सुनंदा...!! (कथा भाग ३)

"सूनंदे , तुझ्या पोराला गप्प कर!! कोणाला माहित कोणाची घाण आहे ते !!! " सरपंच एकदम बोलून गेला.
"श्याम , तू आजीकडे जाऊन ये !! " सुनंदा सरपंचाकडे रागाने पहात म्हणाली. तीच्या ओठांवर कित्येक शब्द आले पण ते तिने परतून लावले. या सरपंचाला माझं पोर कोणाची तरी घाण वाटत. पण कित्येक वेळी हा सरपंच इथेच येतो ना घाणीत. मी वाईट मग का येतो इथे हा ! या गोष्टी वाईट वाटतात मग माझ्याकडे आल्यावर याला शांतता का भेटते, पण फक्त स्वतःची शांतता. कधी या नीच माणसाने विचार केलाय माझा किंवा स्वतःचा बायकोचा तरी. नाहीना !! याला फक्त स्वत:ची शांतता हवी आहे. खरंच ही स्वार्थी वृत्ती कधीच कमी होत नाही. म्हणून मला वेश्या , रांड केलं जातं. फक्त आणि फक्त या स्वार्थी आणि नीच माणसांसाठी.
"ये !!! कुठ आहे लक्ष?? " चला!! " सरपंच एकदम बोलला.
"हो !! आले !! " सुनंदा सरपंचाच्या जवळ जात बोलली.
श्याम कित्येक वेळ बाहेरच बसून होता. तो आजीकडे गेलाच नाही. कित्येक वेळा नंतर सूनंदाने दरवाजा उघडला. सरपंच अगदी लपत निघून गेला.
"आई , कोण आहे तो?? मला नेहमी रागवतोच बघ !!! " श्याम सूनंदाकडे पहात म्हणाला.
"कोणी नाही !! चल तू घरात !! तुला म्हटलं होत ना आजीकडे जा म्हणून!! सुनंदा श्यामचा हात हातात घेत म्हणाली.
"श्याम , अंग गरम लागतंय रे तुझ !! "
"नाही आई , बाहेर झोपलो होतो ना!! त्यामुळे वाटत असेन. " श्याम आईला समजावत बोलला.
  श्यामला ताप आला होता हे सुनंदा ने ओळखले होते. पण एवढ्या रात्री कोण वैद्य भेटेल म्हणुंती सकाळची वाट पाहू लागली. घरगुती काही उपायही केले तिने.
"आई , तू पण झोप ना!! " श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
"नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! " सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
"आई , तू एवढी छान आहेस !! मग या लोकांना तू वाईट का वाटतेस ??"  श्यामच्या या प्रश्नाने सुनंदा काहीवेळ निशब्द झाली.
"कदाचित त्यांना मी फक्त बाहेरूनच कळले!! मनात कोणी कधी डोकावलच नाही रे !! म्हणून असेन कदाचित!!"
"म्हणजे काय आई ??"
"काही नाही बाळा!! " झोप तू!!! अस म्हणताच श्याम अलगद डोळे मिटून झोपी गेला. पण सुनंदा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दिव्याकडे पहात राहिली. कदाचित तिला श्यामला सांगायचं होत की " भावनेच्या पलिकडे वासना राहते आणि तिला मन कधी कळलंच नाही. तुझ्या नशिबी ही नरकं यातना देणारी मी, मला वाईट म्हटलं तर काही चुकीचं नाही. माझ्यासारख्या वेश्येच्या उदरात तुझ्या सारखं गोड आणि हुशार पोर देऊन कदाचित त्या विधात्याने तुझ्यावर अन्यायच केला आहे. मी वाईट आहे पण तुझ काय रे !! तुलाही हा समाज रांडेच पोर म्हणूनच हिणावतच ना!! हा दोष फक्त माझा!! त्याचीच शिक्षा कदाचित मी भोगते आहे!! तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होऊ न द्यायची म्हणूनच मला तुला शिकवुन मोठं करायचं आहे. या नरकातून बाहेर काढायचं आहे. असंख्य विचारांचा गोंधळ रात्रभर मनात करत सुनंदा झोपी गेली.
सकाळी तिला जाग आली ती शेजारच्या आजीने दरवाजा वाजवला तेव्हा.
"सुनंदा !! ये सुनंदा!! " आजी दरवाजा वाजवत बोलली.
"आले !! " दरवाजा उघडताच आजी आत आली.
"काय ग !! कधी गेला मग तो खवीस!! " आजी अगदी तिरस्काराने बोलत होती.
"रात्री उशिरा गेले सरपंच !! ते गेले आणि श्यामला पाहिलं. म्हटलं होत त्याला तुझ्याकडे झोपायला जा म्हणून पण नाही, झोपला बाहेरच!! ताप आलीय त्याला!!"
"काय म्हणायंच या पोराला!! मधे पण असाच रात्री आला होता हा तुझ्याकडं माझा डोळा चुकवून!! आई शिवाय क्षणभरपण राहत नाही पोर!! " आजी श्यामच्या जवळ जात म्हणाली. श्याम अजूनही झोपला होता. डोक्यावर हात ठेवत आजी म्हणाली.
"बाई !! ताप जास्तच वाटतोय ग आता !!! "
"रात्रीपासून आहे !!! " सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
"शेजारच्या वाडीतल्या वैद्याकडे घेऊन जा बरं पटकन त्याला!! " आजी काळजीच्या स्वरात म्हणाली.
"हो आता आवरून जाणारच आहे!!"
"तोपर्यंत त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते मी!! "आजी एकदम पुढे सरकत म्हणाली.
सुनंदा सगळं आवरू लागली. आपलं पोर बर होत नाही तोपर्यंत तीच मन कुठेच लागतं नव्हतं.
"ये सुनंदा!!"
"कोण आहे !!"
"मी आहे सरपंच!! "
"सरपंच तुम्ही या वेळी ?? " माझ्या पोराला बर वाटत नाही सरपंच जाऊ द्या मला!!!" सुनंदा केविलवाणी विनवणी करत सरपंचाला बोलत होती.
"ये , असली नाटक माझ्या समोर नाही करायची !! रांड साली!! मला नाही म्हणती !! " सुनंदाला कानाखाली मारत सरपंच खोलीत घेऊन गेला. आजी कित्येक वेळ श्याम जवळ बसून त्याची काळजी घेत होती.
"सरपंच , पोराला खूप ताप आलंय मला लवकर जायचं आहे !"
"ये , मरू दे मेल तर ते!! मला उगाच त्रास देऊ नकोस !!! "
कित्येक वेळ गेला, सरपंच आला आणि वासनेच्या जगात बुडून गेला ही. सुनंदा पलंगावर पडून होती डोळ्यात पाणी होते आणि अंगावर कित्येक घाव, तिच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू एकच बोलत होता, " अरे हा बलात्कार नाही तर काय आहे? पण तुम्हाला, या समाजाला हा बलात्कार वाटणार नाही कारण वेश्येला कुठली आलीय इज्जत ना?? " तिच्या मनाला काहीच नसेन ना वाटत आता!! शेजारी फेकलेल्या पैश्याना हातही लावू वाटत नसेन या घुसमटलेल्या जीवना पुढे. अरे हो असे बलात्कार काय होतच असतील ना !! त्यात नवल काय ते!!! कारण इथे फक्त वासना नांदते!!
"सुनंदा !! ये पोरी !! चल लवकर!! श्यामकडे चल पटकन!! " आजी एकदम ओरडतच आली.
  आजीच्या बोललण्याने सुनंदा एकदम भानावर आली . अंगावरचे कपडे नीट करत ती श्यांमकडे गेली.
"श्याम !! काय झाल बाळ !! उठ ना!! उठ ना रे बाळा!!! "

क्रमशः....

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...