स्मशान कथा भाग १ || मराठी रंजक कथा ||


कथा भाग १

  "आगीच्या या लोटात सार का संपून जातं असेल ?आणि उरलेच काही चुकून तर ही गिधाडं तुटून का पडतात त्याचा फडशा पाडायला. पण उरतच काय?? निर्जीव शरीर आणि कोणतीही इच्छा न राहिलेलं एक नाव.तेही काही क्षणात संपून जाण्यास !! बस् !! हेच आहे आयुष्य !! आणि हाच खरा शेवट!! जिथं शांतता आहे !! जिथं लोक भितात यायला !! का तर म्हणे स्मशानात भूत असतात !! ज्यांनी आपल्याच लोकांना जाळलं तीच ही माणसं आता त्याच लोकांना भूत होऊन फिरताना भितात !! पण मग मी ?? मी कोण ?? एक जिवंत भूत ?? की माणूस ?? कोण आहे कोण मी !! या स्मशानाचा राखणदार .!! बस एवढीच काय ती ओळख आहे का माझी ?? नाही !! मी एक माणूस आहे !!! मी जिवंत आहे !! मी शिवा आहे !! " शिवा स्वतःच्या तंद्रीत समोर जळणाऱ्या चीतेस बघत होता.
तेवढ्यात गावचा दत्तू पळतच शिवाकडे आला. त्याला हाका मारू लागला.
"ये शिवा !! " शिवा मात्र आपल्याच तंद्रीत होता.
"ये लेका शिवा !! कुठ हाय लक्ष !! "
शिवा अचानक भानावर आला. पुढे दत्तुला पाहून लगबगीने उठला.
" का रे दत्तू ?? एवढं धावत का आला ??"
"अरे !! श्याम्याची आई गेली!! यायचं लागलेत मागनं!! सरपन तयार ठीव सांगायला आलतो !! "
"बर बर लगेच करतो!!"
दत्तू धावत धावत निघून गेला. शिवा शेजारच्या सरपणाच्या खोलीत जाऊन सरपण रचू लागला.
"श्याम्याची आई म्हणजे वस्ताद बाई !! पण मनानं साधी !! आईचं बोट भाजल म्हणून हेच श्याम्या पोरगं !! तालुक्याला जाऊन त्याचा मलम घेऊन आलत !! किती माया आईवर !! आता क्षणात जळून खाक होईल म्हातारी !! मग त्या मनात किती यातना होतील त्या श्याम्याला माहिती !! " शिवा जणू त्या लाकडांकडे पाहून त्यांना मनातल्या मनात बोलत होता.
"जन्मभर नुसतं मागत राहायचं !! आणि शेवट तो काय असेल कोणास ठाऊक!! त्या इस्पितळात मरतोय !! की घरात !! की अजून वेगळं ते काय !! देवाची करणीच भारी !! आयुष्य गेलं लोकांच्या सरणावरची लाकड रचताना !! कोणतं लाकूड मलाच जाळतय ते त्या परमेश्वरालाच माहीत !! "  शिवा गालातल्या गालात पुसट हसला.
तेवढ्यात मागून शाम, दत्तू सगळे आले. सगळे विधी करू लागले. शिवा कोपऱ्यात उभा राहून बघत होता. दत्तू त्याच्या जवळच होता. श्याम्याला रडताना पाहून त्यालाही राहवलं नाही. आणि तो त्याला सावरायला गेला. शिवा पुढे गेलाच नाही.
दत्तू पुन्हा काही वेळात परत येऊन शिवा जवळ उभा राहिला आणि म्हणाला.
"पोट्ट कुठ दिसत नाही तुझ ??"
"शाळेत गेलंय !! येईलच इतक्यात !! "
"शाळेत ?? " दत्तू आश्चर्याने म्हणाला.
"हा !! " शिवा शांत उत्तरला.
"शिकून कुठ मास्तर व्हणाराय पोट्ट तुझ !! तुला मदत करायची सोडून नाहिते कशाला उद्योग करत बसायचे !!!"
"आवड आहे त्याची !!"
"असली काय कामाची आवड !! "
शिवा काहीच न बोलता. समोरच्या पेटत्या आगिकडे पाहू लागला.बघता बघता लाकडांणी पेट घेतला आणि आलेली माणसं निघून जाऊ लागली. श्याम आणि दत्तू जरावेळ थांबले आणि तेही निघून गेले.
संध्याकाळची वेळ झाली. शेजारीच शिवाच दोन खोल्याच एक खोपट होत. त्यात बसून तो आणि त्याची बायको सुधा गप्पा मारत होते.
"यंदाच्या वर्षी आपला सदा पहिला येईल बघ !! बघ तू!त्याला काय आयुष्यभर लोकांची चीता पेटवायला नाही लावणार मी !!! मोठा करणार!! शिकू देणार !! " शिवा सुधाकडे पाहत बोलत राहिला.
" होय तर !! होईल की !! " सुधा शांत म्हणाली.
सूर्य पूर्वेकडे झुकला आणि लांब सावल्या सगळीकडे नाचू लागल्या. त्यात एक सावली ओळखीची दिसली.
"आबा !! अजुन बाहेरच बसलाय तुम्ही !! " सदा शिवाचा पोरगा हातातली शाळेची पिशवी ठेवत म्हणाला.
"अरे ! राखण करत बसलोय !! "
"कशाची !! या भुताच्या वाडीची ??" सदा जरा हसतच म्हणाला.
"आबा इकडं कोणी येत नाही बघा !!गावाच्या बाहेर आहे किती!! म्हणत्यात की वरच्या लिंबाकड म्हणजे या मसनवाट्याकड रात्री भूत फिरतेत म्हणून.  आणि तुम्ही कोणाची राखण करताय !! या जळणाऱ्या मुडद्याची !! की त्या पलीकडं थोड गेल्यावर पुरलेल्या मुडद्याची."सदा थोडा हसतच म्हणाला.
"तुला नाही कळायचं बाळा !! मेलेल्या मुडद्यांपेक्षा !! जिवंत भूत लई बेकार!!! तुला नाही कळायचं !! " शिवा लांब बुडत्या सूर्याकडे एकटक पाहत म्हणाला.
एव्हाना आता अंधाराने चादर ओढली होती. शिवा , सदा आणि सुधा तिघेही जेवण करून बाहेर बसले होते. उघड्या त्या आभाळ खाली. धगधगत्या त्या विस्तवाकडं बघत.
"आबा तुम्हाला माहितेय !! शाळेतली पोरं तर मला सुद्धा बोलायला भितेत ..!! म्हणे तुझ्या अंगात एखाद भूत असल ! उगा लागायचं आमच्या माग !! "
"आरे मग होय म्हणायचं !! " शिवा तोंड वाकड करत.भुताची नक्कल करत म्हणाला.
शिवा आणि सदा मनसोक्त हसले. तेवढ्यात शेजारच्या रानातून कोल्हे , ओरडताना आवाज झाला. शिवा सावध होत उठला. खोपट्यात गेला. हातात भाला घेऊन बाहेर धावत आला. सदाला काही कळायच्या आत शिवा धावत पुढे गेला.
"आबा !! आबा !! "सदा मागून हाका मारू लागला.
सुधा खोपट्याच्या बाहेर येऊन सदाला बोलावू लागली.
"सदा !! थांब !! अरे कोल्ह्याची टोळी आलिये मसनवाट्यात !! भाला घेऊन जा !! आबाला मदत कर !!"
सदा धावतच आईकडे आला. तिने भाला त्याच्याकडे दिला. धावतच स्मशानात गेला. पाच सहा कोल्हे अर्धवट जळलेल्या प्रेताचे लचके तोडायचा प्रयत्न करत होते . शिवा त्यांना हुस्कुवून लावायचा प्रयत्न करत होता.
"आबा !! " सदाने हाक मारताच शिवा म्हणाला.
"सदा मागच्या बाजूनं हान त्याला !! "
सदा मागे फिरला . कित्येक वेळ झटापट झाली. शिवाच्या उजव्या हाताला कोल्ह्यान चावा घेतला. सदाने एका फटक्यात एकाला गारद केला. थोड्या वेळाने ती भुकेली कोहल्याची टोळी माग सरकली. थकली.
शिवा आणि सदा तिथंच बसून राहिली. जळत्या त्या प्रेताला राखण करत. कित्येक वेळ.
"कळलं पोरा !! इथ का राखण करावी लागते ती !!" शिवा उठतं म्हणाला.
सदा कित्येक वेळ विचार करत बसला. त्याच्या समोर अस पहिल्यांदाच घडत होत.
शिवा परत खोपट्याकड आला. सुधा वाटच पाहत होती.
"गेली का पिसाळलेला कोल्ही !! "
"हुसकून लावली ..!! " शिवा तोंडावर गार पाणी मारत म्हणाला.

क्रमशः 

✍️© योगेश खजानदार


वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग २ || हृदयस्पर्शी कथा ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...