आभाळ || मराठी सुंदर कविता || Aabhal ||



वाऱ्यास न व्हावा, भार तो कोणता!! दाही दिशा, मार्ग दिसावे !!
स्वार होऊन, निघता ते मग!! आभाळ नभी त्या, दाटून यावे !!

कधी शुभ्र धवल ते, कापूस दिसता !! उन्ह सावल्यांचे, खेळ व्हावे !!
कधी कृष्णवर्ण ते, रंगून येता !! बेफाम होऊनी मग, बरसून जावे !! 

गर्जून सांगता अन, आकाशात जणू मग !! आवाजही ते, असे घुमावे !!
तळपत्या त्या, तलवारी सम !! विजेस त्या, क्षणभर पहावे !!

नाते कोणते असे, वृक्षांसवे नकळत की !! आनंदाने ते, बहरून जावे !!
हिरवी चादर पांघरूनी, फिरावी धरती !! असे निसर्गाने, नटून यावे !!

संसार या जगी , पाण्याविण न काही!! जीवन नाव, त्यास द्यावे !!
जपावे जणू असे, मोती जसे !! पैशात न, त्यास मोजावे !!

नदी नाल्यातून खळखळून, डोंगरास त्या बोलून !! असेच ते, वाहत जावे !!
नकळत मग त्या, वाऱ्यासवे कधी !! आभाळ नभी त्या, दाटून यावे !!

✍️ © योगेश खजानदार

स्पर्श तुझ्या आठवांचा || मराठी प्रेम कविता || Love ||




स्पर्श तुझ्या आठवांचा, ओठांवर त्या क्षणांचा !!
अलगद माझ्या हृदयास, बहरून जातो !!

तू असावे जवळी, मागणे हेच मनी !!
आभास या मनाला, छळून जातो !!

बोलता मी अबोल, गाते गीत कोण ??
सूर त्या प्रेमाचे, छेडून जातो !!

नजरेस एक शोध !! शोधूनही मग हरवून !!
अनोळखी त्या तुझ्यात, अडकून जातो !! 

वाटेवरी त्या थांबून, वाट तुझी पाहून !!
नकळत त्या पानावर, लिहून जातो !!

फांदिवरच्या त्या फुलांना, सांगितले दाही दिशांना !!
गंध तुझ्या मिठीचा, दरवळून जातो !!

✍️© योगेश खजानदार

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||

उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून दुपारची वेळ, एक निवांत मिळालेला क्षण आणि पुढे काय करावं हा प्रश्न. मग लॅपटॉप ऑन करून त्यावर एखादा चित्रपट पहायचं ठरलं. मनाशी तस ठरवलं सुद्धा. पण मन कुठेतरी वेगळीकडेच हरवून गेले होत. सगळं काही ट्राय करून बसलो, मित्रांशी फोनवर बोललो, चॅटिंग केली. इंस्टाग्राम वर रिल्स पाहिले तरीही मन काही केल्या लागेना. पाहता पाहता उन्हाची तीव्रता कमी झाली. संध्याकाळची वेळ झाली. फ्रिझ मधील थंडगार पाणी पिऊन गच्चीवर मोकळी हवा खायला चाललो आणि जाताना अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड पाहिला. क्षणात मनाला जुन्या आठवांचा स्पर्श झाला आणि माझी पावले नकळत कॅरम बोर्डकडे वळली. मनाची घालमेल का होते आहे याच उत्तर मला मिळालं होत. त्या संध्याकाळी तो कॅरम बोर्ड चांगल्या फडक्याने पुसून स्वच्छ केला. माळ्यावर एका कोपऱ्यात पडलेल्या सोंगट्या दिसल्या आणि मनाला एकच आनंद झाला. सगळं काही स्वच्छ करून ठेवलं. मित्रांना व्हॉट्सॲप वर त्याचे फोटो टाकले आणि उद्या भेटण्याचं ठरलं.




हे नेहमी असंच होत, रोजच्या आयुष्यात आपल्याला कंटाळा आला की अडगळीतल्या त्या गोष्टी पुन्हा आनंद देऊन जातात. एरवी वाटतात त्या पडीक गोष्टी किंवा घरातली अडचण. पण आठवांचा बाजारात आजही त्या गोष्टी किती अनमोल आहेत हे उगाच वाटतं राहताना, मन नकळत आठवांच्या बाजारात काय काय भेटत हे पाहायल जात आणि हातात मावणार नाही इतकं सारं घेऊन येत. कुठे कुठे आपण थांबावं असही त्याला वाटायला लागत. अगदी लहानपणीच्या आठवणी ते स्वतः समोर जिवंत करत. 

साधा अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड मला नकळत माझ्या जुन्या आठवणीत घेऊन गेला. जेव्हा मी सहा सात वर्षाचा असेल. तेव्हा एवढी कुठे कनेक्टिव्हिटी नव्हती, ना लोकांकडे घरोघरी लॅन्डलाईन फोन नव्हते. तेव्हा कोणा नातेवाईकांचा फोन हा कोणा शेजारच्या घरी जर लॅन्डलाईन असेल तर यायचा. त्याच्याकडील कोणी चुणचुणीत पोर पळत येऊन सांगायचं. फोन आपल्यासाठी आहे हे कळल्यावर घरातले पळत सुटत आणि फोनवर बोलत. बोलणं पाचच मिनिट होई पण पुढच्या महिनाभराचा आनंद त्यात सामावलेला असायचा. कोणाचं लग्न ठरलं , कोणाची थब्येत कशी आहे , कोण कुठे गेला हे त्यातून कळायचं. पुढे मग काही वर्षानंतर आमच्याही घरी लॅन्डलाईन फोन आला आणि या सर्व गोष्टी जुन्या झाल्या. कालांतराने मोबाईल फोन आले त्याचीही तऱ्हा अशीच काही असायची. आमच्यात पहिला फोन बाबांसाठी घेतला होता जेव्हा त्यांची पुण्याला बदली झाली होती तेव्हा. तेव्हा त्याच्या हातात मोबाईल फोन पाहून एवढं नवल वाटायचं की कधी एकदा मोबाईल हातात घेऊन पाहतोय अस व्हायचं. मग स्मार्ट फोन आले आणि आता त्याच कोणाला काहीही देणंघेणं नाही. अस म्हणा ना हवं तर की मोबाईल फोन हा आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 

पुढच्या दिवशी दुपारी कॅरम खेळायला सगळे जुने मित्र आले. निघाल्या मग जुन्या गप्पा आणि नकळत ते उन्हाळ्याचे दिवस. आठवले ते दिवस जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही काय काय मजा करायचो ते. सकाळी लवकर उठून आम्ही सगळे मित्र शाळेच्या ग्राऊंडवर खेळायला जायचो. इतर वेळी हवीहवीशी वाटणारी ती शाळा उन्हाळ्यात मात्र एकटी आणि भकास वाटायची. सगळे वर्ग कुलूपबंद, सगळीकडे शांतता आणि त्या शांततेत शाळेच्या जवळचे पिंपळाचे झाड वाऱ्याने आवाज करायचे. अश्या वेळी माझ्या मनात एकटेपणाची जाणीव का होत असे मला कधीच कळल नाही, पण शाळा सुटली आणि त्याच गुड माझेच मला नकळत काल कळले, की ती एकटेपणाची जाणीव त्या शाळेलाही आम्हा विद्यार्थ्यांमुळेच जाणवतं होती. शेवटी शिष्याविना गुरूही अपूर्णच नाही का ? असो पण आजही ती शाळा मला हवीहवीशी वाटते हे मात्र नक्की. गप्पा रंगात आल्यावर आम्ही कित्येक वेळ कॅरम खेळत खेळत त्या आठवणी गोळा करत राहिलो. त्यावेळी जो कॅरम मध्ये हरेल त्याला सगळ्यांना पेप्सी खायला घालावी लागत असे. आता तुम्ही म्हणाल पेप्सी तर पेय आहे ते खायचं कस ? तर त्याच अस की आमच्या लहानपणी पन्नास पैशाला पेप्सी कांडी मिळायची आणि ती खायची मजाच वेगळी असायची. त्यावेळी आनंद पन्नास पैशाला भेटायचा. किती स्वस्त होतं ना सगळं? 

पुढे मग काही दिवस मी मामाकडे राहायला जायचो. मामाच गाव अस काही लांब नव्हतं आजच बार्शी पासून दहा किलोमिटर अंतर म्हणजे निव्वळ चक्कर मारून आल्या सारखं आहे . हल्ली मी आगळगावला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला फिरत फिरत अगदी सहज जातो. पण १९९७-९८ मध्ये म्हणजे मी त्यावेळी सहा सात वर्षाचा असेल तेव्हा मात्र हे अंतर म्हणजे डोंगर चढून गेल्यासारखं लांब वाटायचं. त्याकाळी सुद्धा सायकल प्रवास करत गावावरून बार्शीला यायचे. पण आम्हा लहानांना अस काही करता येत नसे. टिळक पुतळा म्हणून बार्शीत एक चौक आहे तिथून गावाला जायच्या बस मिळत असतं. तिथे तासनतास थांबल्यावर बस् मिळायच्या त्यातही तुफान गर्दी असायची. हे दहा ते पंधरा किलोमीटरच अंतर बस थाबत थांबत अर्ध्या पाऊण तासात पूर्ण करायची. गावाला गेलो रे गेलो की सगळीकडे नुसता आंब्याचा सुगंध पसरलेला असायचा. अख्खी एक खोली आंब्यानी भरलेली असायची. हे शहरातल एक डझन दोन डझन असल तिथे काही नसायचं. वाटला आंबा खावासा की जायचं खोलीत घ्यायचा एक मस्त आंबा आणि बसायचं खात. तसच खात खात बाहेर जायच गावाकडच्या मित्रांसोबत चावडीवर खेळायला. बैलगाडीत फिरायला, मज्जा मस्ती करायला. मग त्यातही दुपारच्या वेळी आलेल्या गॅरेग्यार वाल्याकडून मस्त गॅरेग्यार खायचं, गॅरेग्यार म्हणजे  बर्फाचा गोळा. त्यावेळी आम्ही त्याला गॅरेग्यार म्हणायचो. का म्हणायचो विचारू नका पण म्हणायचो.

बघता बघता दिवस असे निघून जायचे आज्जी आजोबा ,मामा मामी यांच्या सोबत दिवस कसे मजेत जायचे.मग मजेत अजून भर म्हणून मामा व्हिसिआर् आणायचा तेही भाड्याने. मग त्यावर आम्ही जुन्या लग्नाच्या कॅसेट्स बघायचो एखादा चित्रपट बघायचो. जोपर्यंत तो व्हीसिआर परत देत नाही तोपर्यंत त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा. मग सुट्टी संपायला आली की बाबा आणि आई बार्शीला आम्हाला पुन्हा घेऊन जायला यायचे. जाताना अक्षरशः पाय निघत नसायचा. मामेभाऊ तर माझ्यासोबत यायचा हट्ट करायचा. आणि आमची उन्हाळ्याची सुट्टी जवळ जवळ संपायची. 

हे सगळं आठवताना नकळत आजचे ते दुरावलेले नाते आठवले जे स्मार्ट फोनच्या एका क्लिकवर कनेक्ट आहेत. आता कोणाकडे सहसा जाणं होत नाही. काहीतरी निम्मित असेल तरच जायचं होत. मेसेज सोडा भेटण सुद्धा दुर्मिळ झालं आणि म्हणूनच की काय हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या उन्हाच्या झळां जास्त तीव्र वाटतात. असेल कदाचित ही काळाची महिमा की त्याने क्षणात सगळे जवळ तर आणले पण तितकेच सगळे दुरावले ही. मी म्हणेन दुरावले ते प्रत्येकाच्या गरजेमुळे , प्रतकेजण व्यस्त झाला आपल्या रोजच्या गोष्टीत आणि म्हणूनच कदाचित तो अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड मला इतका जवळचा वाटला. कारण आता त्याच्याभोवती बसणारी माणसं भेटणं इतकं सोपं राहिलेलं नाही. आवर्जून भेटाव लागत त्यांना. नाहीतर माणसेही अडगळीत पडतात आठवणींच्या.

✍️© योगेश खजानदार

सांज तो वारा || अव्यक्त प्रेम कविता || Marathi Poem ||



बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!

सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा,  गोष्ट त्या आठवांची !!

इथे असे क्षण ते अपुरे, सल मनी विरहाची !!
भरावी नजरेची कडा ती तेव्हा, जाणीव रिक्त मिठीची !!

बरसून गेल्या सरित मग तेव्हा , रात्र भिजावी स्वप्नांची !!
खिडकीत बसून तू मग तेव्हा, साथ द्यावी जगण्याची !!

अस्तास चालला सूर्य ही तेव्हा, आठवण त्या वचनाची !!
उद्या पुन्हा भेटेन मी इथेच,  ओढ तुझ्या भेटीची !!

उद्या पुन्हा भेटेन मी इथेच, ओढ तुझ्या भेटीची !!

✍️©योगेश खजानदार

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||




भाग १७

पुढचा प्रवास 

"पाहता पाहता आयुष्याची पाने पटापट पलटत गेली, कळलही नाही आयुष्यात कोण राहील आणि कोण नाही. पण आज जे आहेत बरोबर त्यांच्या सोबत आयुष्याचा पुढचा प्रवास करावा एवढंच वाटतं राहत. पण मग मनातल सांगावं तरी कसे हेच मला कळत नाही. सायली सोबत असताना जी माझी अवस्था झाली तीच पुन्हा इथे होईल का ?? की विचारूच नये मी. आहे ती मैत्री जपावी आयुष्यभर असच वाटत राहतं मला. पण मग ही मनाची रुखरुख बोलते मला खूप काही त्याच काय ?? पण त्याला समजावता येईल ना. खरच मनाची ही घालमेल पुन्हा होईल अस कधी वाटलच नव्हतं. पुन्हा मला प्रेम होईल असही कधी वाटलं नव्हतं मला. या पुण्यात माझं अस आहे तरी कोण?? तीच ना ? तिच्याशिवाय मी माझी कल्पनाच करू शकत नाही. या अनोळखी शहरात, तिचं काय तो माझा आधार आहे.  " आकाश खुर्चीवर बसून विचारात मग्न होता. 


"आकाश ??" समोर अचानक निशा आली.
"निशा तू आणि इथे ??"
"हो चल आवर !! आज दिनेश दादांच लेक्चर आहे पुण्यात कॉलेज मध्ये !!आपल्याला लवकर आवरून जाव लागेल !!"
"होका !! बरं बस् आवरून आलोच मी !!"
"ठीक आहे !!"

थोड्या वेळाने आकाश आवरून निशा सोबत बाहेर आला. त्याला हे शहर नविन होत. इथली माणसं नवीन होती. त्यामुळे तो फक्त निशा म्हणेल तसेच करत होता. 
"निशा !! मला काही माहीत नाही बर !! तू एकटं सोडून जाऊ नकोस मला!!"
"नको रे काळजी करुस !! मी आहे ना !! चल !!"

दोघेही समोर बस स्टॉपवर आले. गर्दीच्या त्या वेळी. आलेल्या त्या बस मध्ये बसले. पण गर्दीत आकाश मागे राहिला आणि निशा पुढे निघून गेली. दोघांचीही ताटातूट झाली. निशा पुढच्या स्टॉपवर उतरली. पण आकाश मात्र बसमध्येच राहिला. त्याला काहीच सुचत नव्हतं. आकाश आपल्या सोबत नाही हे तिच्या लक्षात आल. 
" आकाश कुठे गेला??  त्याला म्हटलं होत माझ्या सोबत रहा म्हणून !! " निशा त्याला सर्वत्र शोधत होती. त्याला पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत होती. 
"हा आकाश फोन का उचलत नाहीये ??" 
निशा आकाशच्या काळजीने व्याकूळ झाली. त्याला पुन्हा पुन्हा फोन लावू लागली.

आकाशलाही आपण बसमध्ये पुढे निघून आलो आहोत हे लक्षात आल. तो बसमध्ये निशाला शोधू लागला. ती कुठेच दिसत नव्हती. तो गडबडून गेला. हळूहळू पुढे आला. आणि पुढच्या स्टॉपवर उतरला. खिशातला मोबाईल बाहेर काढून त्याने निशाचे मिसकॉल पाहिले. लगेच त्याने तिला फोन लावला. 
"निशा !! "
"आकाश कुठे गेलास तू !! " निशा फोन उचलत म्हणाली.
"माहीत नाही निशा पण !! तू बसमध्ये कुठेच दिसली नाहीस म्हणून मी उतरलो !! " 
"पण कुठे ??"
"नाही माहित हा स्टॉप कुठला आहे ??"
"कोणालातरी विचार ना !!"

आकाश शेजारी उभ्या एका आज्जीना स्टॉप कोणता हे विचारतो. ते कळल्यावर निशाला सांगतो. ती तिथे येईपर्यंत त्याला वाट पाहायला सांगते. 

"या आकाशला किती वेळा सांगितलं तरी कळत नाही. मी त्याला निक्षून सांगितलं होत माझ्या सोबत रहा. पण नाही ! आज काही झालं असतं तर !! माझी काय अवस्था झाली असती. हे कळत नाही का त्याला? प्रत्येकवेळी शब्दांनी बोलून दाखवली तरच काळजी आहे हे कळत का ?? पण एक लक्षात येत नाहीये की या आकाशबद्दल मला एवढी काळजी का ?? मी त्याच्या प्रेमात तर नाहीना पडले?? छे छे !! काहीही काय !!" निशा मनातल्या मनात कित्येक विचार करत बसली होती. तिचा चेहरा रडकुंडीला आल्या सारखा झाला होता. 

आकाशने सांगितलेल्या स्टॉपवर उतरताच समोरच आकाश स्टॉपच्या बाकावर बसलेला तिने पाहिला. ती आली आहे हे पाहतच तोही जागेवरून उठला. तिच्या  जवळ आला, निशा अक्षरशः त्याच्यावर ओरडली,
"तुला कळत नाही का रे आकाश !! मी म्हटलं होत ना !! माझ्या सोबतच रहा म्हणून !!"
"हो हो !! माझ्या लक्षात होत ते !! पण गर्दीत कुठे हरवून गेलो मलाच कळाल नाही !! "
"कळाल नाही !! तू कुठे दिसत नाहीस म्हटल्यावर माझी काय अवस्था ..!! " निशा बोलता बोलता थाबली.
आकाशही तिच्या बोलण्याने क्षणभर शांत राहिला, त्याला जणू तिच्या मनातल कळलं होत.
"निशा !! आय लव्ह यू !!" क्षणात आकाश बोलून गेला. 

निशा फक्त आकाशकडे पाहत राहिली. ती काहीच बोलली नाही. आकाश मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत राहिला. 
"चल !! आपल्याला उशीर होतोय !! "
"माझ्या प्रेमाला होकार नाही दिलास तू !!" 
"काही गोष्टी निरुत्तरीत राहिलेल्या बऱ्या असतात आकाश !!"
"तुझ्या आयुष्यात कोणी आहे ??"
"तुझ्या शिवाय कोणा सोबत असते मी ??"
"मग तरीही ??"
"मी म्हटलं ना !! काही गोष्टी अनुत्तरित राहिलेल्या बऱ्या असतात!!"

आकाश पुढे काहीच बोलला नाही. दोघेही दिनेश दादा यांच्या लेक्चरला आले. सगळ्या लेक्चर मध्ये दोघांचं लक्ष सतत एकमेकांकडे होत. 

"माझ्या या वर्तुळ संस्थेचे दोन सहकारी आज इथे आपल्यात आपल्या सर्वांना भेटायला आले आहेत, आकाश देशपांडे आणि निशा बर्वे !!"  दिनेश दादा दोघांकडे बघत बोलले. 
" आमच्या पुण्यातील कार्याची जबाबदारी मी आता या दोघांवर सोपवली आहे. त्यामुळे आपल्या या लेक्चर नंतर एक पॉम्पलेट सर्वांना दिले जाईल त्यामध्ये या दोघांचा नंबर आहे !! तेव्हा इच्छुक मित्रांनी त्यांना नक्की संपर्क करावा !!"

लेक्चर संपल्यानंतर दोघेही दिनेश दादाला भेटायला आले. दोघांच्याही डोळ्यात स्पष्ट लिहिलेलं दिनेश दादाने ओळखलं. 
"काय मग आकाश साहेब !! पुणं मानवत ना ??"
"हो !! सुरुवात आहे पण चांगली आहे !! "
"आणि काय निशा ताई !! हल्ली घरी असता तुम्ही !! बरं वाटतं असेल आता !!"
"दादा तुम्ही इथे हवे होतात !! सगळे मिळून इथलं काम केलं असतं !!"
"मला खूप इच्छा आहे !! पण तिकडेही आपलं काम आहे आणि ते पाहावं लागेलच !! बरं चला मी निघतोय नगरला"
"दादा लगेच ??"
"अरे हो !! उद्या तिकडे महत्वाचं काम आहे !!"

दोघेही एकमेकांकडे बघत बसले. दिनेश दादा परतीच्या प्रवासाला निघाले. जाताना निशाकडे पाहून म्हणाले. 
"मनातल बोलावं !! म्हणजे आपलं मन हलकं होत !! "
निशा फक्त दादाकडे पाहून हसली. 

आकाश आणि निशा घरी जायला निघाले. बसमध्ये एकाच बाकड्यावर बसले. आकाश एकटक बाहेरच्या गर्दीकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला निशा बोलू लागली,
"आकाश !!"
"हा !! बोल ना !" 
"तुला माहितेय !! मी कोणावर प्रेम करेन अस मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. पण नकळत तो माझ्या आयुष्यात आला आणि मी त्याच्या प्रेमात अक्षरशः वाहत गेले. त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी सुचतही नव्हतं. मग या प्रेमात आमच्या दोघात सीमाच उरली नाही. आम्ही दोघे अखंड संभोगात बुडालो. मला त्याचा सहवास हवाहवासा वाटू लागला. पण त्याला फक्त माझ्या शरीराशी देणंघेणं होत. कॉलेज बुडवून त्याच्यासोबत मी फिरायचे. तो म्हणेल ,वाट्टेल तशी मी वागायचे !!"
आकाश सगळं शांत होऊन ऐकत होता. जणू आता आजूबाजूचा आवाज बंद झाला होता. 
"एकेदिवशी बाबांना सगळं हे कळाल !!  माझे आणि त्याचे नको त्या अवस्थेतले फोटो त्यांनी पाहिले. मला खूप बोलले !! तरीही मी त्याच्यासाठी  सगळं सहन करायला तयार होते!! पण त्यानंतर त्याने अक्षरशः माझ्याशी संबंध तोडून टाकले. नंबर बदलला. मित्रांना माझ्याबद्दल काहीही वाईट सांगितले. एकंदरीतच काय तर माझा यापुढे वापर होन शक्य नाही हे त्याला कळलं !! आमच्यात काहीच नात नव्हतं या आविर्भावात तो माझ्यापासून दूर निघून गेला. पुन्हा नवी निशा शोधायला!! पण दुःख कशाच वाटलं माहितेय ??"
"सांग !! आज मनमोकळ सांग !!" आकाश तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला.
" त्याने आमच नात टिकवायचा साधा प्रयत्नही केला नाही याचं दुःख वाटतं !! माझ्या बाबांना कळलं हे त्याला कळताच तो मागे हटून निघून गेला. त्यावेळी एकदा जरी तो म्हणाला असता की काहीही होऊ दे मी तुझ्या सोबत आहे !! तर सगळ्या दुनियेशी मी लढले असते. "
"आयुष्यात पुन्हा प्रेम होणंही तितकंच महत्वाचं असतं निशा !! मी ही तुझ्यासारख निराश होऊन बसलो होतो !! नको त्या संगतीत स्वतःत भरकटून गेलो होतो. पण आता योग्य मार्गावर आहे मी !!"
"हो पण ते प्रेम खर असावं एवढच मला वाटत !!"
"म्हणजे हे सगळं ऐकून तुला वाटत की मी माझा निर्णय बदलेल अस का ??"
निशा काहीच बोलली नाही.
"चुकीचे माणसं येतात आयुष्यात पण मग सगळीच माणूस जात वाईट आहे अस थोडीच असतं !!  तुझ्या भुतकाळाशी प्रेम नाही करायला आलो मी !! तू जशी आहेस त्यावर प्रेम करायला आलो आहे मी !! तुझ्यासारखा भूतकाळ माझाही आहे !! मीही कोणावर तरी प्रेम केलं !! पण तू आयुष्यात आल्यावर खर प्रेम काय असत हे मला कळलं !! त्यामुळे तुझ्या भूतकाळामुळे माझ्या प्रेमावर काहीही परिणाम होणार नाही. "
निशा एकटक आकाशकडे पाहत राहिली. क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली,
"आकाश !! आय लव्ह यू !! खरतर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते. पण पुन्हा प्रेमात चुकायच नाही यामुळे मी गप्प राहिले!!"
"त्यामुळेच तर मला कळलं ना !! तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ते !!"

दोघेही एकमेकांकडे बघून हसले. एकमेकांत हरवून गेले. तेवढ्यात कंडक्टर म्हणाला. 
"लास्ट स्टॉप "

दोघेही बस मधून उतरले आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. 

* समाप्त *

वर्तुळ || कथा भाग १६ || खर प्रेम ||




भाग १६ 

खरं प्रेम

आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर  उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले. 
कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला. 
"आक्या !! दोन दिवस झाले बघतोय !! तुझं वागणं जरा बदललंय बर का ??"
"म्हणजे ??" आकाश प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला.
"म्हणजे ?? काल कुठे होतास दिवसभर तू ??"
"काल !! अरे मित्रांकडे गेलो होतो !! "
"कोणत्या मित्रांकडे ?? आमच्या शिवाय अजून कोण आहेत मित्र तुला ??"
"अरे बार्शीहून आले होते !! "
"हा मग भेटायला घेऊन यायचं की आम्हाला पण !!"
सदानंद बोलत असताना मध्येच आकाशचा फोन वाजतो. आकाश बोलता बोलता फोन उचलतो,
"हॅलो !! कोण ??"
"हाय !! अरे निशा बोलते आहे !! चल येणार आहेस ना आजच्या ट्रीपला !! मी तुझ्या कॉलेज समोर आले आहे !! तीन वाजलेत"
"हो आलोच !! आलोच मी !!"

आकाश सदानंद सोबत बोलणं अर्धवट ठेवून पळत कॉलेज बाहेर गेला. समोर निशाला पाहून अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. नकळत तो तिच्याकडे पाहत राहिला.
"चल !! आधीच उशीर झालाय !!"
आकाश बाईकवर मागे बसून निघू लागतो, तेवढ्यात शेजारी त्याच्या गणेश येतो,

"काय भाई !! कुठे निघाली स्वारी ??"
"ये गग्या !! भेटतो तुला रात्री !! तेव्हा बोलू आपण !!"

