आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास
साथ हवी होती ती सावल्यांना
-योगेश खजानदार
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे, कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण, नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply