मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही सगळं कस अगदी मजेत असायचं. शहरातल्या सारखं दरवाजा बंद करून घरात बसणं हा प्रकार म्हणजे गावाकड शेजारच्यांना चर्चेला विषय असं व्हायचं. गावातल्या त्या मोठ्या झाडाखाली कित्येक वेळ गप्पा चालायच्या. गावातल्या सुशीच्या लग्नापासून ते तिच्या बाळांतपणा पर्यंत सगळी माहिती थोडी थोडी सांगितली जायची. हो !! पण आपुलकीने बरं का!! शेजारच्या चावडीत खेळत असलेले पोट्टे आईने एकदा तरी तुडवल्या शिवाय घराची वाट धरायचे नाहीत. हे असं रोज व्हायचं. म्हणजे गावात जिवंतपणा होता हे बाकी खरं. शहरातून आलेला माणूस म्हणजे परग्रहावरील एखादा माणूस आपल्या घरी आला आहे अशी त्याची खातिरदारी व्हायची. म्हणजे एकंदरीत काय !! तर आलेला पाहूणा ४ २ किलोने लठ्ठ होऊन जायचा. उगाच नाही खेड्यात चला म्हणायचे बापू..!! असं सारं होत ते आपलं खेड!! राजकारण गेलं चुलीत म्हणत इथले प्रत्येक सण साजरे व्हायचे यात काहीं वाद नाही. आणि २ ४ चुणचुणीत पोर या कार्यक्रमाचं आकर्षण असायचे हे विसरूनही चालत नाही. अगदी गावात पूर्वी तमाशाचा फड आणण्यापासून ते मंदिरात भजन कीर्तन घेणं इथपर्यंत त्याचा सहभाग असायचा. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे , अगदी वेळप्रसंगी आपला विचार न करता समोरच्याचा विचार करणे याला खेड असं म्हणायचं . पण हे सगळं आधी व्हायचं बर का !! पूर्वी !!
  रंगीत चित्रपट आले आणि गावाकडच्या पोरांची डोकी सटकली. शेजारची सुशी लग्न करून सासरी गेली म्हणून महाद्या चार महिने रडकी गाणी ऐकत बसला. नंतर लग्न करून दिलं दुसऱ्या पोरी सोबत आणि ४ पोट्टे झाले बाहद्दराला ते वेगळंच. असो .. पण काळ बदलत गेला. तश्या गावाकडच्या रूपरेषा ही बदलत गेल्या. फक्त गावाकडच्याच असं नाही पण शहरातल्या ही . शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे हे म्हणतात ते काहीं खोट नाही. माणूस बदलतो आणि त्यासोबत त्याच्या गरजाही बदलत जातात.तसे खूप काही बदल होत गेले. संध्याकाळचा वेळेला घराच्या अंगणात तुळशी समोर एक सुंदर दिवा तेवत असायचा. आईने अगदी बजावून सांगायचं, शुभंकरोती म्हणल्या शिवाय रात्रीच जेवण मिळणार नाही बघ तुला.!! आणि मग बहीण भाऊ सगळे मिळून अगदी एका सुरात म्हणायची. रात्रीच्या वेळी रामरक्षा स्तोत्र पठण केल्याशिवाय तर झोपच येत नसायची. कधी कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायच आणि त्या सारखं सुख ते काय असायचं.!! पण ते सारं काळाच्या पडद्याआड गेल. असो !! पण हे सारं आज पुन्हा पाहताना खरंच त्या लहानपणी आपण खर आयुष्य जगलो याच समाधान देऊन जात.
