कुठे रंगीबेरंगी दिसावे, कुठे बेरंग असावी !!
रंगात रंगून तेव्हा, आनंदाची उधळण करावी !!
नुसत्याच त्या रेशांमधून, जीवनाची वाट पहावी !!
सार काही इथेच, तरीही शोधाशोध करावी !!
भरल्या त्या हृदयात, अनोळखी ती पाहावी !!
ओळख त्या आपुल्यांची, अबोल होऊन जावी !!
घर ते स्वप्नांचे , भिंत जिथे उरावी !!
ओढ होईल जाण्याची, मनास आवर घालावी !!
रमून जाईल मन, प्रेमाची उब दिसावी !!
कुठे स्पर्श मायेचा, कुठे ती असावी !!
प्रेम ते नितांत, क्षणास बोलून जावी !!
थांबवावे मग क्षणास, आठवण ती भरावी !!
जाऊच नये कूठे, जणू बांधून ठेवावी !!
कितीही केले तरी, सहज ती सुटावी !!
जून्यास सामावून घेता, लाट नवी यावी !!
आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !!
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी !!
बेरंग त्या कागदावर, सहज उतरवून घ्यावी !!
रंग भरल्या जीवनाची, कविता ती व्हावी !!
© योगेश खजानदार
All Rights Reserved
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply