मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ...!✍ (कथा भाग ४)

"तुझ्यासाठी कित्येक कविता लिहिल्या विशाल !! माझ मन मला सांगत होत, तू कुठेतरी नक्कीच वाचत असणार!! पण ते असं !! याचा कधीच विचार मी केला नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं !! एक प्रेयसी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून यावं !! एवढीच इच्छा होती माझी!!" प्रिती विशाल समोर व्यक्त होत होती.
"पण .. ते ... अस भेटावं .. अस मला ..ही नको होत!! " विशाल हळू आवाजात प्रितीला बोलू लागला. बोलताना  त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला.
हे सगळं पाहून प्रिती त्याला सावरायला पुढे आली. मारिया बाहेर विशालसाठी पाणी आणायला गेली.
"तू गेल्या नंतर कित्येक दिवस मला काहीच सुचत नव्हते!! आई आणि बाबांनी नंतर लग्नासाठी हट्ट धरला
, आणि लग्न केले. पण त्या नंतरही मला तुला विसरण अवघड होतं. पण संसार मात्र चांगला केला. आपल्या प्रेमाचं दुःख संसारावर पडू दिलं नाही. तुझ्या आठवणी होत्याच सोबत , नंतर लिखाणाला सुरुवात केली. तुला तिथे जपलं , माझ्या जवळ ठेवलं. अगदी कायमचं!! " प्रिती विशालला खूप काही सांगु लागली.
तेवढ्यात मारिया खोलीत आली. पाण्याचा ग्लास प्रितीकडे देत ती म्हणाली.
" पाणी !!!"
प्रिती मारियाकडे पाहत पाण्याचा ग्लास घेत विशाल जवळ आली. विशालला मानेला अलगद आधार देत थोड उठवत पाणी पाजू लागली. पण पाणी पिताच विशालला खोकला लागला.
"हळू !!" प्रिती.
"मारिया , तुला आठवत !! जेव्हा तू आम्हाला पहिल्यांदा सोबत पाहिलं होतस तेव्हा काय म्हणाली होतीस!!"
प्रिती ग्लास तिच्याकडे देत बोलू लागली.
"आठवत ना !! " मारिया थोड स्मित करत म्हणाली.
"पण बघ ना !! आज मात्र मी तशी नाहीच !! खूप काही बदल झाला आता !!" प्रिती.
तेवढ्यात विशाल काहीतरी बोलू लागला. मारिया आणि प्रिती त्याच्याकडे पाहत होत्या.
"मी तरी... कुठे .. आता तसा ... राहिलो... मीच मला हरवून गेलो !! या बंदिस्त खोलीत हरवून गेलो .... हरवून ... गेलो... !! " विशाल स्वतः ला सावरत म्हणाला.
"गप्प बस !! उगाच ....!!" प्रितीला पुढचं बोलवेना. ती खोलीतून बाहेर गेली. तिच्यामागे मारिया ही आली.
"मारिया !! मला खर खर सगळं सांग !! विशालची ही अवस्था का झाली. तो असा अंथरुणाला खिळून का आहे??? सांग मारिया !!" प्रिती मारियाल विचारू लागली. कित्येक अश्रू तिला बोलू लागले.
"प्रिती !! कस सांगू !! विशाल !!! " मारिया खोलीकडे पाहू लागली.
"मारिया !! त्याला मी काही बोलत नाही!!"
मारिया आता प्रितीला सगळं सांगायचं या निर्धाराने बोलू लागली.
"तुझ्या आणि विशालच्या प्रेमाला खरंतर तुझ्या बाबांनीच वेगळं केलं प्रिती !!"
हे ऐकताच प्रिती प्रश्नार्थक मुद्रेने मारीयकडे पाहू लागली आणि म्हणाली.
"माझे बाबा !! कसे काय !! आणि विशालच्या अवस्थेला ते कसे जबाबदार ??"
"तुला भेटायचं म्हणून विशाल त्या दिवशी घरातून बाहेर पडला. पण तुला भेटायच्या आधी त्याला तुझ्या बाबांची भेट झाली. त्यांचा तुमच्या या नात्याला विरोध होता. विशालने खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते नाहीच समजू शकले. बोलताना तुझ्या बाबांचा राग अनावर झाला आणि !!!" मारिया बोलता बोलता थांबली.
"पुढे काय मारिया !! " प्रिती अगदिक होऊन म्हणाली.