  कित्येक वर्ष सरली आणि आताच्या काळात सगळं कस स्मार्ट झाल. मोबाईल आले , डिश टीव्ही आले..!!ज्या खेड्यात दूरदर्शन शिवाय चॅनल्स माहीत नव्हते तिथे आता लोक कित्येक चॅनल्स पाहू लागले. गाड्या आल्या सारं काही सुख आणि सोई घेऊन आल. पण कित्येक बदलही झाले. म्हणावे तर चांगले बदलही झाले आणि काही वाईटही.!! गावाकडच्या गाडीची वाट पाहणं आता बंद झाल, काही वेळात लोक प्रवास पूर्ण करू लागले. पूर्वी तालुक्याच्या गावाला जायचं म्हणजे गडावर जाऊन आल्यासारखं असायचं, पण आता आले काय गेले काय , काही नाही!! पण बदल झाला. शहरात तर ,लोक कमी आणि गाड्या जास्त झाल्या. रस्त्यावरच्या गाडीची किंमत आहे पण चालणाऱ्या लोकांची नाही अशी अवस्था झाली. रस्ते रुंद झाले आणि इमारती उंच..!! एकाच इमारतीत २० २० कुटुंब राहू लागले, पण कोण कोणाला ओळखत पण नाही अशी अवस्था..!! खेड्यात ही तेच सुरू झाल. मालिका नावाचं भूत साऱ्याच्या मानगुटीवर बसलं..  चुलितली भाकर करपून खाक झाली तरी मालिका बंद होईना अशी परिस्थिती झाली. चावड्या ओस पडल्या. पोट्टे मोबाईल मध्ये गेम खेळण्यात मग्न..!! म्हातारे कित्येक स्वर्गवासी झाले ,जे आहेत ते घराच्या कोपऱ्यात.
   पण परिस्थिती बदलली ती इथेच थांबली नाही. जे तरुण पोर प्रत्येक सणवार एकत्रित येऊन साजरे करायचे ते आता एकमेकांना जातीपातीच्या नजरेतून पाहू लागले. यातून समाजात एक वेगळीच दुफळी निर्माण झाली. खरतर ही आजही सौम्य प्रमाणात आहे .. याचा उद्रेक होण्या अगोदर ही फळी मोडायला हवी हे मात्र खर. राजकारण गेलं चुलीत म्हणारे तरुण राजकारणासाठी भांडू लागले !! खरतर हा बदल नको होता !! पिरावर जाऊन मस्तक ठेवताना जे सुख भेटायचं ते कुठेच नव्हतं.!! गावाच्या देवीच्या जत्रेत सलीम भाईच्या दुकानातली जलेबी आजही तोंडावर गोडी आणते!! बदल व्हावा पण नक्की कसा हे एकदा पाहायला हवं !! टुकार पोरांचे वाढदिवसही चौकाचौकात होऊ लागले. नेतृत्व बदलू लागले. काही चांगले झाले काही वाईट आले ..!! पण लोकांनी काय घ्यावे हे कळेनाच झाले.!! पण हे काही बदल वाईटच झाले.
   अशात आता पुन्हा गावाकडे फिरा किंवा शहरात फिरा वेगळेपण काय फार थोडेच राहिले. आता सगळीकडेच लोक सुधारले !! शहरातल्या सारखं गावाकड सुधा लोक दरवाजे लावून बसू लागले ..!! चावड्या नामशेष झाल्या !! आणि त्यात खेळायला पोरांना वेळ तर मिळायला हवा ना !! शाळा , ट्युशन , एक्स्ट्रा क्लासेस, हे!!  ते,  काय आणि काय !! ७५ वर्षाचा आजोबा अजुन ठणठणीत आहेत आणि या पोरांना कानावर जड होतो आहे इतक्या जड भिंगाचा चष्मा !! !! आणि त्यातून शुभंकरोती विसराच !!! हे पोर twinkle twinkle little star वाले !! त्यामुळे तुळशी समोरचा दिवा वैगेरे यांच्यासाठी संस्कार नाही तर भंमकपणा झाला!!! रागवायची सोय नाही त्यांना, तर आईने तुडवाव कधी !! सारं कस नाजूक झालंय !! पण मुलांना यातून बाहेर काढायला हवं !! Twinkle Twinkle पेक्षा यांना शिवराय आणि संभाजी महाराजांचे धडे द्यायला हवे !! आपली माती , आपला देश याबद्दल त्यांना प्रेम निर्माण करायला हवं हे मात्र नक्की !!असो !! बदल झाला याचा आनंद आहेच !! नवनवीन तंत्रज्ञान आले खूप काही बदलले !! पण आपली संस्कृती , आपले विचार बदलता कामा नये !!
  शेवटी! आपली माती , आपली माणसं !! यातच तर खरा आपलेपणा असतो !! आणि ते जपणं फार गरजेचं असतं !! नाही का ??
 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...