मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग ४ || हृदयस्पर्शी कथा ||



कथा भाग ४

"दृष्टीला उद्या घरी आणायचं या विचारात रात्र निघून गेली. नव्या दिवसाने नवी दिशा या आयुष्याला दिली. क्षितिज आज नेहमी पेक्षा जरा लवकरच उठला होता. सकाळी लवकर आवरून, सर्व कामे पूर्ण करून, दृष्टीला आणायला जायचं या विचारात तो होता. आईच्याही हे लक्षात आलं होत. त्याला आवरताना पाहून ती मध्येच बोलते.

"नाष्टा तरी करणार आहेस की नाही ??"आई मिश्किल हसते.
"हो आई !! करणार आहे !! " तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला.
"ये मग !! तुझ्या आवडीचे मस्त दडपे पोहे केलेत!!"
"मस्तच !!" क्षितिज खुर्चीवर बसत म्हणाला.
"घे ! कधी जाणार आहेस दृष्टीला घरी घेऊन यायला !!!!"
"एक काम आटोपलं की लगेच जाणार आहे !!"
"तिला फोन करून सांगितलंस की नाही ??"
"नाही !! Surprise .!!" क्षितिज गालात हसत म्हणाला.
"छान !!" आई त्याला अजून पोहे वाढत म्हणते.
"वाह काय !! मला टेन्शन आलंय मालती ताईंच!!! त्या परवानगी देतील की नाही माहीत नाही !!"
"देतील रे !! आणि काही तसे म्हणाल्या तर फोन कर मला !! मी सांगेन हवं तर !!"
"हो चालेल!!" क्षितिज हसत म्हणाला. 

डिश मधले पोहे संपवून क्षितिज आता बाहेर निघाला होता. त्यालाही दृष्टीला भेटायची ओढ लागली होती.पण कित्येक वेळ तो कामातच गुंतून राहिला. केव्हा काम संपवून दृष्टीला आणायला जातो आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. अखेर कित्येक वेळ काम केल्यानंतर तो आश्रमात जायला निघाला. मोबाईल पाहतो तर आश्रमातून कित्येक फोन त्याला आले होते. त्याच्या मनात अनेक विचार आले. आश्रमातून इतके कॉल्स कसे काय त्याला काहीच कळत नव्हतं. अखेर तो घाईघाईत आश्रमात पोहचला. समोर मालती ताई उभ्याच होत्या. त्यांच्या जवळ जात क्षितिज बोलू लागला.

"मालती ताई !! आश्रमातून इतके कॉल्स !! सगळं ठीक आहे ना ??" क्षितिज मनात आलेल्या कित्येक विचारांना शांत करत बोलू लागला.
"कुठे होतास तू ?? तुला किती कॉल्स केले !! एकही रिसिव्ह केला नाहीस तू !! अरे दृष्टी !!" 
"काय झालं दृष्टीला??" क्षितिज मध्येच बोलला.
"अरे दृष्टी हा आश्रम सोडून गेली रे !! " मालती ताई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या.
"आश्रम सोडून ?? कुठे !! आणि तुम्ही कोणीच अडवल कस नाही तिला !! पण का सोडून गेली ती ???"

मालती ताई भानावर येत बोलू लागल्या. क्षितिजला झाली हकीकत सांगू लागल्या.
"काल तू गेल्यावर दृष्टीचे आई बाबा कित्येक वर्षांनी तिचा शोध घेत आले होते!! त्यांनी दृष्टी त्यांची मुलगी आहे अस आश्रमातल्या सगळ्या व्यवस्थापकांना पटवून दिलं !! आणि तिचा विरोध असतानाही तिला ते सोबत घेऊन गेले !!"
"सोबत घेऊन गेले ?? असे कसे घेऊन गेले?? इतक्या वर्षांनी कसे काय आले ?? आणि तुम्ही मला आता हे सांगताय !! कालच फोन का केला नाही ??" क्षितिजच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठत होते.
"काल सगळं हे इतकं अनपेक्षित घडत होतं की दृष्टीला सांभाळाताना तुला फोनच करता आला नाही !!!" मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"नाही !! खोटंय हे सगळं !! कोण कुठले लोग !! त्याच्या सोबत असच पाठवून दिलं !! मी दृष्टीला फोन लावतो !! तिला जाब विचारतो !! मला न सांगता तू गेलीस तरी कशी ते !! " क्षितिज खिशातून मोबाईल बाहेर काढू लागला.
"त्याचा काही उपयोग नाहीये !! बंद लागतोय तिचा फोन !! "मालती ताई मध्येच म्हणाल्या.
"कुठे घेऊन गेलेत तिला !! सांगितलं असेल ना त्यांनी ??" 
"नाही !! अस काहीच बोलले नाहीत ते !! " 
"मालती ताई हे काय झालं !! आज तिला मी घरी घेऊन जायला आलो होतो!! आणि ती मला न सांगता निघून गेली!! अस कस करू शकते ती !!" क्षितिज आता डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता.
"मला तिच्याबद्दल काहीही कळाल!! ती कुठे आहे !! तर मी तुला फोन करून सांगेन !! तू पण तिला सारख कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर !! ती जोपर्यंत सुखरूप आहे, हे कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये !! " मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"पण तरीही!! मला अजूनही विश्वास बसत नाहीये की ती मला अस सोडून गेली ते !!" क्षितिज मालती ताईंना मनातलं बोलू लागला.
"तिने केला प्रयत्न !! पण ते सगळं एवढं अनपेक्षित होत की तिला ते सावरून घेता नाही आल. शेवटी जाताना ती एकच म्हणाली, क्षितिजला सांगा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही !! मला तुझ्यासोबत घेऊन चल !! अगदी कायमच !!" मालती ताई क्षितिजला सगळं काही सांगत होत्या.

क्षितिज हताश होऊन परत चालला होता.त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजलं होतं. दृष्टीचा तो सुंदर चेहरा त्याच्या नजरे समोरून हटतच नव्हता.गाडीच्या त्या वेगात त्याच्या विचारांच्या वेगालाही मर्यादा राहिली नव्हती. दिशाहीन वादळा सारखी त्याची अवस्था जणू झाली होती. 

"एखादी व्यक्ती मनात घर करून बसली, की तिच्यासाठी काहीही करावं असं हे मनच त्याला सांगत!! ती व्यक्ती विसरून गेली असेल तर आठवणींच्या विश्वात पुन्हा त्याला जिवंत करावं असं हे मन त्याला सांगत !! त्याच चित्र काढावं अस की त्याचे रंग आपण बनावे अस हे मनच सांगत !! मग हे मन या आठवणीतल्या त्या व्यक्तीला चारही दिशा शोधावं असंही सांगत !! पण तरीही ती व्यक्ती शोधूनही सापडत नसेल तर काय करावं !! हे मन मात्र ते सांगत नाही !! त्या आठवणी कश्या पुसाव्या तेही सांगत नाही !! माझी दृष्टी माझ्यापासून दूर गेली !! कुठे गेली ?? कुठे असेल ?? काही माहीत नाही !! चारही दिशा मी तिला शोधलं पण मला ती काही सापडत नाही !! अगदी कालपर्यंत जीच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे !! तो हतबल होऊन बसला आहे !!" क्षितिज आपल्याच विचारांच्या तंद्रीत बसून राहतो. आश्रमासमोर ,गाडीतच.

अखेर कित्येक वेळ तसाच बसून राहिल्या नंतर क्षितिज घरी जायला निघतो. त्याचे मन मात्र त्या आश्रमातून निघेना. दृष्टीला अजूनही ते मन तिथेच शोधत होते. जड पावलांनी तो जायला निघाला, घरी जायला उशीर झाला. घराचे दार उघडताच आई समोरच उभी होती. दृष्टी येणार म्हणून तिने सगळी तयारी केलेली होती. क्षितिजला एकट्याला पाहून आई विचारते,