"पुढे जे झाल ते तू पहातेच आहेस !! तुझ्या बाबांनी रागात विशालला धक्का दिला !! रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे दोघे, पण तुझ्या बाबांच्या धक्क्याने विशाल रस्त्याकडे फेकला गेला . रस्त्यावरून जाणारे वाहन विशालला धडकले!! आणि त्याला त्यात त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले!!" मारिया डोळे बंद करून ते सगळं बोलू लागली.
"नाही मारिया !! हे सगळं खोटं आहे !! "
"पहिल्यांदा मलाही हे खरं वाटलं नाही !! पण जेव्हा तुझे बाबाच त्याला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा त्यांनीच मला हे सगळं सांगितलं.!! त्याची चूक झाली अस ते म्हणाले !!" मारिया.
प्रिती हे सगळं ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावं तेच कळेना. कित्येक क्षण दोघीही शांत होत्या. मारिया पुन्हा बोलू लागली.
"हे सगळं घडल्या नंतर तुझे बाबा रोज विशालकडे येत होते !! आपल्या केलेल्या चुकीची माफी मागायला. पुढे आज कित्येक वर्ष या खोलीत तो पडुन आहे !!  त्यामुळे कित्येक आजारांनी त्याला त्रस्त केलंय!!"
"पण बाबांनी हे केलं ! माझ्या प्रेमाला अशी शिक्षा का?  प्रेम मीही केलं होत !! मग त्याची शिक्षा मला द्यायची !! " प्रिती मनातलं बोलू लागली.
तेवढ्यात खोलीतून आवाज आला. प्रिती आणि मारिया दोघीही पळत खोलीत गेल्या.
"विशाल !! विशाल !! " प्रिती विशालच्या जवळ जात बोलू लागली.
"मारिया !! विशालला दवाखान्यात घेऊन जाऊयात का?"
मारिया काहीच बोलली नाही. ती फक्त पाहत होती.
"तुला .. शेवटचं .. पहायचं .. ही एकच .. इच्छा होती माझी !! पण तेही माझ्या ... आठवणीतून .. तू मला कधी ... पुन्हा ... भेटूच नये ... असच वाटायचं ... " विशाल अडखळ त बोलत होता.
"का ?! माझ्या लिखाणावर प्रेम केलंस !! मग ती पत्र पाठवलीस !! निरंजन म्हणून पाठवलेलं प्रत्येक पत्र मला निरंजनाचा नाही ,तुझ्या प्रेमात पाडत होत !! पुन्हा पुन्हा!! मी फक्त तुझ्याच सारखा अजून कोण आहे हेच पाहायला आले होते !!" प्रिती विशालच्या हात हातात घेत म्हणाली.
विशाल फक्त हसला. तिचा हात घट्ट पकडत तो बोलू लागला.
"तुझ्या लिखाणाने ... मला तू... माझ्यापासून ... दूर .. आहेस असं .. कधी .. वाटलच नाही ... !! न. .. राहवून मी तुला ..... पत्र लिहायचो....! मला तुझ्या त्या ... चार .. ओळी खूप .. आवडतात..... पहिल्या ... पावसाच्या .... सरी "

प्रिती पुढे त्या ओळी म्हणू लागली.
"पहिल्या पावसाच्या सरी
हळुवार भिजली ती माती
त्या मातीच्या वासात जणू
आठवांचा गंध गवसला

तुझ्या असण्याची ती जाणीव
प्रत्येक थेंबात तुला शोधून
त्या थेंबात जणू मज तेव्हा
तुझाच चेहरा पुन्हा दिसला

कश्या पुन्हा नव्याने आता
त्या वेली जणू बहरल्या
साऱ्या हिरवळती जणू मज
नव्याने मज तू भेटला

दाटून आल्या आभाळी
ढगांच्या कित्येक लहरी
हळुवार वाऱ्यासवे तेव्हा
जणू तूच सख्या, पुन्हा बरसला

अगदी मनसोक्त !!!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत शांत झाली. क्षणभर ती स्वतःलाही हरवून बसली भानावर येताच ती विशालकडे पाहू लागली. विशाल शांत होता .
"विशाल !!! विशाल !!! " प्रिती विशालकडे पाहून बोलू लागली.

क्रमशः ...

©✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...