" विशाल ताट हातात घेत म्हणाला.
"कामात व्यस्त होतास !! म्हणून मी घेऊन आले !!"
विशाल काहीच म्हणाला नाही. आई क्षणभर शांत राहिली आणि पुढे म्हणाली.
"सकाळपासून पाहते आहे !!कामात लक्ष नाहीये तुझ? काही झालंय का ??"
"काही नाही आई !! "
"मनात असतं ते बोलून टाकावं विशाल !! नाहीतर मनात विचारांचे कित्येक डोंगर तयार होतात !! मग ते आपल्यालाच उगाच मोठे वाटायला लागतात." आई मनसोक्त बोलत होती.
"पण ते बोलता येत नसेल तर काय करावे मग ??" विशाल.
"कोणतीच गोष्ट व्यक्त करता येत नाही असे होत नाही, एकतर आपण ती व्यक्त करताना उगाच भीती बाळगतो !! म्हणून ती तशीच आत राहते !! मनातल्या कोपऱ्यात !!" 

विशाल फक्त आई कडे पाहत राहतो. आई त्याच्याकडे क्षणभर पाहते आणि आपल्या खोलीत निघून जाते. विशाल जेवण करतो आणि आपल्या खोलीत जातो. रात्रभर तो झोपतच नाही. समोरच्या चित्राना उगाच एकटक पाहत राहतो.

"आज मला भूतकाळ आणि वर्तमान यातला फरक तो कळतो आहे. पायल हा माझा भूतकाळ आहे, ते बघ त्या चित्रात ती माझ्या सोबत आहे. पण आज तिचा स्पर्श आठवणी शिवाय कुठेच नाही. ती सायली माझा वर्तमान आणि भविष्य आहे. आता मनात माझ्या कोणतेच द्वंद्व नाही. मला कळून चुकले ते सायलीचे पुन्हा पुन्हा माझ्याकडे येणे !! माझ्यावर नितांत प्रेम करणे !! पण हे कळले तरी केव्हा !! जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा !!! पण नाही, आता हा भास नाही !! आता शोध आहे तो अस्तित्वाचा !! ज्याला मी नेहमी दुर्लक्ष करत राहिलो!! नाही मला तिला शोधायला हवं !! मला तिला शोधायला हवं !!" विशाल भानावर येतो.  क्षणभर शांत झोपी जातो.

सकाळच्या सूर्य किरणांनी नवी दिशा दिली. विशाल झोपेतून उठला. त्याने मनाला आज पक्क केलं होत, आज तो सायलीला शोधणारा होता. त्यामुळे तो आज लवकर आटपून बाहेर आला. आई समोरच होती तिच्याकडे पाहून तो म्हणाला.

"आई मी बाहेर जातोय !! "
"एवढ्या सकाळी !! अरे पण कुठे ??"
"सायलीला शोधायला !! तिला पुन्हा घेऊन यायला !!"

आई फक्त पाहत राहिली. विशाल मुख्य दरवाज्यातून बाहेर गेला.

क्रमशः 

✍️योगेश

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...