"एकटाच आलास !! दृष्टी नाही आली ??" आई प्रश्नार्थक नजरेने पाहते.
"नाही !" क्षितिज थोड तुटकच बोलतो.
" का रे ?? मालती ताईंनी परवानगी दिली नाही का ?? तुला म्हटलं होत मी तसं काही असेल तर मला फोन कर म्हणून !! मी सांगितलं असत त्यांना !!" आई क्षितिजकडे बघत म्हणते. काहीतरी झालं आहे याची जाणीव तिला होते.
"नाही !! तसं काही नाही!!" 
"काय झालं क्षितिज ?? काही सांगशील का ??" 
"आई दृष्टी आश्रम सोडून निघून गेली !! "
"आश्रम सोडून निघून गेली ?? कुठे ?? आणि का ??"
"काल कित्येक वर्षांनंतर तिचे आई बाबा तिला शोधत आले होते म्हणे !! त्याच्या सोबत ती निघून गेली!! " क्षितिज समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
"असे कसे आले आई बाबा ?? आणि कोण कुठली माणसं !! आश्रमातल्या लोकांनी विश्वास ठेवलाच कसा??" 
"त्यांनी त्याच्याकडे काही कागदपत्र दाखवली !! तिची एक जन्मखून सांगितली !! त्यानंतर त्याची खात्री पटली आणि त्यांनी तिला जाऊ दिल !!" क्षितिज बसल्या आवाजात सार काही सांगू लागला.
"जाताना तिला तुझी एकदाही आठवण आली नाही ??"
"तिचा विरोधच होता म्हणे !! मालती ताई सांगत होत्या !! पण अखेर नाईलाज झाला !! आणि ती गेली त्यांच्यासोबत !!कुठे गेली !! आता सुखरूप आहे की नाही !! काहीही माहीत नाही !! " 
"तिचे आई वडील मिळाले याचा आनंद करावा की दुःख काहीच कळत नाहीये !! पण ती तुला अशी सोडून नाही जाणार !! तू नकोस असा हताश होऊस !!" आई क्षितिजला धीर देत म्हणाली.
" मला तर हे सगळं खोटं आहे अस वाटतंय !!" क्षितिज स्वतःला सावरत म्हणाला.

क्षितिज आई सोबत कित्येक वेळ आपल्या मनातलं बोलून अखेर आपल्या खोलीत आला. कित्येक वेळ आज झालेल्या गोष्टी आठवून विचार करत बसला. दृष्टी आज अचानक कुठे निघून गेली हे त्याला काहीच केल्या कळतं नव्हतं. त्याने कित्येक वेळा तिचा फोन लावून पाहिला पण अजूनही बंदच लागत होता. आश्रमात विचारून पाहिलं तिथेही ती कुठे गेली काहीच कळतं नव्हतं. 

रात्र अशीच गेली, रात्रभर क्षितिज झोपलाच नाही. दृष्टीच्या आठवणींनी त्याला पुरत वेडून घेतलं होत. "तिला दृष्टी नाही, तरी ती माझ्या नजरेतून ही दुनिया पाहत होती. पण आता न सांगता निघून गेली , मग आता ही दुनिया ती कशी पाहत असेल ??दृष्टी !! कुठे आहेस तू ?? तुझ्या आठवणी खूप छळतात मला !! तुलाही माझी आठवण येत असेलच ना?  कुठे आहेस ?? कशी आहेस ?? " तुझ्या आठवांचा हा पाऊस सतत मला भिजवत आहे." 

"हरवून गेल्या दिशांना 
व्यर्थ उगाच शोधणे!!
डोळ्यातल्या अश्रूंना
तुझीच ओढ लागणे!!

व्यर्थ सारी स्वप्ने ही
एकांत मनी तो दिसणे!!
तुझ्या आठवांच्या जगात
उगाच फिरुनी येणे!!

हात तुझा हाती असावा
क्षणाचे हे बोलणे !!
आयुष्यभराची आठवण तू
हेच खरे जगणे !! "

क्षितिज कित्येक वेळ त्या अंधारात त्या खोलीत बसून राहिला.

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...