वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi lekh ||

दरवर्षी वाढदिवस येतो आणि कित्येक आठवणी देऊन जातो. त्याची सुरूवात नवे वर्ष सुरू झाले की आपल्या जन्म दिवशी कोणता वार येतो तिथून केली जाते आणि दरवर्षी हे नक्की होत. हल्ली तर लहान मुलांचे महिन्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात. पण पूर्वी तस काहीच नसायच, जन्म दिलेल्या आईलाही आपलं मूल केव्हा जन्मल हे नीटसं आठवत नसायचं. अगदी लांब कशाला माझ्या आईच तसच काहीस आहे. तिला तिची जन्म तारीख नक्की कधी आहे हेच माहित नाही. आज्जीला विचारलं की आज्जी एवढंच सांगायची की मोठी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुझ्या आईचा जन्म झाला, १९६७ की ६८ ते नीटसं सांगता येत नाही, पण त्यादिवशी मंगळवार होता. बस्स एवढंच ते काय माहिती आईच्या वाढदिवसाबद्दल. मग काय गेली कित्येक वर्ष आईचा वाढदिवस आम्ही द्वादशीला साजरा करू लागलो. पण नक्की तारीख ती काय जाणुन घ्यायची इच्छा मला काही शांत बसू देईना.




या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुलै १९६७ वार मंगळवार आणि द्वादशी हे सगळं या तारखेत आज्जीने सांगितलं तस जुळून आल आणि आईचा वाढदिवस त्यानंतर १८ जुलैला साजरा होऊ लागला. 

वाढदिवस आणि ती नेमकी तारीख हा घोळ पूर्वीच्या बऱ्याच लोकांमधे सहज पाहायला मिळतो, काहीचा वाढदिवस शाळेतल्या गुरुजींच्या कृपेने १ जूनला साजरा केला जातो आणि त्याबद्दल विचारलं तर हे लोक सहज म्हणतात, माझ्या आई बापाला कुठे आठवत होती तारीख  शाळेत घेऊन गेले, आणि मास्तरांनी लिहिली १ जून आणि तीच आमची ऑफिसियल जन्मतारीख झाली. 

म्हणूनच की काय पूर्वीचे लोक तिथीनुसार जन्मदिवस साजरे करत असत कारण त्यावेळी या इंग्रजी कॅलेंडरचे एवढे चोचले लोकांना माहित नव्हते. पण आता काळ बदलत गेला, ग्रेगोरियन कॅलेंडर हे आता जणू साऱ्या जगाचं कॅलेंडर झाल. म्हणूनच की काय मीही आईच्या वाढदिवसाच्या जन्मतारखेचा घोळ या इंटरनेटच्या सहाय्याने सहज सोडवला.

आता जणू वाढदिवस म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच होऊन बसला. राजकीय लोकांना तर यातून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे एक कारणच मिळाले. केक, गिफ्टस , ग्रीटिंग कार्ड्स या साऱ्या गोष्टी यामागे जणू हळूच येऊन बसल्या. ती वाढदिवसाची तारीख म्हणजे तो दिवस त्या व्यक्तीसाठी एक पर्वणीच झाली. 

पण मला अजूनही नवल वाटत ते जुन्या लोकांचं त्यांनी कधी या गोष्टींना एवढी किंमत का दिली नाही याची.  जणू त्यांना मूल जन्मल्याच काहीच वाटत नव्हतं असच वाटतं असावं. पण हाही भ्रम माझा दरवर्षी मोडतो. माझी आज्जी न चुकता आजही आईला द्वादशीला आवर्जून फोन करते. तिला वाढदिवसाची शुभेच्छा देते. मग हा तारखेचा विषय कशासाठी तर बदलत जाणाऱ्या काळासाठी. कदाचित काही वर्षांनी अजून दुसरे काही येईल, पण बदलणार नाही ती वेळ. 

पण आता या तारखेच्या गोंधळातून वर येत विचार करावासा वाटतो तो आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवलेला वेळ, सर्वात जास्त महत्त्वाचं खरतर ते आहे, आज पद्धत बदलली पण आपल्या माणसांची सोबत तीच आहे यात आनंद आहे. खरतर येत्या काळात अजून खूप काही बदलत जाईल. त्यादृष्टीने आपल्याला सुद्धा बदलत जायला हवं असं आता वाटत, पण बदलायच म्हणजे जुनं विसरायचं अस आहे का?? तर अजिबात नाही. आजही तारखेनुसार वाढदिवस साजरे झाले तरी तिथीनुसार येणाऱ्या वाढदिवसाला आवर्जून एक फुल तरी नक्की दिलं जात. एक जुन्या त्या क्षणांची आठवण म्हणून. 

शेवटी काय असतं तर वाढदिवस साजरा करणं महत्त्वाचं नसतं तर ती व्यक्ती आपल्या सोबत आहे. तिचा सहवास आपल्या सोबत आहे, आणि त्या क्षणांचा आनंद घेणं महत्त्वाचं असत. शेवटी वाढदिवस केवळ निमित्तमात्र. 


✍️योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...