शर्यत || कथा भाग ७ || गावाकडच्या गोष्टी || Sharyat Katha ||



कथा भाग ७

सखा दरवाजात येताच त्याला शांताच्या खोकण्याचा आवाज आला. तो लगेच आता पळत गेला. शांता सारखं खोकत होती, तो पटकन तिला पाण्याचा तांब्या देत म्हणाला,
"कशाला काम करत बसतेस !! अधिच तुला बरं वाटतं नाहीये !! त्यातून ही झाडलोट कशाला !! "
"आहों मग कोण करणार ही काम !! "
"मी करणार !! "
"तुम्ही ??" शांता थोड हसत म्हणाली.
"हो मी !!" तिच्या हातातील झाडू घेत सखा म्हणाला.
झाडू एका कोपऱ्यात ठेवून ,सखा आवरू लागला. मध्येच तो शांताला बोलू लागला.
"शांता आता शर्यत जवळ आली !! उद्या आप्पांनी मला महादेवाच्या मंदिराजवळ बोलावलं आहे !! शर्यत काय आहे ते समजावून सांगणार आहे मला !! "
"होका !! आणि साहेब काय म्हणाले ??"
"काही नाही !! शर्यतीवर लक्ष दे म्हणाले !!"
"एकदाका शर्यत जिंकली की मोठ्या गावाला जाऊन तुझा इलाज करू आपण !! "
"मला काही एवढं झालेलं नाही !! तुम्ही काळजी नका करू !! मी होईल बरी !!" शांता सखाला धीर देत म्हणाली. 
"ताप आहे अजून !!" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
शांता काहीच बोलत नाही.

रात्रभर सखाला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात शांता आणि शर्यत यांच्या विचारांची जणू चढाओढ लागली होती. एक मन त्याला सांगत होत सखा सगळं ठीक होईल आणि दुसरं मन त्याला सांगत होत सखा तू म्हणतोस तस झालं नाही तर ?? काय करायचं!! त्या विचारांनी त्याला पुरत वेढून घेतल होत. मध्ये मध्ये शांता खोकत होती त्या आवाजाने पुन्हा तो भानावर येत होता. अशात सारी रात्र निघून गेली. 

सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले.
"व्हा सखा ! बरं झालं लवकर आलास !! आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये !! " आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले ,
"तयार आहात ना रे सगळे !! " 
सगळे एका सुरात म्हणाले.
"हो !!" 
सखा फक्त पाहत राहिला.
"तर सखा तुझ्या हातात गावाच्या वेशीवर असलेला एक झेंडा असेल !! शर्यतीच्या दिवशी इथ पन्नास गावांच स्पर्धक येतील !!तेव्हा आजच तुला सांगणं गरजेच आहे !! " आप्पा सखाकडे पाहत बोलत होते.
"तर या मंदिराच्या खालच्या मैदानावरून शर्यतीला सुरुवात होईल! अगदी सुरुवातीलाच आपल्याला पाडण्याचा , जखमी करण्याचा प्रयत्न होईल !! त्यासाठी घोळक्यातून जेवढं लांबून पळता येईल तेवढं पळायचं !! मध्येच कोणी शिव्या देईल !! एखादा प्रतिस्पर्धी तुला भुलवण्याचा प्रयत्न करेल !! पण आपण फक्त समोर बघत पळत राहायचं !!"
"आप्पा हे सगळं टाळता नाही येत !! मारणं, पाडणं?? त्या देवाच्या जत्रेत हे असं ??"
"सखा !! अरे खुद्द देवाने सुद्धा अशा क्रूर प्रवृत्तींचा सामना केला आहे !! मग आपण तर माणूस आहोत ! आणि तू प्रतिकार केला नाहीस तर सुरू होण्याआधीच संपून जाशील !!! खरतर हे शर्यतीत नाहीच !! पण प्रतिष्ठा पणाला लागली की डावपेच हे होणारच !! पण आपण तरीही चांगल्या मार्गाने जिंकण्याचा प्रयत्न करायचा !!" आप्पा पुढे चालत जाऊ लागले.
आप्पा खालच्या मैदानावर आले. समोर उभा राहून म्हणाले.
"सखा इथून सावंतवाडीच्या मंदिरात जायला तुला कमीत कमी वेळ कसा लागेल याचा प्रयत्न कर !! चल !!"

सखा पुढे चालत आला. त्या मैदानावर आप्पांनी आपल्या पायांनी एक रेष ओढली होती. सखा त्यांच्या इशार्याची वाट पाहू लागला. आप्पांनी धावण्याचा ईशारा देताच सखा जोरात धावू लागला. चार पावले पुढे जातो न जातो तोच त्याच्या पायावर जोरात फटका बसला. सखा जमिनीवर जोरात पडला. आप्पा धावत त्याच्या जवळ आले.
"उठवारे !! " बाजूच्या लोकांना आप्पा म्हणाले.
सखा हळू हळू उठला. शेजारच्या एका माणसाने त्याच्या पायावर जोरात चाबूक मारला होता. पायावर लाल जखम दिसू लागली होती.
"सखा मी काय म्हणालो होतो!! या अशा लोकांपासून , अशा डावपेचात तुला पुढं जायचयं ! तू प्रतिकार करायचं नाही असं नाही !! "

सखा पुन्हा त्या रेषेजवळ आला. पुन्हा धावू लागला.चाबूक फिरवणारा पाहताच त्याला हुलकावणी देऊन सखा पुढे धावत सुटला. अगदी जोरात , वाऱ्याच्या वेगाने , त्याला समोर फक्त आता सावंतवाडी मंदिर दिसत होत. सखा धावत होता अगदी जोरात , अचानक मध्येच कोणीतरी अडथळा बनून येत होत. सखा त्याला चुकवून मध्येच ते अंगावर घेऊन धावत होता. पाहता पाहता त्याने सावंवाडीतील महादेवाचं मंदिर गाठलं. पुन्हा तिथे क्षणभर थांबून तो सुतारवाडीच्या मंदिरात आला. आप्पा तिथे त्याची वाट पाहत होते. त्याच्या सोबत धावत गेलेल्या एका पोराला त्यांनी विचारलं
"किती वेळ लागला रे ??"
"मागच्या शर्यतीत धोंडा पाटीलला लागला होता त्यापेक्षा जरा जास्तच लागला !!" 
"म्हणजे माझ्यापेक्षाही कोणीतरी जोरात धावत ??" सखा आश्चर्यचकित होत म्हणाला.
"सखा शर्यत एवढी सोपी नाही बरं !! तुझ्यापेक्षा जोरात आणि तरणे स्पर्धक असतील स्पर्धेला !! त्यांना हरवण सोप्पी गोष्ट नाही !!" आप्पा सखाकडे पाहत म्हणाले.

दिवसभर आज त्यांची शर्यतीचीच पूर्वतयारी चालू होती. शेवटी सुर्य मावळतीला आला आणि आप्पा म्हणाले.
"सखा आता घरी जा !! मी तुला काय सांगितलं ते सगळं काही लक्षात ठेव!! लक्षात ठेव एक चूक खूप महागात पडू शकते आणि आता आपण शर्यतीच्याच दिवशी भेटू, तोपर्यंत आराम कर , आणि शर्यतीच्या दिवशी तयार राहा !! " आप्पा सखाला एवढं बोलून निघाले.
सखा काहीच बोलला नाही. तो फक्त पाहत राहिला.

सगळं काही लक्षात ठेवून तो घरी आला. झालं ते त्याने शांताला सांगितलं, पण पायावर झालेली जखम त्याने सांगितली नाही. शांताने ती पाहिली आणि तिने लगेच विचारल,
"पायाला काय लागलंय एवढं ??"
सखा अडखळत बोलू लागला, त्याला शांताला शर्यत किती जीवघेणी आहे हे सांगायचं नव्हतं. तिला त्या अवस्थेत अजून त्रास द्यायाचा नव्हता.
"काही नाही !! धावता धावता पडलो बाकी काही नाही !! "
शांता पुढे काहीच बोलली नाही.
"आता फक्त थोडा वेळ राहिलाय शांता !! एकदाका ही शर्यत मी जिंकली !! की आपण दोघे मस्त मजेत राहुत !! "
शांता सखाकडे पाहून म्हणाली.
"हो !! तुम्ही शर्यत जिंकणार याची मला खात्री आहेच ! या वयात घेतलेली ही कष्ट तो परमेश्वरी ही वाया जाऊ देणार नाही !! त्या महादेवाला माहितेय सगळं !! तो नक्की तुम्हाला यशस्वी करेन !"
डोळ्यात आलेला एक टिपूस पुसत शांता सखाकडे पाहत राहिली.

सखाला आता शर्यतीच्या दिवसाची ओढ लागली होती. थोड्याच क्षणात त्याला सर्वांची मन जिंकायची संधी मिळणार होती. तो आता शर्यतीत स्वतःला हरवून गेला होता.

क्रमशः

✍️योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...