तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||



  आयुष्याच्या एकातरी पायरीवर आपण नकळत अडकून जातो, ना पुढे जाण्याचा मार्ग सापडतो ना मागे येण्याचा मार्ग. मागे जाण्याचा मार्ग तर पूर्णपणे बंद होतो. अशावेळी आपण हतबल होऊन बसतो अगदी निवांत , त्यावेळी काय करावं याचा विचार करत , तो क्षण असा असतो की लोकांनी दिलेला छोटासा सल्लाही आपल्याला आपला अपमान वाटायला लागतो. आपण ठरवलेले मार्ग ,आपले ध्येय याच्यामध्ये आलेल्या त्या संघर्षात आपण शांत होऊन जातो.  यामध्ये मग येते वेळ ती इतरांच्या मार्गांची, त्यांच्या सल्ल्याची. कधीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या आयुष्याचे निर्णय ज्यावेळी इतर लोक घेऊ लागतात तेव्हा आपण आपल्यावर विचार करण्याची वेळ आलेली असते. पण फक्त विचार करणं पुरेस नाही त्यावर काहीतरी मार्ग काढण्याची वेळ आलेली असते. शेवटीं आपण जिथे हतबल होऊन थांबतो, तेव्हा विचार करावा की, आपण दुसऱ्याच्या विचारांवर चालण्यासाठी हा अट्टाहास केला होता का?नाही ना?? पण याचा अर्थ असा नाही की कोणाचंच ऐकायचं नाही!! योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं. कारण असे कित्येक लोक असतात जे योग्य सल्ला देतात, त्याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण रस्त्यावरचे पथदिवे आपल्याला मार्गावर योग्य चालायची दृष्टी देतात. मग ठरवा नवे मार्ग आपल्या विचारांचे आणि चालायला लागा. कुठे एका ठिकाणी थांबून राहू नका. 

निर्णय हे नेहमी योग्यच असतात असे म्हणणे म्हणजे आपणच आपली चेष्टा करून घेतल्या सारखे आहे. निर्णय हे अवलंबून असतात परिस्थितीवर , जशी परिस्थिती तसे निर्णय हे घ्यावे लागतात. तेव्हा कधी निर्णय फसतात सुद्धा. अगदीच सांगायचं तर आपण शैक्षणिक शिक्षण पूर्ण केल्यावर आयुष्याचा घेतलेला निर्णय, हा अगदी काहीच लोकांवर यशस्वी होतो. तर कित्येक लोक जसं ठरवतात तसे होईलच अस नसतं. म्हणुच आपण आयुष्यात अगदीच एका निर्णयावर कधी अवलंबून राहावं हे चुकीचं आहे. आपण कित्येक मोठमोठ्या अभिनेता , उद्योगपती यांच्या मुलाखती ऐकतो. त्यातील काही सहज म्हणून जातात, मला अमुक अमुक व्हायच होत पण नशीब मला इकडे घेऊन आल. म्हणजे सांगायचा उद्देश हा एवढाच की प्रत्येक परिस्थितीतून योग्य निर्णय घेत आपण शिखरावर पोहचण गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही एक उंची गाठता तेव्हा तुम्ही काय होतात. तुम्हाला काय व्हायचं होत याच्याशी समाजाला काही देणं घेणं नसतं. तो काही लोकांच्या फक्त चर्चेचा विषय होऊन बसतो. पण असही नाही की एखाद्या गोष्टीत अपयशी झालो तर माघार घेऊन दुसऱ्या मार्गावर जावं, अस अजिबात नाही फक्त तिथे प्रयत्न करताना दुसऱ्या बाजूने आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग चालत राहावं एवढंच. 