आकाश आणि निशा बाईकवर निघून गेले. थोड्या वेळाने वाड्यावर पोहचले. तेव्हा समोर कर्णिक त्यांची वाटच पाहत होते. त्यांना पाहून ते लगेच म्हणाले,
"अरे किती उशीर !! "
"मी वेळेवरच आले होते !! आकाशच्या लक्षात नव्हतं बहुतेक आज यायचं !!"
कर्णिक लगेच आकाशकडे पाहत म्हणाले,
"काय रे आकाश !! एका दिवसात कंटाळलास का रे आम्हाला ??"
"नाही दादा !! अस काही नाही ! उलट मी सकाळपासून वाटच पाहत होतो यायची !! पण कॉलेज मध्ये मित्रांमध्ये लक्षात राहील नाही. "
"बरं बरं !! मी अरे मस्करी केली रे !! चला तर मग !! " 

कर्णिक आणि सर्व मित्र त्यांच्या मागे मागे निघाले. खूप वेळ बाईकवर ते जात होते. नंतर एक घनदाट झाडी दिसताच ते थांबले. समोर त्या झाडीत ते चालत चालत लांब आले. त्यांच्या मागे सगळे मित्र येत होते. एका ठिकाणी एक छोटा पण सुंदर असा झरा वाहत होता. छोट्याश्या दगडांवरून तो खाली पडत होता. आणि त्या दगडातून वाट काढत काढत तो झरा पुढे जात होता. 

"तर मित्रांनो आज आपण इथे सगळे मिळून एक सुंदर कथा वाचणार आहोत !!" आपल्या बॅगेतून कर्णिक यांनी दहा बारा पुस्तक बाहेर काढली. 
त्याच्या शेजारी उभ्या एका मित्राने ती पुस्तके सर्वांना वाटली. 

"ज्यांना जी जागा आवडेल त्यांनी त्या जागेवर जाऊन बसा !! जेवढं वाचता येईल तेवढं वाचा !! प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्या !! एकरूप होऊन जा त्या पुस्तकात !! आता इथून पुढे सर्वांनी एकह शब्द न बोलता पुस्तक वाचायला सुरुवात करा !! सूर्यास्त झाला की आपण इथून निघुयात !! ओके !!"

सर्वांनी आपल्या जागा धरल्या, निशा आणि आकाश समोरासमोर बसले. वाचनात मग्न झाले.

"खरच ती माझ्यावर प्रेम करत असेल का ?? पण हे मला कळणार तरी कसे ? हेच मला कधी कळत नाही. प्रियाच्या प्रत्येक शब्दात मला ती स्वतःकडे ओढते आहे, असच मला का वाटावं? पण प्रेम म्हणजे तरी नक्की काय ??" आकाश पुस्तकातील मजकूर मनातल्या मनात वाचत होता.
"तिच्या नाजुक ओठांवर माझ्यामुळे आलेलं हसू म्हणजे प्रेम आहे ना ?? मी तिच्या आठवणीत तिला पुन्हा भेटण्याचं वचन म्हणजे प्रेम आहे ना ?? ती रुसल्यावर तिला पुन्हा मनवण म्हणजे प्रेम आहे ना? खरच हे प्रेम आहे तरी कसे ??" 
जयदत्त विचार करत असताना प्रिया त्याच्या समोर आली. तो तिच्याकडे पाहत राहिला. आणि ती क्षणात बोलून गेली.
"जयदत्त मला विसरून जा !! मी या जन्मी तुझी नाही होऊ शकत !! मी तुझ्या प्रेमाची कबुली द्यायला आतुर झाले होते !! तुझ्या डोळ्यात मी ते पाहिलं सुद्धा होत. पण आता मला ते शक्य होत नाही. मला विसरून जा !!"
जयदत्त काहीच बोलला नाही. तिच्या डोळ्यात त्याला फक्त ओढ दिसली. त्याच्यासाठी प्रेम दिसलं. पण ते प्रेम त्याला कधीच भेटू शकणार नव्हतं. पाठमोऱ्या तिला जाताना तो कित्येक वेळ पाहत राहिला. 
"हो प्रिया !!  मी तुझ्यावर प्रेम करतो. हे म्हणण्या आधीच तू मला त्याच उत्तर दिलं आहेस !! पण तरीही तू लक्षात ठेव मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत राहील !! एखाद्याला मिळवणं हेच फक्त प्रेम नाही !! तर त्याच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्याच्यावर मनापासून प्रेम करणं !! यालाही प्रेम म्हणतात. तू आज जरी माझ्या समोरून निघून गेली असशील तरी मी तुझ्या येण्याची आयुष्यभर वाट पाहील !! प्रिया आयुष्यभर वाट पाहील !" 

आकाश पुस्तकातील वाचून होताच समोर पाहू लागला. निखळ प्रेमाची व्याख्या त्याला कळली होती. सगळीकडे शांतता होती फक्त त्या पाण्याचा आवाज तेवढा होत होता. हळू हळू संध्याकाळ होत आली. तसे सर्व मित्र पुस्तक वाचून शांत एका ठिकाणी बसून होते. नकळत आकाशची नजर निशावर पडली. पुस्तक मिटताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आकाश क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला . खूप वेळ कोणीच काही बोललं नाही. सगळे आपल्यातच मग्न झाले होते. तेवढ्यात कर्णिक जागेवरून उठले, त्यांच्या हाती मात्र या सर्वापेक्षा वेगळच पुस्तक होत.

"झालं सगळ्यांचं वाचून ?? "
कोणीच काही बोलत नव्हतं. 
"पुस्तक वाचून झाल्यावर मलाही असच झालं होत मित्रानो !! कित्येक दिवस मी विचार करत होतो की त्या प्रियकराने तिला अडवल का नाही ?? तो म्हणाला सुद्धा नाही की थांब नको जाऊस !! पण नंतर त्यातील सगळी गुपिते माझेच मला कळत गेली. " कर्णिक पुन्हा शांत झाले . आणि थोड्या वेळाने बोलू लागले. 
"मित्रानो स्त्री आणि पुरुष यांमधील खर प्रेम हे फक्त शरीर आकर्षण कधीच नसतं !! आणि जिथं असतं त्याला प्रेम नाही तर शरीराची भूक , वासना म्हणतात. खर प्रेम हे त्यागात असतं, त्याने तिच्यासाठी केलेला, किंवा तिने त्याच्यासाठी !! खर प्रेम हे नजरेतून कळत की त्याला तिला काय म्हणायचं आहे !! ती कधीही पुन्हा येणार नाही हे माहीत असूनही तो तिची वाट पाहतोय याला म्हणतात खर प्रेम !! "

कित्येक वेळ कर्णिक बोलत राहिले. सगळे फक्त ऐकत होते, खऱ्या प्रेमाची ओळख करून घेत होते. पुन्हा सगळे परतीच्या प्रवसाला निघाले. आकाश निशा सोबत बाईकवर निघाला. सगळे मित्र वाड्यावर आले. पुन्हा भेटण्याचे ठरवून सगळे आपापल्या घरी निघाले. आकाशला निशा हॉस्टेलवर सोडून गेली. सोडताना गंग्याने पाहिलं. आकाशला जवळ येताना पाहून तो म्हणाला.
"काय भावा !! हवा चालु आहे तुझी ?? कुठं जातोय पोरीला घेऊन काही कळू देत नाही !! "
"काही नाही रे गंग्या !! असच क्लास लावलाय तिथे जातोय !! "
"दिवस दिवस बाहेर असतो तू !! कोण आहे ते आयटम सांग की ?? लईच खत्रा माल दिसती !! आमचं जमतंय का बघ की कुठं ??" गंग्या मिश्किल हसत म्हणाला.
आकाशला क्षणात राग आला आणि त्याने गंग्याची कॉलर धरली आणि म्हणाला,
"काहीही बोलू नको गंग्या !! साल्या लाज कशी वाटत नाही तुला पोरींबद्दल अस बोलताना !!"
सदानंदने लांबून सगळं हे पाहिलं आणि तो धावत त्यांच्या जवळ आला.
"अरे ! अरे चाललंय काय तुमचं !! सोड आक्या !! भांडणं नका करू बर इथ !!"

आकाशच हे वागणं बघुन गणेशला राग आला. तो तडक खोलीत निघून गेला. 
"काय झालंय एवढं ??"
"अरे !! लाज कशी वाटत नाही त्याला निशाबद्दल अस बोलायची !!"
"कोण निशा !! तुला बाईकवर घेऊन जाते ती ??"
"तुला कसं माहिती ??"
"सगळ्या कॉलेजला माहीत झालंय हे !!"
"कळलं तर कळलं !! मला नाही फरक पडत !! "
"प्रेमात पडलास की काय आकाश ??"
आकाश काहीच बोलत नाही सदानंद जे ओळखायचं ते ओळखतो. 
"भाई मग सांगायचं ना मित्रांना ! त्याला तरी काय माहित असणार तुझ्या मनातलं !! "
"तरीपण त्याच बोलणं चुकलं !!"
"हो चुकलं रे !! पण भांडणं करून काही साध्य होणार आहे का?? "

आकाश आणि  सदानंद त्यानंतर कॅन्टीन मध्ये गेले. त्यांनी जेवण केल. आकाशने सदानंदला सगळी हकीकत सांगितली.
"सद्या !! मला मनातून सुख मिळालं रे तिथ !! या जगाकडे ,प्रत्येक नात्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला या दिनेश दादांनी !! " 
"अरे मग आम्हाला सांगायचं ना !! आम्ही थोडच तुला काही बोलणार होतो !!"
"कोणत्या तोंडान सांगायचं होत सांग ना ?? त्यावेळी ती ताकद ,तो दृष्टिकोन माझ्याकडे नव्हता. आज मला कळून चुकलं की आपल्यातल्या खऱ्या चुका याच आपल्या यशाच्या सर्वात मोठ्या बाधा आहेत. "
"वाह आकाश ! दोन दिवसात एवढा बदल !!"
"एकदा तू चल माझ्या सोबत मग कळेल तुला !!"
"नाही नको !! मी आहे तिथे सुखी आहे !! मुळात मी कोणत्या बंधनात अडकेल अस मला वाटत नाही. पण ज्या दिवशी अडकेल ,तेव्हा नक्की तुझ्या सोबत येईल !!"
"बरं !!" आकाश हसत म्हणाला. 
सदानंद आणि आकाश दोघेही हॉस्टेलवर आले. खोलीत येताच समोर एक बॅग गणेश भरत होता. त्याला पाहून सदानंद म्हणाला.
"हे काय रे आता ??"
"मी खोली बदलतोय !! "
"काय ??" मध्येच सदानंद म्हणाला. 
"होय !!"
" ये गंग्या !! एवढ्याश्या कारणावरून कोणी खोली बदलत का रे ??" सदानंद त्याला अडवत म्हणाला.
"एवढंस !!बर बर !!"

आकाश अचानक गंग्या समोर आला आणि त्याची बॅग धरत म्हणाला. 
"भावा चुकलं माझं !! "
गंग्या काहीच बोलत नाही. 
"ये गंग्या एकदा म्हणाला तो चुकलं म्हणून !!"
"नको भावा तुमचं काही !! मी वाईट आहे खूप कशाला उगाच माझा त्रास !!"
"गंग्या भावा !! खरंच चुकलं रे !! पण काय करू मी माझं प्रेम आहे रे तिच्यावर !! ती समोर आली की काहीच सुचत नाही मला !! आणि तिच्याबद्दल अस बोलला तू ते सहन नाही झालं मला !!"
गंग्या एकदम भावूक होऊन म्हणाला.
"ए ए !! आक्या !! भाई तुझं प्रेम आहे तिच्यावर ??मग तर खूप मोठी चूक झाली रे माझ्याकडुन !! मला माफ कर !!"
"नाही मला तू माफ कर !! मी खूप बोललो तुला !!"
"बस् बस् !! खूप झालं माफी पुराण !!"

तिघेही त्या रात्री कित्येक वेळ गप्पा मारत बसले. आकाश किती दिवसांनी मनमोकळेपणाने बोलत बसला. 

कर्णिक यांच्या सोबत आकाश त्याच्या वर्तुळ या संस्थेसाठी आता मन लावून काम करू लागला होता. याकाळात त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी तो आता पुण्याला जाणार होता. त्यावेळी त्याच्यासोबत निशा सुद्धा यायला तयार झाली होती. आई बाबांना आता त्याचा अभिमान वाटू लागला होता. कारण आकाश पुन्हा दहावी नंतर आत्ता अभ्यासात चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाला होता. 

तो आयुष्याचा प्रवास त्याला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाणारा होता. 

