देशाच्या मनातले...

प्रिय माझ्या नागरीका ...

    हो मित्रा , मी तुझा देश भारत बोलतो आहे. खूप काही बोलायचं आहे म्हणून हा प्रपंच. सध्या तू इतका व्यस्त असतोस की माझ्याकडे पाहायला कदाचित तुझ्याकडे वेळ नाही म्हणून पत्राद्वारे बोलण्याचा एक छोटा प्रयत्न, कित्येक दिवस झाले काही गोष्ट मनात आहेत आणि त्या तुला सांगायचा आहेत. तर मन लावून वाच ,
   १५ ऑगस्ट १९४७ रोजी मला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करून माझ्या क्रांतिवीरांनी मला एका नव्या मुक्त श्र्वासांची दिशा दिली. त्यावेळी ती उमेद खूप छान होती. मी भारतीय आहे या भारत देशाचा पुत्र आहे असे गर्वाने इथली जनता माझ्या या कुशीत गुण्या गोविंदाने राहू लागली. त्या नंतर २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक देश म्हणून माझी नवीन ओळख झाली.  तुझ्या या भारत देशाची नवीन आयुष्याला सुरुवात झाली. पण हे स्वातंत्र्य एवढ सोपं नव्हतं मिळवणं. त्यासाठी कित्येक आंदोलने , कित्येक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर , भगत सिंग, राजगुरू , सुखदेव, सुभाष चंद्र बोस अश्या कित्येक भारतीय महापुरुषांनी मोलाची वाट दाखवली. पण आता तू म्हणशील की हे सगळं मी का सांगत आहे तुला. पण तुझ्या मनावरची धूळ थोडी पुसली गेली असेन याने.
  आज मी स्वातंत्र्या नंतरच्या कित्येक काळात खूप गोष्टी पाहिल्या आणि पुन्हा तुला बोलायचं ठरवलं. आज मी कित्येक भागात विभागलो गेलो आहे ,कोणी इथे गुजराती आहे ,कोणी मराठी , कोणी पंजाबी तर कोणी तामिळ. ज्याला त्याला आपल्या गोष्टींचा आभिमान. कोणी ब्राह्मण आहे , कोणी मराठा , कोणी दलित आहे तर कोणी राजपूत ,कोणी पटेल आहेत तर कोणी जाट. अरे माझा भारतीय कोठे दिसेल का रे ?? मला शोधायचं आहे त्याला माझ्यातच मी हरवून गेलो आहे त्याला. दंगली भडकतात कोणी जातीवरून दंगल करत , कोणाच्या भावना दुखावल्या जातात तर कोणाला आजही स्वातंत्र्य हवं आहे!! पण लक्षात ठेव प्रत्येक वेळी जळतो तो देशच.  अरे!! कुठे गेली देशभक्ती ??की स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतर त्याची काहीच किंमत राहिली नाही. मला आजही पुन्हा सांगावस वाटत कित्येक उपोषण केली तेव्हा भारत स्वतंत्र झाला , कित्येक चळवळी केल्या तेव्हा भारत स्वतंत्र झाला , कित्येक सशत्र उठाव झाले तेव्हा हा भारत स्वतंत्र झाला. आणि हा स्वातंत्र्याचा अट्टाहास का ?? की आज कित्येक वर्षानंतर माझा भारतीय नागरिक मला विसरून लढेन फक्त स्वतः साठी!! की विचार करेन आपल्या प्रांताचा , आपल्या जातीचा ?? आपल्या धर्माचा ?? नाहीना !! मग कोणती ही विचारांची प्रेरणा की तुम्ही आज मला प्रत्येक क्षणाला अंतरीतून फक्त जाळतच राहाल.  मला अभिमान ही काही गोष्टींचा आहे ,त्या लोकांचा आहे, ते भारतीय आहेत याचा गर्व आहे, असे लोक म्हणजे , दिन दुबळ्याची मदत करणारे , मला अभिमान आहे त्याचा ज्यानी भारताला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात यशस्वी केलं. मला अभिमान आहे अशा लोकांचाही ज्यांनी माझ्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मला अभिमान आहे या देशातील इमानदार सेवकांचा अशाच लोकांसाठी मी आजही पुन्हा पुन्हा नव्या चेतनेने उभा राहतो.
   स्वातंत्र्य मिळाल्या नंतर मला नव्या वाटा मुक्त दिसू लागल्या. खरतर त्या दाखवल्या कित्येक महान पुरुषांनी , मी आजही माझ्या मनात त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. मग आज माझा भारतीय का भरकटतो आहे , ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी कधी कोणती जात पाहिली नाही त्यांना तुम्ही धर्मात आणि जातीय का वाटून टाकलं ?? त्यांचं कर्तुत्व यापेक्षा खूप मोठं आहे !!  या देशाला चंद्रशेखर आजाद ही तितकेच प्रिय आहे जितके अश्फाक उला खान !! माझ्या कुशीत कित्येक धर्माची जातीची लोक गुण्या गोविंदाने राहतात , त्यांचा मला अभिमान आहे! पण विचारांची दिशा भरकटलेल्या काही लोकांनी मला फक्त जाती धर्मात वाटलं. पण मी अभेद्य आहे !! आज मी कित्येक स्वप्न बाळगून आहे , भारत मोठी सत्ता होण्याच्या वाटेवर! आणि माझे कित्येक भारतीय यासाठी आजही झटत आहेत, त्याचा मला अभिमान आहे.
  माझ्या पायाशी अखंड समुद्र जलाभिषेक करत आहे आणि मस्तकी आकाश मुकुट होऊन राहिले आहे. या भूमीला महान पुरुषांचे आदर्श लाभले आहेत पण कदाचित आज आदर्श , विचार यांची भाषा  बदलून गेलेली वाटते , कित्येक चोर , गावगुंड , आरोपी सहज मंत्री होतायत , कोणी आमदार खासदार होतायत मग येणाऱ्या भावी पिढीने आदर्श घ्यायचा तो यांचाच का ?? हो भारतीयांचा हा विचार करण्या सारखा विषय आहे !! थोर पुरुष आता पुतळ्या पुरते उरले आहेत आणि त्यांच्या नावे असलेली ग्रंथालये धुळीत जाऊन पडली आहेत !! माझ्या मनातली ही खूप दुःखाची गोष्ट आहे!!  आमची मुलं शिकतात पण फक्त स्वतःच पोट भरण्याचा एक मार्ग म्हणून! मग कसली आली भारतीय असल्याची शान आणि कसले काय ?? सगळेच नुसते दिखावे !! ज्या इंग्रजांनी माझ्या भगत सिंगला मारल , जालियनवाला बाग घडवून आणली !! कित्येक वर्ष माझ्या सोन्याच्या देशाला लुटलं त्यांची भाषा आता मोठ्या अभिमानाने बोलताना दिसतात !! हे माझे आणखी एक दुःख !! कोणत्याही देशाचा अभिमान हा त्याच्या भाषेच्या कडवट पनातून येतो. आणि आता आम्ही तिथेच कमी पडू लागलो आहोत. भाषा , वेष , या गोष्टी आपल्याही तितक्याच सुंदर आहेत हे आता सांगावं लागत !!
  सुरुवात इथूनच आहे !! तुम्हाला लढायच असेन तर आपल्या देश विघातक शक्तीशी लढा !! तुम्हाला स्पर्धा करायची असेन तर देश जागतिक पातळीवर उच्च स्थानी कसा जाईन याची करा !! हेच माझ्या भारतीयां तुला भारतीय असल्याचा अभिमान असू दे !! आपल्याच थोर लोकांचे कित्येक विचार तू घे!!  मग बघ तूही आनंदाने गाणे म्हणशील !!

"जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा !! वो भारत देश है मेरा !!"

तुझाच अभिमान , गर्व

भारत देश ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...