एक पायरी की दोन पायऱ्या हा जीवनाचा मार्ग चढण्याचे सूत्र असते. तुम्ही एक एक पायरी वर चढत गेलात तरी तिथेच पोहचणार आहात, आणि अगदी एका क्षणात मोठी उडी मारून पोहचलात तरी तिथेच पोहचणार. पण मग यामध्ये फरक तो काय ?? असा प्रश्न सर्वांना पडतो. फरक तो एवढाच की एक एक पायरी वर चढून गेलात तर त्या मिळालेल्या यशाची किंमत तुमच्या लेखी जास्त असेल. पण याचा अर्थ असा नाही अगदी काही क्षणात तिथे पोहचलेल्या लोकांना त्याची किंमत नाही. शेवटी आपण कुठे आहोत त्याची किंमत करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव ठरू शकतो. यामध्ये ती प्रत्येक पायरी वर चढून आलेली ती व्यक्ती आपल्या ध्येयावर आपल्या मार्गावर जास्त स्पष्ट असते. पण त्यामानाने सहज क्षणात मिळालेलं यश हे माणसाला झेपेलच अस नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर माणसाने उगाच आयुष्यात शॉर्टकट वापरू नये. कारण यशाला शॉर्टकट नसतात. असतात ते फक्त प्रयत्न. थॉमस अल्वा एडिसन , निकोला टेस्ला या महान वैज्ञानिकांना कोणतंही यश अस एका क्षणात मिळालं नाहीये. त्यासाठी त्यांना कित्येक पायऱ्या चढून जाव लागलं. 

चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ.  तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल. जसे की एखाद्या गोष्टीची आलेली सनक, किंवा राग आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी उद्युक्त करते. पण राग हा योग्य कारणाचा असावा. माझ्या माहितीतले एक सरकारी अधिकारी मला आठवतात , ते बदली करून आमच्या गावी आले होते, सरकारी कामामुळे माझी आणि त्यांची ओळख झाली, नंतर ते माझे चांगले मित्र झाले. सहजच एकदा बोलता बोलता ते मला म्हणाले, मी सरकारी अधिकारी का झालो माहितेय तुला? , या प्रश्नाच्या उत्तराकडे मी कुतूहलाने पाहू लागलो. एवढा मोठा अधिकारी झालो कारण , मी माझ्या मामाकडे राहत होतो शिक्षणासाठी , आणि ते मला माझ्या शिक्षणावरून नेहमी बोलत असायचे, मी काही करू शकणार नाही असं त्यांना वाटायचं आणि ते वाटणं माझ्यासाठी प्रेरणा होत. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. जेव्हा मी अधिकारी झालो, काहीतरी बनलो, तेव्हा त्यांच्या नजरेत माझी प्रतिमा सुधारली, माझी जिद्द मी योग्य जागी खर्च केली. 

शेवटी आपण कसे जगलो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. तुझ्यामुळे अस !! तुझ्यामुळे तस् या गोष्टींना काही महत्व नसतं. लहानपणी जेव्हा आपण पहिल पाऊल टाकतो, तिथून पुढे घडणाऱ्या सर्व गोष्टी या आपण निसर्गाला कसे उत्तर देतो यावर अवलंबून असतं. ज्या समाजात आपण जन्म घेतो त्याचे संस्कार आपण घेतो, जगण्याची दिशा मात्र आपले विचार ठरवतात. तुम्हाला शिक्षणासाठी शाळेत जायला मिळालं, पण तुम्ही उच्यशिक्षित होणार की नाही हे सर्वस्वी तुमच्या विचारांवर , जिद्दिवर , कष्टावर अवलंबून आहे. कारण या जगात शालेय शिक्षण न झालेल्या कित्येक व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी झालेल्या आहेत. म्हणून हेच मिळालं, ते नाही हे रडणं म्हणजे स्वतःची फसवणूक केल्यासारखं आहे. 

तेव्हा उठा !! आपल्या आयुष्याचे निर्णय कोणी दुसरा घेण्या अगोदर आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हा !! मार्ग दाखवणारे व्हा !! कोणाच्या सांगितलेल्या मार्गावर चालणारे होऊ नका !! लढवय्ये व्हा!! मध्येच हत्यार टाकून रडणारे नको. कारण या काही वर्षात आयुष्यात पराभूत होऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आत्महत्या हा विचार करणाऱ्या लोकांना एकच सांगावेसे वाटते, आजची परिस्थिती उद्या तशीच असेल, जेव्हा तुम्ही शांत व्हाल, पण लढाई कराल तर नक्कीच परिस्थीती बदलेल. शेवटी जिंकणं ही सवय झाली पाहिजे. आणि सवय ही सतत कार्य केल्यानेच होते.

✍️© योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...