क्रमशः


वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||




भाग १५

संगत

सकाळ होताच आकाश आपल्या कामाला लागतो. पण तरीही त्याच मन नकळत दिनेश कर्णिक यांच्या विचारांवर फिरत होत. आपण कुठेतरी चुकत आहोत याची जाणीव त्याला होत होती. थोड्यावेळाने त्यानं त्यांना भेटायचं ठरवलं. आवरून तो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. एक भलामोठा वाडा होता तो. त्यामध्ये चहूबाजूंनी झाडे होती. आकाशला आतमध्ये जाताच पिंपळाच्या पानाचा वाऱ्याने होत असलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एखादी चिमणी चिवचिव करत होती. त्याच्यापलिकडे थोड आतमध्ये जाताच त्याला विविध पक्षाचे थवे या झाडांवरून दुसऱ्या झाडावर जाताना दिसले, यामध्ये त्यांचा किलबिलाट चालू होता. थोड पुढे जाताच आकाश मध्येच थांबला ,कोण एक सुंदर मुलगी त्याला दिसली तिने त्याला विचारलं,
"आपण कोण ??"
अचानक समोर आलेल्या मुलीला पाहून आकाश क्षणभर गोंधळात पडला आणि खिशातील पोंप्लेट काढून त्याने तिला दाखवत विचारलं,
"मला दिनेश कर्णिक यांना भेटायचं आहे !!"
"तुम्ही ओळखता का त्यांना ?? "
"ओळख अशी नाही !! पण काल ते माझ्या कॉलेज मध्ये आले होते त्यामुळे आज त्यांना भेटावसं वाटलं म्हणून मी इथे आलो!!"
"बरं बरं !! तुम्ही या बाकड्यावर बसा त्यांना मी सांगते !! ते येतील भेटायला!! "
"ठीक आहे !! "

आकाश समोरच्या बाकड्यावर बसला. त्याला फक्त आजूबाजूच्या झाडांचे आवाज आणि  किलबिलाट एवढंच ऐकू येत होत. थोड्या वेळाने दिनेश कर्णिक त्याच्या भेटीला आले. अगदी साधे सहजपणाने त्यांनी आकाशचे हसून स्वागत केले. 

"नमस्कार !! "
"नमस्कार सर !!"
मध्येच आकाशला थांबवत कर्णिक म्हणाले.
"सर नाही !! दादा म्हणायचं !! सर या शब्दात खूप ओझं असतं !!"
अस म्हणताच आकाश त्याच्याकडे बघून हसला आणि पुढे मनमोकळे पणाने बोलू लागला. 
"माझं नाव आकाश देशपांडे !! मला काल तुमच्या बोलण्याने खरंच माझ्यातील कित्येक चुका कळून आल्या !! आणि तुम्हाला भेटण्यासाठी कधी एकदा इकडे येतोय अस झाल होत. "
"वाह ! !! चला म्हणजे कालच्या माझ्या लेक्चरचा काहीतरी फायदा झाला तर !!"
"फायदा नाही !! मार्ग मिळाला मला!! "
"गुड !! मला तुला इथे पाहून खरंच खूप आनंद झाला !! "
"मलाही आपल्याला भेटून खरंच खूप आनंद झाला !! आणि मला आपल्यात सामील करून घ्या म्हणून विनंती करायला आलोय !! "
"म्हणजे काल मी वर्णन केलेल्या गोष्टी तुझ्याही बाबतीत घडतायत तर !"
"हो !! "
"कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त त्रास देत आहे ??"
कर्णिक यांनी विचारताच आकाश क्षणभर शांत राहिला , कर्णिक यांनी त्याला पुढे काय म्हणायचं आहे हे ही न बोलताच ओळखलं. 
"हस्तमैथून ??"
आकाशाने होकारार्थी मान हलवली. आणि पुढे बोलला,
"दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिला आलो होतो. बाबांनी मोबाईल घेऊन दिला आणि मग त्यावर गेम्स, पोर्न बघणे अश्या सवयी लागत गेल्या !! पुढे त्याच रूपांतर हस्तमैथुन करण्यात झालं. आणि इकडे आल्यावर तर दारू आणि सिगरेट अविभाज्य भागच झाला. मला खरंच कळतं नाहीये की या सगळ्यातून बाहेर कसा पडू !! " आकाश हताश होऊन सगळं सांगत होता. 
"हे बघ आकाश ! ! तरुणपणी आपण आपल्या मोहावर तसेच सगळ्यात महत्त्वाचे आपल्या संगतीवर लक्ष दिले पाहिजे. अति मोह आपल्याला खड्ड्यात घेऊन जातो हे नक्की !!"
"खड्ड्यात तर गेलोच आहे मी !! मला डॉक्टर व्हायचं होतं !! पण इथे येऊन बीएसस्सीला एडमिशन घेतलंय !! "
"नक्कीच !! तुझ दुःख मी समजू शकतो आकाश !! पण झालं गेल सोडून द्यायचं !! पुढे निघायचं !!"
"हो पण पुढे जायचा मार्गच मला दिसत नाहीये !! "
"नक्की दिसेल !! शोधल्याने सगळं मिळत !! "
कर्णिक बोलत असताना मध्येच ती मगाशीची मुलगी त्यांना येऊन बोलू लागली,
"दादा !! सगळी तयारी झाली आहे !! निघायचं !! "
"हो चला !! एक मिनिट !" आकाशकडे पाहत कर्णिक म्हणाले.
"आकाश तू का नाही जॉईन होत आजच्या आमच्या ट्रिपमध्ये !!"
"हो पण !! मी अजून तुमच्या संस्थेत प्रवेश ही घेतला नाहीये !! चालेल तुम्हाला??"
"तू इथे आलास !! आमच्याशी मनमोकळे बोललास !! झालं तुझा प्रवेश झाला या संस्थेत चल बर !!"

आकाश लगेच कर्णिक आणि त्याच्या टीमसोबत जाण्यास तयार झाला. सगळ्यांनी आपल्या समोरच्या बाईकवर बसून निघायचं ठरवलं. सगळे बसले आकाश मात्र तसाच उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या समोर पुन्हा ती मुलगी आली आणि तिने बाईकवर बसण्यास सांगितले. आकाश तिच्या बाईकवर मागे बसला. त्याला एका मुलीच्या बाईकवर आपण बसलोय याच नवल वाटतं होत. ती एकदम बिनधास्त होती. बाईक एकदम मुलांसारखी , त्यांच्या बरोबरीने चालवत होती. सगळ्यात पुढे कर्णिक आपली बाईक चालवत होते, थोड्या  वेळाने ते बाईक एका डोंगराच्या जवळ घेऊन आले. तिथे बाईक लावून त्यांनी सर्वांना आपल्या सोबत घेतलं,

" माझ्या मित्रांनो !! आपण नेहमी एका वर्तुळात जगतो !! पण जीवन हे काही वर्तुळ नाही !! तुम्ही या ब्रह्मांडाच्या जेवढे बाहेर झालं तितक वेगळेपण हे ब्रह्मांड तुम्हाला देईल !! तसेच तुम्ही स्वतःकडे पाहा ,इथे कोणते बंधन नाही !! बंधन घालत ते हे शरीर आणि त्याचा मित्र मन !! "
आकाश कर्णिक यांचं बोलणं मनापासून ऐकत होता. 
"पण बघा ना !! हे मन वाट्टेल तिथे फिरून येत आणि पुन्हा आपल्याला आठवणींच्या बंधनात अडकत ठेवण्याचा प्रयत्न करत. सुखाच्या आठवांचा काहीच प्रॉब्लेम नाही !! पण त्या वाईट आठवणींना आज आपल्याला इथे सोडून ,फेकून द्यायच आहे !!"
"पण कस दादा ? मी कितीही प्रयत्न केला तरी नाही सोडू शकतं त्या आठवणी !!" एक आकाशच्या वयाचा मुलगा म्हणाला.
"यालाच तर आपल्याला हरवायच आहे !!चला माझ्या सोबत "

आकाश आणि सगळे मित्र कर्णिक याच्या मागे जाऊ लागले. आकाशचे मात्र लक्ष हळूहळू त्या मुलीकडे जाऊ लागले. तिच्या सौंदर्यावर तो सारखी नजर फिरवत होता. आणि तेवढ्यात ते एका डोंगराच्या माथ्यावर पोहचले. समोर पाहतात तर दूरदूर पर्यंत नुसती हिरवी चादर त्यांना दिसत होती. सगळे समोर पाहून कुजबुज करत होते. किती सुंदर आहे हे एकमेकांना सांगत होते. 

"मित्रानो !! आयुष्यात सुंदर आठवणी गोळा करायला सुरुवात केली ना !! की केव्हा आपण वाईट आठवांच गाठोड फेकून देतो आपल्याला कळतही नाही !! आजपासून आपण तेच करायच !! सुंदर आठवणी गोळा करायला सुरुवात करायची. आणि निसर्गा इतकी सुंदर आठवण तुम्हाला कधीच कुठे भेटणार नाही. पहा समोरच्या त्या लांब टेकडीच्या पायथ्याशी इवलंसं गाव दिसतंय ना ??"
सगळे एका सुरात हो म्हणाले.
"विचार करा !! आत्ता तिथली माणसे काय करत असतील !! कोण असतील !! देवाने मला हा क्षण इथे दिलाय !! तिथल्या किती लोकांना त्या गावात तो क्षण मिळाला असेल !! " कर्णिक हे सांगत असताना सूर्य अस्ताला जात होता. 
"पाहा !! थोड्या वेळाने त्या गावचे दिवे लुकलुकत आपल्याला त्यांच्याकडे पाहायला लावतील ! मनात त्या गावच चित्र आणा आणि विचार करा तुम्ही तिथे असतात तर ??"
आकाश डोळे बंद करुन विचार करू लागतो. त्याला समोर एका छोट्या घरात आपले आई बाबा ,आपले सवंगडी दिसतात. ते सगळं इमॅजिन करून गालातल्या गालात तो हसतो. आणि डोळे उघडतो.

"किती सुंदर आहे ना हे जग !! बघा तो सूर्य अस्ताला जातोय आणि आता ते लुकलुकनारे गावचे दिवे आपल्याला जणू तिकडे येण्यासाठी खुणावत आहेत !! हातात कोणतं प्येय नको ! ना नको तो सिगरेटचा वास !! कारण शुद्धीत राहून या जगाकडे पाहण्याची जी मजा आहे ना !! ती या वर्तुळात अडकून पडण्यासाठी नाही रे !!! आता हा सूर्यास्त मनात साठवून ठेवा !! " कर्णिक सूर्याकडे बघत बोलता बोलता थांबले.

आकाश आणि बाकी सगळे मित्र तिथे कित्येक वेळ तो सूर्यास्त पाहत बसले. त्यानंतर ते संस्थेच्या ऑफिसवर निघाले. यादरम्यान सर्वांची एकमेकांशी ओळख झाली. 
"नमस्कार !! मी आकाश देशपांडे !! " 
"नमस्कार !! मी निशा बर्वे !! " कित्येक वेळ सोबत असलेली ती अखेर तीने त्याला नाव सांगितले. 
"तु इथे ??"
"पुण्याहून आले मी !! तारुण्याच्या उंबरठ्यावर खूप चुका करायला लागले होते मी !! सिगरेट, ड्रिंक्स ,सेक्स अश्या नको त्या नादी लागतं चालले होते. एकदिवस कर्णिक दादांच लेक्चर ऐकलं !! माझ्या मला चुका कळतं गेल्या आणि अखेर इथे आले!! दादांनी मला सांभाळून घेतलं ! कित्येक चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढलं !!"
आकाश क्षणभर काहीच बोलला नाही. 
"सेक्स?? त्यात काय वाईट ??"  त्याने मनातल्या मनात विचार केला. 
"तू ही विचारात पडलास ना की किती वाईट होते मी ??"
"नाही नाही नाही !! मला अस काही वाटलं नाही !!"

आकाश संस्थेच्या त्या वाड्यात आला. सगळे आपापल्या घरी निघून गेले. काही मित्र तिथेच कर्णिक यांच्या सोबतच राहत होते. कर्णिक यांनी आकाशला पाहिलं आणि त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतल,
"काय मग आकाश ?? आज कस वाटलं आपलं फिरणं ??"
"खूप छान !! मनाला खूप मस्त वाटलं !! आज कित्येक दिवसांनी मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेलो होतो. वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो. "
"होना ?? मग आता नेहमी आमच्या सोबत यायचं !! आपल्या सारख्या या वर्तुळात अडकलेल्या मित्रांना बाहेर काढायचं !! आणि असही तुझी ही सुरुवात आहे !! अजून खूप अनुभव तुला यायचे आहेत !!"
" मग मी पुन्हा केव्हा येऊ ??"
"उद्या जमेल ?? उद्या आम्ही पुन्हा भटकंती करायला जाणार आहोत !!"
"हो चालेल !! येईल मी नक्की !!"
"पण कॉलेज क्लास करून ये बर !! आपण दुपारी तीनला निघणार आहोत !!"
"हो चालेल !!"

आकाश वाड्यातून बाहेर पडतो. चालत आपल्या हॉस्टेलवर जायला निघतो. तेवढ्यात निशा बाईक घेऊन त्याच्या समोर येते आणि म्हणते,
"सोडू का तुला मी ??"
"नाही नको जाईन मी !!"
"चल रे !! सोडते मी !!"
"पण तुला ??"
"मीही इथे हॉस्टेलवर राहते!! गर्ल्स हॉस्टेल आहे आमचं !! आपल्या संस्थेशी जोडून राहावं म्हणून इथेच एडमिशन घेतलंय !! गर्ल्स कॉलेजला !! "
"ओके !!"

निशासोबत आकाश त्याच्या हॉस्टेल समोर आला, तिच्या सोबत थोडा वेळ गप्पा मारत राहिला. आणि उद्या पुन्हा भेटू अस म्हणत ती बाईकवर निघून गेली. आकाश कित्येक वेळ तिला जाताना पाहत राहिला. 

क्रमशः


Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...