अधुरे स्वप्न !!!

  "कुठेतरी ती सांज तुझी आणि माझी वाट पहात असेलच ना !! तो खळखळ आवाज करणारा समुद्र !! त्याच्या त्या लाटा आजही तुझ्या आणि माझ्या येण्याची वाट पाहत असतीलच ना !! तो मावळतीकडे जाणारा सूर्य कदाचित उद्या मला एकटा पाहून कित्येक प्रश्न विचारेल !! त्याला मी काय उत्तर द्यावं!! हे तरी सांगून जा !! ज्या वळणावरती आपण रोज भेटायचो तिथे मी एकटाच कित्येक दिवस तुझी वाट पाहत बसलो तर त्या वाटेवरचे ते पारिजातक माझ्यावरच रुसून बसेल ना!! मग आयुष्यभर साथ देण्याच वचनं दिलेली तू मला एकांताच्या या काळया रात्रीत का सोडून जावीस !! सांग ना ??" त्या अबोल सायलीकडे पाहून कित्येक वेळ सोहम एकटाच बोलत होता. आपल्या मनातलं सारं काही तिला सांगत होता.
सायली एकटक फक्त त्याच्याकडेच पाहतच होती. कित्येक वेळ शांत होती. सोहम फक्त तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतं होता.
"सायली हा तुझा अबोला मला खरंच खूप त्रास देतोय !! बोल काहीतरी !! शेवटचं एकदा मनातलं सगळं सांगून टाक मला !! कदाचित तुझ्या या बोलण्याने माझ हे हृदय तू नसताना रडणार तरी नाही!! "
"मला खरंच कळतं नाहीये रे सोहम मी काय बोलावं !! तुझ्या असण्याने मला पूर्णत्व आहे !! माझ्या कित्येक भावना तुझ्याशीच बोलतात रे !! पण माझ्या सोबत कदाचित तुझ्याही आयुष्याला काही अर्थ नसेल !! तुला अजुन खूप काही करायचं आहे !! मला त्यात गुंतवू नकोस एवढंच सांगेन मी तुला !! " सायली डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.
"पण का ?? कालपर्यंत आयुष्यभर सोबत राहायचं वचन देणारे आपण आज काय झालं की वेगळं व्हावं ??" सोहम कित्येक मनातले भाव शब्दात आणत होता.
" मी नाही सांगू शकत तुला सोहम !! पण कदाचित आपण वेगळं होण चांगलं !! कदाचित मलाही !! आणि तुलाही !! माझ्या या आयुष्याची कथाच वेगळी आहे !! नियती कदाचित माझ्याशी कित्येक डाव मांडून बसली आहे !! मी यात गुरफटून गेले !! आणि कदाचित यातून कधी बाहेर पडेल असे वाटत नाही !! " सायली सोहमचा हात हातात घेत म्हणाली.
"मला हेच कळतं नाही!! प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांना सांगणारे आज अस काय झालं की तू काहीतरी माझ्यापासून लपवते आहेस !!" सोहम.
"काही गोष्टी आपल्या सोबतच गेल्या तर बरं असतं सोहम !! त्याने समोरच्या व्यक्तीला त्रास कमी होतो !!" सायली सोहमच्या डोळ्यात पहात म्हणाली.
"पण तू सोडून जाते आहेस यापेक्षा मोठा त्रास कोणता असेल मला !!!सायली आयुष्यभर हे मन मला खात राहील !!" सोहम डोळ्यातले अश्रू पुसुत म्हणाला.
"मला विसरून जा सोहम !! एवढंच म्हणेल मी !! माझ्या नसण्याने या हृदयाला तू उगाच त्रास नकोस करून घेऊ !! "
"इतकं सोपं असतं ते ??"
"कदाचित इतकं अवघडही नसेल सोहम !!"
"तू विसरून जाशील मला ??"
"हो !!"  सायली सोहमच्या नजरेस चुकवून म्हणाली.
"आपण ज्याला सर्वस्व मानलं !! ज्याला आपण आपलं हृदय दिलं !! त्याला इतकं सोप असतं विसरण ??" सोहम स्वत:ला सावरत म्हणाला.
"मनाला समजवाव लागतं !! ते कदाचित हट्ट करत पण त्याला शांत करावं लागतं !! या मनाचं तरी किती ऐकावं आपण !! " सायली सोहम पासून लांब जात म्हणाली.
"कदाचित सायली तुझा निर्णय झालाय !! तू फक्त सांगायला आलीस ना??"
"हो !! मला यापुढे कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नकोस !! कारण मी तुला सापडणार नाही !! शोधायचं असेल तर त्या चांदण्यात शोध मी तिथेच असेल तुझ्यावर प्रेम करतं !! " सायली आकाशाकडे पाहत म्हणाली.
"हे बघ तू काय म्हणतेय मला काही कळत नाही !! पण मला वाटतं तू जावू नयेस !! " सोहम तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
"सोहम मला जावच लागेल रे ! माझ्याकडे वेळ नाहीये !! " सायली आपला हात सोडवत म्हणाली.
"म्हणजे काय ??"  सोहम जाणाऱ्या सायलीकडे फक्त बघत राहिला.
कित्येक वेळ फक्त पाहत राहिला. त्या एकांतातल्या काळोखास बोलत.
"वेळ नाही म्हणजे !!! नक्की म्हणायचं तरी काय आहे सायली तुला ?? माझ्यासाठी वेळ नाही की!!! प्रेमाच्या या वाटेवर तू मला अस का सोडून गेलीस ते तरी सांगायचं होतस!! हक्काने प्रेम केलं होतस मग एवढाही हक्क ठेवला नाहीस तू मला, की मी तुला पुन्हा बोलावून घ्यावं. सायली हे प्रेम असेच असते का ग??? आपल्याला  वाटेल तेव्हा आपण एखाद्यावर करायचं आणि वाटेल तेव्हा त्याला एकटं टाकून निघून जायचं !! पण बघ ना सायली !! तुझ्यावर रागावू की तू गेल्याच दुःख मनात ठेवू!! तू का गेलीस सोडून हेच मला कळलं नाही !! तुझ्याकडे वेळ नाहीये !! पण तो माझ्यासाठी का अजुन काही?? ते तरी सांगायचं !! पण नाही. या एकट्या काळोखात मला अखेर तू एकटं सोडून गेलीसच!! " सोहम कित्येक वेळ शांत बसून होता.
जणू कित्येक वेळ गालावरचे अश्रू त्याला बोलत होते..

विसरून जाशील मला तू
की विसरून जावू तुला मी
भाव या मनीचे बोलताना
खरंच न कळले शब्द ही

वाट ती रुसली माझ्यावरी
की वाट ती अबोल तुलाही
वळणावरती ते पारिजातक
सुकून गेले ते फुलंही

ती सांजवेळ शोधते तुला
की त्या सांजवेळेस सोबती मी
समुद्राच्या कित्येक ओढीस
बोलते ती लाटही

न तुला पाहिले मी
की मला शोधले तू
काळया रात्रीस या मग
बोलतो तो एकांतही

आठवणीत शोधतो मी
की आठवणीत राहतेस तू
अबोल या नात्याचे आपुल्या
अधुरेच राहिले स्वप्नही..!!

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...